Friday, 21 July 2017

समभाग खरेदी विक्रीच्या सूचना देण्याचे विविध पर्याय आणि सवलती

       ......समभाग खरेदी विक्रीच्या सूचना(Sell/Purchase orders) देण्याचे विविध पर्याय आणि सवलती .......

   आपण समभागात (Shares) गुंतवणूक करणार आहोत .यासाठी आवश्यक असे बचत खाते (Saving A/C) समभाग खरेदी आणि विक्री करण्याचे खाते (Trading A/C) आणि हे सर्व ज्या खात्यात त्यांची साठवणुक आणि हाताळणी करण्यासाठी निक्षेपिकेकडील  (Dipositary) डी मॅट खाते डिपोसिटरी पर्टिसिपंटकडे (D P)आहे .याद्वारे आपण ऑनलाईन /ऑफलाईन व्यवहार करू शकतो .बरेच लोक आपले खरेदी विक्री करण्याच्या सूचना आपल्या मोबाईल किंवा कंप्यूटरवरून  देतात .हे व्यवहार सुलभ आणि जलद होण्यासाठी आधी दलालाचे सॉफ्टवेअर /App डाउनलोड करून घ्यावे लागते तर काही लोक हे व्यवहार दलालाच्या ऑफीसला किंवा त्यांचे उपदलालास फोन करून देतात . या दोन्ही मार्गाने केलेले व्यवहार हे ऑनलाईनच आहेत फक्त ते स्वतः च्या कंप्यूटर आणि मोबाइल मार्फत स्वतः न करता दलाल अथवा त्याचा प्रतिनिधी  करतो . या प्रत्येक व्यवहारांची तो पूर्ण झाला की नोंद होते आणि कामकाजाचे दोन दिवसांनी बाजाराच्या नियमानुसार हा व्यवहार पूरा होतो .शेअर बाजारात कोणतेही ऑफलाईन व्यवहार होत नाहीत .जेव्हा गुंतवणूकदार बाजारात न जाता काही रकमेच्या मोबदल्यात अथवा विनामोबदला समभाग हस्तांतरित करेल जसे , न्यायालयाच्या आदेशाने , वारसा हक्काने ,  इच्छापत्राने ,कंपनीने स्वतः चे शेअर खरेदीस दिलेल्या देकारास (Share Buyback) किंवा डिपोसिटरी पार्टिसिपंट बदलल्यावर होतील यासारखे व्यवहार तांत्रिकदृष्ट्या ऑफलाईन होवू शकतात . ही एक सोय असून एकंदरीत व्यवहारांच्या तुलनेत अशा व्यवहारांचे प्रमाण नगण्य आहे .
   बाजारात समभागाच्या खरेदी / विक्रीच्या सूचना देण्याच्या अनेक पद्धती आहेत . त्यानुसार आपणास ज्या प्रकारे खरेदी / विक्री करायची तशीच सूचना आपल्या दलालाला अथवा त्याच्या प्रतिनिधीस फोनवर अथवा ऑनलाईन द्यायला हवी .आपण जशी सूचना देवू  तशीच सूचना तंतोतंत अमलात आणली जाते . इतर कोणत्याही बाजाराप्रमाणे मागणी आणि पुरवठा यातील संबधानूसार म्हणजे मागणी अधिक पुरवठा कमी तर शेअरचा भाव वाढतो , मागणी कमी पुरवठा जास्त तर शेअरचा भाव कमी होतो .मागणी आणि पुरवठा हा अनेक गोष्टीवर अवलंबून असतो यात सर्वाधिक परिणाम हा राजकिय व आर्थिक घडामोडी , निवडणुकीचे निकाल , बंडाळी , लढाई ,भूकंप ,पूर ,संप , ताळेबंदी, व्यवस्थापनातील  बदल , अर्थसंकल्पातील बदल ,कंपनी संदर्भातील बातम्या अंदाज अफवा या सारख्या अनेक गोष्टी कारणीभूत असतात . सामान्यतः विक्री करणाऱ्याच्या अपेक्षीत भाव आलेला असतो वा भाव खाली आला त्यामुळे त्याचा अपेक्षाभंग झाल्याने विकायला तयार झालेला असतो किंवा याहून खाली भाव येईल अशी भीती त्याला वाटत असते .या सर्व परिस्थितीत आपल्याला जास्तीत जास्त भाव मिळवायचा तो प्रयत्न करतो तर खरेदिदारास भाव योग्य वाटतो ,तो वाढेल असे वाटत असते या परिस्थितीत आपल्याला हवे असलेले समभाग किमान किंमतीत मिळावेत अशी त्यांची अपेक्षा असते .हे जसे व्यक्तीचे ,तसेच बाजारात भाग घेणाऱ्या म्यूचुअल फंड ,स्वदेशी संस्थात्मक गुंतवणूक दार (DII),विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII)यांनाही वाटत असते .अशा प्रकारे व्यक्ति आणि समूह यांच्या एकत्रित मानसिकतेच्या परीणामाने समभागांचे भाव खालीवर होतात परंतु अंतिमतः कंपनीचे कामगिरीवर स्थिरावून वाढतात अथवा कमी होतात .आपण विक्री /खरेदीच्या करण्याच्या विविध पद्धती पाहू .यामध्ये फक्त Cash मार्केटचा विचार केला असून Derivetive मार्केट मधील सौदे  यापेक्षा थोडे वेगळे आहेत --
    Cash मार्केटमध्ये काही जण समभाग खरेदी करून त्याचा ताबा घेवून नंतर विक्री करतात .(Delivery Base Trading ) यामधे ते जेव्हा विक्री करतील त्या कालावधीवर ही विक्री अल्प अथवा दीर्घ मुदतीची समजली जाते .तर खरेदी /विक्री करून त्याच दिवशी पुन्हा उलट व्यवहार करून विक्री /खरेदी केली जाते आणि यामधून झालेला फायदा /नुकसान दिले /घेतले जाते .यास Day Trading असे म्हणतात . यामधे जर आपल्याकडे शेअर नसताना विक्री करून बाजार बंद होण्यापूर्वी खरेदी करून दिले तर अशा विक्रीला Short Selling  असे म्हणतात .
1)बाजारभावाप्रमाणे खरेदी विक्री (Market Rate) :येथे समभाग खरेदी विक्रीचा चालू दर काय आहे ते समजत असते . तो आपल्याला मान्य असल्यास आणि त्याप्रमाणे आपण ऑर्डर दिली तर ताबडतोब सौदा मान्य होऊन नोंदवला जातो . delivary base आणि day trading या पद्धतीने करता येते .
2)विशिष्ट भावाने खरेदी /विक्री (limit order)वरील दोन्ही पद्धतीत खरेदी विक्री करताना उपलब्ध भावापेक्षा वेगळा भाव आपणास अपेक्षित असेल तर विशिष्ट मर्यादेत आपणास आपल्या मर्जीप्रमाणे भाव मागणी करता येते जर बाजार चालू असताना तो भाव आला तर सौदा होतो आणि तो नोंदवला जातो .जर आपण मागणी टाकलेला भाव बाजार चालू आला नाही तर ती मागणी आपोआप रद्द होते .
   या दोन्ही पद्धतीत day trading करत असल्यास उलट मागणी करून सौदा पूरा होतो परंतू जर आपण उलट मागणी केली नाही तर बाजार बंद होण्याच्या 15/30 मिनिटे आधी आपोआप मागणी नोंदवली जाते व सौदा पूर्ण केला जातो .यापूर्वी जर delivary घ्यायची असेल तर मागणीत बदल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे .day trading करीत असताना शेअरच्या भावात होणाऱ्या फरकावर बारकाईने लक्ष ठेवावे लागते अशा वेळी मोठे नुकसान टाळण्यासाठी अथवा अपेक्षित फायदा मिळवण्यासाठी stop loss हा पर्याय वापरता येतो .यामधे आपली विरुध्द मागणी ठराविक भाव आल्यावर आपोआप नोंदवली जावून सौदा पूर्ण होतो .या ठराविक भावाच्या अलीकडील भावास ज्यास  Trigger price  असे म्हणतात तेथे भाव आल्यास आपोआप विरुध्द मागणी केली जाते
3)आज खरेदी उद्या विक्री (BTST Buy today sell tomorrow)-अनेक दलाल आपल्या ग्राहकांना ही सुविधा देत आहेत .delivary besis वर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी अनेक दलालांनी ही सुविधा देवू केली आहे .यामधे त्यांनी ठरवलेल्या यादीतील शेअरची विशिष्ट मर्यादेत ताबा न घेता दुसऱ्या दिवशी विक्री करता येते .असा व्यवहार करताना त्यासंदर्भात माहिती घेवूनच मागणी नोंदवावी .
  याप्रमुख खरेदी /विक्री करण्याच्या प्रकारशिवाय विविध फर्म फक्त त्यांच्या ग्राहकांना काही अटीवर अधिकच्या सोई उपलब्ध करून देतात .जसे शिल्लक रक्कम किंवा असलेल्या शेअरच्या बाजारमूल्यांचे पटीत काही अटीवर व्यवहार करू देण्याची परवानगी (exposure) मोठ्या प्रमाणातील एका वेळी टाकलेली ऑर्डर अंशतः जुळली असता शिल्लक ऑर्डर आपोआप रद्द होणे(Immediate Order Cancel),मार्केट बंद झाल्यावर पुढील दिवसाकरीता लिमिट ऑर्डर द्यायची असेल तर ब्रोकरकडे नोंदवू शकतो .अशा प्रकारे अनेकांनी नोदवलेली ऑर्डर बाजार चालू झाल्यावर एकत्रितरित्या दिली जाते ,तिला Batch Order असे म्हणतात . याशिवाय जर एखादी ऑर्डर GTDT (Good till date order)या पद्धतीने दिली तर ती पूर्ण होईपर्यंत पुढील 30 दिवस रोज टाकली जाते .अचानक पैशाची गरज लागल्यास Encash या पद्धतीने ऑर्डर टाकली असता स्टॉक एक्सचेंज कडून पैसे मिळण्याआधी ज्या दिवशी ऑर्डर मान्य झाली त्याच दिवशी पैसे आपल्या खात्यात जमा होतात .या सवलती आपले ट्रेडिंग खाते जेथे आहे त्यांनी दिलेल्या अधिकच्या सुविधा आहेत आणि सवलती त्याच असल्या तरी फर्मप्रमाणे त्यांना वेगवेगळी नावे दिली आहेत .एकदा आपण ऑर्डर दिली की ती पूर्ण होण्याच्या आत वाटल्यास दूरूस्त करता येते त्यास modified ऑर्डर असे म्हणतात मांत्र मान्य झालेला सौदा बदलता येत नाही .

©उदय पिंगळे


ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

आपल्या मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी शेअर करा म्हणजे अनेकांपर्यत ती माहिती एकाच वेळी पोहोचेल.

No comments:

Post a Comment