Friday, 4 May 2018

मागील आर्थिकवर्षांचा अर्थविषयक शोधबोध

मागील आर्थिकवर्षांचा अर्थविषयक शोधबोध

  अलीकडेच 2017/18 हे आर्थिक वर्ष संपले . समभाग , म्यूचुयल फंड गुंतवणूकदारांच्या दृष्टीने त्या आधिच्या तुलनेत भरघोस वाढ झाली .निर्देशांकाने याच वर्षात आपली सर्वोच्च पातळी ओलांडून नवीन विक्रम प्रस्थापित केला तर 11 वर्षांनंतर पुन्हा दीर्घकालीन नफा काही अटींसह लागू करण्याचे  योजल्याने त्यावरील टोकाची प्रतिक्रिया व्यक्त होवून निर्देशांक वाढिला लगाम बसला .यामुळे अनेकांचे नुकसान झाले .यातून पैशांचे व्यवस्थापन करण्याच्या संदर्भात अनेक गोष्टी शिकता येवू शकतील त्यातील काही गोष्टींचा शोध आणि त्यातून झालेला बोध .
1.आभासी चलनाचे मृगजळ  : बीटकॉइन या आभासी चलनात झालेली वाढ .यामुळे अनेक गुंतवणुकदार त्याकडे आकर्षीत झाले .या चलनास सरकारकडून वैधता नसल्याचे वेळोवेळी जाहीर केले गेले .या कालखंडात 1000 अमेरिकन डॉलर्सचे आसपास असलेला बीटकॉइनचा भाव अल्पावधीत 20000 डॉलर्सवर गेला अनेक गुंतवणूकदार सट्टेबाजाप्रमाणे गुंतवणूक वाढवत गेले आणि अचानक त्याचा भाव 8000 वर आला यात लोकांचे प्रचंड नुकसान झाले आणि आपण नुकसान सोसू शकू एवढीच गुंतवणूक केली पाहिजे हा धडा मिळाला ते यातून नक्कीच शिकले असावेत .
2.चिकाटीचा अभाव : एका अंदाजानुसार जीवनविम्याच्या काढलेल्या पॉलीसीपैकी 33% पॉलिसी या बंद केल्या जातात .अनावश्यक पॉलिसीची खरेदी आणि मुदतीच्या पूर्वी वीमोचन यामुळे आपण स्वताबरोबर आपल्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करीत आहोत असे वाटत नाही का ?
3.अनुचित प्रथांना विरोध : नियोजित फर्डिबीलातील अयोग्य तरतूदी आणि वाढीव बँकींग चार्जेस यांना  सर्वांनी तीव्र विरोध केला .यासाठी सोशल मिडीयाचा वापर केला गेला मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाल्याने या गोष्टी स्थगित झाल्या .
4.अल्पबचतीवरील व्याजदराचा नीचांक : दर तिमाहीत बदलत असलेले अल्पबचतीवरील व्याजदर यावर्षात नीचांकी पातळीवर आले .फक्त यावर आपण अवलंबून राहू शकत नाही याची सर्वाना जाणीव झाली असावी .
5.कर्जावरील किमान व्याजदर : या कालखंडांत किमान व्याजदराने कर्ज उपलब्ध झाल्याने कर्जदारांच्या दृष्टीने हा सुवर्णकाळ म्हणता येईल .तर बुडीत कर्जे आणि मोठ्या प्रमाणात कर्ज घेवून पसार झालेले कर्जदार यामुळे यंत्रणेतील दोष उघडकीस आले आणि आंतरराष्टीय पातळीवर आपणास मान खाली घालावी लागली .
6.क्रेडिट स्कोरचे महत्व : कर्ज घेण्यास उत्सुक प्रत्येकाचे मूल्यमापन सीबिल मार्फत केले जाते . आपल्या सर्व व्यवहारांचा मागोवा घेवून त्याप्रमाणे आपले मूल्यांकन 300 ते 900 अंकात केले जाते .ज्यांचे गुण 750 हून अधिक असतात त्यांना बँक सहज कर्ज देतात .इतके दिवस आपले सिबील रेटिंग जाणून घेण्यास पैसे द्यावे लागत होते . यावर्षीपासून ते आपणास विनामूल्य अन्य मार्गाने जाणून घेता येत असल्याने कर्ज घेणार नसाल तरी आपला क्रेडिट स्कोर जाणून घ्यावा .जर आपली त्यावर हरकत असेल तर योग्य ते पुरावे देवून तो दुरुस्त करता येईल आणि भविष्यात सुलभतेने कर्ज मागणी करता येईल .
7.मेडिक्लेमचे महत्व : अलीकडील काळात वैद्यकीय खर्चात झालेली प्रचंड वाढ यामुळे एखादा गंभीर आजार आपले आर्थिक गणित बिघडवू शकतो ,  आरोग्य विमा असेल तर थोडा दिलासा मिळतो . आगामी अर्थसंकल्पात यावर वाढीव सूट देण्यात आली आहे .
8.पोर्टफोलीओच्या जोखीम व्यवस्थापनाची गरज : गेल्या वर्षभरात मिड /स्मॉलकेप शेअर मधे 40 ते 50% वाढ अल्पावधीत झाली त्याबरोबर वर्षअखेरीस त्यात तीव्र घट झाली .अशी स्थिती लार्ज / डिवेर्सिफाइड केपमध्ये दिसली नाही .एक समतोल पोर्टफोलीओच्या जोखीम व्यवस्थापनासाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज /डिवेर्सिफाइड केप शेअर्सची आवश्यकता असणे गरजेचे आहे हे या निमीत्ताने अधोरेखित झाले .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

No comments:

Post a Comment