Friday, 27 June 2025
पैसा, पैसा आणि पैसा!
#पैसा_पैसा_आणि_पैसा
पैसा आणि उद्योजकता या विषयाचे संस्कार मराठी माणसांवर नसल्याने या विषयावर बोलणे, आपापसात चर्चा करणे टाळले जाते. पैसा जीवनाचे सर्वस्व नसले तरी प्रत्येक ठिकाणी तुमचे पैशांवाचून अडते. आपल्याकडे किती पैसे असावेत याचा कोणताच मापदंड नाही. पैसा ही अशी शक्ती आहे जी कधीच पुरेशी आहे असं वाटतं नाही. एकीकडे सतत पैसा पैसा करणारे लोक, जे कायम प्रत्येक गोष्ट पैशांत मोजतात. येन केन प्रकारे तो केवळ आपल्यालाच मिळावा असं त्यांना वाटतं तर दुसरीकडे लोक कल्याणार्थ अतिशय निरीच्छ व्यक्ती आहेत ते पैसा महत्वाचा न मानता त्यांचे कार्य उत्तमरीतीने करीत असून भरीव कार्यही करीत असतात, अशी टोकाची उदाहरणे समाजात आहेत. आपण पडलो मध्यम प्रवृत्तीची माणसे आता आपली मनोभुमिका कोणतीही असो, पैशाचे महत्व जाणत असल्याने आणि सातत्याने प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागत असल्याने इच्छापूर्तीचे साधन म्हणून सर्वांनी त्याचा स्वीकार केला आहे. तो योग्य मार्गाने वैध पद्धतीने मिळवला आणि योग्य त्या कारणासाठी खर्च केला तर त्याचे मोल राहते हे आपल्याला पटले आहे.
या विषयावर सर्व भाषांत अनेक स्वतंत्र तसेच अनुवादीत पुस्तके असली तरी बहुतांश पुस्तके पैसा कसा मिळवावा, वाढावावा, टिकवावा अशा स्वरूपाची आहेत. अशी पुस्तके निश्चितच असली पाहिजेत याबद्दल वाद नाही परंतु मन न गुंतवता योग्य प्रकारे पैशांचा वापर केल्यास त्याचे मूल्य कसे वाढते. या विषयावर चिंतन करणारे पुस्तक अलीकडेच मी वाचून पूर्ण केलं. त्याचं नाव आहे, ‘पैसा, पैसा आणि पैसा’. हे पुस्तकं लिहिलं आहे प्रा सुरेश गर्जे यांनी. सन 2023 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची किंमत ₹170/- असून ते सकाळ पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. या शंभर पानी पुस्तकात लेखानामागील भूमिका सांगून एकंदर चौदा निबंधासारखे लेख असून ते एकामागोमाग एक अथवा स्वतंत्र वाचलेत तरी चालण्यासारखे आहे. ज्यात पैशांच्या शक्तीचे तत्त्वज्ञान, त्याचा उपयोग, आणि समाजहिताच्या संदर्भातील जबाबदारी या सर्वांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
प्रत्येक लेखाचे थोडक्यात सार अतिशय कमी शब्दात सुरवातीलाच दिले असून त्याचे अधिक स्पष्टीकरण लेखात आहे.
■लेख विषय आणि थोडक्यात स्पष्टीकरण असे,
◆पैशांचे झाड- उद्यागाच्या भूमीत कल्पकतेची बीजे योग्य वेळी पेरावी लागतात. त्यावर घामाचे चिंतन करावे लागते. तेव्हा ती बीजे अंकुरतात. रोपांच्या रूपाने डोलू लागतात. त्यांच्या वाढीच्या दृष्टीने डोळ्यात तेल घालून त्यांची मशागत करावी लागते. तेव्हा पैशांचे झाड उभे राहते. त्यांना पाने फुले बहरतात. यासाठी अहर्निश धडपड करावी लागते, कष्ट उपसावे लागतात, तेव्हा कुठे पैशांचे झाड डोलू लागते.
◆धनसंग्रह नेमका कशासाठी?- दरिद्रीनारायणाची सेवा हीच परमात्म्याची सेवा आहे. याचा अर्थ असा की, लोककल्याणाची कामे ही सत्कर्मे होत. धनसंग्रह स्वतःच्या उपभोगसाठी न करता तो जनकल्याणासाठी, गरजूच्या पीडाहरणासाठी केल्यानेच मनःशांती प्राप्त होऊ शकते.
◆पैसे कामावण्याच्या प्रेरणा- खर्च आणि काटकसर, काटकसर आणि बचत यात तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. अत्यंत जरुरी बाबींवर खर्च करणे आणि अनावश्यक गोष्टीवर खर्च टाळणे, हे शहाणपणाचे लक्षण आहे. खर्च हा नेहमी उधळेपणाच्या मर्यादेपर्यंत करू नये आणि काटकसर कंजूषपणाच्या स्तरापर्यंत पोहचू नये. खर्च आणि काटकसर यांतील सुवर्णमध्य साधला पाहिजे.
◆जोडूनिया धन- आर्थिक व्यवहारात सर्वतोपरी प्रामाणिकपणास महत्व आहे आणि असा सत्यावर आधारित, नीतिमत्तेला घरून असणारा व्यवहार ‘उत्तम व्यवहार’ सदरात मोडतो आणि त्याची उत्तम फळे कर्त्या व्यक्तीस यथावकाश निश्चितच प्राप्त होत असतात.
◆पैशाचे सामर्थ्य - पैशाची भूमिका सर्वच क्षेत्रात महत्वापूर्ण आहे. वैयक्तिक बाबतीत कुटुंब आणि परिवाराच्या संबंधी, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक प्रभाव दर्शवत असतो. कोणत्याही उपक्रमांचे आयोजन आणि सामाजिक सुधारणांचे प्रकल्प एक इंचभरही पुढे पैशाशिवाय पुढे हलू शकत नाहीत.
◆दौड पैशासाठी- सुवर्णाचा साठा सुवर्णाचे मोल कमी होऊ शकते, परंतु प्रियजनांचा, नात्यागोत्यातील जिवंत व्यक्तींच्या प्रेमाचा साठा कधीच कमी होत नाही. हीच जीवनातील खरी संपत्ती आहे. जीवनातील सुख आणि आनंद देण्याची शक्ती सोन्यात नाही.
◆पैशाची निरर्थकता- माणसाची तृष्णा थांबली, की त्याच्या ठायी असलेल्या यातनांचे शमन होयला हवे. सत्य, अहिंसा आणि करुणा हे तीन घटक मानवाची प्रज्ञा आणि शील यांच्या संवर्धनाचे कारण आहेत. ज्ञानप्राप्तीबरोबरच सदाचाराचा प्रवेश मानवी मनात झाला, की मनःशांतीचे बिजाकुरण होयला वेळ लागत नाही.
◆अपरिग्रह- आज करोडोंच्या संख्येने गोरगरीब, आसराहीन, अन्नासाठी दाही दिशा भटकणारे लोक जगाच्या पाठीवर आहेत, तोपर्यंत गांधींच्या विचारांचे गांभीर्य कायम टीकणारे आहे.
◆पैशाची सार्थकता- पैशाच्या त्यागातून प्राप्त होणारी मनःशांती, समाधान, सुख आणि आनंद आगळवेगळा असतो. मनुष्यजीवनात अशा प्रकारच्या आनंदाची अनुभूती प्राप्त करण्याचा सक्रिय सहभाग आणि प्रयत्न प्रत्येक पैसेवाल्या व्यक्तीने स्वतःच्या उत्पन्नाच्या काही भागातून करणे आवश्यक आहे.
◆सुखाचा शोध- दरिद्री लोकांचे दारिद्र्य दूर करणे, अज्ञान दूर करण्यासाठी मोफत शाळा, महाविद्यालयाची उभारणी माफक दरात शिक्षणाच्या सोयी, सर्व सुविधानी युक्त भव्य रुग्णालये, अनाथालये, विध्यार्थांसाठी वसतिगृहे, वृद्धांसाठी शुश्रुषालये, महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती, आदिवासीच्या विकासाचे उपक्रम, नैसर्गिक आपत्ती, भूकंप, समुद्री वादळे, महापुरानी ग्रस्त जनसमुदायासाठी पिण्याच्या पाण्याच्या सोई असे अनेक उपक्रम राबवण्यासाठी स्वतःजवळील घनाचा शक्य तेवढा भाग खर्च करून समाजाच्या उपकारांची अंशतः का होईना परतफेड करावी.
◆आर्थिक भ्रष्टाचार- अवैध मार्गानी पैसा जमा करण्याच्या प्रवृत्तीची कारणमिमांसा हा या लेखाचा एक एक हेतू आहे. पैशाच्या सोबत प्रतिष्ठा येते. समाजात मानसन्मान प्राप्त होतो. यासाठी आणि सुखासोयीनी युक्त, चैनींनी युक्त जीवन जगण्यासाठी आणि पिढ्यानंपिढ्याच्या आर्थिक सुरक्षतेसाठी आणि भावी काळात आर्थिक विपत्तीला सामोरे जाण्याची पाळी येऊ नये, यासाठी आवश्यक सुरक्षेची भक्कम तटबंदी उभारण्याकरिता येनकेन प्रकारेन पैसा वाढवण्याची प्रवृत्ती निर्माण होत असते. या प्रवृत्तीला मुळी अंतच नसतो.
◆पैसा आणि प्रारब्ध- समस्याचे निराकरण कसे होईल, त्यातून साहिसलामत सुटण्याचे मार्ग कोणते यावर चिंतन करणे उपयुक्त आहे. पैशांची कमतरता आहे, आर्थिक परिस्थिती बिकट आहे, दारिद्र्याची छाया कुटुंबावर आहे. अशा परिस्थितीत माणूस एकच करू शकतो, परिश्रम. पैसा कमावण्याचे परिश्रम. परिश्रमाच्या झाडाला पैशांची फळे लागतात. प्रारब्धानुसार ती कमी अधिक लागतील हा भाग वेगळा, परंतु फळे लागणार एवढे मात्र निश्चित समजले पाहिजे.
◆पैसा आणि रचनात्मक उपक्रम- मुलांना ‘धन कमवा’ हे शिकवत असताना धर्मही शिकवला पाहिजे. अर्थात नीतिधर्म किंवा मानवता धर्म. या धर्मात जी शिकवण दिली जाते, तिचा परिणाम चरित्र्याची निर्मिती आणि नैतिकदृष्ट्या वागणुकीचे संवर्धन यात होत असते.
◆सुख आणि आनंद- समाजावरील प्रेम हे प्रेमाची व्यापकता दाखवते, प्रेम ही शक्ती आहे. ती व्यक्तीला शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ प्राप्त करून देते. जनताजनार्धनावरील प्रेम ही प्रेमाची विशाल व्याप्ती आहे. हे प्रेम लोकसेवा कार्यातून व्यक्त होते. ज्यांच्याकडे अधिक धनसंग्रह आहे त्यांनी अभावग्रस्तांवर पैशांचा पाऊस पाडला पाहिजे, प्रेमाचा वर्षाव केला पाहिजे.
थोडक्यात,
●पैशाची ऊर्जा आणि सामर्थ्य: पैशामध्ये मोठी शक्ती आहे — स्वतंत्रता, संसाधने, आणि क्षमता निर्माण करण्याची क्षमता. मात्र, पैसा कच्चा संसाधन आहे, ज्याला योग्य दिशा आणि ध्येयाच्या अनुरूप वापरल्यासच फलदायी ठरते.
●वैयक्तिक वागणूक: सकस नियोजन, संयमन, गुंतवणूक आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर भर. केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर आवश्यकतेनुसार गरजू लोकांसाठी वापर करण्याद्वारे आत्मसंतुष्टी मिळते आणि समाधान वाढतं.
●सामाजिक उत्तरदायित्व:
पैसा ‘देणगी’ किंवा ‘दान’ स्वरूपात समाजाच्या भल्यासाठी वापरणे, जे आत्मिक समाधान शंभरपट वाढवते. फक्त वैयक्तिक संपत्तीच नव्हे, तर समाजातील गरजू जनतेसाठीही पैशाचा हितकारक उपयोग कसा करता येईल याचा संदेश पुस्तकातून मिळतो.
■कोणाला उपयुक्त?
◆व्यक्तिगत वित्त व्यवस्थापन शिकणाऱ्यांना – खर्च‑नियोजन, गुंतवणूक आणि बचत विषयक मूलभूत दृष्टीकोनासाठी.
◆समाजसेवी व दानप्रवृत्त लोकांसाठी – पैशाच्या समाजोपयोगाच्या मूल्यांना समजण्यासाठी.
◆चिंतनशील‑आध्यात्मिक वाचकांसाठी – तत्त्वज्ञानाने प्रेरित लेखनातून आर्थिक दृष्टीकोन प्राप्त करण्यासाठी.
■का वाचावे?
शाश्वत जीवनशैलीचा पुरस्कार करणारे हे पुस्तक वाचताना, विनोबांच्या पूर्वी वाचलेल्या ‘गीता प्रवचने’ या पुस्तकाची प्रकर्षाने आठवण करून देते. ते तुमच्या आर्थिक ज्ञानाचं परिमाण वाढवण्यास मदत करतं, आणि सोबतच समाजातील गरजूंच्या भल्यासाठी पैसे कसे वापरायचे हेही शिकवते. आत्म‑विकासाला आणि समाजोपयोगाला एकत्र साधून लेखनातून जीवनात अर्थ प्राप्त करण्याचे मार्ग दाखवले आहेत. अर्पणपत्रिकेत म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक पैशाचा सदुपयोग करणाऱ्या आणि पैशाचा हव्यास असलेल्या समस्त जनांस असले तरी कुणाचाही पैशाविषयीच्या दृष्टिकोनात निश्चित बदल करू शकणारे असल्याने संग्रही ठेवण्यासाठी, प्रियजनांस भेट देण्यासाठी योग्य आहे. पुस्तकातील लेख आणि त्याविषयीची अधिक माहिती पुस्तकातलीच आहे, मी फक्त निमित्यमात्र! अजूनही दोन पुस्तकं निवांततेने वाचतोय, उपयुक्त वाटल्यास त्यावरही यथावकाश नक्की लिहीन.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत, याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 27 जून 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 13 June 2025
फिनटेक उद्योग आणि नव्या उद्योग संधी
#फिनटेक_उद्योग_आणि_नव्या_उद्योग_संधी
‘फिनटेक’ हा शब्द यापूर्वी बऱ्याचदा वाचनात अथवा कानावर अनेकदा आला असेल. हा शब्द फायनान्स आणि टेक्नॉलॉजी या दोन शब्दांच्या मिश्रणातून तयार झाला आहे. जसे ‘निफ्टी’= एनएससी + फिफ्टी, ‘सेन्सेक्स’= सेन्सेटिव्ह + इंडेक्स. अशा प्रकारे दोन शब्दातून तयार होणाऱ्या शब्दाला मराठी व्याकरणात ‘संधी’ म्हणतात. ‘संधी’ हा शब्द ‘शक्यता, अवसर, वेळ, अवधी’ अशा अर्थानेही सामान्यपणे वापरला जातो. फिनटेक कंपन्या या वित्तीय क्षेत्रांशी संबंधित विविध कार्य हे तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होणाऱ्या शक्यताचा अधिकाधिक वापर करून करत असतात. उदाहरण द्यायचे झाले तर या कंपन्या अशा प्रकारचे डिजिटल तंत्रज्ञान विकसित करतात ज्यामुळे व्यक्ती व्यक्तीना एकमेकांना (पी 2 पी) पैसे पाठवायचे असतील तर त्याचे खास अँप्लिकेशन्स बनवले जाईल त्यामुळे हा व्यवहार सुलभ होईल. फिनटेक हा खूप व्यापक शब्द आहे. अलीकडे इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व्यवहार वाढले असले तरी भारतात अजूनही रोख रकमेने अनेक व्यवहार होत आहेत. लोक बँकांना केंद्रित ठेवून त्यांच्या माध्यमातून व्यवहार करतात. यातील काही व्यवहारांसाठी शुल्क आकारणी करण्यात येते. जर असे व्यवहार सुरक्षित, झटपट आणि अत्यंत कमी खर्चात किंवा विनामूल्य झाले तर अधिकाधिक लोक त्याकडे आकर्षित होतील. ते करण्याचे महत्वाचे कार्य या कंपन्या करत असतात. या वर्ष अखेरपर्यंत भारतातील फिनटेक व्यवसाय 230 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता असून सन 2030 पर्यंत तो 30.55% वार्षिक वृद्धीदराने 550 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जागतिक फिनटेक व्यवसायात आपले स्थान तिसरे आहे.
■फिनटेक कंपन्या या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना देत असलेल्या महत्वाच्या आर्थिकसुविधा या पारंपरिक बँकिंगपेक्षा वेगवान, सुलभ आणि किफायतशीर दरात अथवा विनामूल्य देतात.
●पैशांची देवाणघेवाण:
◆उदाहरण: फोन पे, गूगल पे, पेटीएम
◆सेवा: युपीआय, पैसे पाठवणे, क्यू आर कोड, बिल पेमेंट्स, व्यापारांना एकमेकांशी (बी 2 बी), व्यापारी आणि ग्राहक (बी 2 पी), ग्राहक आणि व्यापारी (पी 2 बी), व्यक्तींना एकमेकांशी (पी 2 पी) पैशांचे व्यवहार करण्याची सुविधा,
●कर्ज वितरण:
◆उदाहरण: क्रेडिटबी, लेंडिंगकार्ट
◆सेवा: वैयक्तिक आणि व्यवसायासाठी झटपट कर्ज, सामान मासिक हप्ते सुविधा.
●शेअर बाजार अन्य गुंतवणूक मंच
◆उदाहरण: झेरोदा, ग्रोव, अपस्टोक्स
◆सेवा: शेअर्स, म्युच्युअल फंड्स त्यातील नियमित गुंतवणूक करण्यासाठी त्याचा आढावा घेण्यासाठी योग्य अँप्सची निर्मिती
●निओबँक्स (डिजिटल बँका)
●उदाहरण: ज्युपिटर, नियो, फी
●सेवा: बँक खाते, कार्ड, खर्चाचे व्यवस्थापन (पूर्णतः ऑनलाइन) कोणत्याही शाखेत न जाता.
●विमा तंत्रज्ञान:
●उदाहरण: ऍको, पॉलिसीबाजार, डिजिट
●सेवा: विमा खरेदी, दावा प्रक्रिया, वर्गणी तुलना ऑनलाईन आणि अँप्सच्या माध्यमातून
●व्यक्तिगत आर्थिक व्यवस्थापन
◆उदाहरण: मनीव्ह्यू, वॉलनट
◆सेवा: खर्च मागोवा, आर्थिक नियोजन, क्रेडिट स्कोअर
आज बहुतेक लोकांकडे त्यांच्या मोबाईलमध्ये किमान एक तरी फायनान्शियल अँप आहे, ज्यामुळे आपले जीवन सुसह्य होण्यास मदत झाली आहे. गुगल पे/ पेटीएम यांनी मोठी बाजारपेठ काबीज केली आहे. अनेकजण उद्योजक त्यात अधिकाधिक कल्पकता आणून त्यांचे स्टार्टअप उद्योग सुरू करीत आहेत. ते स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यास सरकारी प्रोत्साहनही मिळत आहे. अनेक नावीन्यपूर्ण फिनटेक कंपन्या व्यवसायवृद्धीस हातभार लावून आपल्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम करीत आहेत. आपल्या पेमेंट करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवत असल्याने त्यांचे महत्व अधोरेखित होते
■फायदे:
●ग्रामीण भागात आर्थिक सेवा पोहोचवणे.
●कॅशलेस व्यवहाराला चालना.
●स्टार्टअप्स आणि मध्य लघु आणि सूक्ष्म उद्योगासाठी फायद्याचे.
●पारंपरिक बँकिंगला पूरक सेवा.
■आव्हाने
●नियामक नियमांचे पालन आणि सायबर सुरक्षेचा धोका.
●सन 2024 मधील पहिल्या सहामाहीत फंडिंगमध्ये 59% घट.
●योग्य टॅलेंट मिळवणे आणि ग्राहक टिकवून ठेवणे हे मोठे प्रश्न.
■संधी
●दुर्लक्षित लोकसंख्येसाठी आर्थिक समावेशाचे दरवाजे खुले.
●ग्रामीण आणि निमशहरी भागांत वाढीची मोठी शक्यता.
●पारंपरिक बँका आणि फिनटेकमधील परस्पर सहकार्याला चालना
भारतातील ग्राहकांना उपयोग होईल अशा भविष्यकालीन नाविन्यपूर्ण फिनटेक कल्पना त्यासंबधीची उदाहरणे आणि त्यांचे परिणाम
●पूरक वित्त - (Embedded Finance)
म्हणजे काय: बँकींग किंवा आर्थिक सेवा थेट. पेमेंट,कर्ज, विमा एकाच छताखाली उपलब्ध.
उदाहरण: फ्लिपकार्टवर खरेदी करताना कर्ज मिळणे.
परिणाम: बँकेकडे न जाता व्यवहार पूर्ण.
●कृत्रिम प्रज्ञेवर आधारित संपत्ती व्यवस्थापन- (Robo-Advisors)
म्हणजे काय: कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून दिला जाणारा गुंतवणुकीचा सल्ला. हा सल्ला वैयक्तिक असेल.
उदाहरण: तुमच्या मासिक खर्चाचा विचार करून म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला.
परिणाम: नवशिक्यांसाठी गुंतवणूक सुलभ आणि प्रभावी होण्याची शक्यता.
●CBDC (डिजिटल रुपये – RBI कडून)
म्हणजे काय: आरबीआयने जारी केलेला डिजिटल भारतीय रुपया. सध्या मोठ्या कंपन्या व्यवहार करण्यासाठी त्याचा वापर करीत आहेत भविष्यात हा वापर सार्वत्रिक होईल.
परिणाम: जलद, सुरक्षित, सहज शोध घेता येऊ शकेल व्यवहार.
●विकेंद्रित वित्त - (Decentralized Finance)
म्हणजे काय: ब्लॉकचेनवर तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक सेवा, मध्यस्थाचा कमीतकमी वापर,पारदर्शक व्यवहार.
उदाहरण: कर्ज, विमा, व्याज मिळवणे स्मार्ट कॉन्ट्रॅक्टद्वारे.
परिणाम: पारदर्शक, कमीतकमी व्याजदर आणि व्यवस्थापन फी आकारणी शक्य आहे त्यावर नियमन गरजेचे.
●बोलून सूचना देऊन केले जाणारे व्यवहार- (Voice based banking/transactions)
म्हणजे काय: आपल्या भाषेत फक्त बोलून व्यवहार.
उदाहरण: "मंदारला 1000 रुपये त्वरित पाठवा" अशी सूचना गुगल असिस्टंला केली असता माझ्या खात्यातील पैसे गुगल पे ने मंदारच्या खात्यात त्वरित हस्तांतरीत होतील.
परिणाम: ज्येष्ठ नागरिक आणि अल्पशिक्षित व्यक्तींना व्यवहार करण्यासाठी उपयुक्त.
●कृषी वित्तव्यवहार - (Agri-Fintech)
म्हणजे काय: शेतकऱ्यांसाठी खास आर्थिक तंत्रज्ञान सेवा.
उदाहरण: हवामान अंदाजावर आधारित कर्ज, पीक विमा अॅपवरून.
परिणाम: ग्रामीण भागाचा आर्थिक विकास.
●पर्यायी विदेद्वारे पतमानांकन-
म्हणजे काय: कॉल, व्यवहार, मोबाईल वापराच्या डेटावरून क्रेडिट स्कोअर.
परिणाम: ज्यांच्याकडे बँक इतिहास नाही त्यांनाही कर्ज.
●बायोमेट्रिक + ब्लॉकचेन केवायसी-
म्हणजे काय: फिंगरप्रिंट, डोळा स्कॅन व ब्लॉकचेनद्वारे तपासणी.
परिणाम: फास्ट व फसवणूक-मुक्त ओळख पडताळणी.
●ग्राहकांच्या गरजेनुसार विशेष सेवा- (Special Services)
म्हणजे काय: ग्राहकांच्या विशिष्ट खास गरजा ओळखून त्यानुसार सेवा
उदाहरण: ग्राहकास काही समभाग, म्युच्युअल फंड युनिटस, दीर्घकालीन रोख्यामधील गुंतवणूक प्रदीर्घकाळ ठेवायची असल्यास- ती त्यास मोडताही येणार नाही आणि सुरक्षित राहील अशा पद्धतीने साठवून ठेवता येईल अशी डीजीलॉकर अथवा एन्टिटीलॉकर सदृश्य सुविधा
परिणाम: वारसांसाठी निश्चित सुरक्षित दीर्घकालीन गुंतवणूक करता येणे शक्य.
ही यादी परिपूर्ण नसून यात ग्राहकांच्या विशिष्ट आणि नेमक्या गरजा ओळखून त्यात अनेक गोष्टींची भर घालता येईल. त्यातून फिनटेक निर्मितीत रस असणाऱ्या उद्योजकांना अनेक नावीन्यपूर्ण स्टार्टअप उद्योगात ‘अवसर’ अशा अर्थाने संधी शोधता येणे शक्य आहे.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक असून हा लेख कोणत्याही फिनटेक मंचाची शिफारस करीत नाही
13 जून 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
Sunday, 8 June 2025
जर्मनीची लवकर निवृत्तीवेतन सुरुवात योजना
#जर्मनीची_लवकर_निवृत्तीवेतन_सुरुवात_योजना_आर्थिक_साक्षरतेकडे_एक_क्रांतिकारी_पाऊल_की_केवळ_एक_कल्पना?
जगभरात अनेक देश सामाजिक सुरक्षेचा भाग म्हणून त्यांच्या नागरिकांसाठी कल्याणकारी योजना राबवीत असतात. अनेकदा अशा प्रकारच्या योजना ह्या बेरोजगार, ज्येष्ठ नागरिक, कामगार याच्यासाठी अथवा क्वचित समाजातील मोठ्या वंचित घटकासाठी राबवण्यात येतात. त्यात केवळ वृद्धांसाठी असलेल्या अश्या खास योजना आहेत. आयुर्मानात वाढ होत असल्याने जगभरात वृद्धांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे अशा योजनांवरील खर्चात सातत्याने वाढ होत असते. विकसित देशांची लोकसंख्या कमी आणि सरकारचे उत्पन्न अधिक असल्याने त्यांना सरसकट अशा योजना सर्वांसाठी रबावता येतात, परंतु वृद्धांची संख्या वाढत असल्याने त्यांनाही आता या खर्चावर नियंत्रण असावे असे वाटू लागले आहे. विकसनशील देशात त्या राबवण्यावर मर्यादा येत असल्याने त्याला कठोर चाळणी लावली जाते. जर्मनीला एकंदर लोकसंख्येत वृद्धांची संख्या सातत्याने वाढत असल्याने अशा योजनांवरील खर्चात होणाऱ्या वाढीचा ताण येत आहे. त्यावर उपाय म्हणून अगदी गेल्या आठवड्यात त्यांनी एक अभिनव योजना सुरु करण्याचे ठरवले आहे. सध्या ती केवळ प्रस्तावित असून त्यास मंजुरी मिळायची आहे. त्यानुसार आता सामाजिक सुरक्षा योजनेचा एक भाग म्हणून आर्थिक सुरक्षिततेसाठी प्रथमच 6 ते 18 या वयोगटातील मुलांसाठी ‘लवकर निवृत्तीवेतन सुरुवात’ (Early Start Pension) या नावाची योजना आणण्याचे ठरवले आहे. या योजनेतून लहान वयातच देशात आर्थिक साक्षरतेचा पाया घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
जर्मनी ही सध्या जगातील तिसरी आणि युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मोटार वाहने, त्यांचे सुटे भाग आणि रासायनिक उद्योग यात जर्मन कंपन्या आघाडीवर असून सकल राष्ट्रीय उत्पन्नात तेथील सेवा क्षेत्राचा 70% वाटा असल्याचे सन 2024 च्या केपीएमजीच्या अहवालात म्हटले आहे. जगभरातील निवृत्तीवरील योजनांच्या संकेतास तडा देत प्रथमच, सहा ते अठरा या वयोगटातील सर्व मुलांसाठी सरकारने तयार केलेली ही निवृत्तीवेतन योजना आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या एनपीएस वात्सल्य आणि लाडकी बहीण या योजनांशी त्याची काहीशी तुलना होऊ शकते. एनपीएस वात्सल्य ही निवृत्ती योजना असली तरी त्यातील वर्गणी केवळ पालकांनी भरायची आहे बालक सज्ञान झाले की त्यांनी तिचे एनपीएस मध्ये रूपांतर करायचे आहे तर पात्रता पूर्ण केलेल्या लाडक्या बहिणींना सरकारकडून दरमहा रक्कम मिळते. जर्मनीतील प्रस्तावित असलेल्या या योजनेनुसार शाळेत जाणाऱ्या प्रत्येक पात्र मुलांना सरकारकडून दरमहा दहा युरो मिळतील. पालक त्याच्या इच्छेनुसार त्यात रक्कम जमा करू शकतील. सरकारकडून
एकूण जास्तीतजास्त बारा वर्षाच्या कालावधीत प्रत्येक मुलाला एकूण 1440 युरो मिळू शकतील. ही निवृत्ती योजना असल्याने पुढे 60 वर्षे त्यात सातत्याने चक्रवाढ गतीने वाढ होत राहील कारण जर्मनीत 67 हे सन 1964 नंतर जन्मलेल्या नागरिकांचे निवृत्तीचे वय आहे. स्वेच्छानिवृत्ती 45 वर्षे पूर्ण झाल्यावर घेता येते अशी तेथे तरतूद आहे. या निवृत्तीनिधीत जमा होणारी रक्कम सरकारतर्फे भांडवल बाजारात गुंतवली जाईल. मुलाचे पालक त्यात स्वेच्छेने रक्कम जमा करू शकतील. लाभार्थी मूल अठरा वर्षाचे झाल्यावर त्यात त्यांना स्वकमाईची रक्कम भरण्याची परवानगी मिळेल. या मध्ये जमा रकमेवर कर सवलत मिळेल तसेच त्यातील नियमांनुसार सुयोग्य कारणासाठी पैसे काढूनही घेता येतील. योजनेस लवकर सुरुवात झाल्याने अधिक रक्कम जमा होऊन दीर्घकाळात त्यात लक्षणीय वाढ होईल.
योजनेच्या समर्थकांचे असे म्हणणे आहे की- ●यामुळे मुलांना लहान वयातच आर्थिक साक्षरतेची शिकवण मिळेल. लहानपणापासून आर्थिक संकल्पनांची ओळख करून देणं ही काळाची गरज आहे. ही योजना मुलांना पैसे, गुंतवणूक आणि बचत यांचे महत्त्व समजून घेण्यास मदत करू शकते.
●चक्रवाढव्याज, गुंतवणूक आणि बचत यांचे महत्व समजेल. मुलांचा आर्थिक बाजारपेठ, दीर्घकालीन भांडवल सुरक्षितता या संकल्पनाशी परिचय होईल. वयाच्या अगदी सुरुवातीपासूनच बचत सुरू केल्यामुळे व्याजाच्या चक्रवाढीचा अधिक फायदा मिळेल. परिणामी, निवृत्तीच्या वेळी त्यांनी पुरेसा निधी साठवलेला असेल.
●ज्या घरांमध्ये मुलांबरोबर बचत गुंतवणूक या विषयावर चर्चाच होत नाही तेथे ती होण्याची सुरुवात होईल.
●वाढत्या वृद्ध लोकसंख्येमुळे सरकारी निवृत्ती निधीवर ताण वाढत आहे. जर प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्याच योजनेत बालवयात लवकर बचत सुरू केली, तर भविष्यात सरकारी यंत्रणेवरचा अतिरिक्त भार कमी होऊ शकतो.
सीएनबीसी मेकच्या अहवालानुसार, ●आपल्याकडील सरकारच्या वादग्रस्त ‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणे जर्मनीतील अनेक लोकांना ही योजना विसंगत वाटते. त्यांना केवळ प्रतिकात्मक दृष्ट्या ही योजना शक्तिशाली वाटत असली तरी वास्तविक जगात अनेक वर्षांनी त्याचे मूल्य फारसे नसेल असे वाटते. त्यामुळे तेथे जमलेल्या निधीचे वास्तविक मूल्य कमी असल्याने त्यातून अर्थपूर्ण निवृत्ती निधी जमा होण्याची शक्यता कमी वाटते.
●हे केवळ बचत खाते असल्याने आणि त्यातून गुंतवणूक केली गेल्याने त्यामागील गुंतवणूक निर्णय समजून घेऊन आर्थिक साक्षरता वाढेल का? याबाबत अनेक मान्यवरांना शंका आहेत. ●काही तज्ज्ञांचे मत आहे की इतक्या लहान वयात पैशांबद्दलची जबाबदारी देणे मुलांवर मानसिक दडपण अणू शकते.
●काही समीक्षक असे म्हणतात की ही योजना केवळ एक ‘feel good’ वातावरण निर्माण करण्यासाठी आहे. प्रत्यक्षात या योजनेचा सर्वसामान्य कुटुंबांवर फारसा परिणाम होणार नाही.
●अशा लहान मुलांसाठी स्वतंत्र निवृत्ती योजना तयार करणे, तिचे व्यवस्थापन करणे व पालकांना प्रोत्साहित करणे हे प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरू शकतं.
काही अर्थतज्ज्ञ याला पुढील पिढीसाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजनाची चांगली सुरुवात मानतात. ही योजना प्रत्यक्षात राबवायला अत्यंत कठीण आहे, विशेषतः जेव्हा सामाजिक आणि मानसिक बाबी लक्षात घेतल्या जातील. ‘आरडब्ल्यूआय लीबनिझ इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक रिसर्च’ चे प्रमुख ‘क्रिस्टोफ श्मिट’ आणखी एक पाऊल पुढचा विचार करतात. त्यांना हा प्रस्ताव मुळातून दोषपूर्ण वाटतोय आणि शैक्षणिकदृष्ट्याही ते चुकीचे आहे असे वाटते. बचतीचा मूळ गाभा - उद्याच्या चांगल्यासाठी आजचा त्याग करणे- यातून हरवला आहे, असे त्यांना वाटते. मुलांना निवड करण्याची किंवा त्याग करणे म्हणजे काय हे समजून न घेता, निष्क्रियपणे निधी मिळत असल्याने, बचतीचा खरा हेतू त्यातून हरवला जात असल्याचे वाटते. श्मिट पुढे म्हणतात की, माफक आर्थिक परताव्याच्या आशेने असे प्रयोग करण्यापेक्षा सध्याची राष्ट्रीय शिक्षण प्रणाली सुधारण्यासाठी तेच पैसे खर्च करणे अधिक योग्य होईल.
जर्मनीची लवकर सुरू होणारी ही पेन्शन योजना, निवृत्ती नियोजन आणि आर्थिक शिक्षणासाठी एक नवीन दृष्टिकोन आहे यात शंका नाही. ती निश्चितच महत्त्वाकांक्षेत दूरदर्शी वाटते. पुढच्या पिढीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि बचतीबद्दल समाजाच्या विचारांना आकार देणारी वाटते. त्याचबरोबर ती परिणामकारकता, प्रतीकात्मकता विरुद्ध वस्तुस्थिती आणि मुलांना निवृत्ती बचत योजनेत सरकारकडून पैशाचे वाटप केल्याने त्यांना पैशाबद्दल खरोखर काही अर्थपूर्ण शिकवले जाईल का? याबद्दल गंभीर प्रश्न देखील उपस्थित करते. सर्व जग म्हणूनच या अभिनव आर्थिक प्रयोगाकडे पाहत असताना, एक गोष्ट निश्चित आहे - जर्मनीची मुले लवकरच या ग्रहावरील निवृत्तीसाठी तरतूद करणारे सर्वात तरुण गुंतवणूकदार बनू शकतात. ‘लवकर निवृत्तीवेतन सुरुवात’ ही संकल्पना आकर्षक वाटत असली, तरी तिच्या यशासाठी ठोस अंमलबजावणी, पालकांचे सहकार्य आणि शैक्षणिक पातळीवर सखोल आर्थिक साक्षरतेचा समावेश असावा लागेल. सध्या तरी ही योजना केवळ प्रस्तावित आहे आणि भविष्यात तिच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेवरच तिच्या यशाचे मोजमाप अवलंबून आहे. तेव्हा जर्मनीतील नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिक म्हणून वाढतील की त्यांना कधी तरी निवृत्तीसाठी तरतूद करावी लागते, हेच विसरतील?
हे केवळ फक्त येणारा काळ (जो सहा दशके एवढा दीर्घ आहे) ठरवेल.
उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत. याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकर म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
6 जून 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
डब्बा ट्रेडिंग
#डब्बा_ट्रेडिंग
कर चुकवण्यासाठी अनेक छोटे मोठे व्यवहार रोखीत होत असतात हे आपल्याला माहीत आहे. अधिकाधिक लोकांनी आपले सर्वच व्यवहार जाहीर करून त्यावर असलेल्या सवलतींचा लाभ घेऊन देय कर भरावा अशी सरकारची इच्छा असते. त्याप्रमाणे सर्वांनी प्रामाणिकपणे कर भरल्यास विकासासाठी मुबलक पैसा उपलब्ध होऊन भविष्यात कर दर कमी होऊ शकतील. कर संकलन वाढवण्याचा उपाय म्हणून सरकार अनेक उत्पन्न आणि खर्च यावर टीडीएस, टीसीएस लागू करते. हा एक प्रकारचा अग्रीम कर असुन त्यामुळे संबंधित व्यक्ती आपले उत्पन्न जाहीर करून नियमानुसार कर भरेल अशी अपेक्षा असते. भविष्यात सर्वच रोखीचे व्यवहार पूर्णपणे बंद करून अथवा त्यावर काही कर लावणे शक्य आहे परंतु त्यात असंख्य अडचणी आहेत. अजूनही अनेक लोक विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि अशिक्षित लोक ऑनलाइन व्यवहार करीत नाहीत. त्यांना ते तितकेसे सोपे आणि सुरक्षित वाटत नाहीत यासंबंधीत तक्रारी समाधानकारक रित्या सुटतील अशी ठोस यंत्रणा नाही. याचबरोबर आज अनेक असे व्यवसाय आहेत ज्यात रोखीचे अधिकाधिक व्यवहार होतात. हे व्यवहार करणारे व्यावसायिक सर्वच राजकीय पक्षातील राजकारणी लोक करत असल्याने ते कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांचे यासंबंधात हितसंबंध जपले जावेत याबाबत ते अत्यंत दक्ष असतात. जोपर्यंत त्यांना असे वाटते तोपर्यंत त्यात बदल होणे जवळपास अशक्य आहे. आज जीएसटी लागू झाल्यावर कर संकलन वाढत असले तरी सर्व घाऊक
नियमित व्यवहारांबरोबर जवळपास तेवढेच व्यवहार रोख रकमेत होतात हे उघड सत्य आहे. ते बदलण्याची राजकीय इच्छाशक्ती आणि त्यासाठी त्याच्यावर जनतेचा दबाव या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. जोपर्यंत राजकारणी आणि जनता यांचे हे साटेलोटे असेच राहील तो पर्यंत यात मोठा फार काही बदल होईल असे वाटत नाही.
इतर बाजारांप्रमाणे शेअरबाजार, वस्तुबाजार आणि चलन बाजारात होणाऱ्या नियमित व्यवहारांशीवाय समांतर असे व्यवहार फार पूर्वीपासून होत आहेत. हे व्यवहार प्रामुख्याने रोखीत आणि विश्वासावरच होत असतात. सूचिबाह्य शेअर्सची खरेदी विक्री करणारे काही मंच आपण मागील काही लेखात पाहिले, असे मंच अधिकृत असून त्यावर व्यवहार करण्यास बंदी नाही. या व्यवहारांवर कमी नियामक बंधने असली तरी पारदर्शक पद्धतीने आणि अधिकृतपणे होतात. त्यावर कर आकारणी कशी होणार तेही आपल्याला माहिती आहे. मान्यताप्राप्त बाजारात होणारे व्यवहार हे करार असतात आणि ते पूर्ण करणे संबंधितांवर बंधनकारक असते या व्यवहार पुर्ततेची हमी बाजार नियामक मंडळावर असते. कोणत्याही कारणाने ते पूर्ण झाले नाहीत तर त्यांची भरपाई कशी करायची यांचे निश्चित नियम असल्याने ते अधिक सुरक्षित असतात. याशिवाय अन्य ठिकाणी जर समांतररित्या असे व्यवहार होत असतील तर त्यास डब्बा ट्रेडिंग असे म्हणतात. यात प्रामुख्याने पैजेचे व्यवहार होतात. या पैजा प्रत्यक्षात खरेदी विक्री न करता भविष्यातील विशिष्ट वेळी, दिवशी, शेअरचा भाव, निर्देशांक, सोने चांदी यासारख्या मौल्यवान वस्तूंचा भाव, डॉलरचा भाव एवढा असेल अशा स्वरूपाच्या असतात. या पैजा अत्यंत कमी पैशांची हमी देऊन लावता येतात आणि त्यांचे समायोजन पूर्वी आणि आजही प्रामुख्याने रोख पद्धतीने होते. पूर्वी ही पैजेची रक्कम डब्यात, खोक्यात अथवा बादलीत ठेवण्यात येत असल्याने त्यास डब्बा ट्रेडिंग, बॉक्स ट्रेडिंग आणि बकेट ट्रेडिंग असे नाव पडले असण्याची शक्यता आहे. आता काही व्यवहार डी मॅट खात्याचा वापर करून आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन पद्धतीनेही केले जात आहेत. डब्बा ऑपरेटरशी संपर्क करून असे व्यवहार करायचे असल्याचे तोंडी अथवा अन्य कोणास शोधाता येणार नाही अशा पद्धतीने कळवण्यात येते, काही रक्कम देण्याच्या बोलीवर व्यवहार निश्चित केला जातो, यातील किंमती नियमित बाजारा बरोबर ताडण्यात येतात, त्यात जिकल्यास ठरलेली रक्कम देण्यात येते रोख रक्कम त्रितीयपक्षी मध्यस्थाच्या माध्यमातून दिली घेतली जात असून केवळ विश्वासावर हे व्यवहार केले जातात. यास कायद्याचे कोणतेही पाठबळ नसल्याने, एक प्रकारे तो मालमत्तेतील किमतीच्या चढ उतारावर आधारित असा जुगार आहे.
■मान्यताप्राप्त बाजार, सूचिबाह्य शेअर्स खरेदीविक्री मंच, डब्बा ट्रेडिंग यांची तुलना-
●कायदेशीरपणा: मान्यताप्राप्त बाजार आणि सूचिबाह्य शेअर्सच्या व्यवहारांचे मंच कायदेशीर असल्याने सुरक्षित आहेत. डब्बा ट्रेडिंग मंच बेकायदेशीर आहेत.
●व्यवहार व्यवस्था: बाजार आणि सूचिबाह्य शेअर्स मंच यावरील व्यवहार निश्चित नियमाने होतात. यावरील ग्राहकांची नोंद ठेवली जाते. ओळख पटवली जाते व्यवहार पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होतात. डब्बा ट्रेडिंग व्यवहार त्यांचे जरी काही नियम असले तरी ते बहुतेक रोख रकमेत आणि केवळ विश्वासावर होतात. त्याचे समायोजन डब्बा ट्रेडिंग ऑपरेटरद्वारे केले जाते.
●नियामक देखरेख: बाजार व्यवहारावर सेबीचे पूर्ण नियंत्रण असून सूचिबाह्य शेअर्स व्यवहार कमी नियंत्रणात आहेत. डब्बा ट्रेडिंग हे सेबीच्या नियामक यंत्रणेत येत नाहीत.
●कर आकारणी: बाजार व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून मान्यताप्राप्त बाजारात अल्प आणि दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर विशेष दराने कर आकारणी केली जाते. सुहीबाह्य शेअर्सवरील भांडवली नफ्यावर अन्य मालमत्तांप्रमाणे दोन वर्षानंतर विशेष दराने कर आकारणी केली जाते. डब्बा ट्रेडिंग व्यवहार अधिकृतपणे नोंदले जात नसल्याने त्यावर कोणताही कर दिला जात नाही.
●जोखीम तीव्रता: आधी सांगितल्याप्रमाणे बाजारातील व्यवहार अधिक सुरक्षित असल्याने त्यातील जोखीम अत्यंत कमी असते. सूचिबाह्य शेअर्सच्या व्यवहारांचे मंच विविध परवानग्या घेऊन हे व्यवहार करीत असल्याने आता त्यातील जोखीम खूप कमी झाली आहे. डब्बा ट्रेडिंग व्यवहार बेकायदेशीर असल्याने त्यात फसवणूक, त्याचप्रमाणे त्यात भाग घेतल्याबद्दल कायदेशीर कारवाई आणि शिक्षा होऊ शकण्याची शक्यता आहे.
■अन्य व्यवहार आणि डब्बा ट्रेडिंग यातील मुख्य फरक:
●पारदर्शकतेचा अभाव: डब्बा ट्रेडिंग पारदर्शक पद्धतीने होत नाही. त्यामुळे त्यात फसवणूक होण्याची शक्यता असते.
●गुंतवणूकदार संरक्षणाचा अभाव: हे व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर असल्याने यातील फसवणुकी संदर्भात गुंतवणूकदार ग्राहकांना कुठेही दाद मागता येत नाही.
●कर आकारणी: या व्यवहारावर कोणतीही कर आकारणी होत नाही किंबहूना असे व्यवहार कर चुकवण्यासाठीच केले जातात.
●व्यवहार समायोजन: यातील व्यवहारांचे समायोजन संबंधित डब्बा ऑपरेटरकडून केले जाते.
थोडक्यात,
डब्बा ट्रेडिंग ही नियमित बाजार अथवा अधिकृत मंचाबाहेर केल्या जाण्याऱ्या बेकायदेशीर व्यवहारांची प्रक्रिया आहे.
प्रत्यक्ष शेअर्सची खरेदी विक्री न करता भावातील फरकाचा लाभ देणारे, दलाली न आकारणारे, कमी भांडवलावर कित्येक पटीत व्यवहारांची परवानगी देणारे, बाजार संचाहून वेगळ्या संचात / तुकड्यात खरेदी विक्री करता येणारे, पैज लावण्याची परवानगी देणारे, त्वरीत पैसे देण्याची व्यवस्था करणारे, अधिकाधिक लोक वापरत असलेले, 24 तास कार्यरत असणारे, आणि आता तंत्रज्ञानाचा वापरुन ग्राहकस्नेही व्यवहार पर्याय उपलब्ध करून देणारे असून डब्बा ट्रेडिंग ब्रोकर आणि त्यांचे मंच समाज माध्यमावर उघडपणे जाहिराती प्रकाशित करीत असतात. सहज गुगल सर्च केलं असता, भारतातील प्रमुख डब्बा ट्रेडरची मिळालेली नावे अशी-
ट्रेडेक्स लाइव, एरो ट्रेड, व्ही मनी, व्हेंटज मार्केट, डब्बा ट्रेडिंग, स्काय ट्रेड, आवाज शेअर्स, डब्बा ट्रेडिंग कस्ट माइज, एलिट फॉर्च्युन, ट्रेड पाल अशी 10 आघाडीची नावे सहज मिळाली. यांची अँप्स आणि संकेतस्थळेही आहेत, यातील ‘व्यवहार किमान पैशांत कमाल व्यवहार’ या तत्वांवर आधारित असल्याने ते व्यक्तींमधील जुगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देतात. यास कायदेशीर संरक्षण नसल्याने गुंतवणूकदराचे नुकसान होऊन कायदेशीर समस्या उद्भवू शकतात. प्रतिभूती करार नियमन कायदा 1956 च्या (SCRA) कलम 23 (1) नुसार प्रतिभूती व्यवसायासाठी प्रचार करणे, बोली किंवा देकार देण्यासाठी लोकांना एकत्र करणे, कायद्यातील कलमांचे पालन न करणे आणि प्रतिभूती अपील न्यायाधिकरणाच्या आदेशांचे पालन न करणे यांचा समावेश आहे त्यामुळे असे व्यवहार करणे बेकायदेशीर आहे त्याचप्रमाणे भारतीय न्याय संहिता 2023 (BNS) च्या कलम 410 (विश्वासाचा भंग) आणि 318(फसवणूक आणि कट) नुसारही गुन्हेगारी कृत्य आहे. याबद्दल संबंधित व्यक्ती आणि व्यापारी यांना जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि अथवा ₹ 25 कोटीपर्यत दंडाची शिक्षा होऊ शकते. बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी केवळ माहिती म्हणून डब्बा ट्रेडिंग म्हणजे काय जाणून घ्यावे. हा लेख डब्बा ट्रेडिंगमधील गुंतवणूक आणि त्यांच्याशी संबंधित कोणत्याही मध्यस्तांची शिफारस करीत नाही.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकरणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 30 मे 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.
आयटीआर 3 विषयक शंका समाधान
#आयटीआर_3_विषयक_शंका_समाधान….
आयकर रिटर्न फॉर्म (ITR-3) हा अशा व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे व्यापार अथवा व्यवसायातून उत्पन्न मिळते. याशिवाय घरभाडे, भांडवली नफा, पगार किंवा अन्य उत्पन्न आहे, ज्यासाठी सर्वसमावेशक हिशेब पुस्तके राखणे आवश्यक असेल अथवा नसेल. हा सरकारच्या आयकर विभागाने विविध प्रकारच्या उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी विहित केलेल्या विविध आयकर रिटर्न फॉर्मपैकी एक आहे. या फॉर्म विषयीच्या शंकाची उत्तरे जाणून घेऊन तो कसा दाखल करता येतो त्याची अधिक तपशीलवार माहिती घेऊया.
◆आयटीआर-3 फॉर्म म्हणजे काय?
~आयटीआर-3 हा भारतात पगार, व्यवसाय आणि अन्य स्रोतांमधून उत्पन्न असलेल्या व्यक्ती आणि हिंदू अविभाजित कुटुंबांसाठी (एचयूएफ) वापरला जाणारा प्राप्तिकर परतावा फॉर्म आहे.
◆आयटीआर-३ कोण दाखल करू शकते?
~उद्योग किंवा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न, पगार किंवा पेन्शनमधून मिळणारे उत्पन्न, घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न भांडवली नफ्यातून मिळणारे उत्पन्न, इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न. याशिवाय करदात्याकडे त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांपैकी एक म्हणून मालकी हक्क किंवा व्यवसाय असणे आवश्यक आहे. हा फॉर्म अधिक व्यापक असून करदात्यांना त्यांच्या उत्पन्नाबद्दल आणि विविध स्रोतांमधील कपातींबद्दल तपशीलवार माहिती सादर करण्याची परवानगी देतो. यात विविध विभाग आहेत जिथे करदात्यांना त्याची वैयक्तिक माहिती, एकूण उत्पन्नाची गणना, वेगवेगळ्या स्रोतांमधून उत्पन्नाचे तपशील, वजावट, भरलेले कर आणि त्यांची पडताळणी या संबंधित अनेक तपशील द्यावे लागतात.
◆खालील श्रेणींमध्ये येणाऱ्या करदात्यांकडून आयटीआर-3 दाखल करता येईल.
~पगार अथवा पेन्शन याशिवाय करदाता हा मालक असलेल्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न (ऑडिट आणि नॉन-ऑडिट दोन्ही प्रकरणे)
एकापेक्षा जास्त घरांच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न
'इतर स्रोतांमधून उत्पन्न' अंतर्गत येणाऱ्या लॉटरी, घोड्यांच्या शर्यती आणि इतर क्रियाकलाप जिंकून मिळालेली बक्षिसे
भारताबाहेरील देशातील मालमत्तेच्या माध्यमातून उत्पन्न मालमत्ता
अल्पकालीन किंवा दीर्घकालीन भांडवली नफ्यातून मिळणारे उत्पन्न
भागीदारी फर्मकडून मिळालेला मोबदला असे उत्पन्नाचे एकाहून अनेक स्रोत असलेले वैयक्तिक करदाते किंवा असे हिंदू अविभक्त कुटुंब यांना हा फॉर्म भरता येईल.
◆आयटीआर-3 दाखल करण्यास कोण पात्र नाही?
~व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबे वगळता इतर कोणीही आयटीआर-3, फॉर्म भरण्यास पात्र नाहीत. त्याचप्रमाणे-
आयटीआर-1 (सहज), आयटीआर-2 आणि आयटीआर-4 (सुगम) भरणारे करदाते, व्यापार व्यावसायिक अथवा भागीदारीत उत्पन्न नसलेले करदाते हा फॉर्म भरू शकत नाहीत.
◆आयटीआर-3 फॉर्मची रचना काय आहे?
~दरवर्षी फॉर्ममध्ये किरकोळ बदल होत असले तरी अशा नियमित बदलाशिवाय यावर्षी फॉर्मची रचना थोडी बदलली असून त्यातील प्रमुख बदल असे-
●भांडवली नफ्याचे विभाजन: भांडवली नफ्यासंबंधित करदर बदलल्याने 23 जुलै 2024 च्या आधी आणि नंतर झालेल्या विक्रीमुळे मिळालेला भांडवली नफा या वर्षी स्वतंत्रपणे नोंदवावा लागेल.
●बायबॅक तोटा: 1 ऑक्टोबर 2024 पासून, शेअर बायबॅक म्हणून मिळालेली रक्कम लाभांश समजून त्यावर इतर स्रोतापासून मिळालेले उत्पन्न मानून कर आकारला जाणार असून सदर शेअर खरेदी करण्यासाठी मोजलेली रक्कम भांडवली तोटा म्हणून मान्य केली जाणार आहे.
●मालमत्ता प्रकटीकरण मर्यादेत वाढ: आता मालमत्ता आणि दायित्वे नोंदवण्याची मर्यादा ₹1 कोटी (पूर्वी ₹50 लाख) पेक्षा जास्त असेल तरच आवश्यक आहे.
●नवीन कलम ४४बीबीसी: क्रूझ व्यवसाय ऑपरेटरसाठी लागू केले आहे. या कलमाअंतर्गत, प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या 20% रक्कम करपात्र उत्पन्न म्हणून गणली जाते.
●अधिक कपात तपशील: 80C, 10(13A), इत्यादी अंतर्गत दाव्यांसाठी तपशीलवार अहवाल आवश्यक आहे. कलम 80 सी, कलम 10 (13 ए)
●घरभाडे भत्ता आणि इतर संबंधित कलमांखाली कपातीचा दावा करणाऱ्या करदात्यांना आता आयटीआर-3 फॉर्ममध्ये अधिक बारकाईने माहिती द्यावी लागेल.
●टीडीएस विभाग कोड: व्यवसायाच्या स्वरूपावरून आणि त्याच्या उपविभागावरून ज्या अंतर्गत कर कापला गेला त्याचा नेमका व्यवसाय कोड भरणे आवश्यक आहे. यासाठी विविध व्यवसायांचे कोड आयकर विभागाने जाहीर केले असून ते त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
●कलम 80 सी खालील गुंतवणूक खर्च आणि कलमनिहाय टीडीएस टिसीएस रिपोर्टिंग सारख्या कपातींसाठी स्वतंत्र तपशील देणे सुरू करण्यात आले आहे.
यामुळे सादर करण्यात आलेल्या माहितीत पारदर्शकता, अचूकता येऊन विवरणपत्र दाखल करणे सोईचे होईल.
◆आयटीआर 3 दाखल करण्यास आवश्यक कागदपत्रे-
~पॅन, आधार, बँक खात्यांची माहिती, पगार मिळत असल्यास फॉर्म 16, गुंतवणूक तपशील, हिशोब पुस्तके.
◆आयटीआर 3, विवरणपत्र दाखल करण्याचे सर्वसाधारण टप्पे -
●विभागाच्या संकेतस्थळावर विवरण भरण्यासाठी लॉग इन करणे
●आपल्या खात्यास पॅन लिंक करणे
●वैयक्तिक माहिती- जसे की, नाव, पत्ता, पॅन, आधार, करदात्याचा प्रकार इ माहिती देणे
●उत्पन्नाचे स्रोत- विविध व्यवसाय त्यातून मिळालेला नफा त्यासंबंधित इतर तपशील, पगार पेन्शन घरभाडे भांडवली नफा अन्य उत्पन्न याचा तपशील आणि
केलेली गुंतवणूक आणि खर्च यांची विस्तृत माहिती द्यावी लागेल.
●भरलेल्या अथवा मुळातून कापलेल्या कराचा तपशील: यांची तपशीलवार माहिती द्यावी.
●इतर आवश्यक खुलासे : नियमानुसार इतर आवश्यक ते खुलासे करावे लागतील.
●करदेयता: सारांश पहा, तुलना करा आवश्यक असल्यास करमोजणी करण्याच्या पद्धतीत बदल केल्यास करामध्ये काय फरक पडतो तो पहावा आणि योग्य करप्रणाली निश्चित करावी. *नवी कर प्रणाली एकदा स्वीकारली की त्यात बदल करता येत नाही.* हे लक्षात ठेवूनच ती स्वीकारावी अथवा नाकारावी.
●दिलेली माहिती खरी असल्याचे प्रकटीकरण करावे
●आवश्यक असल्यास कर भरणा करावा
●यानंतर आयकर विभागाच्या पोर्टलवर विवरणपत्र सादर करून त्यांचे सत्यापन करावे. असे सत्यापन तीस दिवसात न केल्यास विवारणपत्र दाखल केले नाही असे समजण्यात येते. त्यामुळे यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.
असे यातील सर्वसाधारण टप्पे आहेत
स्वतः आपले आयटीआर 3 दाखल करणे गोंधळात टाकणारे आणि त्रासदायक असू शकते. ते बरेच क्लिष्ट असल्याने, विशेषतः सामान्य लोकांसाठी, पुढील दंड आणि सूचना टाळण्यासाठी कर व्यावसायिकाची मदत घेणे उचित आहे. त्याच्याकडून तुमच्या कर प्रश्नांचे निराकरण करताना तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या वजावटीचा जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल ते पहाणे जरुरीचे आहे.
◆आपण व्यावसायिक मदतीशिवाय आयटीआर 3 दाखल करू शकतो का?
~हो, जर तुम्हाला तुमच्या खात्यांचे लेखापरीक्षण करण्याची आवश्यकता नसेल तर तुम्ही कोणत्याही व्यावसायिक मदतीशिवाय आयटीआर 3 दाखल करू शकता. तथापि, हा फॉर्म अतिशय किचकट असल्यामुळे आयटीआर स्वतः दाखल करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि कठीण असू शकते म्हणून तुमचे अचूक आयटीआर दाखल करण्यासाठी कर व्यावसायिकांचा सल्ला घेणे अधिक योग्य होईल.
✍️उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकरणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 23 मे 2025 रोजी पूर्वप्रकाशित.
Friday, 16 May 2025
विवरणपत्र भरण्याची पूर्वतयारी
#विवरणपत्र_भरण्याची_पूर्वतयारी
आपले सर्व मार्गाने होणारे उत्पन्न आणि त्यावर भरलेला कर करदात्याने प्रमाणित करणे म्हणजे आयकर विवरणपत्र भरणे. कायद्यानुसार विशिष्ट उत्पन्न अथवा काही अटी पूर्ण करणाऱ्या सर्वाना आयकर विवरणपत्र भरणे सक्तीचे आहे. ज्या करदात्यांना आपले आयकर विवरणपत्र भरताना हिशोब प्रमाणित करावे लागत नाहीत त्यांना सन 2024-25 या वर्षाचे आपले आयकर विवरणपत्र दंड न भरता सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे. ज्यांना आयकर कायद्यानुसार हिशोबांचे लेखापरीक्षण करून मान्यता घ्यावी लागते, त्यांच्यासाठी हीच तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे. गेले काही वर्षे 31 जुलै ही दंड न देता विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली गेलेली नाही. त्यामुळे यंदा ती कदाचित वाढवली जाईल, या भ्रमात कोणी राहू नये. मुदतीत विवरण पत्र न भरल्याने दंड द्यावा लागतोच पण अनेक महत्वाच्या आयकर सवलतींवर पाणी सोडावे लागते. तेव्हा आपले विवरणपत्र दिलेल्या मुदतीत भरल्याने दंड वाचतोच, शिवाय करविषयक काही सवलती मिळतात. 1 एप्रिल 2025 पासून आपल्याला दिलेल्या मुदतीत आयकर विवरणपत्र दाखल करता येत असले तरी तांत्रिक कारणाने ते अनेकांना भरता येत नाही. त्यातील काही कारणे अशी-
★शेवटच्या तिमाहीत मुळातून कापलेला कर हा ज्याने कापला आहे त्यांना 30 एप्रिल पर्यंत भरता येतो. त्यात तफावत असेल तर 31 मे पर्यंत त्याचे विवरणपत्र भरून तो समायोजित करता येतो. अनेक कंपन्या हे सर्व शेवटच्या क्षणी करतात. त्यामुळे तो करदात्याच्या 26AS अथवा AIS वर दिसायला अजून काही दिवस लागू शकतात.आता सर्व करभरणा ऑनलाइन होत असताना हा तपशील ताबडतोब दिसायला हवा किंवा एक दिवसाहून अधिक कालावधी लागायला नको. आयकर खात्याने या संदर्भात तातडीने काहितरी करून हा विलंब टाळण्याची गरज आहे.
★अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांना कायद्याने देणे आवश्यक असा फॉर्म 16, मे अखेर ते अगदी 15 जूनपर्यंत देतात त्यामुळे आपले नक्की उत्पन्न किती, करकपात किती आणि विविध कलमानुसार घेतलेली आयकर सवलत किती ते नक्की समजत नाही.
★आयकर विवरणपत्र भरण्यासाठी आवश्यक फॉर्ममध्ये दरवर्षी काही बदल केले जातात असे फॉर्म अनेकदा 1 एप्रिलला उपलब्ध नसतात. या वर्षी सुधारित फॉर्म 3 विभागाकडून 25 एप्रिल 2025 ला उपलब्ध करून देण्यात आला.
★अनेक व्यावसायिक संस्थांचे जमाखर्च तपासून त्यांचे लेखापरीक्षण होणे आणि त्याला मान्यता मिळणे आवश्यक असते. असे असले तरीही-
ज्यांचे करपात्र उत्पन्न विहित मर्यादेहून खूप कमी आहे, ज्यांचा कर मुळातून कापला जात नाही आणि ज्यांना भांडवली नफा या सदराखाली काही उत्पन्न असेल/ नसेल असे करदाते आपले उत्पन्न मोजून ताबडतोब आयकर विवरणपत्र 1 एप्रिलपासून कधीही भरू शकतात.
आयकर विवरणपत्र दाखल करायचे विविध फॉर्म आहेत दरवर्षी विभागाकडून त्यात किरकोळ बदल होत असतात. आपण आपल्या कराची मोजणी दोन प्रकारे करू शकतो. त्याचप्रमाणे व्यवसाय उत्पन्न नसेल तर मोजणी करण्याच्या पद्धतीत सोईनुसार बदल करू शकतो. आपल्याला नेमका कोणता फॉर्म लागेल आणि तो भरण्यासाठी कोणत्या गोष्टी हाताशी ठेवल्या तर सोयीचे होईल याची माहिती घेऊयात.
★आयटीआर 1 (सहज)
कुणी भरायचा?
*करदाते ज्याचे पगार, पेन्शन, व्याज हेच उत्पनाचे साधन आहे.
*एकूण उत्पन्न 50 लाख रुपयांहून कमी आहे.
आवश्यक कागदपत्रे-
*फॉर्म 16
*बँक खातेउतारा
*मुळातून कर कापल्याचे प्रमाणपत्र
★आयटीआर 2
कुणी भरायचा?
*तुमचे उत्पन्न 50 लाखाहून कमी आहे.
*भांडवली नफा, घरभाडे हे तुमच्या उत्पन्नाचा भाग आहेत.
*परदेशात मालमत्ता आहे किंवा त्यात गुंतवणूक केली आहे.
आवश्यक कागदपत्रे-
*फॉर्म 16
*फॉर्म 16 A
*भांडवली नफ्याचा तपशील
★आयटीआर 3
कुणी भरायचा?
*पगार व्यवसाय यासह अथवा शिवाय उत्पन्नाची वेगवेगळी साधने असणारे
*स्वतःचा व्यवसाय असणारे
*भागीदारीत व्यवसाय करणारे
*उत्पन्नाचे अनेक स्रोत असणारे
आवश्यक कागदपत्रे-
*व्यवसायचा वार्षिक जमाखर्च
*वार्षिक नफातोटा पत्रक
*मुळातून कापून गेलेल्या कराचे प्रमाणपत्र
★आयटीआर 4 (सुगम)
एवढ्या दुर्बोधित फॉर्मच सुगम नाव ठेवणं हा मोठाच विनोद आहे
कुणी भरायचा?
*₹ 50 लाखाहून कमी उत्पन्न असलेले छोटे व्यावसायिक
आवश्यक कागदपत्रे-
*बँक खातेउतारा
*मुळातून करकपातीचे प्रमाणपत्र
★आयटीआर 5
कुणी भरायचा?
*मर्यादित भागीदारी व्यवसाय
*प्रोप्रायटर्स
*असोसिएशन ऑफ पर्सन
*अन्य फर्म ज्याचे उत्पन्न परिशिष्ट 11 नुसार करमुक्त आहे.
आवश्यक कागदपत्रे-
*व्यवसायाचा वार्षिक जमाखर्च
*वार्षिक नफातोटा पत्रक
*मुळातून कापून गेलेल्या कराचे प्रमाणपत्र
★आयटीआर 6
कुणी भरायचा?
*कोणतीही कंपनी ज्यांचे उत्पन्न परिशिष्ट 11 नुसार करमुक्त नाही.
आवश्यक कागदपत्रे-
*व्यवसायचा वार्षिक जमाखर्च
*वार्षिक नफातोटा पत्रक
*मुळातून कापून गेलेल्या कराचे प्रमाणपत्र
★आयटीआर 7
कुणी भरायचा?
आयकर कायदा 139 AA/AB/AC/AD मध्ये उल्लेख असलेल्या सर्व व्यक्ती/ संस्था यात प्रामुख्याने राजकिय पक्ष, विश्वस्त संस्था, वैज्ञानिक संशोधन संस्था यांचा समावेश होतो.
आवश्यक कागदपत्रे-
*आवश्यक असल्यास हिशोब तपासनीसांचा अहवाल
*मुळातून कर कपातीचे प्रमाणपत्र
या शिवाय आयकर विवरणपत्र भरण्यासाठी उपयुक्त गोष्टी जसेकी -
पॅन, आधार, पासवर्ड, बँक खाते तपशील, बचत गुंतवणूक केली असल्यास त्याचे तपशील, व्याज प्रमाणपत्र, गृहकर्ज मूद्दल व्याज यांची विभागणी, मेडीक्लेम भरल्याची पावती, मिळालेल्या दिलेल्या भेटवस्तू, क्रेडिट कार्ड व्यवहार, स्थानिक स्वराज्य संस्थेचा भरलेला कर, करमुक्त उत्पन्नाचा तपशील, भागीदारी करार, लीज करार, मोठ्या रकमेच्या व्यवहाराचे तपशील, देणगी दिली असल्यास त्याचा तपशील बोनस, राईट, मर्जर, डीमर्जर, खरेदीविक्रीची बिले या सारखी आपल्या उत्पन्नाच्या संबंधित आवश्यक ती माहिती हाताशी ठेवावी म्हणजे आयत्याक्षणी धावपळ करावी लागत नाही. या आर्थिक वर्षात भांडवली नफा वेगवेगळ्या कार्यकालासाठी वेगवेगळया दराने लागत असल्याने आयटीआर तीन मध्ये त्यांची मोजणी आणि करदेयता वेगवेगळी दाखवावी लागेल. त्याचप्रमाणे 1 ऑक्टोबर नंतर शेअर कंपनीने शेअरहोल्डरकडून खरेदी केले असतील तर मिळालेली रक्कम लाभांश म्हणून आणि मूळ शेअर्स खरेदी करण्यास लागलेली रक्कम भांडवली तोटा म्हणून दाखवावी लागेल. त्याचप्रमाणे एक कोटी रुपयाहून अधिक मालमत्ता आणि दायित्वे असल्यास त्याचाही तपशील द्यावा लागेल त्याप्रमाणे नवीन फॉर्म तयार करण्यात आला असून तो संबंधिताना उपलब्ध आहे.
याप्रमाणे फॉर्म भरण्यास आवश्यक तपशील हाताशी असल्यास आयकर विवरणपत्र भरणे सोपे जाते. आपल्याला विवरणपत्र भरता येत नसल्यास तज्ज्ञ व्यक्ती/ संस्था यांची मदत घ्यावी. अनेकदा आपण जाणकार समजत असलेली व्यक्ती यात जाणकार असतेच असे नाही तेव्हा आपण माहिती असल्यास स्वतः अचूक मोजणी करून द्यावी आणि संबंधित व्यक्तीस समजावून सांगावी त्याने विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी तपासून आपण पहावी. अनावधानाने यात संबंधित व्यक्तीकडून चूक झाल्यास त्याची सर्व जबाबदारी करदात्यांवर येते. त्यास दंड होतो याशिवाय मनस्ताप होतो तो वेगळाच. काही व्यावसायिक फर्म यासारख्या सेवा फी आकारून आपल्या ग्राहकांसाठी करीत असतात त्यांची मदत घेता येईल. एवढी पुरेशी काळजी घेऊनही काही जाहीर करायचे राहिले असल्यास विवरणपत्र 31 डिसेंबरपर्यत (जरी ते मंजूर झालेले असले / नसले तरी) दुरुस्त करता येते.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत. याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)
18 मे 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम आणि दैनिक प्रहार मुंबई आवृत्तीमध्ये पूर्वप्रकाशित.
Monday, 12 May 2025
काही सुचिबाह्य कंपन्या भाग2
#काही_सूचिबाह्य_कंपन्या_भाग2
मागील भागात आपण विविध मंचावर उपलब्ध असणाऱ्या अपोलो ग्रीन एनर्जी, विक्रम सोलार, टाटा कॅपिटल, एसबीआय फंड मॅनेजमेंट लिमिटेड या सूचिबाह्य कंपन्यांची माहीती मिळवली आज अजून काही प्रमुख कंपन्यांची माहिती मिळवूयात.
●एनएसई इंडिया लिमिटेड: सन 1992 मध्ये सरकारच्या पुढाकाराने स्थापन झालेले राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) हे जगातील आघाडीचे स्टॉक एक्सचेंज आहे ज्यामध्ये सुमारे 2300 कंपन्या सूचीबद्ध आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ, भारतीय स्टेट बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन त्याचे महत्वाचे भागधारक आहेत. सन 1994 मध्ये, NSE ने इलेक्ट्रॉनिक स्क्रीन-आधारित ट्रेडिंग आणि इंटरनेट ट्रेडिंग सुरू केले भारतीय शेअरबाजारात क्रांती केली. NSE चा प्रमुख निर्देशांक, निफ्टी 50, भारतीय भांडवली बाजारांसाठी जागतिक बेंचमार्क म्हणून काम करतो. NSE हे जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहे ज्याचा जागतिक डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट ट्रेडिंगमध्ये 21% वाटा आहे. चलनातील फ्युचर्स ट्रेडिंगसाठी ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज देखील आहे. NSE चे भांडवली बाजार व्यवसाय मॉडेल प्रामुख्याने ट्रेडिंग सेवा, एक्सचेंज लिस्टिंग, मार्केट डेटा फीड, निर्देशांक आणि तंत्रज्ञान उपाय प्रदान करते. त्याचे रोख बाजार इक्विटी शेअर्स, म्युच्युअल फंड, ईटीएफ, आरईआयटी, सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स, सरकारी सिक्युरिटीज, टी-बिल इत्यादींच्या व्यापारासाठी एक व्यासपीठ देते. कर्ज बाजार सरकारी, कॉर्पोरेट बाँड, व्यावसायिक कागदपत्रे आणि इतर कर्ज साधने उपलब्ध करून देते. एनएसई इक्विटी निर्देशांक, हायब्रिड निर्देशांक आणि मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या, विमा कंपन्या, गुंतवणूक बँका, पीएमएस आणि स्टॉक एक्सचेंजसाठी कस्टमाइज्ड निर्देशांकांसाठी निर्देशांक व्यवस्थापन सेवा देखील प्रदान देत आहे. गेल्या तीन वर्षांत कंपनीने 35% च्या सीएजीआरवर कामगिरी केली आहे. एनएसईचा आर्थिक वर्ष 2024 अखेरचा महसूल ₹ 15640 कोटी तर निव्वळ नफा ₹ 8327 कोटींवर पोहोचला आहे. प्रति शेअर कमाई ₹ 33.47 आहे. एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 1650/- च्या आसपास असून व्यवहार किमान 50 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹1560/₹8160 या मर्यादेत होती. काही अंतर्गत चौकशींमुळे त्याचा पब्लिक इशू लांबला तो लवकरच येण्याची शक्यता आहे. 6 मे रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मार्च 2025 प्रतिशेअर 35/- रुपये लाभांश देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
●चेन्नई सुपर किंग्ज लिमिटेड: चार वेळा आयपीएल विजेता असलेला सीएसके हा भारतातील एकमेव असा क्रीडा संघ आहे ज्यामध्ये सर्वसामान्यांना गुंतवणूक करता येईल. सीएसके ही सर्वात लोकप्रिय आयपीएल फ्रँचायझींपैकी एक आहे ज्याचे ब्रँड व्हॅल्यू मजबूत आहे. या ब्रँडची स्थापना सन 2008 मध्ये चेन्नई, तमिळनाडूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आयपीएल क्रिकेट संघाच्या रूपात झाली. ही इंडिया सिमेंट्सची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. आयपीएलची लोकप्रिय फ्रँचायझी असल्याने, सीएसके देशातील पहिली स्पोर्ट्स युनिकॉर्न बनली. या ब्रँडचे मार्केट कॅप 7800 कोटीपर्यंत वाढले.
चेन्नई सुपर किंग्ज विविध स्रोतांमधून उत्पन्न मिळवते जसे की- गेट तिकीट कलेक्शन, स्टेडियममधील जाहिराती आणि मर्चेंडाईज विक्री. संघाला एकूण महसुलाच्या 60% रक्कम मीडिया राईट्समधून मिळते, जी सर्वाधिक महसूल प्रवाह आहे. प्रायोजकत्वातून मिळणारे उत्पन्न एकूण महसुलाच्या सुमारे 15 ते 29% आहे आणि त्यानंतर तिकीट विक्रीतून 10% आहे. महामारीचा अनेक ब्रँडवर परिणाम झाला असला तरी, सीएसकेने अप्रत्यक्ष महसूल प्रवाहांद्वारे संतुलन राखण्यात यश मिळवले. आयपीएलमधील सर्वात आवडत्या संघांपैकी एक, सीएसके, मर्चेंडाईज विक्री, प्रायोजकत्व, बक्षीस रकमेचा काही भाग आणि डिजिटल व्ह्यूअरशिपद्वारे ठोस महसूल मिळवत राहील. आर्थिक वर्ष 2024 अखेर कंपनीने ₹695 कोटींच्या उलाढालीवर ₹ 201 कोटींचा निव्वळ नफा कमावला. त्यांची प्रति शेअर कमाई ₹ 6.14 आहे. दहा पैसे दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 190/- च्या आसपास असून व्यवहार 250 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹166/₹220 या मर्यादेत होती. कंपनी शेअरबाजारात येताना त्याचे दर्शनी मूल्य शेअर एकत्रित करून ₹ 1 करेल कारण भारतीय बाजारात एक रुपयांहून कमी दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सचे व्यवहार होत नाहीत.
●ऑर्बिस फायनान्शियल्स कॉर्पोरेशन लिमिटेड: सन 2005 मध्ये स्थापित, ऑर्बिस फायनान्शियल कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतातील वित्तीय सेवा क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी आहे. ऑर्बिस कस्टडी आणि फंड अकाउंटिंग, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज क्लिअरिंग, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज क्लिअरिंग, शेअर ट्रान्सफर एजन्सी आणि ट्रस्टी सेवा यासारख्या विस्तृत सेवा देते. कंपनीच्या ग्राहकांत 50 हून अधिक परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs), 150 पर्यायी गुंतवणूक निधी (AIFs) आणि 800 हून अधिक अनिवासी भारतीय (NRIs) यांचा समावेश आहे. कंपनी कस्टोडियल आणि क्लिअरिंग उत्पन्न आणि ट्रेझरी-संबंधित उत्पन्नातून महसूल मिळवते. ती भांडवली बाजारातून देखील उत्पन्न मिळवते.
अलिकडच्या वर्षांत, कंपनीने आर्थिक वर्ष 2024 अखेर 366 कोटी रुपयांच्या उलढालीवर 141 कोटींच्या निव्वळ नफ्यासह उत्कृष्ट आर्थिक वाढ दर्शविली आहे. प्रति शेअर कमाई ₹ 12.1 आहे. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 470/- च्या आसपास असून व्यवहार 100 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹290 / ₹510 या मर्यादेत होती.
●स्टड्स एक्सेसरीज लिमिटेड: दुचाकी हेल्मेट उत्पादनात जागतिक आघाडीवर असल्याने, स्टड्स संघटित दुचाकी हेल्मेट बाजारपेठेत जवळजवळ एक तृतीयांश वाटा उचलतात. कोविड-१९ दरम्यान स्टड्सना जास्त मागणी असताना फेस शिल्ड आणि प्रोटेक्शन वेअर तयार करण्याची संधी मिळाली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारत फक्त BIS-प्रमाणित दुचाकी हेल्मेटच तयार आणि विक्री करेल असे जाहीर केल्यावर स्टड्सच्या विक्रीला आणखी एक चालना मिळाली. कोविड-19 नंतर वाहतूक पुन्हा सुरू झाल्यामुळे दुचाकी हेल्मेटची मागणी झपाट्याने वाढत आहे. याशिवाय, लोक अनेकदा दोन ते तीन वर्षांत त्यांचे हेल्मेट बदलतात, ज्यामुळे कंपनीला अधिक व्यवसाय मिळतो. स्टड्स रायडिंग गियर ग्लोव्हज, गॉगल्स, जॅकेट आणि सेफ्टी आणि स्टोरेज गियरसह अॅक्सेसरीज उत्पादनाचा विस्तार करत आहे. याव्यतिरिक्त, स्टड्सला सायकल हेल्मेट विक्रीवर वर्चस्व गाजवण्याची संधी देखील आहे. कंपनी युरोप आणि अमेरिकेसह 40 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. अलीकडेच, कंपनीने हरियाणातील फरीदाबादमध्ये आपली उत्पादन क्षमता दुप्पट केली आहे. सन 2024 आर्थिक वर्ष अखेर कंपनीची उलाढाल ₹531 कोटी असून प्रति शेअर कमाई ₹ 14.54 आहे. पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 680/- च्या आसपास असून व्यवहार 100 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹670 / ₹1550 या मर्यादेत होती.
विविध मंचावर हे आणि असे अनेक कंपन्यांचे शेअर्स उपलब्ध असून त्यांचा व्यवहार संच आणि बाजारभाव यात मंचानुसार फरक पडू शकतो. मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करायची असल्यास बाजारभावात फरक पडू शकतो. हा लेख कोणतीही गुंतवणूक शिफारस करीत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत
Subscribe to:
Posts (Atom)