Friday, 27 January 2023
ऐतिहासिक दिवस
#ऐतिहासिक_दिवस
भारतीय शेअरबाजाराच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आजपासून शेअरबाजारातील व्यवहाराची सौदापूर्ती आता T+1 या पद्धतीने होणार आहे म्हणजेच खरेदी केले असल्यास शेअर्स किंवा विक्री केली असल्यास पैसे यांची देवाणघेवाण ब्रोकरच्या खात्यात दुसऱ्या कामकाज दिवशी होईल आणि त्याच दिवशी किंवा फारतर दुसऱ्या दिवशी ग्राहकाला पैसे मिळतील. यापूर्वी हे व्यवहार T+2 असे म्हणजे व्यवहार झाल्यावर कामकाजाच्या दोन दिवसानंतर होत असत. यात टप्याटप्याने सुधारणा होऊन आज चीन नंतर भारत हा जगातील दुसरा असा देश आहे तेथे शेअरबाजारातील व्यवहाराची सौदापूर्ती T+1 पद्धतीने होत आहे. जगभरात अन्य देशात सौदापूर्ती T+2 किंवा T+3 या पद्धतीने होत आहेत.
जगातील जुना, भारत आणि आशियातील सर्वात पहिला शेअरबाजार 9 जुलै 1875 साली चालू झाला. यामुळे उद्योगांना कमीतकमी खर्चात भांडबल उपलब्ध झाले. गुंतवणूकदारांना भागधारक या नात्याने उद्योगाची मालकी मिळाली. कंपनीच्या प्रति भागधारकाचे उत्तरदायित्व हे त्यानी गुंतवलेल्या रकमेइतकेच मर्यादित असून दुय्यम बाजारात भांडवल खरेदी विक्री दोन्ही संधी प्राप्त झाल्या. गुंतवणुकीवर डिव्हिडंड आणि भाववाढ असे दोन्हीही मिळू शकल्याने गुंतवणूक करण्याचे नवीन साधन मिळाले. 31 ऑगस्ट 1957 रोजी सिक्युरिटीज काँट्रॅक्ट ऍक्ट या कायद्याने अधिकृतता प्राप्त खाली. यापूर्वी असे व्यवहार केवळ विश्वासाने केले जाऊन पूर्ण केले जात असत. त्यास कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाल्याने एक्सचेंजच्या नियामक मंडळाची जबाबदारी वाढली. येथे मुंबईसह अनेक प्रादेशिक बाजार अस्तीत्वात आले देशभरात 23 प्रादेशिक बाजार कार्यरत होते. या सर्व बाजारांतील नियामक मंडळात दलालांचे वर्चस्व होते, कार्यकारी संचालकांवर दलालांचा दबाव होता बाजाराच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता नव्हती. दलालांची एकाधिकारशाही निर्माण खाली होती. सौदापूर्ती वेळेवर होत नसे. अनेक व्यवहार जाहीर केले जात नसत, त्यामुळे योग्य किमतीचा अंदाज बांधणे कठीण जात असत विक्री करताना कमीतकमी भाव आणि खरेदी करताना सर्वाधिक भावाने आकारणी केली जाई जवळपास सन 1990 पर्यंत अशीच स्थिती होती. देशी आणि विदेशी गुंतवणूकदार आकर्षित होण्यासाठी यासर्व व्यवहारात पारदर्शकता यावी असे तत्कालीन सरकारचे मत होते. त्यामुळे अर्थकारणास प्रोत्साहन मिळेल याहेतूने मुंबई शेअरबाजाराचे कंपनीकरण करून त्याचे विश्वस्त मंडळ वेगळे असावे यात दलाल असले तरी चालतील परंतु कार्यकारी मंडळात व्यावसायिक व्यवस्थापन अस्तित्वात असले पाहिजे असे सुचवण्यात आले. मुंबई शेअरबाजाराच्या तेव्हाच्या व्यवस्थापनाने अनुकूल भूमिका न घेतल्याने शेवटी अत्यंत नाईलाजाने सरकारने राष्ट्रीय शेअरबाजार निर्माण कारण्यास प्रोत्साहन देऊन पुढाकार घेतला.
राष्ट्रीय शेअरबाजाराच्या रूपाने देशातील आधुनिक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअरबाजार अस्तित्वात आला. त्याचे व्यवहार चक्र सुरवातीला आठवड्याने मग तीन दिवसाने नंतर दोन दिवसाने ठराविक कालावधीत अस्तीत्वात आले. असा बाजार अस्तीत्वात येताना भविष्यात एक दिवसात सौदापूर्ती आणि शेवटी तात्काळ सौदापूर्ती असे उद्दिष्ट ठेवले होते. हा बाजार अस्तीत्वात आल्यावर मुंबई शेअरबाजाराने धडा घेऊन आवश्यक ते बदल करून चूक दुरुस्ती केली आणि व्यवसायाचे नवनवे मार्ग शोधत राहिला म्हणून टिकून आहे अन्य प्रादेशिक बाजार एकामागोमाग एक बंद पडले कोलकाता स्टॉक एक्सचेंज कागदोपत्री अस्तित्वात आहे पण तेथे कोणतेही व्यवहार होत नाहीत. दरम्यान राष्ट्रीय शेअरबाजाराने उलढालीच्या दृष्टीने सध्या प्रथम क्रमांकावर आणि जगात चौथ्या क्रमांकावर झेप घेतली असून डिरिव्हेटिव्ह व्यवहाराच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर गेला. हे दोन्ही बाजार राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहेत त्यांनीं आता गांधीनगर येथे दिवसभरात 16 ते 22 तास चालू असणारे आंतराष्ट्रीय शेअरबाजार चालू केले आहेत.
भविष्यात T+0 म्हणजे व्यवहार ज्या दिवशी होईल त्याच दिवशी त्याची सौदापूर्ती होईल अशी गुंतवणूकदारांनी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे पदाधिकारी असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत याची नोंद घ्यावी)
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 27 जानेवारी 2023 रोजी पूर्वप्रकाशीत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment