Thursday, 13 August 2026
सोन्याचे टोकनीकरण (पूर्वार्ध)
सोन्याचे टोकनीकरण : ब्लॉकचेनमुळे लंडनचे सुवर्णबाजारातील वर्चस्व टिकणार का?
(पूर्वार्ध)
शतकानुशतके सोने ही एक भौतिक मालमत्ता राहिली आहे. सोने स्वतःच्या मालकीचे असावे असे वाटत असेल, तर एकतर ते प्रत्यक्ष जवळ असणे आवश्यक होते किंवा ते सुरक्षितपणे ठेवणाऱ्या एखाद्या विश्वासार्ह संस्थेची गरज असायची. मात्र गेल्या काही वर्षांत सोन्याच्या मालकीचे आणि व्यापाराचे स्वरूप झपाट्याने डिजिटल होत आहे. आपणही हा बदल स्वीकारला असून संगणकीय सुवर्ण पावत्याचे व्यवहार आपल्या मुंबई शेअरबाजारात आणि राष्ट्रीय शेअरबाजारात चालू झाले आहेत. या बदलाच्या केंद्रस्थानी लंडन आहे. लंडन ही जगातील सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ आहे. बँका, तिजोऱ्या, रिफायनर्स, ब्रोकर आणि क्लिअरिंग संस्था यांचे मोठे जाळे येथे कार्यरत आहे. उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेतील एखादी सोन्याची खाण ऑस्ट्रेलियातील बँकेला सोने विकत असली, तरी त्या व्यवहाराचा काही भाग लंडनच्या वित्तीय पायाभूत सुविधांमधून होण्याची शक्यता असते. या व्यवस्थेला “लोको लंडन सिस्टीम” (Loco London System) असे म्हणतात परंतु आता या व्यवस्थेसमोर एक नवे आव्हान उभे राहिले आहे. सोन्याची मागणी हळूहळू आशियाकडे सरकत आहे. चीन आणि भारत हे जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या ग्राहकांपैकी आहेत. त्याचबरोबर अनेक देशांच्या केंद्रीय बँका सोन्याचा साठा वाढवत आहेत. त्यामुळे जागतिक सुवर्ण परिसंस्थेतील आपले स्थान टिकवण्यासाठी लंडनला बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आवश्यक झाले आहे.
या पार्श्वभूमीवर ब्रिटनची Financial Conduct Authority (FCA) आणि वित्तीय क्षेत्रातील इतर संस्था “Tokenised Gold” म्हणजे सोन्याचे टोकनीकरण यासाठी आवश्यक नियामक आणि बाजारपेठीय चौकट विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहेत.
यामध्ये डिजिटल टोकन हे तिजोरीत सुरक्षितपणे ठेवलेल्या विशिष्ट प्रमाणातील भौतिक सोन्यावरील मालकी किंवा हक्काचे डिजिटल प्रतिनिधित्व करू शकते. यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो पण येथे एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो—
एखाद्या केंद्रीकृत वित्तीय व्यवस्थेला सोने ब्लॉकचेनवर का आणायचे आहे? ब्लॉकचेनचा मूलभूत उद्देशच मध्यस्थांची गरज कमी करणे हा नाही का?
या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी प्रथम लंडनची सध्याची घाऊक सोन्याची बाजारपेठ कशी कार्य करते हे पाहणे आवश्यक आहे.
सोन्याच्या मालकीचे दोन प्रमुख प्रकार
मोठ्या प्रमाणावर संस्थात्मक पातळीवर सोने ठेवण्याच्या व्यवस्थेत प्रामुख्याने दोन प्रकार दिसतात.
●विनियोजित नसलेले सोने — आजच्या घाऊक सोन्याच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर सोने Unallocated Account च्या माध्यमातून ठेवले जाते. याची तुलना आपण सोन्याच्या औंसमध्ये असलेल्या बँक खात्याशी करू शकतो. समजा, तुमच्या खात्यात 100 औंस सोने आहे. याचा अर्थ तिजोरीत तुमच्या नावावर 100 विशिष्ट सोन्याच्या लगडी ठेवलेल्या आहेत, असा होत नाही. त्याऐवजी तुम्हाला बुलियन बँक किंवा क्लिअरिंग बँकेकडून 100 औंस सोन्याचा सर्वसाधारण हक्क (General Credit Claim) असतो.
याचा मोठा फायदा असा की मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी-विक्री करणे तुलनेने सोपे होते. प्रत्येक सोन्याची लगड स्वतंत्रपणे ओळखणे, हलवणे किंवा साठवणे आवश्यक नसते.
परंतु यासाठी एक किंमतही मोजावी लागते.
तुम्ही संबंधित संस्थेचे असुरक्षित कर्जदार (Unsecured Creditor) असता. उदाहरणार्थ, जर तुमच्या बुलियन बँकेला आर्थिक अडचण आली, तर तुमचा सोन्यावरील दावा त्या संस्थेच्या आर्थिक स्थितीशी जोडला जातो कारण तुमच्या नावावर विशिष्ट सोन्याच्या लगडी ठेवलेल्या नसतात.
●विनियोजित किंवा विशिष्ट सोने — हे अगदी बरोबर उलट आहे. यामध्ये विशिष्ट क्रमांक असलेल्या सोन्याच्या लगडी थेट मालकाच्या नावावर नोंदवल्या जातात आणि त्या त्याच्या मालमत्तेचा भाग असतात. कस्टोडियन किंवा तिजोरीची भूमिका मुख्यतः त्या सोन्याची सुरक्षित साठवणूक करण्याएवढी मर्यादित असते.
यामुळे गुंतवणूकदाराला सोन्यावर अधिक स्पष्ट आणि मजबूत मालकी हक्क मिळतो. त्याची मालकी कस्टोडियनच्या आर्थिक स्थितीपासून मोठ्या प्रमाणात स्वतंत्र राहते. मात्र या सोन्याच्या संरक्षणासाठी अधिक खर्च आणि तुलनेने कमी लवचिकता स्वीकारावी लागते. प्रत्येक सोन्याची लगड ओळखणे, साठवणे, विमा उतरवणे आणि व्यवस्थापित करणे आवश्यक असते. तसेच एखाद्या विशिष्ट सोन्याच्या लगडीचे छोटे भाग करून त्यांची सहज देवाणघेवाण करणेही सोपे नसते आणि नेमक्या याच ठिकाणी सोन्याच्या टोकनीकरणाची संधी निर्माण होते. कल्पना करा की एक सोन्याची लगड सुरक्षित तिजोरीत ठेवलेली आहे. मात्र त्या संपूर्ण सोन्याच्या लगडीचा मालक एकच व्यक्ती किंवा संस्था नसून तिची मालकी शेकडो डिजिटल टोकनमध्ये विभागलेली आहे. प्रत्येक टोकन त्या भौतिक सोन्यातील कायदेशीरदृष्ट्या मान्य हिस्सा दर्शवू शकते. त्यामुळे गुंतवणूकदाराला संपूर्ण सोन्याची लगड खरेदी करण्याची किंवा ती स्वतःकडे ठेवण्याची गरज नाही. उदाहरणार्थ, तो एखाद्या सोन्याच्या लगडीतील 1% हिस्सा डिजिटल टोकनच्या स्वरूपात खरेदी करू शकतो. सोने मात्र तिजोरीत सुरक्षित राहते.
ही गोष्ट आता केवळ सैद्धांतिक कल्पना राहिलेली नाही. सप्टेंबर 2025 मध्ये World Gold Council आणि कायदेविषयक संस्था Linklaters यांनी Pooled Gold Interests (PGI) नावाची चौकट सादर केली. यामागील कल्पना अशी आहे की घाऊक गुंतवणूकदारांना बुलियन बँकेविरुद्ध केवळ सर्वसाधारण कर्जदावा ठेवण्याऐवजी भौतिक सोन्याच्या एका पूलमध्ये लाभकारी मालकी हक्क (Beneficial Ownership) मिळू शकतो. म्हणजेच, Allocated आणि Unallocated Gold यांच्यातील दरी भरून काढण्याचा हा प्रयत्न आहे. गुंतवणूकदाराला प्रत्यक्ष सोन्याशी जोडलेला हक्क मिळतो आणि त्याच वेळी त्या हक्काचे विभाजन आणि हस्तांतरण अधिक सुलभ होऊ शकते.
लंडनमध्ये सोन्याचे टोकनीकरण प्रत्यक्षात सुरू
या तंत्रज्ञानाची चाचणी लंडनच्या सोन्याच्या बाजारपेठेतही सुरू झाली आहे. एचएसबीसी, ही जगातील प्रमुख मौल्यवान धातूंच्या कस्टोडियन संस्थांपैकी एक आहे. तिने सन 2023 मध्ये लाइव्ह गोल्ड टोकनायझेशन प्लॅटफॉर्म सुरू केले. या मंचावर लंडनमधील एचएसबीसीच्या तिजोरीत ठेवलेल्या भौतिक सोन्याचे डिजिटल प्रतिनिधित्व तयार केले जाते. संस्थात्मक ग्राहक त्यांच्या इवोल्व्ह (Evolve) या मंचावर त्यांची खरेदी-विक्री करू शकतात. प्रत्येक टोकन ट्रॉय औंस सोन्याच्या एका अंशाचे प्रतिनिधित्व करते. ही व्यवस्था ब्रिटनच्या डिजिटल सिक्युरिटीज सॅन्डबॉक्स अंतर्गतही विकसित केली जात आहे. त्यामुळे लंडनच्या सोन्याच्या बाजारपेठेचे डिजिटल रूपांतर ही केवळ भविष्यातील कल्पना राहिलेली नाही. (अपूर्ण)
उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment