Friday, 16 January 2026

भारतातील बँकिंग क्षेत्र सन 2025 चा आढावा

#भारतातील_बँकिंग_क्षेत्र_सन_2025_चा_आढावा भारतातील बँकिंग व्यवसायाच्या संबंधित काही माहिती अलीकडेच भारतीय रिझर्व बँकेने अलीकडे प्रकाशित केलेल्या ‘Trend and Progress of Banking in India’ आणि ‘Financial Stability Report’ या दोन अहवालातून समोर आली आहे. ●अनुत्पादक कर्जाची (NPA’s) पातळी खुप कमी झाली - भारतीय बँकांची अनुत्पादक कर्जे लक्षणीयरीत्या कमी झाली. खराब कर्ज (NPAs) जवळपास कमी झाले. मार्च 2025 अखेर हे प्रमाण 2.2% एवढे असून ते गेल्या दशकातील नीचांकी पातळीवर आले आहे. हे एक चांगल्या व्यवस्थापकीय कौशल्याचे लक्षण मानले जाते. त्यामुळे आपली अशी समजूत होईल की कर्जाची वसुली योग्य पद्धतीने होत असावी. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे तर त्यामागे, या बँकांनी 1.58 लाख कोटी रुपयांनी जुनी अनुत्पादक कर्ज पुस्तकातून काढली (write-offs) आणि कर्ज वसुलीसाठी विविध उपाय वापरले. त्यात 32% रक्कम परत करण्याच्या बोलीवर 68% रक्कम सोडून देण्यात आली, त्यामुळे त्यांचे नफातोटा पत्रक आकर्षक दिसत आहे, पण ह्या मागील वास्तविक अर्थ जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नादारी आणि दिवाळखोरी संहिता 2016 अंतर्गत बरेच प्रकरणे सोडवली गेली, यातील बरीच कर्ज संपूर्ण वसूली न करता बंद करण्यात आली. ●मालमत्ता पुनर्बांधणी कंपन्या (ARC) आणि थकीत कर्ज विक्री- मालमत्ता पुनर्बांधणी कंपन्या या रिजर्व बँकेद्वारे नियंत्रित विशेष कंपन्या असून या कंपन्या बँकांचे जमाखर्च व्यवस्थित करण्यावर भर देतात. त्या बँकांकडून अनुत्पादक कर्जे कमी दरात विकत घेतात. त्या बदल्यात सुरक्षा पावत्या देतात हा उपाय बँकांना त्यांचे कर्ज पुस्तक नेटके करण्यासाठी होतो. यानंतर कर्जदारांशी बोलून कर्जाची पुनर्रचना, मालमत्ता विक्री अथवा एकरकमी कर्ज फेडीबाबत समझोता असे उपाय योजतात. ●फिनटेक क्रांती आणि जोखीम - डिजिटल कर्ज देणाऱ्या फिनटेक कंपन्या, अँप आधारित कर्जपद्धती आणि अन्य कुणाचीही मदत न घेता त्वरित तात्काळ कर्ज वितरण करणाऱ्या मंचांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला. हे मंच विशेषतः 35 वर्षाखालील लोकांमध्ये लोकप्रिय झाले. मात्र, फिनटेकच्या माध्यमातून घेतलेली कर्जे प्रामुख्याने विनातारण असतात आणि त्यात हप्ता न भरला गेल्याने त्यांची वसुली न होण्याची शक्यता जास्त बघायला मिळते. तसेच, एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या फिनटेक कंपन्यांकडून कर्ज घेतल्यास सर्व हप्ते भरणे अशक्य झाल्याने त्यातील जोखीम वाढते. एवढेच नाही तर अशी कर्जे बँका फिनटेक कंपन्यांच्या सहयोगाने देऊ करतात अथवा खरेदी करतात त्यामुळे त्यातील न झालेल्या वसुलीमुळे बँकांचे नुकसान होते. बँका आणि फिनटेक कंपन्या यांनी देऊ केलेली अनेक वैयक्तिक कर्जे मोठ्या प्रमाणात थकीत झाली आहेत. ●बँका आणि बिगर बँकिंग कंपन्या यांच्यातील भागीदारीचे फायदे आणि धोके- बिगर बँकिंग कंपन्यांच्या माध्यमातून आपला विस्तार व्हावा या हेतूने बँका त्यांना कर्ज पुरवठा करतात. त्यामुळे शाखा न उघडता बँकिंग सेवेचा विस्तार होतो. यामुळे कर्ज व्यवहार वाढीस लागले आहेत. जर एखादी बिगर बँकिंग कंपनी अडचणीत आली तर त्यांनी दिलेली ही कर्जे बँकेची जोखीम वाढवू शकतात त्यामुळे व्यवसायातील सर्व जोखीम एकाच ठिकाणी केंद्रित होते. ●ठेव (Deposits) आणि निधीची समस्या- बँकांचे महत्वाचे भाडवल म्हणजे जनतेच्या ठेवी. लोक आता त्याच्याकडील जास्तीचे पैसे बँकांच्या मुदत ठेवीत ठेवण्याऐवजी अधिक परतावा मिळेल अशा म्युचुअल फंड योजना, कंपनी डिपॉझिटमध्ये ठेवणे पसंत करतात. कर्जाची मागणी वाढत असताना त्या प्रमाणात ठेवी (deposits) तितक्या वेगाने वाढल्या नाहीत तर बँकांचे कर्ज पुरवठा करण्यात अडचणी येतात. मुदत ठेवी आकर्षित करण्यासाठी बँकांना त्यावरील व्याजदर वाढवावा लागतो. त्यामुळे ठेवींवरील व्याजदर आणि कर्जावरील व्याजदर यातील फरक कमी होतो त्यामुळे त्यांची नफा मिळण्याची क्षमता कमी होते. सन 2026 मध्ये काय बघायचे? ●अनुत्पादक मालमत्ता खरंच कमी राहतील का सध्या जशी कर्ज खात्यातून काढली गेली तशी काढली जातील. ●फिनटेक कंपन्या आणि डिजिटल कर्ज मंच यांच्याद्वारे कर्जे वितरीत केली जात असताना जोखीम कशी हाताळली जाईल? ●बँका आणि बिगर बँकिंग कंपन्या यांच्यातील भागीदारीमुळे बँकांची कर्ज जोखीम वाढेल का? ●कर्ज वाढण्याच्या तुलनेत ठेवी अधिक वाढविण्याचे उपाय काय असतील? हे सारे घटक 2026 मध्ये बँकिंग व्यवसायास योग्य आकार देतील. थोडक्यात, ●अनुत्पादक मालमत्ता ऐतिहासिकदृष्ट्या कमी झाल्या असल्या त्या त्या पूर्णतः कमी झाल्या नाहीत तर त्या कर्ज पुस्तकातून दूर करण्यात आल्या आहेत. ●फिनटेक कर्जांनी बँकिंगमध्ये नवीन गती आणली असली तरी पण त्यामुळेची ते वसूल न होण्याची जोखीम दिसते. ●ठेवी पुरेश्या प्रमाणात कर्जाच्या गतीने न वाढल्यास त्यांना जास्त रक्कम मोजून निधी जमवावा लागत असल्याने बँकांच्या फंडिंग रचनेवर ताण येत आहे. ◆सन 2026 मध्ये बँकिंग सेक्टरची वाढ आणि स्थिरता यांचा समतोल कसा राहील हे पाहणे महत्वाचे आहे. उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)

No comments:

Post a Comment