Sunday, 8 June 2025
डब्बा ट्रेडिंग
#डब्बा_ट्रेडिंग
कर चुकवण्यासाठी अनेक छोटे मोठे व्यवहार रोखीत होत असतात हे आपल्याला माहीत आहे. अधिकाधिक लोकांनी आपले सर्वच व्यवहार जाहीर करून त्यावर असलेल्या सवलतींचा लाभ घेऊन देय कर भरावा अशी सरकारची इच्छा असते. त्याप्रमाणे सर्वांनी प्रामाणिकपणे कर भरल्यास विकासासाठी मुबलक पैसा उपलब्ध होऊन भविष्यात कर दर कमी होऊ शकतील. कर संकलन वाढवण्याचा उपाय म्हणून सरकार अनेक उत्पन्न आणि खर्च यावर टीडीएस, टीसीएस लागू करते. हा एक प्रकारचा अग्रीम कर असुन त्यामुळे संबंधित व्यक्ती आपले उत्पन्न जाहीर करून नियमानुसार कर भरेल अशी अपेक्षा असते. भविष्यात सर्वच रोखीचे व्यवहार पूर्णपणे बंद करून अथवा त्यावर काही कर लावणे शक्य आहे परंतु त्यात असंख्य अडचणी आहेत. अजूनही अनेक लोक विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि अशिक्षित लोक ऑनलाइन व्यवहार करीत नाहीत. त्यांना ते तितकेसे सोपे आणि सुरक्षित वाटत नाहीत यासंबंधीत तक्रारी समाधानकारक रित्या सुटतील अशी ठोस यंत्रणा नाही. याचबरोबर आज अनेक असे व्यवसाय आहेत ज्यात रोखीचे अधिकाधिक व्यवहार होतात. हे व्यवहार करणारे व्यावसायिक सर्वच राजकीय पक्षातील राजकारणी लोक करत असल्याने ते कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांचे यासंबंधात हितसंबंध जपले जावेत याबाबत ते अत्यंत दक्ष असतात. जोपर्यंत त्यांना असे वाटते तोपर्यंत त्यात बदल होणे जवळपास अशक्य आहे. आज जीएसटी लागू झाल्यावर कर संकलन वाढत असले तरी सर्व घाऊक
नियमित व्यवहारांबरोबर जवळपास तेवढेच व्यवहार रोख रकमेत होतात हे उघड सत्य आहे. ते बदलण्याची राजकीय इच्छाशक्ती आणि त्यासाठी त्याच्यावर जनतेचा दबाव या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. जोपर्यंत राजकारणी आणि जनता यांचे हे साटेलोटे असेच राहील तो पर्यंत यात मोठा फार काही बदल होईल असे वाटत नाही.
इतर बाजारांप्रमाणे शेअरबाजार, वस्तुबाजार आणि चलन बाजारात होणाऱ्या नियमित व्यवहारांशीवाय समांतर असे व्यवहार फार पूर्वीपासून होत आहेत. हे व्यवहार प्रामुख्याने रोखीत आणि विश्वासावरच होत असतात. सूचिबाह्य शेअर्सची खरेदी विक्री करणारे काही मंच आपण मागील काही लेखात पाहिले, असे मंच अधिकृत असून त्यावर व्यवहार करण्यास बंदी नाही. या व्यवहारांवर कमी नियामक बंधने असली तरी पारदर्शक पद्धतीने आणि अधिकृतपणे होतात. त्यावर कर आकारणी कशी होणार तेही आपल्याला माहिती आहे. मान्यताप्राप्त बाजारात होणारे व्यवहार हे करार असतात आणि ते पूर्ण करणे संबंधितांवर बंधनकारक असते या व्यवहार पुर्ततेची हमी बाजार नियामक मंडळावर असते. कोणत्याही कारणाने ते पूर्ण झाले नाहीत तर त्यांची भरपाई कशी करायची यांचे निश्चित नियम असल्याने ते अधिक सुरक्षित असतात. याशिवाय अन्य ठिकाणी जर समांतररित्या असे व्यवहार होत असतील तर त्यास डब्बा ट्रेडिंग असे म्हणतात. यात प्रामुख्याने पैजेचे व्यवहार होतात. या पैजा प्रत्यक्षात खरेदी विक्री न करता भविष्यातील विशिष्ट वेळी, दिवशी, शेअरचा भाव, निर्देशांक, सोने चांदी यासारख्या मौल्यवान वस्तूंचा भाव, डॉलरचा भाव एवढा असेल अशा स्वरूपाच्या असतात. या पैजा अत्यंत कमी पैशांची हमी देऊन लावता येतात आणि त्यांचे समायोजन पूर्वी आणि आजही प्रामुख्याने रोख पद्धतीने होते. पूर्वी ही पैजेची रक्कम डब्यात, खोक्यात अथवा बादलीत ठेवण्यात येत असल्याने त्यास डब्बा ट्रेडिंग, बॉक्स ट्रेडिंग आणि बकेट ट्रेडिंग असे नाव पडले असण्याची शक्यता आहे. आता काही व्यवहार डी मॅट खात्याचा वापर करून आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन पद्धतीनेही केले जात आहेत. डब्बा ऑपरेटरशी संपर्क करून असे व्यवहार करायचे असल्याचे तोंडी अथवा अन्य कोणास शोधाता येणार नाही अशा पद्धतीने कळवण्यात येते, काही रक्कम देण्याच्या बोलीवर व्यवहार निश्चित केला जातो, यातील किंमती नियमित बाजारा बरोबर ताडण्यात येतात, त्यात जिकल्यास ठरलेली रक्कम देण्यात येते रोख रक्कम त्रितीयपक्षी मध्यस्थाच्या माध्यमातून दिली घेतली जात असून केवळ विश्वासावर हे व्यवहार केले जातात. यास कायद्याचे कोणतेही पाठबळ नसल्याने, एक प्रकारे तो मालमत्तेतील किमतीच्या चढ उतारावर आधारित असा जुगार आहे.
■मान्यताप्राप्त बाजार, सूचिबाह्य शेअर्स खरेदीविक्री मंच, डब्बा ट्रेडिंग यांची तुलना-
●कायदेशीरपणा: मान्यताप्राप्त बाजार आणि सूचिबाह्य शेअर्सच्या व्यवहारांचे मंच कायदेशीर असल्याने सुरक्षित आहेत. डब्बा ट्रेडिंग मंच बेकायदेशीर आहेत.
●व्यवहार व्यवस्था: बाजार आणि सूचिबाह्य शेअर्स मंच यावरील व्यवहार निश्चित नियमाने होतात. यावरील ग्राहकांची नोंद ठेवली जाते. ओळख पटवली जाते व्यवहार पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होतात. डब्बा ट्रेडिंग व्यवहार त्यांचे जरी काही नियम असले तरी ते बहुतेक रोख रकमेत आणि केवळ विश्वासावर होतात. त्याचे समायोजन डब्बा ट्रेडिंग ऑपरेटरद्वारे केले जाते.
●नियामक देखरेख: बाजार व्यवहारावर सेबीचे पूर्ण नियंत्रण असून सूचिबाह्य शेअर्स व्यवहार कमी नियंत्रणात आहेत. डब्बा ट्रेडिंग हे सेबीच्या नियामक यंत्रणेत येत नाहीत.
●कर आकारणी: बाजार व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून मान्यताप्राप्त बाजारात अल्प आणि दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर विशेष दराने कर आकारणी केली जाते. सुहीबाह्य शेअर्सवरील भांडवली नफ्यावर अन्य मालमत्तांप्रमाणे दोन वर्षानंतर विशेष दराने कर आकारणी केली जाते. डब्बा ट्रेडिंग व्यवहार अधिकृतपणे नोंदले जात नसल्याने त्यावर कोणताही कर दिला जात नाही.
●जोखीम तीव्रता: आधी सांगितल्याप्रमाणे बाजारातील व्यवहार अधिक सुरक्षित असल्याने त्यातील जोखीम अत्यंत कमी असते. सूचिबाह्य शेअर्सच्या व्यवहारांचे मंच विविध परवानग्या घेऊन हे व्यवहार करीत असल्याने आता त्यातील जोखीम खूप कमी झाली आहे. डब्बा ट्रेडिंग व्यवहार बेकायदेशीर असल्याने त्यात फसवणूक, त्याचप्रमाणे त्यात भाग घेतल्याबद्दल कायदेशीर कारवाई आणि शिक्षा होऊ शकण्याची शक्यता आहे.
■अन्य व्यवहार आणि डब्बा ट्रेडिंग यातील मुख्य फरक:
●पारदर्शकतेचा अभाव: डब्बा ट्रेडिंग पारदर्शक पद्धतीने होत नाही. त्यामुळे त्यात फसवणूक होण्याची शक्यता असते.
●गुंतवणूकदार संरक्षणाचा अभाव: हे व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर असल्याने यातील फसवणुकी संदर्भात गुंतवणूकदार ग्राहकांना कुठेही दाद मागता येत नाही.
●कर आकारणी: या व्यवहारावर कोणतीही कर आकारणी होत नाही किंबहूना असे व्यवहार कर चुकवण्यासाठीच केले जातात.
●व्यवहार समायोजन: यातील व्यवहारांचे समायोजन संबंधित डब्बा ऑपरेटरकडून केले जाते.
थोडक्यात,
डब्बा ट्रेडिंग ही नियमित बाजार अथवा अधिकृत मंचाबाहेर केल्या जाण्याऱ्या बेकायदेशीर व्यवहारांची प्रक्रिया आहे.
प्रत्यक्ष शेअर्सची खरेदी विक्री न करता भावातील फरकाचा लाभ देणारे, दलाली न आकारणारे, कमी भांडवलावर कित्येक पटीत व्यवहारांची परवानगी देणारे, बाजार संचाहून वेगळ्या संचात / तुकड्यात खरेदी विक्री करता येणारे, पैज लावण्याची परवानगी देणारे, त्वरीत पैसे देण्याची व्यवस्था करणारे, अधिकाधिक लोक वापरत असलेले, 24 तास कार्यरत असणारे, आणि आता तंत्रज्ञानाचा वापरुन ग्राहकस्नेही व्यवहार पर्याय उपलब्ध करून देणारे असून डब्बा ट्रेडिंग ब्रोकर आणि त्यांचे मंच समाज माध्यमावर उघडपणे जाहिराती प्रकाशित करीत असतात. सहज गुगल सर्च केलं असता, भारतातील प्रमुख डब्बा ट्रेडरची मिळालेली नावे अशी-
ट्रेडेक्स लाइव, एरो ट्रेड, व्ही मनी, व्हेंटज मार्केट, डब्बा ट्रेडिंग, स्काय ट्रेड, आवाज शेअर्स, डब्बा ट्रेडिंग कस्ट माइज, एलिट फॉर्च्युन, ट्रेड पाल अशी 10 आघाडीची नावे सहज मिळाली. यांची अँप्स आणि संकेतस्थळेही आहेत, यातील ‘व्यवहार किमान पैशांत कमाल व्यवहार’ या तत्वांवर आधारित असल्याने ते व्यक्तींमधील जुगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देतात. यास कायदेशीर संरक्षण नसल्याने गुंतवणूकदराचे नुकसान होऊन कायदेशीर समस्या उद्भवू शकतात. प्रतिभूती करार नियमन कायदा 1956 च्या (SCRA) कलम 23 (1) नुसार प्रतिभूती व्यवसायासाठी प्रचार करणे, बोली किंवा देकार देण्यासाठी लोकांना एकत्र करणे, कायद्यातील कलमांचे पालन न करणे आणि प्रतिभूती अपील न्यायाधिकरणाच्या आदेशांचे पालन न करणे यांचा समावेश आहे त्यामुळे असे व्यवहार करणे बेकायदेशीर आहे त्याचप्रमाणे भारतीय न्याय संहिता 2023 (BNS) च्या कलम 410 (विश्वासाचा भंग) आणि 318(फसवणूक आणि कट) नुसारही गुन्हेगारी कृत्य आहे. याबद्दल संबंधित व्यक्ती आणि व्यापारी यांना जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि अथवा ₹ 25 कोटीपर्यत दंडाची शिक्षा होऊ शकते. बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी केवळ माहिती म्हणून डब्बा ट्रेडिंग म्हणजे काय जाणून घ्यावे. हा लेख डब्बा ट्रेडिंगमधील गुंतवणूक आणि त्यांच्याशी संबंधित कोणत्याही मध्यस्तांची शिफारस करीत नाही.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकरणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 30 मे 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment