Sunday, 8 June 2025

आयटीआर 3 विषयक शंका समाधान

#आयटीआर_3_विषयक_शंका_समाधान…. आयकर रिटर्न फॉर्म (ITR-3) हा अशा व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे व्यापार अथवा व्यवसायातून उत्पन्न मिळते. याशिवाय घरभाडे, भांडवली नफा, पगार किंवा अन्य उत्पन्न आहे, ज्यासाठी सर्वसमावेशक हिशेब पुस्तके राखणे आवश्यक असेल अथवा नसेल. हा सरकारच्या आयकर विभागाने विविध प्रकारच्या उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी विहित केलेल्या विविध आयकर रिटर्न फॉर्मपैकी एक आहे. या फॉर्म विषयीच्या शंकाची उत्तरे जाणून घेऊन तो कसा दाखल करता येतो त्याची अधिक तपशीलवार माहिती घेऊया. ◆आयटीआर-3 फॉर्म म्हणजे काय? ~आयटीआर-3 हा भारतात पगार, व्यवसाय आणि अन्य स्रोतांमधून उत्पन्न असलेल्या व्यक्ती आणि हिंदू अविभाजित कुटुंबांसाठी (एचयूएफ) वापरला जाणारा प्राप्तिकर परतावा फॉर्म आहे. ◆आयटीआर-३ कोण दाखल करू शकते? ~उद्योग किंवा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न, पगार किंवा पेन्शनमधून मिळणारे उत्पन्न, घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न भांडवली नफ्यातून मिळणारे उत्पन्न, इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न. याशिवाय करदात्याकडे त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांपैकी एक म्हणून मालकी हक्क किंवा व्यवसाय असणे आवश्यक आहे. हा फॉर्म अधिक व्यापक असून करदात्यांना त्यांच्या उत्पन्नाबद्दल आणि विविध स्रोतांमधील कपातींबद्दल तपशीलवार माहिती सादर करण्याची परवानगी देतो. यात विविध विभाग आहेत जिथे करदात्यांना त्याची वैयक्तिक माहिती, एकूण उत्पन्नाची गणना, वेगवेगळ्या स्रोतांमधून उत्पन्नाचे तपशील, वजावट, भरलेले कर आणि त्यांची पडताळणी या संबंधित अनेक तपशील द्यावे लागतात. ◆खालील श्रेणींमध्ये येणाऱ्या करदात्यांकडून आयटीआर-3 दाखल करता येईल. ~पगार अथवा पेन्शन याशिवाय करदाता हा मालक असलेल्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न (ऑडिट आणि नॉन-ऑडिट दोन्ही प्रकरणे) एकापेक्षा जास्त घरांच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न 'इतर स्रोतांमधून उत्पन्न' अंतर्गत येणाऱ्या लॉटरी, घोड्यांच्या शर्यती आणि इतर क्रियाकलाप जिंकून मिळालेली बक्षिसे भारताबाहेरील देशातील मालमत्तेच्या माध्यमातून उत्पन्न मालमत्ता अल्पकालीन किंवा दीर्घकालीन भांडवली नफ्यातून मिळणारे उत्पन्न भागीदारी फर्मकडून मिळालेला मोबदला असे उत्पन्नाचे एकाहून अनेक स्रोत असलेले वैयक्तिक करदाते किंवा असे हिंदू अविभक्त कुटुंब यांना हा फॉर्म भरता येईल. ◆आयटीआर-3 दाखल करण्यास कोण पात्र नाही? ~व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबे वगळता इतर कोणीही आयटीआर-3, फॉर्म भरण्यास पात्र नाहीत. त्याचप्रमाणे- आयटीआर-1 (सहज), आयटीआर-2 आणि आयटीआर-4 (सुगम) भरणारे करदाते, व्यापार व्यावसायिक अथवा भागीदारीत उत्पन्न नसलेले करदाते हा फॉर्म भरू शकत नाहीत. ◆आयटीआर-3 फॉर्मची रचना काय आहे? ~दरवर्षी फॉर्ममध्ये किरकोळ बदल होत असले तरी अशा नियमित बदलाशिवाय यावर्षी फॉर्मची रचना थोडी बदलली असून त्यातील प्रमुख बदल असे- ●भांडवली नफ्याचे विभाजन: भांडवली नफ्यासंबंधित करदर बदलल्याने 23 जुलै 2024 च्या आधी आणि नंतर झालेल्या विक्रीमुळे मिळालेला भांडवली नफा या वर्षी स्वतंत्रपणे नोंदवावा लागेल. ●बायबॅक तोटा: 1 ऑक्टोबर 2024 पासून, शेअर बायबॅक म्हणून मिळालेली रक्कम लाभांश समजून त्यावर इतर स्रोतापासून मिळालेले उत्पन्न मानून कर आकारला जाणार असून सदर शेअर खरेदी करण्यासाठी मोजलेली रक्कम भांडवली तोटा म्हणून मान्य केली जाणार आहे. ●मालमत्ता प्रकटीकरण मर्यादेत वाढ: आता मालमत्ता आणि दायित्वे नोंदवण्याची मर्यादा ₹1 कोटी (पूर्वी ₹50 लाख) पेक्षा जास्त असेल तरच आवश्यक आहे. ●नवीन कलम ४४बीबीसी: क्रूझ व्यवसाय ऑपरेटरसाठी लागू केले आहे. या कलमाअंतर्गत, प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या 20% रक्कम करपात्र उत्पन्न म्हणून गणली जाते. ●अधिक कपात तपशील: 80C, 10(13A), इत्यादी अंतर्गत दाव्यांसाठी तपशीलवार अहवाल आवश्यक आहे. कलम 80 सी, कलम 10 (13 ए) ●घरभाडे भत्ता आणि इतर संबंधित कलमांखाली कपातीचा दावा करणाऱ्या करदात्यांना आता आयटीआर-3 फॉर्ममध्ये अधिक बारकाईने माहिती द्यावी लागेल. ●टीडीएस विभाग कोड: व्यवसायाच्या स्वरूपावरून आणि त्याच्या उपविभागावरून ज्या अंतर्गत कर कापला गेला त्याचा नेमका व्यवसाय कोड भरणे आवश्यक आहे. यासाठी विविध व्यवसायांचे कोड आयकर विभागाने जाहीर केले असून ते त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ●कलम 80 सी खालील गुंतवणूक खर्च आणि कलमनिहाय टीडीएस टिसीएस रिपोर्टिंग सारख्या कपातींसाठी स्वतंत्र तपशील देणे सुरू करण्यात आले आहे. यामुळे सादर करण्यात आलेल्या माहितीत पारदर्शकता, अचूकता येऊन विवरणपत्र दाखल करणे सोईचे होईल. ◆आयटीआर 3 दाखल करण्यास आवश्यक कागदपत्रे- ~पॅन, आधार, बँक खात्यांची माहिती, पगार मिळत असल्यास फॉर्म 16, गुंतवणूक तपशील, हिशोब पुस्तके. ◆आयटीआर 3, विवरणपत्र दाखल करण्याचे सर्वसाधारण टप्पे - ●विभागाच्या संकेतस्थळावर विवरण भरण्यासाठी लॉग इन करणे ●आपल्या खात्यास पॅन लिंक करणे ●वैयक्तिक माहिती- जसे की, नाव, पत्ता, पॅन, आधार, करदात्याचा प्रकार इ माहिती देणे ●उत्पन्नाचे स्रोत- विविध व्यवसाय त्यातून मिळालेला नफा त्यासंबंधित इतर तपशील, पगार पेन्शन घरभाडे भांडवली नफा अन्य उत्पन्न याचा तपशील आणि केलेली गुंतवणूक आणि खर्च यांची विस्तृत माहिती द्यावी लागेल. ●भरलेल्या अथवा मुळातून कापलेल्या कराचा तपशील: यांची तपशीलवार माहिती द्यावी. ●इतर आवश्यक खुलासे : नियमानुसार इतर आवश्यक ते खुलासे करावे लागतील. ●करदेयता: सारांश पहा, तुलना करा आवश्यक असल्यास करमोजणी करण्याच्या पद्धतीत बदल केल्यास करामध्ये काय फरक पडतो तो पहावा आणि योग्य करप्रणाली निश्चित करावी. *नवी कर प्रणाली एकदा स्वीकारली की त्यात बदल करता येत नाही.* हे लक्षात ठेवूनच ती स्वीकारावी अथवा नाकारावी. ●दिलेली माहिती खरी असल्याचे प्रकटीकरण करावे ●आवश्यक असल्यास कर भरणा करावा ●यानंतर आयकर विभागाच्या पोर्टलवर विवरणपत्र सादर करून त्यांचे सत्यापन करावे. असे सत्यापन तीस दिवसात न केल्यास विवारणपत्र दाखल केले नाही असे समजण्यात येते. त्यामुळे यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. असे यातील सर्वसाधारण टप्पे आहेत स्वतः आपले आयटीआर 3 दाखल करणे गोंधळात टाकणारे आणि त्रासदायक असू शकते. ते बरेच क्लिष्ट असल्याने, विशेषतः सामान्य लोकांसाठी, पुढील दंड आणि सूचना टाळण्यासाठी कर व्यावसायिकाची मदत घेणे उचित आहे. त्याच्याकडून तुमच्या कर प्रश्नांचे निराकरण करताना तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या वजावटीचा जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल ते पहाणे जरुरीचे आहे. ◆आपण व्यावसायिक मदतीशिवाय आयटीआर 3 दाखल करू शकतो का? ~हो, जर तुम्हाला तुमच्या खात्यांचे लेखापरीक्षण करण्याची आवश्यकता नसेल तर तुम्ही कोणत्याही व्यावसायिक मदतीशिवाय आयटीआर 3 दाखल करू शकता. तथापि, हा फॉर्म अतिशय किचकट असल्यामुळे आयटीआर स्वतः दाखल करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि कठीण असू शकते म्हणून तुमचे अचूक आयटीआर दाखल करण्यासाठी कर व्यावसायिकांचा सल्ला घेणे अधिक योग्य होईल. ✍️उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकरणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत.) अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 23 मे 2025 रोजी पूर्वप्रकाशित.

No comments:

Post a Comment