Friday, 19 September 2025
समजून घेऊया भांडवल बाजारातील गुंतवणूक भाग 1
#समजून_घेऊया_भांडवल_बाजारातील_गुंतवणूक_भाग_1
1.भांडवल बाजारातील गुंतवणूक : यापूर्वी आपण महागाई आणि गुंतवणूक यासंबंधीची माहिती मिळवली आहे. आपली आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण जी बचत करतो त्यात लवकर वाढ होण्यासाठी गुंतवणूक करणं आवश्यक आहे.
भांडवल बाजाराचे दोन विभाग आहेत
अ) प्राथमिक बाजार
ब) दुय्यम बाजार
अ) प्राथमिक बाजार- येथे समभाग, रोखे, सरकारी कर्जरोखे सर्व गुंतवणूकदारांना प्रारंभिक भाग विक्री, विद्यमान भागधारकांनी केलेली विक्री याद्वारे सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिले जातात.
ब)दुय्यम बाजार - जिथे समभाग, रोखे, सरकारी कर्जरोखे यांची खरेदीविक्री, ते जारी करणारे सोडून इतर गुंतवणूकदार आपापसात व्यवहार करतात. मुंबई शेअरबाजार, राष्ट्रीय शेअरबाजार, मेट्रोपोलियन स्टॉक एक्सचेंज ही काही दुय्यम बाजारांची उदाहरणे आहेत.
2.भांडवल बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक गोष्टी : भांडवल बाजारात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराकडे आवश्यक गोष्टी अशा-
अ)डी मॅट खाते- हे खाते आपल्याला सेबी नोंदणीकृत डिपॉजीटरी पार्टीसीपंटकडे काढावे लागते. या खात्यात गुंतवणूकदार त्यांची भांडवल बाजारातील गुंतवणूक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवता येते. डिपॉजीटरी पार्टीसीपंट हे डिपॉजीटरीचे अधिकृत प्रतिनिधी असतात सध्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजीटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉजीटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या दोन मान्यताप्राप्त डिपॉजीटरी आहेत.
आ)ट्रेडिंग खाते किंवा ब्रोकिंग खाते- सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या ब्रोकरकडील खाते याचा वापर करून शेअरबाजारात शेअर्सची खरेदी विक्री करता येते.
इ)बँक खाते- भांडवल बाजारात व्यवहार करण्यासाठी बँक खात्याची गरज असते.
3.भांडवल बाजारातील मालमत्ता प्रकार- भांडवल बाजारात शेअर्स, रोखे, इटीएफ, फ्युचर आणि ऑप्शन या सारखे डिरिव्हेटिवमधील करार विविध मालमत्तांचे प्रत्यक्ष आणि म्युच्युअल फंड हाऊस मार्फत अप्रत्यक्ष सौदे होतात. यातील प्रत्येक मालमत्ता प्रकार आगळावेगळा गुंतवणूक प्रकार असून त्याचे वैशिष्ट्य आणि त्यातील जोखीम यांची जाणीव गुंतवणूक करण्यापूर्वी माहिती असणं गरजेचं आहे.
अ)शेअर्स-
म्हणजे काय?
●व्यवसाय सुरू करण्यासाठी जे भांडवल लागतं ते समभाग जारी करून उभारले जाते.
●जेव्हा गुंतवणूकदार शेअर खरेदी करतो तेव्हा तो त्या प्रमाणात त्या व्यवसायाचा मालक होतो आणि त्याला कंपनीच्या वाढ, उन्नती यांत सहभागी होण्याची संधी मिळते.
फायदे:
●लाभांशाच्या रूपाने गुंतवणूकदारास उत्पन्न मिळते.
●शेअर्सच्या किंमतीत वाढ झाल्यास भांडवली नफा मिळतो.
जोखीम:
●शेअर्सचे भाव अस्थिर असतात.
●कंपनीच्या कामगिरीवर भाव वर खाली होत असतात त्याचप्रमाणे सर्वसाधारण आर्थिक परिस्थितीचा त्यावर प्रभाव पडतो.
आ)रोखे-
म्हणजे काय?
●उद्योग किंवा सरकार यांनी घेतलेलं कर्ज म्हणजे रोखे,
●रोखे जारी करून ते निधी उभारू शकतात.
फायदे:
●गुंतवणूकदारास ठराविक अंतराने मान्य केलेल्या दराने व्याज मिळते.
●मुदत संपल्यावर गुंतवलेली रक्कम परत मिळते.
जोखीम:
●भावातील चढउतार,
● व्याज, मुद्दल परत न मिळणे’
●व्यवसाय विसर्जित होणे.
इ) म्युच्युअल फंड-
म्हणजे काय?
●भांडवल बाजारात अप्रत्यक्ष गुंतवणूक करण्याचा हा मालमत्ता प्रकार आहे. येथे फंड मॅनेजर विविध गुंतवणूकदारांनी एकत्रित केलेली गुंतवणूक भांडवल बाजारात गुंतवतो,
●ही गुंतवणूक शेअर्स रोखे अथवा अन्य मालमत्ता प्रकारात गुंतवण्यात येते.
फायदे:
●गुंतवणूकीचे विविध मालमत्ता प्रकारात विभाजन झाल्याने जोखीम कमी होते.
●गुंतवणूक व्यावसायिक गुंतवणूक तज्ज्ञाकडून व्यवस्थापित केली जाते.
जोखीम:
●भावातील अस्थिरता.
ई)एक्सचेंज ट्रेडेड फंड-
म्हणजे काय?
●म्युच्युअल फंड योजनांशी मिळताजुळता असा गुंतवणूक प्रकार मात्र त्याचे व्यवहार शेअरबाजारात होतात.
फायदे:
●गुंतवणूक वेगवेगळ्या मालमत्तांमध्ये केली गेल्याने गुंतवणूक संचाचे विविधिकारण होते.
तोटे:
●भावांतील चढउतार.
4.भांडवल बाजार गुंतवणूकीतील जोखीम:
भांडवल बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची गुंतवणूक उद्दिष्टे, हेतू आणि त्यातील जोखीम माहिती असणं गरजेचं आहे. विविध जोखमीचे विविध प्रकारात वर्गीकरण करता येणे शक्य आहे.
◆बाजार संबंधित जोखीम: बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराना बाजाराचा कल आणि देशाची सर्वसाधारण अर्थव्यवस्था यांच्या परिणामामुळे कधीकधी तोटा झाल्याचे अनुभवास येते.
◆महागाई संबंधात जोखीम: महागाई संबंधातील जोखीम म्हणजे त्यामुळे लोकांची खरेदी करण्याची क्षमता म्हणजे क्रयशक्ती कमी होते. महागाईमुळे रोखता प्रवाह कमी झाल्याने त्याचा गुंतवणूकीच्या भविष्यातील मूल्यावर प्रभाव पडतो.
◆तरलते संबंधित जोखीम: तरलता नसल्यास योग्य वेळी गुंतवणूक करणे किंवा ती काढून घेणे शक्य होत नाही.
◆व्यवसायासंबंधीत जोखीम: काही अनपेक्षित अडचणी अथवा आर्थिक परिस्थितीमुळे व्यवसाय करणे अशक्य होते. तेव्हा अशा व्यवसायात केलेली गुंतवणूक धोकादायक ठरते.
◆भावातील तीव्र चढउतारासंबंधित जोखीम: बाजारात काही कंपन्यांच्या भावात तीव्र चढउतार होतात. अशा वेळी योग्य भावात गुंतवणूक करणे अथवा ती काढून घेणे यासंबंधी निर्णय घेणे कठीण होते.
◆विदेशी चलन संबंधित जोखीम: चलनाच्या भावात होणाऱ्या चढ उताराचा त्यासंबंधीत गुंतवणूकीवर परिमाण होऊ शकतो.
जोखमीवर मात कशी करायची?
वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या उद्योगात गुंतवणूक विभागून वर उल्लेख केलेल्या जोखमींची तीव्रता कमी करता येते.
5.गुंतवणूक संदर्भात ‘करा’ आणि ‘करू नका’- गुंतवणूकदारास आपल्या गुंतवणूकीच्या संदर्भात म्हणजे त्याचे अधिकार, जबाबदारी यांची माहिती असणे गरजेचे आहे. यासंदर्भातील ‘करा’ आणि ‘करू नका’ असे-
◆करा-
●भांडवल बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबीकडे नोंदणी केलेल्या गुंतवणूक सल्लागाराचाच सल्ला घ्या.
●तुमचे उद्दिष्ट जोखीम घेण्याची क्षमता यांचा विचार करूनच गुंतवणूक साधन अथवा योजनेची निवड करा.
●व्यवहार झाल्याची सूचना आणि व्यवहार करार 24 तासाच्या आत मिळायला हवा. तुमचा गुंतवणूक संच बरोबर आहे की नाही? हे नियमितपणे तपासा.
●सही करण्यापूर्वी कोणतेही कागदपत्र वाचून पहा.
●सही केलेल्या कराराच्या प्रति, खाते उतारा, व्यवहार करार आणि पैसे दिल्याचा मिळाल्याचा तपशीलाची नोंद ठेवा.
●ठराविक कालावधीने आपली आर्थिक गरज, उद्दिष्टे आणि गुंतवणूक संच याचा आढावा घेऊन सर्व काही योग्य दिशेने चालू असल्याची खात्री करून घ्या.
●पैशांचे कोणतेही व्यवहार बँकेच्या मध्यस्थीने करा म्हणजेच रोखीने कोणतेही व्यवहार करू नका.
●आपल्या वैयक्तिक माहितीतील बदल जसे- पत्ता, फोन नंबर, बँक तपशिल, नाम निर्देशक, मेल इ यातील बदल वेळोवेळी सर्वत्र अद्ययावत करा. सिम कार्ड आता पोर्ट करता येते त्यामुळे एकच मोबाईल क्र सर्व गुंतवणूक साधनांमध्ये वापरा. मोबाइलद्वारे आता सर्व व्यवहार शक्य असल्याने तो सर्वात महत्वाचा साथीदार आहे.
●नामनिर्देशन सुविधेचा वापर करा आता एकाहून अधिक व्यक्तींचे नामनिर्देशन डी मॅट खात्यास करता येते.
●तुमच्या ब्रोकरकडील खात्यातील व्यवहार तुमच्या सूचनेप्रमाणे 30 अथवा 90 दिवसांनी पूर्वपदावर आणले जातात की नाही ते पहा.
●तुमचे ट्रेडिंग खाते, त्यात होणारे व्यवहार, व्यवहार झाल्याचे संदेश, आलेले मेल सर्वांवर बारकाईने लक्ष असुद्यात.
◆करू नका-
●गुंतवणूक करण्यासाठी कर्ज काढू नका.
●अनधिकृत दलाल आणि मंच यांच्यामार्फत व्यवहार करू नका.
●कबूल केलेल्या दारानेच अधिकृत मध्यस्थाना त्याची दलाली द्यावी.
●अटी आणि शर्ती समजून घेतल्याशिवाय कोणतेही करार करू नका.
●वर काहीही न लिहिलेल्या डिलिव्हरी इनस्टक्शन स्लिपवर सही करू नका.
●कोणालाही सर्वसाधारण अधिकारपत्र देऊ नका अगदीच गरजेचे असल्यास विशिष्ट परिस्थतीत व्यवहार करण्याचे अधिकारपत्र विश्वासू व्यक्तीस देता येईल.
●वाद निर्माण झाल्यास विहित मुदतीत मध्यस्थाविषयीची रीतसर तक्रार शेअरबाजार अथवा सेबी यांच्याकडे करावी.
●डब्बा ट्रेडिंग (अनधिकृत मंचावरील पैजेचे व्यवहार) बेकायदेशीर असून धोकादायक आहेत.
●खात्रीलायक बातम्या देऊन तुम्हाला गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या व्यक्ती मध्यस्थ यांच्यावर विश्वास ठेवू नका. सेबीकडे त्यांची तक्रार करा.
●आपल्या खात्याचा पासवर्ड वेळोवेळी बदलत राहा तो कुणालाही सांगू नका.
●अविश्वसनीय परतावा देण्याचा दावा करणाऱ्या पोंझी स्कीम, डिपॉझिट स्कीम, चिट फंड यामध्ये गुंतवणूक करू नका.
●तुमची ग्राहक ओळख (केवायसी) फॉर्म भरताना त्यातील आवश्यक रकाने सोडून देण्याऐवजी त्यावर काट मारा.
●तुम्हाला असुरक्षित वाटत असल्यास डिजिटल करार करू नका.
सेबीच्या सारथी या अँपवर असलेल्या माहितीचा भावानुवाद (अपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत.
लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही याची नोंद घ्यावी)
अर्थसाक्षर डॉट कॉम या संकेतस्थळावर 19 सप्टेंबर 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment