Friday, 18 July 2025

दीपस्तंभ भाग एक

दीपस्तंभ_भाग_एक अर्थशास्त्रात गुंतवणुकीचा अभ्यास करताना गुंतवणूक तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजाभिमुख विकास व्यवस्थेचा विचार करणारे म्हणून अनेक मार्गदर्शकांची नावे पुढे येतात. त्यातील निवडक व्यक्तींचा आणि त्या प्रत्येकाचा त्यांच्या विषयावरील मौलिक विचारांचा थोडक्यात मागोवा घेण्याचा हा प्रयत्न. त्यांचे विचार आपल्याला नक्कीच दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करतील आणि प्रेरणा देतील. ■गुंतवणूक तज्ज्ञ आणि शेअरबाजार विचारवंत 1. वॉरेन बफे (Warren Buffett) बर्कशायर हाथवे या अमेरिकन गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष (या वर्षअखेर या पदावरून ते निवृत्त होत आहेत), गुंतवणुकीचे चालते बोलते विद्यापीठ आणि ‘ओरेकल ऑफ ओमाहा’ या टोपणनावाने प्रसिद्ध. दीर्घकालीन मूल्याधारित गुंतवणुकीचे समर्थक आहेत. मजबूत पायाभूत तत्त्वांवर चालणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणुक करण्यावर त्यांचा भर असतो. बफे यांचे विचार- ●इतर लोक अधिक फायदा होईल या लोभाने शेअर्स खरेदी करत असतील तेव्हा घाबरून विक्री करा आणि जेव्हा सगळे घाबरून विक्री करीत असतील, तेव्हा खरेदी करा. ●शेअर बाजाराची रचना ही सक्रिय गुंतवणूकदारांकडून संयमी गुंतवणूकदारांकडे पैसा हस्तांतरित करण्यासाठी केली आहे. ● तुम्ही खरेदीसाठी देता ती किंमत आणि विक्री करून मिळवता ते मूल्य. ●शेअर कायमस्वरूपी ठेवायला आवडतात. ●ज्या कंपनीत गुंतवणूक केल्यावर पुढची दहा वर्षे बाजार बंद राहिला तरी चालेल, अशाच कंपनीत पैसे गुंतवा. ●जेव्हा तुम्हाला तुम्ही काय करत आहात हे समजत नाही तेव्हा सर्वाधिक धोका उद्भवतो. ●शेअरबाजातील चालू भाव बाजारातील लोकांचे कंपनी विषयी मत दाखवत असले तरी ते कंपनीचे दीर्घकालीन मार्केट मूल्य मोजण्याचे यंत्र आहे. ●संधी क्वचित येतात. जेव्हा सुवर्णधारा वाहते, तेव्हा त्याचा पुरेपूर फायदा घ्या. ●जेव्हा बाजारभाव खाली येतात, तेव्हाच भांडवल वापरण्याची सर्वोत्तम संधी असते. ●योग्य किमतीत चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणं, स्वस्तात वाईट कंपनीचे शेअर्स घेण्यापेक्षा नेहमीच चांगलं. 2. पीटर लिंच (Peter Lynch) फिडेलिटी मॅजेलन फंडचे माजी व्यवस्थापक. त्यांनी शेअर बाजारात सातत्याने सर्वोत्कृष्ट परतावा मिळवलेला आहे. लिंच “तुम्हाला जे समजते त्यातच गुंतवणूक करा” या तत्त्वाचा पुरस्कार करतात. त्यांचे विचार- ●तुमच्याकडे जे आहे त्याबद्दलची माहिती ठेवा त्याचबरोबर ते का आहे, हेही समजून घ्या. ●प्रत्येक शेअरमागे एक कंपनी म्हणजे व्यवसाय असतो. ती कंपनी नेमका काय व्यवसाय करते ते शोधा. ●शेअर मार्केटमध्ये पैसे कमावण्याची खरी गुरुकिल्ली म्हणजे घाबरून सर्व शेअर्स विकून टाकू नका. ●ज्याने सर्वात जास्त दगड पलटले, तोच जिंकतो. ●ज्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत त्यामध्येच गुंतवणूक करा. ●मंदी येणारच त्यामुळे शेअर बाजार कोसळणार. हे मान्य नसेल, तर त्याचा अर्थ गुंतवणुकीसाठी तुम्ही तयार नाही असा होतो. ●बाजारभाव खाली येण्याची वाट बघून किंवा त्या संबंधी अंदाज बांधून जेवढं नुकसान होतं ते प्रत्यक्षात खाली आलेल्या भावामुळे झालेल्या नुकसानीपेक्षा अधिक असतं. ●बाजारभाव वाढल्याने चांगले शेअर्स विकून वाईट शेअर्स ठेवणं म्हणजे बहरलेली फुलझाडं कापून टाकून आणि गवतावर पाणी वाया घालवणं. ●जेव्हा तुमच्याकडे भक्कम कंपन्यांचे शेअर्स असतात, तेव्हा काळ तुमच्या बाजूने असतो. ●अधिक गुंतागुंत नको, जितकं साध आणि सरळ तितकं चांगलं. 3. बेंजामिन ग्रॅहम (Benjamin Graham) मूल्याधारीत गुंतवणूक (व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग) या संकल्पनेचे जनक. ‘The Intelligent Investor’ या पुस्तकाचे लेखक आणि वॉरेन बफे यांचे गुरू. त्यांनी ‘Margin of Safety’ या संकल्पनेचा पुरस्कार केला. ग्रॅहम यांचे विचार- ●वैयक्तिक गुंतवणूकदाराने कायमच गुंतवणूकदारासारखेच वागावे, सट्टेबाजासारखे नाही. ●थोडक्यात शेअरबाजार हा मतदान मशीनसारखा असतो, पण दीर्घकालात तो वजन मोजणारे यंत्र बनतो. ●गुंतवणुक व्यवस्थापन म्हणजे त्यातील परताव्याचे नाही तर जोखमीचे व्यवस्थापन. ●बुद्धिमान गुंतवणूकदार हा वास्तववादी असतो. तो आशावाद्यांना शेअर्स विकतो आणि निराश व्यक्तीकडून शेअर्स खरेदी करीत असतो.. ●गुंतवणूकदाराचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे तो स्वतःच. ●सर्वोत्तम गुंतवणूक ही केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातूनच केली जाते. ●समाधानकारक गुंतवणूक परतावा मिळवणे खूप सोपे आहे परंतु उत्कृष्ट परतावा मिळवणे सर्वात कठीण गोष्ट आहे. ●तुम्ही जेव्हा सट्टा खेळत असता तेव्हा ती गुंतवणूक आहे असे समजून स्वतःला फसवू नका. ●आशावादावर नव्हे, आकड्यांवर आधारित खरेदी करा. ●बुद्धिमान गुंतवणूकदार संशयी असतो तो केवळ आणि केवळ वाजवी किमतीतच खरेदी करतो. 4. फिलिप फिशर (Philip Fisher) वाढीवर आधारित गुंतवणुकीचे प्रवर्तक. ‘Common Stocks and Uncommon Profits’ या पुस्तकाचे लेखक. नाविन्यपूर्ण संशोधन आणि दीर्घकालीन दृष्टी असलेल्या कंपन्यांमधील गुंतवणुकीचे समर्थक. फिशर यांचे विचार- ●शेअरबाजार अशा लोकांनी भरलेला आहे जिथे सर्वाना मूल्य नाही तर किंमत माहित असते म्हणूनच गुंतवणूक करताना किंमतीवर नाही, तर मूल्यावर लक्ष केंद्रित करा. ●संयमी गुंतवणूकदार गाढ झोपतो. सुरक्षित आणि स्थिर गुंतवणूकीतून मनःशांती मिळते. ●जो गुंतवणूकदार स्वतंत्रपणे विचार करू शकतो, तो नफा मिळवू शकतो. ●जर शेअर खरेदी करताना व्यवस्थित अभ्यास केला असेल, तर तो विकण्याची वेळ कधीच येत नाही. उत्तम कंपन्या या नेहमी दीर्घकाळासाठी ठेवायच्या असतात. ●यशस्वी गुंतवणूकदार हा तोच असतो ज्याला व्यवसायातील समस्यामध्ये स्वाभाविक रस असतो. शेअरमागे असलेल्या व्यवसायास नीट समजून घ्या. ●युद्धाच्या भीतीमुळे खरेदी करण्यास घाबरू नका. संकटकाळातच सर्वोत्तम संधी उपलब्ध असू शकतात. ●ज्याचं संशोधन सर्वात उत्तम आहे, ती कंपनीच शेवटी आघाडीवर राहते. नाविन्यपूर्ण कंपन्यांमध्ये गुंतवा. ● जास्त पैसे मोजून खरेदी केल्याने एक उत्कृष्ट कंपनीत केलेली गुंतवणूक देखील सर्वात वाईट गुंतवणूक ठरते म्हणून मोजलेली किंमतही तितकीच महत्त्वाची आहे. ●मोठे गुंतवणूकदार कंपनीच्या भूतकाळाकडे नव्हे, भविष्यातील क्षमतेकडे पहातात. ●कालावधी हा व्यवसायाचा जिवलग मित्र असतो. चांगल्या कंपन्यांना वेळ द्या, त्याचा नफा वाढत जातो. 5. जॉन सी. बोगल (John C. Bogle) व्हॅनगार्ड ग्रुपचे संस्थापक. त्यांनी पहिला लो-कॉस्ट इंडेक्स फंड सुरू केला. अप्रत्यक्ष (Passive investing) आणि कमी खर्च असलेल्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर. बोगल यांचे विचार- ●गवताच्या ढिगाऱ्यात सुई शोधण्याचा प्रयत्न करू नका, संपूर्ण ढिगाराच खरेदी करा. एकेका कंपनीऐवजी संपूर्ण बाजारात एकत्रित गुंतवणूक (इंडेक्स फंड) करा. ●शेअर बाजार हे गुंतवणुकीपासून तुमचे लक्ष विचलित करणारे मोठे साधन आहे. रोजच्या हालचालींकडे न पाहता, दीर्घकालीन दृष्टी ठेवा. ●वेळ हा तुमचा मित्र आहे आणि तीव्र भावना (इम्पल्स) तुमचा शत्रू. त्यामुळे संयम बाळगा, भावनांवर नियंत्रण ठेवा. ●व्यवस्थापक जितका जास्त मोबदला घेतात, गुंतवणूकदार तितकं कमी कमावतो. जास्त खर्च म्हणजे गुंतवणूकीवरील कमी परतावा. ●जे काही होईल ते होईलच म्हणून आपला गुंतवणुकीचा मार्ग बदलू नका. नेहमी शिस्तीत राहणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे. ●तुम्हाला शेअर बाजारात २०% तोटा होण्याची शक्यता सहन होत नसेल, तर तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका बाजारातील तीव्र चढ उतार सहन करण्याची मनाची तयारी ठेवा. ●शेअरबाजारातील एक सखोल नियम म्हणजे सरासरीकडे परतणं त्यामुळे बेफाम वाढ झाल्यावर शेअर पुन्हा स्थिर मूल्यावर येतोच येतो. ●इक्विटी फंड गुंतवणूकदाराचे दोन मोठे शत्रू म्हणजे खर्च आणि भावना त्यांना नियंत्रणात ठेवा. ●इंडेक्स फंड तुम्हाला वैयक्तिक शेअर्सची निवड, योग्य वेळ पकडण्याची आणि व्यवस्थापक निवडीची जोखीम टाळतात त्यातील साधेपणातच यश आहे. ●गुंतवणुकीत तुम्हाला जे मिळतं ते सहसा त्या गोष्टींपासून मिळतं, ज्या तुम्ही पैसे न देता घेता, कमी खर्च म्हणजे जास्त परतावा. 6. रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki) ‘Rich Dad Poor Dad’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक. त्यांनी आर्थिक साक्षरतेचा प्रचार केला आणि लोकांनी पैशासाठी काम न करता पैसे आपल्यासाठी कसे काम करतात ही संकल्पना समजावून देण्यावर त्यांचा भर आहे. कियोसाकी यांचे विचार- ●श्रीमंत लोक पैसे मिळवण्यासाठी काम करत नाहीत. ते पैशांना आपल्यासाठी काम करायला लावतात. ●तुम्ही किती पैसे कमावता ते महत्त्वाचे नाही तुम्ही ते किती आणि कसे टिकवता हे महत्त्वाचे आहे. ●आर्थिक स्वातंत्र्य केवळ त्या लोकांसाठी उपलब्ध आहे जे त्याचा अभ्यास करतात आणि त्यासाठी प्रचंड मेहनत करतात. ●यशस्वी गुंतवणूकदार सगळं जाणणारे नाही तर शिकत राहणारे असतात. ●ज्या गोष्टी समजत नाहीत त्यात गुंतवणूक करू नका, आधी शिकून घ्या. ●शेअर बाजार हा संयमी व्यक्तीकडे पैसा हस्तांतरित करणारे यंत्र आहे. ●आजच्या बदलत्या जगात, तुम्हाला काय येतं यापेक्षा तुम्ही ते किती लवकर शिकता,हे अधिक महत्त्वाचं आहे. ●अपयश आल्यावर हार मानणारे हरतात तर वारंवार अपयशावर अपयश येऊनही न हार मानणारेच जिंकतात. ●आपल्याकडे असलेली सर्वात शक्तिशाली मालमत्ता म्हणजे आपला मेंदू. ●तुम्ही फक्त तेव्हाच गरीब होता, जेव्हा तुम्ही हार मानता म्हणूनच शिकणं कधीही थांबवू नका. (अपूर्ण) ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)

No comments:

Post a Comment