Friday, 29 November 2024
तांत्रिक विश्लेषण
#तांत्रिक_विश्लेषण
बाजारात दिसतो तो मालमत्ता प्रकारांचा बाजारभाव. एक गुंतवणूकदार म्हणून आपल्या गुंतवणुकीचे योग्य मूल्य शोधून कमी किमतीत अथवा रास्त किमतीत (स्वस्त नव्हे) गुंतवणूक संधी शोधणे हे कौशल्याचे काम आहे. यासाठी मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण यांचा आधार घेतला जातो. मूलभूत विश्लेषणात उत्पादक, उत्पादन, विक्री, कमाई यासारख्या व्यवसायाच्या कामगिरीवर आधारित संदर्भांचा विचार केला जातो. यासाठी वार्षिक अहवालाचा उपयोग होतो. मध्यम आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीसाठी या पद्धतीचा वापर करतात. तांत्रिक विश्लेषण भूतकाळातील किंमत, हालचाल, बाजार उलाढाल, त्यांची पद्धती, रचना याच्या उपलब्ध माहितीवरून भविष्यातील कामगिरीचा अंदाज बांधून कोणत्या भावाने खरेदी करायची, काय भाव आल्यावर विक्री करायची याचा अंदाज बांधला जातो. हे करत असताना “भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची सातत्याने पुनरावृत्ती होत असते” हे गृहीत धरले आहे. अल्पकालीन गुंतवणूकदारांना किमान भांडवलात आणि कमी कालावधीत अधिकाधिक नफा मिळवायचा असल्याने ते प्रामुख्याने तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतात.
◆अल्पकालीन गुंतवणूकदार डे ट्रेडर्स, स्विंग ट्रेडर्स, पोझिशनल ट्रेडर्स तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून -
●आपण नेमकी खरेदी अथवा विक्री करून कुठे उलट ट्रेंड घ्यायचा ते ठरवतात.
●समर्थन आणि प्रतिकार पातळी ओळखून आपले नुकसान होऊ नये याची काळजी घेतात.
●बाजार भावना म्हणजे बाजारात तेजी आहे अथवा मंदी आहे किंवा एका विशिष्ट भावातच तो स्थिर झाला आहे ते जाणून त्यात होणारे बदल लक्षात घेतात.
◆हे विश्लेषण जाणून घेताना विविध तक्ते आलेख यांचा वापर केला जातो ते किंमत आणि उलाढाल याचा आधार घेऊन बनवले जातात ते असे-
●रेखा तक्ते - हे बाजाराचा कल एका रेषेत दृश्य स्वरूपात दाखवतात यासाठी विशिष्ठ कालावधीतील छोटे भाग घटना यांचा संदर्भ घेतला जातो.
●बार चार्ट - हे विशिष्ट कालावधीतील खुला बंद भाव सर्वात कमी आणि सर्वाधिक भाव याचा विचार करून बनवलेले असतात त्यामुळे ते रेखा तक्त्याहून अधिक तपशील पुरवतात.
●कॅडल स्टिक चार्ट - हे बार चार्टशी मिळतेजुळते असून त्यामुळे किंमत हालचाल आणि कलबदल ओळखण्यास मदत करतात.
◆तांत्रिक विश्लेषणाचे विविध संकेतक - भविष्यातील किमतीचा अंदाज बांधण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. भारतीय बाजारात वापरले जाणारे सर्वसामान्य संकेतक असे आहेत.
●अद्ययावत सरासरी किंमत (Moving Average) ही विशिष्ट कालावधीतील भूतकाळातील दिलेल्या किंमतीचा विचार करून अंकगणितीय सरासरी घेते तर (Exponential MA)मध्ये अलीकडच्या किमतीचा विचार करून सरासरी काढली जाते. यामुळे अल्प आणि मध्यम काळातील किंमतीचा कल समजून घेऊन अंदाज बांधता येतो.
●सापेक्ष शक्ती निर्देशांक (Relative Strenth Index) अलीकडील ट्रेडिंग कालावधीच्या बंद होणाऱ्या किमतीवरून शेअर किंवा बाजाराच्या शक्तीची म्हणजे अधिक खरेदी होत असल्यास भाव वर जाण्याची शक्यता अथवा अधिक विक्री होत असल्यास किंमती खाली येतील याच्या शक्यता सूचित करतो.
●बदलते सरासरी अभिसरण / विचलन (MA covergences divergence) - यातून दोन इएमए मधील संबध दाखविला जातो. अभिसरणात दोन्ही इएमए एकमेकांच्या दिशेने जातात तर विचालनात एकमेकांपासून दूर जातात अल्प मुदतीत किंमत हालचाल ओळखून त्याचे मूल्यांकन यामुळे करता येते.
●हालचाल रेषा (Trendline) - ही एक रेषा असून तिच्या साहाय्याने बाजार हालचाल म्हणजेच समर्थन आणि प्रतिकार कुठे असतील ते समजू शकते, त्यानुसार व्यवहार करता येतात. या रेषा क्रम संलग्न करून निष्कर्ष काढण्यासाठी वापरल्या जातात. बाजार दिशा आणि सामर्थ्य दाखवतात.
●समर्थन आणि प्रतिकार - भाव पातळी एकच एक दिशा दाखवीत नाही जर भाव वरवर जात असेल तर एका मर्यादेनंतर तो खाली येतो किंवा खाली खाली जाणारा भाव एका मर्यादेवर स्थिर होऊन वाढतो नंतर एका पातळीवर स्थिरावतो. या स्थिरावलेल्या पातळीत भाव वर खाली होत असल्याने कोणत्याही परिस्थितीत गुंतवणूक संधी असतात.
●करारांची संख्या - एकूण खरेदी विक्री करार किती झाले त्याच्या संख्येवरून त्याचप्रमाणे करार करण्यास स्वारस्य असलेल्या गुंतवणूकदारांची संख्या आणि त्यात होणारी उलाढाल अचानक होणारी वाढ यावरून अनेकजण अंदाज बांधत असतात.
या सर्व संकेतकांच्या आधारे मोठ्या प्रमाणात तांत्रिक विश्लेषण केले जाते. बाजारात सर्वाधिक व्यवहार हे झटपट फायदा मिळवणे या प्रकारातले तर त्याखालोखाल मध्यम कालावधीतील गुंतवणूकीत होत असल्याने बाजारफलक सतत हलता राहतो. यासाठी आधार म्हणून काही पद्धती वापरल्या जातात.
●कल ओळख (Trend anyalis) - यामध्ये किंमती वाढत राहतील अजून वाढतील, कमी येतील अथवा आणखी खाली जातील की एका मर्यादित पातळीत राहतील या गोष्टी पाहिल्या जातात.
●समर्थन आणि प्रतिकार (Support and Resistance) - जेथे शेअर्स अथवा बाजाराची घसरण थांबेल तो समर्थन बिंदू आणि जेथे वाढ थांबण्याची शक्यता तो प्रतिकार बिंदू शोधून खरेदी विक्री कोणत्या भावाने केली जावी ते ठरवले जाते.
●बॉलिंगर बँड - यातून सरासरी किंमत पट्याच्या आधारे बाजारातील तरलता आणि त्यातील बदल याविषयी माहिती मिळते.
●फिबोनाची रिटरॅटमेन्ट - हे एक गुणोत्तर आहे ज्यात किंमत खाली किंवा वर जाईल याच्या शक्यता सांगितल्या जातात.
●कॅडलस्टिक - ही एक जपानी पद्धत असून यामध्ये भावातील फरक आकृतिबंधाच्या साहाय्याने पाहण्याचा प्रयत्न करून त्याचा अर्थ लावण्यात येतो. उदा दोजी, हॅमर त्यांना निश्चित असे अर्थ आहेत.
●उलाढाल - विशिष्ट कालावधीतील बाजारातील व्यवहार त्यामध्ये झालेले बदल यावरून अंदाज बांधले जातात.
●विविध आलेख- भावातील बदल आलेखाद्वारे दाखवून त्यातून भविष्यातील किमतीचा अंदाज बांधण्यात येतो. त्यांना हेड अँड शोल्डर, डबल टॉप/ बॉटम, फ्लॅग यासारखी नावे दिली आहेत. अशा अलेखांचे अर्थ ही आहेत.
●पॅरा बोलीक एसएआर- याद्वारे असा बिंदू निश्चित होतो जेथून स्टॉक अथवा बाजार त्याच्या विरुद्ध दिशेत जाईल.
एक वा अनेक पद्धतीने केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या मर्यादा आहेत यातील कोणतीही पद्धत यशाची हमी देत नाही. तांत्रिक विश्लेषक त्यांचा वापर करून आपले व्यापार घोरण ठरवतात. असे करणे आणि त्यावर त्वरित निर्णय घेऊन तो अमलात आणणे हे अतिशय कौशल्याचे काम आहे. अनेकजण सर्वत्र उपलब्ध असलेल्या सारख्या माहितीस स्वतःचे ज्ञान आणि अनुभव यांची जोड देऊन निर्णय घेत असल्याने त्यांचे निष्कर्ष वेगवेगळे असू शकतात. जास्तीत जास्त एकसमान निर्णय असतील त्या दिशेवर बाजार कल झुकतो. तो ओळखण्यात अधिकाधिक अचूकता आली तरच गुंतवणूक यशस्वी होऊ शकते.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment