Friday, 3 March 2017

सेवा /स्वेच्छानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन.......😃

    सेवा /स्वेच्छानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन.........😄


   सध्या अनेकजण वयोमानानुसार निवृत्त होत आहेत  अथवा काही कारणाने स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत.यावेळी  त्यांच्या हातात तुलनेने मोठी रक्कम येत आहे.जरी ही रक्कम आजच्या काळाच्या हिशोबाने मोठी असली तरी असलेल्या जबाबदाऱ्या ,कारण आपली निवृत्ती ही नोकरीतून असते ,जीवनातून नाही.वाढती आयुर्मर्यादा, साधारणपणे पुढची पंचवीस वर्षे , वाढते वैद्यकीय खर्च या सर्वांचा विचार करून मिळालेल्या पैशांचे वेळीच योग्य नियोजन करणे जरुरीचे आहे आपल्या गुंतवणूकीवर दीर्घकाळ महागाईवर मात परतावा मिळावा अशी सर्वांचीच अपेक्षा असणार.यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.यातून सर्व साधारण सर्वाना योग्य असे गुंतवणूक पर्याय आपण शोधू शकतो काय ? या गोष्टीचा आपण विचार करु.त्याचप्रमाणे काही लोकांना आलेले अनुभव यातून काही शहाणपण शिकता येईल का याचा विचार करुयात.
  आपल्याला पैसे मिळणार आहेत असे समजले तर आपल्या सभोवती अनेक जण अनेक हेतू ठेऊन आजुबाजुस जमा होतात.यात मित्र ,नातेवाईक , विविध योजनांचे अभीकर्ते ,बँक कर्मचारी यांचा समावेश होतो.ते त्याना रस असलेल्या किंवा ते ज्यांचे अभीकर्ते आहेत अशाच योजना किंवा बँक कर्मचारी त्यांच्या बँकेने पुरस्कृत केलेल्या योजना प्रामुख्याने त्यांच्या फायद्यासाठी आपल्या गळ्यात कशा आडकवता येतील यासाठी जोरदार प्रयत्न करीत असतात. त्यांच्या दृष्टीने आपण त्यांचे मित्र कमी आणि संभाव्य गिऱ्हाईक जास्त असतो. मात्र ते ,त्याना आपली किती काळजी  वाटते ,असे दर्शवतात एकदा का तुम्ही त्यांच्या योजनेत सहभागी झालात की एकदम अनोळखी व्यक्तिसारखे वागू लागतात.यातील काही लोक तर इतके गळी पडतात की ते आपल्यावर जात , धर्म ,मराठी माणूस ,मैत्रीची शपथ ,पूर्वी त्यांनी केलेली मदत, गरीबी यासर्वाचा भांडवल म्हणून वापर करतात त्यांची योजना सोडून दुसऱ्या योजनेचे नाव जरी काढले तरी  ती योजना कशी बंडल आहे ते पटवण्याचा प्रयत्न करतात.आपण तरीही बधलाे नाही तर माझ्यासाठी तरी किमान काहीतरी करच येथपर्यत येतात.या लोकांना निक्षून नाही म्हणून सांगणे हे मोठे आव्हान आहे.यात जर आपण यशस्वी झालो तर अर्धी लढाई जिंकल्यात जमा आहे.खाली सूचवलेले पर्याय त्यांच्या प्राधान्य क्रमानुसार असून त्यातील पहिले तीन पर्यायांना अन्य काही पर्याय आहे असे मला वाटत नाही.
   १)आरोग्यविमा असणे ही काळाची गरज आहे कारण वैद्यकीय खर्चात झालेली बेसुमार वाढ.एखादे मोठे आजारपण आपली सर्व जमापूंजी क्षणार्धात नाहीशी करु शकते. आपल्याकडे आरोग्यविमा असेल तर तो असल्याचे मानसिक समाधान मिळते आणि आजारपण आल्यास काही प्रमाणात मदत होते.अशा प्रकारची सवलत आपणास आधी घेतलेल्या योजनेतून ,आपल्या पुर्वीच्या व्यवस्थापनाकडून  अथवा आपल्या मुलामुलींकडून मिळत असेल तर ठीक, अन्यथा यासाठी तरतूद करणे जरुरीचे आहे.सध्या बँक ऑफ इंडिया कडून त्यांच्या खातेधारकांसाठी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची गट आरोग्यविमा योजना  उपलब्ध असून याद्वारे जास्तीत जास्त  5 लाख रुपयांचा आरोग्यविमा एका कुटुंबाकरिता ₹7246/-मध्ये उपलब्ध आहे.यामध्ये पति पत्नी आणि 25वर्षांखालील 2मुलांना यांचा समावेश होऊ शकतो.सर्वात कमी किंमतीत मिळणारा हा आरोग्य विमा असून या पर्यायाचा अवश्य विचार करावा आणि दरवर्षी आठवणीने त्याचे नूतनीकरण करावे.आपल्या जास्तीचे गरजेसाठी www.policybazzar.com या संकेतस्थळावरून आरोग्यविमा देणाऱ्या कंपनीचा शोध घेवून त्याचा हप्ता ऑनलाइन भरावा.अशा प्रकारे हप्ता भरल्यास भरीव बचत (20%)होते.काही कंपन्या 2/3वर्षांचा हप्ता एकदम स्वीकारून त्यात काही सवलत देत आहेत त्यांचाही विचार करता येईल.
   २)उत्पन्नाचा मार्ग बंद झाल्याने आपली सध्याची जीवनशैली कायम ठेवण्यासाठी नियमीत उत्पन्नाची गरज आहे.सध्या आपली जमाराशी सुरक्षित ठेवून सर्वाधिक वार्षिक 8.3%व्याज देणारी सीनियर सिटीझन सेव्हीग स्कीम 2004 ही एकमेव सरकारी योजना आहे.या योजनेचे खाते पोस्ट ,सरकारी /खाजगी /मान्यताप्राप्त सहकारी बँकेत काढता येते.व्याज दर तिमाहीस    मिळते.या योजनेमध्ये जास्तीत जास्त 15 लाख रुपये ठेवता येतात.एवढी रक्कम ठेवल्यास तिमाहीस ₹31125/-म्हणजेच मासिक ₹10375/-ची सोय होते.व्याज करपात्र असून गुंतवणुकीला 80/सी च्या मर्यादेत सूट मिळते.
   ३)या पुढील अतिशय महत्वाचा पर्याय म्हणून मी hdfc prudance fund dividend payout हा पर्याय सुचवतो आहे.हा एक बेलेन्स फंड असून यात समभागातील उच्च परतावा आणि कर्जरोख्याची सुरक्षितता यांचा गेली 19वर्षे सातत्याने उत्तम समन्वय साधला आहे.निवृत्तांसाठी ही काळाच्या कसोटीवर उतरलेली सर्वोत्तम योजना आहे.दर महिन्याच्या 25 तारखेला या योजनेकडून लाभांश देण्यात येतो.हे यूनिट आपण त्याच्या एन ए व्ही  प्रमाणे कधीही घेऊ अथवा विकू शकतो.यामधे समभाग प्रमाण मोठे असल्याने शेअर मार्केटच्या वर खाली होण्यावर याची एन ए वी कमीजास्त होऊ शकते.मागील अनुभवांवरून यामधे 20%वाढ अगर घट होऊ शकते.हा पर्याय विचारात घेण्यासाठी प्रथम आपल्या मनातील नफा आणि तोटा या संकल्पना तपासून घायला हव्यात.योजनेच्या एन ए व्ही मधे घट झाल्याने होणारा तोटा /नफा आभासी असतो.खराखुरा तोटा होण्यासाठी सदर यूनिट आपणास त्या दराने विकावे लागतील.तीच गोष्ट नफ्याची.तेव्हा यात गुंतवणूक करताना आपण आपणास शक्यतो कधीही परत घ्यावी न लागणारी आणि जास्तीत जास्त शक्य रक्कम गुंतवावी.आपल्याला दरमहा लाभांश मिळतो की नाही ते पहावे.एन ए व्ही पाहून मनस्ताप करून घेऊ नये.केवळ याच पर्यायातून आपणास पुरेसा करमुक्त परतावा मिळू शकतो. एन ए व्ही चा विचार फक्त सुरुवातीस गुंतवणूक करताना करावा. म्यूचुअल फंडामध्ये आपण कोणत्याही मध्यस्थाशिवाय गुंतवणूक करु शकतो.मात्र या पर्यायात अभीकर्त्याची मदत घ्यावी असे माझे मत आहे.कारण या पर्यायात सध्या यूनिट एन ए व्ही ₹32.5/-आहे तर थेट गुंतवणुकीमध्ये एन ए व्ही ₹37.5/- आहे.मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे निवृत्त व्यक्तीस चांगल्या आणि सातत्याने उच्च परतावा देणाऱ्या,महागाईवर मात करणाऱ्या  योजनेची गरज असल्याने सध्याच्या दराने हे यूनिट्स अभिकर्त्यामार्फत खरेदी केल्यास 11.8%तर थेट गुंतवणूक केल्यास 10.3%वार्षिक परतावा मिळतो.तेव्हा दोन्ही पर्यायात आपल्याला सारखाच लाभांश मिळूनही साधारण 1.5% चा फरक पडतो.
 उदाहरणार्थ 10 लाख रुपये आपण अभिकर्त्याच्या मदतीने गुंतवले तर त्याचे 30769.230 यूनिट्स मिळतील यावर दरमहिन्याच्या 25 तारखेला मिळणारा लाभांश 0.3%प्रमाणे ₹9230/-दरमहा मिळेल तर थेट गुंतवणूक केल्यास 26666.666यूनिट्स मिळतील यावर मिळणारा लाभांश ₹ 8000/-दरमहा असेल. यामधे 9230-8000=1230/-₹ एवढा फरक पडतो. निवृत्त व्यक्तीचे दृष्टीने हा खूप मोठा फरक आहे.अशी गुंतवणूक करून यात आपण धोका पत्करतो आहोत का ?याचे उत्तर होय असे आहे. परंतु जोपर्यंत मासिक 1%चे आसपास परतावा मिळत असेल तर एन ए व्ही कमी होत असताना जर हे यूनिट्स विकण्याची वेळ आपल्यावर आली तर आणि तरच तोटा होईल.तेव्हा निश्चितपणे जास्तीत जास्त किती रक्कम आपणास लागणार नाही तेवढीच रक्कम या योजनेत गुंतवावी.सध्या जोखिम नसलेल्या योजनांचा सरासरी निश्चित परतावा हा 8%चे आसपास आहे.यातून 10लाख रुपयांवर मासिक ₹6667/-मिळू शकतात.दीर्घ काळात मिळणाऱ्या जास्तीच्या ₹2563/- मधून जर आपण ₹2000/-  ईक्विटी म्यूचुअल फंडाचे एस आई पी मधे गुंतवल्यास हा धोकाही बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी होईल. moneycontrol व valueresarch यांचे संकेतस्थळांवर सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या म्यूचुअल फंड योजनांची यादी उपलब्ध आहे. त्याचा गुंतवणूक निर्णय घेण्यास संदर्भ म्हणून मदत होऊ शकेल.
   अशा प्रकारे विभाजन करूनही काही रक्कम शिल्लक रहात असल्यास काही उपलब्ध पर्याय व त्यावर मिळणारा परतावा खालीलप्रमाणे ----
   ४)दहा वर्षे मुदतीचे भारत सरकारचे कर्जरोखे :किमान गुंतवणूक 1000₹, सध्याचा व्याजदर 8%अर्ध वार्षिक ,व्याज करपात्र.
  ५)उच्च दर्जा धारण करणाऱ्या कंपनी ठेवी :मुदत 1ते 5 वर्ष किमान गुंतवणूक 5 ते 25 हजार ,व्याजदर 7 ते 8% व्याज करपात्र.
  ६)पोस्टाची मासिक प्राप्ती योजना :मुदत 5वर्ष किमान गुंतवणूक 6हजार कमाल 4.5 सहगुंतवणूकदारासह 9लाख , व्याजदर 7.5%
  ७)विविध पेन्शन योजना :या मध्ये रक्कम दीर्घकाळ गुंतून रहाते. मासिक व्याज निरंतर मिळत रहाते.विमा कंपन्या ,म्यूचुअल फंड ,पेन्शन फंड यांच्याकडून अशा योजना राबवल्या जातात.परतावा 6ते 7.5%.एवढा आहे.या योजनेची तपशीलवार माहिती योजनेच्या पुरस्कर्त्याकडून समजून घ्यावी.व्याज करपात्र.
   ८)मुदत ठेव योजना : बँक , पोस्ट , फायनांस कंपन्या ,गृहकर्ज देणाऱ्या कंपन्या , पतपेढी , मायक्रोफायनांस कंपन्या यांच्या योजना आहेत.मुदत 14 दिवस ते 7वर्ष ,व्याजदर 3.5ते 8%
   याशिवाय इतर विविध बचत योजना , सोने ,चांदी , कमोडिटी, समभाग वायदे व्यवहार ,विविध प्रकारचे कर्ज रोखे ,स्थावर मालमता खरेदी असे अनेक पर्याय उपलब्ध असून यातील प्रत्येक पर्याय हा वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकतो.
    या व्यतिरिक्त निवृत्त व्यक्तीने काही महत्वाच्या गोष्टी तसेच पैसे वाचवू शकणाऱ्या काही गोष्टी अंगीकारणे जरुरीचे आहे.पैसे वाचवणे म्हणजे पैसे मिळवणे होय.
    १}सर्व गुंतवणूक आपण व जोडीदार याचे संयुक्त नावे ठेवावी.त्यासाठी वारस नोंदणी करावी मिळालेल्या पावत्या , पासबुक सुरक्षित ठिकाणी ठेवून त्यांची वेगळ्या ठिकाणी नोंद करून ठेवावी.
   २}किमान काही महीने पै न पै चा जमाखर्च लिहावा आणि महीना अखेर त्याचा आढावा घेऊन भविष्यात अनावश्यक खर्च टाळावा.
   3}आपल्याला भेट म्हणून काही रक्कम द्यावी असे वाटते.होता होईतो आशा भेटी देऊ नयेत.आपल्या पश्चात ही रक्कम जोडीदारास व नंतर वारसाना आपल्या इच्छेनुसार मिळावी असे इच्छापत्र बनवून ठेवावे.
   ४}शक्यतो गुंतवलेली रक्कम मोडू नये.सध्या बऱ्याच बँका आपल्या बचतखात्याशी निगडीत मुदत ठेव बनवून देतात त्याचा वापर करावा.
  ५}दगाबाज मित्र आणि स्वार्थी नातेवाईक यांच्यापासून सावध रहावे.
   ६}योग्य किमतीस योग्य वस्तू (value for money) यास अनुसरून उचित व्यवहार कोठे होतात याचा सतत शोध घ्यावा म्हणजे आपोआपच पैसे वाचतील.
   ७}मोठ्या प्रमाणात सातत्याने काही औषधे लागत असतील तर, काही दुकानदार एम आर पी पेक्षा कमी दराने औषधे विकतात त्यांचा शोध घ्यावा.ऑनलाइनही 20%सूट मिळते.जेनेरीक औषधे अजून कमी किंमतीत मिळतात.काही वैद्यकीय चाचण्याही अल्पखर्चात वेगवेगळ्या न्यासामार्फत केल्या तेथे कराव्या.
   ८}आवश्यकता नसल्यास मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्तेत गुंतवणुक करु नये.कारण यामुळे आपल्या आर्थिक प्रवाहामध्ये फरक पडतो.
   ९}आपल्या पैशातून करदेयता वाढणार नाही याची पुरेशी काळजी घ्यावी
  १०}म्यूचुअल फंडातील अल्पमुदतीच्या नफ्यावरील करदेयता एस डब्ल्यू पी (sistyematic withdrawal plan) चा वापर करून कमी करण्याचा प्रयत्न करा.
   ११}आपल्या गुंतवणुकीवरील परताव्यातील काही भाग समभागसंबद्धीत योजनेत गुंतवून महागाईवर मात करा व आपली खरेदीक्षमता वाढवा.
    १२}नियोजन करताना किमान पुढील 25 वर्षे,हे कायम लक्षात ठेवा.
   ही यादी अजून वाढू शकते.ती आपण जास्तीत जास्त परिपूर्ण बनवू या.आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेेत.
 
     (एक महत्वाची सूचना :वरील लेख माझी निवृत्तीनंतरची गुंतवणूक सर्व साधारणपणे कशी असावी याचा विचार करून अभ्यासासाठी लिहीला असून यावर विचारमंथन व्हावे.वैयक्तिक गुंतवणूक करताना आपण गुंतवणूक सल्लागाराची मदत आणि मार्गदर्शन घ्यावे.)

उदय पिंगळे

Blog लिंक
https://udaypingales.blogspot.in/?m=1

Page लिंक
https://www.facebook.com/pingaleuday/

Friday, 24 February 2017

.राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (N P S)

   निवृत्तीवेतन (पेन्शन ) योजना म्हणजे अशी योजना जी आपल्या निवृत्तीनंतर खात्रीने उत्पन्न ,निश्चित कालावधीसाठी देण्याची हमी देते.या योजनेत सहभागी होऊन आपण योजनेचे हप्ते भरले असता जमा रकमेत दीर्घ काळात वाढ होते.ह्या  रकमेचे व्यवस्थापन करून धारकास दरमहा उत्पन्न मिळते.सर्वसाधारण पणे या वेळी  मिळणाऱ्या उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्याने या उत्पन्नातून अस्तित्वात असलेली जीवनशैली राखता येते.आपण कोणावरही अवलंबून नाही या भावनेतून आत्मसंन्मानात भर पडते.अशा प्रकारच्या योजना जीवन विमा कंपन्या ,म्यूचुअल फंड   आणि सरकार यांचेकडून राबवण्यात येतात.
  राष्टीय सेवानिवृत्ती योजना ही सरकारी मान्यता असलेली सेवानिवृत्ती योजना असून 18 ते 60 या वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकांस या योजनेत ऐच्छीकरीत्या सहभागी होता येते. तर 1जानेवरी 2004 नंतर रुजू झालेल्या केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना (सैन्य विभाग सोडून )या योजनेत सक्तीने सहभागी व्हावे लागते.पेन्शन वरील खर्चात बेसुमार वाढ झाल्याने  सरकारी कामगारांना पुर्वीच्या निश्चित हमी पेन्शन याऐवजी सहभागानुसार पेन्शन या बदलास सामोरे जावे लागत आहे.तर इतरांना पेन्शनचा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.
  या योजनेची अमंलबजावणी पी ए आर डी ए या पेन्शन नियामकाकडून केली जाते.त्याची मार्गदर्शक तत्वे त्यांनी जाहीर केली असून ती सरकारी कर्मचाऱ्यास वेगळी आणि इतर जनतेसाठी वेगळी आहेत. सरकारी निधीचे व्यवस्थापन भारतीय आयुर्विमा महामंडळ , एस बी आई पेन्शन , यू टी आई अेसेट मॅनेजमेंट यांचे कडून केले जात असून त्यामधे सरकारकडून मूळ वेतन व महागाई भत्ता यांच्या 10%रक्कम या योजनेत जमा केली जाते.योजनेची व्यवस्थापन फी 0.0102% इतकी आहे.कामगारांस स्वतःचे 10%योगदान द्यावे लागते.यातील निधीची गुंतवणूक करण्यासाठी समभाग गुंतवणुकीवर 15%ची मर्यादा आहे.खाजगी क्षेत्राचे मालकांना ही योजना ऐच्छिक आहे.
   सर्वसाधारण जनतेसाठी असलेल्या योजनेचे कार्य म्यूचुअल फंडाच्या बॅलन्स फंड योजनेसारखे चालते यातील निधीचे व्यवस्थापन आई सी आई सी आई प्रुडेन्शियल ,एच डी एफ सी ,कोटक महिंद्रा ,रिलायंस कॅपिटल ,एस बी आई ,यू टी आई या   6 वेगवेगळ्या व्यवस्थापकांमार्फत केले जात असून त्याना व्यवस्थापन फी योगदानाच्या 0.25% दिली जाते.या दोनही योजनांचा निधी समभाग, कर्जरोखे आणि सरकारी हमीकर्जे या तीन वेगवेगळ्या फंड प्रकारांत विभागण्यात येऊन समभागातील उच्च नफा आणि रोख्यातील सुरक्षितता यांचा समतोल साधण्यात येतो. जनते साठी असलेल्या योजनेत कोणत्याही परिस्थितित समभाग मर्यादा 50% पेक्षा जास्त होऊ दिली जात नाही.या योजनेतून मिळणारा परतावा फंड व्यवस्थापनावर अवलंबून असून यात समभाग समावेश असल्याने निश्चित परताव्याची हमी देता येत नाही.योजनेचे पी ओ पी  म्हणजेच मध्यस्थ म्हणून  कार्य करणारे ,यात बँक, पोस्ट , अर्थसंस्था यांचे मार्फत  प्रथम एक कायम निवृत्तीवेतन नोंदणी क्रमांक घ्यावा लागतो त्याला प्रान असे म्हणतात त्यासाठी अर्ज भरून देऊन फोटो ,ओळख , जन्मतारिख , स्वाक्षरी ,बँक खातेक्रमांक ,आई एफ सी कोड व  रहिवासी पुरावा द्यावा लागतो त्यानंतर टायर 1 आणि टायर 2 अश्या दोन प्रकारची खाती उघडता येतात.पहिल्या खात्यात जमा केलेली रक्कम ही पेन्शन योजनेच्या खरेदीसाठी जमा रक्कम समजण्यात येते ती सहजासहजी काढता येत नाही.तर दुसऱ्या खात्यातील रक्कम ही बचत खात्याचे प्रमाणे वापरता येऊन त्यातील शिल्लक कधीही काढता येऊ शकते.टायर 2प्रकारचे खाते नाही काढले तरी चालते.enps या पोर्टलवर सदर खाते प्रान तयार करून ऑनलाइनही उघडू शकतो आणि पैसेही भरू शकतो.खाते चालू ठेवण्यासाठी दरवर्षी किमान 1000/-₹ भरणे आवश्यक आहे.खाते उघडतानाच वरीलपैकी आपला फंड व्यवस्थापक निवडता येतो त्याचप्रमाणे समभाग , कर्जरोखे, सरकारी हमीकर्जे यांचे प्रमाण ठरवता येते.दर एक वर्षानी आपणास वाटले तर हे प्रमाण आपण बदलू शकतो.जर असे प्रमाण आपण ठरवून देऊ शकत नसलो तर आपल्या वयानुसार हे प्रमाण बदलण्याचा पर्याय आपण फंड व्यवस्थापकास देऊ शकतो.यामध्ये 35 वर्षपर्यंत समभाग प्रमाण 50%असून ते 60 व्या वर्षपर्यंत 10%पर्यत हळुहळू कमी होते तर सरकारी हमीकर्जाचे प्रमाण 30% वरून 80%पर्यत हळूहळू वाढत जाते.या योजनेतील खात्याची नोंद एन एस डी एल मार्फत अद्ययावत ठेवली जाते.या मधील जमा रकमेवर जमा करणाऱ्यास (व्यक्ति अथवा संस्था) आयकर अधिनियमानुसार सूट मिळते तसेच या योजनेवरील नफा करमुक्त आहे,तर मिळणारे पेन्शन करपात्र आहे.जास्तीत जास्त लोकांनी या योजनेत भाग घ्यावा म्हणून आयकर अधिनियम 80/सी सी डी (1बी)नुसार ₹50000/-ची अतिरिक्त सूट मिळून  2लाख रुपयांपर्यंत परंतु एकूण सूट 20% वार्षिक उत्पन्नच्या मर्यादेत करदात्यास  मिळू शकते.
   खातेदाराने 60 वर्ष पूर्ण केली की या योजनेतील काही रक्कम काढता येते तर उरलेल्या रकमेतून मान्यताप्राप्त योजनेतून नियमित पेन्शन देणारी योजना खरेदी करता येते.मुदतपूर्ती पूर्वी अथवा नंतर खाते धारकाचा मॄत्यू झाल्यास सर्व जमा रक्कम कोणतीही कर आकारणी न करता वारसास दिली जाते  2017/2018 चे प्रस्तावित अर्थसंकल्पात मुदतपूर्ती पूर्वी काढलेल्या मालकांच्या 25%योगदानावर आणि मुदतपूर्तीनंतर एकूण जमेच्या 40% रक्कम करमुक्त करण्याचे सूचवले आहे.या योजनेतील काही रकमेवर कर लागत असला तरी योजनेतील समभागाचे जमा राशीवर 12 ते 15% एवढा उच्च परतावा मिळणे शक्य आहे.सध्या सर्वांची आयुर्मर्यादा वाढत असल्याने आपले जीवनमान  उंचावण्यासाठी अशा प्रकारच्या योजनेची गरज आहे. या योजनेची तपशीलवार माहिती www.enps.nsdl.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

उदय पिंगळे

.... राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना महत्वाचा खुलासा....

    काल या योजनेची विस्तृत माहिती देणार लेख माझ्या fb पेज आणि वेगवेगळ्या गटांवर पोस्ट केला.आपल्यापैकी अनेकांना तो आवडल्याचेही समजले.काहींना यासंदर्भात असलेल्या शंकांचे मी निराकरण केले.हा लेख अधिकाधिक निर्दोष व्हावा म्हणून माझ्या काही जाणकार CA , MBA(fin) मित्रांना अभिप्रायार्थ पाठवला होता.लेख प्रसिद्ध करेपर्यंत त्यांचेकडून काही खास सूचना आल्या नाहीत. लेखातील माहिती बरोबर आहे , मात्र आज सकाळी माझ्या एका मित्राने (अनिरुद्ध जोशी जो  CA चा विद्यार्थी आहे) ज्या काही सूचना केल्या त्या मला तत्वता मान्य आहेत म्हणून हा खुलासा करीत आहे.
  एन पी एस मध्ये निश्चित परतावा मिळेल याची कोणतीही हमी नाही
मुदतपूर्ती नंतर किमान 40% जमाराशीची पेन्शन योजना घ्यावीच लागते.या योजनांचा सध्याचा व्याजदर 7% आहे हे पेन्शन आणि मुदतपूर्तीची रक्कम करपात्र आहे.त्यामुळे 50% इतक्या उच्च प्रमाणात समभाग सहभाग असला तरी अंतिंमत: किती परतावा मिळेल हे येणारा काळच ठरवेल.यापेक्षा तेवढीच रक्कम पी पी एफ मध्ये टाकली तर त्यावर करमुक्तदराने निश्चित उच्च परतावा मिळेल (सध्या हा व्याजदर 8% आहे)यातील पैसे तुलनेने काढणे सोपे आहे आणि ते करपात्र नाहीत.
    या सर्वांचा एकत्रित विचार करून 1/01/2004  पूर्वी ई पी एफ चे सदस्य असलेल्या ज्या कर्मचाऱ्यांनी ऐच्छिकरित्या या योजनेत सहभाग घेतला असेल त्यांनी त्याना उपलब्ध असलेल्या, ई पी एफ कडे पून्हा जाण्याचा पर्याय निवडावा तर अन्य लोकांनी जास्तीत जास्त रक्कम पी पी एफ मध्ये भरावी आणि पैसे न काढण्याची स्वयंशिस्त लावून घ्यावी.80/सी ची ज्यांची मर्यादा संपली असेल त्यांनी अधिकचा कर वाचवण्यासाठी एन पी एस मध्ये ₹50हजार भरून अधिकची करसवलत घ्यावी.
   जर nps वर चक्रवाढ व्याजदराने 11.5%एवढा परतावा मिळाला तरच ही दरी दूर होऊ शकते.करमुक्त व करपात्र उत्पन्नामुळे हा फरक पडतो. तेव्हा आपल्या आर्थिक प्रवाहाला धक्का न देता यामध्ये पैसे टाकावेत.

उदय पिंगळे

Saturday, 18 February 2017

सुकन्या समृध्धी योजना......

......सुकन्या समृध्धी योजना.....
         ~~~~~~~~~~~~
  ' कन्या ही परक्याचे धन ' या गैरसमजामुळे अनेक अशिक्षित आणि काही सुशिक्षित लोकांनाही  मुलीचा जन्म म्हणजे म्हणजे संकट वाटते. लोकांनी  ही मानसिकता बदलावी त्यांनी मुलींना वाढवावे , शिकवावे आणि  स्वावलंबी बनवावे त्यांच्या आत्मसंमानामध्ये भर पडावी याकरीता आपल्या पंतप्रधानांच्या 'बेटी बचाओ बेटी सिखाओ ' या धोरणास अनुसरून जानेवरी 2015 मध्ये या योजनेची सुरूवात करण्यात आली.या योजनेचे खाते मुलीचे जन्मानंतर लगेच अथवा तीचे वय 10 वर्षे पूर्ण होण्याचे आत तिच्या नावाने ,तिच्या पालकांना किंवा कायदेशीर पालकांना पोस्ट ऑफिस ,सरकारी बँक ,खाजगी बँक अथवा मान्यताप्राप्त सहकारी बँकेत काढता येते. खात्याची मुदत 21 वर्षे असून जास्तीत जास्त दोन मुलींच्या (अपवादाने तीन) नावे  खाती काढता येऊ शकतात.दत्तक मुलीचे नावानेही खाते उघडता येते. खाते काढण्यासाठी अर्जासोबत मुलीचा जन्म दाखला व पालकाचे के वाई सी (ओळख व निवास पुरावा)आणि फोटो याची जरूरी असते. या खात्यामध्ये एकत्रितपणे दरवर्षी किमान ₹ 1000/-  ते कमाल ₹150000/- भरता येतात आणि दरवर्षी काहीतरी रक्कम सलग  15 वर्षे भरावी लागते. यानंतर रक्कम भरली नाही तरी चालूशकते.वर्षातून कितीही वेळा रक्कम जमा करता येत असून दर महिन्याच्या 10 तारखेस शिल्लक असलेल्या रकमेवर त्या महीन्याचे पूर्ण व्याज देण्यात येते.मुलीचे वय 10 पूर्ण झाले की ,स्वतंत्रपणे हे  खाते तिला चालवता येते.मुलीला एस एस सी नंतर किंवा 18 वर्षे पूर्ण झाली की उच्च शिक्षणाकरीता शिल्लक रकमेच्या  50%पर्यत रक्कम योग्य ते पुरावे देऊन काढता येऊ शकते.मुलीचे वय 18 पूर्ण झाले असून जर तिचे लग्न ठरले तर अथवा 21वर्षे पूर्ण झाल्यावर कधीही खाते बंद करता येऊन खात्यातील सर्व रक्कम मुलीला मिळते.यावर कोणतीही कर आकारणी होत  नाही. अपवादात्मक परिस्थितीत गंभीर उपचारांसाठी पाच वर्षे पूर्ण झालेले खाते बंद करता येऊ शकते अन्य कारणाने खाते बंद केल्यास जमा रकमेवर बचत खात्याचे दराने व्याज मिळते.
  एकाद्या व्यक्तीने त्याच्या एक वर्षाच्या मुलीचे नावे जर 10/01/2017 रोजी या योजनेत खाते काढले असेल व दर महीना एक हजार रूपये प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपुर्वी पुढील 15वर्ष भरले तर त्याने जमा केलेल्या एकूण ₹180000/-चे 10/01/2138 या मुदत पुर्तीचे दिवशी सध्याचे 8.5%  हाच व्याजदर कायम राहिल्यास चक्रवाढ व्याजाने₹578390.70 इतके होतील योजनेत जमा केलेल्या रकमेवर आयकर अधिनियम 80/सी प्रमाणे पालकाला नियमाप्रमाणे सूट मिळते.व्याजावर तसेच मुदतपूर्तीचे रकमेवर कोणतीही कर आकारणी होत नाही.या योजनेचे व्याजदर हे सरकारकडून दर तीन महिन्यांनी निश्चित केले जातात हे दर 10 वर्षाच्या सरकारी कर्जरोख्यावरील व्याजदरापेक्षा 75बेसिस पॉईंटने (3/4%)जास्त असतात. सध्या या योजनेतील व्याज दरसाल 8.3% एवढा असून तो कोणत्याही सरकारी योजनेतील व्याजदरापेक्षा उच्च आहे.ही माहिती 1जुलै 2017 रोजीचा आहे .एकंदरीतच मुलीचे कल्याणाकरीता सरकारची हमी असणारी उच्च परतावा देणारी अशी ही अतिशय चांगली योजना असून आपल्या10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तसेच आपल्या परिचयातील अशा सर्व मुलींच्या पालकांपर्यत या योजनेची माहिती पोहोचवावी आणि त्याना या योजनेचे खाते काढण्यास उद्युक्त करावे आणि मुलींचे भवितव्य उज्ज्वल होण्यास मदत करावी.

उदय पिंगळे

अटल पेन्शन योजना......

अटल पेन्शन योजना.....

   असंघटित क्षेत्रातील व्यक्तींना ज्याना कोणतेही निवृत्ती वेतन मिळत नाही त्यांनी केलेल्या बचतीवर त्यांचे उतारवयात ठराविक रक्कम दर महीना मिळावी या उद्देशाने भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजी  यांचे नावाने सरकारच्या जन धन योजनेचा एक भाग म्हणून सर्वाना निश्चित पेन्शन यासाठी  ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी पी ए आर डी ए या पेन्शन नियामकाकडे असून त्यास अर्थ मंत्रालयाने हमी दिली आहे.जेवढा जास्त सहभाग तेवढे जास्त पेन्शन असे या योजनेचे स्वरूप असून त्याद्वारे प्रतीमहीना किमान एक ते कमाल पाच हजार रुपये एवढे निवृत्तीवेतन मिळण्याची हमी देण्यात आली आहे. 31 मार्च 2016 पूर्वी ज्यानी या योजनेत योगदान दिले असेल त्या॑ना त्यांचे जमाराशीच्या नीम्मे परंतु जास्तीत जास्त रूपये एक हजार दरवर्षी येवढी रक्कम प्रोत्साहन म्हणून पुढील पाच वर्षे सरकारकडून देण्यात येईल. मांत्र ही प्रोत्साहन राशी आयकर भरणाऱ्या अथवा पी एफ किंवा ई पी एफ धारकास मिळणार नाही.
   ज्याना 1 ते 5हजार एवढे निवृत्तीवेतन वयाच्या 60 व्या वर्षी हवे असेल अशा परंतु  18 ते 40 याच वयोगटातील बँकेत बचत खाते असलेल्या व्यक्तींनाच या योजनेत  सहभागी होता येईल.आपल्या वयानुसार आणि इच्छेनुसार दरमहा ,तीन महिन्याने अथवा सहा महिन्यांनी पैसे जमा करता येतील .म्हणजेच खात्याची मुदत 20 ते 42 वर्षे एवढी असेल. कोणत्याही पोस्ट ऑफिस ,सरकारी बँकेत अथवा या योजनेची धनराशी जमा करण्याचे अधिकार दिलेल्या खाजगी किंवा सहकारी बँकेत अर्ज करून या योजनेचे खाते उघडता येईल. एक हजार रुपए पेन्शनसाठी वयानुसार दरमहा 42 ते 291 रूपये भरावे लागतील तर पाच हजार पेन्शनसाठी मासिक 210 ते 1454 रुपये भरावे लागतील विविध वयोगटासाठी एक ते पाच हजार पेन्शनसाठी किती रक्कम  मासिक , तिमाहीस , सहामाहीस भरावी लागेल याचा तक्ता संबधीत बँकेत उपलब्ध आहे. योजना पूर्ण झाली की खातेधारकास तो जिवंत असेपर्यंत दरमहा पेन्शन मिळेल व वारसास 1 लाख 70 हजार ते 8 लाख 50 हजार एवढी रक्कम मिळेल. दीर्घ काळासाठी सातत्याने निश्चित रक्कम हमखास देऊ शकणारी आणि सरकारची हमी असलेली एकमेव योजना आहे. आपण पात्रता पूर्ण करीत असलो तर स्वतःसाठी त्याचप्रमाणे आपणास सेवा पुरवणारे जसे कामवाली ,धोबी ,पेपर टाकणारे ,दूध टाकणारे अशा लोकाना या योजनेची माहिती देवून बचत करण्यास प्रोत्साहित करावे.
हे खाते मुदतीपूर्वी बंद करता येते परंतु त्यात व्याजाचे नुकसान होते.तसेच खाते कालावधी पूर्ण होण्यापूर्वी धारकाचे निधन झाल्यास त्याचे वारसास व्याजासह जमा रक्कम परत करण्यात येते.

उदय पिंगळे
मोबाईल क्रमांक 8390944222
या व इतर आर्थिक विषयक लेख वाचण्यासाठी अर्थसाक्षरतेच्या दिशेने.....हे फेसबुक पेज पहा यासाठी खालील लिंकवर जा.

https://www.facebook.com/pg/pingaleuday/community/

Sunday, 29 January 2017

परस्पर निधी (म्यूचुअल फंड)..............👿

    परस्पर निधी (म्यूचुअल फंड)

  परस्पर निधी अर्थात म्यूचुअल फंड हा एक चलनवाढीवर मात करून आकर्षक उतारा मिळवून देऊ शकणारा गुंतवणूक प्रकार असून यामध्ये अनेक प्रकारच्या योजना अाहेत. आपण त्या काय आहेत हे जाणून घेऊ या.त्याचे गुंतवणूक कालावधीवरून दोन ,गुंतवणूक साधनावरून चार ,तर उत्पन्न विभागणीवरून दोन असे प्रमुख प्रकार आहेत. यामध्ये फंडाचे पुरस्कर्ते जनतेकडून अथवा उद्योगाकडून विशिष्ठ ध्येय्य डोळ्यासमोर ठेवून निधी गोळा करतात.तज्ञ गुंतवणूक व्यवस्थापकाचे मार्गदर्शनाखाली फंडाच्या उद्देशानुसार गुंतवणूक करून मिळालेला फायदा गुंतवणूकदरात वाटला जातो अथवा त्याची पुनर्गुतवणुक केली जाते.गुंतवणूक व्यवस्थापनासाठी फी आकारली जाते आणि ती फंडाच्या वर्गणीतून गुंतवणूकदारांकडून घेतली जाते. AMFI (The Association of Mutual Fund in India)या त्यांच्या संघटनेकडून उचित व्यापारी प्रथेचे पालन आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळेल असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.फंडातील गुंतवणूक ही    समभाग , कर्जरोखे ,अल्प/ दीर्घ मुदतीची कर्जे इ. भांडवलबाजाराशी संबधीत साधनांत केली जात असल्याने यावर SEBI(Securities and Exchange Board of India) या नियामकाचे अंतिम नियंत्रण आहे.
   सर्वसामान्य गुंतवणूकदारास भांडवल बाजारात गुंतवणूक करताना काही मर्यादा येतात. म्यूचुअल फंडाकडे अनेक गुंतवणूकदरांकडून एकत्रित रक्कम  जमा होत  असल्याने आणि एका विशिष्ठ ध्येय्याने आणि मार्गदर्शनाने कामकाज करीत असल्याचा लाभ त्याला होतो. म्यूचुअल फंडाचे भांडवलबाजारातील गुंतवणुकीचे मूल्यास एकूण वितरित केलेल्या यूनिट्सच्या संख्येने भागल्यास त्याचे नगद मूल्य (एन ए व्ही  ) मिळते. जेव्हा एखादी नवीन योजना बाजारात विक्रीसाठी येते तेव्हा त्याचे मूल्य त्याच्या दर्शनी मूल्याएवढे असते आणि त्यांनी केलेल्या गुंतवणूकीतील भावाचे चढउतारानुसार त्यात वट घट होते. प्राथमिक विक्री योजना बंद झाल्यावर एन ए व्ही  प्रमाणे त्याची खरेदी विक्री मान्यताप्राप्त शेअर दलाल अभिकर्ते यांचेमार्फत अथवा  फंडहाउसकडून थेट होऊ शकते. योजनेतून बाहेर पाडण्याच्या  कालावधीनुसार त्यावर अधिभार द्यावा लागतो,तो गुंतवणूक कालावधीनुसार कमी कमी व नंतर शून्य होतो.खरेदी अथवा विक्री यासाठी कामकाजाचे दिवसाची दुपारचे तीन ही महत्वाची वेळ आहे. यापूर्वीची खरेदी विक्री त्याच दिवशीचे एन ए व्ही प्रमाणे होते तर त्यानंतरची खरेदीविक्री कामकाजाचे पुढील दिवसाचे एन ए व्ही प्रमाणे होते.
   गुंतवणूक कालावधी वरून म्यूचुअल प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.
1)निरंतर (ओपन  एंडेड): यामध्ये आपणास कधीही गुंतवणूक करता येते आणि कधीही काढून घेता येते.
2)मुदतबंद (क्लोज़ एंडेड):यामधे प्राथमिक विक्रीचेवेळी यूनिट खरेदी करता येतात आणि ठराविक मुदतीनंतर यूनिटचे विमोचन (Redeem) अथवा सदर यूनिट आपोआपच निरंतर योजनेमधे वर्ग केले जातात.
  म्यूचुअल फंडाचे ते प्रामुख्याने करीत असलेल्या गुंतवणूक साधनांवरून चार प्रकार पडतात
1)ईक्विटी (समभाग)म्यूचुअल फंड : नावाप्रमाणे या फंडाची गुंतवणूक प्रामुख्याने समभागात केली जाते त्यामुळे या गुंतवणूकीतून अधिक आणि आकर्षक परतावा मिळू शकतो.समभाग वर्गवारीनुसार लार्ज /मिड /स्मॉल /इनफ्रास्ट्रक्चर /डायवर्सीफाईड /सेक्टरल /इंडेक्स फंड असे याचे उपप्रकार आहेत. या शिवाय करबचतीसाठी ई एल एस एस ही योजना आहे.
2)डेट (कर्जरोखे)म्यूचुअल फंड : या फंडातील गुंतवणूक ही कर्जरोख्यात असते त्यामुळे यातून मिळणारा परतावा तुलनेने कमी त्याचप्रमाणे धोकाही कमी असतो.रोख्याचे कालावधीवरून याचे लॉग /शॉर्ट टर्म डेट फंड असे उपप्रकार आहेत.
3)हायब्रीड फंड :यामधे इक्विटि व डेट यांचा समतोल साधण्यात येतो.अनेक गुंतवणूकदाराना कर्जरोख्यांची सुरक्षितता व समभागाचा आकर्षक परतावा या दोन्ही गोष्टी हव्या असतात. त्याचप्रमाणे अनेकांना विशेषत: सेवानिवृत्त लोकाना दरमहा ठराविक रक्कमेची गरज असते परंतु जोखिम घेण्याची तयारी नसते.या योजना बॅलन्स फंड अथवा मासिक उत्पन्न फंड योजना या नावाने विकल्या जातात.
4)मनी मार्केट म्यूचुअल फंड : यामधील सर्व गुंतवणूक अल्प/दीर्घ  मुदतीच्या कर्जात केली जाते तुलनेत सर्वात सुरक्षित असा हा फंड प्रकार असून उच्च उत्पन्नधारक आणि भरपुर गंगाजळी असलेल्या कंपन्या यामधे गुंतवणूक करतात.
म्यूचुअल फंडाचे उत्पन्न विभागणी वरून दोन प्रकार पडतात.
1)डीवीडेंड : यामध्ये ठराविक कालावधीनंतर उत्पन्नाचे वाटप लाभांश रूपाने केले जाते तो धारकास दिला जातो अथवा जर त्याने या रकमेचे यूनिट घेण्याचा पर्याय दिला असल्यास तेवढे यूनिट घेतले जातात.
2)ग्रोथ :यामधे उत्पन्नाची वाटणी केली जात नाही सातत्याने फायदेशीर पुनर्गुतवणूक केली जात  असल्याने दीर्घकाळात एन ए व्ही  वाढत असल्याने आकर्षक लाभ होतो.
  आयकरात लाभ देणाऱ्या समभागसलग्न करबचत योजना (ई एल एस एस ) आहेत.यामधे डीवीडेंड व ग्रॉथ हे पर्याय असून हे यूनिट तीन वर्ष विकता येत नाहीत तसेच लाभांश रकमेचे युनिट घेता येत नाहीत.
 त्याचप्रमाणे सर्वसाधारण गुंतवणूकदारास 'थेंबे थेंबे तळे साचे' या न्यायाने गुंतवणूकीस वाढ करण्यासाठी एस आई पी हा पर्याय  उपलब्ध आहे यामध्ये दररोज /आठवड्यास /पंधरवड्यास /मासिक /त्रीमासीक गुंतवणूक करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.यामुळे गुंतवणूकीत आवर्ती वाढ आणि बाजारातील चढ उतार यामुळे सरासरीचा फायदा मिळू शकतो.
  अनेक फंड योजना व त्यांचे पुरस्कर्ते यामुळे अधिकाधिक आकर्षक आणि गुंतवणूकदाराच्या विविध आपेक्षा पूर्ण करणाऱ्या कल्पक योजना बाजारात आहेत व येत आहेत.आपल्या आपेक्षा , जोखिम घेण्याची तयारी आणि गरजा पूर्ण करणारी योजना निवडावी. तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. www.moneycontrol.com तसेच  www.valueresearchonline.com या संकेतस्थळांवर विविध योजना त्यांचा परतावा त्यांचे कामगिरीनुसार क्रमवारी यांची माहिती उपलब्ध आहे तिचा लाभ घ्यावा.गुंतवणूक योजनेचा सातत्याने आढावा घेऊन त्यात आवश्यक बदल करावेत.आपल्या उत्पन्नातील काही भाग हा किमान दोन एस आई पी मध्ये विभागून टाकावा जेणेकरून एक एस आई पी दीर्घ मुदतीचे ध्येय आणि दूसरी एस आई पी सेवानिवृत्तीनंतर कमी येऊ शकेल.
  म्यूचुअल फंडाप्रमाणेच ई टी एफ हा एक गुंतवणूक प्रकार असून याचे व्यवहार फक्त शेअर मार्केट मध्येच होतात यामध्ये तो ई टी एफ ज्या निर्देशांकाचे प्रतिनिधित्व करतो त्यांतील शेयर्सचे प्रमाणानुसार गुंतवणूक केली जात असल्याने मार्केटमध्ये ज्याप्रमाणे चढ उतार होत असतील , त्याचप्रमाणे मागणी आणि पुरवठा या तत्वानुसार त्याचे कीमतीत (रिअल टाइम)फरक पडत असतो. मार्केट खाली असल्यास खरेदी करून आणि वाढल्यावर ई टी एफ विकून फायदा मिळवणे शक्य आहे.

उदय पिंगळे
मोबाईल नंबर 8390944222
हा व इतर अर्थ विषयक लेख या fb पेजवर वाचा आणि प्रतिसाद द्या.
https://www.facebook.com/pg/pingaleuday/community/
अथवा या blog लिंक वर जा.
https://udaypingales.blogspot.in/?m=1

Sunday, 15 January 2017

सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन.......😃

सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन......😆

   अजून थोड्याच दिवसात हे आर्थिक वर्ष संपेल.पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितिचा अंदाज  घेवून वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेवून करबचत करणे शक्य असून आपण त्याना मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेवू या.
  आपणास कर किती लागू शकतो याचा अंदाज घ्या. 2016/17 या आर्थिक वर्षासाठी सर्व मार्गाने मिळणारे ऐकून उत्पन्न ₹2लाख 50हजारचे आत असेल तर तर आपणास कोणताही आयकर द्यावा लागत नाही जर आपले वय 60हून अधिक असेल तर करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ₹3लाख व आपण अतीवरीष्ठ नागरीक असाल म्हणजेच आपले वय 80 पेक्षा जास्त असेल तर ही मर्यादा ₹5लाख एवढी आहे. लक्षात घ्या उत्पन्नावर कर आहे खर्चावर नाही आपले सर्व मार्गाने होणारे ऐकून उत्पन्न यासाठी विचारात घेणे जरुरीचे आहे.या करमुक्त मर्यादेतील 5 लाखापर्यतचे उत्पन्नावर 10% त्यावरील 10 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्नावर 20%आणि त्यावरील उत्पन्नावर 30% या दराने आयकर लागतो. या एकूण करावर 3% दराने  शैक्षणिक,स्वच्छ भारत व कृषीकर द्यावा लागतो.ज्यांचे वार्षिक उत्पन्न  1 कोटीचे वर आहे त्या॑ना करावर 15% अतिरिक्त सरचार्ज द्यावा लागतो. हा एकूण         करदायित्वांवरील कर आहे. (Tax on tax) तर ज्यांचे एकूण उत्पन्न ₹5लाख चे आत आहे त्याना आयकर अधिनियम 87/ A अनुसार जास्तीत जास्त ₹5हजार ची कर भरपाई मिळू शकते. म्हणजेच एकूण करातून जास्तीत जास्त 5हजार रुपये कमी द्यावे लागतात.
   आयकरासाठी ज्याप्रमाणे सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केला जातो त्याचप्रमाणे विविध बचत आणि खर्च यांना विहित मर्यादेत सूट दिली जाते.
यातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे --
  1)विविध बचत गुंतवणूक योजना व खर्चाना मिळणाऱ्या सवलती: या मध्ये विहित मर्यादेत जमा केलेली रक्कम एकत्रित उत्पन्नातून कमी होत असल्याने एकूण करदायित्व कमी होते.आयकर अधिनियम            80/C ,80/CCC ,80/CCD एकत्रित  मिळून जास्तीत जास्त दीड लाख रुपए सूट मिळू शकते.                     80/C ची सवलत मिळणाऱ्या अनेक योजना आहेत यामध्ये पी एफ वर्गणी,वी पी एफ ,पी पी एफ मधील जमा केलेली रक्कम ,विमा हप्ते ,एन एस सी ,एन एस सी व्याज ,5 वर्ष मुदतीच्या करबचत मुदत ठेवी ,वरीष्ठ नागरिक बचत योजना ,सुकन्या समृध्धी योजना ,गृहकर्ज मूद्दल , रजिस्टरेशन खर्च ,दोन मुलांचा शैक्षणिक खर्च ,करबचतीच्या समभाग संलग्न योजना यांमधे जमा केलेली रक्कम यांचा समावेश होतो.
80/CCC मध्ये विमा कंपन्या व म्यूचुअ ल फंडाच्या पेन्शन योजनांचा समावेश होतो.
80/CCD मधे केंद्रीय कर्मचाऱ्याच्या नवीन पेन्शन योजनेच्या वर्गणीचा समवेत होतो.       यापैकी एक अथवा अनेक ठिकाणी जमा केलेली रक्कम जास्त होत असली तरी सूट दीड लाख एवढीच मिळते.2015 पासून 80/ CCD(1B) नुसार एन पी एस मध्ये जमा केलेल्या ₹50000/-रुपयांवर अतिरिक्त सूट मिळते अशाप्रकारे एकूण दोन लाख रुपये एवढी वजावट मिळू शकते.
   2)आरोग्य सामाजिक सुरक्षा आणि पुनर्वसन योजनावर मिळणाऱ्या सवलती : यामध्ये आयकर कलम 80/D ,80/DD ,80/DDE ,80/DU यांचा सामावेश  होतो. 
  80/D नुसार स्वतःचा , जोडीदाराचा आणि दोन मुलांच्या आरोग्य विम्याच्या हप्त्यापोटी भरलेल्या रकमेवर ₹25000/- जमाकर्ता जेष्ठ नागरिक असेल तर ₹30000/- पर्यत सूट मिळते त्याचप्रमाणे जमाकर्त्यावर अवलंबीत पालकांच्यासाठी भरलेल्या हप्त्यावर अतिरिक्त सूट मिळते तेव्हा या कलमानुसार किमान ₹25 ते कमाल 60 हजार रुपयांची सूट मिळू शकते.
  80/DD नुसार अवलंबीत अपंग जोडीदार, मूल ,पालक ,भाऊ बहीण यांचे वैद्यकीय              उपचार ,कल्याणकारी विमा योजनेचा भरलेला हप्ता यावर केलेला खर्च हा अपंगत्वाचे प्रमाणानुसार ₹75 हजार ते ₹1लाख 25 पर्यंत आहे गृहित धरून सूट घेता येते यासाठी खर्चाच्या पुराव्याची कोणतीही गरज नाही.
  80/DDE या कलमानुसार स्वतः साठी ,जोडीदारासाठी ,मूल , अवलं बीत भाऊ बहीण आई वडील यांच्यावर काही विशिष्ठ आजारावर केलेल्या खर्चाबद्द्ल वयानुसार ₹40 ते 80 हजार रुपयांची सूट घेता येते.
  80/DU या कलमानुसार अपंग करदात्यास त्याच्या अपंगत्वाचे प्रमाणानुसार त्याच्या उत्पन्नातून ₹75हजार ते 1लाख 25 हजारांची सूट मिळू शकते.
   3) विविध कर्जावरील व्याजावर मिळणारी सूट : यामध्ये आयकर कलम 80/E ,Section 24 ,80/EE यांचा समावेश होतो.
  80/E नुसार   स्वतःसाठी , जोडीदारासाठी अथवा मुलांचे उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील
 व्याज कर्ज घेतल्यापासून 8वर्षापर्यत कोणत्याही मर्यादेशिवाय सूट मिळण्यासाठी पात्र आहे.
  Section 24 नुसार गृहकर्जावरील व्याजाला जास्तीत जास्त 2लाख  रुपयांची व घरदुरुस्ती कर्जावर 30 हजार रुपयांची सूट मिळते.
  80/EE नुसार पहिल्यांदा घरासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीस 50 हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळते.
  4)विविध दान आणि मदतनिधीस मिळणारी सूट : यामध्ये कलम 80/G व 80/GGC यांचा समावेश होतो.
 80/G नुसार मान्यताप्राप्त संस्था , न्यास यांना दिलेली एकूण उत्पन्नाच्या 10% मर्यादेत 50 ते 100%सूट मिळते.
  80/GGC नुसार मान्यताप्राप्त राजकीय पक्षास दिलेल्या देणगीतून एकूण उत्पन्नाच्या मर्यादेत 50% पर्यंत सूट मिळते.
  5)इतर काही कलमानुसार मिळणाऱ्या सवलती : यामध्ये 80/GG ,80/CCG ,80/TTA यांचा समावेश होतो.
  80/GG मध्ये काही अटींची पूर्तता केल्यास दरमहा 5हजार रुपये एवढी घरभाड्याची वाजवट मिळु शकते.
   80/ CCG यानुसार 12 लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेले , भांडवल बाजाराशी संबध नसलेल्या लोकाना बाजारात आणण्यास प्रोत्साहन देण्यासाठी RGESS या योजनेतून त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर 50% सूट मिळते ही सूट जास्तीत जास्त 25 हजार रुपयांपर्यंत मर्यादीत आहे.म्हणजेच 50 हजार पर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येऊ शकते.
  80/TTA या कलमानुसार बचत खात्यातील रकमेवर मिळालेले 10 हजार रुपयावरील  व्याज करमुक्त आहे.
   या ठळक तरतुदींशिवाय अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर मुळातून एस टी टी कापला असेल सवलतीचे दराने कर तर दीर्घ मुदतीचे भांडवली नफा करमुक्त आहे.भांडवल बाजारातील कंपन्यांनी दिलेला लाभांश करमुक्त आहे.वेगवेगळ्या पायाभूत सुविधा पूरवाणारे करमुक्त कर्जरोख्यावरील व्याज करमुक्त आहे. 
  या तरतुदीशिवाय इतर अनेक तरतुदीमुळे आपली करदेयता लक्षणीयरित्या कमी होऊ शकते.वर फक्त सर्वसमावेशक तरतुदींचा विचार केला आहे.यातील प्रत्येक तरतुदीवर स्वतंत्रपणे तपशीलवार लेख लिहिता येऊ शकेल.
  या सर्व तरतुदी त्यातील अटींसह  www.incometaxindia.gov.in या आयकर विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.त्या पहाव्यात अथवा तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.आपल्या करविषयक शंकांचे निराकरण आपण www.taxguru.in या संकेतस्थळावर प्रतिसाद देवून करु शकता.

उदय पिंगळे 
माझ्या या व इतर अर्थविषयक लिखाणासाठी fb  वरील अर्थसाक्षरतेचे दिशेने हे page पहा त्यासाठी या लिंकवर  जा........

https://www.facebook.com/pg/pingaleuday/community/

Wednesday, 11 January 2017

ऑनलाईन व्यवहार काही अनुभव.......

 ऑनलाइन व्यवहार काही अनुभव........

       नोटाबंदीच्या अनुषंगाने आपण आपले व्यवहार रोख पैसे न देता करण्यासाठी, ज्याकाही उपाययोजना सुचवल्या जात आहेत त्यामधे ऑनलाईन व्यवहार हा एक महत्वाचा पर्याय आहे. 8 नोव्हेंबर नंतर असे व्यवहार करण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. यापूर्वी असे व्यवहार उच्चशिक्षित लोक व तरुण पिढी या गटापुरता मर्यादित होता. वास्तविक अनेक लोकांकडे असे व्यवहार करता येतील अशी यंत्रणा होती परंतू ती आपण वापरावी असे फारच थोड्या लोकांना वाटत होते. त्यांना अशा व्यवहारांची भीती वाटत होती आणि अन्य मार्ग असल्याने ऑनलाइन व्यवहार करण्याची जरूरी नव्हती. त्यामुळे आपणहून असे व्यवहार करावेत असे फारच थोड्या लोकाना वाटत असणार. मी एक त्यापैकी आहे. एक तर असे व्यवहार कसे करावेत हे शिकून घेणे अगदी सोपे आहे. त्यामुळे रोख पैसे बाळगणे ,रांगेत उभे राहणे ,ठराविक वेळेचे बंधन पाळणे यापासून सुटका होते. आपणही असे व्यवहार सहज करु शकतो हा आत्मविश्वास येतो. असे व्यवहार कसे करावेत यापेक्षा यामध्ये काही गैरव्यवहार झाले तर काय करावे हेही आपणास माहिती असले पाहिजे. मी हे व्यवहार अलीकडेच शिकलो माझे वय 55 आहे. रोख किंवा चेकने पैसे देणे एवढेच मला माहिती होते या सहा महिन्यात मी अनेक गोष्टी स्वतः करून पहिल्या त्यामुळे या गोष्टी मी करु शकतो याचा मला आनंद मिळाला आज मी या गोष्टी कशा शिकलो यापेक्षा काही चुकीच्या व्यवहारासंदर्भातील आलेले दोन अनुभव कथन करतो आहे.
   मी नेटबँकिंगद्वारे एक वस्तु खरेदी केली या वस्तूचे पैसे देताना बँकेकडून आलेला ओ टी पी (One Time Password )आणि माझा पिन यांची नोंद केल्यावर हा व्यवहार पूर्ण झाला नाही असा संदेश स्क्रीनवर आला त्यामुळे मी तोच व्यवहार नवा otp घेऊन पुन्हा केला. माझ्या दृष्टीने व्यवहार पूर्ण झाल्याने विषय संपला होता परंतू प्रत्यक्षात या एकाच व्यवहारासाठी माझ्याकडून दोनदा पैसे दिले गेले असे खात्याची तपासणी केले असताना आढळून आले. व्यवहार केलेली कंपनी इंदूर मधील होती आणि वारंवार विचारणा करूनही ते लोक दाद देत नव्हते मी फोन केल की चौकशी करून आपणास पुन्हा फोन करु असे सांगायचे पण प्रत्यक्षात फोन करायचे नाहीत. वास्तविक त्याना दोन वेळा माझ्याकडून पैसे मिळले आहेत याची खात्री करून पैसे ताबडतोब परत करता आले असते आणि मग त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार राहिली नसती. मी माझ्या बँक शाखेत जाऊन ही सर्व गोष्ट कथन केल्यावर त्यांनी माझेकडून एक फॉर्म भरून घेतला तो भरून दिल्यानंतर जी काही करवाई झाली असेल ती आश्चर्यकारक होती. मला त्या कंपनीतून फोन आला त्यांनी माझी तक्रार ऐकून घेतली. त्यानंतर माझे समाधान अन्य वस्तु खरेदी करून होते का ते पाहिले मी त्यास नकार दिला त्यानंतर सतत तीन दिवस रोज मला त्यांच्याकडून फोन येत होते मी पैसे परत हवे असे म्हणत होतो.शेवटी ते पैसे देतो पण आधी तक्रार मागे घ्या असे म्हणाले मीही या गोष्टींसाठी तयार झालो परंतू बँकेत गेल्यावर त्यांनी मला सूचवले की तक्रार मागे घेतली तर जर त्यांनी नंतर पैसे नाही दिले तर तुम्ही काय करणार ?मला ते पटले मग पुन्हा फोन आल्यावर त्याना सांगितले की मी तक्रार मागे घेणार नाही जर तुम्ही आधी माला पैसे दिलेत तरच मी तक्रार मागे घेईन असे सांगितल्यावर त्यांच्याकडून येणारे फोन बंद झाले.यथावकाश कंपनीकडून बँक व बँकेकडून मला पैसे मिळाले.
   दूसरी गोष्ट अगदी अलीकडची 29 डिसेंबरला सकाळी 07:40 ला मी क्रेडिट कार्ड वर 421 USD ची मी खरेदी केली म्हणून आभार मानणारा संदेश आला आणि मी उडालोच. ही एक सायबर गुन्ह्याची केस आहे हे माझ्या ताबडतोब लक्षांत आले.मी बँकेचे ग्राहक सेवा प्रतिनिधिशी संपर्क साधून त्यांचे निदर्शनास आणली दरम्यानच एक 470 USD चा व्यवहार त्यांचेकडे माझेच कार्डवरून होणार होता तो थांबवला आणि कार्ड रद्द केले. आधीचा व्यवहार पूर्ण झालेला असल्याने त्यासंदर्भात हरकत नोंदवली. त्यांनी सुचवल्याप्रमाणे त्यांचे ग्राहक सेवा विभागात ई मेल द्वारे तसेच रजिस्टर्ड पोस्टाने रीतसर तक्रार नोंदवली. या सर्व गोष्टीत बँकेकडून सहकार्यचा चांगला अनुभव आला. वादग्रस्त व्यवहारामुळे कमी झालेली व्यवहार मर्यादा मला ताबडतोब देण्यात आली.रद्द केलेल्या कार्डचे बदल्यात नवे कार्ड दिले गेले. त्याचप्रमाणे दिलेल्या तक्रारी संदर्भातील निर्णय योग्यची चौकशी करून मला 50 दिवसात कलावण्यात येईल असे फोन करून आणि मेलवर कळवले. थोडक्यात यथावकाश चौकशी होवून हे प्रकरण मार्गी लागेल.
    या अनुभवांवरून online व्यवहार करावेत की नाही यावर सम्भ्रम निर्माण होईल. तरीही असे व्यवहार करावेत असे माझे मत आहे कारण ही काळाची गरज आहे व्यवहारांचे तुलनेत गैरव्यवहारांचे प्रमाण अल्प आहे आणि तक्रार निवारण करण्याची यंत्रणा आहे. आपल्याकडून आपण  गैरव्यवहार होऊ नयेत म्हणून खालीलप्रमाणे काळजी घ्यावी --
   1)नेट बँकिंगसाठी बँकेचे app असेल तर ते वापरावे.
   2)कोणालाही आपले कार्ड नंबर, पिन ,ओ टी पी देऊ नये.बँक कधीही ग्राहकास ही माहिती विचारीत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही बक्षीसाचे आमिषास भूलू नये.
   3)वेळोवेळी आपण पासवर्ड बदलावा.
   4)कार्डवरील cvv लक्षांत ठेवावा आणि कोणास समजणार नाही अशा प्रकारे नाहीसा करावा.कार्ड स्वतः स्वाईप करावे आणि पिन स्वतः टाकावा.
   5)ऑनलाईन व्यवहार सायबर कॅफे फ्री वाई फाय उपलब्ध असलेल्या ठिकाणी असे करु नयेत.
   6)शक्यतो एकच कम्प्यूटर अथवा मोबाईल वापरावा त्यावर पासवर्ड साठवून ठेऊ नये. मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असतील तर योग्य anti virus टाकून घ्यावा  आणि अशा व्यवहारांकरिता जरूर तर विमा उतरवून घ्यावा.
   7)जर असा व्यवहार निदर्शनास आला तर ग्राहक सेवा प्रतिनिधीशी संपर्क साधून त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे कार्यवाही करावी.
   8)या कार्यवाहीने आपले समाधान न झाल्यास बँकिंग लोकपाल अथवा ग्राहक मंचाचे मार्फत तक्रारीचा पाठपुरावा करावा.
   9)या दरम्यान आलेले अनुभव इतरांना सांगून त्याना जरूर ती मदत व मार्गदर्शन करावे.
 
Rd
उदय पिंगळे