Friday, 8 November 2024
दीर्घकालीन गुंतवणूक
#दीर्घकालीन_गुंतवणूक
मागील काही भागात आपण अल्प मध्यम आणि दीर्घ कालावधीवर आधारित विविध गुंतवणूक पद्धतीची ओळख करून घेत आहोत. यातील कालमर्यादा ही व्यक्तीसापेक्ष असली तरी ती शेअर्स, विविध म्युच्युअल फंड योजनांचे युनिट, इटीएफ,बॉण्ड, सरकारी रोखे, रिटस, इनव्हीट, सोने चांदी यासारखे मौल्यवान घातू, स्थावर मालमत्ता, दुर्मिळ वस्तू, चित्र अशा कोणत्याही मालमत्ता प्रकारात करता येते. आयकर कायद्यानुसार त्याचा प्रकार आणि मालमत्ता बाजारातील नोंदणी यानुसार त्यातील एक ते दोन वर्षावरील गुंतवणूक म्हणजे दीर्घकाळ असतो. केवळ गुंतवणुकीतून बेंजामिन ग्रॅहम, वॉरेन बफे, चार्ल्स मंगुर, पीटर लीच यांनी गुंतवणूकदारांत जागृती करून प्रचंड बाजारमूल्य निर्माण करून आदर्श ठेवला आहे.
“सब्र का फल मिठा होता है!” याच अर्थाने त्यामुळेच जगभरातील गुंतवणूक तज्ञांच्या मते अश्या पद्धतीने गुंतवणूक करणे सर्वश्रेष्ठ मानले जात असावे.
■वैशिष्ट्ये-
●मोठा गुंतवणूक कालावधी - गुंतवणूक तज्ञांच्या मते साधारणतः 5 वर्षाहून अधिक, शेअर्स म्युच्युअल फंड युनिट याबाबत हा कालावधी 7 वर्ष असून या प्रकारात गुंतवणूक विभागून ठेवली असल्यास या कालावधीत आकर्षक परतावा मिळण्याची अधिक शक्यता असते.
●दलाली आणि अन्य खर्च कमी - अशी गुंतवणूक वारंवार केली जात नसल्याने त्यासाठी द्यावी लागणारी दलाली व अन्य शासकीय कर हे तुलनेने कमी असतात.
●जोखीम - आशा प्रकारच्या गुंतवणुकीत गुंतवणूकदाराने घेतलेली जोखीम ही मध्यम ते तीव्र या स्वरूपाची असते.
●गुंतवणूक विविध मालमत्ता प्रकारात - जाणीवपूर्वक जोखीम स्वीकारून यातून अधिक लाभाची अपेक्षा असल्याने अशी गुंतवणूक विविध मालमत्ता प्रकारात कमी अधिक प्रमाणात विभागली जाते.
●चक्रवाढवाढीचा लाभ- गुंतवणूक कालावधी दीर्घ असल्याने त्यातील चक्रवाढवाढीचा लाभ मिळण्याची शक्यता असते जितका अधिक कालावधी तेवढा लाभ अधिकाधिक वाढत जातो.
●संशोधन आणि संयम - ही गुंतवणूक करताना मालमत्ता प्रकारचे मूलभूत आणि तांत्रिक असे संशोधन करून त्यावरील दीर्घकालीन धोरण ठरवण्यात येते.
■फायदे-
●प्रचंड परतावा - चक्रवाढ वेगाने मिळणारा परतावा दीर्घकाळात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रकमेत प्रचंड वाढ होते.
●जोखीम कमी -गुंतवणूक कालावधी मोठा असल्याने कोणत्याही मालमत्ता प्रकारातील जोखीम ही कमी कमी होत जाते. अधिक जोखीम घेतल्यास अल्पकाळात लाभ अथवा तोटा अधिक होण्याची शक्यता दीर्घकाळात कमी होते.
●शिस्त - बचत नियमितपणे तर कोणतीही गुंतवणूक ही योग्य संधी साधून करायची असते याची आपोआपच सवय लागते. त्यादृष्टीने मनाची तयारी होते.
●करलाभ- दीर्घकालीन गुंतवणुकीतून मिळणारा लाभ हा भांडवली नफा समजण्यात येऊन तुमचे उत्पन्न कितीही असेल तरी त्यावर सवलतीच्या एकसमान दराने कर आकाराला जातो. शेअरबाजार संबंधित अशा दीर्घकालीन भांडवली लाभावरील कर आकारणी काही मर्यादेत करमुक्त तर त्यावरील अधिक लाभावर कमी दराने कर आकारणी होत असल्याने आपोआपच एकूणच करदेयता कमी होते.
●संपत्ती निर्मिती - दीर्घकाळ गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण होते. त्यामुळे गुंतवणूकदार केवळ श्रीमंत न होता धनवान होतो. (रिच आणि वेल्थ यातील फरक समजून घ्या)
●निवृत्ती नियोजन - ज्यांना आपल्या भविष्यातील निवृत्तीकाळाचे आर्थिक नियोजन करायचे आहे. त्याच्यासाठी लवकरात लवकर सुरुवात करण्याची ही आदर्श पद्धती आहे.
तोटे-
●कमी रोकडक्षमता - काही मालमत्ता प्रकारात मोठ्या प्रमाणावर लाभ दिसत असला तरी तो प्रत्यक्षात मिळवण्यात अडचणी असल्याने त्यातून अपेक्षित रक्कम योग्य वेळी मिळेल याची शक्यता कमी असते.
●बाजार हालचाल - मालमत्ता बाजार सातत्याने हलता असतो त्यामध्ये वर्षभरात पडणारा फरक हा खूप मोठा असतो या संधीचा फायदा घेता येत नाही.
●महागाईमुळे होणारा तोटा - काही मालमत्ता प्रकारात केलेली गुंतवणूक महागाई दरावर मात करणारी नसल्यास त्यामुळे त्यातील गुंतवणुकीचे मूल्य कमी होते.
●बाजार संधी- गुंतवणूक धोरण आधीच ठरवलेले असल्याने अन्य उपलब्ध संधीचा लाभ घेता येत नाही.
●गुंतवणूक प्रकारात सहज बदल अशक्य - विविध मालमत्तेतील गुंतवणूक प्रमाण बदलायचे असल्यास त्यातील बदल सहज करता येत नाहीत.
●भुराजकीय हालचाली- देशातील आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील ताण तणावाचा प्रभाव मालमत्तांच्या किंमतीवर पडण्याचा संभव यात अधिक आहे.
●मानसिक ताण - यात होणारे बदल हे अनेकांच्या अपेक्षेनुसार नसल्यास त्या सर्वांचा गुंतवणूकदारांच्या मनावर ताण येऊ शकतो.
■दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठीच्या विशेष सूचना
●आपले निश्चित गुंतवणूक ध्येय ठरवावे
●जोखीम क्षमतेनुसार विविध मालमत्ता प्रकारात गुंतवणूक विभागणी करावी.
●संधी साधून योग्य वेळीच गुंतवणूक करावी.
●नियमीत कालावधीनंतर (सर्वसाधारणपणे वर्षातून किमान एकदातरी) गुंतवणुकीचा आढावा घेऊन आवश्यक असल्यास बदल करावेत. वारंवार बदल करू नयेत त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.
●यासंबंधात माहिती मिळवून स्वतःला अद्यावत ठेवणे उत्तम. शिक्षणात केलेली गुंतवणूक कधीही फुकट जात नाही. आज अनेक मंच या संबंधातील उत्तम शिक्षण अल्प खर्चात उपलब्ध करून देत आहेत.
●आधी सांगितल्याप्रमाणे श्रध्दा आणि सबुरी ठेवणं अत्यावश्यक.
दीर्घकालीन गुंतवणूक वाटते तेवढी सहज सोपी नाही त्यासाठी निश्चित मनोभूमिका असणे आणि त्याचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असते. त्याची काही सिद्ध झालेली अनेक गुंतवणूक धोरणे किंवा पद्धती आहेत त्यातील कोणती धोरणे गुंतवणूकदार म्हणून आपल्याला पूरक होऊ शकतात ते ठरवण्यासाठी व्यावसायिक गुंतवणूक सल्लागाराची मदत होऊ शकते. अनेकांना गुंतवणूक करताना मध्यस्थाकडून आपल्याला काहीतरी कमिशन मिळावे अशी अपेक्षा असते ते अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे मध्यस्थही त्याला अधिक कमिशन किंवा अन्य लाभ देणाऱ्या योजना गुंतवणूकदारांच्या गळ्यात मारण्याची शक्यता असते म्हणूनच मध्यस्थ निवडण्यास अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घेण्यास कोणताही संकोच बाळगू नये. केशवसुतांनी त्यांच्या सतारीचे बोल या त्यांच्या दीर्घ कवितेत
धीर धरी रे धीरा पोटी
असती मोठी फळे गोमटी
ऐक मनीच्या हरितील गदा
ध्वनि हे ....
दिड दा, दिड दा, दिड दा …
असे आपल्याला सुचवले आहेच.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखातील मते वैयक्तिक आहेत)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 8 नोव्हेंबर 3024 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 25 October 2024
फॉर्म 12BAA पगारदारांसाठी आयकर कायद्यातील नवी तरतूद
#फॉर्म_12BAA_पगारदारांसाठी_आयकर_कायद्यातील_नवी_तरतूद
अधिकाधिक लोकांनी आयकर विवरणपत्र भरून आपले सर्व मार्गानी मिळवलेले उत्पन्न जाहीर करावे आणि नियमानुसार सवलती घ्याव्यात आणि लागू असल्यास योग्य कराचा भरणा करावा अशी सरकारची अपेक्षा आहे. त्यासाठी काही विशिष्ट रकमेच्या व्यवहारांवर मुळातून करकपात केली जाते. ही करकपात दोन पद्धतीने होते
1. टीडीएस
2. टीडीएस
जरी या दोन्ही पद्धतीने मुळातून करकपात केली जात असली तरी त्यात सूक्ष्म फरक आहे. टीडीएस हा विविध देयकांवर लावला जातो. उदा. व्याजाचे उत्पन्न, पगार, डिव्हिडंड, कमिशन, लॉटरी
टीडीएस कापणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस कपातकर्ता असे म्हणतात.
तर टीसीएस वस्तू आणि काही सेवांच्या विक्रीवर लागू होतो. उदा. मानवी वापरासाठी विकलेले मद्य, दोन लाखाहून अधिक रकमेचे सोने अथवा दागिने यांची विक्री. 50 लाखाहून अधिक रकमेचे स्थावर मालमत्तेचे व्यवहार.
तर टीसीएस कापून घेणाऱ्या व्यक्तीस कलेक्टर म्हणतात.
दोन्ही कर करदात्यांच्या वतीने सरकारकडे विहित मुदतीत जमा केले जातात. कापलेल्या टीडीएस बद्धल फॉर्म 16 आणि 16AA या स्वरूपात कापलेल्या कराचे प्रमाणपत्र कपातकर्त्याकडून करदात्यांस दिले जाते. फॉर्म 15 G किंवा H भरून दिल्यास करदेयतेची जबाबदारी कपातकर्त्यावर न येता करदात्यावर येते
टीसीएस कापणाऱ्या व्यक्तीने फॉर्म 27 D मध्ये कापलेल्या कराचे प्रमाणपत्र करदात्यास दिले पाहिजे. तो कमी दराने कापवायचा असल्यास फॉर्म 13 भरून त्यावर सक्षम आयकर अधिकाऱ्यांची मान्यता घेतल्यास कमी दराने अथवा शून्यदराने कपात करता येईल.
अशा रीतीने मुळातून करकपात केली जात असली तरी त्याचा करदात्यांच्या एकूण करदेयतेशी संबध असेलच असे नाही. जर व्यक्तीचे एकूण करपात्र उत्पन्न विहित मर्यादेहून कमी असल्यास विवरणपत्र भरून दिल्यावर सदर करदात्यांला कर परत केला जातो. थोडक्यात करदेयता आणि करकपात या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.
पगारदार व्यक्तींचा अन्य ठिकाणी मुळातून कर कापला गेल्याने त्याची एकंदर करदेयता कमी होत असेल तर तशी कर सवलत पगारातून मिळायला हवी अशी करदात्यांची मागणी होती. त्यास प्रतिसाद म्हणून 23 जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पगारदारांच्या अन्य उत्पन्नातून मुळातून कर कपात झाली असल्यास त्याचा तपशील आपल्या मालकास दिल्यास त्या उत्पन्नाचा आणि पगाराचा एकत्रित विचार करून कर कपात केली जाईल असे जाहीर केले होते. त्यामुळे मुळातून कापून घेतलेला कर आपोआपच समायोजित होईल असा यामागचा हेतू आहे.
यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष करनियंत्रण मंडळाने फॉर्म 12BAA चा नमुना 15 ऑक्टोबर 2024 रोजी प्रकाशित केला आहे सदर फॉर्म भरून दिल्यास त्याचा विचार करून मालकाकडून त्याप्रमाणे कर आकारणी करणे बंधनकारक आहे. या फॉर्ममध्ये करदात्याचे नाव, पॅन, कर निर्धारण वर्ष यासह,
टीडीएसच्या संदर्भात-
●कोणत्या कलमानुसार कर आकारणी केली
●कपातकर्त्याचे नाव, पत्ता आणि टॅन क्रमांक
●कापलेला कर
●मिळालेले उत्पन्न
ही माहिती करदात्याने भरायची आहे. तर,
टीसीएसच्या संदर्भात-
●कोणत्या कलमाखाली कर आकारणी केली
●कलेक्टरचे नाव, पत्ता आणि टॅन क्रमांक
●कापलेला कर
●झालेला व्यवहार अथवा दिलेल्या सेवेचा तपशील
याशिवाय टीडीएस/ टीसीएस इतर आवश्यक तपशील आणि घराच्या संबंधित तोटा म्हणजे गृह कर्जावरील दिलेल्या व्याजाचा तपशील असल्यास द्यायचा आहे.
आजपर्यंत मालकवर्ग दिलेला पगार, भत्ते आणि नोकराने केलेली पगारातील व बाहेरील गुंतवणूक यांचा विचार करून करकपात करीत असत आता टीडीएस आणि टीसीएस मधील वरील फॉर्म नुसार दिलेला तपशील विचारात घेऊन करकपात करणार असल्याने अनेकांची एकंदरीत करदेयता कमी होऊ शकते तरी विहित नमुन्यात आणि निर्धारित कालावधीत नोकरदारांनी फॉर्म 12 BAA भरून देणे हिताचे आहे. शासकीय राजपत्रात प्रकाशित झालेला फॉर्मचा नमुना सोबत जोडला आहे तो पहावा.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत असून लेखातील मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 25 ऑक्टोबर 2024 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 18 October 2024
स्कँल्पिंग
#स्कँल्पिंग
शेअरबाजारात वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूकदार आहेत ते करीत असलेल्या सर्व व्यवहारांना ट्रेडिंग असे म्हटले जाते. त्यांच्या गुंतवणूक करण्याच्या कालावधीवरून ते अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार आहेत असे समजले जाते. या कालावधीची निश्चित सीमारेषा नाही. आयकर कायद्यानुसार शेअर्समध्ये किमान एक दिवस ते एक वर्ष या कालावधीकरता केलेली गुंतवणूक अल्पकालीन तर त्याहून अधिक कालावधीसाठी केलेली गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणूक समजण्यात येते त्यातून मिळालेला नफा-तोटा हा भांडवली नफा-तोटा समजण्यात येऊन तो व्यक्तीच्या उत्पन्नात मिळवला जाऊन त्यावर कर द्यावा लागतो. लोकांनी अशी गुंतवणूक करावी त्यामुळे अधिकाधिक लोक भांडवल बाजाराकडे आकर्षित व्हावेत यासाठी नियमित करदरांच्या ऐवजी विशेष दराने कर आकारणी होते. या पद्धतीने तुमचा निव्वळ भांडवली नफा कितीही असला तर तो दीर्घकालीन असेल तर एक लाख पंचवीस हजारावरील सरसकट दराने 12.5% कर द्यावा लागतो तर अल्पकालीन भांडवली नफ्यावर सरसकट 20% दराने कर आकारणी केली जाते. यामुळे अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्ती हिशोबी जोखीम (Calculated Risk) घेऊन भांडवल बाजारात गुंतवणूक करण्यासाठी तयार होतात. व्यक्ती जितकी जास्त जोखीम घेऊ शकते त्यावर नफा किंवा नुकसान कमीअधिक होण्याची शक्यता असते.
याशिवाय वेगळ्या पद्धतीने ट्रेडिंग करता येते. असे ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूकदारांना डे ट्रेडर्स म्हटले जाते. ते आपले व्यवहार त्याच दिवसात पूर्ण करतात. यांचा गुंतवणूक करण्याचा कालावधी हा सेकंदाचा काही भाग ते पूर्ण कामकाज दिवस असा असतो. भावातील फरकाचा लाभ उठवून कमीतकमी वेळात अल्प भांडवलावर अधिक नफा मिळवणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. यातून मिळालेले उत्पन्न हे अन्य मार्गाने मिळालेले उत्पन्न समजून त्यावर नियमितदराने कर आकारणी होते. एखाद्या व्यक्तीचा शेअर्स खरेदीविक्री करणे हाच व्यवसाय असल्यास त्यास कायद्याने उपलब्ध असलेल्या व्यावसायिक खर्चाच्या वजावटी घेता येतात. पूर्वी या संबंधात अनेक वाद निर्माण झाल्याने त्यावर उपाय म्हणून शेअर खरेदी विक्री करणे ही गुंतवणूक आहे की व्यवसाय हे जाहीर करण्याचे स्वातंत्र्य करदात्यांना मिळाले आहे.
आज आपण स्कँल्पिंग म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत ही एक डे ट्रेडिंगचीच पद्धत आहे. ज्या ज्या मालमत्ता प्रकारात उदा शेअर्स, इंडेक्स, कमोडिटी, करन्सी डे ट्रेडिंग होऊ शकते त्यात स्कँल्पिंग करता येते येथे सोयीसाठी शेअर्स विचारात घेतले आहेत. भावात पडणाऱ्या छोट्याशा फरकाचा लाभ डे ट्रेडर्स कडून मिळवला जातो. एका किंवा त्याहून अधिक कंपन्यांच्या शेअर्सचे अनेक छोटे छोटे ट्रेंड दिवसभरात घेतले जातात. सकाळी मार्केट चालू झाल्यावर शेअर्स खरेदी अथवा विक्री करून आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत किंवा पोझिशन स्क्वेअर अप करण्याच्या वेळेपर्यंत अथवा स्टॉपलॉस हिट होईपर्यंत वाट पाहणे त्यांना मान्य असते. आपला व्यवहार ते चुकूनही डिलिव्हरीमध्ये बदलून घेत नाहीत. त्यांचे टार्गेट आणि स्टॉपलॉस हे अन्य डे ट्रेडर्सच्या तुलनेत अत्यंत छोटे असतात. त्याचे गणिताचे ज्ञान पक्के असते भावात किती फरक पडला की आपल्याला सर्व खर्च वजा जाऊन फायदा होईल (Break even) अथवा तोटा होईल हे त्यांना निश्चित माहिती असते. या पद्धतीचे फायदे तोटे असे-
■फायदे-
●मोठ्या प्रमाणात नफा होण्याची शक्यता- स्कँल्पिंगमध्ये व्यवहार संख्या अधिक असल्याने जरी प्रत्येक व्यवहारात कमी नफा असला तरी अनेक व्यवहारांचा नफा मोठा असण्याची शक्यता असते.
●व्यवहार जोखीम- स्कँल्पिंग व्यवहार ट्रेडर्स त्याच्याकडील पैसे त्यावर व्यवहार किती प्रमाणात करता येतील हे जाणत असल्याने आपल्या मर्यादा जाणत असतात त्यामुळे जे काही नफा नुकसान होईल ते आजच हे त्यांना माहिती असते यासंबंधी व्यवहार जोखीम अत्यंत कमी असते.
●व्यवहारातली लवचिकता- स्कँल्पर बाजाराच्या बारीकसारीक हालचाली टिपत असल्याने बाजाराच्या दिशेनुसार ट्रेंड घेतात, टार्गेट बदलतात किंवा स्टॉपलॉस बुक करतात.
●बाजाराकडे नाविन्यपूर्ण पद्धतीने पहाण्याची दृष्टी- स्कँल्पिंग करणारे ट्रेडर्स बाजार दिशेवर लक्ष ठेवीत असल्याने, सरावाने त्यांची नजर तयार होते आणि ते सूक्ष्म फरक टिपू शकतात. त्यामुळे नुसती नजर टाकून काय होऊ शकेल हे त्यांना सहज समजते.
◆तोटे-
●जादा जोखीम- स्कँल्पिंग करणारे हे खूप मोठ्या संख्येने ट्रेडिंग करीत असल्याने व्यवहार त्यांच्या विरोधात गेल्यास अधिक नुकसान होऊ शकते.
●ब्रोकरेज आणि अन्य चार्जेस- त्यांना मिळू शकणाऱ्या नफ्याशी तुलना करता जास्त मोठ्या संख्येने व्यवहार होत असल्याने दलाली आणि अन्य चार्जेस व्यवहाराच्या तुलनेने अधिक द्यावे लागतात.
●जास्त वेळ घेणारे आणि निर्णय तत्परता- स्कँल्पिंग करताना पूर्ण वेळ बाजार हालचालींवर लक्ष ठेवावे लागते आणि त्यातील बदलानुसार झटपट निर्णय घ्यावे लागतात.
●मानसिक ताण- स्कँल्पिंग करणाऱ्या व्यक्तींना झटपट निर्णय घेण्याच्या नादात मानसिक ताण येऊ शकतो.
●बाजारातील अस्थिरता- बाजारात एकाच वेळी अनेक मध्यस्थ काम करीत असल्याने बाजार सातत्याने वरखाली होत असतो. जास्त अस्थिरता ट्रेडर्सना अनुकूल असली तरी त्यात निर्णय चुकण्याची शक्यता अधिक असते.
●तरलतेचा अभाव- काही शेअर्स कमी तरल असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यवहार करण्याची इच्छा असली तरी तसे करता येत नाही. त्यामुळे अपेक्षित किंमत मिळू शकत नाही.
■स्कँल्पिंगची वैशिष्ट्ये
●अत्यल्प व्यवहार कालावधी - हे व्यवहार काही सेकंद ते काही मिनिटे या कालावधीचे असतात.
●अधिक व्यवहार वारंवारता- कालावधी कमी असल्याने एक वा अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये वारंवार एकसारखे अधिक व्यवहार केले जातात.
●अत्यल्प नफा उद्दिष्ट - यातील बहुतेक सर्व व्यवहार अत्यल्प नफा मिळवण्यासाठी केले जातात.
●तांत्रिक विश्लेषणाचा वापर - स्कँल्पिंग व्यवहार करताना तांत्रिक विश्लेषण उपयोगी पडत असल्याने स्कँल्पर त्याचा प्रामुख्याने वापर करतात.
■लोकप्रिय स्कँल्पिंग तंत्रे
●रेंज ट्रेडिंग - शेअर्सची किंमत पातळी ओळखून त्याच दरम्यान व्यवहार करणे.
●ट्रेंड फॉलोइंग - शेअर्सचा कल ओळखून त्यानुसार व्यवहार करणे.
●ब्रेकआउट ट्रेडिंग - अचानक होणारे भावातील बदल ओळखून व्यवहार करणे
●मिन रिव्हर्शन - शेअर्सची किंमत कालांतराने सरासरी किमतीत बदलते ते ओळखून व्यवहार करणे
स्कँल्पिंगसाठी आवश्यक कौशल्ये
●बाजार ज्ञान - स्कँल्पर म्हणून काम करण्यासाठी बाजाराचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे.
●तांत्रिक विश्लेषण - निर्णय घेण्यासाठी विविध तांत्रिक गोष्टींचा विचार केला जात असल्याने या विषयाचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
●जोखीम व्यवस्थापन - कोणत्याही गुंतवणूकीसाठी हे आवश्यक असल्याने स्कँल्पिंगसाठी ही त्याची गरज आहे.
●शिस्त - आपल्या गुंतवणूक धोरणाचे तंतोतंत पालन करण्याची शिस्त अंगीकारायला हवी.
●तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता - भाव क्षणार्धात वरखाली होत असल्याने निर्णय झटपट घेण्याचे कौशल्य असायला हवे. यात एक चूक म्हणजे आर्थिक नुकसानच.
स्कँल्पिंग सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी
●योग्य ट्रेडिंग प्लँटफॉर्म - किमान ब्रोकरेज लागेल ज्यामुळे व्यवहार खर्च कमी होईल असा ब्रोकर निवडणे.
●स्निश्चित असा ट्रेडिंग प्लॅन- व्यवहार करताना कोणत्या पातळीवर करायचा स्टॉप लॉस एन्ट्री एक्सिट कुठे घेणार या बद्धल संदिग्धता नसावी.
●सराव मंच - सरावासाठी अनेक ट्रेडिंग प्लँटफॉर्म उपलब्ध आहेत यात प्रत्यक्ष पैशांशी संबंध येत नसल्याने व्यवहार करण्यात कोणताही धोका नाही
●व्यवहार पातळी- सुरुवातीस छोटे आणि कमी संख्येने व्यवहार करून त्यांचे प्रमाण वाढवावे.
डे ट्रेडिंग हे दुय्यम दर्जाचे आहे असे गुंतवणूक तज्ञ समजतात, असे असले तरी ही एक गुंतवणूक करण्याची सर्वमान्य पद्धत आहे. डे ट्रेडर्स असल्यामुळे बाजाराचा भावफलक सतत हलता राहतो, व्यवहार संख्या वाढते. शेअरबाजारात बहुसंख्य व्यवहार याच प्रकारात होतात. सरकारला कर मिळतो. स्कँल्पिंग करण्यासाठी जोखीम - प्रतिफळ संबध (Risk Reward Ratio) याचबरोबर ट्रेडिंगवर समर्पितता (Delegation), शिस्त (Discipline) आणि सतत शिकत राहण्याची इच्छाशक्ती असण्याची गरज आहे.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक समजावी.)
18 ऑक्टोबर 2024 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
Friday, 11 October 2024
काही आर्थिक संज्ञा भाग 2
#काही_आर्थिक_संज्ञा_भाग_2
आर्थिक विषयाची किमान माहिती व्हावी म्हणून काही प्राथमिक संकल्पना आपल्याला माहिती असाव्यात असे वाटते मागील लेखात त्यापैकी मालमत्ता(अँसेट), वार्षिक अहवाल (अँन्युअल स्टेटमेंट), ताळेबंद (जमाखर्च), उच्च आर्थिक मूल्य असलेले समभाग (ब्लुचिप शेअर्स), रोखे (बॉण्ड), भांडवली नफा (कॅपिटल गेन), रोख प्रवाह (कॅश फ्लो) , पत (क्रेडिट) या संकल्पना थोडक्यात माहिती करून घेतल्या. आता आणखी काही संकल्पना समजून घेऊयात.
★घसारा निधी -(Depression)
जमीन वगळता सर्व स्थिर मालमत्ता म्हणजे इमारत, यंत्रसामुग्री, फर्निचर, उपकरणे यांच्या किमतीत सातत्याने घट होत असते. या मालमत्ता वापरण्यास अयोग्य झाल्यावर त्याऐवजी नव्या मालमत्ता खरेदी कराव्या लागतात. यासाठी मूळ मालमत्तेच्या कमी झालेल्या मूल्याएवढी तजवीज करावी लागते त्यास घसारा असे म्हणतात. घसारा मोजण्यासाठी सदर मालमत्ता उपयोगी पडण्याचा कालावधी, काही कालावधीनंतर मालमत्तेची विक्री केली असता येऊ शकणारी किंमत, नवीन मालमत्तेचीच्या खरेदी करण्यासाठी लागणारी सर्व रक्कम ज्यात वाहतूक खर्च, स्थापना खर्च, कर इत्यादी सर्वांचा विचार केला जातो. केवळ वस्तूच्या वापरामुळे नाही तर तंत्रज्ञानातील बदलामुळेही एखादी वापरातील वस्तू कालबाह्य होऊन नवीन वस्तू घ्यावी लागते यासाठी काही तरतूद करून ठेवावी लागते. घसारा हा खर्च समजला जाऊन तो कोणत्या वस्तूसाठी किती प्रमाणात घेतला जावा या विषयी कायद्यात असलेल्या तरतुदी प्रमाणेच रक्कम बाजूला ठेवावी लागते.
★समभाग-( Shares)
व्यवसायाची उभारणी करण्यासाठी मोठ्या भांडवल लागते. हे भांडवल प्रवर्तक, जनता आणि बाजारातून कर्ज घेऊन उभे केले जाते. कर्जासाठी तारण ठेवावे लागते किंवा हमीदार लागतो याशिवाय त्यावर व्याजही द्यावे लागत असल्याने देयता वाढते. याउलट प्रवर्तक, जनता, गुंतवणूक कंपन्या यांच्याकडून भांडवल गोळा केल्यास त्यामुळे देयता न वाढल्याने कमी दरात मोठी रक्कम भांडवल रूपाने उपलब्ध होते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीच्या मालकांच्या मालकीचा भांडवलाचा एक भाग. यावर कोणत्याही निश्चित परताव्याची हमी नसते. दुय्यम बाजारात हे भाग विकता येतात किंवा विकत घेता येतात. त्यामुळे त्यात बऱ्यापैकी तरलता असते. कंपनीची मालमत्ता आणि दायित्वे माहिती असल्यास मालमत्तेतून दायित्वे वजा केली असता येणारी रक्कम ही त्या समभागांची एकूण रक्कम असते. कंपनी कायद्यातील या तरतुदीमुळे व्यावसायिकांना कमी खर्चात भांडवल उपलब्ध होते तर गुंतवणूकदारांना त्यांनी स्वीकारलेल्या जोखमीच्या तुलनेत कोणत्याही अतिरिक्त देयतेशिवाय आकर्षक परतावा मिळण्याची शक्यता असते.
★प्रति समभाग कमाई-(Earning per share)
समभाग (शेअर्स) हा कंपनीच्या मालकीचे प्रतिनिधित्व करीत असल्याने कंपनीस झालेल्या निव्वळ नफ्यातून कर देऊन झाल्यावर प्रति समभाग किती कमाई खाली याची माहिती देणारे आर्थिक गुणोत्तर आहे. प्रति समभाग उच्च उत्पन्न मिळवणाऱ्या कंपन्यांची गणना सुदृढ कंपन्यात होते या कंपन्या आपल्या भागधारकांना सातत्याने लाभांश, हक्कभाग आणि बोनस शेअर्स देत असतात साहजिकच या कंपन्या आपल्याकडे असाव्यात असे अनेकांना वाटल्याने त्यांना अधिक मागणी असते त्यामुळेच त्यांचा बाजारभावही अधिक असतो.
★प्रारंभिक भाग विक्री-(Initial Public Offer)
बाजारात प्रथमच एखाद्या खाजगी कंपनीस सार्वजनिक करून शेअर्स उपलब्ध झाल्याचे आपण वाचतो या प्रक्रियेत गुंतवणूकदारांना कंपनीचे समभाग नव्याने उपलब्ध करून दिले जातात आणि अथवा प्रवर्तकांकडून काही भाग विक्रीस काढले जातात हे भाव सममूल्याने अथवा अधिभार देऊन दिले जातात यात अधिभार किती घ्यावा हे कंपनीने नेमलेल्या लीड मॅनेजरच्या सल्ल्याने ठरवण्यात येते. कोणत्या कंपनीने अधिमूल्य किती घ्यावे यावर सध्या कोणतेही बंधन नाही. बाजारात अस्तित्वात असलेल्या कंपनीने सर्वांसाठी शेअर्स विक्रीसाठी काढल्यास त्याला फॉलो ऑन ऑफर असे म्हटले जाते.
★आयकर विवरणपत्र-(Income Tax Returns)
सर्व मार्गाने मिळालेले एकूण उत्पन्न नवीन प्रणालीनुसार तीन लाखाहून अधिक अथवा जुन्या प्रणालीनुसार वयानुसार अडीच ते पाच लाखाहून अधिक असेल तर आपले सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाची मोजणी म्हणजेच व्यवसाय अगर पगाराचे उत्पन्न, मिळालेले व्याज, भांडवली नफा, घरभाडे असल्यास अन्य उत्पन्न याचा लागू असलेल्या प्रकारचा तपशीलवार फॉर्म भरून विशिष्ट मुदतीत एकूण उत्पन्न जाहीर करावे लागते. त्या फॉर्मला आयकर विवरणपत्र असे म्हणतात. हा फार्म भरणे आणि कर भरणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. यामुळे आपले निश्चित उत्पन्न किती आहे यास पुष्टी मिळते जी कर्ज घेणे जामीन राहणे यासाठी आवश्यक आहे. हाच फार्म वेळेत भरून अधिक कापलेला कर आपल्याला परत मिळवता येतो.
★देयता-(Liabilities)
देयता म्हणजे व्यवसायाने घेतलेले कर्ज अथवा इतरांकडून प्राप्त केलेले फायदे म्हणजे कंपनीने जे कर्ज घेतले आहे त्यावरील व्याज देणे दिलेल्या मुदतीत त्याची परतफेड करणे. भांडवली गुंतवणूक करणाऱ्याना त्याचा अंशतः मोबदला देणे ही तिची जबाबदारी आहे त्यास देयता असे म्हणतात. मालमत्ता आणि देयता यांची तुलना करून कंपनीची आर्थिक स्थिती कधी आहे याची सर्वसाधारण कल्पना येते. देयता म्हणजे देणे देण्याची जबाबदारी ही भवितव्याचा विचार करून निर्माण केली जाते. देणे देण्याच्या कालावधीवरून अल्पकालीन दायित्वे आणि दीर्घकालीन दायित्वे असे वर्गीकरण करता येईल याशिवाय कधीकधी अचानकपणे खर्च करावा लागल्यास त्यास आकस्मिक दायित्व असे म्हणता येईल.
★तरलता- (Liquidity)
बाजारभावावर फारसा प्रभाव न पडता ज्या ज्या मालमत्तेचे रोखीत सहज रूपांतर करता येते. त्या क्षमतेस तरलता असे म्हणता येईल. बाजार तरलता आणि लेखा तरलता असे तरलतेचे दोन प्रकार आहेत. देयतेपेक्षा मालमत्ता अधिक असणे आणि त्याचे त्वरित पैशात रूपांतर करता येण्याच्या क्षमतेवर कंपनीची सुदृढता अवलंबून असते. दीर्घकालीन कर्जे अशा कंपनीस सहज फेडता येतात.
★बाजारमूल्य- (Market Capital)
एखाद्या कंपनीच्या बाजारात उपलब्ध शेअर्सना कंपनीच्या बाजारभावाने गुणले असता त्या कंपनीचे बाजारमूल्य समजते, त्यावरून तिचे मूल्यांकन करता येतं. कंपनीची मोठ्या आकाराची लार्ज कॅप, मध्यम आकाराची मिड कॅप अथवा लहान आकाराची स्मॉल कॅप कंपनी अशी विभागणी करण्यास याची मदत होते. पूर्वी बाजारमूल्य मर्यादेवर अशी विभागणी केली जात असे आता नोंदणीकृत सर्व कंपन्यांचे बाजारमूल्य शोधून त्यांची क्रमवारी लावतात. सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या पहिल्या शंभर कंपन्या या मोठ्या कंपन्या समजतात. क्रमवारीतील एकशेएक ते दोनशे पन्नास पर्यंतच्या कंपन्या या मध्यम कंपन्या समजण्यात येतात तर इतर सर्व कंपन्यांचे बाजारमूल्य कितीही असले तरी त्यांना छोट्या कंपन्या समजण्यात येते.
★परस्पर निधी- (Mutual Funds)
विशिष्ट ध्येयाने अनेक लोकांची एकत्रितपणे गुंतवणूक करण्यासाठी निर्माण केलेला निधी. भांडवल बाजारात व्यक्ती म्हणून गुंतवणूक करताना अनेक मर्यादा येतात यावर मात करून एकत्रित गुंतवणूक केल्यास जोखीम कमी होते. ही पूर्णपणे पारदर्शक प्रक्रिया असून यामुळे बचतीची सवय लागून थोडा संयम बाळगल्यास आकर्षक परतावा मिळू शकतो. थांबण्याची तयारी असेल तर निश्चित फायदा होतो. दीर्घकाळ थांबल्यास चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो. आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारात या योजना आहेत. अगदी दरमहा पाचशे रुपये त्यात टाकून सुरुवात करू शकतो त्यायोगे आपली सर्व स्वप्ने ही केवळ इच्छा न राहता लवकरच पूर्ण होऊ शकतात. शेअर्स, बॉण्ड, सोनेचांदी, इंडेक्स असे अनेक मालमत्ता प्रकार स्वतंत्रपणे अथवा मिश्रणात त्याच्याकडे उपलब्ध आहेत. ज्याची जी गरज त्यासाठी कोणतीतरी योजना असे त्यांचे स्वरूप आहे. याबाबत पुरेशी जागरूकता निर्माण झाल्याने या योजनांत सातत्याने गुंतवणूक येत आहे.
★सांपत्तिक स्थिती- (Netwarth)
व्यक्ती अथवा संस्था यांच्या एकूण मालमत्तेच्या किमतीतून देयता वजा केल्यास खरीखुरी सांपत्तिक स्थिती समजून येते. देयतेच्या तुलनेत मालमत्तेचे मूल्य अधिक असल्यास तुमची सांपत्तिक स्थिती उत्तम समजली जाते. मालमत्तेच्या तुलनेत देयता अधिक असल्यास आपण धोकादायक परिस्थितीत आहोत असे समजावे. राखीव फंड शिलकीत असल्यास त्यातून अधिक व्याजदराचे कर्ज प्रथम फेडावे. असा फंड नसेल तर मालमत्तेत वाढ होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत.
★गुंतवणुकीवरील परतावा- (Return On Investment)
यावरून गुंतवणूकीचे मूल्यमापन करता येते. ते टक्केवारीत व्यक्त करतात. ही गणना सकारात्मक असेल तर आपली गुंतवणूक योग्य कार्य करीत आहे असे समजले जाते तर नकारात्मक असेल तर त्याचा अर्थ असा होईल की गुंतवणुकीतून मिळणारा परतावा तुमची अपेक्षित देयतेची जबाबदारी पूर्ण करण्यास कमी पडत आहे. असा परतावा काढण्यासाठी गुंतवणूकीतून मिळालेले निव्वळ उत्पन्न आणि गुंतवणूक रक्कम माहिती असणे गरजेचे आहे. ही गणना करण्याचे प्राथमिक कारण म्हणजे
पैसे योग्य प्रकारे गुंतवले जात आहेत याचा अंदाज बांधणे. त्यानुसार गुंतवणूकीचे पुनरावलोकन करून आवश्यक त्यामध्ये योग्य ते बदल करणे.
★अस्थिरता- (Volatility)
आपण बाजारात केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य हे प्रामुख्याने मागणी आणि पुरवठा यातील यातील फरकामुळे त्यात सातत्याने बदल होत असतो याशिवाय सरकारी धोरण, भु राजकिय परिस्थिती, सट्टेबाजी, अफवा या सारख्या अनेक गोष्टींमुळे भाव कमी अधिक होत असतात असे असले तरी कंपनीच्या कामगिरीवर ते कमी अधिक होतात अथवा स्थिरावतात. गुंतवणूकीमध्ये असलेल्या जोखीमीमध्ये बाजारातील अस्थिरतेचा समावेश होतो.
आर्थिक संकल्पना समजण्यासाठी थोडासा वेळ दिलात तर त्या सहज समजू शकतात. आपल्या आर्थिक सल्लागाराशी यासंबंधी नियमित चर्चा करीत रहा या विषयावरील उत्तमोत्तम माहिती समाज माध्यमांवर आज उपलब्ध आहे. आपल्या आर्थिक जाणिवा समृद्ध होण्यासाठी त्याचा नक्की उपयोग होईल. अलीकडेच एका खाजगी कार्यक्रमात सुप्रसिद्ध अर्थतज्ञ केदार ओक यांनी गुंतवणूकदारांना मार्गदर्शनपर संदेश देताना चार “वा” लक्षात ठेवा असं सांगितलं होतं. ते चार “वा” असे-
1 वाचवा - आपले आर्थिक नुकसान टाळा
2 वाढवा - वाजवी नफा मिळवा
3 वापरा - मिळालेल्या पैशांचा सुयोग्य उपभोग घ्या
4 वाटा - सामाजिक जाणिव ठेवून गरजूंना मदतीचा हात पुढे करा.
या चारही वांची वाहवा करीत त्यांनी सांगितलेल्या सूचना लक्षात ठेवुयात. (संपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक समजावी.)
11 ऑक्टोबर 2024 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम येथे पूर्वप्रकाशित.
Friday, 4 October 2024
काही आर्थिक संज्ञा भाग 1
#काही_आर्थिक_संज्ञा_भाग_1
भांडवल बाजारात व्यवहार करताना अनेक छोट्या मोठ्या संकल्पनांचा उल्लेख होतो यातील सर्वच संकल्पना सर्वाना माहीत असतातच असे नाही. तरीही जुजबी ज्ञान म्हणून काही संकल्पना आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे म्हणून त्यातील काही महत्वाच्या संकल्पना थोडक्यात समजून घेऊयात.
★मालमत्ता (Asset)-
मालमत्ता हे केवळ कंपनीच्या मालकीचे आर्थिक मूल्य असलेले संसाधन आहे. ज्याचा कंपनीच्या कार्यात उपयोग होतो त्यातून महसूल निर्माण होतो. यामध्ये जमीन, इमारत, इन्व्हेंटरी यासारख्या मूर्त वस्तू अथवा पेटंट ट्रेडमार्क बौद्धिक संपत्ती यासारख्या अमूर्त गोष्टींचा समावेश होतो. कंपनीचे मूल्य वाढवण्यासाठी म्हणजे कंपनीच्या कार्यचालनासाठी रोखता प्रवाह आवश्यक असून त्यासाठी मालमत्ता तयार केली जाते अथवा विकत घेतली जाते. एखादी गोष्ट मालमत्ता आहे की नाही हे ठरवण्याची सोपी पद्धत म्हणजे ती संस्थेच्या मालकीची असायला हवी किंवा नियंत्रणात असावी तिचे मूल्य असायला हवं आणि भविष्यात त्यातून उत्पन्न निर्माण करण्याची क्षमता असली पाहिजे. त्यामुळे विक्री वाढ होईल अथवा उत्पादन खर्चही कमी होऊ शकेल. मालमत्तेची ओळख आणि प्रभावी व्यवस्थापन हे समजून घेणे आवश्यक आहे त्यामुळे कंपनीच्या आर्थिक आरोग्याचे मूल्यांकन म्हणजेच भविष्यातील वाढ आणि स्थिरता समजण्यास मदत होते.
ढोबळमानाने मालमत्तेचे तीन प्रकारात वर्गीकरण करता येईल.
●परिवर्तनीयता- मालमत्तेचे रोख रकमेत तात्काळ रूपांतर करता येण्याच्या क्षमतेवरून त्याचे परिवर्तनीय मालमत्ता आणि अपरिवर्तनीय मालमत्ता असे वर्गीकरण करता येईल. कच्चा माल, पक्का माल, खात्यातील शिल्लक, रोखे यासारख्या मालमत्ता परिवर्तनीय आहेत. तर जागा मशिनरी यासारख्या मालमत्ता अपरिवर्तनीय म्हणता येतील कारण त्यांचे सहजासहजी पैशांत रूपांतरण करता येत नाही.
●भौतिक अस्तीत्व- मालमत्तेच्या भौतिक अस्तीत्वावरून त्याचे मूर्त मालमत्ता आणि अमूर्त मालमत्ता असे वर्गीकरण करता येईल. एकाधिकार (पेटंट) व्यापार चिन्ह (ट्रेडमार्क) यांना अमूर्त मालमत्ता असे म्हणता येईल.
●वापरानुसार- यामध्ये मालमत्तेचे वर्गीकरण त्याच्या कार्यानुसार अथवा व्यवसायाच्या उद्देशानुसार केले जाते.
कंपनीचा लेखाजोखा समजण्यासाठी मालमत्ता नेहमी सकारात्मक योगदान देत असते.
कंपनीच्या मालमत्तेचा अहवाल आर्थिक विवरणपत्रात दिला जातो तो भागधारकांना पाठवून सर्वसाधारण जनतेच्या माहितीसाठी कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतो. या अहवालात मालमत्ता दोन प्रकारात विभागली जाते.
●चालू मालमत्ता-
यामध्ये वर्षभराच्या आत वापरात येणाऱ्या किंवा रोखीत सहज रूपांतर होऊ शकणाऱ्या सर्व मालमत्ताचा समावेश असतो उदा रोख रक्कम, आधीच केलेले काही खर्च, इनव्हेंटरी, धारण केलेल्या सिक्युरिटीज
●चालू नसलेल्या मालमत्ता-
यामध्ये दीर्घकालीन आर्थिक संसाधने येतात उदा इमारत, जमीन, पेटंट, कॉपीराईट, गुडविल, दीर्घकालीन गुंतवणूक यांचा समावेश होतो.
★वार्षिक अहवाल (Anual Report) -
वार्षिक अहवाल हा कंपनीची सर्वसमावेशक माहिती देणारा दस्त आहे. गुंतवणूकदारांना संदर्भ म्हणून याचा उपयोग होतो. अहवालाचा हेतू वर्षभरातील कंपनीच्या स्थितीचे सार्वजनिक प्रकटीकरण हा असून त्यामुळे हितसंबंधितांना पारदर्शक पद्धतीने कंपनीची स्थिती समजू शकते. वार्षिक अहवालात सर्वसाधारणपणे खालील माहिती असते.
●अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालकांचे कंपनी विषयी सर्वसाधारण माहिती देणारे पत्र.
●कंपनीची सर्वसामान्य स्थिती.
● वर्षातील आर्थिक विषयावरील ठळक माहिती.
●वर्षभरातील आव्हाने त्यावर योजलेले किंवा प्रस्तावित उपाय.
●व्यवस्थापणाविषयी चर्चा आणि त्यांचे विश्लेषण भविष्यातील ध्येयधोरणे.
●नफा तोटा पत्रक.
●आर्थिक बाबींची सारांश आणि मागील वर्षाशी तुलना.
हा अहवाल कर्मचारी आणि ग्राहक या सर्वांसाठी उपलब्ध असतो.
★ताळेबंद (Balance sheet) -
यामध्ये कंपनीची एकूण मालमत्तेची तुलना ही भागधारकांचा फंड आणि कंपनीच्या दायित्वाशी करून दाखवली जाते. ते थोडेसे गुंतागुंतीचे आहे. ताळेबंद शिलकीचा नसेल तर काहीतरी गडबड असू शकते त्यातुन कंपनीच्या मालकीची मालमत्ता आणि देणी समजतात त्यावरून कंपनीचे आंतरिक मूल्य काय असेल ते समजते त्याची बाजाभावाशी तुलना करून गुंतवणूकी संबंधित योग्य निर्णय घेण्यास मदत होते.
★उच्च गुणवत्ता असलेली कंपनी (Blue Cheap Company) -
सातत्याने चांगली आर्थिक कामगिरीचा प्रदीर्घ इतिहास असणाऱ्या कंपनीस ब्लु चिप कंपनी समजण्यात येते. या कंपन्यांतील शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक कमी जोखमीची समजली जाते. कोणत्याही कारणाने बाजारात येणारे तीव्र उतार चढाव त्या झेलू शकतात तर बाजार चांगल्या स्थितीत असल्यास उच्च परतावा देऊ शकतात. यातील गुंतवणूक संयमी गुंतवणूकदारांची दीर्घकालीन उद्दिष्टे लवकर पूर्ण करण्यात मदत करतात. बाजार खूप खाली गेल्यास त्या तुलनेत यांच्या बाजार भावातील घसरण कमी असते एका विशिष्ट पातळीवर त्यांचे भाव स्थिर होऊन नंतर ते वाढतात.
★रोखे (Bonds) -
हे एक प्रकारचे कर्ज आहे. अनेकदा सर्वच प्रकारच्या कंपन्या भारत सरकार कर्जद्वारे भांडवल उभारतात. यावरील व्याजदर सर्वसामान्य गुंतवणूकीवरील व्याजदराहून अधिक असतो. सरकारने,सरकारी कंपन्यानी आणि ब्लुचिप कंपन्यांना निधी आवश्यक असेल तर भांडवल बाजारातून रोख्याच्या माध्यमातून स्पर्धात्मक दराने कर्ज मिळवता येते. हे रोखे विनिमय योग्य असल्याने ते गुंतवणूकदार दुय्यम बाजारात त्यांची खरेदी विक्री करू शकतात. स्टॉकपेक्ष्या कमी जोखीम, स्थिर परतावा, विनिमयता आणि करलाभ ही याची वैशिष्ट्ये म्हणता येतील तर शेअर्सच्या तुलनेत कमी तरलता, चलन वाढीचा धोका आणि क्रेडिट जोखीम यासारखे त्याचे तोटे सांगता येतील. कंपनीने व्याज अथवा मूळ रकमेचा परतावा न दिल्यास त्याविरुद्ध दाद मागण्याची सुलभ तरतूद सध्यातरी अस्तीत्वात नाही.
★भांडवली नफा /तोटा (Capital Gain /Loss )-
भांडवली मालमत्तेची विक्री केल्यावर मिळालेल्या रकमेतून गुंतवणूक रक्कम वजा केली असता पडणारा फरक म्हणजे भांडवली नफा तोटा होय. मालमत्ता प्रकार, धारण करण्याचा कालावधी, मालमत्ता प्रकार भांडवल बाजारात नोंदणी केलेला आहे किंवा नाही यावरून त्यावरील नफा तोटा हे इतर उत्पन्न समजायचे की अल्पकालीन अथवा दीर्घकालीन भांडवली नफा तोटा समजायचा ते अवलंबून आहे. त्याच दिवशी पडणारा भावातील फरक हा इतर उत्पन्न म्हणून मोजणी करून त्यावर नियमित दराने कर घ्यावा लागेल तर साधनानुसार (1 ते 2 वर्षातील) भांडवली नफा तोटा अल्पकालीन तर अन्य दीर्घकालीन समजण्यात येतो. अल्पकालीन नफ्यावर सरसकट 20% दराने कर आकारणी केली जाते तर दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 12.5% दराने कर द्यावा लागतो. शेअर बाजारात नोंदणीकृत दीर्घकालीन मालमत्तेवरील एक लाख पंचवीस हजारावरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कोणताही कर लागत नाही.
★रोख प्रवाह (Cash Flow) -
नावाप्रमाणेच याचा संबंध खेळत्या पैशाशी आहे. उद्योगात अनेकदा पैशांची देवाण घेवाण करावी लागते विविध ठिकाणांहून कच्चा माल खरेदी करावा लागतो तो उत्पादन ठिकाणापर्यंत पोहोचवणे, त्यावर प्रक्रिया करणे उत्पादन बनवणे, त्याची वर्गवारी करणे, त्यासाठी ग्राहक शोधणे त्याच्याकडे माल पोहोचवणे यामध्ये निश्चित कालावधीत व्यवहार पुरा करावा लागतो. संबंधिताना ठरलेल्या वेळी त्यांची रक्कम द्यावी लागते, कामगारांचे पगार , वीज बिल यासारखे नियमित खर्च करावे लागतात. विक्री केलेल्या मालाच्या पैशांची वेळेत वसुली करावी लागते उधारी लांबल्यास पर्यायी व्यवस्था करावी लागते ती न केल्यास उद्योग पूर्ण कार्यक्षम पद्धतीने चालू शकत नाही. रोख प्रवाह हा उद्योगात कुठून कोणत्या कालावधीत कसे पैसे आले आणि कसे खर्च झाले याचा आरसा असतो त्यावरून कंपनीचे आर्थिक आरोग्य समजते सकारात्मक रोखता प्रवाह तुमच्या मालमत्तेतील वाढ दर्शवतो आणि निश्चित ध्येयाकडे वाटचाल करीत असल्याचे सूचित करतो.
★बाजारातील पत (Credit)-
आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात क्रेडिट हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो परंतु हा सावकार आणि कर्जदार यांच्यातील कराराच्या तरतुदीचा भाग आहे. यात कर्ज घेतलेल्या रकमेवरील व्याजाचा समावेश असू अथवा नसू शकतो. व्यवसायात अनेकदा क्रेडिट घ्यावे लागते तसेच द्यावेही लागते त्याची नियमानुसार फेड होत असेल तर आपोआपच तुमची विश्वासार्हता वाढते . तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी सहज उपलब्ध होऊ शकतात त्याचे पैसे कालांतराने दिले तरी चालतात. तसेच तुम्हालाही तुमच्या ग्राहकांवर विश्वास ठेवून उत्पादित माल द्यावा लागतो. यातून व्यवसाय वृद्धी होऊन स्नेह वाढू शकतो. अनेक वित्तीय संस्था तुमच्या या कर्जाचा लेखाजोखा ठेवतात. त्यातून व्यक्ती, संस्था यांची बाजारातील पत (क्रेडिट स्कोर) तयार होत असतो. (अपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत ह्या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
4 ऑक्टोबर 2024 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम येथे पूर्वप्रकाशीत.
Friday, 27 September 2024
एनपीएस वात्सल्य योजना
#एनपीएस_वात्सल्य_योजना
केवळ मुलांसाठी असलेल्या योजनांची संख्या मर्यादित आहे. म्युच्युअल फंडाच्या विविध मालमत्ता प्रकारांवर आधारित योजना आहेत. इन्शुरन्स कंपन्यांनी बचतीशी सांगड घालून आणलेल्या विविध योजना आहेत. मुलांच्या नावाने त्यांच्या पालकांना पीपीएफ खातेही उघडता येते. केवळ 10 वर्ष वयाच्या आतील मुलींसाठी त्यांचे पालक ‘सुकन्या समृद्धी योजना’ घेऊ शकतात. या सर्वच योजना या मुलांचे उच्च शिक्षण, लग्न, व्यवसायास भांडवल, भविष्यातील एकरकमी पैशांची गरज याचा विचार करून बनवल्या आहेत यातील प्रत्येक योजना वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांचे वेगवेगळे फायदेतोटे आहेत. पण मुलांचा त्याच्या निवृत्तीच्या नियोजनाएवढा दीर्घ विचार करून असलेली कोणतीही सरकार पुरस्कृत योजना नाही.
23 जुलै 2024 रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मुलांची दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा बळकट करणे आणि लवकर बचत करण्याची सवय लावणे या उद्देशाने सरकारकडून अशी योजना आणण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार अलीकडेच म्हणजे 18 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे योजनेचे माहितीपत्रक प्रकाशित करून औपचारिकरित्या ही योजना बाजारात आली असून ‘एनपीएस वात्सल्य’ असे तिचे नाव आहे. या योजनेचे व्यवस्थापन पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) मार्फत केले जाईल त्यांचा व्यवस्थापन खर्च अत्यंत कमी आहे. कोणतीही गुंतवणूक अधिक काळ केली तर त्याचा परतावा चक्रवाढ गतीने मिळतो हेच ध्यानात घेऊन म्युच्युअल फंडाप्रमाणे अप्रत्यक्षपणे शेअरबाजारात गुंतवणूक केल्याने दिर्घकाळात अधिक परतावा मिळेल. संपत्ती वृद्धिंगत होईल, जोखीम कमी होईल. हे यामागील प्रमुख सूत्र आहे.
या योजनेत पालक वार्षिक ₹1000/- जमा करू शकतात कमाल गुंतवणूकीवर कोणतीही मर्यादा नाही. यामुळे मुलांसाठी शिस्तबद्ध बचत करण्याची सवय वाढेल. पाल्य सज्ञान होइपर्यंत पालकांद्वारे ही योजना चालवली जाईल त्यानंतर या योजनेचे रूपांतर नियमित एनपीएस खात्यात किंवा नॉन एनपीएस योजनेत वर्ग करता येईल. खाते मुदत दीर्घ असल्याने या कालावधीत मोठी रक्कम जमा होऊन त्यात आकर्षक वाढ होईल त्यामुळेच सरकारी वचनबद्ध तेशी सुसंगत राहून एक सन्माननीय आर्थिक सुरक्षितता प्राप्त होऊ शकेल.
‘एनपीएस वात्सल्य’ योजनेचे खाते हे अल्पवयीन पाल्याच्या नावेच उघडण्यात येते सज्ञान होईपर्यत ते पालकामार्फत चालवले जात असले तरी त्याचा लाभार्थी पाल्यच असेल. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेलपमेंट अँथोरेटीकडील नोंदणीकृत पॉईंट ऑफ प्रेसेन्स मार्फत ते काढता येते. यात पोस्ट प्रमुख बँका, वित्तीय कंपन्या, पेन्शन फंड यांचा समावेश आहे. तेथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन खाते उघडण्याची सोय आहे. एनपीएस ट्रस्टकडून e एनपीएस खाते एनएसडीएल, कॅम, के फिनटेक येथे ऑनलाइन पद्धतीने उघडता येते तेथे ‘एनपीएस वात्सल्य’ खाते उघडता येईल.
खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, योजनेचे स्वरूप/
●अल्पवयीन पाल्याचा जन्मतारखेचा पुरावा
●पालकाचे ओळख आणि निवासाचा पुरावा
●पालकाचा पॅन किंवा फार्म 60 मधील घोषणापत्र
●पालक अनिवासी भारतीय परदेशी भारतीय नागरिक असल्यास पासपोर्ट आणि अल्पवयीन व्यक्तीचे एनआरइ किंवा एनआरओ खाते
●खाते उघडताना ₹1000/- जमा करणे गरजेचे असून दरवर्षी त्यात किमान ₹1000/- भरणे आवश्यक असून कोणतीही कमाल मर्यादा नाही.
●खाते उघडल्यावर एनपीएस प्रमाणेच एक स्थायी ओळख क्रमांक (PRAN) दिला जाईल. व्यवहार करण्यासाठी त्याचा वापर करावा लागेल.
●पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे नोंदलेल्या व्यवस्थापकांपैकी कोणत्याही एका व्यवस्थापकाची नेमणूक पालकास करावी लागेल.
●मालमत्ता कोणत्या पद्धतीने गुंतवावी त्याची निवड करावी लागेल. यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत.
◆समतोल गुंतवणूक पर्याय- यामध्ये 50% गुंतवणूक शेअर्समध्ये केली जाईल. जर एखाद्याने कोणताही पर्याय दिला नसेल तर त्याना हा पर्याय हवा आहे असे गृहीत धरले जाईल. (Modarate lifecycle Fund- LC-50)
◆सक्रिय गुंतवणूक पर्याय- यामध्ये पालकाच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार त्यांना 75% पर्यत गुंतवणूक शेरबाजार, 100% गुंतवणूक सरकारी रोखे किंवा 100% गुंतवणूक कंपनी रोख्यात करता येईल याशिवाय 5% गुंतवणूक इतर पर्यायी गुंतवणूक प्रकारात येईल.
◆स्थिर जोखीम गुंतवणूक पर्याय- या प्रकारात पालकांच्या जोखीम घेण्याच्या प्रकारानुसार शेअरबाजारात 75%(LC-75) , 50% (LC-50) , 25% (LC-25) गुंतवणूक करण्याचा निर्णय घेता येईल.
●पाल्याचा 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास खात्यात जमा रक्कम पालकास मिळेल. पालकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदारास ओळख आणि वास्तव्याचा पुरावा देऊन खाते चालवता येईल जर जोडीदार नसेल तर सक्षम न्यायालय ज्यास पालक म्हणून मान्यता देईल त्याला हे खाते पुढे चालू ठेवता येईल.
●18 वर्षे पूर्ण होण्याआधी यातील तीन वर्षे पूर्ण झालेल्या जमा रक्कमेच्या 25% रक्कम पाल्याचे शिक्षण, आजारपण यासारख्या कारणाने काढून घेता येईल. अशी संधी तीन वर्षांच्या अंतराने जास्तीत जास्त तिनदाच असेल.
●18 वर्षे पूर्ण झाल्यावर तीन पर्याय आहेत.
◆पाल्याचे नवे केवायसी देऊन सदर खाते एनपीएस टियर 1 मध्ये बदलून घेणे.
◆जमा रक्कम अडीच लाखाहून कमी असल्यास सर्व रक्कम काढून घेऊन खाते बंद करणे
◆जमा रक्कम अडीच लाखाहून अधिक असल्यास 20% रक्कम काढून उरलेल्या रकमेतून तेव्हा उपलब्ध असलेली पेन्शन योजना घेणे.
इ पोर्टलवर ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेचे खाते उघडण्याची प्रक्रिया-
पायरी 1: eNPS वेबसाइटला भेट द्या .
पायरी 2: खाली स्क्रोल करा आणि 'NPS वात्सल्य (अल्पवयीन)' टॅब अंतर्गत 'आता नोंदणी करा' पर्यायावर क्लिक करा.
पायरी 3: पालकाची जन्मतारीख, पॅन क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि ईमेल प्रविष्ट करा आणि 'नोंदणी सुरू करा' वर क्लिक करा.
पायरी 4: पालकाच्या मोबाईल नंबर आणि ईमेलवर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा.
पायरी 5: एकदा OTP सत्यापित झाल्यानंतर, स्क्रीनवर पोचपावती क्रमांक तयार केला जाईल. 'Continue' वर क्लिक करा.
पायरी 6: अल्पवयीन आणि पालकांचे तपशील प्रविष्ट करा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि 'पुष्टी करा' वर क्लिक करा.
पायरी 7: रु. 1,000 चे प्रारंभिक योगदान द्या.
पायरी 8: PRAN जनरेट होईल आणि NPS वात्सल्य खाते अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडले जाईल.
पालकांनी मुलांच्या कल्याणाचा विचार करावा हे योग्य असलं तरी-
*आपल्या मुलांना ही योजना पुढे कदाचित चालवावी लागेल अशी सक्ती करावी का?
*यापेक्षाही अधिक चांगल्या योजनेचा शोध घेता येईल का?
*या योजनेत भविष्यात गुंतवणूक स्नेही बदल होतील का?
* इतका टोकाचा म्हणजे मुलांच्या निवृत्तीचाही विचार आतापासून करावा का?
यावर चिंतन केल्यावर जर आपण समाधानी असलात तर सरकार पुरस्कृत ही योजना उपलब्ध झाली आहे. यातून मोठी रक्कम जमा होऊ शकते त्यातील बरीचशी रक्कम भांडवल बाजारात येणार असल्याने त्यातील परताव्याची निश्चित हमी देता येत नाही.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत ह्या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 27 सप्टेंबर 2024 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 20 September 2024
प्रारंभिक भागविक्री प्रक्रिया
#प्रारंभिक_भागविक्री_प्रक्रिया
यावर्षी आत्तापर्यंत अनेक कंपन्यांनी त्यांच्या प्राथमिक भागविक्री केल्या. आणखी अनेक मोठ्या कंपन्या बाजारात येऊ घातल्या आहेत अशी भागविक्री करण्यामागील घडामोडी समजून घेण्याचा हा प्रयत्न. एखादा उद्योग जेव्हा मोठा होतो तेव्हा व्यवसायात टिकून राहण्यासाठी विस्तार होणे आवश्यक असते. कंपनी खाजगी असताना भांडवल उभारणीवर मर्यादा येतात. दायित्व अमर्यादित असते या कंपन्यांवरील करांचे दरही अधिक आहेत. कंपनीचे रूपांतर खाजगी मर्यादित कंपनीतून सार्वजनिक मर्यादित कंपनीत केल्याने म्हणजेच त्याचे शेअर्स विक्रीस खुले केल्याने दोन महत्त्वाचे फायदे होतात ते म्हणजे प्रवर्तकांनी आधी गुंतवणूक केलेल्या पैशांचा त्यांना मोबदला मिळतो आणि कंपनीच्या प्रगतीसाठी शून्य दराने भांडवल उपलब्ध होते. कंपनीच्या दृष्टीने काही प्रमाणात मालकीचे हस्तांतरण होते तर मिळालेल्या अधिमूल्याने गंगाजळीत भर पडते. उपलब्ध भांडवलावर डिव्हिडंड दिलाच पाहिजे असे बंधन नाही तसेच अधिमूल्य किती घ्यायचे हे ठरवण्याचा कंपनीस अधिकार असल्याने अधिकाधिक अधिमूल्य मिळावे यासाठी सर्व कंपन्या प्रयत्न करीत असतात. शेअरबाजार चढा असल्यास अधिमूल्य अधिक देण्याची गुंतवणूकदारांची तयारी असते. अनेकांना शेअर्स लिस्ट झाल्यावर ताबडतोब विकून झटपट फायदा मिळवण्याचे आकर्षण असते. यातून किती नफा होईल याच्या सर्वसाधारण अंदाजावर आणि बाजाराच्या परिस्थितरवर भागविक्री सफल होईल की नाही ते अवलंबून असते. एखादी कंपनी जेव्हा आपले शेअर्स जनतेस देण्याचे ठरवते तेव्हापासून भागविक्री प्रक्रिया चालू होते. ही एक कायदेशीर प्रक्रिया असल्याने त्यात कंपनी कायदा, भांडवल बाजार आणि बाजार नियामक सेबी यांच्या नियम यांचे पालन करावे लागते. हे नियम गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणारे त्याचबरोबर भांडवल बाजाराचा विकास साधणारे असे असतात. परिस्थिती आणि अनुभव यानुसार त्यात आवश्यक ते बदल वेळोवेळी करण्यात येतात. या प्रारंभिक भागविक्रीचे टप्पे आपण समजून घेऊयात. अधिकाधिक कंपन्या त्यांची भागविक्री आयपीओ आणि फॉलो ऑन ऑफरच्या माध्यमातून बाजारात घेऊन येत असतील तर ते देशाच्या सुदृढ अर्थव्यवस्थेचे लक्षण मानले जाते.
कायद्याच्या दृष्टीने भारतात देशातील कोणत्याही भागातून व्यवहार करता येईल अशा राष्ट्रीय स्तरावतील कोणत्याही एका शेअरबाजारात शेअर्सची नोंदणी करावी लागते. मुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार हे दोन राष्ट्रीय स्तरावरील शेअरबाजार आहेत. बहुतेक आघाडीच्या कंपन्या गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी दोन्ही शेअरबाजारामध्ये नोंदणी करतात. या बाजाराद्वारे अपेक्षित आशा पद्धतीने ही नोंदणी करावी लागते यासाठीचे टप्पे असे-
●मर्चंट बँकर्स (लीड मॅनेजर)ची नियुक्ती- या पूर्ण प्रक्रियेत यांची भूमिका महत्त्वाची आहे या भागविक्री संबधित सर्व घटकांचा समन्वय साधण्याचे त्यांचे काम आहे. लीड मॅनेजर ही सेबीकडे नोंदणी केलेली वित्तीय संस्था असून ती कंपन्यांच्यावतीने निधी उभारणे, सल्लागार सेवा प्रदान करणे, अपेक्षित पैशांहून कमी भरणा झाल्यास उर्वरित रकमेची हमी देणे म्हणजेच इशू अंडरराईट करणे या सारखी कामे ते करतात. इशू साईज मोठी असल्यास एकाहून अधिक लीड मॅनेजर असू शकतात अनेक बँकांनी सेबीकडून इतर वित्तीय संस्थासारखा लीड मॅनेजर म्हणून व्यवसाय करण्याचा परवाना मिळवला आहे. समभाग जारी करणारी कंपनी आणि लीड मॅनेजर चर्चा करून शेअर्स विक्रीचा अंतिम मसुदा बनवतात.
●सेबीकडून अंतिम मसुद्यास मान्यता- तयार मसुदा सेबीकडे पाठवला जातो त्यातील तपशीलासंबंधात काही स्पष्टीकरण हवे असल्यास त्याची पूर्तता केली जाते यानंतर त्यास मान्यता दिली जाते यास दोन ते चार महिन्याचा कालावधी लागू शकतो. जर बाजाराच्या एसएमइ प्लँटफॉर्मवर शेअर्सची नोंदणी करायची असेल तर फक्त शेअरबाजारची परवानगी आवश्यक आहे त्याचा भागविक्री मसुदा हा सेबीकडे न जाता सरकारच्या कंपनी प्रबंधक विभागाकडे (MCA) जातो.
●शेअरबाजाराची परवानगी- ज्या बाजारात शेअर नोंदवणार त्या बाजाराची व्यवहार करण्यासाठी तत्त्वता मंजुरी घेतली जाते यासाठी सेबीकडे पाठवलेला त्यातील तपशिलासह अंतिम मसुदा एक्सचेंजकडे पाठवला जातो त्याची पडताळणी करून मंजुरी दिली जाते.
●आयपीओ किंमत निर्धारण: लीड मॅनेजर आणि संबंधित कंपनी कोणत्या पद्धतीने भागविक्री करायची आणि त्यावर किती अधिमूल्य घ्यायचे ते ठरवतात. सध्या दोन प्रकारे किंमत निर्धारण होते-
1 निश्चित पद्धतीने- यामध्ये अधिमूल्यासहित एकच निश्चित किंमत ठरवण्यात येते. इशू ओपन होण्यापूर्वी संस्थात्मक गुंतवणूकदारांना शेअर्स दिले जातात आणि त्याच भावाने नंतर गुंतवणूकदारांना दिले जातात.
2 बुक बिल्डिंग पद्धतीने- यामध्ये एक प्राईज बँड निश्चित करून त्यातून देकार मागवले जातात. यातून इशू ओपन होण्याआधी संस्थात्मक गुंतवणूकदारांना शेअर्स वाटप करून कोणत्या भावाने शेअर्स दिले ते जाहीर केले जाते. बहुतेक त्याच भावाने हे शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांना दिले जातात क्वचित या भावात किरकोळ सूटही (साधारण 5%) देण्यात येते.
●शेअर बाजाराकडे सादर करण्याचा मसुदा- गुंतवणूकदारांच्या सर्वसाधारण माहितीसाठी कंपनीकडून एक मसुदा पाठवला जातो यात सेबीला पाठवलेल्या माहितीशिवाय अगदी अलीकडच्या घडामोडीपर्यंतची बारीकसारीक माहिती असते. यानंतर इशूची तारीख जाहीर झाली आणि इशू सुरु होण्यापूर्वी किंवा सुरू असताना महत्वाची घडामोड झाली तर त्याला वृत्तपत्रातून प्रसिद्धी दिली जाते.
●प्रसिद्धी- विविध माध्यमातून जाहिरात एजन्सीजच्या मदतीने लीड मॅनेजर जाहिरात करतात कंपनी प्रवर्तकांसोबत विविध शहरात गुंतवणूकदारांशी संवाद साधतात त्याला पत्रकार, माध्यम प्रतिनिधी विश्लेषक यांना आमंत्रण दिले जाते. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातात. यासर्व व्यापक प्रसिद्धीस “रोड शो” असे म्हणतात.
●संस्थात्मक गुंतवणूकदारासाठी इशू खुला- सर्वसाधारण गुंतवणूकदारांना शेअर्स खुले करण्यापूर्वी तो पात्र संस्थात्मक
गुंतवणूकदारांना तो खुला करतात. यासाठी किमान गुंतवणूक दहा कोटी रुपये आहे त्याचे वाटप प्रमाणशीर पद्धतीने पब्लिक इशूच्या किमान एक दिवस आधी पूर्ण केले जाते.
●पब्लिक इशू- यानंतर इशू सर्वाना खुला केला जातो यासाठी बोली लावल्याने शेअर्स निश्चित मिळतील याची खात्री नसल्याने वरील भाव पातळीवर अर्ज केला जातो त्याचे सोडत काढून वाटप केले जाते. इशू किमान तीन ते कमाल दहा दिवसांसाठी खुला असतो प्रत्येकाला यासाठी एक खास अर्ज क्रमांक दिला जातो.
●शेअर्सचे वाटप- सार्वजनिक वाटप बंद झाले की सर्व डेटा रजिस्टारकडे पाठवला जातो. त्याच्याकडून अर्जाची छाननी केली जाते. बँक खाते क्रमांक आणि डिमॅट खाते एकाच व्यक्तीचे आहे ना? एका पॅन क्रमांकावरून एकच अर्ज आला आहे ना? त्रितीय पक्षी आलेले अर्ज नाकारले जातात. सोडत काढून प्रमाणशीर पद्धतीने वाटप केले जाते. पात्र धारकांच्या खात्यातून रक्कम काढली जाऊन त्या रकमेचे शेअर्स त्याच्या डिमॅट खात्यात वर्ग केले जातात. ही सर्व माहिती संबंधितांना कळवली जाते.
●शेअर्सची शेअरबाजारात व्यवहारासाठी सुचिबद्धता- ज्या दिवशी शेअर्स सुचिबद्ध होणार असतील तेव्हा गडबड न होता शेअर्सचे वास्तविक मूल्य खालील पद्धतीने शोधले जाते.
◆यासाठी शेअरबाजाराकडून विशेष सत्र चालवले जाते यातील सकाळी 09:00 ते 09:45 हे बाजारपूर्व सत्र असते यात इतर शेअर्ससाठी असलेल्या बाजारपूर्व सत्रासारख्या ऑर्डर्स टाकता, रद्द करता अथवा दुरुस्त करता येतात.
◆यानंतर त्याची पुढील दहा मिनिटात (सकाळी 09:46 ते 09:55) जुळवाजुळव करून प्रारंभिक किंमत शोधली जाते. संबंधित व्यक्तींना ती कळवली जाते.
◆भावात फार फरक पडू नये यासाठी त्यावर सर्किट फिल्टर लावले जातात त्यामुळे त्याखालील अथवा वरील किमतीच्या ऑर्डर आपोआप रद्द केल्या जातात.
◆यानंतर सकाळी 09:56 पासून सत्रसमाप्तीपर्यत ऑर्डर, टाकल्या, रद्द केल्या अथवा सुधारल्या जाऊ शकतात.
◆सकाळी दहा नंतर सदर शेअर्सचे नियमित व्यवहार सुरु होतात. पहिल्या दिवशी या शेअर्स मध्ये डे ट्रेडिंग करता येत नाही. शॉर्ट करता येत नाही फक्त डिलिव्हरीचेच व्यवहार होतात तसेच या शेअर्समध्ये “आज घ्या उद्या विका”(BTST) या पद्धतीचे व्यवहार होऊ शकत नाही. या मान्य पद्धतीत आवश्यकतेनुसार बदल करण्याचा अधिकार बाजार नियामक म्हणजेच सेबीला आहे.
◆बाजार नियमांचे पालन: नोंदणी झालेल्या कंपनीस शेअरबाजार नियमावलीचे पालन करावे लागते.
एसएमइ कंपनीच्या बाबतीत दस्तऐवज मंजुरी सेबी ऐवजी संबंधित शेअरबाजाराकडून मिळवली जाते. इशू येण्यापूर्वी त्याची माहिती देणारे सर्व दस्तऐवज रजिस्टार ऑफ कंपनीस या सरकारी खात्याकडे सादर करावे लागतात.
आयपीओला त्याच्या आकारमानानुसार सेबीकडून मंजुरी 3 ते 12महिन्यांचा तर एक्सचेंजकडून मंजुरी मिळवण्यास 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. सध्या प्रत्यक्षात मंजुरी मिळण्याचा कालावधी याहून कमी झाला आहे. सेबीकडून मंजुरी मिळाल्यावर एक वर्षाच्या आतमध्ये भांडवल विक्री करावी लागते अन्यथा ती परवानगी रद्द होते. सध्या आयपीओ ते नोंदणी प्रक्रिया यासाठी लागणारा कालावधी सर्वसाधारणपणे असा आहे-
-नियोजन 2 आठवडे
-तयारी 4 आठवडे
-मसुदा बनवणे 1 आठवडा
-सेबी मान्यता 4 ते 6 आठवडे
-एक्सचेंज मान्यता 2 ते 3 आठवडे
-आयपीओ कालावधी 3 ते 10 दिवस
-वाटप इशू बंद झाल्यावर एक कामाच्या दिवसात
-लिस्टिंग इशू बंद झाल्यावर तीन कामाच्या दिवसात
अधिकाधिक पारदर्शकता वाढवून हा कालावधी आणखी कमी कसा करता येईल यासाठी प्रयत्न चालू आहेत.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 20 ऑगस्ट 2024 रोजी पूर्वप्रकाशीत.
Subscribe to:
Posts (Atom)