Friday, 28 July 2017

पी नोटस .......


           पी नोटस (offshore derivative instrument)....

     विदेशी व्यक्ति आणि संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) यांना भारतीय भांडवलबाजारात काही अटींचे पालन करून गुंतवणुक करण्यास परवानगी आहे .सेबी (Securities and exchange board of India)या गुंतवणुक नियामकाकडे (Market Regulator) नोंदणी करणे ही यातील पाहिली महत्वाची सर्वात अट आहे . विदेशी व्यक्तिगत ग्राहकना  नोंदणीकृत संस्थापक गुंतवणूकदारांमार्फत सेबीकडे नोंदणी न करतादेखील येथील भांडवलबाजारात गुंतवणूक करण्याची परवानगी आहे ,ह्या प्रकारची गुंतवणूक ही  Participatory Notes या साधित कराराचे  (Derivatives  contract) माध्यमातून केली जाते या ऑफशोअर डेरिवेटीव इन्स्ट्रुमेन्टला  पी नोटस असे म्हणतात. अशा प्रकारच्या  अप्रत्यक्ष गुंतवणूकीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सर्वात धोकादायक गोष्ट अशी आहे की या माध्यमातून नक्की कोण ?आणि कशासाठी गुंतवणूक करीत आहे ?हे समजणे अवघड आहे . जेव्हा या माध्यमातून एखाद्या परदेशी व्यक्तीस येथे गुंतवणूक करायची असते तेव्हा त्याला येथील समभाग ,रोखे अथवा निर्देशांक दर्शवणारी पी नोटस  दिली जाते ,अपेक्षा अशी आहे की त्यात दर्शवलेले शेअर , रोखे , निर्देशांक पी नोटस  वितरित करणाऱ्या कंपनीकडे आहेत . यामधे होणारी वट घट दिवस अखेर अथवा नियमीत कलावधीने दिली / घेतली जाते .जेव्हा गुंतवणुकदारास पैसे हवे असतात तेव्हा त्यावेळच्या बाजार भावाप्रमाणे हिशोब पूर्ण केला जावून रक्कम दिली अथवा घेतली जाते .पी नोटस  मधील मोठ्या प्रमाणातील न वटवलेल्या व पुढे ओढल्या जाणाऱ्या गुंतवणूकीचे वाढते प्रमाण पाहून यातील तरतुदींचा गैरफायदा घेतला जात असावा आणि हवाला मार्गे येथून गेलेला पैसा पुन्हा भारतीय बाजारात गुंतवला जात असावा असा अंदाज आहे .यावर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने उपाय योजना सूचवल्या यावर विचार करून सेबीने काही निर्बंध विदेशी संस्थापक     गुंतवणूकदारांसाठी जारी केले असून त्याची अमलबजावणी 31डिसेंबर 2017 पर्यंत करायची आहे .यातील प्रमुख निर्बंध असे ---
1)नोंदणीकृत विदेशी  वित्तसंस्थाना ते ज्यांचे प्रतिनिधी म्हणून गुंतवणूक करतात त्यांची सेबीला ओळख पटवून द्यावी लागेल .थोडक्यात सर्व गुंतवणूकदारांचे KYC आवश्यक .
2)पी नोटस  द्वारे फक्त गुंतवणूक करता येईल. बचाव  (Hedging -नुकसान कमी करण्याची उपाययोजना )  करण्याव्यतिरिक्त सट्टाकरण्यासाठी(Speculation) पी नोटसचा वापर करता येणार नाही .समजा एखाद्या गुंतवणूकदराकडे 1000 रिलायन्सचे शेअर असतील आणि त्यास भाव खाली येवून नुकसान होईल असे वाटत असेल तर तो तेवढ्या शेअरचे फ्यूचर्स  विकु शकतो जर शेअरचे भाव खाली आले तर फ्यूचरचे भावही खाली येवून होणाऱ्या नफ्याने तोट्याची भरपाई होईल .
3)येथे केलेल्या सर्व व्यवहारांची पूर्तता प्रत्यक्ष ताबा घेवुन/देवून  पूर्ण करावी लागेल ,हे व्यवहार पुढे ओढता येणार नाहीत .शॉर्ट सेलिंग ही खरेदी पूर्ण करूनच  मिटवावे लागेल .यामुळे बाजारात स्थिरता येण्यास मदत होईल होईल .
4)सध्या ज्यानी आधीच समभाग विकले आहेत (short selling ) त्याना समभाग खरेदी करून अथवा आपल्या कडील समभाग देवून व्यवहारपूर्ती करावी लागेल . याशिवाय प्रत्येक गुंतवणूकदारामागे पी नोट व्यवहारासाठी 1000/-$ एवढी फी तीन वर्षासाठी आधीच घेतली जाईल.
5) नियमभंग करणाऱ्या विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदाराना दंड ,काही काळासाठी व्यवहारबंदी अथवा कायमस्वरुपी व्यवहारबंदी अशा प्रकारच्या एक अथवा अनेक शिक्षा होवू शकतात .
   सध्या बाजाराने उर्ध्व दिशा पकडली आहे .त्यामध्ये या सर्वांचा एकत्रित असा परिणाम भविष्यात काय होईल आणि त्यामुळे बाजारास नक्की कोणती दिशा मिळेल ते लवकरच कळेल !

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

आपल्या मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी शेअर करा म्हणजे अनेकांपर्यत ती माहिती एकाच वेळी पोहोचेल.

Friday, 21 July 2017

समभाग खरेदी विक्रीच्या सूचना देण्याचे विविध पर्याय आणि सवलती

       ......समभाग खरेदी विक्रीच्या सूचना(Sell/Purchase orders) देण्याचे विविध पर्याय आणि सवलती .......

   आपण समभागात (Shares) गुंतवणूक करणार आहोत .यासाठी आवश्यक असे बचत खाते (Saving A/C) समभाग खरेदी आणि विक्री करण्याचे खाते (Trading A/C) आणि हे सर्व ज्या खात्यात त्यांची साठवणुक आणि हाताळणी करण्यासाठी निक्षेपिकेकडील  (Dipositary) डी मॅट खाते डिपोसिटरी पर्टिसिपंटकडे (D P)आहे .याद्वारे आपण ऑनलाईन /ऑफलाईन व्यवहार करू शकतो .बरेच लोक आपले खरेदी विक्री करण्याच्या सूचना आपल्या मोबाईल किंवा कंप्यूटरवरून  देतात .हे व्यवहार सुलभ आणि जलद होण्यासाठी आधी दलालाचे सॉफ्टवेअर /App डाउनलोड करून घ्यावे लागते तर काही लोक हे व्यवहार दलालाच्या ऑफीसला किंवा त्यांचे उपदलालास फोन करून देतात . या दोन्ही मार्गाने केलेले व्यवहार हे ऑनलाईनच आहेत फक्त ते स्वतः च्या कंप्यूटर आणि मोबाइल मार्फत स्वतः न करता दलाल अथवा त्याचा प्रतिनिधी  करतो . या प्रत्येक व्यवहारांची तो पूर्ण झाला की नोंद होते आणि कामकाजाचे दोन दिवसांनी बाजाराच्या नियमानुसार हा व्यवहार पूरा होतो .शेअर बाजारात कोणतेही ऑफलाईन व्यवहार होत नाहीत .जेव्हा गुंतवणूकदार बाजारात न जाता काही रकमेच्या मोबदल्यात अथवा विनामोबदला समभाग हस्तांतरित करेल जसे , न्यायालयाच्या आदेशाने , वारसा हक्काने ,  इच्छापत्राने ,कंपनीने स्वतः चे शेअर खरेदीस दिलेल्या देकारास (Share Buyback) किंवा डिपोसिटरी पार्टिसिपंट बदलल्यावर होतील यासारखे व्यवहार तांत्रिकदृष्ट्या ऑफलाईन होवू शकतात . ही एक सोय असून एकंदरीत व्यवहारांच्या तुलनेत अशा व्यवहारांचे प्रमाण नगण्य आहे .
   बाजारात समभागाच्या खरेदी / विक्रीच्या सूचना देण्याच्या अनेक पद्धती आहेत . त्यानुसार आपणास ज्या प्रकारे खरेदी / विक्री करायची तशीच सूचना आपल्या दलालाला अथवा त्याच्या प्रतिनिधीस फोनवर अथवा ऑनलाईन द्यायला हवी .आपण जशी सूचना देवू  तशीच सूचना तंतोतंत अमलात आणली जाते . इतर कोणत्याही बाजाराप्रमाणे मागणी आणि पुरवठा यातील संबधानूसार म्हणजे मागणी अधिक पुरवठा कमी तर शेअरचा भाव वाढतो , मागणी कमी पुरवठा जास्त तर शेअरचा भाव कमी होतो .मागणी आणि पुरवठा हा अनेक गोष्टीवर अवलंबून असतो यात सर्वाधिक परिणाम हा राजकिय व आर्थिक घडामोडी , निवडणुकीचे निकाल , बंडाळी , लढाई ,भूकंप ,पूर ,संप , ताळेबंदी, व्यवस्थापनातील  बदल , अर्थसंकल्पातील बदल ,कंपनी संदर्भातील बातम्या अंदाज अफवा या सारख्या अनेक गोष्टी कारणीभूत असतात . सामान्यतः विक्री करणाऱ्याच्या अपेक्षीत भाव आलेला असतो वा भाव खाली आला त्यामुळे त्याचा अपेक्षाभंग झाल्याने विकायला तयार झालेला असतो किंवा याहून खाली भाव येईल अशी भीती त्याला वाटत असते .या सर्व परिस्थितीत आपल्याला जास्तीत जास्त भाव मिळवायचा तो प्रयत्न करतो तर खरेदिदारास भाव योग्य वाटतो ,तो वाढेल असे वाटत असते या परिस्थितीत आपल्याला हवे असलेले समभाग किमान किंमतीत मिळावेत अशी त्यांची अपेक्षा असते .हे जसे व्यक्तीचे ,तसेच बाजारात भाग घेणाऱ्या म्यूचुअल फंड ,स्वदेशी संस्थात्मक गुंतवणूक दार (DII),विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII)यांनाही वाटत असते .अशा प्रकारे व्यक्ति आणि समूह यांच्या एकत्रित मानसिकतेच्या परीणामाने समभागांचे भाव खालीवर होतात परंतु अंतिमतः कंपनीचे कामगिरीवर स्थिरावून वाढतात अथवा कमी होतात .आपण विक्री /खरेदीच्या करण्याच्या विविध पद्धती पाहू .यामध्ये फक्त Cash मार्केटचा विचार केला असून Derivetive मार्केट मधील सौदे  यापेक्षा थोडे वेगळे आहेत --
    Cash मार्केटमध्ये काही जण समभाग खरेदी करून त्याचा ताबा घेवून नंतर विक्री करतात .(Delivery Base Trading ) यामधे ते जेव्हा विक्री करतील त्या कालावधीवर ही विक्री अल्प अथवा दीर्घ मुदतीची समजली जाते .तर खरेदी /विक्री करून त्याच दिवशी पुन्हा उलट व्यवहार करून विक्री /खरेदी केली जाते आणि यामधून झालेला फायदा /नुकसान दिले /घेतले जाते .यास Day Trading असे म्हणतात . यामधे जर आपल्याकडे शेअर नसताना विक्री करून बाजार बंद होण्यापूर्वी खरेदी करून दिले तर अशा विक्रीला Short Selling  असे म्हणतात .
1)बाजारभावाप्रमाणे खरेदी विक्री (Market Rate) :येथे समभाग खरेदी विक्रीचा चालू दर काय आहे ते समजत असते . तो आपल्याला मान्य असल्यास आणि त्याप्रमाणे आपण ऑर्डर दिली तर ताबडतोब सौदा मान्य होऊन नोंदवला जातो . delivary base आणि day trading या पद्धतीने करता येते .
2)विशिष्ट भावाने खरेदी /विक्री (limit order)वरील दोन्ही पद्धतीत खरेदी विक्री करताना उपलब्ध भावापेक्षा वेगळा भाव आपणास अपेक्षित असेल तर विशिष्ट मर्यादेत आपणास आपल्या मर्जीप्रमाणे भाव मागणी करता येते जर बाजार चालू असताना तो भाव आला तर सौदा होतो आणि तो नोंदवला जातो .जर आपण मागणी टाकलेला भाव बाजार चालू आला नाही तर ती मागणी आपोआप रद्द होते .
   या दोन्ही पद्धतीत day trading करत असल्यास उलट मागणी करून सौदा पूरा होतो परंतू जर आपण उलट मागणी केली नाही तर बाजार बंद होण्याच्या 15/30 मिनिटे आधी आपोआप मागणी नोंदवली जाते व सौदा पूर्ण केला जातो .यापूर्वी जर delivary घ्यायची असेल तर मागणीत बदल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे .day trading करीत असताना शेअरच्या भावात होणाऱ्या फरकावर बारकाईने लक्ष ठेवावे लागते अशा वेळी मोठे नुकसान टाळण्यासाठी अथवा अपेक्षित फायदा मिळवण्यासाठी stop loss हा पर्याय वापरता येतो .यामधे आपली विरुध्द मागणी ठराविक भाव आल्यावर आपोआप नोंदवली जावून सौदा पूर्ण होतो .या ठराविक भावाच्या अलीकडील भावास ज्यास  Trigger price  असे म्हणतात तेथे भाव आल्यास आपोआप विरुध्द मागणी केली जाते
3)आज खरेदी उद्या विक्री (BTST Buy today sell tomorrow)-अनेक दलाल आपल्या ग्राहकांना ही सुविधा देत आहेत .delivary besis वर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी अनेक दलालांनी ही सुविधा देवू केली आहे .यामधे त्यांनी ठरवलेल्या यादीतील शेअरची विशिष्ट मर्यादेत ताबा न घेता दुसऱ्या दिवशी विक्री करता येते .असा व्यवहार करताना त्यासंदर्भात माहिती घेवूनच मागणी नोंदवावी .
  याप्रमुख खरेदी /विक्री करण्याच्या प्रकारशिवाय विविध फर्म फक्त त्यांच्या ग्राहकांना काही अटीवर अधिकच्या सोई उपलब्ध करून देतात .जसे शिल्लक रक्कम किंवा असलेल्या शेअरच्या बाजारमूल्यांचे पटीत काही अटीवर व्यवहार करू देण्याची परवानगी (exposure) मोठ्या प्रमाणातील एका वेळी टाकलेली ऑर्डर अंशतः जुळली असता शिल्लक ऑर्डर आपोआप रद्द होणे(Immediate Order Cancel),मार्केट बंद झाल्यावर पुढील दिवसाकरीता लिमिट ऑर्डर द्यायची असेल तर ब्रोकरकडे नोंदवू शकतो .अशा प्रकारे अनेकांनी नोदवलेली ऑर्डर बाजार चालू झाल्यावर एकत्रितरित्या दिली जाते ,तिला Batch Order असे म्हणतात . याशिवाय जर एखादी ऑर्डर GTDT (Good till date order)या पद्धतीने दिली तर ती पूर्ण होईपर्यंत पुढील 30 दिवस रोज टाकली जाते .अचानक पैशाची गरज लागल्यास Encash या पद्धतीने ऑर्डर टाकली असता स्टॉक एक्सचेंज कडून पैसे मिळण्याआधी ज्या दिवशी ऑर्डर मान्य झाली त्याच दिवशी पैसे आपल्या खात्यात जमा होतात .या सवलती आपले ट्रेडिंग खाते जेथे आहे त्यांनी दिलेल्या अधिकच्या सुविधा आहेत आणि सवलती त्याच असल्या तरी फर्मप्रमाणे त्यांना वेगवेगळी नावे दिली आहेत .एकदा आपण ऑर्डर दिली की ती पूर्ण होण्याच्या आत वाटल्यास दूरूस्त करता येते त्यास modified ऑर्डर असे म्हणतात मांत्र मान्य झालेला सौदा बदलता येत नाही .

©उदय पिंगळे


ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

आपल्या मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी शेअर करा म्हणजे अनेकांपर्यत ती माहिती एकाच वेळी पोहोचेल.

Friday, 14 July 2017

निक्षेपिका (Dipositary)

    निक्षेपिका (Depositary)


      निक्षेपिका (Dipositary) म्हणजे अशी संस्था जी आपली विविध गुंतवणुक कागदविरहित स्वरूपात (Electronic)साठवून ठेवते . असलेल्या कागदी प्रमाणपत्रांचे अमूर्त (Digital) स्वरूपात रुपांतर करून देते .आपल्या सुचनेप्रमाणे हस्तांतरण (Transfer)करते आपले सर्व हक्क लाभांश (Dividend),बोनस (Bonus), प्राधान्य भाग (Rights),भाग विभाजन (splits)ई सुरक्षित ठेवते काही कारणाने गरज पडली तर पुन्हा मूर्त (Physical) स्वरूपात प्रमाणपत्रे देण्याची व्यवस्था करते .यापूर्वी भांडवल बाजाराशी संबधित सर्व व्यवहार कागदी प्रमाणपत्रांच्या सहाय्याने होत असत .त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कागदपत्रांची हाताळणी करावी लागत असे यामुळे व्यवहारपूर्तीसाठी (Settlements ) जास्त वेळ लागत असे .शिवाय हे कागदपत्र सुरक्षित आणि साठवून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता पडत होती .यानंतर हस्तांतरण (Transfer) करण्यासाठी ही प्रमाणपत्रे संबधीत कंपनी अथवा त्यांचे हस्तांतरण प्रतिनिधी (Ragistar and Transfer Agent) यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज आणि मुद्रांकशुल्क (stamp duty) भरून पाठवावे लागत असे .यामधे किमान दोन महिन्याचा कालावधी जावून हस्तांतरण अमान्य झाल्यास ते नियमित करण्यास आणखी कालावधी जात होता .यामधे गुंतवणूकदाराची रक्कम अडकून बसत असे याशिवाय मनस्तापही होत असे .यामधे प्रमाणपत्र गहाळ होण्याचाही धोका होता.याशिवाय व्यवहार करताना तो विक्रियोग्य संचात 50/100 समभागाचे पटीत (Marketable liot ) करावा लागे त्यामुळे किमान तेवढी तरी रक्कम गुंतवावी लागत असे . आता निक्षेपिकेमुळे विक्रीयोग्य संच 1 वर आला आहे त्यामुळे अत्यल्प रक्कम टाकून गुंतवणूक करणे शक्य झाले आहे .
   निक्षेपिकेची व्यवस्था कशी असावी यासाठी Dipositary Act 1996 आहे .या कायद्यानुसार नोंदणी केलेल्या दोन Dipositary सध्या अस्तित्वात आहेत - नेशनल सेक्यूरिटी डिपोसिटरी  लिमिटेड (NDDL)आणि सेंट्रल डिपोसिटरी सर्विसेस लिमिटेड (CDSL) अशी त्यांची नावे आहेत.अनेक बँका , वित्त संस्था ,शेअर बाजार आणि वैयक्तीक गुंतवणुकदार यांचा त्यामधे भांडवली सहभाग आहे . कंपनीच्या दृष्टीने मालक (Registered Owner)म्हणून डिपोसिटरीची नोंद असते तर डिपोसिटरीकडे गुंतवणूकदाराची लाभार्थी मालक (Benificial Owner)म्हणून नोंद असते . हे लाभार्थी मालक खरेदी ,विक्री किंवा तारण या कारणांनी बदलत असतात . या हस्तांतरणास कोणतेही मुद्रांकशुल्क द्यावे लागत नाही . गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यास कोणत्याही एका डिपोसिटरी च्या डिपोसिटरी पार्टिसिपंट (DP)कडे किंवा दोन्हीकडे जावून एक अथवा अनेक खाती काढता येतात . डी पी हे dipositary आणि गुंतवणुकदार यांच्यातील मध्यस्ताचे काम करतात .बहुतेक बँक ,मोठ्या ब्रोकिंग फर्म ,एन बी एफ सी हे काम करतात .यासाठी पात्रता निकष पूर्ण करून सेबी कडे नोंदणी (Registration)करावी लागते .सध्या शेअर ,बॉन्ड , डिबेंचर,ई टी एफ , गोल्ड बॉन्ड ,म्यूचुअल फंडाचे यूनिट यापैकी शेअर आणि बॉन्डसाठी सक्तीने  तसेच नविन शेअर प्राथमिक (IPO/FPO/FOO) अथवा दुय्यम बाजारातून (Stock Market )घेण्यासाठी DP कडे एका व्यक्तीस किमान एक खाते असणे जरुरीचे आहे . तर डिबेंचर ,ई टी एफ ,गोल्ड बॉन्ड , म्यूचुअल फंड या साठी सक्ती नसली तरी सामान्य गुंतवणूकदाराचे दृष्टीने या सर्व
विविध प्रकारच्या गुंतवणूकी एकत्र
असणे कधीही सोईचे आहे . वस्तूबाजारातील (Commodity Market)वस्तूसाठी सध्या वेगळे खाते आवश्यक असल्याने जर त्यात गुंतवणुक करायची असेल तर अजून एका खात्याची गरज पडेल .
  गुंतवणूकीच्या विविध साधनांचे नियमन वेगवेगळया नियामकांकडून (Regulater)होत आहे  .ज्या वेगाने गुंतवणूक क्षेत्रात बदल झाले तो आता वेग कमी झाला आहे . त्यामुळे आपण आधी अपेक्षित ठेवलेल्या लक्षापासून अजून बरेच दूरच आहोत .विविध नियामकात समन्वयाचा आभाव असल्याने  सर्व प्रकारची गुंतवणूक याचप्रमाणे बचत योजना , आयुर्विमा , आरोग्यविमा आणि निवृत्तीवेतन योजना यासाठी केवळ एकच डिपोसिटरी  खाते तांत्रिकदृष्ट्या पुरेसे असले तरीही हे अजून साध्य झालेले नाही .
   आपण असे खाते उघडले तरी त्यात गुंतवणूक ठेवलीच पाहिजे असे बंधन नाही .याखात्याचे व्यवहार बँकेचे बचत खाते किवा सेफ डिपोसिट लॉकरच्या व्यवहाराप्रणाणे चालतात .यासाठी वारस म्हणून जास्तीत जास्त तीन जणांची नोंदणी करता येते .खाते उघडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून देवून फोटो, पॅन , आधार आणि वारसाचा सहीसह फोटो द्यावा लागतो . हल्ली सर्व बँका ,ब्रोकर यांनी एकमेकांशी सामंजस्य करार करून सेविंग , ट्रेडिंग आणि डि मॅट खाते एकत्रित (3 इन 1)देण्याची सोय केली असून गुंतवणूकदाराच्या सोईची अशी ही व्यवस्था आहे .या खात्यात केलेल्या प्रत्येक व्यवहाराचा संदेश आपणास पाठवला जातो तर खात्यात असलेली विविघ गुंतवणूक त्यांचे येणे जाणे आपणास वेळोवेळी नेटवरुन पाहता येते .वर्षातून किमान एकदा डी पी आणि  डिपोसिटरी यांचेकडून एक खातेऊतारा (Holdings and Tansaction Statement) गुंतवणूकदारास पाठवला जातो .खाते उघडणे,ते सांभाळणे , खात्यात जमा करून घेणे किंवा खात्यातुन गुंतवणूक वजा करणे त्यावर लीन मार्क करणे यासारखी कामे डी पी कडून केली जातात त्यासाठी आकार घेतला जातो तो प्रत्येक डी पी कडे वेगवेगळा असून आपली उलाढाल व्यवहारांची संख्या या सर्वांचा विचार करून खाते कोणाकडे काढावे या संबधी अंतिम निर्णय घ्यावा .येथे होणारे सर्व व्यवहार पारदर्शक असून ते 128 Bits नी Encrypted असल्याने पूर्णपणे सुरक्षित आहेत.

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.
                                     जास्तीत जास्त मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी आपल्या वॉलवर शेअर करा म्हणजे अनेकांपर्यत ही माहिती एकाच वेळी पोहोचेल.

Saturday, 8 July 2017

मुंबई शेअरबाजार Bombay Stock Exchange

     मुंबई शेअरबाजार (Bombay Stock Exchange)

  मुंबई शेअर बाजार हा आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार असून तो जगभरात BSE या नावाने प्रसिद्ध आहे .9 जुलै 1875 साली याची स्थापना झाली म्हणजेच 142 वर्ष जुना असाहा समभाग बाजार आहे.प्रेमचंद रॉयचंद या 19 व्या शतकातील उद्योजकांने प्रथम कपडाउद्योग नंतर सोनेउद्योगात नाव कमवून या बाजाराचे महत्व जाणले आणि नेटिव्ह शेअर अँड शेअर ब्रोकर असोसियेशन ही संस्था स्थापन केली जी पुढे मुंबई शेअर बाजार म्हणून नावारूपास आली .या पूर्वी सध्याच्या टाउन हॉल समोरील वडाच्या झाडाखाली 22 दलालांनी आशा प्रकारची व्यवस्था असण्याची गरज यासंबंधी विचार केला होता .यावर अनेक चर्चा विचार विनिमय होऊन नियम आणि आचारसंहिता यास अंतिम रूप देण्यात आले .1874 चे आसपास वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर होवून सध्याच्या दलाल स्ट्रीट येथे व्यवहार करायचे ठरवले आणि त्यानंतरच ही संस्था 1875 ला अस्तित्वात येवून व्यवहार सुरू झाले . 1875 ते 1957 या कालावधीत येथे होणारे सर्व व्यवहार फक्त एकमेकांवरील  विश्वासावर होत होते .यावेळी अस्तित्वात असलेले नियम आणि संकेत हे पुढे स्थापना झालेल्या 23 समभाग बाजारानी जसेच्या तसे स्वीकारले . 31 ऑगस्ट 1957 रोजी भारत सरकारने या बाजारास सिक्युरिटीज कॉन्ट्रक्ट ऍक्ट 1956 अन्वये मान्यता दिली .अशा तऱ्हेने भारतातील पहिला मान्यताप्राप्त शेअर बाजार अस्तित्वात आला .
   लोकांनी रुचि दाखवल्याने , बाजारातील उलाढाल प्रत्यक्ष कागदपत्रांचे सहाय्याने होत असल्याने , उलाढाल वाढू लागल्याने  देवघेवीसाठी जागा अपुरी पडू लागली त्यामुळे 1980 मध्ये सध्याच्या फिरोज जिजिभोय टॉवर मधून व्यवहारास सुरुवात झाली .1986 मधे बाजाराची दिशा दर्शविणारा BSE Sensex या निर्देशांकाची (lndex) निर्मिती करण्यात आली .बाजारातील महत्वाच्या 30 समभागांच्या बाजारभावाशी Sensex निगडीत आहे आणि त्यास जागतिक मान्यता आहे .या मधील काळात झालेल्या आर्थिक सुधारणा , उघडकीस आलेले आर्थिक गैरव्यवहार ,त्यामुळे सक्षम यंत्रणा निर्माण होण्याची झालेली गरज , सरकारी दडपण ,उपलब्ध पर्यायी व्यवस्था ,त्याचप्रमाणे परिस्थितीच्या रेट्यामुळे स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी वेळोवेळी काळानुरुप करावे लागलेले बदल यांचा एकत्रित परिणाम म्हणजे समभाग ,रोखे याशिवाय म्यूचुअल फंड ,ई टी एफ ,इडेक्स , गोल्ड बॉन्ड यांची खरेदी विक्री व्यतिरिक्त लहान कंपन्यांना sme चे माध्यमातून व्यवहार परवानगी , पुर्वीची बदला पद्दत रद्द करून वायद्याचे फ्यूचर ऑप्शन ,व्याजदर अदलाबदल ,भविष्यातील दर यांचे व्यवहार येथे सुरू झाले असून त्यात वेळोवेळी नवनवीन कल्पक व्यवहारांची भर पडत आहे .एक खाजगी संस्था ते व्यावसायिक कंपनी असे त्याचे परिवर्तन झाले आहे .येथील सर्व व्यवस्थापन व्यवसायिक संकेताचे पालन करून केले जाते .गुंतवणुकदाराना  व्यवहार जगाच्या कानाकोपऱ्यातून संगणकाचे माध्यमातून करता येत आहेत 6 मायक्रोसेकंद इतक्या कमी वेळात ते पूर्ण होतात ,ही जागतिक बाजारातील सर्वात जलद अशी विक्रमी वेळ आहे . निक्षेपिकेमुळे (dipostary) सर्व कागदी प्रमाणपत्र नाहीशी होवून मालकी हस्तांतरण सुलभ आणि जलद झाले आहे .cdsl या bse च्या उपकंपनीद्वारे डिपोसिटरी सेवा पुरवण्यात येते . कागदी प्रणालीतून कागद विरहित पद्दतीत टप्याटप्याने कोणताही गोंधळ न होता 50 दिवसात हे बदल bse मधे करण्यात आले .बँकिंग प्रणालीतील बदलामुळे पैशांची देवाण घेवाण त्वरित होवू शकते . यामुळे बाजारातील दैनिक उलाढाल प्रचंड वाढली आहे . नोंदणीकृत कंपन्यांचे बाबतीत हा बाजार प्रथम स्थानावर तर दैनंदिन उलाढालीचे बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे .जागतिक क्रमवारीत तेराव्या स्थानावर आहे .सध्या रोज 2800हून अधिक कंपन्याचे 15 लाखांपेक्षा जास्त सौदे होत असून दैनिक उलाढाल 20000 कोटी पेक्षा जास्त आहे .BSE हा बाजार धोका व्यवस्थापन , समाशोधन , व्यवहारपूर्ती , बाजराशी संबधित आकडेवारी , गुंतवणुक साक्षरता याबाबत सरस असून या गोष्टी संबंधी जागतिक पातळीवर दखल घेण्यात येवून वेळोवेळी त्यास सन्मानित करण्यात आले आहे .
   सध्याच्या शेअरबाजार संचालक मंडळात मुख्य कार्यकारी अधिकारीसह एकूण 10 संचालक असून त्यातील 5 हे लोकांचे तर 4 भागधारकांचे प्रतिनिधीत्व करतात .अलीकडेच ऑफर फॉर सेल या माध्यमातून 2रुपये दर्शनी मूल्य असलेले समभाग 806 रुपयांनी विकून 3 फेब्रुवारी 2017 पासून भागबाजारात नोंदणी झालेला भारतातील पहिला आणि एकमेव भागबाजार  आहे . इंडिया इंटरनेशनल एक्सचेंज India INS  या भारतातील पहिल्या आंतरराट्रीय भागबाजारची स्थापना करून 9 जानेवारी 2017पासून सुरुवात करण्यात bse चे महत्वाचे योगदान आहे .यामुळे जागतिक गुंतवणूकदार ,अनिवासी भारतीय यांना त्यांच्या सोइप्रमाणे जगभरातून कुठूनही आठवड्यातील सहा दिवस रोज 22तासाचे कालावधीत गुंतवणूक करण्याची सोय उपलब्ध झाली आहे .अश्या या वैशिठ्यपूर्ण बाजाराला त्याच्या 143 व्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !💐🎂🍫

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

आपल्या मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी शेअर करा म्हणजे अनेकांपर्यत ही माहिती एकाच वेळी पोहोचेल.

Friday, 7 July 2017

भागबाजार (stock exchage)

            __भागबाजार (Stock Exchange)__

     भागबाजार (stock exchange)हा भांडवलबाजाराचा महत्वाचा घटक असून तेथे समभाग (Shares) ,कर्जरोखे (Debentures) ,सरकारी /खासगी रोखे (Bonds) ,परस्पर निधी (Mutual fund units) , समभाग निधी (ETF) ,विविध देशांची विनिमय चलने (Forex) , वस्तू बाजारातील वस्तू (Commodity) जसे सोने ,चांदी ,खनिज तेल ई .यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात .भागबाजारतून कृषी /सेवा क्षेत्र /उद्योग /सरकार यांना मध्यम आणि दीर्घ मुदतिचे भांडवल उपलब्ध होते .अशाप्रकारे भांडवल उभारणी ही विविध नियमांचे पालन करून केवळ नोंदणीकृत कंपन्यांना करता येते .याचप्रमाणे या बाजारात उपलब्ध बहुविध गुंतवणूक पर्यायामुळे व्यक्ति , बँका ,विमा कंपन्या ,निवृती वेतन योजना राबवणाऱ्या कंपन्या , परकीय गुंतवणूकदार यांना अतिरिक्त रक्कम जोखिम पत्करून किफायतशीरपणे गुंतवण्याची संधी प्राप्त झाली आहे . यापैकी वस्तू बाजारातील वस्तूचे व्यवहार प्रामुख्याने मल्टि कमोडीटी एक्सचेंजवर तर  इतर सर्व व्यवहार प्रामुख्याने राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात होतात आणि ते कुठूनही करता येतात .या सर्व व्यवहारावर सेबी या स्वतंत्र नियामकाचे नियंत्रण आहे आणि हे व्यवहार विनातक्रार पार पाडण्यासाठी नियम करणे ,त्यात बदल करणे , त्याची अमल बजावणी करणे , लक्ष ठेवणे , नियमबाह्य वर्तन करणाऱ्याना शिक्षा करणे ,तक्रार निवारणाची यंत्रणा उभी करणे , गुंतवणूक दाराना प्रोत्साहित व शिक्षित करणे सेबीला करावे लागते .सरकारला मोठ्या प्रमाणात करप्राप्ती  आणि गुंतवणूकदाराना भागबाजाराच्या माध्यमातून रोकडसुलभता आणि लाभप्रदता यांचे विविध पर्याय प्राप्त होत आहेत .सरकारला तसेच खाजगीक्षेत्रातील उद्योग आणि सेवाक्षेत्र यांना कमी खर्चात मोठ्या प्रमाणात भांडवलाची उभारणी करता येत असून  यासाठी नियम करण्यात आले आहेत .बाजारात व्यवहार करण्यासाठी त्यांचे पालन करावे लागते .केवळ नोंदणीकृत कंपन्यांना येथे व्यवहार करता येतात .अधिकृत दलालांमार्फत हे व्यवहार करावे लागतात . बाजारांच्या कार्यपद्धतीत अलीकडील काळात महत्वपूर्ण सुधारणा झाल्या असून सर्व व्यवहार संगणकामार्फत (Computer) आणि निक्षेपस्थानातून (Depositry) होत असल्याने आणि त्यांची प्रतिपूर्ति राष्ट्रीय समाशोधान यंत्रणेच्या (National Clearing Corporation) च्या माध्यमातून होत असल्याने व्यवहार पूर्ण होण्याचा कालावधी खूप कमी झाला आहे .गुंतवणूकदाराना त्यांच्या गुंतवणूक करण्याच्या आणि जोखिम घेण्याच्या क्षमतेनूसार रोख (cash)त्याच दिवशी व्यवहार (intraday)किंवा सौदापुर्तीचे दिवशी व्यवहार (delivery ) ,आधी खरेदी नंतर विक्री (sell) ,आधी विक्री नंतर खरेदी (short sell ),हजर व्यवहार (spot),वायदे व्यवहार (forward ) , अदलाबदल व्यवहार (swap),भावी व्यवहार (futures),पर्याय व्यवहार (options) , इनव्हीट (investment trust ) यासारखे अनेक ,पर्याय उपलब्ध आहेत .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

आपल्या मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी शेअर करा म्हणजे अनेकांपर्यत ही माहिती एकाच वेळी पोहोचेल.


Friday, 30 June 2017

गुंतवणूकदारांचा मितवा .....😀

      गुंतवणूकदारांचा मितवा ...☺


     एक जागरूक आणि सजग गुंतवणूकदार म्हणून आपण विविध गुंतवणूक प्रकारात आपली बचत आणि गुंतवणुक विभागून ठेवायला हवी .तसेच वेळोवेळी त्याचा आढावा घेवून त्यात योग्य ते बदल करायला हवेत हे आपल्याला माहीत आहेच .प्रत्यक्षात असा मागोवा मोजकेच लोक घेत असतात .अश्या प्रकारे आपल्या गुंतवणूकीचे योग्य मूल्यांकन आणि मुल्यमापन moneycontrol या संकेतस्थळाला भेट देवून अथवा आपल्या मोबाईलवर या अॅपमुळे क्षणात करता येणे शक्य आहे . अनेक जणांनी हे App आपल्या मोबाइलवर घेतले आहे तर काहीजणांच्या मोबाईलमधे ते मुळातच आहे अनेकांनी ते आपल्या पी सी  ,लॅपटॉप मधेही ते घेतले आहे. परंतू बरेचसे लोक शेअरचे भाव आणि म्यूचुअल फंड योजनांचे निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV)एवढे पाहण्यापुरताच  याचा वापर करतात ,थोडीशी मेहनत घेवून जर आपल्या बचत आणि गुंतवणुकीच्या योजना यांची नोंद केली आणि त्यात बदलानुसार दुरुस्त्या केल्या तर याहून अधिक चांगल्या प्रकारे याचा वापर करता येणे शक्य आहे.अनेकांना यामधे काय काय आहे हेच मूळात माहीत नाही .त्या सर्व गोष्टींची आपण माहिती करून घेवूया .जांच्याकडे हे App नाही त्यानी Play Store वर जावून मोबाईलवर मोफत डाउनलोड करून घ्यावे .पी सी आणि लॅपटॉपसाठी moneycontrol.com या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि शॉर्टकट तयार करून तो डेस्कटॉप वर घ्यावा यानंतर आपली वैयक्तीक माहिती भरून लॉग इन आय डी आणि पासवर्ड तयार करून घ्यावा आणि लक्षात ठेवावा .हे करणे अतिशय सोपे असून जर जमले नाही तर कोणाची तरी मदत घ्यावी. आता आपल्याकडे हे App आहे आणि आपण त्याचे वापरकर्ते झालो आहाेत आणि त्याचा पूर्ण क्षमतेने वापर करणार आहोत .
   मोबाईलवर हे App उघडल्यावर  डाव्या बाजूस तीन आडव्या रेषा दिसतील या App ची ही    गुरुकिल्ली Enter असून त्यावर क्लिक केले असता एखादा खजिना मिळावा त्याप्रमाणे विविध शीर्षक असलेले अनेक आयकॉन दिसतील .
   १.Language हा डाव्या बाजूस सर्वात वर आयकॉन असून याची भाषा English दिसेल ,शेजारील Pencil ला क्लिक केले कि त्यात बदल होवून  इंग्रजी ,हिंदी , गुजराथी असे पर्याय दिसतील यातील आपणास हवा असलेला पर्याय घेऊन भाषा बदल करू  शकतो .आपण जोपर्यंत भाषेत बदल करीत नाही तोपर्यंत यात काही  बदल होणार नाही .
   २. याखाली Home असून त्यावर क्लिक केले तर आपण मागे म्हणजे जेथून सुरुवात केली तेथे Homepage वर जातो.येथे या appचा सारांश आहे या मधे उजव्या बाजूस एंटर ची खूण moneycontol चे बोधचिन्ह असून शेजारी काही Aapची जाहिरात लिंक आहे उजव्या बाजूस माणसाचे चिन्ह असून तेथे My portfolio ,My Watchlist ,My Forum ,Setting यांवर जाण्याचा जवळचा मार्ग (Short Cut) असून येथून बाहेर पडण्यासाठी Log out आहे .शेजारीच असलेल्या दुर्बिणीतून समभाग ,म्यूचुअल फंड ,कमोडीटी यांचे भाव पहाता येतात .याखाली एक धावती पट्टी असून या पट्टिवर Nifty ,Sensex किंवा आपल्या मर्जिनुसार ठेवलेल्या समभागांचे भाव पहाता येतात .या धावपट्टिखाली तीन महत्वाच्या बातम्याचे शीर्षक असून त्यावर क्लिक केले तर सविस्तर बातमी आपल्याला वाचता येते.त्याचेखाली सहा महत्वाचे निर्देशांक ,आपल्या गुंतवणूकीचे निव्वळ मूल्य ,अलिकडे पाहिलेल्या चार कंपन्याचे भाव ,बाजारावर परिणाम करणाऱ्या चार कंपन्यांचे भाव ,सोने ,खनिज तेल ,डॉलर आणि पौंड यांचे सध्याचे बाजारभाव दिसतात .
   ३.याखाली Market हा आयकॉन असून यावर क्लिक केले असता Indian Indices , Global Indices ,या शीर्षकांखाली विविध प्रकारचे , विविध शेअर बाजारांचे निर्देशांक पहावयास मिळतात . याचा मागील आणि चालू बंद भाव ,बाजार चालू असताना पडत असलेला फरक , त्या दिवसाचा आलेख , दिवसभरातील सर्वात कमी जास्त भावपातळी ,मागील ५२ आठवड्यांची भावपातळी ,१दिवस ते ३वर्ष या कालावधीतील उतारा , मागील ३० दिवस ते २०० दिवस दिवसांचा सरासरी भाव यातील एखादा  निर्देशांक क्लिक केला तर त्यात सामाविष्ट शेअर वरील सर्व माहीतीसह स्वतंत्रपणे पाहता येतो ही कंपनी कोणत्या प्रकारात येते तसेच या निर्देशांकात समाविष्ट विविध प्रकारच्या उद्योगांचा आलेख पहाता येतो.याशिवाय निर्देशांकातील कोणत्याही कंपनीवर क्लिक केले तर त्या कंपनीची सर्व माहिती निर्देशांकाच्या माहितीप्रमाणे मिळते याशिवाय जर ती कंपनी F&O मधे असेल त्याविषयी माहिती , त्याचप्रमाणे कंपनीच्या संदर्भातील बातम्या , गुंतवणूकदारानी व्यक्त केलेली मते , कंपनी विषयीचे अंदाज ,पाच सर्वोच्च खरेदीदार आणि विक्रेते यांनी नोदवलेले भाव व शेअरची संख्या ,बोर्ड मीटिंग , डीवीडेंड , बोनस ,समभाग विभागणी , राइट्स ,वार्षिक सर्वसाधारण सभा विशेष सभा ,तिमाही अहवाल , वार्षिक अहवाल ,जमाखर्च ,विविध प्रकारची आर्थिक गुणोत्तरे (Retios),स्पर्धक कंपन्या , समभाग धारकांचे वर्गिकरण , कंपनीचा पत्ता फोन इ मेल संकेतस्थळ संचालक यांच्या विषयी माहिती मिळते यातील Market Moovers मधे Sensex आणि Nifty यातील सर्वाधिक वाढ /घट दाखवणारे शेअर ,किंमत /उलाढाल यानुसार वर्गवारी केलेले शेअर ,52 आठवड्याचा भावाचा उच्चांक आणि निचांक दर्शवणारे शेअर आणि ज्या शेअर्सना फक्त खरेदीदार किंवा फक्त विक्रेते आहेत यांची यादी पहायला मिळते .याच भागात Currency Exchange  Rate , F&O Action ,IPO ,FII ,DII ,Mutual Fund यांनी केलेली खरेदी विक्री याविषयी सखोल माहिती मिळते आणि Broker Research मध्ये वेगवेगळे ब्रोकर आणि फंड हाउस यांनी सूचवलेले शेअर याविषयी माहिती मिळते .
   ४.याखाली News हा आयकॉन असून यामधे Top News , Market ,Stock ,Business , Managment Talk ,Mutual Fund ,Commodities , Economy ,Politics , lnternational ,SME , Technology ,Auto & lifestyle या शिर्षकाखाली विविध बातम्या वाचावयास मिळतात .
  ५.यानंतर Live TV हा आयकॉन असून यामधे CNBC चे  TV 18, Awaaz ,Bazaar ,Prime HD हे चॅनल पाहण्याची सोय असून Vidios on Demand मधे विविध विषयांचे विडिओ पहाण्याची सोय आहे .
   ६.याखाली My Stock हा महत्वाचा आयकॉन असून यामध्ये My Portfolio ,My Watchlist, Stock Last Visited हे उपप्रकार असून My Portfolio मधे आपली एकूण मालमत्ता , यामधे कालच्या तुलनेत झालेली वट घट यांची माहिती मिळते आपण शेअर ,म्यूचुअल फंड त्यांचे एस आई पी ,सोने चांदी ,फिक्स डिपोजिट ,एन एस सी ,पी पी एफ ,मालमत्ता या सारख्या गुंतवणूक व बचत यांच्या नोंदी ठेवण्याची सोय असून वेळोवेळी त्या अद्ययावत करण्याचा पर्याय आहे . त्याचप्रमाणे विविध   उधाऱ्या आणि कर्ज यांचीही नोंद ठेवता येते  तर My Watchlist मधे आपण लक्ष ठेवून असलेल्या शेअरचे भाव आणि त्या कंपनी विषयी सर्व माहिती पाहण्याची सोय असून Stock Last Visited मधे अलीकडे पाहिलेल्या कंपन्यांची माहिती आहे .
   ७.Forum यामधे आपण लक्ष ठेवून असलेल्या किंवा आपली गुंतवणूक असलेले शेअर ,फंड , कमोडिटी यावरील विविध लोकांच्या चर्चा ,मते ,सूचना असतात आपण यात सहभागी होऊ शकतो ,मत मांडू शकतो .
   ८.याखाली Commodity , Currency ,Mutual Fund यांचे आयकॉन असून यामधील चढ उतार ,चलनाचा विनिमय दर , म्यूचुअल फंडाची कामगिरी श्रेणी यांची वर्गवारी दिली आहे यातील प्रत्येक ठिकाणी क्लिक केले असता मागील पाच वर्षाची कामगिरी ,किमान गुंतवणूक , लाभांश ,प्रमुख समभागातिल गुंतवणूक यांची अधिक सखोल माहिती मिळते .
   ९.याखालीच Personal Finance हा आयकॉन असून यामधे Plan & Invest , Insurance ,Tax ,Loans , Property ,Retirement ,Fixed Income ,Credit Cards यासंबंधीची माहिती असून Tools मधे Magic of      Compounding ,How to Become Carorpati ,EMI , Calculater आणि Gratuity Calculater यांच्या तयार सारण्या (tables) असून यात काही माहिती भरल्यास  त्याची उत्तरे मिळू शकतात .
   १०.याखाली Subscription हा आयकॉन असून येथे ब्रोकर आणि फंड हाउस यांच्याकडील पैसे आकारुन गुंतवणूकीचे संदर्भातील मार्गदर्शन उपलब्ध आहे .
   ११.यानंतर Specials मध्ये उपयुक्त विषय दिले असून तेथून यावरील लिंकवर जाता येते.
   १२.याखाली Saved Articles हा आयकॉन असून येथे आपण ऑनलाइन असताना साठवून ठेवलेले लेख ऑफलाइन वाचू शकतो.
   १३.यानंतर Setting हा आयकॉन असून यामधे आपणास Ticker चे सेटिंग Sensex , Nifty , Portfolio आणि Watchlist प्रमाणे करून ठेवता येते .
   या खाली अन्य चार आयकॉन असून त्याद्वारे याApp ची माहिती इतरांना देता येते .आपणास हे App कसे वाटते याविषयी मत नोंदवता येते .यासारख्या दुसऱ्या App ची माहिती मिळवता येते .तसेच या App संबंधी काही सूचना/तक्रारी असतील तर Feedback द्वारे कळवण्याची सोय आहे .
  कोण होईल मराठी करोडपती यातील मितवा हे आधारकार्ड आठवतंय का ? गुंतवणूकदारांच्या दृष्टीने हेApp म्हणजे मित्र , तत्वज्ञ ,वाटाड्याच ! 'अनंतहस्ते कमलावराने ,देता घेशील दो कराने' अतिशय थोडक्यात परंतू या App ची परिपूर्ण ओळख करून देण्याचा हा प्रयत्न असून जिज्ञासुनी या आधारे अधिक माहिती मिळवून स्वयंपूर्ण व्हावे .

©उदय पिंगळे

(यात उल्लेख केलेले  App गुंतवणुकदाराना मार्गदर्शक ठरेल असे वाटते म्हणून त्याची सविस्तर माहिती दिली असून याच्याशी लेखकाचा कोणताही व्यावसायीक संबध नाही)

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

   ही माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांनी वाचण्यासाठी  त्यांना शेअर करा म्हणजे अनेकांपर्यत ती एकाच वेळी पोहोचेल.

Friday, 23 June 2017

रिझर्व बँकेचे द्वैमासिक पतधोरण ......

      ..रिझर्व बँकेचे द्वैमासिक पतधोरण..

       महागाई एका मर्यादेत ठेवण्यासाठी अनेक उपाय सरकार करते .महागाई नियंत्रण करणे हे रिझर्व बँकेच्या  अनेक कामांपैकी एक महत्वाचे काम आहे .बाजारात रकमेची तरलता कायम ठेवून महागाईवर नियंत्रण करता येऊ शकते  यासाठी दर दोन महिन्यांनी रिझर्व बँक आपल्या पतविषयक , धोरणाचा आढावा घेऊन त्यात जरूर असल्यास बदल करते . यात सी आर आर ,एस एल आर , रेपो , रिव्हर्स रेपो ,कॉल रेट ,बँक रेट आणि प्राइम लेंडीग रेट यांचा सामावेश होतो . याचा संबध ठेवी आणि कर्ज यांच्या व्याजदरावर पडत असतो .हे सर्व नक्की काय आहे हे थोडक्यात समजून घेवूया .
    बँकिंग व्यवसायात लोकांच्या ठेवी ,बँकानी विविध मार्गाने जमा केलेले भांडवल , घेतलेली कर्जे ही खर्चाची बाजू तर दिलेली कर्जे, विविध गुंतवणूकीतून  मिळालेला फायदा ,विवीध सेवा पूरवल्याचा आकार ही उत्पन्नाची बाजू असते . यातील 85% रक्कम ही दिलेल्या कर्जावरील व्याज या स्वरूपात असते थोडक्यात भांडवल म्हणून घेतलेल्या पैशावरील दिलेले व्याज आणि दिलेल्या कर्जावर मिळवलेले व्याज यांतील फरक यातून         व्यवस्थापकीय  खर्च वगळून राहिलेली रक्कम ही त्या बँकेचा नफा /तोटा असतो .बँकेकडे जमा झालेले सर्व पैसे बँकेस कर्ज देण्याकरिता वापरता येत नाही .बँकेमधील बचत / चालू खात्यातिल रक्कम ही मागणीदेय स्वरूपातील जमा म्हणजे ग्राहकाने  मागणी केल्यास ताबडतोब देणे बंधनकारक असते यासाठी जमा रकमेचा  काही भाग बँका आपल्याकडे रोख स्वरूपात अथवा रिझर्व बँकेच्या नोटा वितरण विभागात (currency chests ) ठेवतात एकूण जमा रकमेच्या प्रमाणात ही रक्कम ठेवावी लागते यास सी आर आर (cash reserve retio)असे म्हणतात . यावर व्याज मिळत नाही .सध्या हा दर 4% आहे .सी आर  आर कमी झाल्यास कर्ज आणि गुंतवणूक यासाठी अधिक रक्कम उपलब्ध होते .बँकाना जमा रकमेचा काही भाग भविष्यातील संभाव्य देणी (मुदत ठेवींची पूर्तता) देण्यासाठी रोख रक्कम ,सोने , सरकारी कर्जरोख्यात गुतवावा लागतो त्यास एस एल आर (statutary liquidity ratio) असे म्हणतात यावर निश्चित असे उत्पन्न मिळते तसेच आकस्मिक प्रसंगी पैशाची उपलब्धता करण्यास तारण म्हणून याचा वापर करता येतो सध्या हे प्रमाण 20.5%आहे . हे प्रमाण वाढल्यास कर्ज देण्यासाठी कमी रक्कम तर कमी झाल्यास कर्ज वितरणासाठी अधिक रक्कम बँकाना उपलब्ध होते .
   याहून अधिक रकमेची गरज लागल्यास रिजर्व बँकेकडून अल्प मुदतीचे कर्ज घ्यावे लागते यावर व्याज द्यावे लागते यास रेपो रेट असे म्हणतात, सध्या रेपोरेट 6.25%आहे .हा दर कमी झाल्यास कर्जावरील आणि ठेवींवरील व्याजदर कमी होतो त्यामुळे कर्जाची मागणी वाढते तर रेपो रेट वाढल्यास कर्ज महाग झाल्याने मागणी कमी होते .याउलट काही वेळा रिझर्व बँकेस इतर बँकाकडून अल्प मुदतीचे कर्ज घ्यावे लागते आणि त्यावर व्याजही द्यावे लागते या व्याजदरास रिवर्स रेपो असे म्हणतात सध्या हा दर 6% आहे हा दर वाढल्यास बाजारातील कर्जाची उपलब्धता कमी होते कारण बँकाना व्यक्ति आणि उद्योग यांना कर्ज पुरवठा करण्यापेक्षा अतिरिक्त रक्कम रिझर्व बँकेस कर्जाऊ देणे अत्यल्प जोखमीचे आणि अधिक सोयीचे वाटते तर हा दर कमी झाल्यास बँका इतर पर्यायांची चाचपणी करण्याची शक्यता असते .
   बँकांमध्ये आपापसात जी अल्प मुदतीच्या कर्जाची देवाण घेवाण होते यावरील व्याजदरास कॉल रेट म्हणतात .हे दर मागणी आणि पुरवठा यानुसार सतत बदलत असतात .आणीबाणीचे प्रसंगी ग्राहकांचा विश्वास जागवण्याकरीता बँकाना आपली गुंतवणूक तात्पुरती तारण ठेवून रिझर्व बँकेकडून कर्ज घ्यावे लागते यावरील व्याजदर रेपो रेट पेक्षा अधिक असतो सध्या हा दर 6.5%आहे या सोइला मार्जीनल स्टेंडिंग फॅसीलीटी असे म्हणतात . जर असे कर्ज दीर्घ मुदतीसाठी घेतले गेले तर यावरील व्याजदरास बँक रेट असे म्हणतात हा रेट वाढवून अथवा कमी करून चलन नियंत्रण करणे रिझर्व बँकेने बंद केले आहे .प्रत्येक बँकेने गृहकर्ज आणि वाहनकर्ज सोडून आपल्या ग्राहकांना कर्ज देण्यासाठी किमान व्याजदर निश्चित केला असून यापेक्षा कमी दराने बँका कोणालाही कर्ज देत नाहीत हा दर प्रत्येक बँकेने स्वतंत्रपणे ठरवला असून सध्या तो 9.1ते 9.6%या दरम्यान आहे काही कर्जावरील व्याजदर हा यापेक्षाही अधिक आहे .या सर्वावर रिजर्व बँकेचे बारकाईने लक्ष असून जरूर पडल्यास यामधे हस्तक्षेप केला जातो .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

आपल्या मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी आपण त्या॑ना tag करा म्हणजे अनेकांपर्यत ही माहिती एकाच वेळी पोहोचेल.