Wednesday, 11 January 2017

ऑनलाईन व्यवहार काही अनुभव.......

 ऑनलाइन व्यवहार काही अनुभव........

       नोटाबंदीच्या अनुषंगाने आपण आपले व्यवहार रोख पैसे न देता करण्यासाठी, ज्याकाही उपाययोजना सुचवल्या जात आहेत त्यामधे ऑनलाईन व्यवहार हा एक महत्वाचा पर्याय आहे. 8 नोव्हेंबर नंतर असे व्यवहार करण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. यापूर्वी असे व्यवहार उच्चशिक्षित लोक व तरुण पिढी या गटापुरता मर्यादित होता. वास्तविक अनेक लोकांकडे असे व्यवहार करता येतील अशी यंत्रणा होती परंतू ती आपण वापरावी असे फारच थोड्या लोकांना वाटत होते. त्यांना अशा व्यवहारांची भीती वाटत होती आणि अन्य मार्ग असल्याने ऑनलाइन व्यवहार करण्याची जरूरी नव्हती. त्यामुळे आपणहून असे व्यवहार करावेत असे फारच थोड्या लोकाना वाटत असणार. मी एक त्यापैकी आहे. एक तर असे व्यवहार कसे करावेत हे शिकून घेणे अगदी सोपे आहे. त्यामुळे रोख पैसे बाळगणे ,रांगेत उभे राहणे ,ठराविक वेळेचे बंधन पाळणे यापासून सुटका होते. आपणही असे व्यवहार सहज करु शकतो हा आत्मविश्वास येतो. असे व्यवहार कसे करावेत यापेक्षा यामध्ये काही गैरव्यवहार झाले तर काय करावे हेही आपणास माहिती असले पाहिजे. मी हे व्यवहार अलीकडेच शिकलो माझे वय 55 आहे. रोख किंवा चेकने पैसे देणे एवढेच मला माहिती होते या सहा महिन्यात मी अनेक गोष्टी स्वतः करून पहिल्या त्यामुळे या गोष्टी मी करु शकतो याचा मला आनंद मिळाला आज मी या गोष्टी कशा शिकलो यापेक्षा काही चुकीच्या व्यवहारासंदर्भातील आलेले दोन अनुभव कथन करतो आहे.
   मी नेटबँकिंगद्वारे एक वस्तु खरेदी केली या वस्तूचे पैसे देताना बँकेकडून आलेला ओ टी पी (One Time Password )आणि माझा पिन यांची नोंद केल्यावर हा व्यवहार पूर्ण झाला नाही असा संदेश स्क्रीनवर आला त्यामुळे मी तोच व्यवहार नवा otp घेऊन पुन्हा केला. माझ्या दृष्टीने व्यवहार पूर्ण झाल्याने विषय संपला होता परंतू प्रत्यक्षात या एकाच व्यवहारासाठी माझ्याकडून दोनदा पैसे दिले गेले असे खात्याची तपासणी केले असताना आढळून आले. व्यवहार केलेली कंपनी इंदूर मधील होती आणि वारंवार विचारणा करूनही ते लोक दाद देत नव्हते मी फोन केल की चौकशी करून आपणास पुन्हा फोन करु असे सांगायचे पण प्रत्यक्षात फोन करायचे नाहीत. वास्तविक त्याना दोन वेळा माझ्याकडून पैसे मिळले आहेत याची खात्री करून पैसे ताबडतोब परत करता आले असते आणि मग त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार राहिली नसती. मी माझ्या बँक शाखेत जाऊन ही सर्व गोष्ट कथन केल्यावर त्यांनी माझेकडून एक फॉर्म भरून घेतला तो भरून दिल्यानंतर जी काही करवाई झाली असेल ती आश्चर्यकारक होती. मला त्या कंपनीतून फोन आला त्यांनी माझी तक्रार ऐकून घेतली. त्यानंतर माझे समाधान अन्य वस्तु खरेदी करून होते का ते पाहिले मी त्यास नकार दिला त्यानंतर सतत तीन दिवस रोज मला त्यांच्याकडून फोन येत होते मी पैसे परत हवे असे म्हणत होतो.शेवटी ते पैसे देतो पण आधी तक्रार मागे घ्या असे म्हणाले मीही या गोष्टींसाठी तयार झालो परंतू बँकेत गेल्यावर त्यांनी मला सूचवले की तक्रार मागे घेतली तर जर त्यांनी नंतर पैसे नाही दिले तर तुम्ही काय करणार ?मला ते पटले मग पुन्हा फोन आल्यावर त्याना सांगितले की मी तक्रार मागे घेणार नाही जर तुम्ही आधी माला पैसे दिलेत तरच मी तक्रार मागे घेईन असे सांगितल्यावर त्यांच्याकडून येणारे फोन बंद झाले.यथावकाश कंपनीकडून बँक व बँकेकडून मला पैसे मिळाले.
   दूसरी गोष्ट अगदी अलीकडची 29 डिसेंबरला सकाळी 07:40 ला मी क्रेडिट कार्ड वर 421 USD ची मी खरेदी केली म्हणून आभार मानणारा संदेश आला आणि मी उडालोच. ही एक सायबर गुन्ह्याची केस आहे हे माझ्या ताबडतोब लक्षांत आले.मी बँकेचे ग्राहक सेवा प्रतिनिधिशी संपर्क साधून त्यांचे निदर्शनास आणली दरम्यानच एक 470 USD चा व्यवहार त्यांचेकडे माझेच कार्डवरून होणार होता तो थांबवला आणि कार्ड रद्द केले. आधीचा व्यवहार पूर्ण झालेला असल्याने त्यासंदर्भात हरकत नोंदवली. त्यांनी सुचवल्याप्रमाणे त्यांचे ग्राहक सेवा विभागात ई मेल द्वारे तसेच रजिस्टर्ड पोस्टाने रीतसर तक्रार नोंदवली. या सर्व गोष्टीत बँकेकडून सहकार्यचा चांगला अनुभव आला. वादग्रस्त व्यवहारामुळे कमी झालेली व्यवहार मर्यादा मला ताबडतोब देण्यात आली.रद्द केलेल्या कार्डचे बदल्यात नवे कार्ड दिले गेले. त्याचप्रमाणे दिलेल्या तक्रारी संदर्भातील निर्णय योग्यची चौकशी करून मला 50 दिवसात कलावण्यात येईल असे फोन करून आणि मेलवर कळवले. थोडक्यात यथावकाश चौकशी होवून हे प्रकरण मार्गी लागेल.
    या अनुभवांवरून online व्यवहार करावेत की नाही यावर सम्भ्रम निर्माण होईल. तरीही असे व्यवहार करावेत असे माझे मत आहे कारण ही काळाची गरज आहे व्यवहारांचे तुलनेत गैरव्यवहारांचे प्रमाण अल्प आहे आणि तक्रार निवारण करण्याची यंत्रणा आहे. आपल्याकडून आपण  गैरव्यवहार होऊ नयेत म्हणून खालीलप्रमाणे काळजी घ्यावी --
   1)नेट बँकिंगसाठी बँकेचे app असेल तर ते वापरावे.
   2)कोणालाही आपले कार्ड नंबर, पिन ,ओ टी पी देऊ नये.बँक कधीही ग्राहकास ही माहिती विचारीत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही बक्षीसाचे आमिषास भूलू नये.
   3)वेळोवेळी आपण पासवर्ड बदलावा.
   4)कार्डवरील cvv लक्षांत ठेवावा आणि कोणास समजणार नाही अशा प्रकारे नाहीसा करावा.कार्ड स्वतः स्वाईप करावे आणि पिन स्वतः टाकावा.
   5)ऑनलाईन व्यवहार सायबर कॅफे फ्री वाई फाय उपलब्ध असलेल्या ठिकाणी असे करु नयेत.
   6)शक्यतो एकच कम्प्यूटर अथवा मोबाईल वापरावा त्यावर पासवर्ड साठवून ठेऊ नये. मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असतील तर योग्य anti virus टाकून घ्यावा  आणि अशा व्यवहारांकरिता जरूर तर विमा उतरवून घ्यावा.
   7)जर असा व्यवहार निदर्शनास आला तर ग्राहक सेवा प्रतिनिधीशी संपर्क साधून त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे कार्यवाही करावी.
   8)या कार्यवाहीने आपले समाधान न झाल्यास बँकिंग लोकपाल अथवा ग्राहक मंचाचे मार्फत तक्रारीचा पाठपुरावा करावा.
   9)या दरम्यान आलेले अनुभव इतरांना सांगून त्याना जरूर ती मदत व मार्गदर्शन करावे.
 
Rd
उदय पिंगळे

No comments:

Post a Comment