Friday, 11 July 2025
जेन स्ट्रीट विरुद्ध सेबी
#जेन_स्ट्रीट_विरुद्ध_सेबी
जेन स्ट्रीट ही अमेरिकन गुंतवणूक कंपनी. तिच्या उपकंपन्या आणि त्यांची विदेशी संस्थात्मक गुंतवणूक संस्था या जगभरातील विविध शेअरबाजारात आर्थिक गुंतवणूक करीत असतात. त्यांनी भारतीय शेअरबाजारातील डिरिव्हेटिव पद्धतीच्या व्यवहारात गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून यापुढे कोणतेही व्यवहार करण्यास सेबीने बंदी घातली आहे. सेबीने असा अंतरिम आदेश दिला असून त्यांची सखोल चौकशी केली जाईल. त्यांनी बेकायदेशीररित्या कमावलेल्या रकमेतून ₹ 4800 कोटी गोठवण्यात आले असून ते एका विशेष खात्यात (एस्क्रु अकाउंट) ठेवले जातील. आरोपावरील स्पष्टीकरण देण्यासाठी तसेच अंतरिम आदेशाला आव्हान देण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही कारवाई सध्या तात्पुरती असून पुढील निर्णय जेन स्ट्रीटच्या उत्तरानंतर होणार आहे. या बंदीनंतर बाजारातील डिरिव्हेटिव व्यवहारांमध्ये लक्षणीय घट झाली असून अल्गो ट्रेडिंगवर लक्ष ठेवले जात आहे.
याप्रकरणाची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेऊया-
भारतीय शेअरबाजारात दोन प्रकारचे व्यवहार होतात. हे सर्व व्यवहार म्हणजे एक प्रकारचे करार असतात ते पूर्ण करण्याची हमी शेअरबाजार घेतो त्यात कसूर झाल्यास त्यांची पूर्तता आधी निश्चित केलेल्या नियमानुसार होते.
●रोखीचे व्यवहार- येथे शेअर अथवा पैसे देऊन घेऊन व्यवहार पूर्ण केले जातात असे व्यवहार सामान्यतः दुसऱ्या कामकाज दिवशी अथवा काही प्रमाणात त्याच दिवशी पूर्ण केले जातात. ते किमान एक शेअर तर कमाल बाजारात उपलब्ध असलेल्या संख्येएवढे असू शकतात. त्यांची पूर्तता करण्यासाठी पूर्ण रक्कम द्यावी लागते.
●डिरिव्हेटिव बाजार- हे व्यवहार मालमत्तेच्या किंमतीवर आधारित पैजेची स्वरूपातील असून अधिक गुंतागुंतीचे आहेत. ते शेअर्स, रोखे, निर्देशांक, वस्तू, चलन, व्याजदर यामध्ये होऊ शकतात. यातील काही व्यवहार प्रत्यक्ष देवाण घेवाणीतून तर निर्देशांक, व्याजदर यातील व्यवहार त्यातील भावाच्या लाभहानीच्या फरकातून समायोजित केले जातात. हे व्यवहार एका विशिष्ट किमान आकार आणि त्यांच्या पटीत होत असतात. शेअर्स व त्यावर आधारित निर्देशांक यातील एक व्यवहार पाच लाखाहून अधिक रकमेचा असतो त्यासाठी पूर्ण पैसे न देता एकूण व्यवहाराच्या काही प्रमाणात हमी रक्कम घेतली जाते त्यास मार्जिन असे म्हणतात भविष्यातील व्यवहार (फ्युचर्स) आणि पर्याय व्यवहार (ऑप्शन) हे या प्रकारातील करार आहेत. फ्युचर्समध्ये भविष्यात विशिष्ट दिवशी मालमत्ता खरेदी/विक्री करण्याचे आश्वासन दिलेले असते. यातील किंमतीत कोणताही फरक पडला तरी त्यांची पूर्तता करावीच लागते. ऑप्शन या प्रकारात मालमत्ता खरेदी अथवा विक्री करण्याचा अधिकार मिळतो परंतु त्यांची पूर्तता केलीच पाहिजे असे बंधन नसते. यासाठी तुम्हाला बयाणा (प्रीमियम) म्हणून ठराविक रक्कम द्यावी लागते. किंमत वाढल्यास हक्क वापरून मालमत्ता खरेदी करता येईल तर किंमत कमी झाल्यास हक्क सोडून दिल्याने त्यासाठी मोजलेल्या रकमेवर पाणी सोडावे लागेल. ऑप्शन करारांचे कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन असे दोन प्रकार आहेत. भविष्यात किंमत वाढेल असा अंदाज असल्यास कॉल ऑप्शन तर किंमत कमी होईल असा अंदाज असल्यास पुट ऑप्शनचा करार केला जातो. या दोन्ही प्रकारांच्या खरेदी विक्री होऊ शकते. भावात पडणाऱ्या फरकानुसार रोजच्या बंद भावाच्या तुलनेत मार्जिन कमी अधिक केले जाते. त्याचप्रमाणे या दोन्ही प्रमुख करार त्यातील उपप्रकारात डे ट्रेडिंग होऊ शकते. त्यामुळे त्याच दिवशी अथवा सौदापूर्ती होण्यापूर्वी उलट व्यवहार करून त्यातून कधीही बाहेर पडता येते. यातील ऑप्शनमधील खरेदी व्यवहारात अगदीच किरकोळ भांडवल लागत असल्याने आणि त्यातून अधिक फायदा मिळण्याची शक्यता असल्याने ट्रेडर्सना ते अधिक आकर्षित करतात त्यातून त्व्यक्तींमध्ये असलेल्या जुगारी प्रवृत्तीस प्रोत्साहन मिळत असल्याने झटपट पैसे मिळवण्याची आस असलेल्या अनेकांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. जगभरात या पद्धतीने होणाऱ्या व्यवहारातील सर्वाधिक (60%) व्यवहार भारतातील राष्ट्रीय शेअरबाजारात होतात.
एकंदरीतच डिरिव्हेटिव प्रकारातील व्यवहारांना तुलनेने कमी भांडवल लागून त्यातून अधिक लाभ होण्याची शक्यता असली तरी त्यातून फार मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. काही प्रसंगात आपले पूर्ण भांडवल नाहीसे होऊन अधिकची पदरमोडही करावी लागते. सेबीच्या संशोधन अहवालानुसार सामान्य गुंतवणूकदारांतील 10 पैकी 9 जणांना डिरिव्हेटिव व्यवहारात आर्थिक वर्ष 2021-22 ते 2024-25 या काळात तोटा झाला. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांनी डिरिव्हेटिव व्यवहारातील जोखीम समजून न घेता व्यवहार करू नयेत यासाठी सेबी जनजागृती करते. तरीही उलाढाल वाढत असल्याने त्यासाठी आवश्यक असणारी किमान हमी रक्कम (मार्जिन) आणि खरेदी विक्री व्यवहार संच (लॉट साईज) वाढवण्याचे उपाय सेबीने योजले आहेत. या व्यवहारातून सामान्य गुंतवणूकदारांचा तोटा होत असेल तर कोणीतरी फायदा कामावणारा नक्कीच असणार. असे लाभार्थी हे अतिश्रीमंत गुंतवणूकदार आणि वित्तसंस्था याच आहेत. म्युच्युअल फंड कंपन्याना भावात पडणाऱ्या फरकाने होऊ शकणारे संभाव्य नुकसान (हेजिंग) टाळण्याच्या मर्यादेतच डिरिव्हेटिव प्रकारातील व्यवहार करण्याचे त्यांच्यावर बंधन आहे.
■या सर्व प्रकारात जेन स्ट्रीटने काय केलं?
त्यांनी डिरिव्हेटिव कराराच्या शेवटच्या दिवशी ‘पंप ऍण्ड डंप’ धोरणाचा वापर केला.
म्हणजेच,
●त्यांनी बँकिंग निर्देशांकावर प्रभाव पाडणारे महत्त्वाचे शेअर्स जसेकी एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआयचे शेअर्स सकाळी मोठ्या प्रमाणात खरेदी केले.
●त्यामुळे बॅंक निफ्टी निर्देशांक वर गेला.
●हे पाहून रिटेल ट्रेडर्सनी कॉल ऑप्शन खरेदी करण्यास धाव घेतली, त्यांना वाटलं की आणखी तेजी येईल.
●त्याच सुमारास जेन स्ट्रीट यांनी नेमकी उलटी बाजू घेतली, त्यांनी कॉल ऑप्शन विकले आणि पुट ऑप्शन खरेदी करून ठेवले.
●नंतर, एकदम सर्व बँक शेअर्स विकले त्यामुळे अचानक पुरवठा वाढल्याने निर्देशांक कोसळला.
●त्याचा परिणाम पुट ऑप्शन महागले आणि कॉल ऑप्शन शून्य झाले, जेन स्ट्रीटने यातून जबरदस्त नफा कमावला. या संपूर्ण कालावधीत 18 वेळा सौदापूर्तीच्या एकाच दिवशी या पद्धतीने विविध व्यवहार करून कंपनीने ₹ 43289 कोटी एकूण कमावले त्यातील केवळ ऑप्शनच्या व्यवहारांतून ₹36500/- कोटींचा नफा कमावला गेला. हे सर्व कंपनीच्या वतीने कुणी व्यक्तिने केलं असं वाटत असेल, तरी तसं नव्हतं. त्यांनी हाय-स्पीड अल्गोरिदम्स वापरले, जे बाजारात सेकंदाच्या काही भागातच जेन स्ट्रीटला आवश्यक कृती करत होते.
■सेबीला याची माहिती कशी मिळाली?
जेन स्ट्रीटने कंपनीने अमेरिकेत त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपनीवर (मिलेनियम मॅनेजमेंट) केस केली. त्यात त्यांनी असा दावा केला की मिलेनियमने त्यांचे गुप्त अल्गोरिदम डिझाइन करणाऱ्या डग शॅडेवाल्ड आणि डॅनीयल स्पॉटीसवुड या दोन कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेत घेऊन त्यांच्या मदतीने आपल्या गुंतवणूक धोरणात बदल केला त्यामुळे आमचे नुकसान होत असल्याने आम्हाला त्याची भरपाई मिळावी. पुढे प्रत्यक्षात पुराव्यांची देवाणघेवाण होत असताना न्यायालयीन कारवाई न होता हा वाद गुप्त तडजोडीने मिटवण्यात आला. जरी हा दोन अमेरिकन कंपनीतील अंतर्गत वाद असला तरी त्यात भारतीय शेअरबाजाराचा संबंध आल्याने मीडियाचे लक्ष वेधले गेले. त्यातच मयंक बन्सल या ट्रेडरनेही अचानक उलाढालीत होणारी व्यवहारवाढ संशयास्पद असल्याची तक्रार सेबीकडे केली होती. यावर सेबीने स्वतः पुढाकार घेऊन चौकशी चालू केली आणि जेन स्ट्रीटच्या जानेवारी 2023 ते मार्च 2025 पर्यंतच्या काही व्यवहारांची तपासणी केली. त्यातून 18 संशयास्पद दिवस समोर आले आणि यातील बहुतेक दिवस डिरिव्हेटिवच्या सौदापूर्तीचे दिवस होते. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सहा महिन्यातून अधिक कालावधी लागू शकतो. गुंतवणूकदारांचे तोपर्यंत होऊ शकणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठीच सेबीला त्यांना प्राप्तअसलेल्या अधिकाराचा वापर करून अंतरिम आदेश देण्यात आला आहे.
■सेबीने शोधलेले दोन प्रमुख फसवणुकीचे प्रकार
◆दिवसभरातील निर्देशांक हेराफेरी: बाजार नकारात्मक असताना, सकाळी 09:15 ते 12:00 दरम्यान जेन स्ट्रीटने बँक निफ्टीतील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी केली.
एकाचवेळी ते डिरिव्हेटिव मार्केटमध्ये पुट ऑप्शन खरेदी करीत होते नंतर त्यांनी सर्व शेअर्स विकले त्यामुळे निर्देशांक खाली गेला. पुट ऑप्शन महाग झाल्याने त्यातून जबरदस्त फायदा झाला. उदाहरणार्थ 17 जानेवारी 2024 रोजी एचडीएफसी बँकेचे निकाल खराब असूनही ₹4300 कोटींची बँकेच्या शेअर्स खरेदी केली गेली, जिचा उपयोग बँक निर्देशांक कृत्रिमरित्या उचलण्यासाठी झाला.
◆बाजार बंद होण्याच्या शेवटच्या अर्ध्या तासात मोठी विक्री: यामध्ये त्यांनी शेवटच्या अर्ध्या तासात (दुपारी 03:00 ते 03:30 या वेळेत) मोठ्या प्रमाणावर बँकेच्या शेअर्सची विक्री केली. यामुळे बंद निर्देशांक खाली गेला आणि फायनल प्राइस कमी झाल्यामुळे पुट ऑप्शनवर फायदा मिळाला.
■बँक निफ्टीवरच लक्ष का?
कारण बँक निफ्टीमध्ये उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असल्याने ते अधिक तरल आहे त्यामुळे सहज खरेदी-विक्री करता येते. अन्य व्यवहारांच्या तुलनेने खूप मोठ्या संख्येने बँक निफ्टी ऑप्शनचे व्यवहार होतात (16 लाख ट्रेडर्स).
■सेबीच्या कारवाई मागील कारणे:
●निर्देशांकामध्ये सौदापूर्तीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात संशयास्पद हालचाल.
●ठराविक संस्था व्यक्ती यांनाच व्यवहारातून असामान्य आणि सातत्यपूर्ण नफा.
●फसवणूक आणि गैरवर्तन करणारे व्यवहार. सेबी कायदा सन 1992 कलम 11 व 11(4) मधील तरतुदींचे उल्लंधन करणारे याचबरोबर ते सेबीने सन 2023 मध्ये निर्देशित केलेल्या पीएफयुपिटी नियमावलीतील नियम 3ए, 3बी 3 सी, 3डी नुसार फसवणूक, दिशाभूल करणारे आणि 4(1), 4(2)(ए), 4(2)(ई), 4(2)(जी) नुसार कृत्रिम मागणी/पुरवठा निर्माण करून बाजारभावात अनैसर्गिक चढउतार घडवणारे असल्याने नियमावलीचे
उल्लंघन करणारे होते.
●सेबीने राष्ट्रीय शेअर बाजारामार्फत तुमच्या व्यवहारांचा बाजारावर विपरित परिणाम होत असल्याचा इशारा फेब्रुवारी 2025 ला दिला होता त्याकडे कंपनीने केलेले दुर्लक्ष.
यामुळे
●सामान्य गुंतवणूकदारांचे होत असलेले मोठे नुकसान टाळण्यासाठी आणि भारतीय शेअरबाजारातील व्यवहारांच्या पारदर्शकतेवर उभे होत असलेले प्रश्नचिन्हावर मात करण्यासाठी ही कारवाई केली गेली असे सेबीचे म्हणणे आहे. त्यांनी यापुढील लक्ष मिलेनियम मॅनेजमेंट आणि अन्य हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडरकडे वळवले आहे. या प्रकरणाची चौकशी इतर निर्देशांक आणि बाजार भागांतही विस्तारित करण्यात येईल. डिरिव्हेटिव व्यवहारांसाठी नवीन नियम, सौदापूर्तीच्या पद्धतीत बदल, व्यवहार संच मर्यादेत वाढ यासारखे बदल भविष्यात नियामकांकडून अपेक्षित आहेत. या प्रकरणात पुढे नेमके काय होईल ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. सेबीचे अनेक निर्णय त्यांची अपिलेट अथोरिटी सॅटने रद्द केले आहेत हेही आपल्याला विचारात घ्यावे लागेल.
■गुंतवणूकदारांसाठी धडा: डिरिव्हेटिव व्यवहार हे सोपे वाटतात, तेवढे सोपे नाहीत. हाय-स्पीड अल्गो आणि प्रचंड भांडवल घेऊन उभ्या असलेल्या संस्थांसमोर सामान्य गुंतवणूकदार भरकटतात. त्यामुळे बाजारात आपण काय ट्रेड करीत आहोत यापेक्षा ते कोणाच्या विरुद्ध ते करतो आहोत ते महत्त्वाचं असतं.
■निष्कर्ष: डिरिव्हेटिव व्यवहारामध्ये अर्धं युद्ध हे समजून घेणं असतं की आपण नक्की कोणत्या गोष्टींवर पैज लावतो तर बाकीचं युद्ध असतं ते कोणाच्या विरुद्ध लावतो ते समजणं.
सुजाण गुंतवणूकदारांना यातून योग्य तो बोध घेतीलच!
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
11 जुलै 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम या संकेतस्थळावर पूर्वप्रकाशीत.
Friday, 4 July 2025
सावध ऐका पुढल्या हाका
#सावध_ऐका_पुढल्या_हाका!
गेले काही दिवस कुणालाही सहज फोन करावा म्हटलं तर सक्तीने अमिताभच्या आवाजातील एक सरकारी कॉलर ट्यून ऐकावी लागत आहे. त्यामुळे अस्वस्थता वाढते, संदेश उपयुक्त असला तरी त्याचा सततचा भडिमार असह्य वाटतो. कोविड काळानंतर ऑनलाइन व्यवहार त्याचबरोबर यासंबंधीच्या ग्राहकांच्या तक्रारी ही सातत्याने वाढत असल्याने असे व्यवहार पूर्णपणे सुरक्षित नाहीत असे आपण निश्चित म्हणू शकतो. झालेल्या गैरव्यवहारात बरेचदा संबंधित ग्राहकाने केलेली छोटीशी चूक त्याला महागात पडते. मग असे व्यवहार करायचेच नाहीत का? यावर त्यासंबंधीच्या सुरक्षा व्यवस्था अधिकाधिक मजबूत बनवणे हाच त्यावरील उपाय आहेत. या संदर्भात संबंधित बँकेची जबाबदारी रिझर्व बँकेच्या परिपत्रकात स्पष्टपणे दिली आहे, त्याकडे पद्धतशीर दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे आता यासंबंधातील धोरण ठरवणे आणि नियम करणे ही सरकारची जबाबदारी आहे. सायबर फसवणुकीत गेलेला ग्राहकांचा प्रत्येक रुपया सरकारने सुरक्षित केला पाहिजे हा मुद्दा मुंबई ग्राहक पंचायतीने सरकारकडे लावून धरलेला आहे. अनेक सामाजिक संस्था, ग्राहक संस्था, केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालय, भारतीय रिजर्व बँक या सर्वांकडून ग्राहकांची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून व्यवहार करताना त्यांनी नेमके काय करावे आणि काय करू नये, कोणती काळजी घ्यावी. यासंबंधीची माहिती विविध समाज माध्यमातून देऊन ग्राहक जागृती करण्यात येत असते.
कुणाही अनोळखी व्यक्तीला ओटीपी देऊ नये याबद्दल लोक आता सावध होत असल्याने ओटीपी वापरून होणारे गैरव्यवहार इतर गैरव्यवहाराच्या तुलनेत कमी होत आहेत हे दिलासादायक आहे. या समजुतीला छेद देणारी एक अजब घटना समोर आली असून त्यामध्ये 'ओटीपी' व्यवस्थेला बाजूस करून एका हॅकरने धक्का दिला आहे. त्याने आदित्य बिर्ला कॅपिटलचे अँप क्रॅक केले असून, त्यावरील ग्राहकांच्या विविध खात्यांमधून सुमारे जवळपास दोन कोटी रुपयांचे डिजिटल सोने परस्पर ऑनलाइन पद्धतीने विकले. अलीकडे मोठ्या प्रमाणात सायबर फसवणूकीचा गुन्हा समोर आला असून यामुळे बाजारात खळबळ उडाली आहे. मुंबईतील प्रभादेवी भागातून सायबर फसवणुकीचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एका अज्ञात हॅकरने आदित्य बिर्ला कॅपिटल डिजिटल लिमिटेडच्या एबीसीडी अँपमध्ये घुसून काही मूलभूत तांत्रिक बदल केले आणि अनेक ग्राहकांच्या खात्यांमधून सुमारे 2 किलो वजनाचे डिजिटल सोने विकले. त्यानंतर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने विक्री करून आलेली रक्कम विविध बनावट वैयक्तिक बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करून तो गायब झाला आहे. ही घटना अजबरीत्या निदर्शनास आली, झाले असे की अचानक असे नुकसान झालेल्या अनेक ग्राहकांनी कंपनीच्या कॉल सेंटरला फोन करून त्यांच्या संमतीशिवाय त्यांनी खरेदी केलेले डिजिटल सोने विकल्याची तक्रार केली. तेव्हा पडताळणी केल्यावर ही घटना उघडकीस आली. ते समजल्यानंतर, कंपनीने मुंबईतील सेंट्रल रिजन सायबर पोलिसांकडे तक्रार (एफआयआर) दाखल केली असून सायबर सेलने याची पूर्ण गांभीर्याने संपूर्ण चौकशी सुरू केली आहे.
तक्रारीनुसार, 9 जून 2025 रोजी, कंपनीच्या तांत्रिक टीमला असे आढळून आले की एका अज्ञात व्यक्तीने digital.adityabirlacapital.com वरील एबीसीडी अँप आणि कंपनीच्या सर्व्हरमधील अप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) हॅक केला होता. हॅकरने अँपच्या सामान्य व्यवहार पद्धतीमध्ये (प्रोटोकॉल) फेरफार केला आणि अनिवार्य असणारा केवळ एकदाच वापरता येणाऱ्या (वन-टाइम पासवर्ड) संदेश पडताळणी प्रक्रियेला बाजूस सारून 435 हून अधिक वापरकर्त्यांच्या खात्यांमधून डिजिटल सोने यशस्वीरित्या विकले. अशा प्रकारे ओटीपी प्रक्रियेस दूर करण्याचा हा धक्कादायक प्रकार पाहून सायबर तज्ज्ञही विचारात पडले आहेत. कंपनीने सायबर तक्रार दाखल केल्यानंतर, तात्काळ संबंधित ग्राहकांना सोन्याची भरपाई दिली आणि सोने विक्रीवर तात्पुरती स्थगिती आणली. त्यानंतर त्यातील सुरक्षा अधिक कडक करून विक्री सुविधा पूर्ववत देऊ केली आहे. सुकृत दर्शनी यात गुंतवणूकदारांचे कोणतेही नुकसान झाले नसले तरी असं काहीतरी होऊ शकतं हे त्यांना समजलं आहे त्यामुळे अनेकांना प्रश्न पडेल की, यावर उपाय काय ? तर सध्या तरी यावर ठोस असा उपाय तितका नाही. पेक्षा जिथं तुम्ही ऑनलाईन (डिजिटल) पद्धतीने गुंतवणूक करीत आहात ती करताना अधिक सावधगिरी बाळगावी, हे उत्तम. मोठी गुंतवणूक करताना तरी किमान *बसल्या जागी काम होतेय* असं म्हणत ऑनलाईन व्यवहार शक्य असल्यास टाळावे. त्यासाठी सेबी, सरकार मान्य असे जे मध्यस्थ असतात किंवा संबंधित कंपनीच्या ऑफिसेस मधील अधिकृत कर्मचारी असतात त्यांच्या सोबत राहून गुंतवणूक करावी. त्याने फसवणूक होण्याची शक्यता किमान असते.
■डिजिटल गुंतवणूकदारांसाठी सुरक्षा टिप्स-
●दोन अथवा अधिक टप्यातील ओळख (MFA) वापरा, ओटीपी अॅप वापरा (Google Authenticator), केवळ एसएमएस वर अवलंबून राहू नका.
●अॅपला दिलेल्या परवानग्या तपासा, एसएमएस वाचण्याची, फाइल्समध्ये प्रवेश यांसारख्या परवानग्या मर्यादित ठेवा.
●नियमितपणे गुंतवणूक तपासा, व्यवहार सूचना (SMS / ईमेल) ऑन ठेवा.
●प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी वेगळे पासवर्ड वापरा. सहसा ओळखता येणार नाही पासवर्ड ठेवा आणि पासवर्ड मॅनेजरचा वापर करा.
●फक्त अधिकृत अॅप स्टोअर्सवरून अॅप डाऊनलोड करा अनधिकृत वेबसाईट्स लिंक्स असलेल्या एपिके फाईल्स टाळा.
●फिशिंग ईमेल आणि लिंकपासून सावध रहा
संस्था, प्रसिद्ध व्यक्ती सारख्या नावाने आलेले फसवे ईमेल ओळखा.
●आपले एपीआय टोकन तपासा (प्रगत वापरकर्त्यांसाठी) कोणते थर्ड पार्टी एपीआय वापरत आहेत, ते तपासा आणि अनावश्यक टोकन हटवा. हे सर्वसाधारण जाणकार व्यक्तींकडून समजून घ्यावे. हा एक प्रकारचा डिजिटल पासवर्ड आहे जो आपल्याला अँप वापरण्याची परवानगी देतो, वापरकर्त्याची ओळख आणि अधिकार यांची माहिती ठेवतो.
●मोबाइलला सुरक्षित ठेवा.
फिंगरप्रिंट / फेस लॉकसारखी ओळख वापरा.
■भारतातील डिजिटल गोल्ड व फिनटेक सुरक्षा यांचं भवितव्य
●सेबी आणि भारतीय रिझर्व बँक यांच्याकडून अधिक कडक नियमांची अपेक्षा.
●सायबर इन्शुरन्स सेवा आता अनेक अॅप्समध्ये सक्तीने लागू होऊ शकतील.
●Zero Trust Security आणि AI आधारित फ्रॉड डिटेक्शन वापरणं अनिवार्य व्हायची शक्यता आहे.
एखादी गंभीर समस्या किंवा आव्हान समोर असताना, लोकांना 'सावध ऐका पुढल्या हाका' असे म्हणून परिस्थितीचे गांभीर्य ओळखायला सांगितले जाते. डिजिटल व्यवहार करायचे असतील तर डिजिटल शहाणपण प्राप्त करणे आवश्यक आहे. हे एक दुधारी शस्त्र असून ते जितके चांगले वाटते, तितकेच ते आपल्याच अंगावर उलटूही (बुमरँग) शकते. हे यानिमित्ताने लक्षात घ्यावे !
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत, याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 4 जुलै 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 27 June 2025
पैसा, पैसा आणि पैसा!
#पैसा_पैसा_आणि_पैसा
पैसा आणि उद्योजकता या विषयाचे संस्कार मराठी माणसांवर नसल्याने या विषयावर बोलणे, आपापसात चर्चा करणे टाळले जाते. पैसा जीवनाचे सर्वस्व नसले तरी प्रत्येक ठिकाणी तुमचे पैशांवाचून अडते. आपल्याकडे किती पैसे असावेत याचा कोणताच मापदंड नाही. पैसा ही अशी शक्ती आहे जी कधीच पुरेशी आहे असं वाटतं नाही. एकीकडे सतत पैसा पैसा करणारे लोक, जे कायम प्रत्येक गोष्ट पैशांत मोजतात. येन केन प्रकारे तो केवळ आपल्यालाच मिळावा असं त्यांना वाटतं तर दुसरीकडे लोक कल्याणार्थ अतिशय निरीच्छ व्यक्ती आहेत ते पैसा महत्वाचा न मानता त्यांचे कार्य उत्तमरीतीने करीत असून भरीव कार्यही करीत असतात, अशी टोकाची उदाहरणे समाजात आहेत. आपण पडलो मध्यम प्रवृत्तीची माणसे आता आपली मनोभुमिका कोणतीही असो, पैशाचे महत्व जाणत असल्याने आणि सातत्याने प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागत असल्याने इच्छापूर्तीचे साधन म्हणून सर्वांनी त्याचा स्वीकार केला आहे. तो योग्य मार्गाने वैध पद्धतीने मिळवला आणि योग्य त्या कारणासाठी खर्च केला तर त्याचे मोल राहते हे आपल्याला पटले आहे.
या विषयावर सर्व भाषांत अनेक स्वतंत्र तसेच अनुवादीत पुस्तके असली तरी बहुतांश पुस्तके पैसा कसा मिळवावा, वाढावावा, टिकवावा अशा स्वरूपाची आहेत. अशी पुस्तके निश्चितच असली पाहिजेत याबद्दल वाद नाही परंतु मन न गुंतवता योग्य प्रकारे पैशांचा वापर केल्यास त्याचे मूल्य कसे वाढते. या विषयावर चिंतन करणारे पुस्तक अलीकडेच मी वाचून पूर्ण केलं. त्याचं नाव आहे, ‘पैसा, पैसा आणि पैसा’. हे पुस्तकं लिहिलं आहे प्रा सुरेश गर्जे यांनी. सन 2023 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची किंमत ₹170/- असून ते सकाळ पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. या शंभर पानी पुस्तकात लेखानामागील भूमिका सांगून एकंदर चौदा निबंधासारखे लेख असून ते एकामागोमाग एक अथवा स्वतंत्र वाचलेत तरी चालण्यासारखे आहे. ज्यात पैशांच्या शक्तीचे तत्त्वज्ञान, त्याचा उपयोग, आणि समाजहिताच्या संदर्भातील जबाबदारी या सर्वांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
प्रत्येक लेखाचे थोडक्यात सार अतिशय कमी शब्दात सुरवातीलाच दिले असून त्याचे अधिक स्पष्टीकरण लेखात आहे.
■लेख विषय आणि थोडक्यात स्पष्टीकरण असे,
◆पैशांचे झाड- उद्यागाच्या भूमीत कल्पकतेची बीजे योग्य वेळी पेरावी लागतात. त्यावर घामाचे चिंतन करावे लागते. तेव्हा ती बीजे अंकुरतात. रोपांच्या रूपाने डोलू लागतात. त्यांच्या वाढीच्या दृष्टीने डोळ्यात तेल घालून त्यांची मशागत करावी लागते. तेव्हा पैशांचे झाड उभे राहते. त्यांना पाने फुले बहरतात. यासाठी अहर्निश धडपड करावी लागते, कष्ट उपसावे लागतात, तेव्हा कुठे पैशांचे झाड डोलू लागते.
◆धनसंग्रह नेमका कशासाठी?- दरिद्रीनारायणाची सेवा हीच परमात्म्याची सेवा आहे. याचा अर्थ असा की, लोककल्याणाची कामे ही सत्कर्मे होत. धनसंग्रह स्वतःच्या उपभोगसाठी न करता तो जनकल्याणासाठी, गरजूच्या पीडाहरणासाठी केल्यानेच मनःशांती प्राप्त होऊ शकते.
◆पैसे कामावण्याच्या प्रेरणा- खर्च आणि काटकसर, काटकसर आणि बचत यात तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. अत्यंत जरुरी बाबींवर खर्च करणे आणि अनावश्यक गोष्टीवर खर्च टाळणे, हे शहाणपणाचे लक्षण आहे. खर्च हा नेहमी उधळेपणाच्या मर्यादेपर्यंत करू नये आणि काटकसर कंजूषपणाच्या स्तरापर्यंत पोहचू नये. खर्च आणि काटकसर यांतील सुवर्णमध्य साधला पाहिजे.
◆जोडूनिया धन- आर्थिक व्यवहारात सर्वतोपरी प्रामाणिकपणास महत्व आहे आणि असा सत्यावर आधारित, नीतिमत्तेला घरून असणारा व्यवहार ‘उत्तम व्यवहार’ सदरात मोडतो आणि त्याची उत्तम फळे कर्त्या व्यक्तीस यथावकाश निश्चितच प्राप्त होत असतात.
◆पैशाचे सामर्थ्य - पैशाची भूमिका सर्वच क्षेत्रात महत्वापूर्ण आहे. वैयक्तिक बाबतीत कुटुंब आणि परिवाराच्या संबंधी, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक प्रभाव दर्शवत असतो. कोणत्याही उपक्रमांचे आयोजन आणि सामाजिक सुधारणांचे प्रकल्प एक इंचभरही पुढे पैशाशिवाय पुढे हलू शकत नाहीत.
◆दौड पैशासाठी- सुवर्णाचा साठा सुवर्णाचे मोल कमी होऊ शकते, परंतु प्रियजनांचा, नात्यागोत्यातील जिवंत व्यक्तींच्या प्रेमाचा साठा कधीच कमी होत नाही. हीच जीवनातील खरी संपत्ती आहे. जीवनातील सुख आणि आनंद देण्याची शक्ती सोन्यात नाही.
◆पैशाची निरर्थकता- माणसाची तृष्णा थांबली, की त्याच्या ठायी असलेल्या यातनांचे शमन होयला हवे. सत्य, अहिंसा आणि करुणा हे तीन घटक मानवाची प्रज्ञा आणि शील यांच्या संवर्धनाचे कारण आहेत. ज्ञानप्राप्तीबरोबरच सदाचाराचा प्रवेश मानवी मनात झाला, की मनःशांतीचे बिजाकुरण होयला वेळ लागत नाही.
◆अपरिग्रह- आज करोडोंच्या संख्येने गोरगरीब, आसराहीन, अन्नासाठी दाही दिशा भटकणारे लोक जगाच्या पाठीवर आहेत, तोपर्यंत गांधींच्या विचारांचे गांभीर्य कायम टीकणारे आहे.
◆पैशाची सार्थकता- पैशाच्या त्यागातून प्राप्त होणारी मनःशांती, समाधान, सुख आणि आनंद आगळवेगळा असतो. मनुष्यजीवनात अशा प्रकारच्या आनंदाची अनुभूती प्राप्त करण्याचा सक्रिय सहभाग आणि प्रयत्न प्रत्येक पैसेवाल्या व्यक्तीने स्वतःच्या उत्पन्नाच्या काही भागातून करणे आवश्यक आहे.
◆सुखाचा शोध- दरिद्री लोकांचे दारिद्र्य दूर करणे, अज्ञान दूर करण्यासाठी मोफत शाळा, महाविद्यालयाची उभारणी माफक दरात शिक्षणाच्या सोयी, सर्व सुविधानी युक्त भव्य रुग्णालये, अनाथालये, विध्यार्थांसाठी वसतिगृहे, वृद्धांसाठी शुश्रुषालये, महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती, आदिवासीच्या विकासाचे उपक्रम, नैसर्गिक आपत्ती, भूकंप, समुद्री वादळे, महापुरानी ग्रस्त जनसमुदायासाठी पिण्याच्या पाण्याच्या सोई असे अनेक उपक्रम राबवण्यासाठी स्वतःजवळील घनाचा शक्य तेवढा भाग खर्च करून समाजाच्या उपकारांची अंशतः का होईना परतफेड करावी.
◆आर्थिक भ्रष्टाचार- अवैध मार्गानी पैसा जमा करण्याच्या प्रवृत्तीची कारणमिमांसा हा या लेखाचा एक एक हेतू आहे. पैशाच्या सोबत प्रतिष्ठा येते. समाजात मानसन्मान प्राप्त होतो. यासाठी आणि सुखासोयीनी युक्त, चैनींनी युक्त जीवन जगण्यासाठी आणि पिढ्यानंपिढ्याच्या आर्थिक सुरक्षतेसाठी आणि भावी काळात आर्थिक विपत्तीला सामोरे जाण्याची पाळी येऊ नये, यासाठी आवश्यक सुरक्षेची भक्कम तटबंदी उभारण्याकरिता येनकेन प्रकारेन पैसा वाढवण्याची प्रवृत्ती निर्माण होत असते. या प्रवृत्तीला मुळी अंतच नसतो.
◆पैसा आणि प्रारब्ध- समस्याचे निराकरण कसे होईल, त्यातून साहिसलामत सुटण्याचे मार्ग कोणते यावर चिंतन करणे उपयुक्त आहे. पैशांची कमतरता आहे, आर्थिक परिस्थिती बिकट आहे, दारिद्र्याची छाया कुटुंबावर आहे. अशा परिस्थितीत माणूस एकच करू शकतो, परिश्रम. पैसा कमावण्याचे परिश्रम. परिश्रमाच्या झाडाला पैशांची फळे लागतात. प्रारब्धानुसार ती कमी अधिक लागतील हा भाग वेगळा, परंतु फळे लागणार एवढे मात्र निश्चित समजले पाहिजे.
◆पैसा आणि रचनात्मक उपक्रम- मुलांना ‘धन कमवा’ हे शिकवत असताना धर्मही शिकवला पाहिजे. अर्थात नीतिधर्म किंवा मानवता धर्म. या धर्मात जी शिकवण दिली जाते, तिचा परिणाम चरित्र्याची निर्मिती आणि नैतिकदृष्ट्या वागणुकीचे संवर्धन यात होत असते.
◆सुख आणि आनंद- समाजावरील प्रेम हे प्रेमाची व्यापकता दाखवते, प्रेम ही शक्ती आहे. ती व्यक्तीला शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ प्राप्त करून देते. जनताजनार्धनावरील प्रेम ही प्रेमाची विशाल व्याप्ती आहे. हे प्रेम लोकसेवा कार्यातून व्यक्त होते. ज्यांच्याकडे अधिक धनसंग्रह आहे त्यांनी अभावग्रस्तांवर पैशांचा पाऊस पाडला पाहिजे, प्रेमाचा वर्षाव केला पाहिजे.
थोडक्यात,
●पैशाची ऊर्जा आणि सामर्थ्य: पैशामध्ये मोठी शक्ती आहे — स्वतंत्रता, संसाधने, आणि क्षमता निर्माण करण्याची क्षमता. मात्र, पैसा कच्चा संसाधन आहे, ज्याला योग्य दिशा आणि ध्येयाच्या अनुरूप वापरल्यासच फलदायी ठरते.
●वैयक्तिक वागणूक: सकस नियोजन, संयमन, गुंतवणूक आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर भर. केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर आवश्यकतेनुसार गरजू लोकांसाठी वापर करण्याद्वारे आत्मसंतुष्टी मिळते आणि समाधान वाढतं.
●सामाजिक उत्तरदायित्व:
पैसा ‘देणगी’ किंवा ‘दान’ स्वरूपात समाजाच्या भल्यासाठी वापरणे, जे आत्मिक समाधान शंभरपट वाढवते. फक्त वैयक्तिक संपत्तीच नव्हे, तर समाजातील गरजू जनतेसाठीही पैशाचा हितकारक उपयोग कसा करता येईल याचा संदेश पुस्तकातून मिळतो.
■कोणाला उपयुक्त?
◆व्यक्तिगत वित्त व्यवस्थापन शिकणाऱ्यांना – खर्च‑नियोजन, गुंतवणूक आणि बचत विषयक मूलभूत दृष्टीकोनासाठी.
◆समाजसेवी व दानप्रवृत्त लोकांसाठी – पैशाच्या समाजोपयोगाच्या मूल्यांना समजण्यासाठी.
◆चिंतनशील‑आध्यात्मिक वाचकांसाठी – तत्त्वज्ञानाने प्रेरित लेखनातून आर्थिक दृष्टीकोन प्राप्त करण्यासाठी.
■का वाचावे?
शाश्वत जीवनशैलीचा पुरस्कार करणारे हे पुस्तक वाचताना, विनोबांच्या पूर्वी वाचलेल्या ‘गीता प्रवचने’ या पुस्तकाची प्रकर्षाने आठवण करून देते. ते तुमच्या आर्थिक ज्ञानाचं परिमाण वाढवण्यास मदत करतं, आणि सोबतच समाजातील गरजूंच्या भल्यासाठी पैसे कसे वापरायचे हेही शिकवते. आत्म‑विकासाला आणि समाजोपयोगाला एकत्र साधून लेखनातून जीवनात अर्थ प्राप्त करण्याचे मार्ग दाखवले आहेत. अर्पणपत्रिकेत म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक पैशाचा सदुपयोग करणाऱ्या आणि पैशाचा हव्यास असलेल्या समस्त जनांस असले तरी कुणाचाही पैशाविषयीच्या दृष्टिकोनात निश्चित बदल करू शकणारे असल्याने संग्रही ठेवण्यासाठी, प्रियजनांस भेट देण्यासाठी योग्य आहे. पुस्तकातील लेख आणि त्याविषयीची अधिक माहिती पुस्तकातलीच आहे, मी फक्त निमित्यमात्र! अजूनही दोन पुस्तकं निवांततेने वाचतोय, उपयुक्त वाटल्यास त्यावरही यथावकाश नक्की लिहीन.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत, याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 27 जून 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 13 June 2025
फिनटेक उद्योग आणि नव्या उद्योग संधी
#फिनटेक_उद्योग_आणि_नव्या_उद्योग_संधी
‘फिनटेक’ हा शब्द यापूर्वी बऱ्याचदा वाचनात अथवा कानावर अनेकदा आला असेल. हा शब्द फायनान्स आणि टेक्नॉलॉजी या दोन शब्दांच्या मिश्रणातून तयार झाला आहे. जसे ‘निफ्टी’= एनएससी + फिफ्टी, ‘सेन्सेक्स’= सेन्सेटिव्ह + इंडेक्स. अशा प्रकारे दोन शब्दातून तयार होणाऱ्या शब्दाला मराठी व्याकरणात ‘संधी’ म्हणतात. ‘संधी’ हा शब्द ‘शक्यता, अवसर, वेळ, अवधी’ अशा अर्थानेही सामान्यपणे वापरला जातो. फिनटेक कंपन्या या वित्तीय क्षेत्रांशी संबंधित विविध कार्य हे तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होणाऱ्या शक्यताचा अधिकाधिक वापर करून करत असतात. उदाहरण द्यायचे झाले तर या कंपन्या अशा प्रकारचे डिजिटल तंत्रज्ञान विकसित करतात ज्यामुळे व्यक्ती व्यक्तीना एकमेकांना (पी 2 पी) पैसे पाठवायचे असतील तर त्याचे खास अँप्लिकेशन्स बनवले जाईल त्यामुळे हा व्यवहार सुलभ होईल. फिनटेक हा खूप व्यापक शब्द आहे. अलीकडे इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व्यवहार वाढले असले तरी भारतात अजूनही रोख रकमेने अनेक व्यवहार होत आहेत. लोक बँकांना केंद्रित ठेवून त्यांच्या माध्यमातून व्यवहार करतात. यातील काही व्यवहारांसाठी शुल्क आकारणी करण्यात येते. जर असे व्यवहार सुरक्षित, झटपट आणि अत्यंत कमी खर्चात किंवा विनामूल्य झाले तर अधिकाधिक लोक त्याकडे आकर्षित होतील. ते करण्याचे महत्वाचे कार्य या कंपन्या करत असतात. या वर्ष अखेरपर्यंत भारतातील फिनटेक व्यवसाय 230 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता असून सन 2030 पर्यंत तो 30.55% वार्षिक वृद्धीदराने 550 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जागतिक फिनटेक व्यवसायात आपले स्थान तिसरे आहे.
■फिनटेक कंपन्या या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना देत असलेल्या महत्वाच्या आर्थिकसुविधा या पारंपरिक बँकिंगपेक्षा वेगवान, सुलभ आणि किफायतशीर दरात अथवा विनामूल्य देतात.
●पैशांची देवाणघेवाण:
◆उदाहरण: फोन पे, गूगल पे, पेटीएम
◆सेवा: युपीआय, पैसे पाठवणे, क्यू आर कोड, बिल पेमेंट्स, व्यापारांना एकमेकांशी (बी 2 बी), व्यापारी आणि ग्राहक (बी 2 पी), ग्राहक आणि व्यापारी (पी 2 बी), व्यक्तींना एकमेकांशी (पी 2 पी) पैशांचे व्यवहार करण्याची सुविधा,
●कर्ज वितरण:
◆उदाहरण: क्रेडिटबी, लेंडिंगकार्ट
◆सेवा: वैयक्तिक आणि व्यवसायासाठी झटपट कर्ज, सामान मासिक हप्ते सुविधा.
●शेअर बाजार अन्य गुंतवणूक मंच
◆उदाहरण: झेरोदा, ग्रोव, अपस्टोक्स
◆सेवा: शेअर्स, म्युच्युअल फंड्स त्यातील नियमित गुंतवणूक करण्यासाठी त्याचा आढावा घेण्यासाठी योग्य अँप्सची निर्मिती
●निओबँक्स (डिजिटल बँका)
●उदाहरण: ज्युपिटर, नियो, फी
●सेवा: बँक खाते, कार्ड, खर्चाचे व्यवस्थापन (पूर्णतः ऑनलाइन) कोणत्याही शाखेत न जाता.
●विमा तंत्रज्ञान:
●उदाहरण: ऍको, पॉलिसीबाजार, डिजिट
●सेवा: विमा खरेदी, दावा प्रक्रिया, वर्गणी तुलना ऑनलाईन आणि अँप्सच्या माध्यमातून
●व्यक्तिगत आर्थिक व्यवस्थापन
◆उदाहरण: मनीव्ह्यू, वॉलनट
◆सेवा: खर्च मागोवा, आर्थिक नियोजन, क्रेडिट स्कोअर
आज बहुतेक लोकांकडे त्यांच्या मोबाईलमध्ये किमान एक तरी फायनान्शियल अँप आहे, ज्यामुळे आपले जीवन सुसह्य होण्यास मदत झाली आहे. गुगल पे/ पेटीएम यांनी मोठी बाजारपेठ काबीज केली आहे. अनेकजण उद्योजक त्यात अधिकाधिक कल्पकता आणून त्यांचे स्टार्टअप उद्योग सुरू करीत आहेत. ते स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यास सरकारी प्रोत्साहनही मिळत आहे. अनेक नावीन्यपूर्ण फिनटेक कंपन्या व्यवसायवृद्धीस हातभार लावून आपल्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम करीत आहेत. आपल्या पेमेंट करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवत असल्याने त्यांचे महत्व अधोरेखित होते
■फायदे:
●ग्रामीण भागात आर्थिक सेवा पोहोचवणे.
●कॅशलेस व्यवहाराला चालना.
●स्टार्टअप्स आणि मध्य लघु आणि सूक्ष्म उद्योगासाठी फायद्याचे.
●पारंपरिक बँकिंगला पूरक सेवा.
■आव्हाने
●नियामक नियमांचे पालन आणि सायबर सुरक्षेचा धोका.
●सन 2024 मधील पहिल्या सहामाहीत फंडिंगमध्ये 59% घट.
●योग्य टॅलेंट मिळवणे आणि ग्राहक टिकवून ठेवणे हे मोठे प्रश्न.
■संधी
●दुर्लक्षित लोकसंख्येसाठी आर्थिक समावेशाचे दरवाजे खुले.
●ग्रामीण आणि निमशहरी भागांत वाढीची मोठी शक्यता.
●पारंपरिक बँका आणि फिनटेकमधील परस्पर सहकार्याला चालना
भारतातील ग्राहकांना उपयोग होईल अशा भविष्यकालीन नाविन्यपूर्ण फिनटेक कल्पना त्यासंबधीची उदाहरणे आणि त्यांचे परिणाम
●पूरक वित्त - (Embedded Finance)
म्हणजे काय: बँकींग किंवा आर्थिक सेवा थेट. पेमेंट,कर्ज, विमा एकाच छताखाली उपलब्ध.
उदाहरण: फ्लिपकार्टवर खरेदी करताना कर्ज मिळणे.
परिणाम: बँकेकडे न जाता व्यवहार पूर्ण.
●कृत्रिम प्रज्ञेवर आधारित संपत्ती व्यवस्थापन- (Robo-Advisors)
म्हणजे काय: कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून दिला जाणारा गुंतवणुकीचा सल्ला. हा सल्ला वैयक्तिक असेल.
उदाहरण: तुमच्या मासिक खर्चाचा विचार करून म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला.
परिणाम: नवशिक्यांसाठी गुंतवणूक सुलभ आणि प्रभावी होण्याची शक्यता.
●CBDC (डिजिटल रुपये – RBI कडून)
म्हणजे काय: आरबीआयने जारी केलेला डिजिटल भारतीय रुपया. सध्या मोठ्या कंपन्या व्यवहार करण्यासाठी त्याचा वापर करीत आहेत भविष्यात हा वापर सार्वत्रिक होईल.
परिणाम: जलद, सुरक्षित, सहज शोध घेता येऊ शकेल व्यवहार.
●विकेंद्रित वित्त - (Decentralized Finance)
म्हणजे काय: ब्लॉकचेनवर तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक सेवा, मध्यस्थाचा कमीतकमी वापर,पारदर्शक व्यवहार.
उदाहरण: कर्ज, विमा, व्याज मिळवणे स्मार्ट कॉन्ट्रॅक्टद्वारे.
परिणाम: पारदर्शक, कमीतकमी व्याजदर आणि व्यवस्थापन फी आकारणी शक्य आहे त्यावर नियमन गरजेचे.
●बोलून सूचना देऊन केले जाणारे व्यवहार- (Voice based banking/transactions)
म्हणजे काय: आपल्या भाषेत फक्त बोलून व्यवहार.
उदाहरण: "मंदारला 1000 रुपये त्वरित पाठवा" अशी सूचना गुगल असिस्टंला केली असता माझ्या खात्यातील पैसे गुगल पे ने मंदारच्या खात्यात त्वरित हस्तांतरीत होतील.
परिणाम: ज्येष्ठ नागरिक आणि अल्पशिक्षित व्यक्तींना व्यवहार करण्यासाठी उपयुक्त.
●कृषी वित्तव्यवहार - (Agri-Fintech)
म्हणजे काय: शेतकऱ्यांसाठी खास आर्थिक तंत्रज्ञान सेवा.
उदाहरण: हवामान अंदाजावर आधारित कर्ज, पीक विमा अॅपवरून.
परिणाम: ग्रामीण भागाचा आर्थिक विकास.
●पर्यायी विदेद्वारे पतमानांकन-
म्हणजे काय: कॉल, व्यवहार, मोबाईल वापराच्या डेटावरून क्रेडिट स्कोअर.
परिणाम: ज्यांच्याकडे बँक इतिहास नाही त्यांनाही कर्ज.
●बायोमेट्रिक + ब्लॉकचेन केवायसी-
म्हणजे काय: फिंगरप्रिंट, डोळा स्कॅन व ब्लॉकचेनद्वारे तपासणी.
परिणाम: फास्ट व फसवणूक-मुक्त ओळख पडताळणी.
●ग्राहकांच्या गरजेनुसार विशेष सेवा- (Special Services)
म्हणजे काय: ग्राहकांच्या विशिष्ट खास गरजा ओळखून त्यानुसार सेवा
उदाहरण: ग्राहकास काही समभाग, म्युच्युअल फंड युनिटस, दीर्घकालीन रोख्यामधील गुंतवणूक प्रदीर्घकाळ ठेवायची असल्यास- ती त्यास मोडताही येणार नाही आणि सुरक्षित राहील अशा पद्धतीने साठवून ठेवता येईल अशी डीजीलॉकर अथवा एन्टिटीलॉकर सदृश्य सुविधा
परिणाम: वारसांसाठी निश्चित सुरक्षित दीर्घकालीन गुंतवणूक करता येणे शक्य.
ही यादी परिपूर्ण नसून यात ग्राहकांच्या विशिष्ट आणि नेमक्या गरजा ओळखून त्यात अनेक गोष्टींची भर घालता येईल. त्यातून फिनटेक निर्मितीत रस असणाऱ्या उद्योजकांना अनेक नावीन्यपूर्ण स्टार्टअप उद्योगात ‘अवसर’ अशा अर्थाने संधी शोधता येणे शक्य आहे.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक असून हा लेख कोणत्याही फिनटेक मंचाची शिफारस करीत नाही
13 जून 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
Sunday, 8 June 2025
जर्मनीची लवकर निवृत्तीवेतन सुरुवात योजना
#जर्मनीची_लवकर_निवृत्तीवेतन_सुरुवात_योजना_आर्थिक_साक्षरतेकडे_एक_क्रांतिकारी_पाऊल_की_केवळ_एक_कल्पना?
जगभरात अनेक देश सामाजिक सुरक्षेचा भाग म्हणून त्यांच्या नागरिकांसाठी कल्याणकारी योजना राबवीत असतात. अनेकदा अशा प्रकारच्या योजना ह्या बेरोजगार, ज्येष्ठ नागरिक, कामगार याच्यासाठी अथवा क्वचित समाजातील मोठ्या वंचित घटकासाठी राबवण्यात येतात. त्यात केवळ वृद्धांसाठी असलेल्या अश्या खास योजना आहेत. आयुर्मानात वाढ होत असल्याने जगभरात वृद्धांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे अशा योजनांवरील खर्चात सातत्याने वाढ होत असते. विकसित देशांची लोकसंख्या कमी आणि सरकारचे उत्पन्न अधिक असल्याने त्यांना सरसकट अशा योजना सर्वांसाठी रबावता येतात, परंतु वृद्धांची संख्या वाढत असल्याने त्यांनाही आता या खर्चावर नियंत्रण असावे असे वाटू लागले आहे. विकसनशील देशात त्या राबवण्यावर मर्यादा येत असल्याने त्याला कठोर चाळणी लावली जाते. जर्मनीला एकंदर लोकसंख्येत वृद्धांची संख्या सातत्याने वाढत असल्याने अशा योजनांवरील खर्चात होणाऱ्या वाढीचा ताण येत आहे. त्यावर उपाय म्हणून अगदी गेल्या आठवड्यात त्यांनी एक अभिनव योजना सुरु करण्याचे ठरवले आहे. सध्या ती केवळ प्रस्तावित असून त्यास मंजुरी मिळायची आहे. त्यानुसार आता सामाजिक सुरक्षा योजनेचा एक भाग म्हणून आर्थिक सुरक्षिततेसाठी प्रथमच 6 ते 18 या वयोगटातील मुलांसाठी ‘लवकर निवृत्तीवेतन सुरुवात’ (Early Start Pension) या नावाची योजना आणण्याचे ठरवले आहे. या योजनेतून लहान वयातच देशात आर्थिक साक्षरतेचा पाया घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
जर्मनी ही सध्या जगातील तिसरी आणि युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मोटार वाहने, त्यांचे सुटे भाग आणि रासायनिक उद्योग यात जर्मन कंपन्या आघाडीवर असून सकल राष्ट्रीय उत्पन्नात तेथील सेवा क्षेत्राचा 70% वाटा असल्याचे सन 2024 च्या केपीएमजीच्या अहवालात म्हटले आहे. जगभरातील निवृत्तीवरील योजनांच्या संकेतास तडा देत प्रथमच, सहा ते अठरा या वयोगटातील सर्व मुलांसाठी सरकारने तयार केलेली ही निवृत्तीवेतन योजना आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या एनपीएस वात्सल्य आणि लाडकी बहीण या योजनांशी त्याची काहीशी तुलना होऊ शकते. एनपीएस वात्सल्य ही निवृत्ती योजना असली तरी त्यातील वर्गणी केवळ पालकांनी भरायची आहे बालक सज्ञान झाले की त्यांनी तिचे एनपीएस मध्ये रूपांतर करायचे आहे तर पात्रता पूर्ण केलेल्या लाडक्या बहिणींना सरकारकडून दरमहा रक्कम मिळते. जर्मनीतील प्रस्तावित असलेल्या या योजनेनुसार शाळेत जाणाऱ्या प्रत्येक पात्र मुलांना सरकारकडून दरमहा दहा युरो मिळतील. पालक त्याच्या इच्छेनुसार त्यात रक्कम जमा करू शकतील. सरकारकडून
एकूण जास्तीतजास्त बारा वर्षाच्या कालावधीत प्रत्येक मुलाला एकूण 1440 युरो मिळू शकतील. ही निवृत्ती योजना असल्याने पुढे 60 वर्षे त्यात सातत्याने चक्रवाढ गतीने वाढ होत राहील कारण जर्मनीत 67 हे सन 1964 नंतर जन्मलेल्या नागरिकांचे निवृत्तीचे वय आहे. स्वेच्छानिवृत्ती 45 वर्षे पूर्ण झाल्यावर घेता येते अशी तेथे तरतूद आहे. या निवृत्तीनिधीत जमा होणारी रक्कम सरकारतर्फे भांडवल बाजारात गुंतवली जाईल. मुलाचे पालक त्यात स्वेच्छेने रक्कम जमा करू शकतील. लाभार्थी मूल अठरा वर्षाचे झाल्यावर त्यात त्यांना स्वकमाईची रक्कम भरण्याची परवानगी मिळेल. या मध्ये जमा रकमेवर कर सवलत मिळेल तसेच त्यातील नियमांनुसार सुयोग्य कारणासाठी पैसे काढूनही घेता येतील. योजनेस लवकर सुरुवात झाल्याने अधिक रक्कम जमा होऊन दीर्घकाळात त्यात लक्षणीय वाढ होईल.
योजनेच्या समर्थकांचे असे म्हणणे आहे की- ●यामुळे मुलांना लहान वयातच आर्थिक साक्षरतेची शिकवण मिळेल. लहानपणापासून आर्थिक संकल्पनांची ओळख करून देणं ही काळाची गरज आहे. ही योजना मुलांना पैसे, गुंतवणूक आणि बचत यांचे महत्त्व समजून घेण्यास मदत करू शकते.
●चक्रवाढव्याज, गुंतवणूक आणि बचत यांचे महत्व समजेल. मुलांचा आर्थिक बाजारपेठ, दीर्घकालीन भांडवल सुरक्षितता या संकल्पनाशी परिचय होईल. वयाच्या अगदी सुरुवातीपासूनच बचत सुरू केल्यामुळे व्याजाच्या चक्रवाढीचा अधिक फायदा मिळेल. परिणामी, निवृत्तीच्या वेळी त्यांनी पुरेसा निधी साठवलेला असेल.
●ज्या घरांमध्ये मुलांबरोबर बचत गुंतवणूक या विषयावर चर्चाच होत नाही तेथे ती होण्याची सुरुवात होईल.
●वाढत्या वृद्ध लोकसंख्येमुळे सरकारी निवृत्ती निधीवर ताण वाढत आहे. जर प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्याच योजनेत बालवयात लवकर बचत सुरू केली, तर भविष्यात सरकारी यंत्रणेवरचा अतिरिक्त भार कमी होऊ शकतो.
सीएनबीसी मेकच्या अहवालानुसार, ●आपल्याकडील सरकारच्या वादग्रस्त ‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणे जर्मनीतील अनेक लोकांना ही योजना विसंगत वाटते. त्यांना केवळ प्रतिकात्मक दृष्ट्या ही योजना शक्तिशाली वाटत असली तरी वास्तविक जगात अनेक वर्षांनी त्याचे मूल्य फारसे नसेल असे वाटते. त्यामुळे तेथे जमलेल्या निधीचे वास्तविक मूल्य कमी असल्याने त्यातून अर्थपूर्ण निवृत्ती निधी जमा होण्याची शक्यता कमी वाटते.
●हे केवळ बचत खाते असल्याने आणि त्यातून गुंतवणूक केली गेल्याने त्यामागील गुंतवणूक निर्णय समजून घेऊन आर्थिक साक्षरता वाढेल का? याबाबत अनेक मान्यवरांना शंका आहेत. ●काही तज्ज्ञांचे मत आहे की इतक्या लहान वयात पैशांबद्दलची जबाबदारी देणे मुलांवर मानसिक दडपण अणू शकते.
●काही समीक्षक असे म्हणतात की ही योजना केवळ एक ‘feel good’ वातावरण निर्माण करण्यासाठी आहे. प्रत्यक्षात या योजनेचा सर्वसामान्य कुटुंबांवर फारसा परिणाम होणार नाही.
●अशा लहान मुलांसाठी स्वतंत्र निवृत्ती योजना तयार करणे, तिचे व्यवस्थापन करणे व पालकांना प्रोत्साहित करणे हे प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरू शकतं.
काही अर्थतज्ज्ञ याला पुढील पिढीसाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजनाची चांगली सुरुवात मानतात. ही योजना प्रत्यक्षात राबवायला अत्यंत कठीण आहे, विशेषतः जेव्हा सामाजिक आणि मानसिक बाबी लक्षात घेतल्या जातील. ‘आरडब्ल्यूआय लीबनिझ इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक रिसर्च’ चे प्रमुख ‘क्रिस्टोफ श्मिट’ आणखी एक पाऊल पुढचा विचार करतात. त्यांना हा प्रस्ताव मुळातून दोषपूर्ण वाटतोय आणि शैक्षणिकदृष्ट्याही ते चुकीचे आहे असे वाटते. बचतीचा मूळ गाभा - उद्याच्या चांगल्यासाठी आजचा त्याग करणे- यातून हरवला आहे, असे त्यांना वाटते. मुलांना निवड करण्याची किंवा त्याग करणे म्हणजे काय हे समजून न घेता, निष्क्रियपणे निधी मिळत असल्याने, बचतीचा खरा हेतू त्यातून हरवला जात असल्याचे वाटते. श्मिट पुढे म्हणतात की, माफक आर्थिक परताव्याच्या आशेने असे प्रयोग करण्यापेक्षा सध्याची राष्ट्रीय शिक्षण प्रणाली सुधारण्यासाठी तेच पैसे खर्च करणे अधिक योग्य होईल.
जर्मनीची लवकर सुरू होणारी ही पेन्शन योजना, निवृत्ती नियोजन आणि आर्थिक शिक्षणासाठी एक नवीन दृष्टिकोन आहे यात शंका नाही. ती निश्चितच महत्त्वाकांक्षेत दूरदर्शी वाटते. पुढच्या पिढीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि बचतीबद्दल समाजाच्या विचारांना आकार देणारी वाटते. त्याचबरोबर ती परिणामकारकता, प्रतीकात्मकता विरुद्ध वस्तुस्थिती आणि मुलांना निवृत्ती बचत योजनेत सरकारकडून पैशाचे वाटप केल्याने त्यांना पैशाबद्दल खरोखर काही अर्थपूर्ण शिकवले जाईल का? याबद्दल गंभीर प्रश्न देखील उपस्थित करते. सर्व जग म्हणूनच या अभिनव आर्थिक प्रयोगाकडे पाहत असताना, एक गोष्ट निश्चित आहे - जर्मनीची मुले लवकरच या ग्रहावरील निवृत्तीसाठी तरतूद करणारे सर्वात तरुण गुंतवणूकदार बनू शकतात. ‘लवकर निवृत्तीवेतन सुरुवात’ ही संकल्पना आकर्षक वाटत असली, तरी तिच्या यशासाठी ठोस अंमलबजावणी, पालकांचे सहकार्य आणि शैक्षणिक पातळीवर सखोल आर्थिक साक्षरतेचा समावेश असावा लागेल. सध्या तरी ही योजना केवळ प्रस्तावित आहे आणि भविष्यात तिच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेवरच तिच्या यशाचे मोजमाप अवलंबून आहे. तेव्हा जर्मनीतील नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिक म्हणून वाढतील की त्यांना कधी तरी निवृत्तीसाठी तरतूद करावी लागते, हेच विसरतील?
हे केवळ फक्त येणारा काळ (जो सहा दशके एवढा दीर्घ आहे) ठरवेल.
उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत. याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकर म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
6 जून 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
डब्बा ट्रेडिंग
#डब्बा_ट्रेडिंग
कर चुकवण्यासाठी अनेक छोटे मोठे व्यवहार रोखीत होत असतात हे आपल्याला माहीत आहे. अधिकाधिक लोकांनी आपले सर्वच व्यवहार जाहीर करून त्यावर असलेल्या सवलतींचा लाभ घेऊन देय कर भरावा अशी सरकारची इच्छा असते. त्याप्रमाणे सर्वांनी प्रामाणिकपणे कर भरल्यास विकासासाठी मुबलक पैसा उपलब्ध होऊन भविष्यात कर दर कमी होऊ शकतील. कर संकलन वाढवण्याचा उपाय म्हणून सरकार अनेक उत्पन्न आणि खर्च यावर टीडीएस, टीसीएस लागू करते. हा एक प्रकारचा अग्रीम कर असुन त्यामुळे संबंधित व्यक्ती आपले उत्पन्न जाहीर करून नियमानुसार कर भरेल अशी अपेक्षा असते. भविष्यात सर्वच रोखीचे व्यवहार पूर्णपणे बंद करून अथवा त्यावर काही कर लावणे शक्य आहे परंतु त्यात असंख्य अडचणी आहेत. अजूनही अनेक लोक विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि अशिक्षित लोक ऑनलाइन व्यवहार करीत नाहीत. त्यांना ते तितकेसे सोपे आणि सुरक्षित वाटत नाहीत यासंबंधीत तक्रारी समाधानकारक रित्या सुटतील अशी ठोस यंत्रणा नाही. याचबरोबर आज अनेक असे व्यवसाय आहेत ज्यात रोखीचे अधिकाधिक व्यवहार होतात. हे व्यवहार करणारे व्यावसायिक सर्वच राजकीय पक्षातील राजकारणी लोक करत असल्याने ते कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांचे यासंबंधात हितसंबंध जपले जावेत याबाबत ते अत्यंत दक्ष असतात. जोपर्यंत त्यांना असे वाटते तोपर्यंत त्यात बदल होणे जवळपास अशक्य आहे. आज जीएसटी लागू झाल्यावर कर संकलन वाढत असले तरी सर्व घाऊक
नियमित व्यवहारांबरोबर जवळपास तेवढेच व्यवहार रोख रकमेत होतात हे उघड सत्य आहे. ते बदलण्याची राजकीय इच्छाशक्ती आणि त्यासाठी त्याच्यावर जनतेचा दबाव या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. जोपर्यंत राजकारणी आणि जनता यांचे हे साटेलोटे असेच राहील तो पर्यंत यात मोठा फार काही बदल होईल असे वाटत नाही.
इतर बाजारांप्रमाणे शेअरबाजार, वस्तुबाजार आणि चलन बाजारात होणाऱ्या नियमित व्यवहारांशीवाय समांतर असे व्यवहार फार पूर्वीपासून होत आहेत. हे व्यवहार प्रामुख्याने रोखीत आणि विश्वासावरच होत असतात. सूचिबाह्य शेअर्सची खरेदी विक्री करणारे काही मंच आपण मागील काही लेखात पाहिले, असे मंच अधिकृत असून त्यावर व्यवहार करण्यास बंदी नाही. या व्यवहारांवर कमी नियामक बंधने असली तरी पारदर्शक पद्धतीने आणि अधिकृतपणे होतात. त्यावर कर आकारणी कशी होणार तेही आपल्याला माहिती आहे. मान्यताप्राप्त बाजारात होणारे व्यवहार हे करार असतात आणि ते पूर्ण करणे संबंधितांवर बंधनकारक असते या व्यवहार पुर्ततेची हमी बाजार नियामक मंडळावर असते. कोणत्याही कारणाने ते पूर्ण झाले नाहीत तर त्यांची भरपाई कशी करायची यांचे निश्चित नियम असल्याने ते अधिक सुरक्षित असतात. याशिवाय अन्य ठिकाणी जर समांतररित्या असे व्यवहार होत असतील तर त्यास डब्बा ट्रेडिंग असे म्हणतात. यात प्रामुख्याने पैजेचे व्यवहार होतात. या पैजा प्रत्यक्षात खरेदी विक्री न करता भविष्यातील विशिष्ट वेळी, दिवशी, शेअरचा भाव, निर्देशांक, सोने चांदी यासारख्या मौल्यवान वस्तूंचा भाव, डॉलरचा भाव एवढा असेल अशा स्वरूपाच्या असतात. या पैजा अत्यंत कमी पैशांची हमी देऊन लावता येतात आणि त्यांचे समायोजन पूर्वी आणि आजही प्रामुख्याने रोख पद्धतीने होते. पूर्वी ही पैजेची रक्कम डब्यात, खोक्यात अथवा बादलीत ठेवण्यात येत असल्याने त्यास डब्बा ट्रेडिंग, बॉक्स ट्रेडिंग आणि बकेट ट्रेडिंग असे नाव पडले असण्याची शक्यता आहे. आता काही व्यवहार डी मॅट खात्याचा वापर करून आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन पद्धतीनेही केले जात आहेत. डब्बा ऑपरेटरशी संपर्क करून असे व्यवहार करायचे असल्याचे तोंडी अथवा अन्य कोणास शोधाता येणार नाही अशा पद्धतीने कळवण्यात येते, काही रक्कम देण्याच्या बोलीवर व्यवहार निश्चित केला जातो, यातील किंमती नियमित बाजारा बरोबर ताडण्यात येतात, त्यात जिकल्यास ठरलेली रक्कम देण्यात येते रोख रक्कम त्रितीयपक्षी मध्यस्थाच्या माध्यमातून दिली घेतली जात असून केवळ विश्वासावर हे व्यवहार केले जातात. यास कायद्याचे कोणतेही पाठबळ नसल्याने, एक प्रकारे तो मालमत्तेतील किमतीच्या चढ उतारावर आधारित असा जुगार आहे.
■मान्यताप्राप्त बाजार, सूचिबाह्य शेअर्स खरेदीविक्री मंच, डब्बा ट्रेडिंग यांची तुलना-
●कायदेशीरपणा: मान्यताप्राप्त बाजार आणि सूचिबाह्य शेअर्सच्या व्यवहारांचे मंच कायदेशीर असल्याने सुरक्षित आहेत. डब्बा ट्रेडिंग मंच बेकायदेशीर आहेत.
●व्यवहार व्यवस्था: बाजार आणि सूचिबाह्य शेअर्स मंच यावरील व्यवहार निश्चित नियमाने होतात. यावरील ग्राहकांची नोंद ठेवली जाते. ओळख पटवली जाते व्यवहार पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होतात. डब्बा ट्रेडिंग व्यवहार त्यांचे जरी काही नियम असले तरी ते बहुतेक रोख रकमेत आणि केवळ विश्वासावर होतात. त्याचे समायोजन डब्बा ट्रेडिंग ऑपरेटरद्वारे केले जाते.
●नियामक देखरेख: बाजार व्यवहारावर सेबीचे पूर्ण नियंत्रण असून सूचिबाह्य शेअर्स व्यवहार कमी नियंत्रणात आहेत. डब्बा ट्रेडिंग हे सेबीच्या नियामक यंत्रणेत येत नाहीत.
●कर आकारणी: बाजार व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून मान्यताप्राप्त बाजारात अल्प आणि दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर विशेष दराने कर आकारणी केली जाते. सुहीबाह्य शेअर्सवरील भांडवली नफ्यावर अन्य मालमत्तांप्रमाणे दोन वर्षानंतर विशेष दराने कर आकारणी केली जाते. डब्बा ट्रेडिंग व्यवहार अधिकृतपणे नोंदले जात नसल्याने त्यावर कोणताही कर दिला जात नाही.
●जोखीम तीव्रता: आधी सांगितल्याप्रमाणे बाजारातील व्यवहार अधिक सुरक्षित असल्याने त्यातील जोखीम अत्यंत कमी असते. सूचिबाह्य शेअर्सच्या व्यवहारांचे मंच विविध परवानग्या घेऊन हे व्यवहार करीत असल्याने आता त्यातील जोखीम खूप कमी झाली आहे. डब्बा ट्रेडिंग व्यवहार बेकायदेशीर असल्याने त्यात फसवणूक, त्याचप्रमाणे त्यात भाग घेतल्याबद्दल कायदेशीर कारवाई आणि शिक्षा होऊ शकण्याची शक्यता आहे.
■अन्य व्यवहार आणि डब्बा ट्रेडिंग यातील मुख्य फरक:
●पारदर्शकतेचा अभाव: डब्बा ट्रेडिंग पारदर्शक पद्धतीने होत नाही. त्यामुळे त्यात फसवणूक होण्याची शक्यता असते.
●गुंतवणूकदार संरक्षणाचा अभाव: हे व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर असल्याने यातील फसवणुकी संदर्भात गुंतवणूकदार ग्राहकांना कुठेही दाद मागता येत नाही.
●कर आकारणी: या व्यवहारावर कोणतीही कर आकारणी होत नाही किंबहूना असे व्यवहार कर चुकवण्यासाठीच केले जातात.
●व्यवहार समायोजन: यातील व्यवहारांचे समायोजन संबंधित डब्बा ऑपरेटरकडून केले जाते.
थोडक्यात,
डब्बा ट्रेडिंग ही नियमित बाजार अथवा अधिकृत मंचाबाहेर केल्या जाण्याऱ्या बेकायदेशीर व्यवहारांची प्रक्रिया आहे.
प्रत्यक्ष शेअर्सची खरेदी विक्री न करता भावातील फरकाचा लाभ देणारे, दलाली न आकारणारे, कमी भांडवलावर कित्येक पटीत व्यवहारांची परवानगी देणारे, बाजार संचाहून वेगळ्या संचात / तुकड्यात खरेदी विक्री करता येणारे, पैज लावण्याची परवानगी देणारे, त्वरीत पैसे देण्याची व्यवस्था करणारे, अधिकाधिक लोक वापरत असलेले, 24 तास कार्यरत असणारे, आणि आता तंत्रज्ञानाचा वापरुन ग्राहकस्नेही व्यवहार पर्याय उपलब्ध करून देणारे असून डब्बा ट्रेडिंग ब्रोकर आणि त्यांचे मंच समाज माध्यमावर उघडपणे जाहिराती प्रकाशित करीत असतात. सहज गुगल सर्च केलं असता, भारतातील प्रमुख डब्बा ट्रेडरची मिळालेली नावे अशी-
ट्रेडेक्स लाइव, एरो ट्रेड, व्ही मनी, व्हेंटज मार्केट, डब्बा ट्रेडिंग, स्काय ट्रेड, आवाज शेअर्स, डब्बा ट्रेडिंग कस्ट माइज, एलिट फॉर्च्युन, ट्रेड पाल अशी 10 आघाडीची नावे सहज मिळाली. यांची अँप्स आणि संकेतस्थळेही आहेत, यातील ‘व्यवहार किमान पैशांत कमाल व्यवहार’ या तत्वांवर आधारित असल्याने ते व्यक्तींमधील जुगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देतात. यास कायदेशीर संरक्षण नसल्याने गुंतवणूकदराचे नुकसान होऊन कायदेशीर समस्या उद्भवू शकतात. प्रतिभूती करार नियमन कायदा 1956 च्या (SCRA) कलम 23 (1) नुसार प्रतिभूती व्यवसायासाठी प्रचार करणे, बोली किंवा देकार देण्यासाठी लोकांना एकत्र करणे, कायद्यातील कलमांचे पालन न करणे आणि प्रतिभूती अपील न्यायाधिकरणाच्या आदेशांचे पालन न करणे यांचा समावेश आहे त्यामुळे असे व्यवहार करणे बेकायदेशीर आहे त्याचप्रमाणे भारतीय न्याय संहिता 2023 (BNS) च्या कलम 410 (विश्वासाचा भंग) आणि 318(फसवणूक आणि कट) नुसारही गुन्हेगारी कृत्य आहे. याबद्दल संबंधित व्यक्ती आणि व्यापारी यांना जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि अथवा ₹ 25 कोटीपर्यत दंडाची शिक्षा होऊ शकते. बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी केवळ माहिती म्हणून डब्बा ट्रेडिंग म्हणजे काय जाणून घ्यावे. हा लेख डब्बा ट्रेडिंगमधील गुंतवणूक आणि त्यांच्याशी संबंधित कोणत्याही मध्यस्तांची शिफारस करीत नाही.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकरणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 30 मे 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.
आयटीआर 3 विषयक शंका समाधान
#आयटीआर_3_विषयक_शंका_समाधान….
आयकर रिटर्न फॉर्म (ITR-3) हा अशा व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे व्यापार अथवा व्यवसायातून उत्पन्न मिळते. याशिवाय घरभाडे, भांडवली नफा, पगार किंवा अन्य उत्पन्न आहे, ज्यासाठी सर्वसमावेशक हिशेब पुस्तके राखणे आवश्यक असेल अथवा नसेल. हा सरकारच्या आयकर विभागाने विविध प्रकारच्या उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी विहित केलेल्या विविध आयकर रिटर्न फॉर्मपैकी एक आहे. या फॉर्म विषयीच्या शंकाची उत्तरे जाणून घेऊन तो कसा दाखल करता येतो त्याची अधिक तपशीलवार माहिती घेऊया.
◆आयटीआर-3 फॉर्म म्हणजे काय?
~आयटीआर-3 हा भारतात पगार, व्यवसाय आणि अन्य स्रोतांमधून उत्पन्न असलेल्या व्यक्ती आणि हिंदू अविभाजित कुटुंबांसाठी (एचयूएफ) वापरला जाणारा प्राप्तिकर परतावा फॉर्म आहे.
◆आयटीआर-३ कोण दाखल करू शकते?
~उद्योग किंवा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न, पगार किंवा पेन्शनमधून मिळणारे उत्पन्न, घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न भांडवली नफ्यातून मिळणारे उत्पन्न, इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न. याशिवाय करदात्याकडे त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांपैकी एक म्हणून मालकी हक्क किंवा व्यवसाय असणे आवश्यक आहे. हा फॉर्म अधिक व्यापक असून करदात्यांना त्यांच्या उत्पन्नाबद्दल आणि विविध स्रोतांमधील कपातींबद्दल तपशीलवार माहिती सादर करण्याची परवानगी देतो. यात विविध विभाग आहेत जिथे करदात्यांना त्याची वैयक्तिक माहिती, एकूण उत्पन्नाची गणना, वेगवेगळ्या स्रोतांमधून उत्पन्नाचे तपशील, वजावट, भरलेले कर आणि त्यांची पडताळणी या संबंधित अनेक तपशील द्यावे लागतात.
◆खालील श्रेणींमध्ये येणाऱ्या करदात्यांकडून आयटीआर-3 दाखल करता येईल.
~पगार अथवा पेन्शन याशिवाय करदाता हा मालक असलेल्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न (ऑडिट आणि नॉन-ऑडिट दोन्ही प्रकरणे)
एकापेक्षा जास्त घरांच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न
'इतर स्रोतांमधून उत्पन्न' अंतर्गत येणाऱ्या लॉटरी, घोड्यांच्या शर्यती आणि इतर क्रियाकलाप जिंकून मिळालेली बक्षिसे
भारताबाहेरील देशातील मालमत्तेच्या माध्यमातून उत्पन्न मालमत्ता
अल्पकालीन किंवा दीर्घकालीन भांडवली नफ्यातून मिळणारे उत्पन्न
भागीदारी फर्मकडून मिळालेला मोबदला असे उत्पन्नाचे एकाहून अनेक स्रोत असलेले वैयक्तिक करदाते किंवा असे हिंदू अविभक्त कुटुंब यांना हा फॉर्म भरता येईल.
◆आयटीआर-3 दाखल करण्यास कोण पात्र नाही?
~व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबे वगळता इतर कोणीही आयटीआर-3, फॉर्म भरण्यास पात्र नाहीत. त्याचप्रमाणे-
आयटीआर-1 (सहज), आयटीआर-2 आणि आयटीआर-4 (सुगम) भरणारे करदाते, व्यापार व्यावसायिक अथवा भागीदारीत उत्पन्न नसलेले करदाते हा फॉर्म भरू शकत नाहीत.
◆आयटीआर-3 फॉर्मची रचना काय आहे?
~दरवर्षी फॉर्ममध्ये किरकोळ बदल होत असले तरी अशा नियमित बदलाशिवाय यावर्षी फॉर्मची रचना थोडी बदलली असून त्यातील प्रमुख बदल असे-
●भांडवली नफ्याचे विभाजन: भांडवली नफ्यासंबंधित करदर बदलल्याने 23 जुलै 2024 च्या आधी आणि नंतर झालेल्या विक्रीमुळे मिळालेला भांडवली नफा या वर्षी स्वतंत्रपणे नोंदवावा लागेल.
●बायबॅक तोटा: 1 ऑक्टोबर 2024 पासून, शेअर बायबॅक म्हणून मिळालेली रक्कम लाभांश समजून त्यावर इतर स्रोतापासून मिळालेले उत्पन्न मानून कर आकारला जाणार असून सदर शेअर खरेदी करण्यासाठी मोजलेली रक्कम भांडवली तोटा म्हणून मान्य केली जाणार आहे.
●मालमत्ता प्रकटीकरण मर्यादेत वाढ: आता मालमत्ता आणि दायित्वे नोंदवण्याची मर्यादा ₹1 कोटी (पूर्वी ₹50 लाख) पेक्षा जास्त असेल तरच आवश्यक आहे.
●नवीन कलम ४४बीबीसी: क्रूझ व्यवसाय ऑपरेटरसाठी लागू केले आहे. या कलमाअंतर्गत, प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या 20% रक्कम करपात्र उत्पन्न म्हणून गणली जाते.
●अधिक कपात तपशील: 80C, 10(13A), इत्यादी अंतर्गत दाव्यांसाठी तपशीलवार अहवाल आवश्यक आहे. कलम 80 सी, कलम 10 (13 ए)
●घरभाडे भत्ता आणि इतर संबंधित कलमांखाली कपातीचा दावा करणाऱ्या करदात्यांना आता आयटीआर-3 फॉर्ममध्ये अधिक बारकाईने माहिती द्यावी लागेल.
●टीडीएस विभाग कोड: व्यवसायाच्या स्वरूपावरून आणि त्याच्या उपविभागावरून ज्या अंतर्गत कर कापला गेला त्याचा नेमका व्यवसाय कोड भरणे आवश्यक आहे. यासाठी विविध व्यवसायांचे कोड आयकर विभागाने जाहीर केले असून ते त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
●कलम 80 सी खालील गुंतवणूक खर्च आणि कलमनिहाय टीडीएस टिसीएस रिपोर्टिंग सारख्या कपातींसाठी स्वतंत्र तपशील देणे सुरू करण्यात आले आहे.
यामुळे सादर करण्यात आलेल्या माहितीत पारदर्शकता, अचूकता येऊन विवरणपत्र दाखल करणे सोईचे होईल.
◆आयटीआर 3 दाखल करण्यास आवश्यक कागदपत्रे-
~पॅन, आधार, बँक खात्यांची माहिती, पगार मिळत असल्यास फॉर्म 16, गुंतवणूक तपशील, हिशोब पुस्तके.
◆आयटीआर 3, विवरणपत्र दाखल करण्याचे सर्वसाधारण टप्पे -
●विभागाच्या संकेतस्थळावर विवरण भरण्यासाठी लॉग इन करणे
●आपल्या खात्यास पॅन लिंक करणे
●वैयक्तिक माहिती- जसे की, नाव, पत्ता, पॅन, आधार, करदात्याचा प्रकार इ माहिती देणे
●उत्पन्नाचे स्रोत- विविध व्यवसाय त्यातून मिळालेला नफा त्यासंबंधित इतर तपशील, पगार पेन्शन घरभाडे भांडवली नफा अन्य उत्पन्न याचा तपशील आणि
केलेली गुंतवणूक आणि खर्च यांची विस्तृत माहिती द्यावी लागेल.
●भरलेल्या अथवा मुळातून कापलेल्या कराचा तपशील: यांची तपशीलवार माहिती द्यावी.
●इतर आवश्यक खुलासे : नियमानुसार इतर आवश्यक ते खुलासे करावे लागतील.
●करदेयता: सारांश पहा, तुलना करा आवश्यक असल्यास करमोजणी करण्याच्या पद्धतीत बदल केल्यास करामध्ये काय फरक पडतो तो पहावा आणि योग्य करप्रणाली निश्चित करावी. *नवी कर प्रणाली एकदा स्वीकारली की त्यात बदल करता येत नाही.* हे लक्षात ठेवूनच ती स्वीकारावी अथवा नाकारावी.
●दिलेली माहिती खरी असल्याचे प्रकटीकरण करावे
●आवश्यक असल्यास कर भरणा करावा
●यानंतर आयकर विभागाच्या पोर्टलवर विवरणपत्र सादर करून त्यांचे सत्यापन करावे. असे सत्यापन तीस दिवसात न केल्यास विवारणपत्र दाखल केले नाही असे समजण्यात येते. त्यामुळे यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.
असे यातील सर्वसाधारण टप्पे आहेत
स्वतः आपले आयटीआर 3 दाखल करणे गोंधळात टाकणारे आणि त्रासदायक असू शकते. ते बरेच क्लिष्ट असल्याने, विशेषतः सामान्य लोकांसाठी, पुढील दंड आणि सूचना टाळण्यासाठी कर व्यावसायिकाची मदत घेणे उचित आहे. त्याच्याकडून तुमच्या कर प्रश्नांचे निराकरण करताना तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या वजावटीचा जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल ते पहाणे जरुरीचे आहे.
◆आपण व्यावसायिक मदतीशिवाय आयटीआर 3 दाखल करू शकतो का?
~हो, जर तुम्हाला तुमच्या खात्यांचे लेखापरीक्षण करण्याची आवश्यकता नसेल तर तुम्ही कोणत्याही व्यावसायिक मदतीशिवाय आयटीआर 3 दाखल करू शकता. तथापि, हा फॉर्म अतिशय किचकट असल्यामुळे आयटीआर स्वतः दाखल करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि कठीण असू शकते म्हणून तुमचे अचूक आयटीआर दाखल करण्यासाठी कर व्यावसायिकांचा सल्ला घेणे अधिक योग्य होईल.
✍️उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकरणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 23 मे 2025 रोजी पूर्वप्रकाशित.
Friday, 16 May 2025
विवरणपत्र भरण्याची पूर्वतयारी
#विवरणपत्र_भरण्याची_पूर्वतयारी
आपले सर्व मार्गाने होणारे उत्पन्न आणि त्यावर भरलेला कर करदात्याने प्रमाणित करणे म्हणजे आयकर विवरणपत्र भरणे. कायद्यानुसार विशिष्ट उत्पन्न अथवा काही अटी पूर्ण करणाऱ्या सर्वाना आयकर विवरणपत्र भरणे सक्तीचे आहे. ज्या करदात्यांना आपले आयकर विवरणपत्र भरताना हिशोब प्रमाणित करावे लागत नाहीत त्यांना सन 2024-25 या वर्षाचे आपले आयकर विवरणपत्र दंड न भरता सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे. ज्यांना आयकर कायद्यानुसार हिशोबांचे लेखापरीक्षण करून मान्यता घ्यावी लागते, त्यांच्यासाठी हीच तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे. गेले काही वर्षे 31 जुलै ही दंड न देता विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली गेलेली नाही. त्यामुळे यंदा ती कदाचित वाढवली जाईल, या भ्रमात कोणी राहू नये. मुदतीत विवरण पत्र न भरल्याने दंड द्यावा लागतोच पण अनेक महत्वाच्या आयकर सवलतींवर पाणी सोडावे लागते. तेव्हा आपले विवरणपत्र दिलेल्या मुदतीत भरल्याने दंड वाचतोच, शिवाय करविषयक काही सवलती मिळतात. 1 एप्रिल 2025 पासून आपल्याला दिलेल्या मुदतीत आयकर विवरणपत्र दाखल करता येत असले तरी तांत्रिक कारणाने ते अनेकांना भरता येत नाही. त्यातील काही कारणे अशी-
★शेवटच्या तिमाहीत मुळातून कापलेला कर हा ज्याने कापला आहे त्यांना 30 एप्रिल पर्यंत भरता येतो. त्यात तफावत असेल तर 31 मे पर्यंत त्याचे विवरणपत्र भरून तो समायोजित करता येतो. अनेक कंपन्या हे सर्व शेवटच्या क्षणी करतात. त्यामुळे तो करदात्याच्या 26AS अथवा AIS वर दिसायला अजून काही दिवस लागू शकतात.आता सर्व करभरणा ऑनलाइन होत असताना हा तपशील ताबडतोब दिसायला हवा किंवा एक दिवसाहून अधिक कालावधी लागायला नको. आयकर खात्याने या संदर्भात तातडीने काहितरी करून हा विलंब टाळण्याची गरज आहे.
★अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांना कायद्याने देणे आवश्यक असा फॉर्म 16, मे अखेर ते अगदी 15 जूनपर्यंत देतात त्यामुळे आपले नक्की उत्पन्न किती, करकपात किती आणि विविध कलमानुसार घेतलेली आयकर सवलत किती ते नक्की समजत नाही.
★आयकर विवरणपत्र भरण्यासाठी आवश्यक फॉर्ममध्ये दरवर्षी काही बदल केले जातात असे फॉर्म अनेकदा 1 एप्रिलला उपलब्ध नसतात. या वर्षी सुधारित फॉर्म 3 विभागाकडून 25 एप्रिल 2025 ला उपलब्ध करून देण्यात आला.
★अनेक व्यावसायिक संस्थांचे जमाखर्च तपासून त्यांचे लेखापरीक्षण होणे आणि त्याला मान्यता मिळणे आवश्यक असते. असे असले तरीही-
ज्यांचे करपात्र उत्पन्न विहित मर्यादेहून खूप कमी आहे, ज्यांचा कर मुळातून कापला जात नाही आणि ज्यांना भांडवली नफा या सदराखाली काही उत्पन्न असेल/ नसेल असे करदाते आपले उत्पन्न मोजून ताबडतोब आयकर विवरणपत्र 1 एप्रिलपासून कधीही भरू शकतात.
आयकर विवरणपत्र दाखल करायचे विविध फॉर्म आहेत दरवर्षी विभागाकडून त्यात किरकोळ बदल होत असतात. आपण आपल्या कराची मोजणी दोन प्रकारे करू शकतो. त्याचप्रमाणे व्यवसाय उत्पन्न नसेल तर मोजणी करण्याच्या पद्धतीत सोईनुसार बदल करू शकतो. आपल्याला नेमका कोणता फॉर्म लागेल आणि तो भरण्यासाठी कोणत्या गोष्टी हाताशी ठेवल्या तर सोयीचे होईल याची माहिती घेऊयात.
★आयटीआर 1 (सहज)
कुणी भरायचा?
*करदाते ज्याचे पगार, पेन्शन, व्याज हेच उत्पनाचे साधन आहे.
*एकूण उत्पन्न 50 लाख रुपयांहून कमी आहे.
आवश्यक कागदपत्रे-
*फॉर्म 16
*बँक खातेउतारा
*मुळातून कर कापल्याचे प्रमाणपत्र
★आयटीआर 2
कुणी भरायचा?
*तुमचे उत्पन्न 50 लाखाहून कमी आहे.
*भांडवली नफा, घरभाडे हे तुमच्या उत्पन्नाचा भाग आहेत.
*परदेशात मालमत्ता आहे किंवा त्यात गुंतवणूक केली आहे.
आवश्यक कागदपत्रे-
*फॉर्म 16
*फॉर्म 16 A
*भांडवली नफ्याचा तपशील
★आयटीआर 3
कुणी भरायचा?
*पगार व्यवसाय यासह अथवा शिवाय उत्पन्नाची वेगवेगळी साधने असणारे
*स्वतःचा व्यवसाय असणारे
*भागीदारीत व्यवसाय करणारे
*उत्पन्नाचे अनेक स्रोत असणारे
आवश्यक कागदपत्रे-
*व्यवसायचा वार्षिक जमाखर्च
*वार्षिक नफातोटा पत्रक
*मुळातून कापून गेलेल्या कराचे प्रमाणपत्र
★आयटीआर 4 (सुगम)
एवढ्या दुर्बोधित फॉर्मच सुगम नाव ठेवणं हा मोठाच विनोद आहे
कुणी भरायचा?
*₹ 50 लाखाहून कमी उत्पन्न असलेले छोटे व्यावसायिक
आवश्यक कागदपत्रे-
*बँक खातेउतारा
*मुळातून करकपातीचे प्रमाणपत्र
★आयटीआर 5
कुणी भरायचा?
*मर्यादित भागीदारी व्यवसाय
*प्रोप्रायटर्स
*असोसिएशन ऑफ पर्सन
*अन्य फर्म ज्याचे उत्पन्न परिशिष्ट 11 नुसार करमुक्त आहे.
आवश्यक कागदपत्रे-
*व्यवसायाचा वार्षिक जमाखर्च
*वार्षिक नफातोटा पत्रक
*मुळातून कापून गेलेल्या कराचे प्रमाणपत्र
★आयटीआर 6
कुणी भरायचा?
*कोणतीही कंपनी ज्यांचे उत्पन्न परिशिष्ट 11 नुसार करमुक्त नाही.
आवश्यक कागदपत्रे-
*व्यवसायचा वार्षिक जमाखर्च
*वार्षिक नफातोटा पत्रक
*मुळातून कापून गेलेल्या कराचे प्रमाणपत्र
★आयटीआर 7
कुणी भरायचा?
आयकर कायदा 139 AA/AB/AC/AD मध्ये उल्लेख असलेल्या सर्व व्यक्ती/ संस्था यात प्रामुख्याने राजकिय पक्ष, विश्वस्त संस्था, वैज्ञानिक संशोधन संस्था यांचा समावेश होतो.
आवश्यक कागदपत्रे-
*आवश्यक असल्यास हिशोब तपासनीसांचा अहवाल
*मुळातून कर कपातीचे प्रमाणपत्र
या शिवाय आयकर विवरणपत्र भरण्यासाठी उपयुक्त गोष्टी जसेकी -
पॅन, आधार, पासवर्ड, बँक खाते तपशील, बचत गुंतवणूक केली असल्यास त्याचे तपशील, व्याज प्रमाणपत्र, गृहकर्ज मूद्दल व्याज यांची विभागणी, मेडीक्लेम भरल्याची पावती, मिळालेल्या दिलेल्या भेटवस्तू, क्रेडिट कार्ड व्यवहार, स्थानिक स्वराज्य संस्थेचा भरलेला कर, करमुक्त उत्पन्नाचा तपशील, भागीदारी करार, लीज करार, मोठ्या रकमेच्या व्यवहाराचे तपशील, देणगी दिली असल्यास त्याचा तपशील बोनस, राईट, मर्जर, डीमर्जर, खरेदीविक्रीची बिले या सारखी आपल्या उत्पन्नाच्या संबंधित आवश्यक ती माहिती हाताशी ठेवावी म्हणजे आयत्याक्षणी धावपळ करावी लागत नाही. या आर्थिक वर्षात भांडवली नफा वेगवेगळ्या कार्यकालासाठी वेगवेगळया दराने लागत असल्याने आयटीआर तीन मध्ये त्यांची मोजणी आणि करदेयता वेगवेगळी दाखवावी लागेल. त्याचप्रमाणे 1 ऑक्टोबर नंतर शेअर कंपनीने शेअरहोल्डरकडून खरेदी केले असतील तर मिळालेली रक्कम लाभांश म्हणून आणि मूळ शेअर्स खरेदी करण्यास लागलेली रक्कम भांडवली तोटा म्हणून दाखवावी लागेल. त्याचप्रमाणे एक कोटी रुपयाहून अधिक मालमत्ता आणि दायित्वे असल्यास त्याचाही तपशील द्यावा लागेल त्याप्रमाणे नवीन फॉर्म तयार करण्यात आला असून तो संबंधिताना उपलब्ध आहे.
याप्रमाणे फॉर्म भरण्यास आवश्यक तपशील हाताशी असल्यास आयकर विवरणपत्र भरणे सोपे जाते. आपल्याला विवरणपत्र भरता येत नसल्यास तज्ज्ञ व्यक्ती/ संस्था यांची मदत घ्यावी. अनेकदा आपण जाणकार समजत असलेली व्यक्ती यात जाणकार असतेच असे नाही तेव्हा आपण माहिती असल्यास स्वतः अचूक मोजणी करून द्यावी आणि संबंधित व्यक्तीस समजावून सांगावी त्याने विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी तपासून आपण पहावी. अनावधानाने यात संबंधित व्यक्तीकडून चूक झाल्यास त्याची सर्व जबाबदारी करदात्यांवर येते. त्यास दंड होतो याशिवाय मनस्ताप होतो तो वेगळाच. काही व्यावसायिक फर्म यासारख्या सेवा फी आकारून आपल्या ग्राहकांसाठी करीत असतात त्यांची मदत घेता येईल. एवढी पुरेशी काळजी घेऊनही काही जाहीर करायचे राहिले असल्यास विवरणपत्र 31 डिसेंबरपर्यत (जरी ते मंजूर झालेले असले / नसले तरी) दुरुस्त करता येते.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत. याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)
18 मे 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम आणि दैनिक प्रहार मुंबई आवृत्तीमध्ये पूर्वप्रकाशित.
Monday, 12 May 2025
काही सुचिबाह्य कंपन्या भाग2
#काही_सूचिबाह्य_कंपन्या_भाग2
मागील भागात आपण विविध मंचावर उपलब्ध असणाऱ्या अपोलो ग्रीन एनर्जी, विक्रम सोलार, टाटा कॅपिटल, एसबीआय फंड मॅनेजमेंट लिमिटेड या सूचिबाह्य कंपन्यांची माहीती मिळवली आज अजून काही प्रमुख कंपन्यांची माहिती मिळवूयात.
●एनएसई इंडिया लिमिटेड: सन 1992 मध्ये सरकारच्या पुढाकाराने स्थापन झालेले राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) हे जगातील आघाडीचे स्टॉक एक्सचेंज आहे ज्यामध्ये सुमारे 2300 कंपन्या सूचीबद्ध आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ, भारतीय स्टेट बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन त्याचे महत्वाचे भागधारक आहेत. सन 1994 मध्ये, NSE ने इलेक्ट्रॉनिक स्क्रीन-आधारित ट्रेडिंग आणि इंटरनेट ट्रेडिंग सुरू केले भारतीय शेअरबाजारात क्रांती केली. NSE चा प्रमुख निर्देशांक, निफ्टी 50, भारतीय भांडवली बाजारांसाठी जागतिक बेंचमार्क म्हणून काम करतो. NSE हे जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहे ज्याचा जागतिक डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट ट्रेडिंगमध्ये 21% वाटा आहे. चलनातील फ्युचर्स ट्रेडिंगसाठी ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज देखील आहे. NSE चे भांडवली बाजार व्यवसाय मॉडेल प्रामुख्याने ट्रेडिंग सेवा, एक्सचेंज लिस्टिंग, मार्केट डेटा फीड, निर्देशांक आणि तंत्रज्ञान उपाय प्रदान करते. त्याचे रोख बाजार इक्विटी शेअर्स, म्युच्युअल फंड, ईटीएफ, आरईआयटी, सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स, सरकारी सिक्युरिटीज, टी-बिल इत्यादींच्या व्यापारासाठी एक व्यासपीठ देते. कर्ज बाजार सरकारी, कॉर्पोरेट बाँड, व्यावसायिक कागदपत्रे आणि इतर कर्ज साधने उपलब्ध करून देते. एनएसई इक्विटी निर्देशांक, हायब्रिड निर्देशांक आणि मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या, विमा कंपन्या, गुंतवणूक बँका, पीएमएस आणि स्टॉक एक्सचेंजसाठी कस्टमाइज्ड निर्देशांकांसाठी निर्देशांक व्यवस्थापन सेवा देखील प्रदान देत आहे. गेल्या तीन वर्षांत कंपनीने 35% च्या सीएजीआरवर कामगिरी केली आहे. एनएसईचा आर्थिक वर्ष 2024 अखेरचा महसूल ₹ 15640 कोटी तर निव्वळ नफा ₹ 8327 कोटींवर पोहोचला आहे. प्रति शेअर कमाई ₹ 33.47 आहे. एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 1650/- च्या आसपास असून व्यवहार किमान 50 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹1560/₹8160 या मर्यादेत होती. काही अंतर्गत चौकशींमुळे त्याचा पब्लिक इशू लांबला तो लवकरच येण्याची शक्यता आहे. 6 मे रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मार्च 2025 प्रतिशेअर 35/- रुपये लाभांश देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
●चेन्नई सुपर किंग्ज लिमिटेड: चार वेळा आयपीएल विजेता असलेला सीएसके हा भारतातील एकमेव असा क्रीडा संघ आहे ज्यामध्ये सर्वसामान्यांना गुंतवणूक करता येईल. सीएसके ही सर्वात लोकप्रिय आयपीएल फ्रँचायझींपैकी एक आहे ज्याचे ब्रँड व्हॅल्यू मजबूत आहे. या ब्रँडची स्थापना सन 2008 मध्ये चेन्नई, तमिळनाडूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आयपीएल क्रिकेट संघाच्या रूपात झाली. ही इंडिया सिमेंट्सची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. आयपीएलची लोकप्रिय फ्रँचायझी असल्याने, सीएसके देशातील पहिली स्पोर्ट्स युनिकॉर्न बनली. या ब्रँडचे मार्केट कॅप 7800 कोटीपर्यंत वाढले.
चेन्नई सुपर किंग्ज विविध स्रोतांमधून उत्पन्न मिळवते जसे की- गेट तिकीट कलेक्शन, स्टेडियममधील जाहिराती आणि मर्चेंडाईज विक्री. संघाला एकूण महसुलाच्या 60% रक्कम मीडिया राईट्समधून मिळते, जी सर्वाधिक महसूल प्रवाह आहे. प्रायोजकत्वातून मिळणारे उत्पन्न एकूण महसुलाच्या सुमारे 15 ते 29% आहे आणि त्यानंतर तिकीट विक्रीतून 10% आहे. महामारीचा अनेक ब्रँडवर परिणाम झाला असला तरी, सीएसकेने अप्रत्यक्ष महसूल प्रवाहांद्वारे संतुलन राखण्यात यश मिळवले. आयपीएलमधील सर्वात आवडत्या संघांपैकी एक, सीएसके, मर्चेंडाईज विक्री, प्रायोजकत्व, बक्षीस रकमेचा काही भाग आणि डिजिटल व्ह्यूअरशिपद्वारे ठोस महसूल मिळवत राहील. आर्थिक वर्ष 2024 अखेर कंपनीने ₹695 कोटींच्या उलाढालीवर ₹ 201 कोटींचा निव्वळ नफा कमावला. त्यांची प्रति शेअर कमाई ₹ 6.14 आहे. दहा पैसे दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 190/- च्या आसपास असून व्यवहार 250 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹166/₹220 या मर्यादेत होती. कंपनी शेअरबाजारात येताना त्याचे दर्शनी मूल्य शेअर एकत्रित करून ₹ 1 करेल कारण भारतीय बाजारात एक रुपयांहून कमी दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सचे व्यवहार होत नाहीत.
●ऑर्बिस फायनान्शियल्स कॉर्पोरेशन लिमिटेड: सन 2005 मध्ये स्थापित, ऑर्बिस फायनान्शियल कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतातील वित्तीय सेवा क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी आहे. ऑर्बिस कस्टडी आणि फंड अकाउंटिंग, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज क्लिअरिंग, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज क्लिअरिंग, शेअर ट्रान्सफर एजन्सी आणि ट्रस्टी सेवा यासारख्या विस्तृत सेवा देते. कंपनीच्या ग्राहकांत 50 हून अधिक परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs), 150 पर्यायी गुंतवणूक निधी (AIFs) आणि 800 हून अधिक अनिवासी भारतीय (NRIs) यांचा समावेश आहे. कंपनी कस्टोडियल आणि क्लिअरिंग उत्पन्न आणि ट्रेझरी-संबंधित उत्पन्नातून महसूल मिळवते. ती भांडवली बाजारातून देखील उत्पन्न मिळवते.
अलिकडच्या वर्षांत, कंपनीने आर्थिक वर्ष 2024 अखेर 366 कोटी रुपयांच्या उलढालीवर 141 कोटींच्या निव्वळ नफ्यासह उत्कृष्ट आर्थिक वाढ दर्शविली आहे. प्रति शेअर कमाई ₹ 12.1 आहे. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 470/- च्या आसपास असून व्यवहार 100 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹290 / ₹510 या मर्यादेत होती.
●स्टड्स एक्सेसरीज लिमिटेड: दुचाकी हेल्मेट उत्पादनात जागतिक आघाडीवर असल्याने, स्टड्स संघटित दुचाकी हेल्मेट बाजारपेठेत जवळजवळ एक तृतीयांश वाटा उचलतात. कोविड-१९ दरम्यान स्टड्सना जास्त मागणी असताना फेस शिल्ड आणि प्रोटेक्शन वेअर तयार करण्याची संधी मिळाली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारत फक्त BIS-प्रमाणित दुचाकी हेल्मेटच तयार आणि विक्री करेल असे जाहीर केल्यावर स्टड्सच्या विक्रीला आणखी एक चालना मिळाली. कोविड-19 नंतर वाहतूक पुन्हा सुरू झाल्यामुळे दुचाकी हेल्मेटची मागणी झपाट्याने वाढत आहे. याशिवाय, लोक अनेकदा दोन ते तीन वर्षांत त्यांचे हेल्मेट बदलतात, ज्यामुळे कंपनीला अधिक व्यवसाय मिळतो. स्टड्स रायडिंग गियर ग्लोव्हज, गॉगल्स, जॅकेट आणि सेफ्टी आणि स्टोरेज गियरसह अॅक्सेसरीज उत्पादनाचा विस्तार करत आहे. याव्यतिरिक्त, स्टड्सला सायकल हेल्मेट विक्रीवर वर्चस्व गाजवण्याची संधी देखील आहे. कंपनी युरोप आणि अमेरिकेसह 40 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. अलीकडेच, कंपनीने हरियाणातील फरीदाबादमध्ये आपली उत्पादन क्षमता दुप्पट केली आहे. सन 2024 आर्थिक वर्ष अखेर कंपनीची उलाढाल ₹531 कोटी असून प्रति शेअर कमाई ₹ 14.54 आहे. पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 680/- च्या आसपास असून व्यवहार 100 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹670 / ₹1550 या मर्यादेत होती.
विविध मंचावर हे आणि असे अनेक कंपन्यांचे शेअर्स उपलब्ध असून त्यांचा व्यवहार संच आणि बाजारभाव यात मंचानुसार फरक पडू शकतो. मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करायची असल्यास बाजारभावात फरक पडू शकतो. हा लेख कोणतीही गुंतवणूक शिफारस करीत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत
काही सुचिबाह्य कंपन्या भाग1
#काही_सूचिबाह्य_कंपन्या_भाग1
मागील दोन लेखातून सुचिबद्ध नसलेल्या कंपन्या आणि त्याचे व्यवहार करणारे मंच यांची माहिती घेतली. या दोन्ही लेखांतून अशा कंपन्यांचा उल्लेख मी ‘असुचिबद्ध’ असा केला होता, त्याऐवजी ‘सूचिबाह्य’ असा शब्दप्रयोग माझ्या एका स्नेह्यांनी सुचवला असून तो अधिक योग्य वाटतो. गेल्या काही वर्षांत सूचिबाह्य शेअर्स अधिक लोकप्रिय झाले असून गुंतवणूकदार अशा उदयोन्मुख कंपन्यांचे शेअर्स खरेदी करीत आहेत. या शेअर्समध्ये गुंतवणूक करून, तुम्हाला दोन प्रकारे परतावा मिळतो.
◆ओव्हर-द-काउंटर ट्रेडिंगमुळे या शेअर्सच्या किमती दीर्घकाळात वाढू शकतात.
◆तुम्हाला प्री-लिस्टिंग (सुचिबद्ध होण्यापूर्वी) आणि लिस्टिंग नफा (सुचिबद्ध झाल्यानंतर सहा महिन्यांनी) मिळू शकतो.
अनेक लोक सूचिबाह्य शेअर्सबद्दल अधिक चौकशी करीत असून त्यांच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहेत. त्यातील सध्या उपलब्ध असलेल्या मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असलेल्या काही महत्वाच्या कंपन्यांची माहिती आपण आज घेऊयात.
●अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड: शाश्वत ऊर्जा क्षेत्रात प्रगती करण्याचे उद्दिष्ट ठेवून, अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) ही भारतातील उगवत्या कंपन्यांपैकी एक आहे. सन 1994 मध्ये स्थापन झाली असून ती अपोलो ग्रुपची मालकीची आहे. अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लागणाऱ्या सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करते. त्यांची खासियत सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोमास आणि ऊर्जा साठवणूक उपायांना अनुकूलित करणे यामध्ये आहे. एनएचपीसी, आइओसी, अडाणी ग्रीन हे त्याचे ग्राहक आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हरित ऊर्जा संसाधनांकडे वळण्यासाठी उद्योग आणि समुदायांना सोबत घेऊन कार्बन फूटप्रिंट कमी करणे हे त्यांचे ध्येय आहे. ही कंपनी नफ्यात असून प्रति समभाग ₹16 कमाई करीत आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 1380 कोटी आणि आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये मध्ये 2000 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळवेल अशी अपेक्षा आहे. सध्या, कंपनी विविध प्रकल्पांवर काम करत आहेत, उदा स्मार्ट सोलर स्ट्रीट लाईट इन्स्टॉलेशन, सोलर पॅनल इन्स्टॉलेशन, थर्मल पॉवर प्रोजेक्ट आणि ग्रामीण पाणीपुरवठा प्रकल्प हे काही प्रकल्प आहेत. अंमलबजावणी अंतर्गत प्रकल्पांची एकूण किंमत अंदाजे 1375 कोटी आहे. आशादायक वाढीसह, अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक बनली आहे. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 240/- च्या आसपास असून व्यवहार 100 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹155/₹515 या मर्यादेत होती.
●विक्रम सोलर लिमिटेड: सन 2006 मध्ये स्थापित, विक्रम सोलर ही भारतातील आघाडीच्या सोलर पीव्ही मॉड्यूल उत्पादकांपैकी एक आहे. सध्या, 3.5 गिगावॅट क्षमतेसह, कंपनी एकात्मिक सौर ऊर्जा उपाय, अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) सेवा आणि ऑपरेशन्स आणि देखभाल देखील प्रदान करते. विक्रम सोलरचे तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये तीन उत्पादन प्रकल्प आहेत. कंपनीचे भारतातील 600 जिल्ह्यांमध्ये 42 हून अधिक वितरक आहेत. विक्रमचा 70% महसूल पीव्ही मॉड्यूलमधून आणि सुमारे 20% ईपीसी सेवांमधून येतो.
कोची (केरळ) विमानतळावर पूर्णपणे सौरऊर्जा वापरण्यात, कोलकातामध्ये तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाची स्थापना करण्यात आणि संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात छतावरील सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात योगदान देणारी ही पहिली कंपनी आहे. कंपनीची अमेरिकेत विक्री कार्यालये देखील आहेत आणि त्यांनी 32 हून अधिक देशांमध्ये सौर पीव्ही मॉड्यूलचा पुरवठा केला आहे. कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष 2023 मध्ये 2015 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे, जो त्यामागील आर्थिक वर्षाच्या महसुलापेक्षा 18% जास्त आहे. त्याची प्रति शेअर कमाई ₹3.08 आहे. विक्रम सोलरने प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (आयपीओ) साठी सेबीकडे अर्ज केल्याची बातमी असून दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची
विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 410/- च्या आसपास असून व्यवहार 100 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹235/₹505 या मर्यादेत होती.
●टाटा कॅपिटल लिमिटेड: ही टाटा सन्सची उपकंपनी असून भारतीय रिझर्व बँकेकडे ठेवी स्वीकारत नसलेली एनबीएफसी म्हणून नोंदणीकृत आहे. तिच्या उपकंपन्यांसह, टाटा कॅपिटल कॉर्पोरेट, रिटेल आणि संस्थात्मक ग्राहकांना वित्तीय सेवा देते. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये विविध प्रकारची कर्जे, गुंतवणूक सल्लागार, क्लीनटेक फायनान्स, खाजगी इक्विटी, संपत्ती उत्पादने, व्यावसायिक आणि एसएमई फायनान्स, लीजिंग सोल्यूशन्स आणि टाटा कार्ड यांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये उलाढाल ₹8630/- कोटींवर पोहोचली. प्रति शेअर कमाई ₹ 8.57 आहे. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 960 /- च्या आसपास असून व्यवहार 30 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹865/₹1130या मर्यादेत होती.
●एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेड: ही भारतातील लोकप्रिय आणि सर्वात मोठ्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक आहे. सन 1987 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी हा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अमुंडी (एक जागतिक निधी व्यवस्थापन कंपनी) यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. एसबीआयकडे सध्या 63% हिस्सा आहे आणि उर्वरित 37% हिस्सा अमुंडीचा आहे. एसबीआय म्युच्युअल फंड इक्विटी म्युच्युअल फंड, डेट फंड, हायब्रिड म्युच्युअल फंड, सोल्युशन-ओरिएंटेड स्कीम आणि एक्सचेंज-ट्रेडेड फंड यासारख्या विस्तृत श्रेणीतील म्युच्युअल फंड योजना देतात. कंपनीने सन 2015 मध्ये पर्यायी गुंतवणूक व्यवस्थापन फंड (एआयएफ) देखील लाँच केला आणि भविष्यात आणखी निधी लाँच करू शकते. 53 पेक्षा जास्त म्युच्युअल फंड योजनांसह, एसबीआय म्युच्युअल फंडांकडे ₹1.65 ट्रिलियन रुपयांची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) आहे आणि 12 दशलक्षाहून अधिक गुंतवणूiकदार आहेत. एसबीआय फंड व्यवस्थापन सन 1988 पासून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना सेवा देत आहे. कंपनी भारतातील समर्पित ऑफशोअर फंडांचे मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करते. कंपनी एचएनआय, मोठे भविष्य निर्वाह निधी, संस्था आणि निवडक ट्रस्ट यांना पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा देखील देते. एसबीआयएफएमचा एएयूएम पुढील सर्वात मोठ्या समकक्ष (आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड) पेक्षा 44% जास्त आहे. आणि उर्वरित बाजारपेठेने पाच वर्षांच्या कालावधीत 10% वितरित केले असताना त्यांनी त्याच कालावधीत 27% सीएजीआर गाठला आहे. अलीकडील आर्थिक अहवालांनुसार (मार्च 3024), एसबीआय फंड व्यवस्थापनाने 3418 कोटी रुपयांचा निव्वळ महसूल मिळवला आहे. प्रति शेअर कमाई ₹ 41.1 आहे. एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 2625/- च्या आसपास असून व्यवहार 75 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹1785/₹2940 या मर्यादेत होती.
यापुढील भागात एनएसई इंडिया, ओर्बीस फायनांशीयल सर्व्हिसेस, चेन्नई सुपर किंग्ज आणि स्टड एक्सेसरीज लिमिटेड या कंपन्यांची माहिती घेऊ. या लेखातील माहिती हा गुंतवणूक सल्ला नाही. (अपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉम वर पूर्वप्रकाशीत.
असुचिबद्ध शेअर्सची खरेदी विक्री
#असुचिबद्ध_शेअर्सची_खरेदीविक्री
शेअर बाजारात नोंदणी न केलेले शेअर्स म्हणजे असुचिबद्ध शेअर्स हे आपल्या लक्षात आले असेलच. यांची माहिती आपण यापूर्वी घेतली आहे. त्यांची थोडक्यात उजळणी करूयात.
■असुचिबद्ध शेअर्स घेण्याचे फायदे:
●ते असुचिबद्ध असले तरी त्याची खरेदी विक्री करणारे अनेक मंच उपलब्ध असून त्यातून फायदा मिळवता येतो.
●असे शेअर्स सुचिबद्ध झाल्यानंतर ठराविक कालावधीनंतर त्याची विक्री करून नफा मिळवता येईल.
●याशिवाय डिव्हिडंड, राईट आणि बोनस यामुळेही त्यातून मूल्यवृद्धी होऊ शकते.
●उज्वल भविष्य असणारे शेअर्स अधिक प्रमाणात कमी मूल्यात मिळवून निश्चित अथवा दिर्घकाळात प्रचंड लाभ मिळवता येणे शक्य आहे.
■सुचिबद्ध शेअर्सहून असुचिबद्ध शेअर्समधील वेगळेपणा अथवा फरक:
●कमी तरल
●कमी अपारदर्शक बाजारभाव
●कमी नियामक नियमन
●सहज उपलब्ध माहिती नसल्याने मूल्यांकन करणे कठीण
●मोठ्या व्यवहार संचांमुळे खरेदीदार आणि विक्रेते यांना होणारी व्यवहार असुलभता
■असुचिबद्ध शेअर्समध्ये गुंतवणूक करताना विचारात घ्यायचे घटक:
●गुंतवणूकदाराची जोखीमक्षमता
●गुंतवणुकीमागील हेतू
●तरलतेचा अभाव
●गुंतवणूक संच विविधता
●नियामक असुविधा
■असुचिबद्ध शेअर्सवरील करआकारणी: असे शेअर्स दोन वर्षांच्या आत विकल्यास अल्प मुदतीचा भांडवली नफा होऊन तो करदात्यांच्या नियमित उत्पन्नात मिळवून कर आकारला जाईल तर दोन वर्षानंतर होणारा नफा दीर्घकालीन भांडवली नफा समजण्यात येऊन त्यावर सरसकट 12.5% दराने या विशेष दराने कर आकारला जाईल.
■नियामक बंधने: असे शेअर्स भविष्यात शेअरबाजारात नोंदले गेल्यावर किमान सहा महिने ते विकता येत नाहीत, एवढी गोष्ट सोडून आशा शेअर्सची खरेदी विक्री करण्यावर कोणतेही कायदेशीर बंधन नाही. भांडवल बाजारात होणाऱ्या होणाऱ्या सर्व व्यवहारांच्या पुर्ततेची हमी बाजाराने घेतलेली असते त्यामुळे असे व्यवहार झाल्यावर शेअर बाजाराच्या निश्चित नियमांनी ते पूर्ण केले जातात. यामध्ये वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. अशी निश्चित व्यवस्था असुचिबद्ध शेअर्स करिता नसल्याने या व्यवहारात अधिक जोखीम असते. आता अनेक मध्यस्थ, मान्यताप्राप्त ब्रोकर्स, फिनटेक कंपन्या, खाजगी कंपन्या यातील व्यवहार खात्रीपूर्वक करून देतात. हे व्यवहार 24 ते 48 तासात पूर्ण होतात. ते करणाऱ्या काही मंचाची, फिनटेक कंपन्यांची आपण माहिती आपण करून घेऊया.
◆अनलिस्टेडझोन: झिरोदाने ज्याप्रमाणे सुचिबद्ध शेअर्सच्या ब्रोकिंग व्यवसायात क्रांती घडवून आणली त्याप्रमाणे सन 2018 स्थापन झालेल्या या मंचाने असुचिबद्ध शेअर्सच्या व्यवहारात क्रांती घडवून आणली. उमेश पालिवाल आणि संतोष सिंग हे अभियांत्रिकी आयआयटी पदवीधर याशिवाय 15 वर्षाहून अधिक काळ भांडवल बाजार व्यावसायिक दिनेश गुप्ता यांनी एकत्रित येऊन हा मंच स्थापन केला आहे. या क्षेत्रातील संधी ओळखून तंत्रज्ञान आणि डिजिटल मार्केटिंगवर आधारित असा हा गुंतवणूक स्नेही मंच आहे. त्यावर शेअर्सच्या मागील व्यवहार किंमती उपलब्ध असल्याने त्यावरून सध्याच्या किमतीचा अंदाज घेता येऊ शकतो त्यांनी व्यापक संशोधन केलेले असल्याने त्यावर आधारित व्हिडीओ ब्लॉग पाहून गुंतवणूकदारांना योग्य निर्णय घेण्यास उपयोग होऊ शकतो. त्यांचे भागीदार बनल्याने असुचिबद्ध शेअर्सच्या संशोधन अहवाल, बातम्या मिळू शकतात. त्याचा वापर गुंतवणूकदार आणि त्याच्याशी संबधीत व्यक्तीना होतो. त्यांचे अँपही उपलब्ध असून त्याद्वारे खरेदी विक्री करता येऊन असुचिबद्ध शेअर्स, त्यांचे भाव, आलेख (चार्ट), प्री आयपीओ गुंतवणूक, स्टार्टअप यासंबंधीत माहिती मिळाल्याने अशा कंपन्यांमध्ये त्यांच्या मध्यस्थीने गुंतवणूक करता येणे सहज शक्य आहे.
◆आर्म्स सिक्युरिटीज: परसराम ग्रुपशी संबंधित असलेली ही खाजगी कंपनी गेली 35 वर्ष गुंतवणूकदारांना असुचिबद्ध शेअर्स, सुचिबद्ध पण व्यवहार होत नसलेले शेअर्स आणि कमी तरलता असलेल्या शेअर्सचे व्यवहार करीत आहे. असुचिबद्ध शेअर्सचा एक मॉलच येथे आहे असे म्हणता येईल. विश्लेषण, वाजवी सेवादर, स्पर्धात्मक किमती,
आणि गुंतवणूक मार्गदर्शन ही या कंपनीची वैशिष्ट्ये सांगता येतील. त्याचेही अँप उपलब्ध आहे.
■प्लानिफाय: हा एक फिनटेक मंच असून असुचिबद्ध शेअर्स, कमी तरलता अथवा कोणतीही तरलता नसलेल्या शेअर्समधील व्यवहार पूर्ण करून देतो. त्याचेही अँप उपलब्ध आहे या शिवाय ते कंपन्या, उद्योजक यांना निधी उभारून देण्याची मदतही ते करतात. अनेक अनिवासी भारतीय या मंचाचा वापर करीत असून नजीकच्या भविष्यात प्रचंड मोठे होण्याची ताकद या मंचाकडे आहे. शार्क टँकच्या चवथ्या भागात सर्वाधिक गुंतवणूक या मंचाने पुरस्कृत केलेल्या उद्योगांत झाली.
■3i ग्रुप पीएलसी: हा ब्रोकरेज मंच असून तो सुचिबद्ध आणि असुचिबद्ध शेअर्सचे व्यवहार करण्याचे काम करतो
■एनरीच ऍडव्हरटायजर: याच क्षेत्रातील ही एक नामवंत मंच असून त्यांनी गुंतवणूकदारांना केलेल्या शिफारसीतून 34% परतावा मिळवून दिला आहे असा त्यांचा दावा आहे. 250 हून अधिक कंपन्यांचे व्यवहार या मंचावरून नियमितपणे होत असतात.
पूर्वीच्या तुलनेत असुचिबद्ध शेअर्स खरेदी विक्री करण्यासाठी अनेक खात्रीपूर्वक मंच उपलब्ध आहेत वर उल्लेख असलेल्या मचांशिवाय वेल्थ विस्डम, इंक्रेड मनी, शेअरकार्ट, स्टोकिफाय, कुबेरग्रोव हे आणि यासारखे अनेक मंच अशा शेअर्सची खरेदी विक्री करण्यात कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी काही कंपन्यांचे उपलब्ध असलेले शेअर्स, त्यांचे व्यवसायक्षेत्र, दिनांक रोजी असलेला बाजारभाव, खरेदी विक्री संच अशी नमुन्यादाखल माहिती सोबतच्या चित्रात दिली आहे. यात दाखवलेले भाव, नक्की किती गुंतवणूक करणार यावर कमी अधिक होऊ शकतात. हे भाव केवळ माहिती असावे म्हणून दिले असून त्यातील बाजारभाव आणि बाजार व्यवहार संच यात बदल होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करायची असेल तर इच्छुक व्यक्तींशी विशिष्ट दराबाबत वाटाघाटी करता येणे येथे शक्य आहे.
अनेक ब्रोकर्स त्यांच्या नियमित ग्राहकांना असुचिबद्ध शेअर्सची खरेदीविक्री सुविधा देत असतात. त्यात ते मध्यस्थ म्हणून काम करत असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. यात उल्लेख केलेले गुंतवणूक मंच आणि असुचिबद्ध शेअर्स या मध्ये गुंतवणूक करताना यातील सोय गैरसोय यांचा पूर्ण विचार करूनच मगच योग्य तो निर्णय घ्यावा. लेखात सुचवण्यात आलेले मंच आणि त्यावर व्यवहार होत असलेल्या शेअर्सची कोणतीही शिफारस हा लेख करीत नाही.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
25 एप्रिल 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम येथे पूर्वप्रकाशीत.
सुचिबद्ध नसलेले शेअर्स
#सुचिबद्ध_नसलेले_शेअर्स
सध्या शेअरबाजारात व्यवहार होऊ न शकणारे म्हणजेच असुचिबद्ध पण भविष्यात याच बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता असलेल्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सच्या जाहिराती विविध समाज माध्यमात आपण पाहिल्या असतील. काही कंपन्यांचे शेअर्स बाजार नियमावलीचे पालन न केल्याने त्यांच्यावरील कारवाईचा भाग म्हणून बाजारातून असुचिबद्ध (डिलिस्ट) केल्याच्या किंवा काही कंपन्यांनी आपले शेअर्स बाजारातून स्वेच्छेने असुचिबद्ध केल्याच्या तुरळक घटना आपण ऐकल्या असतील. सुचिबद्ध शेअर्सना बऱ्यापैकी तरलता असते, त्याचे बाजारभाव मागणी पुरवठा तत्वानुसार कमी अधिक होऊन शेवटी कंपनीची कामगिरी आणि सर्वसाधारण बाजारकल, यावर कुठेतरी स्थिरावतात. शेअरबाजारात व्यवहार केलेल्या शेअर्सच्या व्यवहारपूर्ततेची बाजाराची हमी असते म्हणजे विकलेल्या शेअर्सचे पैसे अथवा खरेदी केलेले शेअर्स निश्चित कालावधीत आपल्या डी मॅट खात्यात येतात. काही तांत्रिक
अडचणींमुळे व्यवहार पुरा न झाल्यास बाजार नियमानुसार त्याची पैशात भरपाई केली जाते.
असुचिबद्ध शेअर्समध्ये खरेदीविक्री व्यवहार होऊ शकतो. त्यासाठी विक्रेता आणि खरेदीदार समोरासमोर येणे आवश्यक आहे, त्यासाठी विविध मंच आहेत. या शेअर्समध्ये तरलता नसल्याने त्याची योग्य किंमतशोध या मंचावर होईलच नाही. त्याचप्रमाणे या शेअर्सचे व्यवहार प्रत्येकवेळी अधिक शेअर्सच्या पटीत करावे लागतात त्यामुळे अनेकदा ते विक्रेता आणि खरेदीदार या दोघांना अडचणीचे होऊ शकते. याशिवाय या शेअर्सच्या गुंतवणूकदारांना सुचिबद्ध शेअर्सवर मिळणारे भांडवली नफ्याचे विशेष फायदे मिळत नाहीत. शेअर्स सुचिबद्ध करायला हवेत असे कंपनीवर कोणतेही बंधन नाही. त्याप्रमाणे त्यावर किती अधिमूल्य आकारावे याचेही बंधन नाही त्यामुळे अधिक भाव मिळावा या हेतूने बाजार चढा असतानाच सर्वसाधारणपणे ते सर्वाना उपलब्ध करून दिले जातात. ज्यांचे शेअर्स सुचिबद्ध असतील त्या भांडवल बाजारातील कंपन्यांना अनेक करविषयक सोईसवलती प्रवर्तक आणि गुंतवणूकदार या दोघांनाही आहेत. त्यांना भांडवल बाजार आणि सेबी यांचे नियम पाळून मोठ्या प्रमाणांत भांडवल (भाग भांडवल आणि कर्ज अश्या दोन्ही स्वरूपात) उभे करता येते.
असुचिबद्ध शेअर्स सामान्यतः त्या कंपन्यांचे प्रवर्तक, त्यांचे नातेवाईक, त्याचे धनको (कर्ज देणारे), धाडसी गुंतवणूकदार काही प्रमाणात म्युच्युअल फंड योजना, गुंतवणूक संच व्यवस्थापन कंपन्याच्या योजना पर्यायी गुंतवणूक फंड योजना, अशा कंपन्यांतील कामगार, हितचिंतक आणि काही प्रमाणात वेगळ्या गुंतवणूक पर्यायाचा शोध घेणारे सामान्य गुंतवणूकदार असू शकतात.
■सुचिबद्ध आणि असुचिबद्ध शेअर्समधील फरक-
●तरलता: सुचिबद्ध शेअर्समध्ये जगभरातून मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याने ते असुचिबद्ध शेअर्सहून अधिक तरल आहेत.
●पारदर्शकता: सुचिबद्ध शेअर्सचे भाव बाजारातील मागणी पुरवठा तत्वावर आणि कंपनीच्या कामगिरीवर ठरत असल्याने ते अधिक पारदर्शक असतात.
●नियमन: सुचिबद्ध शेअर्सना शेअर बाजार आणि सेबी यांच्या नियमावलीचे पालन करावे लागते. त्या तुलनेत असुचिबद्ध शेअर्सची नियमावली कंपनी व्यवस्थापनाच्या दृष्टीने कमी जाचक आहे.
●मूल्यांकन: सुचिबद्ध शेअर्सचे मूल्यांकन बरीच माहिती उपलब्ध असल्याने त्यांच्या आधारे करणे सोपे आहे तर असुचिबद्ध शेअर्सबाबत मर्यादित माहिती उपलब्ध असल्याने त्यांचे अचूक मूल्यमापन करणे कठीण आहे.
●व्यवहार सुलभता: सुचिबद्ध शेअर्सचा केवळ एक शेअर्सच्या पटीत (संच) व्यवहार होऊ शकतो. त्यातुलनेत असुचिबद्ध शेअर्सचे व्यवहार मोठ्या संचात करावे लागतात जर असे व्यवहार कमी संचात करायचे असले तर सामान्य गुंतवणूकदारांना त्याची अधीक किंमत चुकवावी लागते.
■असुचिबद्ध शेअर्समध्ये गुंतवणूक करताना विचारात घ्यायचे घटक-
●गुंतवणूकदाराची जोखीमक्षमता: असे शेअर्स कमी तरल आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे अधिक धोकादायक असल्याने ते अधिक जोखिमयुक्त आहेत त्यामुळे त्यात गुंतवणूक करण्यापूर्वी आपली जोखिमक्षमता ओळखून त्या मर्यादेतच गुंतवणूक करावी. यातील बरेचसे व्यवहार केवळ विश्वासावर होत असल्याने काही वेळा नुकसान होऊ शकते. अनेकदा अस्थिर बाजारामुळे सदर कंपन्यांची सुचिबद्धता अपेक्षित काळापेक्षा अधिक काळ लांबणीवर पडू शकते.
●गुंतवणूकीमागिल हेतू: जर दीर्घकालीन गुंतवणूक या दृष्टीने या गुंतवणूकीकडे पहात असाल तर ती कदाचित योग्य गुंतवणूक होऊ शकते.
●तरलतेचा अभाव: झटपट व्यवहारांची गरज हा आपला गुंतवणूक हेतू नसेल तर आणि तरच ही गुंतवणूक आपल्याला कदाचित योग्य असू शकते.
●गुंतवणूक संच विविधता: आपल्या गुंतवणूक संचात विविधता असावी असे अनेक गुंतवणूक तज्ज्ञ सांगतात, आपण या मताशी सहमत असल्यास एक अधिकचा पर्याय म्हणून याचा विचार करता येईल.
●नियामक उपलब्धता: या कंपन्या नोंदणीकृत नसल्याने सेबीच्या अंतर्गत येत नाहीत त्यामुळे त्या अनुषंगाने उपलब्ध संरक्षण या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना उपलब्ध नाही. ज्या वेळी या कंपन्या नोंदवण्याची प्रक्रिया चालू होतील तेव्हाच त्याचा सेबीशी आणि भांडवल बाजाराशी संबंध येतो.
■असुचिबद्ध कंपन्यात गुंतवणूक कशी करायची?
●थेट गुंतवणूक: गुंतवणूक करण्यासाठी थेट कंपनी अथवा त्याच्या मध्यस्थांशी संपर्क साधा. अनेक विश्वास ठेवावे असे गुंतवणूक मंच, फिनटेक कंपन्या, दलाल या संबंधात कार्यरत आहेत त्यांची मदत घेता येईल. ही गुंतवणूक आता सॉफ्ट कागदपत्रांचा वापर करून ऑनलाईन होऊ शकते. डिमॅट खाते, चेक कॉपी, आधार कार्ड, पॅन कार्ड याच्या सॉफ्ट कॉपी आणि पैसे दिले की 24 ते 48 तासात शेअर्स तुमच्या खात्यात येतील किंवा हेच डिटेल्स वापरून तुम्हाला ते शेअर्स तुमच्या खात्यातून विकता येतील.
●इसॉपच्या माध्यमातून: तुम्ही अशा कंपनीचे कामगार असाल आणि तुमच्या मालकाकडून हे शेअर्स तुम्हाला मिळत असतील तर ते त्याची प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता.
●खाजगी फंड आणि व्हेंचर कॅपिटल फंड यांची गुंतवणूक: हे लोक अशी गुंतवणूक करतात आणि त्याची पुनर्विक्री करतात. त्याच्या मार्फत सर्वसाधारण लोक अशी गुंतवणूक करू शकतात.
■करआकारणी: आशा शेअर्स मध्ये केलेली गुंतवणूक 2 वर्षाच्या आत अल्पकालीन गुंतवणूक समजली जाऊन त्यातून होणारा नफा नियमित उत्पन्नात मिळवून त्यावर नियमित दराने कर आकारणी केली जाते तर दोन वर्षानंतर विक्री केली असता होणारा नफा दीर्घ मुदतीचा समजून त्यावर 12.5% दराने कर आकारणी होईल.
■नियामक बंधने: अशा कंपनीचा पब्लिक इशू जाहीर झाल्यावर शेअर्सची नोंदणी झाल्यापासून किमान 6 महिने ते शेअर्स गुंतवणूकदार बाजारात विकू शकत नाही.
सुचिबद्ध नसलेले पण पुढे बाजारात सुचिबद्ध होण्याची शक्यता असलेले शेअर्स योग्य वेळी योग्य किमतीस घेतल्यास दिर्घकाळात मोठा लाभ होऊ शकतो. त्यांचे व्यवहार करणारे विश्वासू मंच आणि सध्या त्यावर उपलब्ध असलेल्या शेअर्सची माहिती आपण पुढील लेखांतून घेऊयात.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
18 एप्रिल 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
Friday, 11 April 2025
गोंधळात टाकणाऱ्या आर्थिक संकल्पना भाग 3
#गोंधळात_टाकणाऱ्या_आर्थिक_संकल्पना_ भाग_3
मागील दोन भागातून एकत्रित उल्लेख होणाऱ्या शब्दयोजना यमक यात साम्य असणाऱ्या काही आर्थिक संकल्पना आपण समजून घेतल्या या अंतिम भागात अजून काही संकल्पना समजून घेऊयात.
■चलनवाढ (Inflation) आणि चलनघट (Deflation)
●चलनवाढ म्हणजे एका विशिष्ट कालावधीत वस्तू आणि सेवांच्या किमती वाढणे, ज्यामुळे पैशाची किंमत कमी होते. उदाहरणार्थ, जर पूर्वी 100 रुपयांत 1 किलो डाळ मिळत असेल, तर आता तीच डाळ 120 रुपयांना मिळत असेल, तर त्याला चलनवाढ म्हणतात.
जेव्हा अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा वाढतो, पण वस्तू आणि सेवांची उपलब्धता स्थिर राहते, तेव्हा चलनवाढ होते. त्यामुळे लोकांची क्रयशक्ती म्हणजेच वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची क्षमता घटते. चलनवाढीमुळे लोकांना समान पैशात पूर्वीपेक्षा कमी वस्तू आणि सेवा खरेदी करता येतात. कंपन्यांना कच्चा माल आणि इतर खर्चांसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. लोकांच्या उत्पन्नापेक्षा किमती अधिक वेगाने वाढल्यास, लोकांची बचत घटू शकते. पूर्वी पाच रुपयात मिळणाऱ्या बिस्कीट पुड्यात 100 ग्रॅम बिस्किटे असत ती कमी कमी होत 48 ग्रॅमवर आली आहेत हे चलनवाढीचे उत्तम उदाहरण होऊ शकते.
●चलनघट: अर्थव्यवस्थेत वस्तू आणि सेवांच्या किमतींमध्ये घट होणे (चलनवाढीच्या विरुद्ध प्रक्रिया) त्यास चलनघट म्हणतात. या स्थितीमध्ये, लोकांकडे असलेल्या पैशाची किंमत वाढते, कारण त्याच पैशाने पूर्वीपेक्षा जास्त वस्तू खरेदी करता येतात. उदाहरणार्थ पूर्वी ज्या आकाराचे दूरदर्शन संच एका विशिष्ट किमतीस मिळत होते त्याच किमतीत त्याहून अधिकाधिक आकाराचे संच आता उपलब्ध होत आहेत. कपड्यांची, मोबाईल फोनची किंमत कमी कमी होत आहे.
चलनघट होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पैशाचा पुरवठा कमी होणे. उत्पादन वाढणे पण मागणी कमी राहणे. लोकांची खरेदी करण्याची इच्छा कमी होणे. याचा परिणाम उत्पादनात घट होते,बेरोजगारी वाढते त्यामुळे आर्थिक विकासाचा दर कमी होतो.
■कर्ज जोखीम (Credit Risk) आणि बाजार जोखीम (Market Risk):
●कर्ज जोखीम : म्हणजे मुद्दल आणि व्याज परत न मिळण्याचा धोका त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची शक्यता, जी सावकारासाठी धोक्याची शक्यता असते. समजा जर तुम्ही तुमच्या मित्राला 1000 रुपये दिले आणि त्याने ते परत न दिल्यास ते कर्ज धोक्यात असते. जर एखादी कंपनी बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज घेईल आणि ती परतफेड करू शकली नाही, तर बँकेला कर्ज आणि व्याज न मिळण्याचा धोका असतो. जर कर्जदार कर्जाची परतफेड करू शकला नाही, तर सावकाराला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. या थकीत कर्जांच्या वसुलीसाठी सावकाराला अधिक खर्च करावा लागतो. उदाहरणार्थ, 2008 च्या आर्थिक संकटात, बऱ्याच ग्राहकांनी त्यांच्या सबप्राइम मॉर्टगेज लोनवर डिफॉल्ट केले, ज्यामुळे बँकांना मोठा आर्थिक फटका बसला.
●बाजार जोखीम (Market Risk): म्हणजे गुंतवणुकीच्या एकूण कार्यक्षमतेवर परिणाम करणाऱ्या घटकांमुळे (उदा. बाजारातील चढउतार, व्याजदर बदल) एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला नुकसान होण्याची शक्यता असते. शेअर मार्केटमध्ये जर शेअर मार्केटमध्ये अचानक घसरण झाली, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होऊ शकते, बाँड मार्केटमध्ये व्याजदरात वाढ झाल्यास, बाँडच्या किमती कमी होऊ शकतात, ज्यामुळे बाँडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना नुकसान होऊ शकते.
जर अर्थव्यवस्थेत मंदी आली, तर कंपन्यांच्या नफ्यात घट येऊ शकते, ज्यामुळे शेअरच्या किमती घसरू शकतात आणि गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ शकते. बाजार जोखीम ही गुंतवणुकीत नेहमीच असते आणि त्यामुळे गुंतवणूक करताना सावध असणे आवश्यक आहे.
■कर्ज मालकी गुणोत्तर (Leverage Ratio) आणि व्याज परतफेड गुणोत्तर (Intrest Coverage Raito)
●कर्ज मालकी गुणोत्तर म्हणजे कंपनीच्या कर्जावर अवलंबून असलेल्या मालमत्तेचे प्रमाण दर्शवणारा एक आर्थिक गुणोत्तर आहे. हे गुणोत्तर कंपनीच्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची क्षमता दर्शवते. उदाहरणार्थ, कर्ज-ते-मालमत्ता गुणोत्तर ०.७ असल्यास, कंपनी तिच्या मालमत्तेच्या ७०% वित्तपुरवठा करण्यासाठी कर्ज वापरते, असं याचा अर्थ होतो. कर्ज मालकी गुणोत्तरामुळे कर्ज आणि कंपनीचे मालकत्व यांच्यातील संबंध समजतो. हे गुणोत्तर कंपनीच्या आर्थिक धोरणाचे मूल्यांकन करण्यासाठी वापरला जातो. ते अधिक असेल तर कंपनीसाठी अधिक धोकादायक असू शकते, कारण जास्त कर्ज असल्यास भविष्यात कंपनीला आर्थिक अडचणी येऊ शकतात. उदाहरणार्थ,
कर्ज-समभाग गुणोत्तर (Debt-to-Equity Ratio): हे गुणोत्तर कंपनीच्या एकूण कर्जाची तिच्या इक्विटीशी तुलना करते.
कर्ज-मालमत्ता गुणोत्तर (Debt-to-Asset Ratio): हे गुणोत्तर कंपनीच्या एकूण कर्जाची तिच्या एकूण मालमत्तेशी तुलना करते.
●व्याज गुणोत्तर (Intrest Ratio) कंपनीच्या कमाईस व्याजाने मिळवता येते. हे गुणोत्तर कंपनीच्या व्याज देयकासाठी तिच्या कमाईची तुलना करते.
कंपनीच्या आर्थिक आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी कर्ज मालकी गुणोत्तर उपयुक्त आहे. गुंतवणूकदार आणि कर्जदेणारे कंपनीच्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची क्षमता तपासण्यासाठी याचा वापर करतात.
●परतफेड गुणोत्तर (Coverage Ratio) म्हणजे कंपनीच्या आर्थिक जबाबदाऱ्या (उदा. कर्ज, व्याज) पूर्ण करण्याची क्षमता मोजण्यासाठी वापरले जाणारे एक वित्तीय प्रमाण आहे. उच्च गुणोत्तर कंपनीची अधिक परतफेड क्षमता दर्शवते, तर कमी गुणोत्तर कमी परतफेडक्षमता दर्शवते.
उदाहरणे:
व्याज आच्छादन गुणोत्तर (Interest Coverage Ratio):
कंपनीच्या कर्जावरील व्याज खर्च भरण्याची क्षमता मोजतो. उदाहरणार्थ,
जर व्याज आच्छादन गुणोत्तर 2.5 असेल, तर कंपनीचे उत्पन्न तिच्या व्याज देयकांपेक्षा 2.5 पट जास्त आहे, याचा अर्थ कंपनीला व्याज देयके भरण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
कर्ज सेवा आच्छादन गुणोत्तर (Debt Service Coverage Ratio):
कंपनीच्या कर्जाची परतफेड आणि व्याजाची देयके भरण्याची क्षमता मोजतो. उदाहरणार्थ,
जर कर्ज सेवा कव्हरेज रेशो 1.2 असेल, तर कंपनीचे उत्पन्न कर्जाच्या परतफेडीसाठी आणि व्याजासाठी 1.2 पट जास्त आहे.
यात उदाहरणादाखल दिलेली गुणोत्तरे विविध व्यवसायात कमी अधिक असतात त्याप्रमाणे ती तपासून घ्यावीत.
■अंदाजपत्रक (Budgeting) आणि वित्तीय अंदाज ( Financial Forcastting):
● अंदाजपत्रक: म्हणजे खर्चाची योजना तयार करणे, म्हणजे तुमच्याकडे किती उत्पन्न आहे आणि ते कशासाठी खर्च करायचे, हे ठरवणे तुमच्या आर्थिक गरजा आणि उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्याकडे असलेल्या उत्पन्नाचे (income) आणि खर्चाचे (expenses) योग्य नियोजन करणे. त्यामुळे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहता येते, अनावश्यक खर्च टाळता येतो आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांजवळ लवकर पोहोचता येते.
वैयक्तिक अंदाजपत्रक (Personal Budget): स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या गरजा आणि खर्चासाठी बजेट तयार करणे. अंदाजपत्रक बनवल्यामुळे अनावश्यक खर्च टाळता येतो आणि पैशांची बचत होते. कर्जाची परतफेड (repayment) व्यवस्थित करता येते आणि कर्जाचा भार कमी होतो. यामुळेच तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांना, जसे की घर खरेदी करणे किंवा प्रवास करणे, लवकर साध्य करू शकतामहिन्याला किती खर्च करायचा (उदा. घरभाडे, वीज बिल, किराणा, इत्यादी) हे ठरवणे आणि त्यानुसार खर्च करणे.
व्यवसाय अंदाजपत्रक (Business Budget): व्यवसायाच्या उत्पन्नावर आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी बजेट तयार करणे. व्यवसायात किती खर्च करायचा (उदा. ऑफिस भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन, इत्यादी) हे ठरवणे आणि त्यानुसार खर्च करणे.
●वित्तीय अंदाजपत्रक (Financial Forecasting) म्हणजे कंपनीच्या भविष्यातील आर्थिक स्थितीचा अंदाज घेणे, जसे की येणाऱ्या वर्षात कंपनीची विक्री, खर्च, नफा आणि रोख प्रवाह कसा असेल. या अंदाजात, कंपनीच्या भूतकाळातील संदर्भ, आर्थिक अहवाल आणि बाजारातील स्थिती यांसारख्या घटकांचे विश्लेषण केले जाते. वित्तीय अंदाज कंपन्यांना योग्य निर्णय घेण्यास, अंदाजपत्रक तयार करण्यास आणि भविष्यासाठी योजना बनवण्यास मदत करते.
उदाहरणार्थ,
कंपनीला येणाऱ्या वर्षात किती विक्री होईल याचा अंदाज घेण्यासाठी, गेल्या काही वर्षातील विक्री तपशील, बाजाराचा कल आणि इतर घटकांचे विश्लेषण केले जाते. त्या आधारे कंपनी येणाऱ्या वर्षात किती विक्री करू शकेल, याचा अंदाज बांधू शकते. त्यानंतर, कंपनी संभाव्य खर्च आणि नफ्याचाही अंदाज बांधू शकते. ज्यामुळे त्यांना अंदाजपत्रक तयार करणे आणि योग्य निर्णय घेणे सोपे जाते. वित्तीय अंदाजपत्रक कंपन्यांसाठी एक महत्त्वाचे साधन आहे, ज्यामुळे त्यांना भविष्यासाठी योग्य योजना बनवता येतात त्या अनुरूप निर्णय घेता येतात.(संपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
11 एप्रिल 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम वर पूर्वप्रकाशीत.
Friday, 4 April 2025
गोंधळात टाकणाऱ्या आर्थिक संकल्पना भाग 2
#गोंधळात_टाकणाऱ्या_आर्थिक_संकल्पना_भाग_2
गेल्या आठवड्यात ‘गोंधळात टाकणाऱ्या आर्थिक संकल्पना’ या विषयावरील काही संकल्पना आपण समजून घेतल्या आजही या लेखातून एकमेकांसोबत उल्लेख केल्या जाणाऱ्या त्यामुळेच सारख्या वाटणाऱ्या परंतु सारख्या नसलेल्या काही संकल्पनांतील फरक आपण समजून घेऊया.
■पुस्तकी मूल्य (Book Value) आणि बाजारभाव (Market Value)
●'पुस्तकी मूल्य' म्हणजे कंपनीच्या मालमत्तेच्या (assets) मूल्यामधून तिच्या देयकांची (liabilities) किंवा कर्जाची (debts) रक्कम वजा केल्यानंतर शिल्लक राहणारी किंमत, जी कंपनीच्या आर्थिक स्थितीचे (financial position) एक महत्त्वाचे माप आहे. ते कंपनीच्या निव्वळ मालमत्तेचे (net assets) प्रतिनिधित्व करते, म्हणजेच कंपनीच्या मालमत्तेतून देयके वजा केल्यानंतर शिल्लक राहते. यामुळे गुंतवणूकदारांना कंपनीच्या मूल्याचा अंदाज लावण्यास मदत करू शकते, विशेषत: हे कमी मूल्यांकित (undervalued) समभाग शोधण्यासाठी उपयोगी ठरू शकते. समजा,
◆जर कंपनीकडे 100 कोटींची मालमत्ता (assets) असेल आणि 50 कोटींची देयके किंवा कर्जे (liabilities) असतील, तर तिचे पुस्तक मूल्य 50 कोटी असेल.
◆काहीवेळा 'प्रति शेअर पुस्तक मूल्य' (Book Value Per Share) देखील वापरले जाते, जे कंपनीच्या एकूण 'पुस्तक मूल्या'ला (book value) तिच्या एकूण शेअर्सच्या संख्येने भागून काढले जाते.
●बाजार मूल्य म्हणजे कोणत्याही वस्तू, मालमत्तेची किंवा कंपनीच्या शेअर्सची, सध्याच्या बाजारात ती विकता किंवा खरेदी करता येईल अशी पैशातील किंमत. जर तुम्ही एखाद्या कंपनीचे सर्व शेअर्स विकले, तर ते किती किमतीला विकले जातील, त्यावरून त्या कंपनीचे बाजार मूल्य ठरेल. बाजार मूल्य खरेदीदार आणि विक्रेत्यांसाठी किमतीची एक पारदर्शक कल्पना देते. हे मालमत्तेचे सध्याचे मूल्य दर्शवते, जे खरेदी-विक्रीसाठी आधार म्हणून काम करते.
◆वाजवी बाजार मूल्य (Fair Market Value): ही एखाद्या मालमत्तेची किंमत असते, जी सामान्यतः निष्पक्ष आणि विशिष्ठ पद्धतीने निश्चित केली जाते, जी बाजार मूल्यापेक्षा कमी किंवा अधिक असू शकते.
■रोख प्रवाह (Cash Flow) आणि नफा (Profit)
●रोख प्रवाह' म्हणजे व्यवसायात येणाऱ्या आणि जाणाऱ्या रोख रकमेचा (cash) आणि रोख-समकक्ष (cash equivalents) रकमेचा (उदा. बँक ठेवी, अल्प-मुदतीची गुंतवणूक) ओघ. उदाहरणार्थ,
◆येणारी रोकड (Inflow):
ग्राहककडून वस्तू /सेवेच्या विक्रीतून मिळणारी रक्कम.बँकेतील ठेवींवर मिळणारे व्याज किंवा गुंतवणुकीतून मिळणारी लाभांश, भाडे अथवा नफ्याच्या स्वरूपात मिळणारी रक्कम.
◆जाणारी रोकड (Outflow):
कर्मचाऱ्यांचे वेतन. खरेदी केलेले साहित्य किंवा सेवांसाठी केलेले पेमेंट.
■तरलता (Liquidity) आणि पत (Solvency)
●तरलता (Liquidity) म्हणजे आर्थिक मालमत्तेची (asset) किंवा गुंतवणुकीची (investment) क्षमता, जी सहजपणे आणि वेळेत रोखीमध्ये (cash) रूपांतरित करता येते, उदाहरणार्थ,
◆रोकड (Cash):
रोकड ही सर्वात तरल मालमत्ता आहे, ती लगेच खर्च करता येते.
◆बँक खाते (Bank Account):
बँक खात्यातील रक्कम लगेच काढता येते, म्हणून ती तरल आहे.
◆समभाग (Share):
समभाग विकून एक दिवसात रोख रक्कम मिळू शकते, त्यामुळे ते देखील तरल असतात.
◆सोनं (Gold):
सोन्याची विक्री करून लगेच रोख रक्कम मिळू शकते, म्हणून ते देखील तरल आहे.
◆घर (House):
घराला विकायला वेळ लागतो, म्हणून ते तुलनेने कमी तरल आहे.
●'पत' किंवा 'ऐपत', म्हणजेच एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेकडे आपल्या कर्जाची आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्यांची पूर्तता करण्याची असलेली क्षमता. उदाहरणार्थ,
एका कंपनीकडे तिच्याकडील मालमत्तेपेक्षा जास्त कर्जे नाहीत, तर तीची बाजारात पत आहे असे समजले जाते. तिला सहज आणि वाजवी दराने कर्ज मिळू शकते. भांडवल बाजारातून समभाग आणि रोखे विक्री करून आवश्यक भांडवल मिळवता येते.
■घसारा (Depreciation) आणि ऋण परिशोध (Amortization)
●घसारा म्हणजे एखाद्या मालमत्तेच्या (asset) किमतीत, तिच्या वापरामुळे, वेळेनुसार किंवा इतर कारणांमुळे होणारी घट अथवा कमी होणारी किंमत. उदाहरणासाठी, गाडी किंवा मशीन वापरल्याने तिची किंमत कमी होते,
बाजारातील बदल किंवा तंत्रज्ञानामुळे एखादी वस्तू अप्रचलित झाल्यास, तिची किंमत कमी होते म्हणजेच मालमत्तेच्या किमतीत होणारी घट. उदाहरणार्थ, गाडी, मशीन, इमारत, फर्निचर, इत्यादी. घसारा हा व्यवसायासाठी केलेला खर्च म्हणून नोंदवला जातो त्यामुळे कर देयता कमी होते.
●ऋण परिशोध म्हणजे निश्चित कालावधीत कर्जाची व्याजासह परतफेड (मुद्दल आणि व्याज) पूर्वनिर्धारित हप्त्यांमध्ये करणे, किंवा अमूर्त मालमत्तेचे मूल्य कमी करणे, जसे की पेटंट किंवा कॉपीराइट. उदाहरणार्थ,
◆कर्ज परतफेड:
जर तुम्ही बँकेकडून 10 वर्षांसाठी 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले, तर ऋण परिशोध म्हणजे दर महिन्याला निश्चित रक्कम (मुद्दल आणि व्याज) भरून 10 वर्षात कर्ज पूर्णपणे फेडले जाईल.
◆अमूर्त मालमत्तेचे मूल्य कमी करणे:
जर कंपनीने 5 वर्षांसाठी 10 लाख रुपयांचे पेटंट खरेदी केले, तर ऋण परिशोध म्हणजे दरवर्षी 2 लाख रुपये (10,00,000/5) ही रक्कम पेटंटच्या वापरासाठी केलेल्या खर्चात नोंदवले जाईल.
■व्याजदर (Interest Rate) आणि वार्षिक टक्केवारी (Annual Percentage Rate)
●व्याजदर म्हणजे तुम्ही कर्ज घेतल्यास किंवा ठेवी ठेवल्यास मिळणाऱ्या किंवा द्याव्या लागणाऱ्या व्याजाची टक्केवारी, जी मुद्दल (principal) रकमेवर आधारित असते.
उदाहरण:
कर्ज:
◆जर तुम्ही बँकेकडून 1,00,000 रुपयांचे कर्ज 10% वार्षिक व्याजदराने घेतले, तर तुम्हाला वर्षाला 10,000 रुपये व्याज म्हणून द्यावे लागेल.
ठेव:
◆जर तुम्ही बँकेत 1,00,000 रुपयांची ठेव 5% वार्षिक व्याजदराने ठेवली, तर तुम्हाला वर्षाला 5,000 रुपये व्याज म्हणून मिळतील.
व्याजदराचे घटक:
◆मुद्दल (Principal):कर्जाची किंवा ठेवीची मूळ रक्कम.
◆व्याजदर (Interest Rate): व्याजाची टक्केवारी, जी मुद्दल रकमेवर आकारली जाते.
◆व्याज (Interest): मुद्दल रकमेवर मिळणारे किंवा द्यावे लागणारे व्याज.
◆व्याज आकारणीचा प्रकार (Compounding Frequency):
व्याज कसे आकारले जाते, उदा. वार्षिक, सहामासिक, किंवा त्रैमासिक.
◆कालावधी (Time Period):
कर्ज किंवा ठेवीची मुदत किती दिवसांची किंवा वर्षाची तो काळ.
●वार्षिक टक्केवारी दर (Annual Percentage Rate - APR) म्हणजे कर्जावर (loan) किंवा गुंतवणुकीवर (investment) मिळणाऱ्या व्याजाची (interest) वार्षिक टक्केवारी, ज्यात व्याजासोबतच इतर सर्व खर्च (fees) देखील समाविष्ट असतात. उदाहरणार्थ,
जसे की प्रक्रिया शुल्क, कर्ज काढल्यास लागणारा खर्च, इत्यादी. कर्जाची एकूण किंमतबजी वार्षिक दराने व्यक्त केली जाते.
कर्जदारांसाठी हे कर्ज घेताना महत्त्वाचे आहे, कारण ते तुम्हाला कर्जाची एकूण किंमत समजायला मदत करते, ज्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीवर मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती देते, ज्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडण्यासाठी मदत होऊ शकते.
■लाभांश (Dividend) आणि भांडवली नफा (Capital Gain)
●लाभांश: कंपनी तिच्या नफ्यातील काही हिस्सा भागधारकांना (shareholders) वाटून देते, त्यालाच लाभांश म्हणतात. कंपन्या नफा मिळवल्यावर तो पुन्हा व्यवसायात गुंतवू शकतात किंवा भागधारकांना लाभांशाच्या अथवा बक्षीस भागाच्या स्वरूपात वाटू शकतात. लाभांश रोख स्वरूपात (cash), बक्षीस समभाग (bonus shares) किंवा विशेष लाभांश स्वरूपात दिला जाऊ शकतो. लाभांश बक्षीसभाग दिलेच पाहिजेत असे कोणतेही बंधन नाही जर तुम्हाला लाभांशासाठी गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला लाभांश अधिक नियमित देणाऱ्या कंपन्या विशेषत: निवडल्या पाहिजेत. सर्वसाधारणपणे चांगल्या कंपन्यांचा भाव जास्त असल्याने लाभांशातून मिळणारा परतावा अत्यंत कमी असतो.
●भांडवली नफा: याचा अर्थ आहे कोणत्याही भांडवली मालमत्तेच्या विक्रीतून मिळणारा नफा, जो मालमत्तेच्या मूळ किमतीहून अधिक असतो. उदाहरणार्थ,
◆तुम्ही एक घर 10 लाखांना विकत घेतले आणि 15 लाखांना विकले1, तर 5 लाखांचा नफा हा भांडवली नफा झाला. शेअर्स खरेदी करून ते जास्त किमतीला विकल्यास मिळणारा नफा देखील भांडवली नफा आहे.
म्हणजेच एखाद्या मालमत्तेच्या (जसे की घर, जमीन, शेअर्स) विक्रीतून मिळणारा नफा, जो त्या मालमत्तेच्या खरेदी किमतीपेक्षा जास्त असतो, त्याला भांडवली नफा म्हणतात.
आता सर्व भांडवली मालमत्ता, शेअरबाजारात नोंदणीकृत आणि नोंदणी नसलेल्या प्रकारात विभागून त्यातील काळवधीनुसार मिळणारा नफा अल्प अथवा दीर्घ ठरवण्यात येतो. त्यातील दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर विशेष दराने (12.5%) कर आकारला जातो तर अल्प मुदतीचा बहुतेक नफा उत्पन्नात मिळवून त्यावर नियमित दराने कर आकारणी होते. अपवाद,
◆भांडवली बाजारात नोंदलेल्या मालमत्तांसदर्भात दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याचा कालावधी एक वर्षाचा असून त्यावरील एक लाख पंचवीस हजारावरील नफ्यावर विशेष दराने कर आकारणी होते तर याहून कमी अवधीच्या नफ्यावर सरसकट 20% या विशेष दराने कर आकारणी होते.
◆23 जुलै 2024 पूर्वी खरेदी केलेल्या घराच्या बाबतीत दीर्घ कालीन भांडवली नफा मोजताना करदात्यांना सरसकट विशेष दराने (12.5%) किंवा महागाई निर्देशांक किमतीचा आधार घेऊन मिळणाऱ्या नफ्यावर 20% या विशेष दराने यापैकी कोणत्याही एका पद्धतीने कर देता येईल.
◆1 एप्रिल 2023 नंतर खरेदी केलेल्या रोखे आधारित योजनांच्या युनिटवर ते कधीही विकले तरी त्यावरील नफा हा अल्प मुदतीचा समजून तो उत्पन्नात मिळवून कर आकारणी होईल.
एकमेकांबरोबर उल्लेख केल्या जाणाऱ्या शब्दांत किंवा शेवटात साम्य असल्याचे सूचित करणाऱ्या आणखी कोणत्या संकल्पना अजून स्पष्ट व्हाव्यात असे आपल्याला वाटते, त्या कळवल्या आणि योग्य वाटल्या तर यापुढील शेवटच्या भागात त्याचा नक्कीच विचार करण्यात येईल.(अपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
4 एप्रिल 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम या संकेतस्थळावर पूर्वप्रकाशीत.
Friday, 28 March 2025
गोंधळात टाकणाऱ्या आर्थिक संकल्पना भाग 1
#गोंधळात_टाकणाऱ्या_आर्थिक_संकल्पना_भाग1
आर्थिक विषय समजून घेताना त्यातील काही संकल्पना निश्चित काय आहेत याबद्दल गोंधळ उडण्याची शक्यता असते. यातील काही संकल्पनांचा उल्लेख एकमेकांसोबत केला जातो तर काही संकल्पनांत शेवटचा शब्द अथवा अक्षर सारखे असल्याने त्यातून नाद उत्पन्न होतो. अशाच दोन काहीशा सारख्याच वाटणाऱ्या परंतु त्याच्या अर्थाबद्धल गोंधळात भर घालणाऱ्या संकल्पना त्यांचा अर्थासह यापुढील दोन तीन भागात क्रमशः समजून घेऊयात.
■उत्पन्न आणि नफा (Revenue and Profit) : व्यवसायाच्या दृष्टीने,
●उत्पन्न: म्हणजे व्यवसायाच्या सामान्य कामकाजातून मिळणारे एकूण पैसे, जसे की मालाची विक्री किंवा सेवा पुरवल्याबद्धल मिळालेले पैसे. उत्पन्नामध्ये कोणताही खर्च वजा केलेला नसतो. त्यामुळे व्यवसायात झालेली वाढ आणि बाजारातील मागणीचे याचा अंदाज घेता येतो.
●नफा: म्हणजे व्यवसायाने मिळवलेल्या उत्पन्नामधून सर्व खर्च (उदा. उत्पादन खर्च, वेतन, व्याज, कर इ.) वजा केल्यावर शिल्लक राहणारी रक्कम. नफा हा व्यवसायाच्या आर्थिक स्थितीचा एक महत्त्वाचा पैलू आहे. नफा वाढल्यास व्यवसाय अधिक सक्षम आणि फायदेशीर ठरतो. उदाहरणार्थ,
जर एका दुकानाचे एकूण उत्पन्न ₹ 100000/- रुपये असेल आणि एकूण खर्च ₹ 80000/- रुपये असेल, तर त्या दुकानाचा नफा (Profit) ₹ 20000/- रुपये असेल.
■'जमा लेखा' (Accrual Accounting) आणि 'रोख लेखा' (Cash Accounting):
●जमा लेखा : या पद्धतीत, व्यवहार रोख स्वरूपात झाला की नाही याचा विचार न करता, तो व्यवहार नोंदवला जातो. म्हणजे, जर तुम्ही एखादी वस्तू विकली आणि पैसे येणे बाकी असेल तरीही ती विक्री नोंदवली जाते.
उदाहरणार्थ,
जर उत्पादकाने एखाद्या ग्राहकाला वस्तू दिली आणि त्याने पैसे 30 दिवसानंतर देण्याचे वचन दिले, तर तुम्ही लगेच विक्री नोंदवाल, जरी पैसे लगेच मिळाले नसले तरी. या पद्धतीमुळे व्यवसायाची खरी आर्थिक स्थिती अधिक स्पष्टपणे दर्शविली जाते, कारण तेथे महसूल आणि खर्चाची नोंद वेळेनुसार केली जाते.
●रोख लेखा : या पद्धतीत, व्यवहार फक्त रोख स्वरूपात झाल्यावरच नोंदवला जातो. म्हणजे, पैसे मिळाल्यानंतरच विक्री नोंदवली जाते आणि जेव्हा पैसे दिले जातील तेव्हाच खर्च नोंदवला जातो.
उदाहरणार्थ,
जर एखाद्या ग्राहकाला वस्तू विकली आणि त्याने लगेच पैसे दिले, तरच तो व्यवहार लगेच नोंदवला जातो. ही अतिशय सोपी पद्धत असून लहान व्यवसायांसाठी उपयुक्त आहे.
■मालमत्ता (Assets) आणि दायित्वे (Liabilities):
●मालमत्ता: ही अशी संसाधने आहेत जी एखाद्या व्यक्ती किंवा व्यवसायाच्या मालकीची किंवा नियंत्रित असतात आणि त्यांचे आर्थिक मूल्य असते.
उदाहरणांमध्ये रोख रक्कम, स्थावर मालमत्ता, गुंतवणूक, उत्पादन उपकरणे आणि रक्कम प्राप्त करण्यायोग्य खाती, शिल्लक कच्चा आणि पक्का माल यांचा समावेश आहे. ही
मालमत्ता रोख रकमेत रूपांतरित केली जाऊ शकते त्याचप्रमाणे भविष्यात आर्थिक फायदे मिळवण्यासाठी वापरली जाऊ शकते.
●दायित्वे:हे एखाद्या व्यक्तीने किंवा व्यवसायाने इतरांना दिलेले वचन किंवा कर्ज दर्शवितात.
उदाहरणांमध्ये उधारीवर उचललेला कच्चा माल, व्यवसायासाठी घेतलेले कर्ज, अन्य देय खाती, यांचा समावेश होईल.
■भांडवली खर्च (CapEx) आणि परिचालन खर्च (OpEx):
●भांडवली खर्च: मालमत्ता, इमारती, तंत्रज्ञान किंवा उपकरणे यासारख्या दीर्घकालीन मालमत्ता मिळवण्यासाठी त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी होणाऱ्या खर्चाचा समावेश होतो.
उदाहरणांमध्ये नवीन यंत्रसामग्री खरेदी करणे, कारखाना बांधणे किंवा सॉफ्टवेअर अपग्रेड करणे समाविष्ट आहे. हे खर्च सामान्यतः एकदाच करावे लागतात, आवर्ती नसलेले असतात आणि दीर्घकालीन फायदे मिळवण्याच्या हेतूने केले जातात.
●कार्यक्षम खर्च (OpEx): व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असलेले दैनंदिन खर्च जसे की, कच्या मालाची खरेदी, पगार, भाडे, विपणन, देखभाल खर्च यांचा समावेश होतो. हे खर्च सामान्यतः आवर्ती असतात आणि व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असतात.
■एकूण नफा टक्केवारी (Gross Margin) आणि निव्वळ नफा टक्केवारी (Net Margin)
●एकूण नफा टक्केवारी: याचा अर्थ कंपनीने तिच्या महसुलातून विक्री केलेल्या वस्तूंच्या निर्मिती करण्यासाठी केलेला खर्च वजा केल्यानंतर मिळवलेल्या नफ्याचा संदर्भ दिला जातो, यात कर आणि दिलेले व्याज याचा समावेश केला जात नाही. तो महसुलाच्या तुलनेत टक्केवारीत व्यक्त केला जातो. कंपनी तिच्या उत्पादन खर्चाचे व्यवस्थापन किती कार्यक्षमतेने करते हे ते यातून समजते. यातून व्यवसायाचा ढोबळ नफा समजतो.
●निव्वळ नफा टक्केवारी : हा काढताना कंपनीच्या महसुलातून उत्पादन परिचालन खर्च, व्याज आणि कर यासह सर्व खर्च वजा केल्यानंतर मिळणाऱ्या नफ्याचे खरेखुरे प्रतिनिधित्व करतो, हा नफा देखिल महसुलाच्या तुलनेत टक्केवारीत व्यक्त केला जातो.
■व्यवसायाची व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफी पूर्वीची कमाई (EBITDTA) आणि
निव्वळ उत्पन्न (Net Income)
●व्यवसायाची व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफी पूर्वीची कमाई: कंपनीच्या मुख्य व्यवसायिक कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे गुंतवणूकदारांना कंपन्यांची तुलना करता येते.
ते मोजण्याची पद्धत,
EBITDA = परिचालन उत्पन्न + घसारा + कर्जमाफी.
●निव्वळ उत्पन्न: कंपनीचा एकूण नफा, जो सर्व खर्च आणि उत्पन्नानंतर शिल्लक राहतो. यामुळे कंपनीच्या एकूण आर्थिक स्थितीचा अंदाज येतो. असे असले तरी त्यातून निश्चित असा रोख प्रवाह समजून येत नाही ही त्यातील त्रुटी आहे.
मोजण्याची पद्धत,
निव्वळ उत्पन्न = एकूण महसूल - सर्व खर्च.
■गुंतवणुकीवर परतावा (Return on Investment) आणि समभागावरील परतावा (Return on Equity):
●गुंतवणुकीवरील परतावा: हा वाक्यांश गुंतवणुकीच्या एकूण नफ्याचा संदर्भ देतो, जो बहुतेकदा टक्केवारीतच व्यक्त केला जातो.
●समभागावरील परतावा: हा वाक्यांश विशेषतः कंपनीच्या भागधारकांच्या समभागाद्वारे निर्माण होणाऱ्या नफ्याचा किंवा मालकांनी गुंतवलेल्या पैशाच्या रकमेचा संदर्भ देतो.
■बाजार मूल्य (Market Cap) आणि उद्योग मूल्यांकन (Enterprise Value):
● बाजारमूल्य: बाजारमूल्य म्हणजे कंपनीच्या सर्व विक्रीयोग्य शेअर्सची बाजारभावानुसार एकूण किंमत. उदाहरण:
जर एका कंपनीचे 100 लाख शेअर्स असतील आणि प्रत्येक शेअरची किंमत ₹100 असेल, तर त्या कंपनीचे बाजारमूल्य ₹100 कोटी (100 लाख * ₹100) असेल.
बाजारमूल्याने कंपनीच्या आकाराचे आणि बाजारातील स्थानाचे (size and position) मोजमाप करता येते. लार्ज, मिड, स्मॉल कंपन्यांचे निकष त्यांच्या बाजारमूल्यानुसार ठरतात. बाजार मूल्यानुसार कंपन्यांचा क्रम लावला असता पहिल्या 100 कंपन्या या मोठ्या आकाराच्या (लार्ज कॅप) 101 ते 250 क्रमांकाच्या कंपन्या मध्यम (मिड कॅप) आकाराच्या आणि अन्य सर्व छोट्या आकाराच्या ( स्मॉल कॅप) समजल्या जातात.
●उद्योग मूल्यांकन: म्हणजे कंपनीच्या एकूण मूल्याचे मोजमाप, ज्यात कंपनीचे समभाग, कंपनीवरील कर्ज आणि त्यातील मालकीचे स्वारस्य यांचा समावेश होतो. यामुळे कंपनीच्या एकूण मूल्याचे अधिक व्यापक आणि वस्तुनिष्ठ चित्र डोळ्यासमोर येते, जे मार्केट कॅपपेक्षा अधिक उपयुक्त असू शकते. याचा वापर कंपनीच्या मूल्यांकनासाठी आणि वित्तीय विश्लेषण करण्यासाठी केला जातो.
■स्थिर खर्च (Fixed Cost) आणि परिवर्तनीय खर्च (Variable Cost):
●स्थिर खर्च: उत्पादन किंवा विक्रीच्या प्रमाणात वाढ किंवा घट झाल्यास, या खर्चावर फारसा कोणताही परिणाम होत नाही.
उदाहरणार्थ,
भाडे, पगार, कर्जाचे हप्ते, इत्यादी.
या खर्चाला 'निश्चित खर्च' असेही म्हणतात.
●परिवर्तनीय खर्च: उत्पादन किंवा विक्रीच्या प्रमाणात बदलल्यास, या खर्चात बदल होतो.
उत्पादन वाढले तर खर्च वाढतो आणि उत्पादन घटले तर खर्च घटतो.
उदाहरणार्थ,
कच्चा माल, पॅकेजिंग, वाहतूक खर्च.
■आर्थिक कर्ज (Financial liverages) आणि निधीतून कार्यक्षम वापर (Operating liverages):
●आर्थिक कर्ज: व्यवसाय विस्तारासाठी कर्ज घ्यावे लागते त्यावर व्याज द्यावे लागते किंवा अधिमूल्याने समभाग वितरित केल्यास अधिक निधी प्राप्त होतो. यातील समभागावर लाभांश द्यावा लागतो. हे करत असताना कंपनीला आर्थिक धोका निर्माण होऊ शकतो. जर भांडवलावर परतावा कर्जावर द्याव्या लागणाऱ्या व्याजाहून अधिक असल्यास किंवा काही कालावधीनंतर अधिक होण्याची शक्यता असेल तर सकारात्मक मानला जाईल. कर्जाची तीव्रता ईपीएसमध्ये टक्केवारीतील बदलाला ईबीआयटीमध्ये टक्केवारीतील बदलाला भागून मिळवता येते
●निधीचा कार्यक्षम वापर : जेव्हा एखादी कंपनी कार्यात्मक क्रियाकलापांमध्ये निश्चित खर्च-वाहक संसाधनांचा वापर करून तिच्या एकूण खर्चाची काळजी घेण्यासाठी अधिक उत्पन्न मिळवते तेव्हा त्याला ऑपरेटिंग लीव्हरेज म्हणतात. विक्रीच्या समायोजनामुळे व्याज आणि कर (EBIT) पूर्वीच्या कमाईवर होणारा परिणाम मोजण्यासाठी ऑपरेटिंग लीव्हरेजची तीव्रता (DOL) मोजली जाते. EBIT मधील बदलाच्या टक्केवारीस विक्रीमधील टक्केवारीतील बदलाने भागून ती मोजता येते.
यापुढील भागात आपण आणखी काही गोंधळात पाडणाऱ्या आर्थिक संकल्पना समजून घेऊयात. (अपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
28 मार्च 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
Subscribe to:
Posts (Atom)