Friday, 10 October 2025
समजूत घेऊया भांडवल बाजारातील गुंतवणूक भाग 3
#समजून_घेऊया_भांडवल_बाजारातील_गुंतवणूक_भाग_3
9. मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (एएमसी):
मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ही एक आर्थिक संस्था असून त्या त्यांच्या ग्राहकांच्या रकमेची गुंतवणूक आणि व्यवस्थापन करतात. सर्वसाधारण गुंतवणूकदार, निवृत्ती नियोजन फंड, बँका, विमा कंपन्या, विविध कंपन्या आणि सरकारही, या सर्वांचा त्यांच्या ग्राहकांत समावेश होतो. किमान जोखीम घेऊन आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त परतावा मिळवून देणे हे मालमत्ता व्यवस्था कंपन्यांचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यांचे कार्य एकाद्या न्यासासारखे असते. म्युच्युअल फंडांचे कार्य ट्रस्टप्रमाणे चालते आणि मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या त्यांच्या गुंतवणूक व्यवस्थापक कंपन्याना म्युच्युअल फंड योजना पुरस्कृत करतात त्यांना नियमानुसार आपली आर्थिक सक्षमता सिद्द ठेवावी लागते. या कंपन्या खाजगी अथवा सार्वजनिक मर्यादित असल्या तरी त्यांना नियामक बंधने पाळावी लागतात. त्याचप्रमाणे कंपनी नियमाप्रमाणे नियम, प्रक्रिया, नियंत्रण, व्यवस्थापन, जबाबदारी, पारदर्शकता, हितसंबंधांचा समतोल, नैतिक आणि कायदेशीर गोष्टीचे पालन करावे लागते. गुंतवणूकदारांचे रक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन करावी लागते. कंपनीच्या संचालक मंडळात एक स्वतंत्र संचालक नेमावा लागतो. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांचा मुख्य उद्देश किमान जोखीम पत्करून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देणे आणि म्युच्युअल फंडांसाठी आवश्यक सुविधा उभ्या करणं हा असतो. या कंपन्या गुंतवणूकदारांची आर्थिक उद्दिष्ट, जोखीम क्षमता, गुंतवणूक कालावधी समजून घेतात. त्याच्या आधारे विविध मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करतात. त्याच्याकडे तज्ज्ञ व्यवस्थापक, तांत्रिक विश्लेषक असतात. आर्थिक संकेतक, कंपनी कामगिरी विचारात घेऊन ते त्यातील जोखिम समजून घेऊन गुंतवणूक संच कसा बनवायचा यासंबंधी निर्णय घेतात.
मालमत्ता व्यवस्थापन कंपनीपासून मिळणारे फायदे:
●व्यावसायिक व्यवस्थापकांच्या अनुभवाचा लाभ- वेगवेगळ्या गुंतवणूक संकल्पना पुढे येत असल्याने त्या समजून घेऊन गुंतवणूक करणे दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांकडे तज्ज्ञ सल्लागारांचा ताफा उपलब्ध असल्याने त्यांचा उपयोग होऊन नवीन गुंतवणूकीत होणाऱ्या सर्वसामान्य चुका टाळता येतात.
●गुंतवणुकीचे विविधिकरण: मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांकडे मोठा गुंतवणूक निधी जमा होत असल्याने त्याची विभागणी वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारात करता येत असल्याने एकाच प्रकारच्या गुंतवणुकीतील धोका टाळता येतो. त्यामुळे एकाद्या गुंतवणूकीतून पुरेसा परतावा मिळाला नाही तरी त्याचा योजनेच्या एकूण परताव्यावर फारसा परिणाम होत नाही.
●वेळेची बचत: सध्याच्या वेगवान जगात आपली नोकरी अथवा व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या, महत्वाकांक्षा, छंद यांचा समतोल साधताना गुंतवणूकीकडे सातत्याने लक्ष देणे अनेकदा जमत नाही. मालमत्ता कंपन्या ही जबाबदारी उचलत असल्याने गुंतवणूकदारांच्या वेळेची बचत होते.
●विविध गुंतवणूक प्रकारांची उपलब्धता: जागतिक बाजार, पर्यायी गुंतवणूक आणि पारंपरिक गुंतवणूक असे विविध पर्याय मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या गुंतवणूकदारांना देत असल्याने गुंतवणूकदाराना अनेक पर्याय उपलब्ध होतात.
●जोखीम विभागणी: सर्वसाधारण बाजार कल खाली असताना मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या अशी गुंतवणूक तंत्रे वापरतात ज्यामुळे गुंतवणूकदारांचे कमीतकमी नुकसान होईल.
त्यामुळे आर्थिक मंदीतही गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक सुरक्षित असल्याचे समाधान मिळते.
10. व्यवस्थापित मालमत्ता मूल्य (assets under management):
AUM हा शब्दप्रयोग अनेकदा आपण ऐकला असेल. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्यावतीने वित्तसंस्था अथवा वित्तीय व्यवस्थापक यांच्याकडून व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या सर्व मालमत्तेचे बाजारमूल्य.
ही गुंतवणूक शेअर्स, कर्जरोखे, स्थावर मालमत्ता किंवा अन्य कोणत्याही आर्थिक साधनांत असू शकते. त्यांच्या बाजारमूल्यामुळे या संस्थेकडे किती मोठी जबाबदारी आहे याचा अंदाज गुंतवणूकदार बांधू शकतात.
व्यवस्थापित मालमत्तेची मोजणी कशी करायची?
व्यवस्थापित मालमत्तेची मोजणी करणं अतिशय सोपं आहे. गुंतवणूक संचातील सर्व मालमत्ता प्रकारांचे बाजारमूल्य काढणे. बाजारमूल्य म्हणजे चालू परिस्थितीत या मालमत्तेची विक्री केली असता मिळू शकणारी किंमत. समजा एखाद्या गुंतवणूक व्यवस्थापकाकडे 100 गुंतवणूकदार आहेत प्रत्येक गुंतवणूकदाराकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स, कर्जरोखे याशिवाय अन्य गुंतवणूक आहे. त्या सर्वांचे बाजारमूल्य म्हणजे व्यवस्थापित मालमत्ता. गुंतवणूक केलेल्या मालमत्तेचे मूल्य बदलत असल्याने व्यवस्थापित मालमत्ता मूल्य सातत्याने वरखाली होत असते. त्यामुळेच ही गुंतवणूक म्युच्युअल फंड योजनेची असेल तर तिचे निव्वळ मालमत्ता मूल्य दररोज दिवसाच्या शेवटी असलेल्या बंद भावांवरून काढले जाते.
व्यवस्थापित मालमत्ता मूल्याचे महत्व: मालमत्ता व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीच्या दृष्टीने त्याच्याकडून किती मालमत्ता व्यवस्थापित केली जाते त्याचे मूल्य कळणे महत्वाचे आहे. त्यावरून ती कंपनी किती मोठी आहे याचा अंदाज बांधता येतो. जर ती कंपनी म्युच्युअल फंड योजना व्यवस्थापित करीत असेल, गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळत असेल आणि त्यांचा व्यवस्थापन खर्च कमी असेल तर त्या योजना गुंतवणूकदारांना आकर्षित करतात. अनेक गुंतवणूकदारही त्सदर योजनेत आपली गुंतवणूक वाढवू शकतात अथवा नव्याने गुंतवणूक करू शकतात. योजनेचा भूतकाळ चांगला असेल तर त्यांतील गुंतवणूक वाढू शकते याचा अर्थ एखाद्या योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली असेल तर त्या योजनेचा भूतकाळ चांगला असेलच असे नाही.
11. म्युच्युअल फंड योजना बदली म्हणजे काय?
समजा तुमची एक वेगवेगळ्या फुलझाडांची बाग आहे. काही झाडे पूर्णपणे डवरली आहेत तर काही तितकीशी वाढ दाखवत नाहीत त्यामुळे तुम्ही ती उपटून जिथे ती बहरतील अशा दुसऱ्या जागी लावता. गुंतवणूकीच्या जगात असं करणं म्हणजे योजना बदली होय.
म्युच्युअल फंडाच्या बाबतीत एका योजनेतील पैसे काढून घेऊन त्याच फंड हाऊसच्या दुसऱ्या योजनेत ते पैसे गुंतवणे. हे अगदी वर उल्लेख केलेल्या झाडाप्रमाणे आहे.
योजना बदलीचे महत्व:
●परताव्यातील वाढ: अश्या प्रकारे योजनेतील बदलामुळे एकंदरीत परतावा वाढण्याची शक्यता असते.
●जोखीम व्यवस्थापन: यामुळे असलेला धोका कमी झाल्याने उत्तम जोखीम व्यवस्थापन होण्याची शक्यता असते.
●गरजेनुसार केलेले बदल: आपल्या गरजामध्ये बदल होत असतात त्यानुसार योजनेत बदल केल्याने ते तुमच्या इच्छा आकांक्षाशी अनुरूप असतात आणि जोखीम कमी करतात.
योजना बदल कसा केला जातो?
●कोणत्या योजनेत बदल करायचा आहे ती योजना प्रथम शोधली जाते.
●तुमच्या गरजांच्या अनुरूप त्याच मालमत्ता कंपनीच्या अन्य योजनेची निवड केली जाते.
●एक विनंती अर्ज भरून दिला गेला की आधीच्या योजनेतील पैसे काढून घेऊन आलेल्या पैशातून निवडलेल्या नव्या योजनेचे युनिट बाजारभावाने घेतले जातात. असे अर्ज आता ऑनलाइन भरून देण्याची सोय आहे.
योजनेतील बदलांमुळे,
●जोखीम कमी होण्याची शक्यता असते.
●पैसे काढून घेऊन पूर्णपणे गुंतवणूक केली गेल्याने त्यातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते.
●यामुळे गुंतवणूकदारांची उद्दिष्टे लवकर पूर्ण होऊन लवकर आर्थिक स्थिरता मिळण्याची शक्यता वाढते.
सेबीच्या सारथी या अँपवर असलेल्या माहितीचा भावानुवाद (अपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत.
लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही याची नोंद घ्यावी)
3 ऑक्टोबर 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम येथे पूर्वप्रकाशीत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment