Friday, 27 June 2025

पैसा, पैसा आणि पैसा!

#पैसा_पैसा_आणि_पैसा पैसा आणि उद्योजकता या विषयाचे संस्कार मराठी माणसांवर नसल्याने या विषयावर बोलणे, आपापसात चर्चा करणे टाळले जाते. पैसा जीवनाचे सर्वस्व नसले तरी प्रत्येक ठिकाणी तुमचे पैशांवाचून अडते. आपल्याकडे किती पैसे असावेत याचा कोणताच मापदंड नाही. पैसा ही अशी शक्ती आहे जी कधीच पुरेशी आहे असं वाटतं नाही. एकीकडे सतत पैसा पैसा करणारे लोक, जे कायम प्रत्येक गोष्ट पैशांत मोजतात. येन केन प्रकारे तो केवळ आपल्यालाच मिळावा असं त्यांना वाटतं तर दुसरीकडे लोक कल्याणार्थ अतिशय निरीच्छ व्यक्ती आहेत ते पैसा महत्वाचा न मानता त्यांचे कार्य उत्तमरीतीने करीत असून भरीव कार्यही करीत असतात, अशी टोकाची उदाहरणे समाजात आहेत. आपण पडलो मध्यम प्रवृत्तीची माणसे आता आपली मनोभुमिका कोणतीही असो, पैशाचे महत्व जाणत असल्याने आणि सातत्याने प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागत असल्याने इच्छापूर्तीचे साधन म्हणून सर्वांनी त्याचा स्वीकार केला आहे. तो योग्य मार्गाने वैध पद्धतीने मिळवला आणि योग्य त्या कारणासाठी खर्च केला तर त्याचे मोल राहते हे आपल्याला पटले आहे. या विषयावर सर्व भाषांत अनेक स्वतंत्र तसेच अनुवादीत पुस्तके असली तरी बहुतांश पुस्तके पैसा कसा मिळवावा, वाढावावा, टिकवावा अशा स्वरूपाची आहेत. अशी पुस्तके निश्चितच असली पाहिजेत याबद्दल वाद नाही परंतु मन न गुंतवता योग्य प्रकारे पैशांचा वापर केल्यास त्याचे मूल्य कसे वाढते. या विषयावर चिंतन करणारे पुस्तक अलीकडेच मी वाचून पूर्ण केलं. त्याचं नाव आहे, ‘पैसा, पैसा आणि पैसा’. हे पुस्तकं लिहिलं आहे प्रा सुरेश गर्जे यांनी. सन 2023 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची किंमत ₹170/- असून ते सकाळ पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. या शंभर पानी पुस्तकात लेखानामागील भूमिका सांगून एकंदर चौदा निबंधासारखे लेख असून ते एकामागोमाग एक अथवा स्वतंत्र वाचलेत तरी चालण्यासारखे आहे. ज्यात पैशांच्या शक्तीचे तत्त्वज्ञान, त्याचा उपयोग, आणि समाजहिताच्या संदर्भातील जबाबदारी या सर्वांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रत्येक लेखाचे थोडक्यात सार अतिशय कमी शब्दात सुरवातीलाच दिले असून त्याचे अधिक स्पष्टीकरण लेखात आहे. ■लेख विषय आणि थोडक्यात स्पष्टीकरण असे, ◆पैशांचे झाड- उद्यागाच्या भूमीत कल्पकतेची बीजे योग्य वेळी पेरावी लागतात. त्यावर घामाचे चिंतन करावे लागते. तेव्हा ती बीजे अंकुरतात. रोपांच्या रूपाने डोलू लागतात. त्यांच्या वाढीच्या दृष्टीने डोळ्यात तेल घालून त्यांची मशागत करावी लागते. तेव्हा पैशांचे झाड उभे राहते. त्यांना पाने फुले बहरतात. यासाठी अहर्निश धडपड करावी लागते, कष्ट उपसावे लागतात, तेव्हा कुठे पैशांचे झाड डोलू लागते. ◆धनसंग्रह नेमका कशासाठी?- दरिद्रीनारायणाची सेवा हीच परमात्म्याची सेवा आहे. याचा अर्थ असा की, लोककल्याणाची कामे ही सत्कर्मे होत. धनसंग्रह स्वतःच्या उपभोगसाठी न करता तो जनकल्याणासाठी, गरजूच्या पीडाहरणासाठी केल्यानेच मनःशांती प्राप्त होऊ शकते. ◆पैसे कामावण्याच्या प्रेरणा- खर्च आणि काटकसर, काटकसर आणि बचत यात तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. अत्यंत जरुरी बाबींवर खर्च करणे आणि अनावश्यक गोष्टीवर खर्च टाळणे, हे शहाणपणाचे लक्षण आहे. खर्च हा नेहमी उधळेपणाच्या मर्यादेपर्यंत करू नये आणि काटकसर कंजूषपणाच्या स्तरापर्यंत पोहचू नये. खर्च आणि काटकसर यांतील सुवर्णमध्य साधला पाहिजे. ◆जोडूनिया धन- आर्थिक व्यवहारात सर्वतोपरी प्रामाणिकपणास महत्व आहे आणि असा सत्यावर आधारित, नीतिमत्तेला घरून असणारा व्यवहार ‘उत्तम व्यवहार’ सदरात मोडतो आणि त्याची उत्तम फळे कर्त्या व्यक्तीस यथावकाश निश्चितच प्राप्त होत असतात. ◆पैशाचे सामर्थ्य - पैशाची भूमिका सर्वच क्षेत्रात महत्वापूर्ण आहे. वैयक्तिक बाबतीत कुटुंब आणि परिवाराच्या संबंधी, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक प्रभाव दर्शवत असतो. कोणत्याही उपक्रमांचे आयोजन आणि सामाजिक सुधारणांचे प्रकल्प एक इंचभरही पुढे पैशाशिवाय पुढे हलू शकत नाहीत. ◆दौड पैशासाठी- सुवर्णाचा साठा सुवर्णाचे मोल कमी होऊ शकते, परंतु प्रियजनांचा, नात्यागोत्यातील जिवंत व्यक्तींच्या प्रेमाचा साठा कधीच कमी होत नाही. हीच जीवनातील खरी संपत्ती आहे. जीवनातील सुख आणि आनंद देण्याची शक्ती सोन्यात नाही. ◆पैशाची निरर्थकता- माणसाची तृष्णा थांबली, की त्याच्या ठायी असलेल्या यातनांचे शमन होयला हवे. सत्य, अहिंसा आणि करुणा हे तीन घटक मानवाची प्रज्ञा आणि शील यांच्या संवर्धनाचे कारण आहेत. ज्ञानप्राप्तीबरोबरच सदाचाराचा प्रवेश मानवी मनात झाला, की मनःशांतीचे बिजाकुरण होयला वेळ लागत नाही. ◆अपरिग्रह- आज करोडोंच्या संख्येने गोरगरीब, आसराहीन, अन्नासाठी दाही दिशा भटकणारे लोक जगाच्या पाठीवर आहेत, तोपर्यंत गांधींच्या विचारांचे गांभीर्य कायम टीकणारे आहे. ◆पैशाची सार्थकता- पैशाच्या त्यागातून प्राप्त होणारी मनःशांती, समाधान, सुख आणि आनंद आगळवेगळा असतो. मनुष्यजीवनात अशा प्रकारच्या आनंदाची अनुभूती प्राप्त करण्याचा सक्रिय सहभाग आणि प्रयत्न प्रत्येक पैसेवाल्या व्यक्तीने स्वतःच्या उत्पन्नाच्या काही भागातून करणे आवश्यक आहे. ◆सुखाचा शोध- दरिद्री लोकांचे दारिद्र्य दूर करणे, अज्ञान दूर करण्यासाठी मोफत शाळा, महाविद्यालयाची उभारणी माफक दरात शिक्षणाच्या सोयी, सर्व सुविधानी युक्त भव्य रुग्णालये, अनाथालये, विध्यार्थांसाठी वसतिगृहे, वृद्धांसाठी शुश्रुषालये, महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती, आदिवासीच्या विकासाचे उपक्रम, नैसर्गिक आपत्ती, भूकंप, समुद्री वादळे, महापुरानी ग्रस्त जनसमुदायासाठी पिण्याच्या पाण्याच्या सोई असे अनेक उपक्रम राबवण्यासाठी स्वतःजवळील घनाचा शक्य तेवढा भाग खर्च करून समाजाच्या उपकारांची अंशतः का होईना परतफेड करावी. ◆आर्थिक भ्रष्टाचार- अवैध मार्गानी पैसा जमा करण्याच्या प्रवृत्तीची कारणमिमांसा हा या लेखाचा एक एक हेतू आहे. पैशाच्या सोबत प्रतिष्ठा येते. समाजात मानसन्मान प्राप्त होतो. यासाठी आणि सुखासोयीनी युक्त, चैनींनी युक्त जीवन जगण्यासाठी आणि पिढ्यानंपिढ्याच्या आर्थिक सुरक्षतेसाठी आणि भावी काळात आर्थिक विपत्तीला सामोरे जाण्याची पाळी येऊ नये, यासाठी आवश्यक सुरक्षेची भक्कम तटबंदी उभारण्याकरिता येनकेन प्रकारेन पैसा वाढवण्याची प्रवृत्ती निर्माण होत असते. या प्रवृत्तीला मुळी अंतच नसतो. ◆पैसा आणि प्रारब्ध- समस्याचे निराकरण कसे होईल, त्यातून साहिसलामत सुटण्याचे मार्ग कोणते यावर चिंतन करणे उपयुक्त आहे. पैशांची कमतरता आहे, आर्थिक परिस्थिती बिकट आहे, दारिद्र्याची छाया कुटुंबावर आहे. अशा परिस्थितीत माणूस एकच करू शकतो, परिश्रम. पैसा कमावण्याचे परिश्रम. परिश्रमाच्या झाडाला पैशांची फळे लागतात. प्रारब्धानुसार ती कमी अधिक लागतील हा भाग वेगळा, परंतु फळे लागणार एवढे मात्र निश्चित समजले पाहिजे. ◆पैसा आणि रचनात्मक उपक्रम- मुलांना ‘धन कमवा’ हे शिकवत असताना धर्मही शिकवला पाहिजे. अर्थात नीतिधर्म किंवा मानवता धर्म. या धर्मात जी शिकवण दिली जाते, तिचा परिणाम चरित्र्याची निर्मिती आणि नैतिकदृष्ट्या वागणुकीचे संवर्धन यात होत असते. ◆सुख आणि आनंद- समाजावरील प्रेम हे प्रेमाची व्यापकता दाखवते, प्रेम ही शक्ती आहे. ती व्यक्तीला शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ प्राप्त करून देते. जनताजनार्धनावरील प्रेम ही प्रेमाची विशाल व्याप्ती आहे. हे प्रेम लोकसेवा कार्यातून व्यक्त होते. ज्यांच्याकडे अधिक धनसंग्रह आहे त्यांनी अभावग्रस्तांवर पैशांचा पाऊस पाडला पाहिजे, प्रेमाचा वर्षाव केला पाहिजे. थोडक्यात, ●पैशाची ऊर्जा आणि सामर्थ्य: पैशामध्ये मोठी शक्ती आहे — स्वतंत्रता, संसाधने, आणि क्षमता निर्माण करण्याची क्षमता. मात्र, पैसा कच्चा संसाधन आहे, ज्याला योग्य दिशा आणि ध्येयाच्या अनुरूप वापरल्यासच फलदायी ठरते. ●वैयक्तिक वागणूक: सकस नियोजन, संयमन, गुंतवणूक आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर भर. केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर आवश्यकतेनुसार गरजू लोकांसाठी वापर करण्याद्वारे आत्मसंतुष्टी मिळते आणि समाधान वाढतं. ●सामाजिक उत्तरदायित्व: पैसा ‘देणगी’ किंवा ‘दान’ स्वरूपात समाजाच्या भल्यासाठी वापरणे, जे आत्मिक समाधान शंभरपट वाढवते. फक्त वैयक्तिक संपत्तीच नव्हे, तर समाजातील गरजू जनतेसाठीही पैशाचा हितकारक उपयोग कसा करता येईल याचा संदेश पुस्तकातून मिळतो. ■कोणाला उपयुक्त? ◆व्यक्तिगत वित्त व्यवस्थापन शिकणाऱ्यांना – खर्च‑नियोजन, गुंतवणूक आणि बचत विषयक मूलभूत दृष्टीकोनासाठी. ◆समाजसेवी व दानप्रवृत्त लोकांसाठी – पैशाच्या समाजोपयोगाच्या मूल्यांना समजण्यासाठी. ◆चिंतनशील‑आध्यात्मिक वाचकांसाठी – तत्त्वज्ञानाने प्रेरित लेखनातून आर्थिक दृष्टीकोन प्राप्त करण्यासाठी. ■का वाचावे? शाश्वत जीवनशैलीचा पुरस्कार करणारे हे पुस्तक वाचताना, विनोबांच्या पूर्वी वाचलेल्या ‘गीता प्रवचने’ या पुस्तकाची प्रकर्षाने आठवण करून देते. ते तुमच्या आर्थिक ज्ञानाचं परिमाण वाढवण्यास मदत करतं, आणि सोबतच समाजातील गरजूंच्या भल्यासाठी पैसे कसे वापरायचे हेही शिकवते. आत्म‑विकासाला आणि समाजोपयोगाला एकत्र साधून लेखनातून जीवनात अर्थ प्राप्त करण्याचे मार्ग दाखवले आहेत. अर्पणपत्रिकेत म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक पैशाचा सदुपयोग करणाऱ्या आणि पैशाचा हव्यास असलेल्या समस्त जनांस असले तरी कुणाचाही पैशाविषयीच्या दृष्टिकोनात निश्चित बदल करू शकणारे असल्याने संग्रही ठेवण्यासाठी, प्रियजनांस भेट देण्यासाठी योग्य आहे. पुस्तकातील लेख आणि त्याविषयीची अधिक माहिती पुस्तकातलीच आहे, मी फक्त निमित्यमात्र! अजूनही दोन पुस्तकं निवांततेने वाचतोय, उपयुक्त वाटल्यास त्यावरही यथावकाश नक्की लिहीन. ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत, याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक आहेत.) अर्थसाक्षर डॉट कॉमवर 27 जून 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.

No comments:

Post a Comment