Friday, 12 September 2025
तुमच्या पैशांची वृद्धी करण्याचा मार्ग- गुंतवणूक भाग 2
#तुमच्या_पैशांची_वृद्धी_करण्याचा_मार्ग- #गुंतवणूक_भाग_2
4. गुंतवणूक योजनांमधील फसवणूकीपासून दूर राहा.
कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फायदा व्हावा असे सर्वांना वाटत असते. काही चलाख व्यक्ती गुंतवणूकदारांच्या याच मानसिकतेचा फायदा घेण्याची संधी शोधत असतात. गुंतवणूकदारांना फसवून लुबाडणे हा त्यांचा उद्देश असतो.
गुंतवणूक करताना फसवणूक टाळण्याच्या युक्त्या-
★गुंतवणूक करू देणारी कंपनी अथवा व्यक्तींची माहिती मिळावा. त्यांनी सुचवलेली योजना तपासून पहा. त्याचा पूर्वेतिहास आणि कायदेशीरपणा बाबतीत खात्री करून घ्या.
★अवास्तव परतावा देऊ करणाऱ्या योजनांबाबत सावधान रहा. अधिक परतवा म्हणजे अधिक जोखीम हे कायम लक्षात असुद्यात.
★फसवणूक करणारे तुमच्यावर गुंतवणूक करण्यासाठी दबाव टाकतील आणि झटपट निर्णय घ्यायला भाग पाडतील. त्याला बळी न पडता विचारपूर्वक निर्णय घ्या.
★फोन कॉल, मेल, सोशल मीडिया या माध्यमातून आलेल्या गुंतवणूक पर्यायावर काळजीपूर्वक निर्णय घ्या त्यातून फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते.
★खात्रीपूर्वक अवास्तव परतावा, गुंतवणूक योजनेची अपूर्ण माहिती अथवा तपशील देण्यात केलेली टाळाटाळ या धोक्याच्या घंटा समजून सावध रहा.
★कंपनी अगर व्यक्तीने सुचवलेल्या योजनेस नियामकांची रीतसर मान्यता मिळवली आहे का? ते पहा.
★एखादी बनावट योजना नजरेस आली तर संबंधित नियामक आणि पोलीस यांच्या ते लक्षात आणून द्या.
★मान्यताप्राप्त आर्थिक सल्लागाराची मदत घ्या ते तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेले विविध गुंतवणूक पर्याय नीट समजावून सांगतील.
5.गुंतवणुकीस लवकरात लवकर सुरुवात करणे महत्वाचे-
गुंतवणूक कालावधी हा गुंतवणुकीचा मित्र आहे. गुंतवणूक करण्याची सुरुवात लवकर करणे हे सुजाण गुंतवणूकदाराचे लक्षण आहे. लवकर सुरुवात केल्याने गुंतवणूकीस अधिक कालावधी मिळाल्याने त्यास चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळून उत्तम वृद्धी होते.
गुंतवणूकीस सुरुवात करण्याचे योग्य वय कोणते?
आयुष्यात जेव्हा कधी तुम्हाला अर्थप्राप्ती होईल तो दिवस आणि त्यावेळी असलेलं तुमचं वय हेच गुंतवणूकीस सुरुवात करण्याचं योग्य वय आहे. ही अर्थप्राप्ती केवळ नोकरी व्यवसाय यातूनच नाही तर अन्य मार्गानेही होत असली तरी चालते. अलीकडे अनेक मुलांना त्यांचे पालक किरकोळ खर्चासाठी पैसे देतात. अनेकांना शिकत असतात शिष्यवृत्ती, पाठ्यवेतन मिळत असते किंवा एखाद्या प्रकल्पातील सहभागाबद्धल पैसे मिळतात. विद्यार्थाना विविध स्पर्धातून खेळांतून पैशांच्या स्वरूपात बक्षिसे मिळतात. यातून मिळणाऱ्या पैशाचा गुंतवणूकीसाठी विचार करू शकतो.
चक्रवाढ व्याजाचा फायदा कसा मिळतो?
चक्रवाढ वृद्धीची ताकद ही गुंतवणूकीची शक्ती आहे. चक्रवाढ व्याज ही समजण्यास सोपी अशी संकल्पना आहे यात मिळत असलेल्या व्याजावर व्याज (परताव्यावर परतावा) मिळत असल्याने एकूण परताव्यात वाढ होते. दीर्घकाळ ही वाढ घातांकीय पद्धतीने होत असल्याने आपण त्याचा अंदाज बांधू शकणार नाही या प्रमाणात वाढते तेव्हा जितका काळ अधिक जाईल तेवढी अधिकाधिक वाढ होते.
चक्रवाढ व्याजाची जादू एका सोप्या उदाहरणातून सहज समजेल.
दरवर्षी 9% दराने व्याज मिळत असल्यास ₹1000/- चे चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात ₹1088/-, 10 वर्षात ₹2367/-, 20 वर्षात ₹5604/- तर 40 वर्षात ₹31409/- होतात.
जोखीम पातळी
जेव्हा तुम्ही गुंतवणूक करण्यास लवकर सुरुवात करता तेव्हा अधिक जोखीम स्वीकारणे शक्य असते कारण तुमच्याकडे अधिक कालावधी असतो त्यामुळे बाजारातील चढ उताराची तीव्रता कमी होते. अधिक जोखीम घेतल्यास अधिक परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे तुमचे आर्थिक उद्दिष्ट वेळेवर किंवा त्यापूर्वी साध्य होऊ शकते.
गुंतवणूकीस लवकर सुरुवात केल्यास विविध मालमत्ता प्रकारात ती विभागता येते अशा वैविध्यपूर्ण गुंतवणूकीमुळे जोखीम विभागली जाऊन दिर्घकाळात सातत्याने योग्य परतावा मिळत राहतो.
निवृत्ती नियोजन
आपल्या निवृत्तीनंतरच्या खर्चाची पूर्तता करण्यास मोठया रकमेची गरज असते. जर आधीपासूनच निवृत्तीसाठी तरतूद केल्यास त्यास दिर्घकाळात मिळणाऱ्या चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो. त्यामुळे निवृत्त काळात आर्थिक सुरक्षितता लाभते.
महागाई
महागाई ही बचतीची शत्रू आहे तर गुंतवणूकीची मित्र. लवकर सुरू केलेली गुंतवणूक महागाईवर मात करते आणि तुमची क्रयशक्ती वाढवते. दिर्घकाळात गुंतवणुक महागाईवर मात करीत असल्याचा इतिहास आहे.
6. गुंतवणूकीतील जोखमीचे व्यवस्थापन
अजूनही अनेकजण भांडवल बाजारात गुंतवणूक करण्यास घाबरतात. त्यांना त्यांची गुंतवणूक बुडण्याची भीती वाटते. या जोखमीचे सुयोग्य व्यवस्थापन करता येते हे त्यांना माहिती नसतं. मूल्याधिष्ठित गुंतवणूक कीचे जनक बेजामिन ग्राहम म्हणतात, जोखीम टाळण्याऐवजी तिचे व्यवस्थापन करणे म्हणजे उत्तम गुंतवणूक करणे. फार वर्षांपूर्वी त्यांनी दिलेला हा संदेश आजही तितकाच लागू पडतो. योग्य माहिती आणि निश्चित हेतू मनात बाळगून भांडवल बाजारात केलेली गुंतवणूक उत्तम परतावा देते.
कोणत्याही गुंतवणूकीत काहींना काही जोखीम असतेच त्यामुळे कोणताही गुंतवणूकदार जोखीम टाळू शकत नाही तो व्यवस्थापन करून त्याच्या गुंतवणूक संचाची तीव्रता कमी करू शकतो त्यावर विपरीत परिणाम होऊ देत नाही.
त्यामुळेच सर्वप्रथम अभ्यास करून गुंतवणूक आणि जोखीम समजून घेतली पाहिजे याला कोणताही पर्याय नाही, सोपा मार्ग नाही. असा अभ्यास तुम्ही करू शकत नसाल तर त्यासंदर्भात व्यावसायिक सल्ला मार्गदर्शकाकडून घ्यावा लागेल.
दुसरं म्हणजे तुम्ही गुंतवणूक विविध मालमत्ता प्रकारात विभागली पाहिजे. जोखमीवर मात करण्याची ती गुरुकिल्ली आहे. तुम्ही मालमत्तेची विभागणी भांडवल बाजार, स्थावर मालमत्ता, वस्तू बाजार आणि मौल्यवान धातू यात करू शकता.
या मालमत्ता प्रकारातील उप प्रकारातही विभागणी करता येऊ शकते उदाहरणार्थ भांडवल बाजारातील तुमची गुंतवणूक कंपनी शेअर्स, विविध व्यवसाय, चलन बाजार, कर्जरोखे यामध्ये विभागता येऊ शकते.
विविध प्रकारच्या दर्जेदार मालमत्ता प्रकारातील गुंतवणूक असलेल्या गुंतवणूक संचास धोका कमी असतो. असे असले तरीही काही धोके असतातच जे आपण टाळू शकत नाही जसे भावातील चढ उतार. जेव्हा बाजारात सर्वसाधारण मंदी असेल तेव्हा आपल्या गुंतवणूक संचात असलेल्या शेअर्सचे भावही खाली येतात.
भाव खाली आले तर त्याचे दडपण घेऊ नये तुमच्या उद्दिष्टानुरूप गुंतवणूक करीत राहावं. अल्पकालीन गुंतवणूक म्हणून शेअर्समध्ये गुंतवणूक करणे टाळावे. दिर्घकाळात शेअर्सची गुंतवणूक तुम्हाला महागाईवर मात करणारा परतावा देईल. तुम्हाला नजीकच्या काळात पैसे लागणार असतील तर ते अत्यंत कमी जोखीम असलेल्या आणि सहज मोडता येतील अशा गुंतवणूक साधनात ठेवावेत.
तुमची गुंतवणूक निश्चित उद्दिष्ट आणि त्यासाठी लागणाऱ्या कालावधी अनुरूप जोखीम तीव्रता विभागणारी असावीत यामुळे तुमचे आर्थिक उद्दिष्ट साध्य होऊन आर्थिक नुकसान टळेल. (समाप्त)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत.
लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही याची नोंद घ्यावी)
अर्थसाक्षर डॉट कॉम या संकेतस्थळावर 12 सप्टेंबर 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment