Friday, 25 July 2025
दीपस्तंभ भाग दोन
#दीपस्तंभ_भाग_दोन
यापूर्वीच्या भागात गुंतवणूक तज्ज्ञ आणि शेअरबाजारातील विचारवंत यांची थोडक्यात ओळख आणि विचार जाणून घेतले या भागात अर्थशास्त्रज्ञ आणि समाजाभिमुख विचार करणारे काही विचारवंत यांची ओळख आणि विचार जाणून घेऊयात.
■अर्थशास्त्रज्ञ व वित्तविषयक विचारवंत
7. रिचर्ड थेलर (Richard Thaler)
नोबेल पुरस्कार विजेते. ‘Behavioral Economics’ चे संस्थापक सदस्य. ‘Nudge’ या पुस्तकात त्यांनी मानवी मानसशास्त्र हे त्यांच्या गुंतवणुकीवर कसा प्रभाव टाकते ते स्पष्ट केले आहे.
थेलर यांचे विचार-
●वर्तणूक अर्थशास्त्राचे गृहितक असे आहे की लोक पारंपरिक अर्थशास्त्र मानते त्यापेक्षा खूप कमी शहाणे असतात.
●कोणाला काही करायला प्रवृत्त करायचं असेल, तर ते आधी सोपं करा.
●आपण विचार करणाऱ्या भावना नाही तर भावना असलेले विचार करणारे यंत्र आहोत.
●लोक अल्पकालीन तोट्यांना अधिक महत्त्व देतात आणि दीर्घकालीन नफ्यांकडे दुर्लक्ष करतात.
●शेअरबाजार हा गोष्टी सांगणारे मशीन आहे. त्यातील कथा या भावनांपेक्षा जास्त किंमत ठरवतात.
●तोटा सहन करता येणे ही भावना, नफ्याच्या आनंदापेक्षा दुप्पट तीव्र असते.
●बचत ही कठीण असते कारण आपण फक्त आत्तावर लक्ष केंद्रित करतो, पुढचं विसरतो.
●एक चांगला हलका धक्का अथवा प्रोत्साहन म्हणजे असा पर्याय जो लोकांना त्यांचे निर्णय स्वातंत्र्य राखून चांगला निर्णय घेण्यास मदत करतो.
●फक्त अधिक माहिती देऊन लोकांचे अज्ञान दूर करता येत नाही.
●बाजार कितीही काळ असह्य वाटेल इतका गैरवर्तन करत राहू शकतो.
8. रॉन चर्नो (Ron Chernow)
प्रसिद्ध इतिहासकार व चरित्रलेखक. J.P. Morgan, Rockefeller आणि Alexander Hamilton यांच्यावर चरित्रे लिहिली. भांडवलशाहीचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाचे योगदान.
चेर्नो यांचे विचार:
●वॉल स्ट्रीटचा इतिहास म्हणजे सट्टा आणि भ्रम यांची एक साखळी आहे.
●बाजार अनेकदा तर्काने नव्हे तर केवळ भावनांनी चालवले जातात.
●आर्थिक इतिहास हा अमेरिकन शिक्षणातील सर्वात दुर्लक्षित विषय आहे पण भांडवलशाही समजून घेण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे.
●प्रत्येक आर्थिक फुगवटा आनंदात सुरू होतो आणि नैराश्यात संपतो.
●वॉल स्ट्रीट हा केवळ आर्थिक आकड्यांचा नाही तर मानवी मानसिकतेचाही खेळ आहे.
●भांडवलशाही ही एकाच वेळी सर्जनशील आणि विध्वंसक असते.
●शेअरबाजार नेहमी अती आशावाद आणि अती निराशावाद यामध्ये वरखाली होत असतो.
●सर्वात वाईट आर्थिक संकटे तेव्हाच उद्भवतात, जेव्हा लोक म्हणतात यावेळी वेगळं आहे.
●महान संपत्ती केवळ मार्केटचे वेळेवर भाकीत करून नव्हे, तर जग बदलणाऱ्या कंपन्या उभ्या करून मिळवली जाते.
●सुज्ञ निर्णय घेणे आणि संयम बाळगणे वॉल स्ट्रीटवर धाडसापेक्षा दुर्मिळ आहे.
9. पॉल क्रुगमन (Paul Krugman)
नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ आणि न्यूयॉर्क टाईम्सचे स्तंभलेखक. आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक भौगोलिक रचना आणि समाजवादी अर्थधोरणांचा समर्थक.
त्यांचे विचार-
●बाजार व्यवस्था ही कायद्याच्या चौकटीत चालणारी सामाजिक सहकार्य आणि परस्पर फायद्यांची प्रणाली आहे.
●आर्थिक व्यवस्थेमध्ये आत्मविश्वास सर्व काही आहे.
●शेअरच्या किंमती वास्तवापेक्षा मानसिकतेने जास्त ठरवल्या जातात.
●अर्थशास्त्र म्हणजे नैतिकतेचा पाठ नाही. ते परिणाम आणि कारणांबद्दल आहे.
●आर्थिक बाजारात सुरक्षिततेचा आभास होणं सर्वात धोकादायक असतो.
●लोक सध्याची स्थिती भविष्यातही तशीच राहील असे गृहित धरतात त्यामुळेच बबल तयार होतात.
●अदृश्य हाताला अनेकदा भटकू नये म्हणून दृश्यमान हाताची गरज असते.
●तेजी आणि मंदी हे भांडवलशाहीचे भाग आहेत पण चुकीची धोरणं त्यांना अधिक वाईट बनवतात.
●जर गुंतवणूक इतकीच सोपी असती, तर सगळेच श्रीमंत झाले असते.
●अर्थशास्त्रज्ञांना खूप काही कळत नाही, पण ते इतरांना काहीच कसं कळत नाही असं वाटायला लावतात.
■विकास व समाजाभिमुख अर्थव्यवस्थेचे तज्ञ
10. चार्ली मंगर (Charles Munger)
बर्कशायर हाथवेचे उपाध्यक्ष आणि वॉरेन बफे यांचे दीर्घकालीन भागीदार होते Mental Models आणि व्यवहारिक तर्कशास्त्र यांचा पुरस्कार करणारे गुंतवणूकदार. संयम, सुलभता आणि उलट सुलट तपासणी या तत्त्वांचा पुरस्कार.
त्यांचे विचार-
●मोठा पैसा केवळ खरेदी किंवा विक्रीत नसतो तर तो थांबण्यात असतो.
●प्रत्येक दिवस आपण कालपेक्षा थोडं अधिक शहाणं व्हावं, हे प्रयत्न करत रहा.
●प्रत्येक समस्या उलट करून पहा. उलटा विचार करा.
●फार मोठा फायदा आपण फक्त एक गोष्ट करून मिळवतो तो म्हणजे मूर्खपणा.
●योग्य किमतीला चांगली कंपनी घेणं, उत्तम किमतीत साधारण कंपनी घेण्यापेक्षा केव्हाही चांगलं.
●शहाणा माणूस नेहमी अदृश्य गोष्टी शोधतो, स्पष्ट दिसणाऱ्या नव्हे.
●जे तुम्हाला माहीत नाही, ते स्वीकारणं ही खऱ्या शहाणपणाची सुरुवात आहे.
●आज जगात जे काही चाललं आहे ते जर तुम्हाला गोंधळात टाकत नसेल याचा अर्थ तुम्ही त्याला समजून घेत नाही.
●झुंडीचा पाठपुरावा केला, तर तुम्ही नेहमीच सरासरीकडे परतता.
●एक साधी कल्पना घ्या आणि ती गंभीरतेने अमलात आणा.
11. अभिजीत बॅनर्जी (Abhijit Banerjee)
MIT मधील प्राध्यापक आणि नोबेल पुरस्कार विजेते. ‘Poor Economics’ या पुस्तकाचे सहलेखक. विकास आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी ‘Randomized Control Trials’ वापरणारे पहिले अर्थशास्त्रज्ञ.
त्यांचे विचार-
●विकास म्हणजे मोठे आराखडे नव्हेत, तर एकावेळी एक समस्या सोडवणं.
●बाजार अनेक वेळा अपयशी ठरतो. म्हणूनच सरकारांनी हस्तक्षेप करावा लागतो.
●गरीब असहाय नसतात. ते अत्यंत काटेकोर निर्णय घेतात.
●सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न ही कल्पना नक्कीच चाचपून पाहण्यासारखी आहे.
●अर्थशास्त्रीय मॉडेल्स नेहमी माणसांच्या वर्तनाचं अचूक चित्रण करत नाहीत.
●दारिद्र्याशी लढण्यासाठी मतप्रवाह नव्हे, प्रयोग आणि पुरावे लागतात.
●छोट्या बदलांमुळे मोठी परिणामकारकता येऊ शकते.
●आपल्याला दारिद्र्याचं गौरवीकरण थांबवून, गरीब लोकांचे म्हणणे ऐकायला हवे.
●प्रेरणा (incentives) महत्त्वाच्या आहेत, पण संदर्भ (context) त्याहून महत्त्वाचा आहे.
●फक्त आर्थिक वाढीने विषमता नाहीशी होत नाही.
12. मोहम्मद युनूस (Muhammad Yunus)
बांगलादेश ग्रामीण बँकेचे संस्थापक आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते. मायक्रोफायनान्स व "Social Business" या संकल्पनांचा प्रचार केला. गरीबांना आर्थिक सशक्तता देण्याचे कार्य केले. सध्या बंगला देशाचे हंगामी अध्यक्ष.
त्यांचे विचार-
●गरीब माणसं म्हणजे बोन्साय वृक्षासारखी आहेत. बीज चांगलं असतं, पण समाजाने त्यांना वाढण्यासाठी जागा दिली नाही.
●कर्ज (क्रेडिट) मिळणं हा मानवी हक्क आहे.
●जर प्रत्यक्षात आणण्याची इच्छा असेल तर जगात गरिबी नसलेली व्यवस्था आपण सहज तयार करू शकतो.
●दान हे गरिबीचे उत्तर नाही. दान केवळ गरिबी टिकवून ठेवतं.
●पैसे कमवणं म्हणजे आनंद तर इतरांना आनंद देणं म्हणजे त्याहून श्रेष्ठ आनंद.
●आपल्यापैकी प्रत्येकात अपार क्षमता आहे. मायक्रोक्रेडिट त्या क्षमतेला मोकळं करतं.
●सामाजिक व्यवसाय म्हणजे नफ्याचा विचार न करता समस्या सोडवणं.
●गरिबी लोकांनी निर्माण केली नाही तर ती आपण बनवलेल्या व्यवस्थेमुळे निर्माण झाली आहे.
●अर्थव्यवस्था ही लोकांसाठी असावी, लोकं अर्थव्यवस्थेसाठी नाहीत.
●तुम्ही जर वेगळी कल्पना करू शकत असाल तर ती शक्य देखील करू शकता. (समाप्त)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायतीचे या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment