Friday, 26 September 2025

समजून घेऊयात भांडवल बाजारातील गुंतवणूक भाग 2

#समजून_ घेऊयात_भांडवल_बाजारातील_गुंतवणूक_भाग_2 6.विशिष्ट विषयावर अथवा व्यवसाय प्रकाराशी संबंधित फंड: या प्रकारातील फंड हे एकदा विषय अथवा व्यवसाय प्रकार यावर आधारित असतात. वेगवेगळ्या व्यवसाय प्रकारात गुंतवणूक करण्याऐवजी ते एकाच प्रकारच्या व्यवसायात अथवा एखाद्या कल्पनेवर आधारित विविध कंपन्यांत गुंतवणूक करतात. ◆विशिष्ट व्यवसायावर आधारित फंड: हे फंड एकाच प्रकारच्या व्यवसायात गुंतवणूक करतात. उदा बँकिंग, आयटी, आरोग्य, ऊर्जा इ. ◆विशिष्ट विषयावर आधारित फंड: हे फंड व्यवसायापेक्षा कल्पेनेवर आधारित असल्याने त्यात अनेक व्यवसाय प्रकार एकवटले जाऊ शकतात. उदा अपारंपरिक ऊर्जा, शहर विकास, तंत्रज्ञान इ यात या कल्पनेवर आधारित वेगवेगळ्या कंपन्यांचा सामावेश होतो. फंडांची काम करण्याची पद्धत: विशिष्ट व्यवसाय अथवा संकल्पना यावर आधारित फंड एका सामायिक खात्यात गुंतवणूकदारांकडून रक्कम एकत्रितपणे जमा करता. फंड व्यवस्थापक त्यातील रकमेचा विनियोग फंडाच्या धेय्यानुसार व्यवसाय अथवा कल्पनेवर आधारित कंपन्यांत गुंतवणूक करण्यासाठी वापरला जातो. या कंपन्यांनी उत्तम कामगिरी केली तर गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत वृद्धी होते. व्यवसाय अथवा कल्पनेवर आधारित फंडाचे भवितव्य: ●निश्चित उद्देशाने केलेली गुंतवणूक- ज्या गुंतवणूकदाराना एखादे क्षेत्र किंवा कल्पना चांगली चालेल असे वाटते अश्यासाठी योग्य गुंतवणूक. ●क्षेत्रातील व्यवसाय विविधता- जरी ही गुंतवणूक एकाच क्षेत्रात किंवा संकल्पनेत होत असली तरी त्यातील एकाच कंपनीत गुंतवणूक न करता विविध कंपन्यांत ती केली जाऊन विविधता साधली जाते. ●अधिक परतावा (अधिक जोखमीसह)- असे फंड जर निवडलेल्या क्षेत्राने उत्तम कामगिरी केल्यास अधिक परतावा मिळवू शकतात असं असलं तरी या क्षेत्राची कामगिरी चांगली न झाल्यास परतावा कमी होण्याचा अधिक धोका असतो. ◆संकल्पनेवर आधारित फंडाचे उदाहरण- जर अक्षय ऊर्जा क्षेत्रास उज्वल भविष्य आहे असे वाटणारे फंड यासंबंधातील ऊर्जा कंपन्या म्हणजे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, विजेवर चालणाऱ्या मोटारी यातील विविध कंपन्यात गुंतवणूक करतील. ◆विशिष्ट व्यवसाय आधारित फंडाचे उदाहरण- आरोग्यक्षेत्र यासंबंधात रुग्णालये, औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या, आरोग्य क्षेत्राशी संबंधित उपकरणे बनवणाऱ्या कंपन्या यामधील विविध कंपन्यात अशा फंडांची गुंतवणूक केली जाते. अशा फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी विचारात घ्यायचे महत्त्वाचे मुद्दे: ●जोखीम: एकाच संकल्पनेवर अथवा क्षेत्रात केलेली गुंतवणूक त्यावर अधिक अवलंबून राहिल्याने अधिक जोखमीची असते. ●सदर क्षेत्राचे ज्ञान: विशिष्ट संकल्पना अथवा क्षेत्रात गुंतवणूक करण्यापूर्वी त्या क्षेत्राचे ज्ञान असणे गरजेचं आहे. ●दीर्घकालीन गुंतवणूक आवश्यक: असे फंड दिर्घकाळात उत्तम परतावा देत असल्याने गुंतवणूक उद्दिष्ट दीर्घकालीन असावे. 7. फंड्स ऑफ फंड: हे फंड भांडवल बाजारात थेट गुंतवणूक न करता विविध फंड योजनांत गुंतवणूक करतात. त्यामुळे गुंतवणूकदाराची जोखीम विविध मालमत्ता प्रकारात विभागली जाते. व्यावसायिक फंड व्यवस्थापनाकडून विविध ठिकाणी गुंतवणूक केली जाते. त्यामुळे एका योजनेतून अनेक फंडाचा लाभ मिळतो. या फंडांची निर्मिती विविध फंडातच गुंतवणूक करण्यासाठी झाली आहे. म्युच्युअल फंड योजनांप्रमाणेच गुंतवणूकदारांकडून जमा केलेली रक्कम एकत्र करून ती विविध फंडात अथवा अन्य एक्सचेंज ट्रेडेड फंडात केली जाते. यामुळे गुंतवणुकीत विविधता येऊन गुंतवणूक तज्ज्ञांकडून व्यवस्थापित केली जाते. फंड्स ऑफ फंड योजनांचे फायदे: ●गुंतवणूक विविधता: ही गुंतवणूक वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या क्षेत्रातील मालमत्ता प्रकारातील फंडातच केली जात असल्याने गुंतवणुकीत विविधता येते. ●परवडणारी गुंतवणूक: वैयक्तिकरित्या गुंतवणूकदारास अशी गुंतवणूक करण्यास प्रचंड रकमेची गरज असते फंड्स ऑफ फंडच्या माध्यमातून छोटे गुंतवणूकदार अत्यंत कमी पैशात अशी गुंतवणूक करू शकतात. ●तज्ज्ञ व्यवस्थापन: ही गुंतवणूक व्यावसायिक जाणकारांकडून होत असल्याने त्याचा ताण गुंतवणूकदारांवर येत नाही. ●कमी जोखीम: यापूर्वी सांगितल्याप्रमाणे विविध फंडात गुंतवणूक केली गेल्याने त्यातील धोका कमी होतो. समजा एखाद्या गुंतवणूकदाराकडे गुंतवणूक करण्यासाठी एक लाख रुपये आहेत त्याला भांडवल बाजार अथवा म्युच्युअल फंड संबंधात काहीही माहिती नसेल तर त्याला ही गुंतवणूक करणे कठीण होईल. त्याने जर फंड्स ऑफ फंडच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास तो अप्रत्यक्षपणे भांडवल बाजारातील शेअर्स, रोखे अशा विविध उपलब्ध प्रकारात गुंतवणूक करू शकेल. या गुंतवणूकदारासाठी फंड्स ऑफ फंड हा उत्तम गुंतवणूक प्रकार ठरू शकेल विविध गुंतवणूक प्रकारात थोडी जास्त व्यवस्थापन फी देऊन (कारण येथे दोनदा म्हणजे ज्या फंडात गुंतवणूक केली जाईल तो फंड आणि ज्याने गुंतवणूक केली तो फंड्स ऑफ फंड) विविध मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करता येईल आणि त्यातून जोखीम टाळून सर्वसाधारण आधिक्य मिळवता येईल. अशी गुंतवणूक दिर्घकाळात उत्तम परतावा देते अशी उदाहरणे आहेत. त्यामुळे दिर्घकाळात संपत्ती मिळवण्यासाठीचा हा योग्य मार्ग आहे. 8.म्युच्युअल फंड म्हणजे काय? समजून घेऊयात. संपत्तीत वाढ करण्यासाठी म्युच्युअल फंड हा लोकप्रिय गुंतवणूक प्रकार आहे. विविध प्रकारचे हे फंड गुंतवणूक दारांची गरज ओळखून व्यवसायिक फंड मॅनेजरकडून व्यवस्थापित केले जात असतात. तुम्ही गुंतवणुकीस सुरुवात करणारे असाल अथवा अनुभवी गुंतवणूकदार असून गुंतवणूक संचात विविधता आणण्याचा विचार करत असाल तर म्युच्युअल फंड म्हणजे काय ते समजून घेणे आवश्यक आहे. आपले उद्दिष्ट आणि आर्थिक भवितव्य सुरक्षित करण्यासाठी करण्यासाठी गुंतवणूक योग्य प्रकारे आणि योग्य प्रकारात करणे आवश्यक आहे. गुंतवणूक म्हटलं की जोखीम आलीच. दिवसेंदिवस गुंतवणूक करणे अधिकाधिक त्यात होणाऱ्या बदलामुळे कठीण होत असल्याने कोणत्याही गुंतवणुकीची सुरुवात म्युच्युअल फंड योजनांत करणे केव्हाही चांगलेच. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूकयोग्य रक्कम असते आणि जाणकार व्यवस्थापक असतात ते शेअर्स, रोखे आणि अन्य गुंतवणूक प्रकारात करत असल्याने आपल्याकडे कोणतेही गुंतवणूक कौशल्य नसले तरी भांडवल बाजारात गुंतवणूक करणे शक्य होते. म्युचुअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड हे एक असे माध्यम आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार एकत्र येऊन पैसे जमा करतात. या एकत्रित पैशांची गुंतवणूक भांडवल बाजारात केली जाते. ही गुंतवणूक जाणकार फंड व्यवस्थापक गुंतवणूकदारांच्या वतीने करतात. म्युच्युअल फंडांची वैशिष्ठ्ये: ●विविधता: भांडवल बाजारातील विविध प्रकारात गुंतवणूक केली गेल्याने त्यातील जोखीम विभागली जाते. ●जाणकार व्यवस्थापक: या फंडाचे व्यवस्थापन तज्ज्ञांकडून होत असल्याने तुम्हाला त्यावर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवावे लागत नाही. ●सहज सुलभ सहभाग: अत्यंत कमी रक्कमेने सुरुवात करता येत असल्याने ती कुणालाही सहज करता येते. ●रोकड सुलभता: योजनेत गुंतवणूक करणे रहावा त्यातून गुंतवणूक काढून घेणे सुलभ असल्याने ते गुंतवणूकदारांच्या सोयीचे आहे. म्युच्युअल फंडाचे कार्य कसे चालते? ●गुंतवणूक रकमेचे एकत्रीकरण: सर्व व्यक्तींची गुंतवणूक योग्य रक्कम एका खात्यात जमा केली जाते. ●या रकमेचा वापर करून फंड मॅनेजर फंडाच्या उद्दिष्टानुरूप गुंतवणूक संच तयार करतो यासाठी शेअर्स, रोखे आणि इतर मालमत्ता प्रकारात गुंतवणूक केली जाते. ●लाभ विनियोग: फंडाने डिव्हिडंड, व्याज आणि भांडवली नफ्याद्वारे मिळवलेला फायदा व्यवस्थापन खर्च वजा करून सर्वाना त्यांच्या गुंतवणूकीच्या प्रमाणात देण्यात येतो. म्युच्युअल फंडाचे प्रकार: या योजना वेगवेगळी आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची यावर अवलंबून असतात. त्यानुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात येते. ●इक्विटी फंड- या योजनेतील गुंतवणूक प्रमुख्याने शेअर्समध्ये केली जाते. दिर्घकाळात यातून उत्तम परतावा मिळू शकतो. ●बॉण्ड फंड: यातील गुंतवणूक विविध कर्ज रोखे निश्चित उत्पन्न देणाऱ्या प्रकारात केली जाते. कमी जोखीम घेणाऱ्या पारंपरिक विचारसरणीच्या गुंतवणूकदारांच्या पसंतीस हे फंड उतरतात. ●बॅलन्स किंवा हायब्रीड फंड: यातील गुंतवणूक शेअर्स कर्जरोखे अशा दोन्ही प्रकारात केल्याने फंडास स्थेर्य आणि वृद्धी असे दोन्ही लाभ मिळतात. ●इंडेक्स फंड: हे फंड वेगवेगळ्या निर्देशांकामध्ये त्यातील होल्डिंगच्या प्रमाणात गुंतवणूक करीत असल्याने ते ज्या निर्देशांकात गुंतवणूक करतात त्या जवळपास परतावा मिळतो. ●टॅक्स सेव्हिंग फंड: यातील गुंतवणूक प्रामुख्याने शेअरबाजारात केली जाऊन त्यामुळे आयकरात सवलत मिळते. इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम असेही त्यांना म्हटले जाते. म्युच्युअल फंड योजनांचा उपयोग- ●संपत्ती निर्मिती: या योजनांत गुंतवणूक केल्याने अधिक परतावा मिळण्याची शक्यता असल्याने त्यातून संपत्तीत वाढ होते. ●गंगाजळीची निर्मिती: अडीअडचणीस पैशाची गरज लागली असता त्याचा उपयोग होतो बचत खात्यात कमी व्याजदराने पैसे ठेवण्यापेक्षा लिक्विड फंडात ठेवले असता ते सहज काढता येऊन त्यावर अधिक परतावा मिळतो. ●करबचत- इ एल एस एस योजनांत गुंतवणूक केल्यास 80 सी नुसार आयकरात सवलत मिळते. ●निवृत्ती नियोजन: यात उपलब्ध असलेल्या योजनांत दरमहा सातत्याने गुंतवणूक करून निवृत्ती नियोजनासाठी मोठ्या रकमेची उभारणी करता येते. म्युच्युअल फंड गुंतवणूकीचे उदाहरण- समजा एखाद्या व्यक्तीने दहा हजार रुपये एखाद्या योजनेत गुंतवले तर फंड मॅनेजर ती रक्कम भांडवल बाजारात टाकेल ही गुंतवणूक वर्षभरात 10% ने वाढल्यास त्याचे अकरा हजार होतील अथवा भाव कमी आल्यास ते कमी होतील. याउलट एखाद्या शेअर्समध्ये ते तुम्ही गुंतवले तर त्यात अधिक फरक पडू शकेल पण योजनेतील गुंतवणूक विविध प्रकारात होत असल्याने ती अचानक कमी होण्याची जोखीम विभागली जाऊ शकते. त्यामुळे बाजार खाली आला तरी म्युच्युअल फंड योजनांवर त्याचा फार प्रभाव पडत नाही. म्युचुअल फंड योजनांची निवड का करावी? ●सुलभता: या योजना समजण्यास आणि गुंतवणूक करण्यास सोप्या असतात. ●वैविध्य: तुम्ही जेवढी जोखीम पत्करू शकता त्यास अनुरूप विविध प्रकार त्यात आहेत. ●पारदर्शकता: या योजनांची त्यातील बदलांची माहिती सहज उपलब्ध असल्याने त्या पुरेशा पारदर्शक आहेत. ●अतिशय कमी पैशात त्यात गुंतवणूक करता येऊन ती वाढवता येते. गुंतवणूक सुरुवात करण्यास म्युच्युअल फंड योजना उत्तम आहेत. गुंतवणूकदारांची गरज, उद्देश, जोखीमक्षमता, गुंतवणूक रक्कम, अपेक्षा यांची त्या पूर्तता करू शकतात. योग्य योजनेची निवड करण्यासाठी म्युच्युअल फंडाविषयी प्राथमिक माहिती असणे जरुरीचे आहे. त्यात जोखीमही आहेच त्यामुळे तुमच्या उद्दीष्ट पूर्तता कोणत्या योजनेने होईल हे समजून घेण्यासाठी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. अगदी अल्प रकमेने सुरुवात करून त्यात वृद्धी कशी आणि किती होते याचा अनुभव घ्या. सेबीच्या सारथी या अँपवरील माहितीचा भावानुवाद.(अपूर्ण) ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही याची नोंद घ्यावी) ∆

No comments:

Post a Comment