Saturday, 18 February 2017

अटल पेन्शन योजना......

अटल पेन्शन योजना.....

   असंघटित क्षेत्रातील व्यक्तींना ज्याना कोणतेही निवृत्ती वेतन मिळत नाही त्यांनी केलेल्या बचतीवर त्यांचे उतारवयात ठराविक रक्कम दर महीना मिळावी या उद्देशाने भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजी  यांचे नावाने सरकारच्या जन धन योजनेचा एक भाग म्हणून सर्वाना निश्चित पेन्शन यासाठी  ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी पी ए आर डी ए या पेन्शन नियामकाकडे असून त्यास अर्थ मंत्रालयाने हमी दिली आहे.जेवढा जास्त सहभाग तेवढे जास्त पेन्शन असे या योजनेचे स्वरूप असून त्याद्वारे प्रतीमहीना किमान एक ते कमाल पाच हजार रुपये एवढे निवृत्तीवेतन मिळण्याची हमी देण्यात आली आहे. 31 मार्च 2016 पूर्वी ज्यानी या योजनेत योगदान दिले असेल त्या॑ना त्यांचे जमाराशीच्या नीम्मे परंतु जास्तीत जास्त रूपये एक हजार दरवर्षी येवढी रक्कम प्रोत्साहन म्हणून पुढील पाच वर्षे सरकारकडून देण्यात येईल. मांत्र ही प्रोत्साहन राशी आयकर भरणाऱ्या अथवा पी एफ किंवा ई पी एफ धारकास मिळणार नाही.
   ज्याना 1 ते 5हजार एवढे निवृत्तीवेतन वयाच्या 60 व्या वर्षी हवे असेल अशा परंतु  18 ते 40 याच वयोगटातील बँकेत बचत खाते असलेल्या व्यक्तींनाच या योजनेत  सहभागी होता येईल.आपल्या वयानुसार आणि इच्छेनुसार दरमहा ,तीन महिन्याने अथवा सहा महिन्यांनी पैसे जमा करता येतील .म्हणजेच खात्याची मुदत 20 ते 42 वर्षे एवढी असेल. कोणत्याही पोस्ट ऑफिस ,सरकारी बँकेत अथवा या योजनेची धनराशी जमा करण्याचे अधिकार दिलेल्या खाजगी किंवा सहकारी बँकेत अर्ज करून या योजनेचे खाते उघडता येईल. एक हजार रुपए पेन्शनसाठी वयानुसार दरमहा 42 ते 291 रूपये भरावे लागतील तर पाच हजार पेन्शनसाठी मासिक 210 ते 1454 रुपये भरावे लागतील विविध वयोगटासाठी एक ते पाच हजार पेन्शनसाठी किती रक्कम  मासिक , तिमाहीस , सहामाहीस भरावी लागेल याचा तक्ता संबधीत बँकेत उपलब्ध आहे. योजना पूर्ण झाली की खातेधारकास तो जिवंत असेपर्यंत दरमहा पेन्शन मिळेल व वारसास 1 लाख 70 हजार ते 8 लाख 50 हजार एवढी रक्कम मिळेल. दीर्घ काळासाठी सातत्याने निश्चित रक्कम हमखास देऊ शकणारी आणि सरकारची हमी असलेली एकमेव योजना आहे. आपण पात्रता पूर्ण करीत असलो तर स्वतःसाठी त्याचप्रमाणे आपणास सेवा पुरवणारे जसे कामवाली ,धोबी ,पेपर टाकणारे ,दूध टाकणारे अशा लोकाना या योजनेची माहिती देवून बचत करण्यास प्रोत्साहित करावे.
हे खाते मुदतीपूर्वी बंद करता येते परंतु त्यात व्याजाचे नुकसान होते.तसेच खाते कालावधी पूर्ण होण्यापूर्वी धारकाचे निधन झाल्यास त्याचे वारसास व्याजासह जमा रक्कम परत करण्यात येते.

उदय पिंगळे
मोबाईल क्रमांक 8390944222
या व इतर आर्थिक विषयक लेख वाचण्यासाठी अर्थसाक्षरतेच्या दिशेने.....हे फेसबुक पेज पहा यासाठी खालील लिंकवर जा.

https://www.facebook.com/pg/pingaleuday/community/

No comments:

Post a Comment