Friday, 4 October 2024
काही आर्थिक संज्ञा भाग 1
#काही_आर्थिक_संज्ञा_भाग_1
भांडवल बाजारात व्यवहार करताना अनेक छोट्या मोठ्या संकल्पनांचा उल्लेख होतो यातील सर्वच संकल्पना सर्वाना माहीत असतातच असे नाही. तरीही जुजबी ज्ञान म्हणून काही संकल्पना आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे म्हणून त्यातील काही महत्वाच्या संकल्पना थोडक्यात समजून घेऊयात.
★मालमत्ता (Asset)-
मालमत्ता हे केवळ कंपनीच्या मालकीचे आर्थिक मूल्य असलेले संसाधन आहे. ज्याचा कंपनीच्या कार्यात उपयोग होतो त्यातून महसूल निर्माण होतो. यामध्ये जमीन, इमारत, इन्व्हेंटरी यासारख्या मूर्त वस्तू अथवा पेटंट ट्रेडमार्क बौद्धिक संपत्ती यासारख्या अमूर्त गोष्टींचा समावेश होतो. कंपनीचे मूल्य वाढवण्यासाठी म्हणजे कंपनीच्या कार्यचालनासाठी रोखता प्रवाह आवश्यक असून त्यासाठी मालमत्ता तयार केली जाते अथवा विकत घेतली जाते. एखादी गोष्ट मालमत्ता आहे की नाही हे ठरवण्याची सोपी पद्धत म्हणजे ती संस्थेच्या मालकीची असायला हवी किंवा नियंत्रणात असावी तिचे मूल्य असायला हवं आणि भविष्यात त्यातून उत्पन्न निर्माण करण्याची क्षमता असली पाहिजे. त्यामुळे विक्री वाढ होईल अथवा उत्पादन खर्चही कमी होऊ शकेल. मालमत्तेची ओळख आणि प्रभावी व्यवस्थापन हे समजून घेणे आवश्यक आहे त्यामुळे कंपनीच्या आर्थिक आरोग्याचे मूल्यांकन म्हणजेच भविष्यातील वाढ आणि स्थिरता समजण्यास मदत होते.
ढोबळमानाने मालमत्तेचे तीन प्रकारात वर्गीकरण करता येईल.
●परिवर्तनीयता- मालमत्तेचे रोख रकमेत तात्काळ रूपांतर करता येण्याच्या क्षमतेवरून त्याचे परिवर्तनीय मालमत्ता आणि अपरिवर्तनीय मालमत्ता असे वर्गीकरण करता येईल. कच्चा माल, पक्का माल, खात्यातील शिल्लक, रोखे यासारख्या मालमत्ता परिवर्तनीय आहेत. तर जागा मशिनरी यासारख्या मालमत्ता अपरिवर्तनीय म्हणता येतील कारण त्यांचे सहजासहजी पैशांत रूपांतरण करता येत नाही.
●भौतिक अस्तीत्व- मालमत्तेच्या भौतिक अस्तीत्वावरून त्याचे मूर्त मालमत्ता आणि अमूर्त मालमत्ता असे वर्गीकरण करता येईल. एकाधिकार (पेटंट) व्यापार चिन्ह (ट्रेडमार्क) यांना अमूर्त मालमत्ता असे म्हणता येईल.
●वापरानुसार- यामध्ये मालमत्तेचे वर्गीकरण त्याच्या कार्यानुसार अथवा व्यवसायाच्या उद्देशानुसार केले जाते.
कंपनीचा लेखाजोखा समजण्यासाठी मालमत्ता नेहमी सकारात्मक योगदान देत असते.
कंपनीच्या मालमत्तेचा अहवाल आर्थिक विवरणपत्रात दिला जातो तो भागधारकांना पाठवून सर्वसाधारण जनतेच्या माहितीसाठी कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतो. या अहवालात मालमत्ता दोन प्रकारात विभागली जाते.
●चालू मालमत्ता-
यामध्ये वर्षभराच्या आत वापरात येणाऱ्या किंवा रोखीत सहज रूपांतर होऊ शकणाऱ्या सर्व मालमत्ताचा समावेश असतो उदा रोख रक्कम, आधीच केलेले काही खर्च, इनव्हेंटरी, धारण केलेल्या सिक्युरिटीज
●चालू नसलेल्या मालमत्ता-
यामध्ये दीर्घकालीन आर्थिक संसाधने येतात उदा इमारत, जमीन, पेटंट, कॉपीराईट, गुडविल, दीर्घकालीन गुंतवणूक यांचा समावेश होतो.
★वार्षिक अहवाल (Anual Report) -
वार्षिक अहवाल हा कंपनीची सर्वसमावेशक माहिती देणारा दस्त आहे. गुंतवणूकदारांना संदर्भ म्हणून याचा उपयोग होतो. अहवालाचा हेतू वर्षभरातील कंपनीच्या स्थितीचे सार्वजनिक प्रकटीकरण हा असून त्यामुळे हितसंबंधितांना पारदर्शक पद्धतीने कंपनीची स्थिती समजू शकते. वार्षिक अहवालात सर्वसाधारणपणे खालील माहिती असते.
●अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालकांचे कंपनी विषयी सर्वसाधारण माहिती देणारे पत्र.
●कंपनीची सर्वसामान्य स्थिती.
● वर्षातील आर्थिक विषयावरील ठळक माहिती.
●वर्षभरातील आव्हाने त्यावर योजलेले किंवा प्रस्तावित उपाय.
●व्यवस्थापणाविषयी चर्चा आणि त्यांचे विश्लेषण भविष्यातील ध्येयधोरणे.
●नफा तोटा पत्रक.
●आर्थिक बाबींची सारांश आणि मागील वर्षाशी तुलना.
हा अहवाल कर्मचारी आणि ग्राहक या सर्वांसाठी उपलब्ध असतो.
★ताळेबंद (Balance sheet) -
यामध्ये कंपनीची एकूण मालमत्तेची तुलना ही भागधारकांचा फंड आणि कंपनीच्या दायित्वाशी करून दाखवली जाते. ते थोडेसे गुंतागुंतीचे आहे. ताळेबंद शिलकीचा नसेल तर काहीतरी गडबड असू शकते त्यातुन कंपनीच्या मालकीची मालमत्ता आणि देणी समजतात त्यावरून कंपनीचे आंतरिक मूल्य काय असेल ते समजते त्याची बाजाभावाशी तुलना करून गुंतवणूकी संबंधित योग्य निर्णय घेण्यास मदत होते.
★उच्च गुणवत्ता असलेली कंपनी (Blue Cheap Company) -
सातत्याने चांगली आर्थिक कामगिरीचा प्रदीर्घ इतिहास असणाऱ्या कंपनीस ब्लु चिप कंपनी समजण्यात येते. या कंपन्यांतील शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक कमी जोखमीची समजली जाते. कोणत्याही कारणाने बाजारात येणारे तीव्र उतार चढाव त्या झेलू शकतात तर बाजार चांगल्या स्थितीत असल्यास उच्च परतावा देऊ शकतात. यातील गुंतवणूक संयमी गुंतवणूकदारांची दीर्घकालीन उद्दिष्टे लवकर पूर्ण करण्यात मदत करतात. बाजार खूप खाली गेल्यास त्या तुलनेत यांच्या बाजार भावातील घसरण कमी असते एका विशिष्ट पातळीवर त्यांचे भाव स्थिर होऊन नंतर ते वाढतात.
★रोखे (Bonds) -
हे एक प्रकारचे कर्ज आहे. अनेकदा सर्वच प्रकारच्या कंपन्या भारत सरकार कर्जद्वारे भांडवल उभारतात. यावरील व्याजदर सर्वसामान्य गुंतवणूकीवरील व्याजदराहून अधिक असतो. सरकारने,सरकारी कंपन्यानी आणि ब्लुचिप कंपन्यांना निधी आवश्यक असेल तर भांडवल बाजारातून रोख्याच्या माध्यमातून स्पर्धात्मक दराने कर्ज मिळवता येते. हे रोखे विनिमय योग्य असल्याने ते गुंतवणूकदार दुय्यम बाजारात त्यांची खरेदी विक्री करू शकतात. स्टॉकपेक्ष्या कमी जोखीम, स्थिर परतावा, विनिमयता आणि करलाभ ही याची वैशिष्ट्ये म्हणता येतील तर शेअर्सच्या तुलनेत कमी तरलता, चलन वाढीचा धोका आणि क्रेडिट जोखीम यासारखे त्याचे तोटे सांगता येतील. कंपनीने व्याज अथवा मूळ रकमेचा परतावा न दिल्यास त्याविरुद्ध दाद मागण्याची सुलभ तरतूद सध्यातरी अस्तीत्वात नाही.
★भांडवली नफा /तोटा (Capital Gain /Loss )-
भांडवली मालमत्तेची विक्री केल्यावर मिळालेल्या रकमेतून गुंतवणूक रक्कम वजा केली असता पडणारा फरक म्हणजे भांडवली नफा तोटा होय. मालमत्ता प्रकार, धारण करण्याचा कालावधी, मालमत्ता प्रकार भांडवल बाजारात नोंदणी केलेला आहे किंवा नाही यावरून त्यावरील नफा तोटा हे इतर उत्पन्न समजायचे की अल्पकालीन अथवा दीर्घकालीन भांडवली नफा तोटा समजायचा ते अवलंबून आहे. त्याच दिवशी पडणारा भावातील फरक हा इतर उत्पन्न म्हणून मोजणी करून त्यावर नियमित दराने कर घ्यावा लागेल तर साधनानुसार (1 ते 2 वर्षातील) भांडवली नफा तोटा अल्पकालीन तर अन्य दीर्घकालीन समजण्यात येतो. अल्पकालीन नफ्यावर सरसकट 20% दराने कर आकारणी केली जाते तर दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 12.5% दराने कर द्यावा लागतो. शेअर बाजारात नोंदणीकृत दीर्घकालीन मालमत्तेवरील एक लाख पंचवीस हजारावरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कोणताही कर लागत नाही.
★रोख प्रवाह (Cash Flow) -
नावाप्रमाणेच याचा संबंध खेळत्या पैशाशी आहे. उद्योगात अनेकदा पैशांची देवाण घेवाण करावी लागते विविध ठिकाणांहून कच्चा माल खरेदी करावा लागतो तो उत्पादन ठिकाणापर्यंत पोहोचवणे, त्यावर प्रक्रिया करणे उत्पादन बनवणे, त्याची वर्गवारी करणे, त्यासाठी ग्राहक शोधणे त्याच्याकडे माल पोहोचवणे यामध्ये निश्चित कालावधीत व्यवहार पुरा करावा लागतो. संबंधिताना ठरलेल्या वेळी त्यांची रक्कम द्यावी लागते, कामगारांचे पगार , वीज बिल यासारखे नियमित खर्च करावे लागतात. विक्री केलेल्या मालाच्या पैशांची वेळेत वसुली करावी लागते उधारी लांबल्यास पर्यायी व्यवस्था करावी लागते ती न केल्यास उद्योग पूर्ण कार्यक्षम पद्धतीने चालू शकत नाही. रोख प्रवाह हा उद्योगात कुठून कोणत्या कालावधीत कसे पैसे आले आणि कसे खर्च झाले याचा आरसा असतो त्यावरून कंपनीचे आर्थिक आरोग्य समजते सकारात्मक रोखता प्रवाह तुमच्या मालमत्तेतील वाढ दर्शवतो आणि निश्चित ध्येयाकडे वाटचाल करीत असल्याचे सूचित करतो.
★बाजारातील पत (Credit)-
आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात क्रेडिट हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो परंतु हा सावकार आणि कर्जदार यांच्यातील कराराच्या तरतुदीचा भाग आहे. यात कर्ज घेतलेल्या रकमेवरील व्याजाचा समावेश असू अथवा नसू शकतो. व्यवसायात अनेकदा क्रेडिट घ्यावे लागते तसेच द्यावेही लागते त्याची नियमानुसार फेड होत असेल तर आपोआपच तुमची विश्वासार्हता वाढते . तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी सहज उपलब्ध होऊ शकतात त्याचे पैसे कालांतराने दिले तरी चालतात. तसेच तुम्हालाही तुमच्या ग्राहकांवर विश्वास ठेवून उत्पादित माल द्यावा लागतो. यातून व्यवसाय वृद्धी होऊन स्नेह वाढू शकतो. अनेक वित्तीय संस्था तुमच्या या कर्जाचा लेखाजोखा ठेवतात. त्यातून व्यक्ती, संस्था यांची बाजारातील पत (क्रेडिट स्कोर) तयार होत असतो. (अपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत ह्या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
4 ऑक्टोबर 2024 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम येथे पूर्वप्रकाशीत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment