Saturday, 18 February 2017

सुकन्या समृध्धी योजना......

......सुकन्या समृध्धी योजना.....
         ~~~~~~~~~~~~
  ' कन्या ही परक्याचे धन ' या गैरसमजामुळे अनेक अशिक्षित आणि काही सुशिक्षित लोकांनाही  मुलीचा जन्म म्हणजे म्हणजे संकट वाटते. लोकांनी  ही मानसिकता बदलावी त्यांनी मुलींना वाढवावे , शिकवावे आणि  स्वावलंबी बनवावे त्यांच्या आत्मसंमानामध्ये भर पडावी याकरीता आपल्या पंतप्रधानांच्या 'बेटी बचाओ बेटी सिखाओ ' या धोरणास अनुसरून जानेवरी 2015 मध्ये या योजनेची सुरूवात करण्यात आली.या योजनेचे खाते मुलीचे जन्मानंतर लगेच अथवा तीचे वय 10 वर्षे पूर्ण होण्याचे आत तिच्या नावाने ,तिच्या पालकांना किंवा कायदेशीर पालकांना पोस्ट ऑफिस ,सरकारी बँक ,खाजगी बँक अथवा मान्यताप्राप्त सहकारी बँकेत काढता येते. खात्याची मुदत 21 वर्षे असून जास्तीत जास्त दोन मुलींच्या (अपवादाने तीन) नावे  खाती काढता येऊ शकतात.दत्तक मुलीचे नावानेही खाते उघडता येते. खाते काढण्यासाठी अर्जासोबत मुलीचा जन्म दाखला व पालकाचे के वाई सी (ओळख व निवास पुरावा)आणि फोटो याची जरूरी असते. या खात्यामध्ये एकत्रितपणे दरवर्षी किमान ₹ 1000/-  ते कमाल ₹150000/- भरता येतात आणि दरवर्षी काहीतरी रक्कम सलग  15 वर्षे भरावी लागते. यानंतर रक्कम भरली नाही तरी चालूशकते.वर्षातून कितीही वेळा रक्कम जमा करता येत असून दर महिन्याच्या 10 तारखेस शिल्लक असलेल्या रकमेवर त्या महीन्याचे पूर्ण व्याज देण्यात येते.मुलीचे वय 10 पूर्ण झाले की ,स्वतंत्रपणे हे  खाते तिला चालवता येते.मुलीला एस एस सी नंतर किंवा 18 वर्षे पूर्ण झाली की उच्च शिक्षणाकरीता शिल्लक रकमेच्या  50%पर्यत रक्कम योग्य ते पुरावे देऊन काढता येऊ शकते.मुलीचे वय 18 पूर्ण झाले असून जर तिचे लग्न ठरले तर अथवा 21वर्षे पूर्ण झाल्यावर कधीही खाते बंद करता येऊन खात्यातील सर्व रक्कम मुलीला मिळते.यावर कोणतीही कर आकारणी होत  नाही. अपवादात्मक परिस्थितीत गंभीर उपचारांसाठी पाच वर्षे पूर्ण झालेले खाते बंद करता येऊ शकते अन्य कारणाने खाते बंद केल्यास जमा रकमेवर बचत खात्याचे दराने व्याज मिळते.
  एकाद्या व्यक्तीने त्याच्या एक वर्षाच्या मुलीचे नावे जर 10/01/2017 रोजी या योजनेत खाते काढले असेल व दर महीना एक हजार रूपये प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपुर्वी पुढील 15वर्ष भरले तर त्याने जमा केलेल्या एकूण ₹180000/-चे 10/01/2138 या मुदत पुर्तीचे दिवशी सध्याचे 8.5%  हाच व्याजदर कायम राहिल्यास चक्रवाढ व्याजाने₹578390.70 इतके होतील योजनेत जमा केलेल्या रकमेवर आयकर अधिनियम 80/सी प्रमाणे पालकाला नियमाप्रमाणे सूट मिळते.व्याजावर तसेच मुदतपूर्तीचे रकमेवर कोणतीही कर आकारणी होत नाही.या योजनेचे व्याजदर हे सरकारकडून दर तीन महिन्यांनी निश्चित केले जातात हे दर 10 वर्षाच्या सरकारी कर्जरोख्यावरील व्याजदरापेक्षा 75बेसिस पॉईंटने (3/4%)जास्त असतात. सध्या या योजनेतील व्याज दरसाल 8.3% एवढा असून तो कोणत्याही सरकारी योजनेतील व्याजदरापेक्षा उच्च आहे.ही माहिती 1जुलै 2017 रोजीचा आहे .एकंदरीतच मुलीचे कल्याणाकरीता सरकारची हमी असणारी उच्च परतावा देणारी अशी ही अतिशय चांगली योजना असून आपल्या10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तसेच आपल्या परिचयातील अशा सर्व मुलींच्या पालकांपर्यत या योजनेची माहिती पोहोचवावी आणि त्याना या योजनेचे खाते काढण्यास उद्युक्त करावे आणि मुलींचे भवितव्य उज्ज्वल होण्यास मदत करावी.

उदय पिंगळे

No comments:

Post a Comment