Friday, 7 November 2025
समजून घेऊया भांडवल बाजारातील गुंतवणूक भाग 8
#समजून_घेऊया_भांडवल_बाजारातील_गुंतवणूक_भाग 8
27. निरंतर योजना (ओपन एन्डडेड) : म्युच्युअल फंड योजनांतील काही योजना मुदतबंद (क्लोज एन्डडेड) म्हणजे ठराविक कालखंड असलेल्या तर काही निरंतर (ओपन एन्डडेड) असतात. निरंतन योजनांत युनिट खरेदी विक्री ही रोजच्या निव्वळ मालमत्ता मूल्यावर होत असते. योजनेतून पैसे कधीही काढता येतील वा त्यात गुंतवणूक करता येईल अशी त्यांची रचना असते.
● निरंतर योजनांनी गुंतवणुकदारांकडून एकत्रित जमा केलेली गुंतवणूक, भांडवल बाजाराशी संबंधित विविध मालमत्तेत गुंतवली जाते.
●दररोज फंडातील युनिटचे निव्वळ मालमत्ता मूल्य मोजले जाते आणि त्या दिवसाची खरेदी विक्री त्यानुसार होते.
●व्यावसायिक व्यवस्थापन : या योजना तज्ज्ञ व्यावसायिक व्यवस्थापकांच्या मदतीने चालवल्या जातात. गुंतवणूक संच कसा निर्माण करायचा कोणते शेअर्स घ्यायचे कोणते विकायचे यासंदर्भातील निर्णय त्याच्याकडून घेतले जातात.
●या योजनेतील पैसे सहज परत मिळत असल्याने त्या रोकड सुलभ आहेत.
●योजनेची गुंतवणूक भांडवल बाजारातील विविध प्रकारात विभागून त्यांचा समतोल साधला जातो.
●गुंतवणूकदाराच्या गरजेनुसार विविध फंड प्रकार उपलब्ध आहेत.
●योजनेतील गुंतवणूक सातत्याने जात येत असल्याने फंड झपाट्याने वाढू शकतो.
28. नव्या योजनेचा देकार (न्यू फंड ऑफर): मालमत्ता व्यवस्थापन कंपनीकडून जेव्हा नवीन योजना बाजारात आणली जाते तेव्हा त्याचा देकार पब्लिक इशू सारखा काही दिवस सर्वाना दिला जातो. या कालावधीत गुंतवणूकदारांना रूपये 10/- दर्शनी मूल्य असलेले युनिट त्याच किमतीस उपलब्ध असतात. योजना देकार बंद झाल्यावर युनिटची खरेदी विक्री त्याच्या निव्वळ मालमत्ता मूल्याने केली जाते.
नव्या योजनेच्या देकाराचे टप्पे:
● मालमत्ता व्यवस्थापन कंपनीकडून नव्या योजनेची माहिती जाहीर केली जाते यात प्रामुख्याने योजनेचे उद्दिष्ट, संकल्पना आणि योजना कालावधी याची माहिती गुंतवणूकदारांना दिली जाते.
● योजना विक्री कालावधी जाहीर केला जातो ● या काळात सर्वाना दहा रुपये भावाने युनिट दिले जातात.
● जमा रक्कम एकत्रित करून योजनेच्या उद्देशानुसार विविध मालमत्ता प्रकारात गुंतवली जाते.
● यानंतर ही योजना त्याच्या निव्वळ मालमत्ता मूल्यावर आधारित व्यवहार करण्यास निरंतर उपलब्ध राहते.
29. निर्देशांक आधारित योजना (इंडेक्स फंड): निर्देशांक हा एक प्रकारच्या वा अनेक प्रकारच्या व्यवसाय असलेल्या कंपन्यांच्या तुलनात्मक कामगिरीचा आढावा असतो. अशा योजनांत केलेली गुंतवणूक परतावा देताना तो निर्देशांकावर मात करणारा नसून त्याच्या जवळपास असतो.
●या योजना अप्रत्यक्ष पद्धतीने गुंतवणूक करत असल्याने त्या त्याच्या उद्देशीत निर्देशांकानुसार तंतोतंत गुंतवणूक करतात.
●ही अप्रत्यक्षपणे केलेली गुंतवणूक असून फंड व्यवस्थापक फक्त मालमत्तेचा निर्देशांकातील भारानुसार गुंतवणूक करतो.
●तो या पद्धतीने गुंतवणूक करत असल्यामुळे या गुंतवणूकीत मानवी हस्तक्षेप जवळपास नसतोच.
●यातून मिळणारा परतावा हा त्याच्या निर्देशांकास मिळणाऱ्या परताव्याच्या जवळपास असतो.
निर्देशांकावर आधारित फंडात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार-
●गुंतवणुकीत विविधता असावी,
●दिर्घकाळात संपत्ती निर्माण व्हावी,
●निर्देशांकाप्रमाणे परतावा मिळावा.
या हेतूने गुंतवणूक करतात.
निर्देशांक आधारित म्युच्युअल फंड योजनांचे फायदे-
●कमीतकमी व्यवस्थापन खर्च,
●सोपी गुंतवणूक पद्धत,
●परताव्यातील सातत्यता,
●तुलनेत कमी धोकादायक,
●पारदर्शक गुंतवणूक,
●अप्रत्यक्ष गुंतवणूक,
●मालमत्तेची किमान उलाढाल,
●सर्व मालमत्ता प्रकारात संतुलित गुंतवणूक,
●निर्देशांक आणि फंड यांच्या कामगिरीत किमान फरक,
●विविध मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करता येणे शक्य असा हा गुंतवणूक प्रकार आहे.
30. ट्रॅकिंग एरर म्हणजे काय?
निर्देशांक आधारित म्युच्युअल फंड योजना आणि इटीएफ यांचा आणि ज्या निर्देशांकावर ती योजना आधारली आहे त्याच्या परताव्यातील फरक म्हणजे ट्रॅकिंग एरर. हा फरक विशिष्ट कालावधीत मोजला जातो आणि तो टक्केवारीत दर्शवला जातो. हा फरक निर्देशांकाच्या बरोबरीत असेल तर तो फंड उत्तम पद्धतीने काम करत आहेत असे समजतात जर हा फरक जवळपास असेल तर तो फंड निर्देशांकानुरूप कामगिरी करीत आहे असे समजले जाते. ट्रॅकिंग एरर ही जाणीवपूर्वक स्वीकारलेली जोखीम असून फंडाची कामगिरी त्याच्या आधारित निर्देशांकाच्या कामगिरीवर मात करणारी असावी अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा असते.
ट्रॅकिंग एरर मोजण्याची पद्धत- हा फरक दोन पद्धतीने मोजता येतो.
पहिल्या पद्धतीत, गुंतवणूक संच - निर्देशांक यातील फरक काढून मोजता येतो तर दुसऱ्या पद्धतीत त्यांनी दिलेल्या परताव्यातील फरक मोजतात.
ट्रॅकिंग एररची उपयुक्तता-
●फंडाच्या कामगिरीचे तुलनात्मक मूल्यमापन करण्यासाठी,
●जोखीम पातळी व्यवस्थापन समजून घेण्यासाठी,
●गुंतवणूक निर्णय घेण्यासाठी म्हणजे जे गुंतवणूकदार जोखीम स्वीकारू शकत नाही ते कमी ट्रॅकिंग एरर असलेल्या फडांची निवड करतील.
ट्रेकिंग एरर पाहण्याचे फायदे-
●गुंतवणूक योजनेचे मूल्यमापन पारदर्शक पद्धतीने करता येते,
●ज्या निर्देशांकावर आधारित योजना आहे त्याचे प्रतिबिंब योजनेवर पडते आहे की नाही याचा तपास करता येतो,
●जोखीम व्यवस्थापन नीट होते आहे का नाही ते पाहता येते,
●आपल्या जोखीम क्षमतेवर आधारित योजनेची निवड करता येते.
ट्रेकिंग एररची वैशिष्ट्ये,
●फंड योजनेचे मूळ निर्देशांकाशी असलेले सातत्य तपासता येते,
●निव्वळ परतावा पाहण्याऐवजी तुलनात्मक जोखीम केंद्रित करता येते.
●बाजारपरिस्थितीतील बदल, मूळ निर्देशांकाच्या गुंतवणूक संचातील बदल यामुळे होणारे परिणाम समजतात.
●कोणत्याही मालमत्ता प्रकारच्या निर्देशांकाच्या बाबतीत ट्रॅकिंग एरर उपयुक्त होऊ शकते.
31. इंटरवल फंड-
हा एक म्युच्युअल फंडाचा वेगळा प्रकार आहे जो निरंतर फंड आणि मुदतबंद फडांची वैशिष्ट्ये एकत्रित करतो. यामुळे गुंतवणूक योजनेचे युनिट मालमत्ता मूल्यावर कधीही खरेदी करता येतात परंतु पूर्व निर्धारित कालावधीमध्ये त्याची काही मर्यादित काळ त्याची पुन्हा विक्री करता येते. हे फंड बहुदा कमी तरल मालमत्तेत गुंतवणूक करीत असल्याने योजना धारकांना मालमत्ता मूल्यानुसार युनिट खरेदी विक्रीची संधी देतात. याशिवाय या योजनेच्या युनिटची खरेदी विक्री शेअरबाजारात ही करता येते.
इंटरवल फंड कसे काम करतात-
●या फंडाचे युनिट निव्वळ मालमत्ता मूल्याने कधीही खरेदी करता येतात.
●विक्री फंड हाऊसकडे मर्यादित कालावधीत करता येते.
●शेअरबाजारात त्यांची खरेदीविक्री होत असल्याने या योजना पुरेशा तरल आहेत.
●व्यवहार बंद कालावधीत नवीन गुंतवणूक घेतली जात नाही.
इंटरवल फंडाची वैशिष्ट्ये-
●या योजनेची रचना म्हणजे निरंतर योजना आणि मुदतबंद योजना यांची सरमिसळ आहे.
●ही गुंतवणूक खाजगी गुंतवणूक, कर्जे, बांधकाम, पायाभूत क्षेत्राशी संबंधित असते.
●वर्षातील काही दिवस सोडून या फंडाचे व्यवहार करण्यात अडचण येत नाही.
●हे फंड नियामक देखरेखीखाली असल्याने गुंतवणूकदारांना पुरेसे संरक्षण देतात.
●डिव्हिडंड स्वरूपात गुंतवणूकदारांना अधूनमधून परतावा देतात.
●हे फंड व्यावसायिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाने चालवले जातात.
●असे फंड हे काही गुंतवणूकदारांची गुंतवणूक गरज असू शकतात.
32.शेअर्स-
शेअर्समधील गुंतवणूक हा एक गुंतवणुकीचा सुलभ मार्ग उपलब्ध आहे. त्याआधी तुम्ही कष्टाने मिळवलेल्या पैशाची गुंतवणूक त्यात करण्यापूर्वी त्याची प्राथमिक माहिती नीट करून घेऊया. शेअर्स ही उद्योगाची काही भागाची मालकी असते. तुम्ही महत्वाच्या विषयावर मत देऊ शकता. तसेच भागधारकांच्या सर्वसाधारण सभेत आपले मत व्यक्त करू शकता. कंपनीचे भांडवल हजार भागात विभागले असून त्याचेही 50 भाग तुमच्या मालकीचे असतील तर त्या कंपनीची 5% मालकी तुमच्याकडे आहे.
तुम्ही जेव्हा एखाद्या कंपनीचा शेअर्स घेता तेव्हा त्याची एक खास किंमत असते त्याला त्या शेअर्सचे दर्शनी मूल्य असं म्हणतात. परंतु त्याला रोखयाप्रमाणे कोणतीही अंतिम मुदत नसते याचाच दुसरा अर्थ असा की जोपर्यंत तुम्हाला वाटेल तोपर्यंत ते शेअर्स तुम्ही बाळगू शकता. दुय्यम बाजारात भावानुसार विक्री करून ते विकू शकता. तुम्ही किंवा कोणीतरी सुरुवातीला मोजलेली किंमत उद्योगासाठी वापरली जाते.
जेव्हा उद्योगातून नफा होतो त्यातील काही भाग शेअर होल्डरना डिव्हिडंड बोनस स्वरूपात दिला जातो. ही एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे ज्यात उद्योगाची मालकी असली तर त्यावरील कर्जाची जबाबदारी नसते. त्याचप्रमाणे उद्योगाने मिळवलेल्या नफ्याचा वाटा भागधारकांना दिलाच पाहिजे याचे बंधनही नसते. त्यामुळे निश्चित रक्कम गुंतवणूकदारास मिळतेच असे नाही. तरीही या गुंतवणूकीतून अनेक फायदे भागधारकास मिळू शकतात ते असे-
●शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यात जोखीम अधिक असली तरी त्यातून सर्वसाधारण गुंतवणूक प्रकाराहून अधिक परतावा मिळण्याची शक्यता असते. चांगल्या कंपन्यातील गुंतवणूक यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. दिर्घकाळात यातील गुंतवणुकीतून अधिक लाभ मिळण्याची शक्यता अधिक असते.
●यामुळे आपल्या गुंतवणूक संचात विविधता येते. जोखीम विभागली जाते.
●जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा बाजारभावानुसार पैसे त्वरीत उभे करता येतात.
या फायद्यासह यातील गुंतवणूकीत असलेले काही धोके असे-
●अनेक कारणांनी शेअर्सचे भाव खालीवर होत असतात.
●भागधारक धनको नसल्याने कंपनी बुडल्यास भांडवल परत मिळण्याची शक्यता जवळपास नसते.
●बदलते सरकारी धोरण, नैसर्गिक संकट यामुळे कंपनीच्या बाजारभावावर बरेवाईट परिणाम होत असतात. (अपूर्ण)
सेबीच्या सारथी अँपवर उपलब्ध असलेल्या माहितीचा भावानुवाद.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत.
लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही याची नोंद घ्यावी)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment