Friday, 11 October 2024
काही आर्थिक संज्ञा भाग 2
#काही_आर्थिक_संज्ञा_भाग_2
आर्थिक विषयाची किमान माहिती व्हावी म्हणून काही प्राथमिक संकल्पना आपल्याला माहिती असाव्यात असे वाटते मागील लेखात त्यापैकी मालमत्ता(अँसेट), वार्षिक अहवाल (अँन्युअल स्टेटमेंट), ताळेबंद (जमाखर्च), उच्च आर्थिक मूल्य असलेले समभाग (ब्लुचिप शेअर्स), रोखे (बॉण्ड), भांडवली नफा (कॅपिटल गेन), रोख प्रवाह (कॅश फ्लो) , पत (क्रेडिट) या संकल्पना थोडक्यात माहिती करून घेतल्या. आता आणखी काही संकल्पना समजून घेऊयात.
★घसारा निधी -(Depression)
जमीन वगळता सर्व स्थिर मालमत्ता म्हणजे इमारत, यंत्रसामुग्री, फर्निचर, उपकरणे यांच्या किमतीत सातत्याने घट होत असते. या मालमत्ता वापरण्यास अयोग्य झाल्यावर त्याऐवजी नव्या मालमत्ता खरेदी कराव्या लागतात. यासाठी मूळ मालमत्तेच्या कमी झालेल्या मूल्याएवढी तजवीज करावी लागते त्यास घसारा असे म्हणतात. घसारा मोजण्यासाठी सदर मालमत्ता उपयोगी पडण्याचा कालावधी, काही कालावधीनंतर मालमत्तेची विक्री केली असता येऊ शकणारी किंमत, नवीन मालमत्तेचीच्या खरेदी करण्यासाठी लागणारी सर्व रक्कम ज्यात वाहतूक खर्च, स्थापना खर्च, कर इत्यादी सर्वांचा विचार केला जातो. केवळ वस्तूच्या वापरामुळे नाही तर तंत्रज्ञानातील बदलामुळेही एखादी वापरातील वस्तू कालबाह्य होऊन नवीन वस्तू घ्यावी लागते यासाठी काही तरतूद करून ठेवावी लागते. घसारा हा खर्च समजला जाऊन तो कोणत्या वस्तूसाठी किती प्रमाणात घेतला जावा या विषयी कायद्यात असलेल्या तरतुदी प्रमाणेच रक्कम बाजूला ठेवावी लागते.
★समभाग-( Shares)
व्यवसायाची उभारणी करण्यासाठी मोठ्या भांडवल लागते. हे भांडवल प्रवर्तक, जनता आणि बाजारातून कर्ज घेऊन उभे केले जाते. कर्जासाठी तारण ठेवावे लागते किंवा हमीदार लागतो याशिवाय त्यावर व्याजही द्यावे लागत असल्याने देयता वाढते. याउलट प्रवर्तक, जनता, गुंतवणूक कंपन्या यांच्याकडून भांडवल गोळा केल्यास त्यामुळे देयता न वाढल्याने कमी दरात मोठी रक्कम भांडवल रूपाने उपलब्ध होते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीच्या मालकांच्या मालकीचा भांडवलाचा एक भाग. यावर कोणत्याही निश्चित परताव्याची हमी नसते. दुय्यम बाजारात हे भाग विकता येतात किंवा विकत घेता येतात. त्यामुळे त्यात बऱ्यापैकी तरलता असते. कंपनीची मालमत्ता आणि दायित्वे माहिती असल्यास मालमत्तेतून दायित्वे वजा केली असता येणारी रक्कम ही त्या समभागांची एकूण रक्कम असते. कंपनी कायद्यातील या तरतुदीमुळे व्यावसायिकांना कमी खर्चात भांडवल उपलब्ध होते तर गुंतवणूकदारांना त्यांनी स्वीकारलेल्या जोखमीच्या तुलनेत कोणत्याही अतिरिक्त देयतेशिवाय आकर्षक परतावा मिळण्याची शक्यता असते.
★प्रति समभाग कमाई-(Earning per share)
समभाग (शेअर्स) हा कंपनीच्या मालकीचे प्रतिनिधित्व करीत असल्याने कंपनीस झालेल्या निव्वळ नफ्यातून कर देऊन झाल्यावर प्रति समभाग किती कमाई खाली याची माहिती देणारे आर्थिक गुणोत्तर आहे. प्रति समभाग उच्च उत्पन्न मिळवणाऱ्या कंपन्यांची गणना सुदृढ कंपन्यात होते या कंपन्या आपल्या भागधारकांना सातत्याने लाभांश, हक्कभाग आणि बोनस शेअर्स देत असतात साहजिकच या कंपन्या आपल्याकडे असाव्यात असे अनेकांना वाटल्याने त्यांना अधिक मागणी असते त्यामुळेच त्यांचा बाजारभावही अधिक असतो.
★प्रारंभिक भाग विक्री-(Initial Public Offer)
बाजारात प्रथमच एखाद्या खाजगी कंपनीस सार्वजनिक करून शेअर्स उपलब्ध झाल्याचे आपण वाचतो या प्रक्रियेत गुंतवणूकदारांना कंपनीचे समभाग नव्याने उपलब्ध करून दिले जातात आणि अथवा प्रवर्तकांकडून काही भाग विक्रीस काढले जातात हे भाव सममूल्याने अथवा अधिभार देऊन दिले जातात यात अधिभार किती घ्यावा हे कंपनीने नेमलेल्या लीड मॅनेजरच्या सल्ल्याने ठरवण्यात येते. कोणत्या कंपनीने अधिमूल्य किती घ्यावे यावर सध्या कोणतेही बंधन नाही. बाजारात अस्तित्वात असलेल्या कंपनीने सर्वांसाठी शेअर्स विक्रीसाठी काढल्यास त्याला फॉलो ऑन ऑफर असे म्हटले जाते.
★आयकर विवरणपत्र-(Income Tax Returns)
सर्व मार्गाने मिळालेले एकूण उत्पन्न नवीन प्रणालीनुसार तीन लाखाहून अधिक अथवा जुन्या प्रणालीनुसार वयानुसार अडीच ते पाच लाखाहून अधिक असेल तर आपले सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाची मोजणी म्हणजेच व्यवसाय अगर पगाराचे उत्पन्न, मिळालेले व्याज, भांडवली नफा, घरभाडे असल्यास अन्य उत्पन्न याचा लागू असलेल्या प्रकारचा तपशीलवार फॉर्म भरून विशिष्ट मुदतीत एकूण उत्पन्न जाहीर करावे लागते. त्या फॉर्मला आयकर विवरणपत्र असे म्हणतात. हा फार्म भरणे आणि कर भरणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. यामुळे आपले निश्चित उत्पन्न किती आहे यास पुष्टी मिळते जी कर्ज घेणे जामीन राहणे यासाठी आवश्यक आहे. हाच फार्म वेळेत भरून अधिक कापलेला कर आपल्याला परत मिळवता येतो.
★देयता-(Liabilities)
देयता म्हणजे व्यवसायाने घेतलेले कर्ज अथवा इतरांकडून प्राप्त केलेले फायदे म्हणजे कंपनीने जे कर्ज घेतले आहे त्यावरील व्याज देणे दिलेल्या मुदतीत त्याची परतफेड करणे. भांडवली गुंतवणूक करणाऱ्याना त्याचा अंशतः मोबदला देणे ही तिची जबाबदारी आहे त्यास देयता असे म्हणतात. मालमत्ता आणि देयता यांची तुलना करून कंपनीची आर्थिक स्थिती कधी आहे याची सर्वसाधारण कल्पना येते. देयता म्हणजे देणे देण्याची जबाबदारी ही भवितव्याचा विचार करून निर्माण केली जाते. देणे देण्याच्या कालावधीवरून अल्पकालीन दायित्वे आणि दीर्घकालीन दायित्वे असे वर्गीकरण करता येईल याशिवाय कधीकधी अचानकपणे खर्च करावा लागल्यास त्यास आकस्मिक दायित्व असे म्हणता येईल.
★तरलता- (Liquidity)
बाजारभावावर फारसा प्रभाव न पडता ज्या ज्या मालमत्तेचे रोखीत सहज रूपांतर करता येते. त्या क्षमतेस तरलता असे म्हणता येईल. बाजार तरलता आणि लेखा तरलता असे तरलतेचे दोन प्रकार आहेत. देयतेपेक्षा मालमत्ता अधिक असणे आणि त्याचे त्वरित पैशात रूपांतर करता येण्याच्या क्षमतेवर कंपनीची सुदृढता अवलंबून असते. दीर्घकालीन कर्जे अशा कंपनीस सहज फेडता येतात.
★बाजारमूल्य- (Market Capital)
एखाद्या कंपनीच्या बाजारात उपलब्ध शेअर्सना कंपनीच्या बाजारभावाने गुणले असता त्या कंपनीचे बाजारमूल्य समजते, त्यावरून तिचे मूल्यांकन करता येतं. कंपनीची मोठ्या आकाराची लार्ज कॅप, मध्यम आकाराची मिड कॅप अथवा लहान आकाराची स्मॉल कॅप कंपनी अशी विभागणी करण्यास याची मदत होते. पूर्वी बाजारमूल्य मर्यादेवर अशी विभागणी केली जात असे आता नोंदणीकृत सर्व कंपन्यांचे बाजारमूल्य शोधून त्यांची क्रमवारी लावतात. सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या पहिल्या शंभर कंपन्या या मोठ्या कंपन्या समजतात. क्रमवारीतील एकशेएक ते दोनशे पन्नास पर्यंतच्या कंपन्या या मध्यम कंपन्या समजण्यात येतात तर इतर सर्व कंपन्यांचे बाजारमूल्य कितीही असले तरी त्यांना छोट्या कंपन्या समजण्यात येते.
★परस्पर निधी- (Mutual Funds)
विशिष्ट ध्येयाने अनेक लोकांची एकत्रितपणे गुंतवणूक करण्यासाठी निर्माण केलेला निधी. भांडवल बाजारात व्यक्ती म्हणून गुंतवणूक करताना अनेक मर्यादा येतात यावर मात करून एकत्रित गुंतवणूक केल्यास जोखीम कमी होते. ही पूर्णपणे पारदर्शक प्रक्रिया असून यामुळे बचतीची सवय लागून थोडा संयम बाळगल्यास आकर्षक परतावा मिळू शकतो. थांबण्याची तयारी असेल तर निश्चित फायदा होतो. दीर्घकाळ थांबल्यास चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो. आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारात या योजना आहेत. अगदी दरमहा पाचशे रुपये त्यात टाकून सुरुवात करू शकतो त्यायोगे आपली सर्व स्वप्ने ही केवळ इच्छा न राहता लवकरच पूर्ण होऊ शकतात. शेअर्स, बॉण्ड, सोनेचांदी, इंडेक्स असे अनेक मालमत्ता प्रकार स्वतंत्रपणे अथवा मिश्रणात त्याच्याकडे उपलब्ध आहेत. ज्याची जी गरज त्यासाठी कोणतीतरी योजना असे त्यांचे स्वरूप आहे. याबाबत पुरेशी जागरूकता निर्माण झाल्याने या योजनांत सातत्याने गुंतवणूक येत आहे.
★सांपत्तिक स्थिती- (Netwarth)
व्यक्ती अथवा संस्था यांच्या एकूण मालमत्तेच्या किमतीतून देयता वजा केल्यास खरीखुरी सांपत्तिक स्थिती समजून येते. देयतेच्या तुलनेत मालमत्तेचे मूल्य अधिक असल्यास तुमची सांपत्तिक स्थिती उत्तम समजली जाते. मालमत्तेच्या तुलनेत देयता अधिक असल्यास आपण धोकादायक परिस्थितीत आहोत असे समजावे. राखीव फंड शिलकीत असल्यास त्यातून अधिक व्याजदराचे कर्ज प्रथम फेडावे. असा फंड नसेल तर मालमत्तेत वाढ होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत.
★गुंतवणुकीवरील परतावा- (Return On Investment)
यावरून गुंतवणूकीचे मूल्यमापन करता येते. ते टक्केवारीत व्यक्त करतात. ही गणना सकारात्मक असेल तर आपली गुंतवणूक योग्य कार्य करीत आहे असे समजले जाते तर नकारात्मक असेल तर त्याचा अर्थ असा होईल की गुंतवणुकीतून मिळणारा परतावा तुमची अपेक्षित देयतेची जबाबदारी पूर्ण करण्यास कमी पडत आहे. असा परतावा काढण्यासाठी गुंतवणूकीतून मिळालेले निव्वळ उत्पन्न आणि गुंतवणूक रक्कम माहिती असणे गरजेचे आहे. ही गणना करण्याचे प्राथमिक कारण म्हणजे
पैसे योग्य प्रकारे गुंतवले जात आहेत याचा अंदाज बांधणे. त्यानुसार गुंतवणूकीचे पुनरावलोकन करून आवश्यक त्यामध्ये योग्य ते बदल करणे.
★अस्थिरता- (Volatility)
आपण बाजारात केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य हे प्रामुख्याने मागणी आणि पुरवठा यातील यातील फरकामुळे त्यात सातत्याने बदल होत असतो याशिवाय सरकारी धोरण, भु राजकिय परिस्थिती, सट्टेबाजी, अफवा या सारख्या अनेक गोष्टींमुळे भाव कमी अधिक होत असतात असे असले तरी कंपनीच्या कामगिरीवर ते कमी अधिक होतात अथवा स्थिरावतात. गुंतवणूकीमध्ये असलेल्या जोखीमीमध्ये बाजारातील अस्थिरतेचा समावेश होतो.
आर्थिक संकल्पना समजण्यासाठी थोडासा वेळ दिलात तर त्या सहज समजू शकतात. आपल्या आर्थिक सल्लागाराशी यासंबंधी नियमित चर्चा करीत रहा या विषयावरील उत्तमोत्तम माहिती समाज माध्यमांवर आज उपलब्ध आहे. आपल्या आर्थिक जाणिवा समृद्ध होण्यासाठी त्याचा नक्की उपयोग होईल. अलीकडेच एका खाजगी कार्यक्रमात सुप्रसिद्ध अर्थतज्ञ केदार ओक यांनी गुंतवणूकदारांना मार्गदर्शनपर संदेश देताना चार “वा” लक्षात ठेवा असं सांगितलं होतं. ते चार “वा” असे-
1 वाचवा - आपले आर्थिक नुकसान टाळा
2 वाढवा - वाजवी नफा मिळवा
3 वापरा - मिळालेल्या पैशांचा सुयोग्य उपभोग घ्या
4 वाटा - सामाजिक जाणिव ठेवून गरजूंना मदतीचा हात पुढे करा.
या चारही वांची वाहवा करीत त्यांनी सांगितलेल्या सूचना लक्षात ठेवुयात. (संपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक समजावी.)
11 ऑक्टोबर 2024 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम येथे पूर्वप्रकाशित.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment