Friday, 26 September 2025
समजून घेऊयात भांडवल बाजारातील गुंतवणूक भाग 2
#समजून_ घेऊयात_भांडवल_बाजारातील_गुंतवणूक_भाग_2
6.विशिष्ट विषयावर अथवा व्यवसाय प्रकाराशी संबंधित फंड:
या प्रकारातील फंड हे एकदा विषय अथवा व्यवसाय प्रकार यावर आधारित असतात. वेगवेगळ्या व्यवसाय प्रकारात गुंतवणूक करण्याऐवजी ते एकाच प्रकारच्या व्यवसायात अथवा एखाद्या कल्पनेवर आधारित विविध कंपन्यांत गुंतवणूक करतात.
◆विशिष्ट व्यवसायावर आधारित फंड: हे फंड एकाच प्रकारच्या व्यवसायात गुंतवणूक करतात. उदा बँकिंग, आयटी, आरोग्य, ऊर्जा इ.
◆विशिष्ट विषयावर आधारित फंड: हे फंड व्यवसायापेक्षा कल्पेनेवर आधारित असल्याने त्यात अनेक व्यवसाय प्रकार एकवटले जाऊ शकतात. उदा अपारंपरिक ऊर्जा, शहर विकास, तंत्रज्ञान इ यात या कल्पनेवर आधारित वेगवेगळ्या कंपन्यांचा सामावेश होतो.
फंडांची काम करण्याची पद्धत: विशिष्ट व्यवसाय अथवा संकल्पना यावर आधारित फंड एका सामायिक खात्यात गुंतवणूकदारांकडून रक्कम एकत्रितपणे जमा करता. फंड व्यवस्थापक त्यातील रकमेचा विनियोग फंडाच्या धेय्यानुसार व्यवसाय अथवा कल्पनेवर आधारित कंपन्यांत गुंतवणूक करण्यासाठी वापरला जातो. या कंपन्यांनी उत्तम कामगिरी केली तर गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत वृद्धी होते.
व्यवसाय अथवा कल्पनेवर आधारित फंडाचे भवितव्य:
●निश्चित उद्देशाने केलेली गुंतवणूक- ज्या गुंतवणूकदाराना एखादे क्षेत्र किंवा कल्पना चांगली चालेल असे वाटते अश्यासाठी योग्य गुंतवणूक.
●क्षेत्रातील व्यवसाय विविधता- जरी ही गुंतवणूक एकाच क्षेत्रात किंवा संकल्पनेत होत असली तरी त्यातील एकाच कंपनीत गुंतवणूक न करता विविध कंपन्यांत ती केली जाऊन विविधता साधली जाते.
●अधिक परतावा (अधिक जोखमीसह)- असे फंड जर निवडलेल्या क्षेत्राने उत्तम कामगिरी केल्यास अधिक परतावा मिळवू शकतात असं असलं तरी या क्षेत्राची कामगिरी चांगली न झाल्यास परतावा कमी होण्याचा अधिक धोका असतो.
◆संकल्पनेवर आधारित फंडाचे उदाहरण- जर अक्षय ऊर्जा क्षेत्रास उज्वल भविष्य आहे असे वाटणारे फंड यासंबंधातील ऊर्जा कंपन्या म्हणजे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, विजेवर चालणाऱ्या मोटारी यातील विविध कंपन्यात गुंतवणूक करतील.
◆विशिष्ट व्यवसाय आधारित फंडाचे उदाहरण- आरोग्यक्षेत्र यासंबंधात रुग्णालये, औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या, आरोग्य क्षेत्राशी संबंधित उपकरणे बनवणाऱ्या कंपन्या यामधील विविध कंपन्यात अशा फंडांची गुंतवणूक केली जाते.
अशा फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी विचारात घ्यायचे महत्त्वाचे मुद्दे:
●जोखीम: एकाच संकल्पनेवर अथवा क्षेत्रात केलेली गुंतवणूक त्यावर अधिक अवलंबून राहिल्याने अधिक जोखमीची असते.
●सदर क्षेत्राचे ज्ञान: विशिष्ट संकल्पना अथवा क्षेत्रात गुंतवणूक करण्यापूर्वी त्या क्षेत्राचे ज्ञान असणे गरजेचं आहे.
●दीर्घकालीन गुंतवणूक आवश्यक: असे फंड दिर्घकाळात उत्तम परतावा देत असल्याने गुंतवणूक उद्दिष्ट दीर्घकालीन असावे.
7. फंड्स ऑफ फंड:
हे फंड भांडवल बाजारात थेट गुंतवणूक न करता विविध फंड योजनांत गुंतवणूक करतात. त्यामुळे गुंतवणूकदाराची जोखीम विविध मालमत्ता प्रकारात विभागली जाते. व्यावसायिक फंड व्यवस्थापनाकडून विविध ठिकाणी गुंतवणूक केली जाते. त्यामुळे एका योजनेतून अनेक फंडाचा लाभ मिळतो. या फंडांची निर्मिती विविध फंडातच गुंतवणूक करण्यासाठी झाली आहे. म्युच्युअल फंड योजनांप्रमाणेच गुंतवणूकदारांकडून जमा केलेली रक्कम एकत्र करून ती विविध फंडात अथवा अन्य एक्सचेंज ट्रेडेड फंडात केली जाते. यामुळे गुंतवणुकीत विविधता येऊन गुंतवणूक तज्ज्ञांकडून व्यवस्थापित केली जाते.
फंड्स ऑफ फंड योजनांचे फायदे:
●गुंतवणूक विविधता: ही गुंतवणूक वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या क्षेत्रातील मालमत्ता प्रकारातील फंडातच केली जात असल्याने गुंतवणुकीत विविधता येते.
●परवडणारी गुंतवणूक: वैयक्तिकरित्या गुंतवणूकदारास अशी गुंतवणूक करण्यास प्रचंड रकमेची गरज असते फंड्स ऑफ फंडच्या माध्यमातून छोटे गुंतवणूकदार अत्यंत कमी पैशात अशी गुंतवणूक करू शकतात.
●तज्ज्ञ व्यवस्थापन: ही गुंतवणूक व्यावसायिक जाणकारांकडून होत असल्याने त्याचा ताण गुंतवणूकदारांवर येत नाही.
●कमी जोखीम: यापूर्वी सांगितल्याप्रमाणे विविध फंडात गुंतवणूक केली गेल्याने त्यातील धोका कमी होतो.
समजा एखाद्या गुंतवणूकदाराकडे गुंतवणूक करण्यासाठी एक लाख रुपये आहेत त्याला भांडवल बाजार अथवा म्युच्युअल फंड संबंधात काहीही माहिती नसेल तर त्याला ही गुंतवणूक करणे कठीण होईल. त्याने जर फंड्स ऑफ फंडच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास तो अप्रत्यक्षपणे भांडवल बाजारातील शेअर्स, रोखे अशा विविध उपलब्ध प्रकारात गुंतवणूक करू शकेल.
या गुंतवणूकदारासाठी फंड्स ऑफ फंड हा उत्तम गुंतवणूक प्रकार ठरू शकेल विविध गुंतवणूक प्रकारात थोडी जास्त व्यवस्थापन फी देऊन (कारण येथे दोनदा म्हणजे ज्या फंडात गुंतवणूक केली जाईल तो फंड आणि ज्याने गुंतवणूक केली तो फंड्स ऑफ फंड) विविध मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करता येईल आणि त्यातून जोखीम टाळून सर्वसाधारण आधिक्य मिळवता येईल. अशी गुंतवणूक दिर्घकाळात उत्तम परतावा देते अशी उदाहरणे आहेत. त्यामुळे दिर्घकाळात संपत्ती मिळवण्यासाठीचा हा योग्य मार्ग आहे.
8.म्युच्युअल फंड म्हणजे काय? समजून घेऊयात.
संपत्तीत वाढ करण्यासाठी म्युच्युअल फंड हा लोकप्रिय गुंतवणूक प्रकार आहे. विविध प्रकारचे हे फंड गुंतवणूक दारांची गरज ओळखून व्यवसायिक फंड मॅनेजरकडून व्यवस्थापित केले जात असतात. तुम्ही गुंतवणुकीस सुरुवात करणारे असाल अथवा अनुभवी गुंतवणूकदार असून गुंतवणूक संचात विविधता आणण्याचा विचार करत असाल तर म्युच्युअल फंड म्हणजे काय ते समजून घेणे आवश्यक आहे.
आपले उद्दिष्ट आणि आर्थिक भवितव्य सुरक्षित करण्यासाठी करण्यासाठी गुंतवणूक योग्य प्रकारे आणि योग्य प्रकारात करणे आवश्यक आहे. गुंतवणूक म्हटलं की जोखीम आलीच. दिवसेंदिवस गुंतवणूक करणे अधिकाधिक त्यात होणाऱ्या बदलामुळे कठीण होत असल्याने कोणत्याही गुंतवणुकीची सुरुवात म्युच्युअल फंड योजनांत करणे केव्हाही चांगलेच. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूकयोग्य रक्कम असते आणि जाणकार व्यवस्थापक असतात ते शेअर्स, रोखे आणि अन्य गुंतवणूक प्रकारात करत असल्याने आपल्याकडे कोणतेही गुंतवणूक कौशल्य नसले तरी भांडवल बाजारात गुंतवणूक करणे शक्य होते.
म्युचुअल फंड म्हणजे काय?
म्युच्युअल फंड हे एक असे माध्यम आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार एकत्र येऊन पैसे जमा करतात. या एकत्रित पैशांची गुंतवणूक भांडवल बाजारात केली जाते. ही गुंतवणूक जाणकार फंड व्यवस्थापक गुंतवणूकदारांच्या वतीने करतात.
म्युच्युअल फंडांची वैशिष्ठ्ये:
●विविधता: भांडवल बाजारातील विविध प्रकारात गुंतवणूक केली गेल्याने त्यातील जोखीम विभागली जाते.
●जाणकार व्यवस्थापक: या फंडाचे व्यवस्थापन तज्ज्ञांकडून होत असल्याने तुम्हाला त्यावर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवावे लागत नाही.
●सहज सुलभ सहभाग: अत्यंत कमी रक्कमेने सुरुवात करता येत असल्याने ती कुणालाही सहज करता येते.
●रोकड सुलभता: योजनेत गुंतवणूक करणे रहावा त्यातून गुंतवणूक काढून घेणे सुलभ असल्याने ते गुंतवणूकदारांच्या सोयीचे आहे.
म्युच्युअल फंडाचे कार्य कसे चालते?
●गुंतवणूक रकमेचे एकत्रीकरण: सर्व व्यक्तींची गुंतवणूक योग्य रक्कम एका खात्यात जमा केली जाते.
●या रकमेचा वापर करून फंड मॅनेजर फंडाच्या उद्दिष्टानुरूप गुंतवणूक संच तयार करतो यासाठी शेअर्स, रोखे आणि इतर मालमत्ता प्रकारात गुंतवणूक केली जाते.
●लाभ विनियोग: फंडाने डिव्हिडंड, व्याज आणि भांडवली नफ्याद्वारे मिळवलेला फायदा व्यवस्थापन खर्च वजा करून सर्वाना त्यांच्या गुंतवणूकीच्या प्रमाणात देण्यात येतो.
म्युच्युअल फंडाचे प्रकार:
या योजना वेगवेगळी आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची यावर अवलंबून असतात. त्यानुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात येते.
●इक्विटी फंड- या योजनेतील गुंतवणूक प्रमुख्याने शेअर्समध्ये केली जाते. दिर्घकाळात यातून उत्तम परतावा मिळू शकतो.
●बॉण्ड फंड: यातील गुंतवणूक विविध कर्ज रोखे निश्चित उत्पन्न देणाऱ्या प्रकारात केली जाते. कमी जोखीम घेणाऱ्या पारंपरिक विचारसरणीच्या गुंतवणूकदारांच्या पसंतीस हे फंड उतरतात.
●बॅलन्स किंवा हायब्रीड फंड: यातील गुंतवणूक शेअर्स कर्जरोखे अशा दोन्ही प्रकारात केल्याने फंडास स्थेर्य आणि वृद्धी असे दोन्ही लाभ मिळतात.
●इंडेक्स फंड: हे फंड वेगवेगळ्या निर्देशांकामध्ये त्यातील होल्डिंगच्या प्रमाणात गुंतवणूक करीत असल्याने ते ज्या निर्देशांकात गुंतवणूक करतात त्या जवळपास परतावा मिळतो.
●टॅक्स सेव्हिंग फंड: यातील गुंतवणूक प्रामुख्याने शेअरबाजारात केली जाऊन त्यामुळे आयकरात सवलत मिळते. इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम असेही त्यांना म्हटले जाते.
म्युच्युअल फंड योजनांचा उपयोग-
●संपत्ती निर्मिती: या योजनांत गुंतवणूक केल्याने अधिक परतावा मिळण्याची शक्यता असल्याने त्यातून संपत्तीत वाढ होते.
●गंगाजळीची निर्मिती: अडीअडचणीस पैशाची गरज लागली असता त्याचा उपयोग होतो बचत खात्यात कमी व्याजदराने पैसे ठेवण्यापेक्षा लिक्विड फंडात ठेवले असता ते सहज काढता येऊन त्यावर अधिक परतावा मिळतो.
●करबचत- इ एल एस एस योजनांत गुंतवणूक केल्यास 80 सी नुसार आयकरात सवलत मिळते.
●निवृत्ती नियोजन: यात उपलब्ध असलेल्या योजनांत दरमहा सातत्याने गुंतवणूक करून निवृत्ती नियोजनासाठी मोठ्या रकमेची उभारणी करता येते.
म्युच्युअल फंड गुंतवणूकीचे उदाहरण- समजा एखाद्या व्यक्तीने दहा हजार रुपये एखाद्या योजनेत गुंतवले तर फंड मॅनेजर ती रक्कम भांडवल बाजारात टाकेल ही गुंतवणूक वर्षभरात 10% ने वाढल्यास त्याचे अकरा हजार होतील अथवा भाव कमी आल्यास ते कमी होतील. याउलट एखाद्या शेअर्समध्ये ते तुम्ही गुंतवले तर त्यात अधिक फरक पडू शकेल पण योजनेतील गुंतवणूक विविध प्रकारात होत असल्याने ती अचानक कमी होण्याची जोखीम विभागली जाऊ शकते. त्यामुळे बाजार खाली आला तरी म्युच्युअल फंड योजनांवर त्याचा फार प्रभाव पडत नाही.
म्युचुअल फंड योजनांची निवड का करावी?
●सुलभता: या योजना समजण्यास आणि गुंतवणूक करण्यास सोप्या असतात.
●वैविध्य: तुम्ही जेवढी जोखीम पत्करू शकता त्यास अनुरूप विविध प्रकार त्यात आहेत.
●पारदर्शकता: या योजनांची त्यातील बदलांची माहिती सहज उपलब्ध असल्याने त्या पुरेशा पारदर्शक आहेत.
●अतिशय कमी पैशात त्यात गुंतवणूक करता येऊन ती वाढवता येते.
गुंतवणूक सुरुवात करण्यास म्युच्युअल फंड योजना उत्तम आहेत. गुंतवणूकदारांची गरज, उद्देश, जोखीमक्षमता, गुंतवणूक रक्कम, अपेक्षा यांची त्या पूर्तता करू शकतात. योग्य योजनेची निवड करण्यासाठी म्युच्युअल फंडाविषयी प्राथमिक माहिती असणे जरुरीचे आहे. त्यात जोखीमही आहेच त्यामुळे तुमच्या उद्दीष्ट पूर्तता कोणत्या योजनेने होईल हे समजून घेण्यासाठी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. अगदी अल्प रकमेने सुरुवात करून त्यात वृद्धी कशी आणि किती होते याचा अनुभव घ्या. सेबीच्या सारथी या अँपवरील माहितीचा भावानुवाद.(अपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत.
लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही याची नोंद घ्यावी)
∆
Friday, 19 September 2025
समजून घेऊया भांडवल बाजारातील गुंतवणूक भाग 1
#समजून_घेऊया_भांडवल_बाजारातील_गुंतवणूक_भाग_1
1.भांडवल बाजारातील गुंतवणूक : यापूर्वी आपण महागाई आणि गुंतवणूक यासंबंधीची माहिती मिळवली आहे. आपली आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण जी बचत करतो त्यात लवकर वाढ होण्यासाठी गुंतवणूक करणं आवश्यक आहे.
भांडवल बाजाराचे दोन विभाग आहेत
अ) प्राथमिक बाजार
ब) दुय्यम बाजार
अ) प्राथमिक बाजार- येथे समभाग, रोखे, सरकारी कर्जरोखे सर्व गुंतवणूकदारांना प्रारंभिक भाग विक्री, विद्यमान भागधारकांनी केलेली विक्री याद्वारे सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिले जातात.
ब)दुय्यम बाजार - जिथे समभाग, रोखे, सरकारी कर्जरोखे यांची खरेदीविक्री, ते जारी करणारे सोडून इतर गुंतवणूकदार आपापसात व्यवहार करतात. मुंबई शेअरबाजार, राष्ट्रीय शेअरबाजार, मेट्रोपोलियन स्टॉक एक्सचेंज ही काही दुय्यम बाजारांची उदाहरणे आहेत.
2.भांडवल बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक गोष्टी : भांडवल बाजारात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराकडे आवश्यक गोष्टी अशा-
अ)डी मॅट खाते- हे खाते आपल्याला सेबी नोंदणीकृत डिपॉजीटरी पार्टीसीपंटकडे काढावे लागते. या खात्यात गुंतवणूकदार त्यांची भांडवल बाजारातील गुंतवणूक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवता येते. डिपॉजीटरी पार्टीसीपंट हे डिपॉजीटरीचे अधिकृत प्रतिनिधी असतात सध्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजीटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉजीटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या दोन मान्यताप्राप्त डिपॉजीटरी आहेत.
आ)ट्रेडिंग खाते किंवा ब्रोकिंग खाते- सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या ब्रोकरकडील खाते याचा वापर करून शेअरबाजारात शेअर्सची खरेदी विक्री करता येते.
इ)बँक खाते- भांडवल बाजारात व्यवहार करण्यासाठी बँक खात्याची गरज असते.
3.भांडवल बाजारातील मालमत्ता प्रकार- भांडवल बाजारात शेअर्स, रोखे, इटीएफ, फ्युचर आणि ऑप्शन या सारखे डिरिव्हेटिवमधील करार विविध मालमत्तांचे प्रत्यक्ष आणि म्युच्युअल फंड हाऊस मार्फत अप्रत्यक्ष सौदे होतात. यातील प्रत्येक मालमत्ता प्रकार आगळावेगळा गुंतवणूक प्रकार असून त्याचे वैशिष्ट्य आणि त्यातील जोखीम यांची जाणीव गुंतवणूक करण्यापूर्वी माहिती असणं गरजेचं आहे.
अ)शेअर्स-
म्हणजे काय?
●व्यवसाय सुरू करण्यासाठी जे भांडवल लागतं ते समभाग जारी करून उभारले जाते.
●जेव्हा गुंतवणूकदार शेअर खरेदी करतो तेव्हा तो त्या प्रमाणात त्या व्यवसायाचा मालक होतो आणि त्याला कंपनीच्या वाढ, उन्नती यांत सहभागी होण्याची संधी मिळते.
फायदे:
●लाभांशाच्या रूपाने गुंतवणूकदारास उत्पन्न मिळते.
●शेअर्सच्या किंमतीत वाढ झाल्यास भांडवली नफा मिळतो.
जोखीम:
●शेअर्सचे भाव अस्थिर असतात.
●कंपनीच्या कामगिरीवर भाव वर खाली होत असतात त्याचप्रमाणे सर्वसाधारण आर्थिक परिस्थितीचा त्यावर प्रभाव पडतो.
आ)रोखे-
म्हणजे काय?
●उद्योग किंवा सरकार यांनी घेतलेलं कर्ज म्हणजे रोखे,
●रोखे जारी करून ते निधी उभारू शकतात.
फायदे:
●गुंतवणूकदारास ठराविक अंतराने मान्य केलेल्या दराने व्याज मिळते.
●मुदत संपल्यावर गुंतवलेली रक्कम परत मिळते.
जोखीम:
●भावातील चढउतार,
● व्याज, मुद्दल परत न मिळणे’
●व्यवसाय विसर्जित होणे.
इ) म्युच्युअल फंड-
म्हणजे काय?
●भांडवल बाजारात अप्रत्यक्ष गुंतवणूक करण्याचा हा मालमत्ता प्रकार आहे. येथे फंड मॅनेजर विविध गुंतवणूकदारांनी एकत्रित केलेली गुंतवणूक भांडवल बाजारात गुंतवतो,
●ही गुंतवणूक शेअर्स रोखे अथवा अन्य मालमत्ता प्रकारात गुंतवण्यात येते.
फायदे:
●गुंतवणूकीचे विविध मालमत्ता प्रकारात विभाजन झाल्याने जोखीम कमी होते.
●गुंतवणूक व्यावसायिक गुंतवणूक तज्ज्ञाकडून व्यवस्थापित केली जाते.
जोखीम:
●भावातील अस्थिरता.
ई)एक्सचेंज ट्रेडेड फंड-
म्हणजे काय?
●म्युच्युअल फंड योजनांशी मिळताजुळता असा गुंतवणूक प्रकार मात्र त्याचे व्यवहार शेअरबाजारात होतात.
फायदे:
●गुंतवणूक वेगवेगळ्या मालमत्तांमध्ये केली गेल्याने गुंतवणूक संचाचे विविधिकारण होते.
तोटे:
●भावांतील चढउतार.
4.भांडवल बाजार गुंतवणूकीतील जोखीम:
भांडवल बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची गुंतवणूक उद्दिष्टे, हेतू आणि त्यातील जोखीम माहिती असणं गरजेचं आहे. विविध जोखमीचे विविध प्रकारात वर्गीकरण करता येणे शक्य आहे.
◆बाजार संबंधित जोखीम: बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराना बाजाराचा कल आणि देशाची सर्वसाधारण अर्थव्यवस्था यांच्या परिणामामुळे कधीकधी तोटा झाल्याचे अनुभवास येते.
◆महागाई संबंधात जोखीम: महागाई संबंधातील जोखीम म्हणजे त्यामुळे लोकांची खरेदी करण्याची क्षमता म्हणजे क्रयशक्ती कमी होते. महागाईमुळे रोखता प्रवाह कमी झाल्याने त्याचा गुंतवणूकीच्या भविष्यातील मूल्यावर प्रभाव पडतो.
◆तरलते संबंधित जोखीम: तरलता नसल्यास योग्य वेळी गुंतवणूक करणे किंवा ती काढून घेणे शक्य होत नाही.
◆व्यवसायासंबंधीत जोखीम: काही अनपेक्षित अडचणी अथवा आर्थिक परिस्थितीमुळे व्यवसाय करणे अशक्य होते. तेव्हा अशा व्यवसायात केलेली गुंतवणूक धोकादायक ठरते.
◆भावातील तीव्र चढउतारासंबंधित जोखीम: बाजारात काही कंपन्यांच्या भावात तीव्र चढउतार होतात. अशा वेळी योग्य भावात गुंतवणूक करणे अथवा ती काढून घेणे यासंबंधी निर्णय घेणे कठीण होते.
◆विदेशी चलन संबंधित जोखीम: चलनाच्या भावात होणाऱ्या चढ उताराचा त्यासंबंधीत गुंतवणूकीवर परिमाण होऊ शकतो.
जोखमीवर मात कशी करायची?
वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या उद्योगात गुंतवणूक विभागून वर उल्लेख केलेल्या जोखमींची तीव्रता कमी करता येते.
5.गुंतवणूक संदर्भात ‘करा’ आणि ‘करू नका’- गुंतवणूकदारास आपल्या गुंतवणूकीच्या संदर्भात म्हणजे त्याचे अधिकार, जबाबदारी यांची माहिती असणे गरजेचे आहे. यासंदर्भातील ‘करा’ आणि ‘करू नका’ असे-
◆करा-
●भांडवल बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबीकडे नोंदणी केलेल्या गुंतवणूक सल्लागाराचाच सल्ला घ्या.
●तुमचे उद्दिष्ट जोखीम घेण्याची क्षमता यांचा विचार करूनच गुंतवणूक साधन अथवा योजनेची निवड करा.
●व्यवहार झाल्याची सूचना आणि व्यवहार करार 24 तासाच्या आत मिळायला हवा. तुमचा गुंतवणूक संच बरोबर आहे की नाही? हे नियमितपणे तपासा.
●सही करण्यापूर्वी कोणतेही कागदपत्र वाचून पहा.
●सही केलेल्या कराराच्या प्रति, खाते उतारा, व्यवहार करार आणि पैसे दिल्याचा मिळाल्याचा तपशीलाची नोंद ठेवा.
●ठराविक कालावधीने आपली आर्थिक गरज, उद्दिष्टे आणि गुंतवणूक संच याचा आढावा घेऊन सर्व काही योग्य दिशेने चालू असल्याची खात्री करून घ्या.
●पैशांचे कोणतेही व्यवहार बँकेच्या मध्यस्थीने करा म्हणजेच रोखीने कोणतेही व्यवहार करू नका.
●आपल्या वैयक्तिक माहितीतील बदल जसे- पत्ता, फोन नंबर, बँक तपशिल, नाम निर्देशक, मेल इ यातील बदल वेळोवेळी सर्वत्र अद्ययावत करा. सिम कार्ड आता पोर्ट करता येते त्यामुळे एकच मोबाईल क्र सर्व गुंतवणूक साधनांमध्ये वापरा. मोबाइलद्वारे आता सर्व व्यवहार शक्य असल्याने तो सर्वात महत्वाचा साथीदार आहे.
●नामनिर्देशन सुविधेचा वापर करा आता एकाहून अधिक व्यक्तींचे नामनिर्देशन डी मॅट खात्यास करता येते.
●तुमच्या ब्रोकरकडील खात्यातील व्यवहार तुमच्या सूचनेप्रमाणे 30 अथवा 90 दिवसांनी पूर्वपदावर आणले जातात की नाही ते पहा.
●तुमचे ट्रेडिंग खाते, त्यात होणारे व्यवहार, व्यवहार झाल्याचे संदेश, आलेले मेल सर्वांवर बारकाईने लक्ष असुद्यात.
◆करू नका-
●गुंतवणूक करण्यासाठी कर्ज काढू नका.
●अनधिकृत दलाल आणि मंच यांच्यामार्फत व्यवहार करू नका.
●कबूल केलेल्या दारानेच अधिकृत मध्यस्थाना त्याची दलाली द्यावी.
●अटी आणि शर्ती समजून घेतल्याशिवाय कोणतेही करार करू नका.
●वर काहीही न लिहिलेल्या डिलिव्हरी इनस्टक्शन स्लिपवर सही करू नका.
●कोणालाही सर्वसाधारण अधिकारपत्र देऊ नका अगदीच गरजेचे असल्यास विशिष्ट परिस्थतीत व्यवहार करण्याचे अधिकारपत्र विश्वासू व्यक्तीस देता येईल.
●वाद निर्माण झाल्यास विहित मुदतीत मध्यस्थाविषयीची रीतसर तक्रार शेअरबाजार अथवा सेबी यांच्याकडे करावी.
●डब्बा ट्रेडिंग (अनधिकृत मंचावरील पैजेचे व्यवहार) बेकायदेशीर असून धोकादायक आहेत.
●खात्रीलायक बातम्या देऊन तुम्हाला गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या व्यक्ती मध्यस्थ यांच्यावर विश्वास ठेवू नका. सेबीकडे त्यांची तक्रार करा.
●आपल्या खात्याचा पासवर्ड वेळोवेळी बदलत राहा तो कुणालाही सांगू नका.
●अविश्वसनीय परतावा देण्याचा दावा करणाऱ्या पोंझी स्कीम, डिपॉझिट स्कीम, चिट फंड यामध्ये गुंतवणूक करू नका.
●तुमची ग्राहक ओळख (केवायसी) फॉर्म भरताना त्यातील आवश्यक रकाने सोडून देण्याऐवजी त्यावर काट मारा.
●तुम्हाला असुरक्षित वाटत असल्यास डिजिटल करार करू नका.
सेबीच्या सारथी या अँपवर असलेल्या माहितीचा भावानुवाद (अपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत.
लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही याची नोंद घ्यावी)
अर्थसाक्षर डॉट कॉम या संकेतस्थळावर 19 सप्टेंबर 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 12 September 2025
तुमच्या पैशांची वृद्धी करण्याचा मार्ग- गुंतवणूक भाग 2
#तुमच्या_पैशांची_वृद्धी_करण्याचा_मार्ग- #गुंतवणूक_भाग_2
4. गुंतवणूक योजनांमधील फसवणूकीपासून दूर राहा.
कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फायदा व्हावा असे सर्वांना वाटत असते. काही चलाख व्यक्ती गुंतवणूकदारांच्या याच मानसिकतेचा फायदा घेण्याची संधी शोधत असतात. गुंतवणूकदारांना फसवून लुबाडणे हा त्यांचा उद्देश असतो.
गुंतवणूक करताना फसवणूक टाळण्याच्या युक्त्या-
★गुंतवणूक करू देणारी कंपनी अथवा व्यक्तींची माहिती मिळावा. त्यांनी सुचवलेली योजना तपासून पहा. त्याचा पूर्वेतिहास आणि कायदेशीरपणा बाबतीत खात्री करून घ्या.
★अवास्तव परतावा देऊ करणाऱ्या योजनांबाबत सावधान रहा. अधिक परतवा म्हणजे अधिक जोखीम हे कायम लक्षात असुद्यात.
★फसवणूक करणारे तुमच्यावर गुंतवणूक करण्यासाठी दबाव टाकतील आणि झटपट निर्णय घ्यायला भाग पाडतील. त्याला बळी न पडता विचारपूर्वक निर्णय घ्या.
★फोन कॉल, मेल, सोशल मीडिया या माध्यमातून आलेल्या गुंतवणूक पर्यायावर काळजीपूर्वक निर्णय घ्या त्यातून फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते.
★खात्रीपूर्वक अवास्तव परतावा, गुंतवणूक योजनेची अपूर्ण माहिती अथवा तपशील देण्यात केलेली टाळाटाळ या धोक्याच्या घंटा समजून सावध रहा.
★कंपनी अगर व्यक्तीने सुचवलेल्या योजनेस नियामकांची रीतसर मान्यता मिळवली आहे का? ते पहा.
★एखादी बनावट योजना नजरेस आली तर संबंधित नियामक आणि पोलीस यांच्या ते लक्षात आणून द्या.
★मान्यताप्राप्त आर्थिक सल्लागाराची मदत घ्या ते तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेले विविध गुंतवणूक पर्याय नीट समजावून सांगतील.
5.गुंतवणुकीस लवकरात लवकर सुरुवात करणे महत्वाचे-
गुंतवणूक कालावधी हा गुंतवणुकीचा मित्र आहे. गुंतवणूक करण्याची सुरुवात लवकर करणे हे सुजाण गुंतवणूकदाराचे लक्षण आहे. लवकर सुरुवात केल्याने गुंतवणूकीस अधिक कालावधी मिळाल्याने त्यास चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळून उत्तम वृद्धी होते.
गुंतवणूकीस सुरुवात करण्याचे योग्य वय कोणते?
आयुष्यात जेव्हा कधी तुम्हाला अर्थप्राप्ती होईल तो दिवस आणि त्यावेळी असलेलं तुमचं वय हेच गुंतवणूकीस सुरुवात करण्याचं योग्य वय आहे. ही अर्थप्राप्ती केवळ नोकरी व्यवसाय यातूनच नाही तर अन्य मार्गानेही होत असली तरी चालते. अलीकडे अनेक मुलांना त्यांचे पालक किरकोळ खर्चासाठी पैसे देतात. अनेकांना शिकत असतात शिष्यवृत्ती, पाठ्यवेतन मिळत असते किंवा एखाद्या प्रकल्पातील सहभागाबद्धल पैसे मिळतात. विद्यार्थाना विविध स्पर्धातून खेळांतून पैशांच्या स्वरूपात बक्षिसे मिळतात. यातून मिळणाऱ्या पैशाचा गुंतवणूकीसाठी विचार करू शकतो.
चक्रवाढ व्याजाचा फायदा कसा मिळतो?
चक्रवाढ वृद्धीची ताकद ही गुंतवणूकीची शक्ती आहे. चक्रवाढ व्याज ही समजण्यास सोपी अशी संकल्पना आहे यात मिळत असलेल्या व्याजावर व्याज (परताव्यावर परतावा) मिळत असल्याने एकूण परताव्यात वाढ होते. दीर्घकाळ ही वाढ घातांकीय पद्धतीने होत असल्याने आपण त्याचा अंदाज बांधू शकणार नाही या प्रमाणात वाढते तेव्हा जितका काळ अधिक जाईल तेवढी अधिकाधिक वाढ होते.
चक्रवाढ व्याजाची जादू एका सोप्या उदाहरणातून सहज समजेल.
दरवर्षी 9% दराने व्याज मिळत असल्यास ₹1000/- चे चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात ₹1088/-, 10 वर्षात ₹2367/-, 20 वर्षात ₹5604/- तर 40 वर्षात ₹31409/- होतात.
जोखीम पातळी
जेव्हा तुम्ही गुंतवणूक करण्यास लवकर सुरुवात करता तेव्हा अधिक जोखीम स्वीकारणे शक्य असते कारण तुमच्याकडे अधिक कालावधी असतो त्यामुळे बाजारातील चढ उताराची तीव्रता कमी होते. अधिक जोखीम घेतल्यास अधिक परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे तुमचे आर्थिक उद्दिष्ट वेळेवर किंवा त्यापूर्वी साध्य होऊ शकते.
गुंतवणूकीस लवकर सुरुवात केल्यास विविध मालमत्ता प्रकारात ती विभागता येते अशा वैविध्यपूर्ण गुंतवणूकीमुळे जोखीम विभागली जाऊन दिर्घकाळात सातत्याने योग्य परतावा मिळत राहतो.
निवृत्ती नियोजन
आपल्या निवृत्तीनंतरच्या खर्चाची पूर्तता करण्यास मोठया रकमेची गरज असते. जर आधीपासूनच निवृत्तीसाठी तरतूद केल्यास त्यास दिर्घकाळात मिळणाऱ्या चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो. त्यामुळे निवृत्त काळात आर्थिक सुरक्षितता लाभते.
महागाई
महागाई ही बचतीची शत्रू आहे तर गुंतवणूकीची मित्र. लवकर सुरू केलेली गुंतवणूक महागाईवर मात करते आणि तुमची क्रयशक्ती वाढवते. दिर्घकाळात गुंतवणुक महागाईवर मात करीत असल्याचा इतिहास आहे.
6. गुंतवणूकीतील जोखमीचे व्यवस्थापन
अजूनही अनेकजण भांडवल बाजारात गुंतवणूक करण्यास घाबरतात. त्यांना त्यांची गुंतवणूक बुडण्याची भीती वाटते. या जोखमीचे सुयोग्य व्यवस्थापन करता येते हे त्यांना माहिती नसतं. मूल्याधिष्ठित गुंतवणूक कीचे जनक बेजामिन ग्राहम म्हणतात, जोखीम टाळण्याऐवजी तिचे व्यवस्थापन करणे म्हणजे उत्तम गुंतवणूक करणे. फार वर्षांपूर्वी त्यांनी दिलेला हा संदेश आजही तितकाच लागू पडतो. योग्य माहिती आणि निश्चित हेतू मनात बाळगून भांडवल बाजारात केलेली गुंतवणूक उत्तम परतावा देते.
कोणत्याही गुंतवणूकीत काहींना काही जोखीम असतेच त्यामुळे कोणताही गुंतवणूकदार जोखीम टाळू शकत नाही तो व्यवस्थापन करून त्याच्या गुंतवणूक संचाची तीव्रता कमी करू शकतो त्यावर विपरीत परिणाम होऊ देत नाही.
त्यामुळेच सर्वप्रथम अभ्यास करून गुंतवणूक आणि जोखीम समजून घेतली पाहिजे याला कोणताही पर्याय नाही, सोपा मार्ग नाही. असा अभ्यास तुम्ही करू शकत नसाल तर त्यासंदर्भात व्यावसायिक सल्ला मार्गदर्शकाकडून घ्यावा लागेल.
दुसरं म्हणजे तुम्ही गुंतवणूक विविध मालमत्ता प्रकारात विभागली पाहिजे. जोखमीवर मात करण्याची ती गुरुकिल्ली आहे. तुम्ही मालमत्तेची विभागणी भांडवल बाजार, स्थावर मालमत्ता, वस्तू बाजार आणि मौल्यवान धातू यात करू शकता.
या मालमत्ता प्रकारातील उप प्रकारातही विभागणी करता येऊ शकते उदाहरणार्थ भांडवल बाजारातील तुमची गुंतवणूक कंपनी शेअर्स, विविध व्यवसाय, चलन बाजार, कर्जरोखे यामध्ये विभागता येऊ शकते.
विविध प्रकारच्या दर्जेदार मालमत्ता प्रकारातील गुंतवणूक असलेल्या गुंतवणूक संचास धोका कमी असतो. असे असले तरीही काही धोके असतातच जे आपण टाळू शकत नाही जसे भावातील चढ उतार. जेव्हा बाजारात सर्वसाधारण मंदी असेल तेव्हा आपल्या गुंतवणूक संचात असलेल्या शेअर्सचे भावही खाली येतात.
भाव खाली आले तर त्याचे दडपण घेऊ नये तुमच्या उद्दिष्टानुरूप गुंतवणूक करीत राहावं. अल्पकालीन गुंतवणूक म्हणून शेअर्समध्ये गुंतवणूक करणे टाळावे. दिर्घकाळात शेअर्सची गुंतवणूक तुम्हाला महागाईवर मात करणारा परतावा देईल. तुम्हाला नजीकच्या काळात पैसे लागणार असतील तर ते अत्यंत कमी जोखीम असलेल्या आणि सहज मोडता येतील अशा गुंतवणूक साधनात ठेवावेत.
तुमची गुंतवणूक निश्चित उद्दिष्ट आणि त्यासाठी लागणाऱ्या कालावधी अनुरूप जोखीम तीव्रता विभागणारी असावीत यामुळे तुमचे आर्थिक उद्दिष्ट साध्य होऊन आर्थिक नुकसान टळेल. (समाप्त)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत.
लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही याची नोंद घ्यावी)
अर्थसाक्षर डॉट कॉम या संकेतस्थळावर 12 सप्टेंबर 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 5 September 2025
तुमच्या पैशांची वृद्धी करण्याचा मार्ग- गुंतवणूक भाग 1
#तुमच्या_पैशांची_वृद्धी_करण्याचा_मार्ग- #गुंतवणूक_भाग_1
1. गुंतवणूक का करायची?
गुंतवणूक केल्याने काही कालावधीनंतर तुमच्या पैशांत वाढ होते त्यामुळे तुमचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करता येतं. गुंतवणूक म्हणून घर घेता येईल. तुमच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी बँकेत पैसे ठेवता येतील किंवा चल आणि अचल मालमत्ता प्रकार घेता येतील.
गुंतवणूकीची सुरुवात लवकरात लवकर करणं कधीही चांगलंच. पहिली कमाई जेव्हा तुमच्या हातात पडेल त्याच दिवसापासून गुंतवणूक करणे योग्य होईल. अनेक कारणांसाठी गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
●गुंतवणूक केल्याने पैशांमध्ये वाढ होते.
●महागाईवर मात करण्यास गुंतवणूक उपयोगी पडते.
●गुंतवणूक केल्याने विविध आर्थिक उद्दीष्टे पूर्ण होण्यास मदत होते.
●आधीपासूनच आणि नियमितपणे गुंतवणूक केल्यास निवृत्ती नंतरच्या नियोजनासाठी मोठी रक्कम जमा होण्यास मदत होते.
गुंतवणूकीची सुरुवात करण्याआधी-
●तुमचे जरुरीचे खर्च भागतील एवढे नियमित उत्पन्न असणे गरजेचं आहे.
●आणीबाणीच्या प्रसंगात जसे- नोकरी जाणे अश्या प्रसंगी तुमचे खर्च भागतील एवढा राखीव निधी तुमच्याकडे असायला हवा.
●वैद्यकीय आणीबाणी उद्भवल्यास पुरेसे विमाछत्र तुमच्याकडे असले पाहिजे.
चला, लगेचच गुंतवणूकीस सुरुवात करूया -
तुमचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी दीर्घकाळात संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणूक लवकरच सुरू करणे फायदेशीर ठरते. नियमितपणे आणि सातत्याते छोटीशी योग्य गुंतवणूक करत राहिलात तर संपत्ती निर्माण होईल आणि तुमची आर्थिक उद्दिष्टं पूर्ण होण्यास मदत होईल.
●लवकरच केलेल्या गुंतवणूकीच्या वाढीस चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो.
●लवकर सुरुवात केलेल्या गुंतवणूकीवर बाजारातील अल्पकालीन चढ उताराचा फारसा फरक न पडता दिर्घकाळात भरगोस वाढ होते.
2. गुंतवणुकीस सुरुवात करण्यापूर्वी-
जेव्हा तुम्ही विचारपूर्वक गुंतवणूक करता तेव्हा त्यामध्ये बचत खात्यात पैसे ठेवून मिळणाऱ्या परताव्याहून अधिक वाढ होण्याची शक्यता असते. गुंतवणूक करण्यात जोखीम आहे कारण त्यातून निश्चित किती परतावा मिळेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे यातून मिळणारा परतावा निश्चित नाही हे स्वीकारण्याची तुमची मानसिक तयारी असणे गरजेचे आहे. ती होण्यासाठी गुंतवणूक संदर्भातील काही प्राथमिक गोष्टी माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.
सुजाण गुंतवणूकदार होण्यासाठी तुम्हाला हे माहिती असायलाच हवं
★उद्दिष्ट- कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी निश्चित आर्थिक उद्दिष्ट असायलाच हवं जसे की घर खरेदी, मुलांचे उच्चशिक्षित, निवृत्ती नियोजन इ.
★गुंतवणूक मर्यादा- तुमच्या गुंतवणुकीची निश्चित अशी कालमर्यादा असू द्या या काळात चक्रवाढ गतीचा लाभ गुंतवणूकीस मिळेल.
★जोखीम घेण्याची क्षमता- तुम्ही किती नुकसान सहन करू शकता यावर तुमची जोखीम क्षमता ठरते. जितका अधिक परतावा गुंतवणूकीतून मिळू शकतो त्या प्रमाणात गुंतवणूक जोखीम वाढत रहाते.
★गुंतवणूक ज्ञान - गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी त्याची प्राथमिक माहिती करून घ्यावी. जर तुम्ही नवगुंतवणूकदार असाल तर ऑप्शन सारख्या कठीण गुंतवणूकीचा विचार करण्याऐवजी तुम्हाला समजेल अशा सोप्या गुंतवणूकीपासून सुरुवात करावी आणि योग्य ज्ञान मिळवूनच कठीण गुंतवणूकीचा विचार करावा.
★गुंतवणूकीचे तीन आधारस्तंभ- सुरक्षितता, परतावा आणि रोकडसुलभता हे कोणत्याही गुंतवणुकीचे आधारस्तंभ आहेत. गुंतवणूक करताना आपले भांडवल सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. त्यातून बाजारात उपलब्ध असलेल्या दराहून अधिक परतावा मिळायला हवा त्याचप्रमाणे त्याचे पैशांत सहज रूपांतर
करता आले पाहिजे.
★गुंतवणूक इतिहास आणि भविष्यवेधाची शक्यता- मागील काही वर्षात गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळत असल्यास त्यातून भविष्यात ही चांगला परतावा मिळेल अशी शक्यतेचा आपल्याला अंदाज येत असला तरी तसे होईलच असे निश्चित सांगता येत नाही. मूलभूत दृष्टिकोनातून गुंतवणूक आणि त्यातील वृद्धीकडे पाहावे.
★विविध मालमत्तामध्ये विभागणी - गुंतवणूक विविध मालमत्ता प्रकारात विभागली गेली असता त्यातील एखादा मालमत्ता प्रकार न चालल्याने त्यातून होणाऱ्या नुकसानीची तीव्रता कमी होते.
★मालमत्ता प्रकारांतील सहभाग - मालमत्ता प्रकारातील सहभाग हा आर्थिक उद्दिष्ट, कालावधी, जोखीम क्षमता आणि बाजाराचा कल यावर अवलंबून असतो. विविध प्रकारातून मिळणाऱ्या परताव्याची गणना करणारे गणक उपलब्ध असून त्याचा वापर केल्यास आपल्याला निष्कर्ष काढण्यास त्यांचा उपयोग होतो.
★करपरिणाम - विविध मालमत्तामधून मिळणाऱ्या परताव्यावर कमी अधिक प्रमाणात कर आकारला जात असल्याने त्याचा गुंतवणूक परताव्यावर होणारा परिणाम पडताळणे आवश्यक असते.
★गुंतवणुकीचे पुनरावलोकन - विविध गुंतवणूक त्यातून मिळणाऱ्या परातव्यासह पाहून गुंतवणूक उद्दीष्ट पूर्ण करण्यास आवश्यक असल्यास त्यात बदल करावेत. असे बदल उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी करावेत.
3.जाणून घ्या गुंतवणूक पर्याय
जोखीम आणि परतावा कमी अधिक असलेले अनेक गुंतवणूक प्रकार सध्या उपलब्ध आहेत. गुंतवणूकLदार त्यांच्या मर्जीनुसार धेय्य, जोखीम क्षमता, गुंतवणूक कालावधी आणि बाजाराची दिशा यानुसार कमी अधिक जोखीम प्रकार निवडून गुंतवणूक करू शकतात.
गुंतवणूक योग्य विविध मालमत्ता प्रकार
★शेअर्स - शेअर्स म्हणजे कंपनीच्या मालकीतील म्हणजे भाग भांडवलातील एक हिस्सा. जेव्हा तुम्ही शेअर्स घेता तेव्हा तुम्ही कंपनीचे भागधारक बनता. त्यातून मिळणारा परतावा मुख्यतः कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून असतो. शेअर्सचा बाजारभाव वाढल्यास भरघोस फायदा होऊ शकतो त्यासोबत असलेले धोके म्हणजे त्याच्या बाजारभावात सातत्याने होणारे चढ उतार आणि कंपनीच्या आर्थिक स्थितीत होणारे बदल.
★कर्ज रोखे- कर्जरोखे म्हणजे कंपनीने घेतलेले कर्ज. असे कर्ज रोखे कंपन्या त्याच्या व्यवसाय वृद्धीसाठी तर स्थानिक स्वराज संस्था सरकार काही विशिष्ट हेतूने काढू शकते. कर्ज घेणारा म्हणजेच ऋणको हा गुंतवणूकदार म्हणून धनकोकडून कर्ज घेतो त्याबद्दल व्याज नियमित अंतराने आणि मुद्दल मुदतपूर्ती च्या वेळी परत कटण्याची हमी देतो. कर्करोख्यासोबत येणारी जोखीम म्हणजे व्याज नियमितपणे न मिळण्याची आणि मुदतपूर्ती च्या वेळी मुद्दल वेळेवर न मिळण्याची शक्यता या आहेत.
★म्युच्युअल फंड- म्युच्युअल फंड विविध गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्रित करून वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारात जसेकी शेअर्स, बॉण्ड आणि इतर मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंड गुंतवणूक दारांना विविध मालमत्ता प्रकारात फारसा अभ्यास न करता शेअरबाजारात गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देतात. म्युच्युअल फंडांकडे व्यावसायिक फंड मॅनेजर असतात गुंतवणूकदारांकडून फंडास अल्पसा मोबदला मिळतो.
★एक्सचेंज ट्रेडेड फंड (इटीएफ) - हा म्युच्युअल फंडासारखा शेअरबाजारात अप्रत्यक्ष गुंतवणूक करण्याचा प्रकार असून तो गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडाच्यापेक्षा कमी व्यवस्थापन फी मध्ये अधिक तरल वेगळा प्रकार आहे.
★स्थावर मालमत्ता - यातील गुंतवणूकीमुळे भाडे आणि भांडवल वृद्धी होऊ शकते. यामुळे गुंतवणूकदाराच्या अप्रत्यक्ष उत्पन्नात मिळते. यातील मिळणाऱ्या लाभामध्ये ती मालमत्ता नेमकी कुठे आहे त्यानुसार फरक पडतो. स्थावर मालमत्तेतील आणखी जोखीम म्हणजे मालमत्ता हा प्रकार कमी तरल आहे.
★मौल्यवान धातू - मौल्यवान धातू म्हणजे सोने चांदी इ यामुळे बरेचदा अडीअडचणीत पैसे उभे करण्यासाठी महागाईवर मात करण्यासाठी यात गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक प्रत्यक्ष धातुरुपात अथवा अप्रत्यक्षपणे इटीएफ स्वरूपात करता येते. या धातूंच्या भावावर आर्थिक परिस्थिती, भु राजकीय स्थिती आणि मागणी पुरवठा प्रभाव पडतो. सेबीच्या सारथी या अँपवरील उपलब्ध माहितीचा भावानुवाद (अपूर्ण)
उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 5 सप्टेंबर 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.
Subscribe to:
Posts (Atom)