Friday, 17 January 2025
मालमत्ता नामांकनाचा नवा घोळ
#मालमत्ता_नामांकनाचा_नवा_घोळ
भांडवल बाजारात व्यवहार करणाऱ्याच्या व्यक्तींनी दावा न केलेल्या मालमत्तांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याची अनेक कारणे आहेत. पूर्वी या मालमत्ता कागदी स्वरूपात होत्या, त्यांचे नामांकन करायची सोय नव्हती. या मालमत्तावर दावा करण्याची प्रक्रिया क्लिष्ट, कंटाळवाणी आणि खर्चिक असल्याने अनेक किरकोळ बाजारमूल्य असलेले दावे गुंतवणूकदारांचे वारस करत नसत. काही बाबतीत आपल्या वाडवडीलानी गुंतवणूक केली आहे याची त्यांच्या वारसांना माहिती नाही, काही बाबतीत वारसांना माहिती आहे पण त्यांच्यात एकवाक्यता नसल्याने अशी प्रकरणे पडून रहात, त्यामुळे अनेकजण कंटाळून त्याचा नाद सोडून देत असत. काही दावे न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असल्याने न्यायप्रकियेतील दिरंगाईमुळे वर्षानुवर्षे रेंगाळत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण व्हावे या हेतूने सेबीने मालमत्ता हस्तांतरण सुलभरीतीने व्हावे या हेतूने नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. गेले वर्षभर भांडवल बाजारातील विविध मध्यस्थांशी या संबंधात चर्चा करून नवीन मार्गदर्शक तत्वे तयार केली असून नवे नियम 1 मार्च 2025 पासून लागू होतील.
नव्या नियमावलीची वैशिष्ट्ये-
●सध्या इन्शुरन्स, म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्यास जास्तीत जास्त तीन व्यक्तींना नामनिर्देशीत करता येते त्यांची टक्केवारी ठरवता येते. अलीकडे बँकेतील रकमेसाठी एकाच वेळी (Simultaneous) तसेच एकापाठोपाठ एक (Successive) दोन पर्यायासह चार व्यक्तींचे नामनिर्देशन करता येते. आता तसाच पर्याय म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्यास उपलब्ध झाला असून यात जास्तीत जास्त दहा व्यक्तींना नामनिर्देशीत करून त्यांची मालमत्तेतील टक्केवारीही निश्चित करता येईल. जेथे टक्केवारी जाहीर केली नसेल तेथे ती सारख्याच टक्केवारीत आहे असे समजण्यात येईल.
●एकल होल्डिंगसाठी आता नामांकन अनिवार्य असेल
●संयुक्त होल्डिंगसाठी ऐच्छिक: संयुक्त होल्डिंगमध्ये नामनिर्देशन करणे गरजेचे नाही. एका धारकाचा मृत्यू झाल्यास ती आधी दिलेल्या नामांकनावर परिणाम न करता दुसऱ्या धारकाच्या नावावर वर्ग केली जाईल.
वाचलेल्या संयुक्त धारकांना आधीचे नामनिर्देशन बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार आहे.
●गंभीर आजारग्रस्त गुंतवणूकदारांसाठी, वैद्यकीय प्रमाणपत्राची पडताळणी करून फोलिओ ऑपरेट करण्यासाठी नामनिर्देशित व्यक्तीला अधिकार मिळू शकतो.
●नामांकनाची पडताळणी करण्यासाठी एकच प्रमाणित पद्धती सुचवली आहे.
●गुंतवणूकदार अथवा नामनिर्देशीत व्यक्तीपैकी एखाद्याचा मृत्यू झाल्यास उर्वरीत नामनिर्देशीत व्यक्तींना त्यांचा वाटा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
●नामांकित केलेली व्यक्ती कायदेशीर वारस असेलच असे नाही त्यामुळे त्याच्या ताब्यात येणारी मालमत्तेची सदरहू व्यक्ती विश्वस्त असेल.
●नामांकन नोंद करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धती उपलब्ध केल्या आहेत-
*ऑनलाइन पद्धतीत नामांकन आधार सत्यापित करून, डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून अथवा द्वि स्तरीय ओळख पटवून करता येईल. तर
*ऑफलाईन पद्धतीत प्रत्यक्ष फॉर्म भरून सही करून तो दोन साक्षीदारांकडून सत्यापित करता येईल.
●नामांकित व्यक्तीच्या नावे मालमत्ता हस्तांतरित करण्यापूर्वी त्यांच्याकडून शपथपत्र आणि हमीपत्र भरून घेतले जाते यापुढे ते द्यावे लागणार नाही. केवळ गुंतवणूकदाराच्या मृत्यूचा दाखला आणि नामांकित व्यक्तीची ओळख पटवणारा पुरावा (KYC) आवश्यक असेल.
●मालमत्ता हस्तांतर झाल्यानंतर संबंधित कागदपत्रे जी भौतिक स्वरूपात अथवा डिजिटल स्वरूपात असतील ती पुढील आठ वर्षे जतन करावी लागतील. नामांकन नोंदी त्यातील बदल अद्ययावत ठेवण्यात येतील.
●विद्यमान धारकांना ऑनलाइन यंत्रणा वापरून नामांकन रद्द करता किंवा सुधारता येईल यासाठी ओटीपी पडताळणी किंवा व्हिडीओ रेकॉर्डिंगचा पर्याय उपलब्ध असेल.
●अस्वस्थ गुंतवणूकदारांसाठी, वैद्यकीय प्रमाणपत्राची पडताळणी करून फोलिओ ऑपरेट करण्यासाठी नामनिर्देशित व्यक्तीला अधिकार देऊ शकते.
एकंदरीत पूर्वीपेक्षा ही पद्धती अधिक गुंतवणूकस्नेही आहे असे सकृतदर्शनी वाटते. यामुळे सकृतदर्शनी गुंतवणूकदारांना त्याचा नक्की उपयोग होऊ शकेल. वरील विवेचनात नामांकन आणि वारसा असे दोन शब्दप्रयोग आले आहेत. आपल्याला हे दोन्ही शब्द सारखेच वाटत असले तरी त्यात भरपूर फरक आहे. कायद्याच्या दृष्टीने नामांकन केलेली व्यक्ती ही त्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसांची विश्वस्त असते म्हणजे सन 2020 पर्यंत तरी अशी समजूत होती. मालमत्ता धारकाच्या मृत्यूनंतर नामांकन केलेल्या व्यक्तीकडे मालमत्ता सहज हसत्तांतरीत होते. मृत व्यक्तीने मृत्युपत्र केले असल्यास त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचे वाटप करणे हे त्याच्याकडून अपेक्षित आहे मृत्युपत्र केले नसल्यास व्यक्तिगत कायद्यानुसार त्याच्या मालमत्तेचे वाटप करावे लागते. थोडक्यात नामांकनधारक योग्य वारसदार शोधून मालमत्ता यथायोग्य त्याच्याकडे वर्ग करेल असे यातून अपेक्षित आहे. नामांकित व्यक्ती ही मृत व्यक्तीची एकमेव वारसदार, काही प्रमाणात वारसदार असू शकते. सध्या जर नामांकन केले नसेल वारसदारांना मालमत्ता कमी रकमेची असल्यास प्रतिज्ञापत्र आणि हमीपत्र देऊन, अधिक वारस असल्यास इतर वारसांचे ना हरकत पत्र सादर करून मागणी अर्ज द्यावा लागतो. रक्कम खूप मोठी असेल तर न्यायालयातून वारसा प्रमाणपत्र मिळवावे लागते ही एक गुंतागुंतीची कायदेशीर प्रक्रिया आहे यास वेळ लागतो आणि काही रक्कम (स्टॅम्प ड्युटी, वकिलांची फी इ) खर्च करावी लागते.
वारसांच्या नावाने नामांकन असेल तर मालमत्तेचे हसत्तांतरण करण्याची प्रक्रिया सुलभ होते. गुंतवणूकदारांच्या वारसांना त्यांची हक्काची रक्कम मिळवण्यासाठी फारश्या अडचणी येत नाहीत. नामांकन नसेल तर वारसदारांना त्यांची ओळख पटवून वारसाहक्क सिद्ध करावा लागतो ही एक मोठी कायदेशीर प्रक्रिया आहे.
दोन्ही गोष्टी सोईच्या किंवा गैरसोयीच्या वाटत असतील अलीकडील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार वेगवेगळ्या मालमत्ताचे नामांकित व्यक्ती किंवा वारसदार लाभार्थी असू शकतात. शेअर्स म्युच्युअल फंड याच्या बाबतीत सहधारक असल्यास ती व्यक्ती आणि नसल्यास नामांकित व्यक्ती हीच कायदेशीर वारस समजण्यात येते.
नामांकन म्हणून तुम्ही जोडीदार, जिथे जोडीदार नसेल तिथे नातेवाईक तेही नसल्यास विश्वासू मित्र यास ठेऊ शकता.अज्ञान व्यक्तीच्या नावे नामांकन केल्यास ती सज्ञान होइपर्यंत त्याचा पालक कोण ते जाहीर करावे लागते. जोपर्यंत काही वाद उपस्थित होत नाही तोपर्यंत प्रक्रियेत सहसा काही अडथळा येत नाही. वाद उपस्थित झाल्यास वारसा प्रमाणपत्र सादर केल्यावरच प्रकरण मार्गी लागेल. हे टाळण्यासाठी जिथे जिथे शक्य तिथे जोडीदारास सहधारक, शक्य नसेल तेथे नॉमिनी म्हणून आणि मृत्युपत्राद्वारे एकमेव वारस नेमल्यास कायदेशीर वादविवाद निर्माण होण्याची शक्यता कमी वाटते.
प्रत्येक मालमत्ता वेगवेगळ्या असून त्यांचे स्वतःचे असे नियम असल्याने त्याचे धारक एक की अनेक, नॉमिनी किती, लाभार्थी कोण यात असलेले साम्य अथवा वेगळेपणा सर्वांनीच माहिती करून घ्यावा. याशिवाय सध्याचा डिजिटल युगात काही अभिनव मालमत्ता निर्माण होत आहेत जसे- संकेतस्थळाचे नाव, इलेक्ट्रॉनिक वॉलेट, इलेक्ट्रॉनिक चलन, आभासी चलन, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, इ मेल, ब्लॉग अशा विविध मालमत्ता निर्माण झाल्या असून त्यातील अनेकांतून अर्थप्राप्तीही होऊ शकते. यातून काही रक्कम बँक खात्यात आली असल्यास त्यास बँकेचे नियम लागू होतील. यासंदर्भात सध्या निश्चित असे कायदे नसले तरी या वेगळ्या प्रकारच्या मालमत्तांचे लाभार्थी कोण असतील याबाबत सध्या त्या प्लँटफॉर्मच्या स्वतःच्या काय तरतुदी आहेत त्याची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
सध्या तीन व्यक्ती नामांकित करता येत असताना जास्तीत जास्त 10 व्यक्तींमध्ये नामांकन करण्यामागे नेमके आणि खास तथ्य काय असावे ते समजण्यास मार्ग नाही. खरं तर सर्वच वारस लाभार्थीच्या दृष्टीने सेबी, आरबीआय, आयआरडीए, पीएफआरडीए या सर्वच नियामकानी अधिक घोळ न घालता सर्वच मालमत्तांसाठी एकसमान पद्धतीने सुलभ नामांकन नियमावली ठरवायला हवी.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
17 जानेवारी 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
Friday, 10 January 2025
दारवास बॉक्स थिअरीची ओळख
#दारवास_बॉक्स_थिअरीची_ओळख
आर्थिक विषयाच्या संदर्भात निकोलस दारवास यांचे नाव आपण कदाचित ऐकलं असण्याची शक्यता आहे त्यांचा जन्म हंगेरीत झाला. 1950 च्या दशकात ते बॉलरूम डान्सर म्हणून जगभर फिरत होते. या काळात एका क्लबने नृत्य सादर करण्याचे मानधन पैशांच्या स्वरूपात न देता कंपनी शेअर्सच्या स्वरूपात देऊ असे सांगून त्याचा बयाणा (Advance) म्हणून काही शेअर्स त्यांना देऊ केले. काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आले की अतिशय कमी कालावधीत त्याच्या बाजारमूल्यात वाढ झाली आहे. आपण इतके कष्ट करून पैसे मिळवतो त्यापेक्षा गुंतवणूक केल्यास इतक्या कमी कालावधीत पैसे अधिक वाढू शकतात याचं त्यांना आश्चर्य वाटलं. पुढे काही कारणाने क्लबशी करार न झाल्याने दारवास यांनी ते शेअर्स विकत घेतले. त्यानंतर आपल्या मिळकतीतील बराचसा भाग ते शेअर्समध्ये गुंतवीत असत. त्यासाठी त्यांनी वॉल स्ट्रीट जर्नल आणि बॅरोन यांचे सदस्यत्व घेतले होते. यशस्वी लोकांचे अनुभव, टिप्स यांचा आधार घेऊन गुंतवणूक करून पाच ते सात वर्षांच्या कालावधीत त्यांनी आपले सर्वच भांडवल गमावले. त्यानंतरच्या कालावधीत आपण कोणत्या चुका केल्या त्याचा शोध घेऊन त्यांनी रोज आठआठ तास संशोधन केले. अनेक पुस्तके वाचली रेटिंग्ज अहवाल वाचले. त्यातून त्यांनी असा निष्कर्ष काढला की उलढालीसह सतत बाजारभाव वाढणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे अतिशय फायदेशीर आहे तसेच आपला तोटा सहन करण्याच्या मर्यादेत राखल्यास अंतिमतः फायदाच होतो. केवळ शेअरबाजारात नोंदणी झालेल्या स्टॉक मध्ये ते गुंतवणूक करत असत. दारवास बॉक्स थिअरी (Darvas Box Theory) ही त्यांनी स्वतः विकसित केलेली ट्रेडिंग पद्धत आहे, जी तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) आणि किंमत चळवळीचा (Price Action) वापर करून भावपातळीत मजबूत वाढ असलेल्या शेअर्सची ओळख पटवते आणि त्यामध्ये व्यापार करण्यासाठी मदत करते. यातील नियमांचा काटेकोर वापर करून अत्यंत कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात सौदे करून त्यांनी 10000 डॉलर्सचे 20 लाख डॉलर्समध्ये रूपांतर केवळ अठरा महिन्यात केले. या कालावधीत बाजारात तेजी होती तरीही मानक निर्देशांकाच्या तुलनेत त्यांना मिळालेले यश भव्यदिव्य होते. त्यांच्या “How I Made $2,000,000 in the Stock Market” या पुस्तकात याचा सर्व तपशील दिला आहे.
■दारवास बॉक्स थिअरीची मुख्य तत्त्वे:
◆जास्त वाढ असलेल्या शेअर्सची ओळख:
दारवास चांगल्या मूलभूत तत्त्वांवर आणि सकारात्मक बाजारभावनेवर भर देणाऱ्या स्टॉक्सवर लक्ष केंद्रित करत. स्टॉक ओळखण्यासाठी त्यांनी बातम्या आणि किंमत-उलाढाल आणि कंपनीच्या मूलभूत विश्लेषणाचा वापर केला.
◆चौकोन (Box) तयार करणे: "बॉक्स" म्हणजे स्टॉकच्या त्या किंमत श्रेणीभोवती आखलेले चौकट, जिथे तो एका चढाईनंतर वरील भावपातळत स्थिर राहतो. वरची सीमा म्हणजे स्टॉकची आजवरची सर्वोच्च किंमत आणि खालची सीमा म्हणजे अलीकडील किमान किंमत.
◆ब्रेकआउट स्ट्रॅटेजी: जेव्हा शेअर्सची किंमत चौकोनाची वरची सीमेला ओलांडते आणि उच्च उलाढालीसह वर जाते, तेव्हा खरेदीचा इशारा मिळतो. त्याला ब्रेकआउट म्हणजेच नवीन वरील पातळीकडे जाण्याची सुरुवात असे समजण्यात येते.
◆स्टॉप-लॉस शिस्त: जर शेअर्सची किंमत चौकोनाच्या खालच्या सीमेखाली गेली, तर नुकसान कमी करण्यासाठी पोजिशन सोडली जाते म्हणजेच विक्री केली जाते.
◆गतीवर आधारित व्यापार (Momentum Trading): कमजोर स्टॉक्सऐवजी चांगली गती असलेल्या स्टॉक्सवर लक्ष केंद्रित केले जाते.
◆भावनिक निर्णयांचा अभाव: पद्धतीत या व्यापार निर्णय घेण्यासाठी वस्तुनिष्ठ निकषांचा वापर केला जातो, जेणेकरून भावनिक चुका टाळता येतात.
■दारवास बॉक्स थिअरीचे उपयोग:
◆गती व्यापार: वेगाने वाढणाऱ्या शेअर्समधील वाढीचा फायदा घेण्यासाठी उपयुक्त.
◆निश्चित निर्णय दृष्टिकोन: कोणत्या भावाने शेअर्स खरेदी करायचे आणि काय भाव आल्यावर विक्री करायची याचे स्पष्ट मार्गदर्शन मिळते.
◆जोखमीचे व्यवस्थापन: स्टॉप-लॉस वापरून नुकसान कमी करण्यास मदत करते.
◆सोपेपणा: सोपी आणि सहज समजणारी पद्धत.
◆उपयुक्तता: केवळ शेअर्सच नव्हे तर कमॉडिटी आणि फॉरेक्स यांसारख्या विविध बाजारांमध्ये वापरली जाऊ शकते.
■दारवास बॉक्स थिअरीच्या मर्यादा:
◆बाजार स्थिती: ही पद्धत बाजार तेजीत चांगली काम करते; परंतु एकाच पातळीत रेंगाळणाऱ्या बाजारात किंवा मंदीची स्थिती दाखवीत असेल तर चुकीचे संकेत मिळू शकतात.
◆उशीराचे सिग्नल: चौकोन तयार करण्यासाठी मागील माहितीचा आधार असल्याने बाजारात प्रवेश आणि निर्गमन थोड्या उशिरा होऊ शकते. बाजार सातत्याने बदलत असल्याने मिळालेला संकेत वापरतो त्या क्षणी स्थितीत कदाचित बदल घडला असल्याची शक्यता असते.
◆उलढालीवर अवलंबित्व: ही पद्धत उलढालीतील वाढीवर अवलंबून आहे, जे कमी उलाढाल वाढ असलेल्या बाजारात अचूक असू शकत नाही.
◆चौकोन तयार करण्यात असलेला विषयानुसारपणा: वेगवेगळ्या व्यक्तींद्वारे त्यांच्या आकालनक्षमतेनुसार चौकोनांच्या सीमांची मर्यादा वेगवेगळी होऊ शकते.
◆मर्यादित मूलभूत विश्लेषण: या पद्धतीत किंमत आणि उलाढाल यावर विशेष भर दिला जातो, परंतु सखोल मूलभूत विश्लेषणावर तेवढा भर दिला जात नाही.
◆शॉर्ट-टर्म ट्रेडिंगसाठी ही पद्धत योग्य नाही:
ही पद्धत मध्यम ते दीर्घकालीन ट्रेडिंगसाठी तयार केलेली आहे आणि इंट्राडे ट्रेडिंगसाठी ती तेवढी कार्यक्षम नाही.
■दारवास बॉक्स थिअरीची तत्वे आणि मर्यादा समजून घेतल्यास, ट्रेडर्स त्यांच्या व्यापार धोरणामध्ये ही पद्धत कशी वापरायची हे ठरवू शकतात. जेव्हा आजच्या इतके प्रगत तांत्रिक चार्टिंग अशक्य असताना दारवासने आपली रणनीती लागू केली. दारवास वापरलेली समान तत्त्वे आता तांत्रिक चार्टिंगसह लागू केली जाऊ शकतात. त्यामुळे आजही अनेक ट्रेडर्स झटपट नफा मिळवण्यासाठी या पद्धतीचा वापर करतात तथापि आर्थिक तज्ञांच्या मते ही रणनीती मंदीच्या कालखंडात वापरल्यास मोठे नुकसान होऊ शकते असे असले तरी वेगवेगळे गुंतवणूकदार त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या कालावधीच्या चार्टवर याचा वापर करतात. त्यामुळे निर्णयक्षमतेवर पडणार भावनिक प्रभाव कमी होतो. उच्च वेगाने वाढणारे शेअर्सचा शोध या पद्धतीने घेता येतो. फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये ही पद्धत समर्थपणे वापरता येते असे त्यातील अनेक जाणकारांचे मत आहे. या रणनीतीस सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक (RSI), बदलती सरासरी (MA), उलाढाल आणि निर्देशांकाची जोड देऊन अधिक प्रभावीपणे वापरता येणे शक्य आहे.
■दारवास बॉक्स सिद्धांत आपल्याला काही गोष्टींची सातत्याने जाणीव करून देत राहील. त्या अशा-
●शेअरबाजारात रोज याल तर नुकसान करून घ्याल कमीत कमी वेळा याल भरपूर नफा मिळवाल.
●संधी असेल तेव्हा व्यवहार केल्यानेच परतावा मिळेल. जेव्हा व्यवहार यशस्वी होईल तेव्हा गुंतवणूक वाढवा.
●आपला तोटा मर्यादित ठेवण्यासाठी स्टॉप लॉसचा वापर करा.
●मिळालेला नफा पुन्हा गुंतवणूक करायला वापरावा. पुढील नफा नियोजनाशी त्याचा वापर करता येईल.
●निष्कर्ष काढून मर्यादित गुंतवणूक करून यश मिळाल्यास त्यातील गुंतवणूक हळूहळू वाढवली पाहिजे. (Divide and Rule)
●चूक करणे मान्य आहे परंतु तीच चूक पुन्हा करणे ही मोठी चूक आहे त्यामुळे चुकूनही तीच चूक पुन्हा करू नये.
●बाजारातील प्रत्येक बातमीचा मागोवा घेणे विश्लेषण करणे आणि त्यावर आधारित व्यापार करणे अशक्य आहे.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत. हा लेख कोणतीही गुंतवणूक शिफारस करीत नाही)
10 जानेवारी 2015 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम येथे पूर्वप्रकाशीत.
Friday, 3 January 2025
डाउ थिअरीची ओळख
डाउ थिअरीची ओळख
चार्ल्स एच डाउ यानी “डी जोन्स आर्थिक वृत्तसेवा” (WSJ) भागीदारीत सुरू केली. ते डाउ जोन्स अँड कंपनीचे सह-संस्थापक आणि डाउ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज (DJIA) चे निर्माता होते. कंपनीतील 27 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी लिहिलेल्या लेखांना नंतर “डाउ थिअरी” असे संबोधण्यात आले. ही एक वित्तीय संकल्पना आहे, जी जगासमोर आणण्याचे श्रेय “विल्यम्स पी हॅमिल्टन” याना जाते. त्यांनी उदाहरणांसह लेख संकलित केले. ते शेअर बाजाराच्या प्रवाहाचे विश्लेषण करण्यासाठी आणि बाजाराच्या प्रवाहाचा अंदाज घेण्यासाठी आजही उपयोगी आहेत. डाउ यांच्या स्मरणार्थ त्या संकल्पनेस डाउ थिअरी असे संबोधण्यात येते. जगभरात वापरली जाणारी सर्वांत जुनी आणि सर्वाधिक प्रचलित पद्धतींपैकी एक आहे. लोकप्रिय अशी कॅडलस्टिक पद्धत येण्यापूर्वीची ही पद्धती आहे. डाउ थिअरीचा मुख्य गाभा असा आहे की शेअर बाजार विशिष्ट प्रवाहाच्या (trends) अधीन असतो आणि या प्रवाहाची दिशा ओळखून गुंतवणूक निर्णय घेतले जाऊ शकतात. ही थिअरी काही महत्त्वाच्या गृहितकांवर आधारित आहे:
◆डाउ थिअरीची मुख्य गृहीतके:
1. बाजार प्रवाहाच्या मध्ये चालतो (Market Moves in Trends): डाउ थिअरीनुसार बाजार तीन प्रकारच्या प्रवाहांमध्ये चालतो.
●प्राथमिक प्रवाह (Primary Trend): दीर्घकालीन प्रवाह (काही महिन्यांपासून अनेक वर्षांपर्यंत) जो वरच्या दिशेने (बुल मार्केट) किंवा खालच्या दिशेने (बेअर मार्केट) असते. त्याला मेगा ट्रेंड असेही म्हणतात
●माध्यमिक प्रवाह (Secondary Trend): माध्यमिक प्रवाह (आठवड्यांपासून महिन्यांपर्यंत), जो सामान्यतः प्राथमिक प्रवाहाच्या विरुद्ध असते. तो मुख्य प्रवाहातील दुरुस्ती (करेक्शन) समजला जाते.
●त्रितीय प्रवाह (Tertiary Trend): अल्पकालीन चढ-उतार (30 दिवसाहून कमी कालावधीचे) जो प्राथमिक प्रवृत्तीवर फारसा परिणाम करत नाही. त्याला बाजारात गोंधळ (Noice) म्हणून संबोधले जाते.
2. प्राथमिक प्रवाहाचे तीन टप्पे (Three Phases of a Primary Trend):
●संचयन टप्पा (Accumulation Phase): जेव्हा जाणकार गुंतवणूकदार संभाव्य बदलांचा अंदाज घेत खरेदी किंवा विक्री करतात. या टप्प्यात व्यापार कमी प्रमाणात होतो आणि संशयास्पद वर्तन दिसते.
●सार्वजनिक सहभाग टप्पा (Public Participation Phase): जेव्हा प्रवाह स्पष्ट होतो, तेव्हा अधिकाधिक गुंतवणूकदार प्रवाहात सामील होतात. या टप्प्यात बाजार स्पष्टपणे वर किंवा खाली जातो.
●वितरण टप्पा (Distribution Phase): जेव्हा पुढे जाणाऱ्या प्रवाहाची गती कमी होते आणि जाणकार गुंतवणूकदार विक्री सुरू करतात.मात्र सामान्य गुंतवणूकदार अजूनही खरेदी करत असतो, त्याला उलट्या प्रवाहाची जाणीव नसते. बाजार कमी कमी होत असताना गुंतवणूकदारांचे वर्तन त्याहून वेगळे दिसून येते.
3. औद्योगिक आणि वाहतूक निर्देशांकांची पुष्टी (Averages Must Confirm Each Other): डाउ यांच्या मते, औद्योगिक आणि वाहतूक निर्देशांकाने (उदा. DJIA आणि Dow Jones Transportation Average) एकमेकांची पुष्टी करायला हवी. जर औद्योगिक शेअर्स आणि वाहतूक शेअर्स दोन्ही वाढत असतील तर ही खरीखुरी वाढ आहे, असे मानले जाते. अन्यथा, ती कमकुवत असू शकते.
4. व्यापाराची संख्या प्रवृत्तीला पुष्टी करते (Volume Confirms the Trend): डाउ यांच्या मते, व्यापाराची संख्या (volume) प्रवाहाला पुष्टी करायला हवी. वाढत्या प्रवाहामध्ये (uptrend) किंमत वाढताना व्यापार वाढायला हवा. कमी होणाऱ्या प्रवाहामध्ये (downtrend) किंमत घसरताना व्यापार वाढायला हवा.
5. प्रवृत्ती स्पष्ट उलट्या संकेतांपर्यंत टिकून राहतात (Trends Persist Until Clear Reversal Signals): डाउ थिअरीचे सर्वात प्रसिद्ध तत्त्व म्हणजे प्रवृत्ती उलट्या संकेतांपर्यंत कायम राहते. एकदा प्रवाह स्थिर झाली की, तो उलटण्याचे स्पष्ट संकेत मिळेपर्यंत त्याचे अनुसरण करणे अधिक फायदेशीर असते.
6.किंमत सुधारणा आणि प्रवास: किंमती खूप आधी दुरुस्त होऊ लागतात आणि इतर मूलभूत घटकांपेक्षा आधी मोठा प्रवास सुरु करतात. प्राथमिक मेगाट्रेंडच्या दिशेने उच्चांकी किंमत (Higher high) हा पुढील चढाईचा संकेत आहे.
7. मूलभूत मर्यादा आणि चार्टवरील प्रतिबिंब: बाजारातील मूलभूत मर्यादा चार्टवर प्रतिबिंबित होऊ शकतात, बाजार भविष्यातील उत्पन्न आणि चक्राकडे लक्ष देतो.
◆डाउ थिअरीचा शेअर बाजारातील वापर-
1. बाजार प्रवाह ओळखणे (Identifying Market Trends): गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स बाजाराच्या दिशा (बुलिश किंवा बेअरिश) ओळखण्यासाठी डाउ थिअरीचा वापर करतात. प्राथमिक प्रवाह ओळखून, ते खरेदी (buy) किंवा विक्री (sell) याबाबत निर्णय घेतात.
2. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ निवडणे (Timing Entries and Exits): डाउ थिअरी गुंतवणूकदारांना आणि ट्रेडर्सना बाजारात प्रवेश (entry) किंवा बाजारातून बाहेर पडण्याचा (exit) निर्णय घेण्यास मदत करते. उदाहरणार्थ, बुल मार्केटच्या संचयन टप्प्यात खरेदी करणे किंवा बेअर मार्केटच्या वितरण टप्प्यात विक्री करणे. बाजाराची अल्पकालीन दिशा ओळखून व्यापार करणे इ
3. प्रवृत्तीची पुष्टी (Confirming Market Trends): गुंतवणूकदार विविध निर्देशांकांची तुलना करून प्रवाहाची पुष्टी करतात. उदा. DJIA वाढत असेल, पण Dow Jones Transportation Average वाढत नसेल, तर त्यातून तेजीचा प्रवाह मजबूत नसल्याचे सूचित होऊ शकते.
4. जोखीम व्यवस्थापन (Risk Management): प्रवाह विश्लेषणाच्या आधारे डाउ थिअरी गुंतवणूकदारांना जोखीम व्यवस्थापित करण्यात मदत करते. बाजार घसरणीच्या प्रवृत्तीत असेल तर शेअर गुंतवणूक कमी करून ते संरक्षणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतात.
5. व्यापार संख्येचे विश्लेषण (Volume Analysis): किंमतीतील हालचालींसह व्यापाराचे विश्लेषण करून, गुंतवणूकदार प्रवाहाची ताकद ओळखू शकतात.
◆डाऊ थिअरीच्या मर्यादा (Limitations of Dow Theory)
1. मागील डेटा आधारित संकेत (Lagging Indicator): डाउ थिअरी प्रवाह ओळखते तेव्हा तो आधीच सुरू झालेला असततो, त्यामुळे बराचसा फायदा कदाचित गमावला जाऊ शकतो.
2. तंतोतंत खरेदी-विक्री संकेत नाहीत (No Specific Buy/Sell Signals): डाउ थिअरीद्वारे विशिष्ट खरेदी किंवा विक्रीच्या वेळेचा अंदाज दिला जात नाही.
3. आधुनिक बाजाराचे गुंतागुंतीचे स्वरूप (Modern Market Complexity): सध्याच्या जागतिक घडामोडी, धोरणे, गुंतवणूकदारांच्या बदलत्या अपेक्षा इत्यादी कारणांमुळे डाउ थिअरी पूर्णतः लागू होऊ शकत नाही.
4. वैयक्तिक व्याख्या (Subjectivity): ट्रेंड्स आणि टप्पे ओळखणे काहीवेळा व्यक्तिनिष्ठ ठरते. व्यक्तीच्या मनात असलेले पूर्वग्रह त्याच्या निर्णय क्षमतेवर प्रभाव पडत असतात.
◆निष्कर्ष-
डाउ थिअरी ही तांत्रिक विश्लेषणातील एक जुनी मूलभूत संकल्पना आहे. बाजार प्रवाह, व्यापार आणि निर्देशांक पुष्टी यावर आधारित विश्लेषणाद्वारे गुंतवणूकदारांना बाजाराच्या संभाव्य दिशेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती त्यातून निश्चित मिळू शकते. मात्र सध्याच्या काळात ही थिअरी इतर पूरक साधनांबरोबर वापरणे अधिक फायदेशीर ठरते.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सलोखा मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 3 जानेवारी 2025 रोजी पूर्वप्रकाशीत
Friday, 27 December 2024
नव्या कॅलेंडर वर्षातील महत्वाच्या तारखा सन 2025
#नव्या_कॅलेंडर_वर्षातील_महत्वाच्या_तारखा(सन 2025)
1 जानेवारी 2025 ला नवे कॅलेंडर वर्ष सुरू होईल. सध्या चालू असलेल्या वर्षात कदाचित काही आर्थिक चुका अनवधानाने आपण केल्या असतील. आर्थिक चूक म्हणजे पर्यायाने आपले आर्थिक नुकसानच. आपण मागे केलेल्या चुका हा इतिहास झाला. त्यांची पुनरावृत्ती आपण या वर्षात करणार नाही असा संकल्प करूया. या वर्षातील काही लक्ष ठेवण्यासारख्या तारखा किंवा कालावधी खालीलप्रमाणे- आपल्याला सहज हाताशी येईल अशा ठिकाणी ही माहिती जपून ठेवा. यात एखादी अंतिम तारीख दिली असली तरी त्यासंबंधित गोष्टीची पूर्तता मुदतीपूर्वीच करावी म्हणजे गोंधळ उडणार नाही, दंड पडणार नाही, आपले आर्थिक नुकसान होणार नाही.
◆31 जानेवारी 2025 /15 फेब्रुवारी 2025/28 फेब्रुवारी 2025
★आर्थिक वर्ष 2024-2025 येत्या काही दिवसात संपेल. हीच वेळ आहे आपल्या अंदाजित उत्पन्नचा आढावा घेऊन पुरेशी गुंतवणूक करण्याची. आपण कर मोजण्याची जुनी पद्धत स्वीकारली असेल तर काही गुंतवणूक /खर्च याची वजावट घेतल्याने आपला आयकर कमी होऊ शकतो पगार पत्रकाव्यतिरिक्त आपण काही गुंतवणूक/ खर्च केले असल्यास त्याची विहित नमुन्यात सूचना मालकास द्यावी लागते. आपल्या अस्थापनेकडून अशा सूचना देण्यासाठी वरील तीन पैकी कोणतीही अथवा एक वेगळीच अंतिम तारीख असू शकते. ती माहीती करून घेऊन आपली पगाराव्यतिरिक्त वैयक्तिक गुंतवणूक /खर्च केले असल्यास पुराव्यासह सदर तारखेच्या आत केल्यास सादर केल्यास त्याचा विचार करून अंतिम आयकर आकारणी होईल. हा फॉर्म आणि त्याचे पुरावे देण्यापूर्वी जर आपला कर अतिरिक्त कापला असल्यास समायोजित केला जाईल तरीही अतिरिक्त कर कापला असल्यास तो आपणास मालकाकडून परत मिळणार नाही तर विहित मुदतीत विवरणपत्र सादर करून आयकर खात्याकडून परत मिळवावा लागेल.
◆1 फेब्रुवारी 2025
★हा सन 2024-2025 चा अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस. या वर्षी नव्याने स्थापना झालेल्या सरकारने आपला पूर्ण अर्थसंकल्प 23 जून 2023 रोजी सादर केला. त्याचवेळी त्यांनी विद्यमान आयकर कायदा बदलून नवीन प्रत्यक्ष कर संहिता लागू केली जाईल असा संकल्प केला होता. त्यानुसार सदर नव्या कर धोरणाचा आराखडा सरकारने जाहीर केला असून त्यात प्रस्तावित केलेले बदल नवीन आर्थिक वर्षांपासून आमलात येतील, असे सांगण्यात येत आहे. त्यातील काही बदलांना मोठा विरोध होऊ शकेल. कदाचित काही सवलती अजून एक दोन वर्षे चालू राहतील हे समजून घेऊन कोणते अंतिम बदल होतात ते पाहून आपल्या गुंतवणूक धोरणात नव्या आर्थिक वर्षात बदल करावा लागेल.
◆15 मार्च 2025/ 31 मार्च 2025
★ज्या लोकांना चालू आर्थिक वर्षात अग्रीम कर (Advance Tax) भरावा लागतो त्यांनी 15 मार्च पर्यंत 100% आणि त्यानंतरच्या व्यवहारांवरील पूर्ण आयकर 31 मार्चपर्यंत भरणे अपेक्षित असून याप्रमाणे अग्रीम कर न भरल्यास 1% प्रतिमाह दंड होऊ शकतो. त्यामुळे अग्रीम कर भरणाऱ्या करदात्यांनी या तारखा लक्षात ठेवाव्यात.
◆31 मार्च 2025
★चालू आर्थिक वर्षात (सन 2023- 2025) आयकर सूट मिळावी म्हणून गुंतवणूक/खर्च करण्याचा हा शेवटचा दिवस. (80 C, 80 D, 80TTA यानुसार मिळणाऱ्या सवलती) या दिवशी गुंतवणूक किंवा खर्च करून तो आयकर विवरणपत्रात दाखवून कर सवलत मिळवता येईल. जुन्या पद्धतीने कर आकारणी मान्य असलेल्या लोकांना याचा अधिक फायदा होऊ शकतो.
★अनिवासी भारतीयांना विविध देशाशी असलेल्या करारानुसार ते रहात असलेल्या देशात कर बसत असल्यास त्या देशांशी असलेल्या दुहेरी कर आकारणी धोरणानुसार तेवढ्या कराची सूट भारतात मिळते अशी सूट मिळवण्यासाठी 10 F फॉर्म आयकर विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन भरावा लागतो, यासाठी पॅन आवश्यक आहे, त्याशिवाय ऑनलाइन फॉर्म प्रोसेस होऊ शकत नाही. ज्या अनिवासी भारतीयांकडे पॅन नाही अशा व्यक्ती करात सूट मिळवण्यासाठी फॉर्म ऑफलाईन पद्धतीने या तारखेपूर्वी भरू शकतील.
◆01 एप्रिल 2025
★नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात (सन 2025- 2026) नवीन वर्षात आपले उत्पन्न किती होईल, नवीन थेट करप्रणाली लागू लागू झाल्यास किती कर लागेल तो वाचवण्यासाठी काय काय तरतुदी आहेत याबाबत प्राथमिक विचार करू शकता. त्याप्रमाणे आपण मागील आर्थिक वर्षाचे म्हणजेच सन 2024-2025 चे आयकर विवरणपत्र भरू शकता त्यासाठी आवश्यक माहितीची जमावजमाव करायला सुरूवात करा म्हणजे शेवटच्या क्षणी होणारी दमछाक थांबेल. जिथे जिथे आपली मुळातून कर कपात होऊ नये असे वाटत असल्यास आवश्यक तेथे 15 G/H फॉर्म भरून द्यावेत म्हणजे कर कापला जाणार नाही.
◆15 जून 2024
★सन 2025-2026 या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाचा अंदाज करून 30% अग्रीम कराचा पहिला हप्ता भरण्याची अंतिम तारीख.
★मालकाकडून कर्मचाऱ्यांना त्यांचे मागील आर्थिक वर्षातील उत्पन्न आणि करकपात यांची सविस्तर माहिती देणारे फॉर्म 16 प्रकारातील प्रमाणपत्र देण्याची अंतिम तारीख. या मुदतीत प्रमाणपत्र मिळाल्यास योग्य मुदतीत विवरणपत्र आपणास भरता येईल.
◆31 जुलै 2025
★ज्या करदात्यांना आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण करावे लागत नाही त्यांना मागील आर्थिक वर्षाचे म्हणजेच सन 2024- 2025 चे आयकर विवरणपत्र दंडाशिवाय दाखल करण्याची अंतिम तारीख. ही तारीख मागील तीन वर्षांत बदलली नसल्याने योग्य मुदतीत विवरणपत्र दाखल करावे.
◆15 सप्टेंबर 2025
★सन 2025-2026 या आर्थिक वर्षासाठी अग्रीम कर भरण्याचा दुसरा हप्ता भरण्याची शेवटची तारीख. यात अंदाजित कराच्या पहिल्या हप्त्यासह 45% एकूण आयकर भरला जावा अशी अपेक्षा आहे.
◆30 सप्टेंबर 2025
★ज्या करदात्यांना आपल्या व्यवहारांचे लेखापरीक्षण करून घ्यावे लागते त्याच्यासाठी आयकर विवरणपत्र दंडाशिवाय दाखल करण्याची शेवटची तारीख. ही तारीख अनेकांचे लेखापरीक्षण पूर्ण होत नसल्याने वाढवली जाते पण भविष्यात ती वाढवली जाईलच याची खात्री देता येत नाही तेव्हा अशा सर्वच करदात्यांनी याच मुदतीत विवरणपत्र दाखल करावे.
◆30 नोव्हेंबर 2024
★पेन्शन अँथोरिटीस हयात असल्याचा दाखला देण्याची अंतिम तारीख. आता हा दाखला आपल्या जन्म ज्या महिन्यात झाला त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी दिला तरी चालतो. विहित मुदतीत हयातीचा दाखला न दिल्यास निवृत्तीवेतन स्थगित केले जाते. मोबाईल अँपवरून आता हयात असल्याचा दाखला देणे सुलभ झाले आहे.
◆15 डिसेंबर 2025
★सन 2025-2026 या आर्थिक वर्षासाठी अग्रीम कर तिसरा हप्ता भरण्याची अंतिम तारीख. या आर्थिक वर्षाच्या अपेक्षित कराच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यासह एकूण 60% कर भरावा अशी अपेक्षा आहे.
◆31 डिसेंबर 2025
★आर्थिक वर्ष 2024-2025 चे आयकर विवरणपत्र दंडासाहित भरण्याची शेवटची तारीख.
★31 जुलै 2025 अथवा 30 सप्टेंबर 2025 किंवा आयकर खात्याने दंडाशिवाय विवरणपत्र भरण्याच्या जाहीर केलेल्या तारखेपूर्वी किंवा तारखेनंतर विवरणपत्र दाखल केले असल्यास सुधारीत विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख. या मधील काळात विभागाकडून विवरणपत्र मंजूर झाले असले तरीही सुधारित विवरणपत्र दाखल करता येईल.
वरील तारखांबाबत काही शंका असल्यास जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. याशिवाय अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार किंवा आयकर खात्याने घेतलेल्या निर्णयांमुळे किरकोळ बदल होऊ शकतात, त्यांची पुरेशी पूर्वसूचना देण्यात येते.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 27 डिसेंबर 2024 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 20 December 2024
वैयक्तिक पूर्वग्रहांचा सिद्धांत
#वैयक्तिक_पूर्वग्रहांचा_सिद्धांत
भांडवल बाजारात मालमत्तांचे भाव आपल्याला वरखाली होताना दिसत असतात, त्याची अनेक ज्ञात अज्ञात कारणे असतात ज्यांची चर्चा आपण यापूर्वी केली आहे. मागणी आणि पुरवठा यांच्यातील संबंधातून बाजारभाव शोधला जात असला तरीही अंतिमतः तो कंपनीच्या कामगिरीवर कुठेतरी स्थिर होत असतो असा अनुभव आहे. तो स्थिर होण्यापूर्वी अनेकदा ज्या मूलभूत पद्धतीस अनुसरून शोधला जावा अपेक्षित आहे तसे न होता त्यावर काही वैयक्तिक पूर्वग्रहांचा प्रभाव पडतो. बाजारभाव हे एकतर तेजी किंवा मंदी दर्शवत असतात किंवा एका ठराविक भावपातळीत वरखाली होत असतात. भावात अशा हालचाली होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे अनेकदा सारखाच दिसणारा भाव हा अनेकांना जसा खरेदीस योग्य वाटतो त्याचप्रमाणे तो विक्रेत्यांना ही विकण्यासाठी योग्य वाटत असतो. असे वाटणाऱ्याची संख्या किती त्यावर भाग वर जाणार खाली येणार की त्याच पातळीत राहणार हे ठरत असते. यामध्ये गुंतवणूकदारांच्या सामूहिक भावनेचा मोठा प्रभाव पडत असतो. या भाव भावना नेमक्या कोणत्या असतील आणि त्यांचा काय प्रभाव पडेल तो पडत असताना कोणते पूर्वग्रह त्यामागे असतील. हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. गुंतवणूकदार हा बाजारात गुंतवणूक करताना त्या शेअरच्या वास्तविक मूल्याचा शोध घेऊन त्याच्या तुलनेत योग्य गुंतवणूकमूल्याच्या शोधात असतो. तेव्हा त्याने मूल्यांकन करताना जर तो काही पूर्वग्रह बाळगत असेल तर त्या पूर्वग्रहांची ही दखल घेणं गरजेचे आहे. “बाजारातील अस्थिरता ही गुंतवणूकदारांच्या बदलत्या मतांमुळे होते” असे सुप्रसिद्ध गुंतवणूकदार आणि तत्वज्ञ “जॉर्ज सोरोस” यांनी आपल्या “अल्केमी ऑफ फायनान्स” या पुस्तकातून “रिफ्लेक्सिव्हिटी थेअरी” ही संकल्पना स्पष्ट केली आहे. सन 1987 साली हे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्यातील थिअरीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. या थिअरीवमध्ये गुंतवणूकदारांच्या वर्तनाचा त्याच्या पूर्वग्रहाशी संबध जोडला असल्याने सोयीसाठी आपण त्यास “वैयक्तिक पूर्वग्रहांचा सिद्धांत” असे म्हणूया आणि थोडया विस्ताराने तो समजून घेऊयात. या सिद्धांतानुसार बाजारातील अस्थिरता गुंतवणूकदारांच्या बदलत्या मतांमुळे उद्भवते. वास्तविक घटनांपेक्षा त्यानी करून घेतलेल्या पूर्वग्रहांचा किंवा अपेक्षांचा त्यावर अधिक प्रभाव पडतो आणि तो प्रभाव भ्रमनिरास होईपर्यंत कायम टीकून राहतो.
या सिद्धांतातील महत्त्वाचे मुद्दे-
★प्रतिक्षिप्तता - आपल्याला दिसणारे बाजारमूल्य हे केवळ मूलभूत गोष्टींवर अवलंबून नसून त्यावर अनेक गृहीत धरलेल्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो त्यामुळे संदर्भ बदलतात बाजार सातत्याने वरखाली होत असतो. बदललेल्या किमती मूलभूत गोष्टींवर परिणाम करतात त्यामुळे अपेक्षा बदलतात त्याचा किंमतीवर परिणाम होतो हे चक्र सातत्याने चालू असते.
★एकतर्फी अंदाज - या गृहीत धरलेल्या गोष्टींमुळे अंदाज वरखाली होत असतात. अपेक्षा अधिक वाढतात, ज्या तथ्ये आणि मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या धारणा आणि किमती समतोल मूल्यांपासून बदलतात
★भ्रम आणि भ्रमनिरास - गुंतवणूकदारांच्या या अपेक्षा जसजश्या पूर्ण होतात तसे भाव वाढतात त्यामुळे अधिक अपेक्षा निर्माण होऊन काही काळ भ्रमनिरास होइपर्यंत ते चढेच राहतात आणि नंतर कोसळतात. बरोबर या विरुद्ध स्थिती भाव खाली येत असताना होत असते.
सन 2008 मध्ये अमेरिकेतील आर्थिक मंदी आणि त्यानंतर जगभरात आलेली मंदी हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्याआधी तेथील बँकांनी स्थावर मालमत्ता क्षेत्रातील वाढते मूल्य कायम वाढतच राहील अशी समजूत करून त्या क्षेत्रास मोठ्या प्रमाणात कर्ज दिले. त्यातून झटपट मिळणाऱ्या अवास्तव परताव्यामुळे अनेक गुंतवणूकदार त्याकडे आकर्षीत झाले त्यामुळे किमती अनियंत्रितरित्या वाढल्या, त्या नक्की का वाढल्या हे समजून न घेता प्रचंड प्रमाणात कर्जपुरवठा केला. यामुळे किंमती अधिक वाढून परवडण्या पलीकडे घेल्यावर हा किंमतवाढीचा फुगा फुटला आणि झपाट्याने भाव खाली येऊ लागले. त्यामुळे ऋणकोंना कर्जफेड करणे अशक्य झाले त्याचा परिणाम मोठमोठ्या बँकानी दिवाळखोरी जाहीर करावी लागली. त्यातून अमेरिकन अर्थव्यवस्थेत आर्थिक आपत्ती आणि विनाशकारी मंदी निर्माण झाली. त्याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत असल्याने जगभरात सर्वच अर्थव्यवस्थाना कमी अधिक प्रमाणात मंदीने ग्रासले.
हा सिद्धांत भांडवल बाजारात कसे काम करतो
★प्राथमिक किंमत हालचाल - प्राथमिक किंमत हालचाल बाजारच्या दिशेने होते परंतु अनेकदा एखाद्या बातमीच्या प्रभावानुसार ती त्याच्या वास्तविक समतोलमूल्याच्या पलीकडे ढकलली जाते. त्याचा परिणाम एकूण मालमत्ता मूल्यावर होतो.
★मालमत्तेची निर्मिती किंवा घट - कमाई लाभांश व्याजदर यांचा मालमत्तेवर प्रभाव पडतच असतो. अनुकूलता आणि आशावादी विचार यामुळे मागणी वाढल्याने मालमत्तेतील गुंतवणूकीत वाढ होते त्यामुळे किंमत वाढते त्यातून अधिक मालमत्ता निर्माण होते किंवा प्रतिकूल विचाराने भाव अधिकाधिक खाली जातात त्यामुळे मालमत्तेत अनपेक्षित घट होते.
★घटना आणि वर्तन - यामुळे मालमत्तेच्या भावात पडलेला फरक प्रत्येक टप्यावर अधिकाधिक मजबूत होतो आणि अधिक वरच्या अथवा अधिक खालच्या पातळीवर पोहोचलो.
या सिद्धांताचे भांडवल बाजारावर होणारे परिणाम-
★कार्यक्षम बाजार गृहितकास तडा - सर्व उपलब्ध माहिती, बाजार किमतीत प्रतिबिंबित करतो असे अर्थशास्त्राचे “कार्यक्षम बाजार- किंमत” संबंधित गृहीतक आहे. अनेक बातम्या त्यातून होणाऱ्या संभाव्य बऱ्यावाईट शक्यता या बाजाराने आधीच स्वीकारल्या आहेत असे मत अनेक तज्ञ चर्चा करताना व्यक्त करतात. हा सिद्धांत त्यांच्या आशा कल्पनेस छेद देतो.
★तेजी मंदीचे चक्र - मालमत्ता बाजार हा कायम तेजीत अथवा मंदीत नसून तो चक्राकार आहे प्रत्येक तेजीचा शेवट मंदीच्या सुरुवातीने आणि प्रत्येक मंदीचा शेवट तेजीने होत असतो. या प्रत्येक संक्रमण काळात भावावर पडणारा कमीअधिक प्रभाव हा मूलभूत विश्लेषणाच्या पलीकडे असतो.
★गुंतवणूक घोरणाचा पुनर्विचार - गुंतवणूकदारांना धोरण म्हणून हा सिद्धांत गुंतवणूक करण्यापूर्वी मूलभूत विश्लेषण बाजार कल विचारात घेण्याबरोबरच या सिद्धांताचा विचार करण्यास प्रवृत्त करतो.
थोडक्यात-
भांडवल बाजारातील गुंतवणूकदारांना
बाजारभाव, मूलभूत विश्लेषण आणि बाजारातील गुंतवणूकदारांची गृहीतके यांच्यातील गुंतागुंतीच्या संबंध अधिक सूक्ष्मपणे समजण्यासाठी हा सिद्धांत अत्यंत उपयोगी आहे. त्यादृष्टीने सुजाण गुंतवणूकदारांनी त्यांचा अभ्यास करून गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी काही गृहीत गोष्टींच्या शक्यतांचा त्या बरोबरीने अवश्य विचार करावा.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक असून हा लेख भांडवल बाजारात गुंतवणूक करण्याची शिफारस करीत नाही.)
अर्थसाक्षर डॉट कॉम वर 20 डिसेंबर 2024 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 13 December 2024
तुमची आर्थिक समृद्धी रोखणाऱ्या सवयी
#तुमची_आर्थिक_समृद्धी_रोखणाऱ्या_सवयी
प्रत्येक व्यक्ती निश्चित हेतूने गुंतवणूक करीत असते. या हेतूंमध्ये अनेकदा आपल्याला खरंखुरं आर्थिक स्वातंत्र्य मिळावं, खर्च करताना पैसे आपल्या मर्जीनुसार करता यावेत अशी त्यांची अपेक्षा असते. कोणतीही गुंतवणूक स्वतः न करता अनपेक्षितपणे काही जण श्रीमंत बनतात. त्यांच्याकडे केवळ भरपूर पैसे आहेत म्हणून आपण त्यांना श्रीमंत असे म्हणू शकतो, समृद्ध नव्हे. असलेले पैसे योग्य रीतीने गुंतवणूक करून वाढवता आले किंवा त्यात भर घालता आली नाही तरी निदान ते सांभाळता येईल एवढे किमान कौशल्य आपल्याकडे असेल तर आर्थिकदृष्ट्या आपण खरोखरच समृद्ध झालो असे म्हणता येईल. हा मार्ग वाटतो सोपा नाही त्यात अनेक अडथळे आहेत. आपल्या अनेक आर्थिक सवयी या आपल्याला मध्यमवर्गातच ठेवतात अथवा त्याकडे ढकलतात, त्या कोणत्या त्यांचा थोडक्यात आढावा घेऊयात.
★कोणतेही निश्चित आर्थिक ध्येय नसणे - अनेक व्यक्ती अशा आहेत त्यांच्यापुढे कोणतेही आर्थिक ध्येय नसते त्यामुळे बचत किंवा त्यापुढे जाऊन गुंतवणूक करावी असे त्यांना वाटतच नसल्याने त्यांना समृद्धी सोडाच श्रीमंतही होता येत नाही. तेव्हा आर्थिक दृष्टीने समृद्ध होयचं असेल तर आपले उद्दिष्ट असणे आणि ते पूर्ण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
★स्वतःच्या आर्थिक उद्दिष्टाना प्राधान्य न देणे - काही व्यक्ती अशाही आहेत ज्यांच्याकडे निश्चित आर्थिक उद्दिष्ट आहे परंतु त्यांचा प्राधान्यक्रम गरजा आणि चैन यासाठी खर्च करण्याकडे आहे. त्यामुळे ते पुरेशी गुंतवणूक करू शकत नाहीत, आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकत नाहीत. फारच थोडे लोक उद्दिष्टांवर लक्ष ठेवून प्रथम बचत अथवा गुंतवणूक करतात. मिळालेल्या पैशाचे नियोजन करून गुंतवणूक केल्यास, राहिलेले पैसे परिस्थितीनुसार कसे खर्च कसे करायचे ते आपोआप समजत जाईल.
★अनावश्यक कर्ज घेणे - आर्थिक क्षेत्रातील स्पर्धेमुळे सध्या कुणालाही सहज कर्ज उपलब्ध होत आहे. त्यासाठी कोणतेही तारण ठेवावे लागत नसल्याने अनेकदा अनावश्यक कारणांसाठी कर्ज घेतले जाते. स्वतः ला राहण्यासाठी घर, उच्च शिक्षण, व्यवसायाची वृद्धी या साठी घेतलेले कर्ज हे आवश्यक कर्ज म्हणता येईल. घर आणि उच्च शिक्षण हे गरजेचे परंतु आता आवाक्यातील नसलेले त्यामुळे कर्ज घ्यावे लागणे अपरिहार्य आहे. व्यवसाय वृद्धीसाठी घेतलेल्या7 कर्जातून भविष्यात उलाढाल होईल वाढीव परतावा मिळू शकतो म्हणून ते कर्ज आवश्यक कर्ज समजावे. याउलट चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी घेतलेले कर्ज अनावश्यक म्हणता येईल. अनेकदा यासाठी हप्ता (EMI) किती पडेल हे सांगितले जाते. त्याकडे पाहून कर्ज खूप शुल्लख वाटू शकते. यासाठी व्याज द्यावे लागते वरचेवर सहज उपलब्ध असणारे कर्ज घेतल्यास “कर्ज फेडण्यासाठी नवे कर्ज” अशी परिस्थिती निर्माण होऊन तुमची वाटचाल दिवाळखोरीकडे सुरू होते.
★पुरेसा राखीव निधी नसणे - अचानक काही आर्थिक संकट आलं जसे मोठे आजारपण, अपघात, नोकरी जाणे अशा परिस्थितीत काही नियमित खर्च हे करावेच लागतात त्यांना पर्याय नसतो. स्वतःकडे 6 ते 12 महिने खर्चास पुरेल एवढा निधी असेल आणि तो सहज काढून घेता येत असेल तर तो उपयोगी पडतो नाहीतर अधिक व्याजदराने कर्ज घ्यावे लागते उधार उसनवारी करावी लागते. असा निधी निर्माण करून आपली आर्थिक स्थिती मजबूत राहते. कुणाकडे हात पसरावे लागत नाहीत.
★उत्पन्न खर्च मालमत्ता दायित्व किती ते माहिती नसणे - कोणतेही आर्थिक उद्दिष्ट नसलेल्या व्यक्तीना या गोष्टी माहिती नसतात
याचा वेळोवेळी आढावा घेऊन त्याप्रमाणे गुंतवणूक निर्णय घेण्याची सवय असल्यास त्यातील अनावश्यक गोष्टी टाळता येतात. आवश्यक तरतुदी / धोरणात्मक बदल करता येतात.
★आर्थिक नुकसान करणाऱ्या महाग सवयी - अपवादात्मक प्रसंगीच क्षम्य असलेल्या आणि अलीकडे सर्रास अंगवळणी पडलेल्या काही सवयी उदा. हॉटेलिंग करणे, तात्काळ कोट्यातून प्रवास तिकीट काढणे, शेवटच्या क्षणी सहलीस निघणे, आयत्या वेळी विमानाचे तिकीट काढणे, बाहेर खाणे, ब्रॅण्डेड वस्तूच खरेदीकरणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याऐवजी खाजगी वाहतुकीचा वापर करणे, सुजाण ग्राहक हा नेहमी जागृत असायाला हवा त्याने योग्य दर्जा आणि वाजवी किंमत (स्वस्त नव्हे) यांचा स्वतः नियमित शोध घ्यावा आणि नियोजन करावे अगदीच नाईलाज असेल तरच अन्य पर्याय आजमावेत.
★गुंतवणूक न करता त्यांच्या संधी शोधत बसणे - गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध असताना विशिष्ठ पर्यायाची वाट पाहण्यासाठी अनेकजण आपले पैसे तसेच बचत खात्यात ठेवतात त्यामुळे गुंतवणूक न होता नुकसानच होते फार काळ पैसे तसेच गुंतवणूक न करता ठेवण्याऐवजी आपल्याकडे एकच पर्याय नसून त्याचे अन्य पर्यायही माहिती असायला हवेत.
★कर आकारणी सवलती संबंधात माहिती नसणे - भांडवल बाजारशी संबंधित अनेक गुंतवणूक प्रकार आहेत त्यावर करसूट आणि सवलतीच्या एकसमान दराने कर आकारणी होते. अनेकांना हे माहिती नसल्याने ते आपली गुंतवणूक अन्य प्रकारात करून त्यावर कर देतात.
★प्राथमिक आर्थिक विषयांची कमी माहिती - आर्थिक संबंधात अशा अनेक प्राथमिक गोष्टी म्हणजे उद्दिष्ट, अंदाजपत्रक, देखभाल खर्च ज्या माहीत असतील तर योग्य पर्याय गुंतवणूकदार निवडू शकतात उदा. घर गाडी विकत घेणे याऐवजी भाड्याने घेणे. असलेले घर गाडी बदलून मोठे घर अलिशान गाडी घेण्याचे फायदे / तोटे हे माहीत असेल तर योग्य तोच खर्च केला जातो.
सहज सुचलेल्या या यादीत अनेक गोष्टींची अजूनही भर टाकता येईल. बऱ्याच जणांना त्या कंजूषपणा दर्शविणाऱ्या वाटतील. आवश्यक असेल तर त्या नक्की कराव्यात त्यासाठी मागेपुढे पाहू नये. हा समतोल साधत राहिल्यासच आपण सुजाण गुंतवणूकदार बनून आपल्या संपत्तीत भर घालू शकतो.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
Friday, 6 December 2024
सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन सन 2024-25
#सरते_आर्थिक_वर्ष_आणि_करनियोजन (सन2024-2025)
चालू आर्थिक वर्ष (सन2024-2025) आता संपत आले. हाहा म्हणता ते कधी संपेल ते कळणारही नाही. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेऊन करबचत करणे शक्य असून आज आपण त्यांना यावर्षात मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेऊयात, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी गोंधळ उडणार नाही. या वर्षीही सर्वाना आयकर मोजणीचे दोन पर्याय आहेत यातील नवीन पर्यायात अनेक सवलती वगळून 5% ते 30% अशी 6 टप्यात कर आकारणी होईल. या पर्यायात ₹ 75 हजार प्रमाणित वजावट आणि व्यवसाय कर अधिकतम रुपये दोन हजार पाचशेची सवलत मिळते. याशिवाय या दोन्ही करमोजणी पद्धतीत एनपीएसमध्ये कर्मचाऱ्यांची मालकाने भरलेल्या वर्गणी, जी पगार आणि महागाई भत्याच्या प्रमाणात सरकारी कर्मचाऱ्यांना 14% पण वर्षभरात जास्तीतजास्त सात लाख पन्नास हजार या मर्यादेत वेगळी वजावट (80/ CCD2) मिळेल. याशिवाय कर्तव्याचा भाग म्हणून मिळणाऱ्या काही भत्त्यांवर सूट आहे. जसे की प्रवास खर्च, टेलिफोन बिल, सवलतीत मिळणारे जेवण इ. याचा लाभ घेऊन या नवीन पर्यायात ज्यांचे करपात्र सात लाख रुपयांच्या आत आहे त्यांना जास्तीतजास्त 25 हजार रुपयांची करसवलत (87/ A) मिळते. त्यामुळे फारशी कोणतीही गुंतवणूक न करता हा पर्याय स्वीकारून फायदा होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण काही प्रमाणात वाढेल. यात निव्वळ पगार हेच ज्यांचे उत्पन्नाचे साधन आहे त्यांना सध्या दोन्ही पद्धतीपैकी कोणतीही पद्धत निवडण्याचा पर्याय आहे पण ज्यांना व्यवसायचेही उत्पन्न आहे अशा व्यक्तीनी नव्या पद्धतीने करमोजणी केल्यास कायम त्याच पद्धतीने करमोजणी करावी लागेल. पुढील आर्थिक वर्षांपासून कदाचित नवीन प्रत्यक्ष करप्रणालीने विद्यमान आयकर कायद्याची जागा घेतल्यास, सर्वांचा कर कायम नवीन पद्धतीने मोजला जाईल असा अंदाज आहे. यावर्षी तरी अशी सक्ती नसल्याने पगारदारांनी दोन्ही पद्धतीने कर मोजणी करावी आणि कोणती पद्धत किफायतशीर राहील ती स्वीकारता येईल ते विवरणपत्र भरण्यापूर्वी ठरवावे. यासाठी आवश्यकता असल्यास तज्ञांची मदत घ्यावी.
जुन्या पद्धतीने कर मोजणी करून आपणास कर किती लागू शकतो याचा अंदाज घ्या. उत्पन्न करपात्र असो अथवा नसो आपले सर्व मार्गांनी होणारे या कालखंडातील उत्पन्न यासाठी विचारात घ्यावे उदा पगार, घरभाडे, ठेवींवरील व्याज, पी पी एफ वरील व्याज, अल्प दीर्घ मुदतीचा नफा, लाभांश, शेअर पुनर्खरेदीची रक्कम, व्यवसाय असल्यास त्यातून मिळालेले उत्पन्न इ., अन्य कोणत्याही मार्गाने मिळालेले उत्पन्न याची बेरीज करून त्यातून करमुक्त उत्पन्न, कायदेशीर वजावटी इ. वजा करून सन 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी सर्व मार्गाने मिळणारे एकूण करपात्र उत्पन्न ₹ 2 लाख 50 ते 5 लाख रुपयांच्या आत असेल, तर आपणास कोणताही आयकर द्यावा लागत नाही. जर आपले वय 60 हून अधिक असेल, तर करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ₹ 3 लाख ते 5 लाखचे आत व आपण अतिवरिष्ठ नागरिक असाल म्हणजेच आपले वय 80 पेक्षा जास्त असेल, तर ही मर्यादा ₹ 5 लाख एवढी आहे. लक्षात घ्या उत्पन्नावर कर आहे खर्चावर नाही (त्यासाठी GST आहे.) हे उत्पन्न ₹ 5 लाख रुपयांच्या आत असेल तर कलम 87 /A नुसार जास्तीत जास्त ₹ 12500/- ची करसवलत मिळते त्यामुळेच 5 लाख रुपयांच्या पर्यंत करपात्र उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही त्याहून अधिक उत्पन्न असेल तर यातील ₹ 2.5 लाख ते 5 लाखापर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर 5% त्यावरील ₹10 लाख रुपयापर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर ₹ 12500 + 20% आणि त्यावरील करपात्र उत्पन्नावर ₹ 112500+ 30% या दराने आयकर लागतो. या एकूण करावर सरचार्ज म्हणून 4% दराने शिक्षण व उच्चशिक्षण कर द्यावा लागतो. ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹ 50 लाखांच्यावर परंतु 1कोटींच्या आत आहे, त्यांना करावर 10% आणि 1 कोटींहून अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना 15% अतिरिक्त सरचार्ज द्यावा लागतो. हा एकूण करदायित्वांवरील कर आहे (Tax on tax) 60 वर्षांखालील करदात्यांना ₹ 5 लाखावर उत्पन्न असेल 2.5 ते 5 लाख आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना ₹ 5 लाखावर उत्पन्न असल्यास 3 लाखावर असलेल्या उत्पन्नावर वरील दराने कर द्यावा लागून त्यांना 87/A नुसार मिळणारी सूट मिळणार नाही. याशिवाय पगारदार लोकांना सेक्शन 4/A नुसार ₹ 50000 ची प्रमाणित वजावट (Standard deduction) मिळेल. तसेच त्यांचा कापलेला अधिकतम व्यवसाय कर (₹2500) एकूण उत्पन्नातून वजा होईल.
आयकरासाठी ज्याप्रमाणे सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केला जातो त्याचप्रमाणे विविध बचत, गुंतवणूक आणि खर्च यांना विहित मर्यादेत सूट दिली जाते.
यातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे -
■ विविध बचत गुंतवणूक योजना व खर्चांना मिळणाऱ्या सवलती : यामध्ये विहित मर्यादेत जमा केलेली रक्कम एकत्रित उत्पन्नातून कमी होत असल्याने एकूण करदायित्व कमी होते. आयकर अधिनियम 80/C, 80/CCC, 80/CCD एकत्रित मिळून जास्तीत जास्त दीड लाख रुपये सूट मिळू शकते.
●80/C ची सवलत मिळणाऱ्या अनेक योजना व खर्च आहेत. कंसात योजनेवरील 1 ऑक्टोबर 2024 पासून मिळू शकणारे व्याजदर दिले आहेत. ते दर तिमाहीस बदलत असून 31 मार्च 2025 पर्यंत शक्यतो हेच व्याजदर राहण्याची शक्यता आहे. यामध्ये पी एफ वर्गणी 8.25 %,वी पी एफ 8.25,%,पी पी एफ (7.1%) मधील जमा केलेली रक्कम,एन एस सी (7.7%), एन एस सी व्याज, ५ वर्ष मुदतीच्या करबचत मुदत ठेवी (जास्तीत जास्त 7.5 ते 9.25%), वरिष्ठ नागरिक बचत योजना (8.2%),सुकन्या समृद्धी योजना (8.2%), विमा हप्ते, राहत्या घराचे गृहकर्ज मूद्दल, रजिस्ट्रेशन खर्च, दोन मुलांचा शैक्षणिक खर्च, करबचतीच्या समभाग संलग्न योजना यांमध्ये जमा/खर्च केलेली रक्कम यांचा समावेश होतो.
●80/CCC मध्ये विमा कंपन्या व म्युच्युअल फंडाच्या पेन्शन योजनांचा समावेश होतो.
●80/CCD मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्याच्या नवीन पेन्शन योजनेच्या वर्गणीचा समावेश होतो. यापैकी एक अथवा अनेक ठिकाणी जमा केलेली रक्कम जास्त होत असली, तरी एकूण सूट दीड लाख एवढीच मिळते.
●सन 2015 पासून 80/*CCD(1B) नुसार एन पी एस मध्ये जमा केलेल्या ₹50000 रुपयांवर अतिरिक्त सूट मिळते.
अशाप्रकारे एकूण जास्तीत जास्त दोन लाख रुपये एवढी वजावट मिळू शकते.
●सेक्शन 24 नुसार गृहकर्जावरील व्याज हे घरापासून झालेला तोटा समजून त्याची जास्तीत जास्त ₹ दोन लाख वाजवट मिळू शकते.
■आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि पुनर्वसन योजनांवर मिळणाऱ्या सवलती : यामध्ये आयकर कलम 80/D, 80/DD, 80/DDE, 80/DU यांचा सामावेश होतो.
●80/D नुसार स्वतःच्या, जोडीदाराच्या आणि दोन मुलांच्या आरोग्य विम्याच्या हप्त्यापोटी भरलेल्या रकमेवर ₹25000 जमाकर्ता जेष्ठ नागरिक असेल तर ₹ 50000 पर्यंत सूट मिळते. त्याचप्रमाणे जमाकर्त्यावर अवलंबित पालकांसाठी भरलेल्या हप्त्यावर त्यांच्या वयानुसार अतिरिक्त 25 ते 50 हजार रुपयांची सूट मिळते. ₹ 5000/- पर्यंत वर्षभरात केलेल्या वैद्यकीय तपासण्या या सुद्धा विमा हप्त्यासह त्या मर्यादेत धरल्या जातात. त्याची बिले आपल्याकडे असणे आवश्यक आहे. तेव्हा या कलमानुसार किमान ₹ 25 हजार ते कमाल 1 लाख रुपयांची सूट मिळू शकते.
●80/DD नुसार अवलंबित अपंग जोडीदार, मूल, पालक, भाऊ, बहीण यांचे वैद्यकीय उपचार, कल्याणकारी विमा योजनेचा भरलेला हप्ता यावर केलेला खर्च हा अपंगत्वाचे प्रमाणानुसार ₹ 75 हजार ते ₹ 1 लाख 25 हजार पर्यंत आहे असे गृहित धरून सूट घेता येते यासाठी खर्चाच्या पुराव्याची कोणतीही गरज नाही.
●80/DDB या कलमानुसार स्वतःसाठी, जोडीदारासाठी, मूल, अवलंबित भाऊ, बहीण, आई, वडील यांच्यावर काही विशिष्ट आजारावर केलेल्या खर्चाबद्द्ल वयानुसार ₹ 40 हजार ते 1 लाख रुपयांची सूट घेता येते.
●80/DU या कलमानुसार अपंग करदात्यास त्याच्या अपंगत्वाच्या प्रमाणानुसार त्याच्या उत्पन्नातून ₹ 75 हजार ते 1 लाख 25 हजारांची सूट मिळू शकते. त्याचप्रमाणे अनेक राज्यात अपंग करदात्यांना आणि त्यांच्या पालकांना व्यवसाय कर (Profesitional Tax) माफ करण्यात आला आहे.
■विविध कर्जावरील व्याजावर मिळणारी सूट : यामध्ये आयकर कलम 80/E, Section 24, 80 EEE यांचा समावेश होतो.
●80/E नुसार स्वतःसाठी, जोडीदारासाठी अथवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज कर्ज घेतल्यापासून ८ वर्षांपर्यंत कोणत्याही मर्यादेशिवाय सूट मिळण्यासाठी पात्र आहे.
●Section 24 नुसार गृहकर्जावरील व्याजाला जास्तीत जास्त 2 लाख रुपयांची व घरदुरुस्ती कर्जावर 30 हजार रुपयांची सूट मिळते.
●80 EEE नुसार परवडणारी घरे याच्या व्याख्येत येणाऱ्या घरच्या कर्जाच्या मूळ रकमेवर एकूण सूट मर्यादेपर्यंत (दीड लाख रुपये) सवलत मिळू शकते.
■विविध दान आणि मदतनिधीस मिळणारी सूट : यामध्ये कलम 80/G व 80/GGC यांचा समावेश होतो.
●80/G नुसार मान्यताप्राप्त संस्था, न्यास यांना दिलेल्या एकूण उत्पन्नाच्या 10% मर्यादेत 50 ते 100%सूट मिळते.
●80/GGC नुसार मान्यताप्राप्त राजकीय पक्षास दिलेल्या देणगीतून एकूण उत्पन्नाच्या मर्यादेत 50% पर्यंत सूट मिळते.
■इतर काही कलमानुसार मिळणाऱ्या सवलती : यामध्ये 80/GG, 80/TTA यांचा समावेश होतो.
●80/GG मध्ये काही अटींची पूर्तता केल्यास दरमहा 5 हजार रुपये एवढी घरभाड्याची वजावट मिळू शकते. मोठ्या शहरात घरभाडे अधिक असल्याने त्यासाठी वेगळी नियमावली आहे.
●80/TTA या कलमानुसार बचत खात्यातील रकमेवर मिळालेले 10 हजार रुपयावरील व्याज 60 वर्षाच्या आतील करदात्यांना करमुक्त आहे एकूण ₹40000 चे आत व्याज असेल तर मुळातून करकपात केली जाणार नाही.
●80/TTB नुसार वरिष्ठ व अतिवरिष्ठ नागरिकांस ₹ 50 हजार पर्यत बचत खाते आणि मुदत ठेव यावरील व्याज करमुक्त आहे. या मर्यादेत एकूण व्याज असल्यास मुळातून करकपात होत नाही. त्यांना 80/TTA ची सवलत मिळणार नाही.
या ठळक तरतुदींशिवाय -
यावर्षी नवनिर्वाचित सरकारने पूर्ण अंदाजपत्रक 23 जून रोजी सादर केल्याने काही करांचे दर त्या दिवसापर्यंत जुन्या दराने नंतर वाढीव दराने कर द्यावा लागेल
★शेअर खरेदीविक्रीतून काही अटींसह अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर मुळातून एस टी टी कापला असेल सवलतीच्या दराने 15%कर द्यावा लागेल. अर्थसंकल्पानंतर 20% या सवलतीचा दर असेल.
★ ₹ 1 लाख 25 हजारांहून अधिक दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर काही अटींसह 10% दराने अर्थसंकल्पानंतर 12.5% दराने कर द्यावा लागेल. 31 जानेवारी 2018 पर्यंत शेअरवरील दीर्घ मुदतीचा भांडवली नफा करमुक्त असल्याने हा नफा मोजताना या दिवसाची सर्वाधिक किंमत किंवा खरेदी किंमत यातील सर्वाधिक, ती सुयोग्य खरेदी किंमत म्हणून गृहीत घराण्याचा पर्याय करदात्यास आहे.
★भांडवल बाजारातील कंपन्यांनी आणि 65% हून अधिक समभाग असणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या योजनांनी दिलेला लाभांश आपल्या उत्पन्नात मिळवून त्यावर आपली करपात्रता निश्चित होईल.
★राहते घर अधिक एक घर भाड्याने दिले नसल्यास त्यावर कोणतेही उत्पन्न गृहीत धरून कर आकारणी होणार नाही याहून अधिक असलेले घर भाड्याने दिलेले असो अथवा नसो त्याचे अंदाजित अथवा वास्तविक भाड्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेचा कर वगळून मिळालेल्या भाड्यातून 30% प्रमाणित वजावट मिळेल (सेक्शन 24)
★पेन्शन योजना चालवणारे म्युच्युअल फंड व विमा कंपन्या यांनी देऊ केलेल्या निवृत्ती वेतनावर अन्य मार्गाने मिळालेले उत्पन्न समजून प्रमाणित वाजवट मिळणार नाही.
★EPFO कडून मृत सदस्यांच्या जोडीदास मिळणाऱ्या निवृत्ती वेतनातून 33.33% अधिकम ₹25 हजार प्रमाणित वजावट मिळेल.
★वेगवेगळ्या पायाभूत सुविधा पुरवणारे करमुक्त कर्जरोख्यावरील (Tax free infrastructure bonds) व्याज करमुक्त आहे.
★कंपनीने पुनर्खरेदी केलेल्या शेअरवरील मिळालेला भांडवली नफा करदात्यांच्या हातात 30 नोव्हेंबर पर्यंत पूर्णपणे करमुक्त आहे (10/34A) 1 ऑक्टोबर 2024 पासून पुनर्खरेदी रक्कम ही डिव्हिडंड समजून त्यानुसार करपात्र असेल तर शेअर खरेदीची रक्कम ही कालावधीनुसार अल्प/ दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा समजला जाईल.
★घरच्या विक्रीतून झालेल्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर महागाईवाढीचा लाभ 23 जून पूर्वी घेतलेल्या मालमत्तानाच मिळेल. यानंतर खरेदी केलेल्या मालमत्ताना हा लाभ मिळणार नाही.
या तरतुदींशिवाय इतर अनेक तरतुदींमुळे आपली करदेयता लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. वर फक्त सर्वसमावेशक तरतुदींचा विचार केला आहे. यातील प्रत्येक तरतुदीवर स्वतंत्रपणे तपशीलवार लेख लिहिता येऊ शकेल.
जुनी कररचना अनेक सवलती देऊन येणाऱ्या करपात्र उत्पन्नावर अधिक दराने कर आकारणी करते तर नवी कररचना सवलती कमीतकमी करून त्यावर कमी दराने कर आकारणी करते. याशिवाय नवीन कररचनेत काही वजावटी मिळतात ज्यांना आपले वेतन कोणत्या शीर्षकाखाली घ्यावे त्याचे स्वातंत्र्य मिळते त्यांनी त्यातील तरतुदींचा पुरेपूर लाभ घ्यावा. ज्या पद्धतीने कर कमी द्यावा लागेल ती पद्धती पूर्ण विचार करून स्वीकारावी.
या सर्व तरतुदी त्यातील अटींसह आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या पहाव्यात अथवा सनदी लेखपालासारख्या (CA) अथवा जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा.
©उदय पिंगळे
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत असून लेखातील मते वैयक्तीक असल्याची नोंद घ्यावी. कर विषयक कायद्यात सातत्याने सुधारणा होत असून त्यातील बदल समजून घेऊन वरील लेख लिहिला असून गुंतवणूकी संबंधात कोणतेही महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी त्याची खात्री करून घ्यावी)
Yahoo Mail: Search, organise, conquer
Subscribe to:
Posts (Atom)