Friday, 22 November 2024

तुझं माझं आपलं

#तुझं+माझं=आपलं आजकाल पतिपत्नी दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करीत असतात. “व्यक्ती तितक्या प्रकृती” या न्यायाने त्यांची पैसे खर्च करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. एकाची वृत्ती ही दुसऱ्यास त्याचा कंजूसपणा अथवा उधळपट्टी वाटू शकते. आर्थिक उद्दिष्टही वेगवेगळी असू शकतात उदा. कर्ज घ्यावे की न घ्यावे, घेतल्यास लवकरात लवकर फेडावे की आरामात फेडावे, पैशांचे व्यवहार कुणाशी कोणत्या मर्यादेत करावे, गुंतवणूक कोणत्या मालमत्ता प्रकारात करावी इ. याबाबत मतभेद असू शकतात. त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परस्परातील नातेसंबंधावर प्रभाव पडतो. ज्यांचे एक दुसऱ्याशी पूर्णपणे समर्पण आहे असे मोजकेच अपवाद सोडले तर अनेकांच्या दृष्टीने हा अतिशय नाजूक विषय आहे. एकमेकांना समजून घेऊन कोणतेही पूर्वग्रह न ठेवता संवाद साधल्यास, काही बाबतीत तडजोड केल्यास संसार सुखाचा होतो. ■आर्थिक वादात सन्माननीय मार्ग काढण्याचे उपाय- ●संवाद साधावा - हा कोणताही वाद मिटवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. आर्थिक विषयातील मतभेद कोणत्याही पूर्वग्रहविरहित चर्चेतून नक्कीच सुटू शकतात. दोन व्यक्तींची जडणघडण वेगळी असल्याने त्यांची आर्थिक मूल्ये, ध्येय, निष्ठा वेगवेगळ्या असणे साहजिकच आहे त्यातून कोणताही एकतर्फी निष्कर्ष काढू नये. मुद्दाम ठरवून निवांतवेळी यावर चर्चा करावी ती करत असताना वैयक्तिक टीकाटिपणी करू नये. ●एकमेकांची पैशांबद्धलची मानसिकता समजून घ्यावी - प्रत्येकाची पैशांविषयीची मानसिकता ही जडणघडण, अनुभव आणि व्यक्तिमत्त्व यावर अवलंबून असते. काही व्यक्ती या काटकसर करणाऱ्या असतात तर काहीजण सढळ हस्ते खर्च करणाऱ्या असतात. एकमेकांनी ती जाणून घेतल्यास त्यातून त्यातून मध्यममार्ग काढता येतो. एकमेकांनी त्यांच्या कुटुंबीयांनी गुंतवणूक कशी केली. त्यांना कोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर त्यांनी काय उपाययोजना केली, हे जाणून घेतल्यास मध्यममार्ग कोणता त्याचा शोध घेता येईल. ●सर्वसाधारण सहमत असलेल्या आर्थिक धेय्यांना प्राधान्य द्यावे - सामायिक किंवा त्याच्या जवळपास जाणारी काही उद्दिष्टे असू शकतात उदा घर घेणे, जग पहाणे, कर्जफेड करणे ती वेगळी करून त्यांना प्राधान्य दिल्यास अनेक छोटेमोठे वाद निर्माणच होणार नाहीत. भविष्यकालीन तरतुदींच्या दृष्टीने आकस्मिक अडचणींवर मात करण्यासाठी कुटुंबाचा राखीव फंड असावा तसेच सेवानिवृत्ती नंतरच्या खर्चाची तोंडमिळवणी करण्याएवढा निधी असावा, यावर निश्चित एकमत होऊ शकते. त्यादृष्टीने मिळून प्रयत्न करावेत, नियमित खर्चावरून एकमेकांना टोचून बोलू नये. ●अंदाजपत्रक तयार करावे - अनेकदा खर्च करताना आपली समजूत अशी असते की आपण योग्य तोच खर्च करतो. आपले काही खर्च असे असतात की जे आपण टाळू शकतच नाही तर काही खर्च पुढेमागे करता येणे शक्य असते एकमेकांनी सहमत नसलेल्या खर्चावर चर्चा करून आपल्या अपेक्षा सांगितल्या तर खर्च, बचत आणि गुंतवणूक यावर निश्चित निर्णय घेता येतील. यासाठी अंदाजपत्रक बनवणे उपयुक्त ठरते त्यात काही बाबतीत थोडेफार स्वातंत्र्य घेता येईल ज्यायोगे दोघांनाही काही खर्च स्वतःच्या मर्जीनुसार करता येईल. आपली मिळकत, खर्च आणि उद्दिष्टे यांचा समन्वय साधणारी मोबाईल अँप्स उपलब्ध आहेत त्यांची मदत घेता येईल. आपल्या अंदाजपत्रकानुसार काही मर्यादेत एकमेकांना मोकळेपणाने खर्च करता आल्यास दोघांनाही आनंद मिळेल. ●आर्थिक जबाबदाऱ्यांची वाटणी करावी - आर्थिक जबाबदाऱ्यांची वाटणी करणे म्हणजे त्या अर्ध्याअर्ध्या उचलणे असे अपेक्षित नसून आपली बलस्थाने ओळखून त्यांची विभागणी करणे उदा एक व्यक्ती मासिक खर्च सांभाळेल तर दुसरा केवळ दीर्घकालीन गुंतवणुकीवर आपले लक्ष केंद्रित करेल. असे करत असताना कोणालाही दुय्यम न समजता अधूनमधून त्याचे मूल्यांकन करावे प्रत्येकजण आपापली भूमिका सांभाळेल आणि सुरळीतपणे पार पाडेल. ●तडजोड करावी लवचिकता बाळगावी - दोन व्यक्तींचे आर्थिक प्राधान्यक्रम सारखेच असतील तर ठीक पण नसतील तर त्यावर वाद घालण्यात काही अर्थ नाही. चर्चा करून तडजोड करणं उत्तम. तेवढी लवचिकता असेल तरच मध्यममार्ग निघेल “मी म्हणतो तेच बरोबर” अशी एकतर्फी भूमिका नसावी. ●मोठे आर्थिक निर्णय परस्पर घेऊ नयेत - काही निर्णय चुकल्यास त्याचे दीर्घकालीन परिणाम कुटुंबावर होत असतात. विशेषतः जवळच्या व्यक्तीस पैसे उधार देणे, जामीन राहणे, मोठी खरेदी इ. हे सर्व आवश्यक असले तरी त्याचे दूरगामी परिणाम होत असतात. या मुद्द्यांवर सर्वसाधारण एकमत नसेल तर त्यातून मोठे वाद निर्माण होऊ शकतात त्यासाठीच्या निश्चित मर्यादा ठरवाव्यात आणि सहमतीने निर्णय घ्यावेत. ●कर्जाबाबत पारदर्शकता असावी - अनेकदा वेगवेगळ्या कारणाने कर्ज घ्यावे लागते. त्यांची अत्यंत आवश्यक आणि अनावश्यक अशी विभागणी करता येईल. यातील कोणतेही कर्ज जोडीदारास पूर्वकल्पना न देता परस्पर घेऊ नये. यातून काही अडचणी निर्माण झाल्यास अहंकार दुखावला जातो. आपल्या नातेसंबंधात यामुळे वादळ उद्भवण्याची शक्यता असते. ●व्यावसायिक सल्लागाराची मदत घ्यावी - मोठे मतभेद असलेले आर्थिक निर्णय एकमेकांवर लादणे चुकीचे आहे यासाठी व्यावसायिक आर्थिक सल्लागाराची किंवा विश्वासार्ह जाणकाराची मदत घेता येईल. तो निःपक्षपातीपणे आपले मत सांगेल ते दोघांनीही मोकळेपणाने मान्य करावे. ●समजून घ्यावे आणि संयम पाळावा - आर्थिक विवाद निवळायला प्रामाणिक प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी वेळ लागतो यासाठी कोणतीही जादूची कांडी उपलब्ध नाही. त्यासाठी समजून घेणे आणि संयमाची अत्यंत गरज असते. “माझंच खरं” करण्यापेक्षा आपलेपणाने प्रत्येक गोष्टीकडे पाहिल्यास आपोआपच सुसंवाद होत राहील. प्रत्येक समस्येची छोट्या भागात विभागणी करावी, छोटी छोटी उद्दिष्टे साध्य होण्याच्या टप्यावर आनंद साजरा करावा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. थोडी असहमती असली तरी कुठेही तोल ढळू देऊ नये. केवळ आर्थिक बाबीसाठी नव्हे तर जीवनातील सर्वच वादग्रस्त समस्यांसाठी या गोष्टींचा थोड्याफार फरकाने उपयोग होईल, आणि “तुझं”, “माझं” करताकरता ते “आपलंच” होऊन जाईल. संसाराकडे पाठ फिरवणाऱ्या रामदास स्वामींनी त्याच्या मनाच्या श्लोकांतून संसार सुखाचा होण्यासाठी उत्तम मार्ग दाखवला आहे, ते म्हणतात- तुटे वाद संवाद त्याते म्हणावे विवेके अहंभाव याते जिणावे। अहंतागुणे वाद नाना विकारी तुटे वाद संवाद तो हितकारी।। ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायती या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तीक आहेत.) अर्थसाक्षर डॉट कॉमवर 22 नोव्हेंबर 2024 रोजी पूर्वप्रकाशीत.

No comments:

Post a Comment