Friday, 31 October 2025
समजून घेऊया भांडवल बाजारातील गुंतवणूक भाग 7
#समजून_घेऊया_भांडवल_बाजारातील_गुंतवणूक_भाग 7
22. बॅलन्स फंड म्हणजे काय?
बॅलन्स फंडांची गुंतवणूक शेअर्स आणि बॉण्ड या दोन्ही प्रकारात असते. शेअर्समधील वृद्धी आणि बॉण्ड मधील स्थिरता यांचा समतोल त्यात साधला गेल्याने असे फंड गुंतवणूकदारांना किमान जोखीम घेऊन चांगला परतावा देत असल्याने अधिक लोकप्रिय आहेत. यांना हायब्रीड फंड असेही म्हटले जाते.
हे फंड बाजारात येताना त्यांची गुंतवणूक शेअर्स आणि बॉण्डमध्ये कमाल किमान किती टक्के असणार ते जाहीर करतात आणि त्या टक्केवारीच्या जवळपास गुंतवणूक कशी राहील याची काळजी घेतात. या फंडाचे व्यवस्थापक बाजाराचा कल ओळखून कुठे किती गुंतवणूक ते निश्चित करतात. जर शेअरबाजार तेजीत असेल तर फंड व्यवस्थापक त्यांच्या मर्यादेतील अधिकाधिक गुंतवणूक शेअर्समध्ये करतात याउलट बाजारात मंदी असल्यास अधिकाधिक गुंतवणूक बॉण्डमध्ये करतात. या योजना गुंतवणूकदारांना भावण्याची कारणे-
●गुंतवणूक विविधता- गुंतवणूक शेअर्स आणि बॉण्ड या दोन्ही मालमत्ता प्रकारात केली गेल्याने गुंतवणुकीचे विविधिकरण होते.
●गुंतवणूक स्नेही: गुंतवणूकदारांना शेअर्स बॉण्ड अशा वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करण्याऐवजी एकत्रितपणे गुंतवणूक संधी उपलब्ध होते.
●वृद्धी सातत्य: यातील गुंतवणूकीस शेअर्सचा
भांडवली लाभ आणि बॉण्डची सुरक्षितता या दोन्हींचा फायदा होत असल्याने त्यात सातत्याने वृद्धी होत राहण्याची शक्यता असते.
●जोखीम विभागणी: शेअर्स आणि बॉण्ड या दोन्ही प्रकारात गुंतवणूक होत असल्याने भांडवल बाजारातील भावाची अशाश्वतता आणि बॉण्डमधील स्थैर्य याची जोड मिळाल्याने जोखीम कमी होते.
23. एक्झिट लोड: म्युच्युअल फंड योजनांतील गुंतवणूक काढून घेताना एक्झिट लोडच वापर होतो. म्युच्युअल फंड योजना त्यातील जोखीम आणि परतावा याचा विचार करता उत्तम गुंतवणूक संधी देत असल्याने गुंतवणूकदारांत लोकप्रिय आहेत. त्यांचे स्वतःचे काही नियम आहेत त्यानुसार गुंतवणूकदारांनी किमान काही काळ रक्कम त्याच्याकडे ठेवावी अशी त्यांची अपेक्षा असते त्यापूर्वी गुंतवणूक काढून घेतली असता काही दंड आकारला जातो त्यास एक्झिट लोड असे म्हणतात. गुंतवणूक करण्यापूर्वी ते किती असेल याची माहिती घ्यावी.
●जेव्हा गुंतवणूकदार म्युच्युअल फंड योजनेतील गुंतवणूक लवकर काढून घेण्याचा विचार करतो तेव्हा त्याला देय असलेल्या रकमेवर फंडाच्या नियमानुसार एक्झिट लोड आकारून उरलेली रक्कम दिली जाते.
●वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या दराने त्याची आकारणी करतात. शेअर्स आधारीत योजनावरील एक वर्षाच्या आतील कालावधीसाठी सर्वसाधारणपणे विक्री किमतीच्या 1% एक्झिट लोड आकारले जाते तर रोखे आधारीत योजनांवर ते अगदी मामुली किंवा शून्य असते.
●एक्झिट लोडमुळे गुंतवणूक दार सातत्याने योजनांची खरेदी विक्री करत नाहीत. त्यामुळे निधी व्यवस्थापित करणे सोपे जाते.
● यामुळे दीर्घकाळ गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळते.
24. समभाग संलग्न गुंतवणूक योजना (इएलएसएस) समभाग गुंतवणूकीस प्रोत्साहन देण्यासाठी या योजना चालू करण्यात आल्या. जे लोक अशा योजनेत गुंतवणूक करतात त्यांना जुन्या करप्रणाली प्रमाणे गुंतवणूक केल्यास 80 सी ची सवलत मिळते. या योजनेत केलेली गुंतवणूक किमान तीन वर्षे पूर्ण झाल्याशिवाय काढून घेता येत नाही. या योजनेतून करबचत आणि दिर्घकाळात संपत्ती निर्माण होत असल्याने लोकप्रिय आहेत. जे लोक अप्रत्यक्षपणे दीर्घकाळ भांडवल बाजारात गुंतवणूक करणे पसंत करतात त्यांना संपत्ती निर्मिती आणि करबचत करून देतात. या योजनेत गुंतवणूक केलेल्या रकमेपैकी 80% रक्कम ही शेअर्स मध्ये गुंतवली जाते. योजना कोणत्याही परताव्याची हमी देत नाही.
●ही गुंतवणूक एकरकमी अथवा एसआयपीच्या माध्यमातून करता येते. किमान ₹ 500/- ची एसआयपी करता येते.
●गुंतवणूकदारांना संचयित गुंतवणूक करता येईल अथवा डिव्हिडंड मिळवता येईल.
●प्रत्येक गुंतवणूक किमान तीन वर्षे काढून घेता येणार नाही गुंतवणूकदारांची इच्छा असल्यास तो कितीही काळ गुंतवणूक तशीच ठेऊ शकतो.
●ती भांडवल बाजाराशी संबंधित असल्याने त्यातून मिळू शकणाऱ्या परताव्याची कोणतीही हमी नाही.
●आयकर कायद्याच्या 80 सी नुसार जास्तीतजास्त दीड लाख गुंतवणुकीवर जुन्या करप्रणालीनुसार आयकारात सूट मिळेल.
●या गुंतवणूकीवर दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर सव्वा लाखाहून अधिक रकमेवर 12.5% या विशेष दारांने कर आकाराला जातो.
25.आरबीट्राज फंड: हे विशेष प्रकारचे इक्विटी फंड असून त्यांची गुंतवणूक शेअर्समध्ये असली तरी कमी जोखमीचे आहेत. यांची गुंतवणूक रचना दोन प्रकारच्या किंवा दोन बाजारातील समभागाच्या बाजारभावात असलेल्या फरकाचा लाभ घेणे हा आहे. रोख बाजार आणि वायदेबाजार यांच्यातील बाजार भावात असलेल्या फरकाचा फायदा घेण्यासाठी यातील व्यवहार एकाच वेळी केले जातात. यामुळे फंड योजनेस कोणतीही जोखीम न घेता फायदाच होतो.
●हे फंड दोन बाजार किंवा बाजार प्रकार यातील भावांमध्ये पडणाऱ्या फरकाचा सतत शोध घेत असतात. समजा एखाद्या शेअर्सचा कॅश मार्केटमध्ये असलेला भाव ₹ 100/- आहे आणि त्याच शेअर्सचा भाव फ्युचर बाजारात ₹ 102/- आहे म्हणजेच भावात ₹2/- चा फरक आहे.
●अशा वेळी फंड कॅश मार्केटमध्ये ₹100/- ने खरेदी करून त्याच वेळी फ्युचरमध्ये ₹102/- ने विक्री करेल.
●फ्युचर सेटलमेंट संपताना दोन्ही भावात फरक नसल्याने फंडास प्रतिशेअर 2/- रुपये फायदा होईल.
●जेव्हा भावात असलेल्या फरकांच्या संधी बाजारात उपलब्ध नसतील तेव्हा मनी मार्केट फंडात पैसे ठेवून फंडास काहींना काही प्राप्ती होत राहील.
आरबीट्राज फंडाचे फायदे-
●कमी जोखीम तरीही शेअर्स मधील गुंतवणूकीचा सर्व लाभ या योजनांना मिळतो.
●कर सवलती: हे फंड तात्पुरत्या स्वरूपात मनी मार्केटमध्ये गुंतवणूक करीत असले तरी कायदेशीररित्या ते इक्विटी फंड समजले जात असल्याने त्यांना त्या अनुषंगाने करात सवलती मिळतात.
●रोकड सुलभ: यातील पैसे कधीही सहज काढून घेता येत असल्याने ते रोकड सुलभ आहेत.
●गुंतवणूक विविधता: हे फंड विविध क्षेत्रात गुंतवणूकीत विविधता येते.
आरबीट्राज फंडाच्या मर्यादा-
●बाजार निगडित परतावा- हे फंड बाजारभावातील फरकाचा फायदा घेत असल्याने जर बाजारात फारशी हालचाल नसेल तर आकर्षक परतावा मिळवू शकत नाहीत.
●अल्प कालीन गुंतवणूकीसाठी योग्य: हे फंड दिर्घकाळ गुंतवणूक करण्यासाठी नाहीत.
26.म्युच्युअल फंड योजनांचा धोकामापक
(रिस्कोमिटर): कोणतीही गुंतवणूक म्हटली की जोखीम आलीच. ही जोखीम गुंतवणूकदारांना सहज समजावी त्यातून त्यांनी जाणीवपूर्वक गुंतवणूक निर्णय या हेतूने सेबीने या धोका मापकाची निर्मिती केली आहे त्यातून योजनेतील धोका स्पष्ट समजून येईल अशी त्याची पारदर्शक रचना आहे. त्यावरून गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणूकीबाबत योग्य तो निर्णय घेऊ शकतात.
सर्व मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना त्यांच्या नव्या योजनेतील जोखीम गुंतवणूक दारांना समजावी म्हणून योजनेच्या माहिती पत्रकात जाहिरातीत धोकामापक दर्शविणे सक्तीचे केले आहे. हा रिस्कोमिटर योजनेतील जोखीम सहा वेगवेगळ्या वर्गात दाखवतो.
●कमी धोकादायक: या योजना जवळपास जोखीम मुक्त असतात. रिस्कोमिटरवर या योजनांचा रंग हिरवा (Irish Greeen) असतो.
●कमी ते मध्यम जोखीम: या योजना कमी किंवा त्याहून किंचित धोकादायक योजनांहुन अधिक पण मध्यम धोकादायक योजनाहून कमी धोकादायक असतात. रिस्कोमिटरवर या योजना पोपटी रंगात दाखवल्या जातात.
●मध्यम धोकादायक: या योजनेतील जोखीम मर्यादित असते जे जाणीवपूर्वक जोखीम स्वीकारतात अशा गुंतवणूकदारांना या योजना उपयुक्त ठरतात. त्या पिवळ्या (Neon yellow) रंगात दर्शवितात
●मध्यम ते अधिक धोकादायक: बाजारातील चढ उतार लक्षात घेऊन अधिक जोखीम घेऊन अधिक उतारा मिळवण्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांना उपयुक्त अशा या योजना आहेत. त्या नारंगी (caramel) रंगात दर्शवितात.
●धोकादायक: या योजना मध्यम आणि अधिक धोकादायक यापेक्षा जास्त धोकादायक असतात. या गडध नारंगी (Dark Orange)
●तीव्र धोकादायक: या योजना साहसी गुंतवणूकदारांसाठी उपयोगी असतात. त्या लाल (Red) रंगात दर्शवितात.
हे वर्गीकरण मालमत्ता प्रकार, बाजारातील चढ उतार, जोखीम व्याजदर यावरून केले आहेत.
रिस्कोमिटरमुळे,
●योजनेतील जोखीम समजते.
●योग्य फंडाची निवड करता येते.
●पारदर्शकपणे जोखीम स्तर समजतो.
●गुंतवणूक निर्णय सहज घेता येतात.
●जोखीम परतावा यातील संबंध समजतो.
●आपल्या उद्दीष्ट आणि जोखीम क्षमताची जाणीव होते.
●सर्वच योजना वेगवेगळ्या स्तरात विभागता येतात.
●अयोग्य योजना टाळता येतात.
●कमी जोखिम घेणारे अधिक जोखमीच्या योजना टाळू शकतात.(अपूर्ण)
सेबीच्या सारथी या अँपवर उपलब्ध माहितीचा भावानुवाद.
उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत.
लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही याची नोंद घ्यावी)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment