Friday, 13 January 2023
कॅलेंडर वर्षातील महत्वाच्या अंतिम तारखा
#कॅलेंडर_वर्षातील_महत्वाच्या_अंतिम_तारखा
1 जानेवारी 2023 ला नवे कॅलेंडर वर्ष सुरू झाले. गेल्यावर्षी कदाचित काही आर्थिक चुका अनवधानाने केल्या असतील. आर्थिक चुक म्हणजे पर्यायाने आपले आर्थिक नुकसानच. मागे केलेल्या चुका हा इतिहास झाला. त्याची पुनरावृत्ती आपण या वर्षात करणार नाही असा संकल्प करूयात. यावर्षातील काही लक्ष ठेवण्यासारख्या तारखा खालीलप्रमाणे त्या आपल्याला सहज हाताशी येतील अशा ठेवा. जरी ही अंतिम तारीख असली तरी त्यासंबंधित गोष्टीची पूर्तता मुदतीपूर्वीच करावी म्हणजे गोंधळ उडणार नाही, दंड पडणार नाही, आपले आर्थिक नुकसान होणार नाही.
31जानेवारी 2023
★गेल्यावर्षी तुम्ही आर्थिक वर्ष (FY) 2021 2022 म्हणजेच आर्थिक विवरण वर्ष (AY) 2022-2023 चे आयकर विवरणपत्र 31 जुलै 2022 रोजी न सादर करता दंड भरून उशिरा (Late Return) सादर केलं असेल आणि त्यात सुधारणा (Revised Return) करायची असेल तर 31 डिसेंबर 2023 ही अंतिम तारीख आहे. यानंतर त्यात कोणतीही सुधारणा करता येणार नाही पूर्वी अशी सुधारणा करण्यास चार महिन्यांचा कालावधी मिळत होता आता तो एक महिन्याचा केला असल्याने जर काही सुधारणा करायच्या असतील तर या मुदतीपूर्वीच कराव्यात.
31 डिसेंबर 2023/15 फेब्रुवारी 2023/28 फेब्रुवारी 2023
★आर्थिक वर्ष 2022-2023 येत्या काही दिवसात संपेल. हीच वेळ आहे आपल्या अंदाजित उत्पन्नचा आढावा घेऊन पुरेशी गुंतवणूक करण्याची. पगार पत्रकाव्यतिरिक्त आपण काही गुंतवणूक केली असल्यास त्याची विहित नमुन्यात सूचना द्यावी लागते. आपल्या अस्थापनेकडून अशा सूचना देण्यासाठी वरील तीन पैकी कोणतीही एक अंतिम तारीख असू शकते. ती माहीत करून घेऊन आपली पगाराव्यतिरिक्त वैयक्तिक गुंतवणूक असल्यास पुराव्यासह सादर करावी म्हणजे त्याचा विचार करून आयकर आकारणी होईल.
03 एप्रिल 2023
ज्या लोकांना कर्मचारी भविष्य निर्माण निधी प्राधिकारणाकडून (EPFO) पेन्शन मिळते किंवा मिळणार आहे त्याच्या पगारातून जास्तीतजास्त ₹1250/- प्रतिमास वर्गणी कापून घेतली जाते याहून अधिक पगार असलेले काही अटींची पूर्तता करून आणि अधिक वर्गणी देऊन वाढीव पेन्शन मिळण्यास पात्र आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या अपिलीय प्राधिकारणाने 04 नोव्हेंबर 2022 रोजी यासंबंधी ऐतिहासिक निर्णय दिला असून ज्यांना वाढीव पेन्शन हवे असेल त्यांना तशी मागणी करण्यास 4 महिन्याची मुदत दिली आहे. जाणकारांच्या मते कर्मचारी आणि मालक यांनी यासंबधी संयुक्त निवेदन इपीएफओकडे जरुरी आहे. यासाठी निश्चित पद्धत ठरवून देण्यासाठी न्यायालयाने चार महिन्याची मुदत इपीएफओस दिली होती. सध्या यासंबधी येणाऱ्या बातम्या गोंधळात भर घालणाऱ्या असल्या तरी स्पष्ट मार्गदर्शन लवकरच मिळेल आणि विहित कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण होईल तरी यासंबंधात स्वारस्य असलेल्या लोकांनी ही तारीख लक्षात ठेवावी आणि यापूर्वी होणाऱ्या हालचालींचा मागोवा घ्यावा.
15 मार्च 2023/ 31 मार्च 2023
★ज्या लोकांना अग्रीम कर (Advance Tax) भरावा लागतो त्यांनी 15 मार्च पर्यंत 90% आणि 31 मार्चपर्यंत 100% आयकर भरणे आवश्यक असून याप्रमाणे अग्रीम कर न भरल्यास 1% प्रतिमाह दंड होऊ शकतो. त्यामुळे अग्रीम कर भरणाऱ्या लोकानी या तारखा लक्षात ठेवाव्यात.
31 मार्च 2023
★चालू आर्थिक वर्षात आयकर सूट मिळावी म्हणून गुंतवणूक करण्याचा शेवटचा दिवस. (80 C, 80 D, 80TTA यानुसार मिळणाऱ्या सवलती)
★पॅन आणि आधार दंड भरून एकमेकांना जोडण्याचा शेवटचा दिवस यानंतर पॅन अपात्र होणार, यासाठी वारंवार मुदतवाढ दिली आहे तेव्हा ज्यांचे पॅन आधार एकमेकांना जोडले नाहीत त्यांनी या तारखेपूर्वी जोडून घ्यावेत.
★15 लाख रुपये भरून पुढील 10 वर्ष 7.4% व्याजदराने पेन्शन देणारी प्रधानमंत्री वय वंदना योजनेचा (PMVVY) शेवटचा दिवस. ज्यांना हा दर मंजूर असेल त्यांनी या तारखेपूर्वी खाते उघडावे. बाजारात व्याजदर वाढल्याने नवी अधिक व्याजदराची योजना येईल अशी शक्यता
वाटणाऱ्या लोकांनी नव्या योजनेची वाट पहावी.
★इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन मिळण्यासाठी असे वाहन खरेदी करण्याच्या कर्जावरील दीड लाखापर्यंतच्या व्याजास 80 EEB नुसार मिळणाऱ्या सवलतीचा शेवटचा दिवस. योजनेस अधिक मुदतवाढ मिळते की नाही ते येत्या अर्थसंकल्पात समजेल अशी अपेक्षा.
★आर्थिक वर्ष 2019-2020 मध्ये ज्यांनी कोणत्याही कारणाने आयकर विवरणपत्र भरले नसेल त्यांना शेवटची संधी (ITR U) गेल्या अर्थसंकल्पात ही मुदत दिली होती.
★अनिवासी भारतीयांना विविध देशाशी असलेल्या करारानुसार ते रहात असलेल्या देशात कर बसत असल्यास तेवढ्या कराची सूट भारतात मिळते अशी सूट मिळवण्यासाठी 10 F फॉर्म आयकर विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन भरावा लागतो, यासाठी पॅन आवश्यक आहे त्याशिवाय ऑनलाइन फॉर्म प्रोसेस होऊ शकत नाही. ज्या अनिवासी भरातीयांकडे पॅन नाही अशा व्यक्ती करात सूट मिळवण्यासाठी फॉर्म ऑफलाईन पद्धतीने या तारखेपूर्वी भरू शकतील.
01 एप्रिल 2023
★भारतात काम करणाऱ्या परदेशी रेटिंग एजन्सीज विरुद्धच्या मूल्यांकन विषयक तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी अंतर्गत लोकपालाची नियुक्ती करण्यास रिझर्व बँकेने सांगितले होते. या तारखेपासून त्यांच्याविषयी असलेल्या तक्रारीची दाद अंतर्गत लोकपालांकडे मागता येईल.
15 जून 2023
★पुढील आर्थिक वर्षाच्या उत्पन्नचा अंदाज करून 30% अग्रीम कराचा पहिला हप्ता भरण्याची अंतिम तारीख.
★मालकाकडून कर्मचाऱ्यांना त्यांचे मागील आर्थिक वर्षातील उत्पन्न आणि करकपात यांची सविस्तर माहिती देणारे फॉर्म 16 प्रकारातील प्रमाणपत्र देण्याची अंतिम तारीख. या मुदतीत प्रमाणपत्र मिळाल्यास योग्य मुदतीत विवरणपत्र आपणास भरता येईल.
31 जुलै 2023
★चालू आर्थिक वर्षाचे म्हणजेच 2022- 2023 चे आयकर विवरणपत्र दंडशिवाय दाखल करण्याची अंतिम तारीख.
15 सप्टेंबर 2023
★अग्रीम कर भरण्याचा दुसरा हप्ता भरण्याची शेवटची तारीख. यात अंदाजित कराच्या पहिल्या हप्त्यासह 45% एकूण आयकर भरला जावा अशी अपेक्षा आहे.
©30 नोव्हेंबर 2023
★पेन्शन अँथोरिटीस हयात असल्याचा दाखला देण्याची अंतिम तारीख. आता हा दाखला आपल्या जन्म ज्या महिन्यात त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी दिला तरी चालतो. विहित मुदतीत हयातीचा दाखला न दिल्यास निवृत्तीवेतन स्थगित केले जाते.
15 डिसेंबर 2023
★अग्रीम कर तिसरा हप्ता भरण्याची अंतिम तारीख. पुढील आर्थिक वर्षाच्या अपेक्षित कराच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यासह एकूण 60% कर भरावा अशी अपेक्षा आहे
31 डिसेंबर 2023
★आर्थिक वर्ष 2022-2023 चे आयकर विवरणपत्र दंडासाहित भरण्याची शेवटची तारीख.
★31 जुलै किंवा आयकर खात्याने दंडाशिवाय विवरणपत्र भरण्याच्या जाहीर केलेल्या तारखेपूर्वी विवरणपत्र दाखल केले असल्यास सुधारीत विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख. या काळात विभागाकडून विवरणपत्र मंजूर झाले असले तरीही सुधारित विवरणपत्र दाखल करता येईल.
वरील तारखांबाबत काही शंका असल्यास जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे पदाधिकारी असून लेखातील मते वैयक्तिक आहेत याची नोंद घ्यावी)
13 जानेवारी 2023 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment