Friday, 4 August 2017

भांडवलबाजार शिक्षण आणि व्यवसायसंधी .......(भाग --१)

    भांडवलबाजार शिक्षण आणि व्यवसायसंधी ......(भाग --१)

   भांडवलबाजारात अनेक घटक कार्यरत आहेत .तेथे मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाची देवाण घेवाण होते .त्यामुळे शेती ,उद्योग ,सेवा क्षेत्राचा विस्तार व आधुनिकीकरण शक्य होते तर व्यक्ति ,बँका ,वित्तीय संस्था ,गुंतवणूक संस्था ,विमा कंपन्या ,विकास बँका यांचेमार्फत बचत आणि गुंतवणूकीचे विविध मार्गातून एकत्रिकरण होवून त्याना सुयोग्य परतावा तर खाजगी उद्योजक , शासन आणि सार्वजनिक उपक्रम यांची कर्ज मागणी पूर्ण केली जाते . भागबाजार (Stock Exchange ),वस्तु बाजार (Commodity Market ) गुंतवणूक विश्वस्त संस्था (Investment Trust),परस्पर निधी Mutual Funds ), निक्षेपसंस्था (Depositary), निक्षेपक (Depositary Participant ) विशेष वित्त संस्था (Specialized Financial Institutes),विनिमय संस्था (Exchanges),बँकेतर वित्तीय संस्था (Non Banking Financial Companies ), पतमापन संस्था (Credit Ratings Agencies ), प्रकल्पसेवी बँका (Merchant Banks ),आंतरराष्टीय वित्तीय संस्था(International Financial Institutes)या घटकांच्या माध्यमातून येथे व्यवहार केले जातात .हे व्यवहार पूर्णपणे पारदर्शक आणि संगणकामार्फत होत असतात , तसेच त्यावर भारतीय रिझर्व बँक (RBI), AMFI ,IRDA ,PRADA नियंत्रण आहे आणि त्यानी केलेल्या समभाग ,रोखे आणि वस्तु व्यवहारावर अंतिम नियामक म्हणून भांडवल बाजार नियंत्रकांचे (SEBI) यांचे नियंत्रण  आहे . विविध व्यक्ती ,संस्था ,परकीय गुंतवणुकदार यांच्यातील व्यवहारांचे प्रमाण प्रचंड असून तंत्रज्ञान वेगवान झाल्याने अनेक तज्ञ व्यक्तींची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे अनेकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत .हे  एकाअर्थी सेवा पुरवणारे उद्योगक्षेत्र बनले असून सेबीच्या नविन कायदेशीर बंधनाप्रमाणे यातील बहुतेक सर्व  घटकांना नोंदणी आणि किमान शैक्षणिक पात्रता अनिवार्य असल्याने संबधीत विषयातील ज्ञान /प्रशिक्षण घेणे जरुरीचे आहे त्याचप्रमाणे ठराविक मुदतीने पुन्हा परीक्षा देवून नविन बदलांचे ज्ञान आपल्याला आहे हे सिद्ध करावे लागत असल्याने काळानुसार होणारे बदल माहीत करून घ्यावे लागत आहेत .तसे पाहिले एकूण लोकसंख्येच्या 4% हून कमी लोक प्रत्यक्षपणे तर इतर बहुसंख्य लोक इतर बचत आणि गुंतवणूकीच्या  माध्यमातून अप्रत्यक्षपणे ,तसेच देशी आणि विदेशी संस्थापक गुंतवणुकदार कोट्यावधी रुपयांचे व्यवहार रोज करत असून सरकारलाही मोठ्या प्रमाणात करप्राप्ती  आणि भांडवल निर्मिती करण्यासाठी या बाजाराचा उपयोग होत आहे . येथील बहुतेक व्यवहार हे मुंबई शेअरबाजार (BSE) , राष्ट्रीय शेअरबाजार (NSE) ,वस्तू व्यवहार प्रामुख्याने MCX यामधे होत असतात आणि जगाच्या पाठीवरून कुठूनही करता येतात .बाजारातील प्रशिक्षित लोकांची गरज पूर्ण करण्यासाठी BSE आणि NSE कडून विविध परीक्षा व पूरक अभ्यासवर्ग ,अर्ध वेळ /पूर्णवेळ अभ्यासक्रम घेतले जातात .NISM या सेबीने स्थापना केलेल्या न्यासाकडून ,तसेच अन्य विद्यापीठे शैक्षणिक संस्था खाजगी संस्था यांच्यातर्फे स्वतंत्रपणे अथवा सहकार्याने असे अभ्यासक्रम घेतले जात आहेत यातील बरेचसे अभ्यासक्रम स्वयंअध्ययनाने व माफक फी देवून करता येत असून त्यासाठी प्रश्न समजणे आणि परीक्षा ऑनलाईन असल्याने संगणकाचे जुजबी ज्ञान आवश्यक आहे .सर्व अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमात असून काही अभ्यासक्रम हिंदी आणि गुजराथी माध्यमात उपलब्ध आहेत . भांडवलबाजारातील काही व्यवसाय ,कामाचे स्वरूप आणि त्यासाठी आवश्यक पात्रता यांना स्पर्श करण्याचा हा अल्पप्रयत्न असून अभ्यासक्रमाचे नाव , नोंदणी , शैक्षणिक पात्रता ,यात येणारे विषय ,फी ,शैक्षणिक साहित्य , सराव परीक्षा ,अंतिम परीक्षा ,व्यवसाय संधी आणि अभ्यासक्रमाची  वैधता यासंबंधीची सविस्तर माहिती त्या त्या संस्थेच्या संकेतस्थळावर असून आवड आणि इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने आपले ज्ञान वाढवण्यासाठी याचा उपयोग करून घेतला पाहिजे .
   कोणी काही म्हणो ,पैशाच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे आणि जीवनातल्या महत्वपूर्ण स्थानामुळे पैशाचा ओघ स्वतःकडे आणणे हे आपले प्राथमिक उद्दिष्ट सर्वच गुंतवणूकदाराना ठेवावे लागते आणि यासाठी कोणी आपले बोट धरून नेईल याची वाट न पहाता वेळ न दवडता गीतेतील संदेशाप्रमाणे स्वताचा उद्धार स्वतः करावा नाशास कारणीभूत होवू नये कारण आपणच आपले मित्र आणि आपणच आपले शत्रू असतो . तेव्हा आळस झटकून सर्वप्रथम काही महत्वाचे व्यवसाय ,त्याचे कामाचे स्वरूप, शैक्षणिक पात्रता यांचा विचार करून यातील शिक्षण आणि व्यवसाय संधी यांचा धावता आढावा घेवूयात  :
  1)दलाल (Brokar): हा एक स्वतंत्र व्यवसाय असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते मुंबई शेअर बाजाराचे सभासदत्व मिळवण्यासाठी 12 वी उत्तीर्ण असणे तर राष्ट्रीय शेअरबाजारासाठी पदवीधर असणे   ही किमान शैक्षणिक पात्रता आहे .असे असले तरी यापेक्षा उच्च शिक्षण जसे सी ए ,सी एस ,एम बी ए यांना प्राधान्य मिळते .nism कडील mandatory certification examination for associated person in the securities markets या किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते .याशिवाय  सेबिकडे नोंदणी फी भरून परवानगी घ्यावी लागते .ज्या बाजाराचे सदस्यत्व हवे  बाजारकडे प्रवेश फी ,नोंदणी फी (cash आणि derivetives  साठी वेगवेगळी ) वार्षिक फी ,ट्रेडिंग फी ,अनामत ,को लेटरल सेक्यूरिटी ,ट्रेड ग्यारंटी फंड ,आपतकाली निधी,याशिवाय  दोन विद्यमान सदस्यांची शिफारसपत्रे याशिवाय  मोठ्या प्रमाणात वैयक्तीक मालमत्ता (networth ) असावी लागते .या व्यवसायास मोठ्या प्रमाणात खेळत्या भांडवलाची गरज लागते .त्यामुळे स्वतः कडे किमान 10 कोटी रुपये असल्याशिवाय हा व्यवसाय करता येणे अशक्य आहे यातून मिळणारे उत्पन्न हे दलाली असल्याने स्पर्धात्मक दलालीत जास्तीत जास्त ट्रेडर मोठे ग्राहक एच एन आई ,एन आर आई आणि देशी विदेशी संस्थात्मक गुंतवणूक दार मिळवणे आणि त्यांना आपल्याकडे टिकवून ठेवणे  जरुरीचे आहे . रीतसर करार करून त्याची पूर्तता करावी लागते .पूर्णपणे बुद्धिजीवी असा हा व्यवसाय असून खरेदीदार आणि विक्रेते यातील महत्वाचा दुवा आहे .काही मोजके व्यवहार सोडले तर दलालाशिवाय व्यवहार करणे बेकायदेशीर आहे .
2) उपदलाल (sub broker): दलाल आणि गुंतवणूकदार यामधील उपदलालाचे स्थान महत्वाचे आहे .दलालांच्या मर्यादित संख्येमुळे सर्वच गुंतवणूकदार दलालाशी थेट संपर्क प्रस्थापित करू शकत नाहीत .सेबी आणि एक्सचेंजकडे नोंदणी आवश्यक , किमान शैक्षणिक पात्रता 12 वी याशिवाय nism ची परीक्षा किंवा समकक्ष  परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असून नोंदणी फी , परवाना शुल्क आणि मुख्य दलालाकडे उभयपक्षी मान्य अनामत रक्कम ठेवून हा व्यवसाय करता येतो आणि तो पूर्णवेळ अथवा अर्धवेळ करता येणे शक्य आहे .विद्यार्थी ,गृहिणी स्वेच्छा /सेवा निवृत्त लोक हे काम करू शकतात .जे लोक उप दलालाचे माध्यमातून गुंतवणुक करतात त्यांना दलाल ,उपदलाल आणि गुंतवणूकदार या तिघांचा एकत्रित करारनामा करावा लागतो याशिवाय असा व्यवसाय करणे    बेकायदेशीर आहे .साधारणपणे 10 लाख रुपये गुंतवून हा व्यवसाय करता येणे शक्य आहे .उत्कृष्ट सेवा आणि मोठा जनसंपर्क याद्वारे यात प्रगती करता येणे शक्य असून बाजार हा भविष्यवेधी असल्याने ज्ञान आणि अनुभव याद्वारे आपली प्रगती करता येणे शक्य आहे .
3)गुंतवणूक संच व्यवस्थापक ( portfolio manager) : हा गुंतवणूकदाराच्या गरजेप्रमाणे विविध ठिकाणी गुंतवणूक करून देतो त्यातील जोखिम व त्यावरील उपाययोजना अमलात आणतो . त्याच्या सर्व शंकांची उत्तरे देतो  . गुंतवणूकदारास गुंतवणूकीचे सखोल ज्ञान असतेच असे नाही अशावेळी त्याला तज्ञ व्यक्तीची गरज लागते .गुंतवणूकीच्या विविध प्रकारांचे ,कायद्याचे ज्ञान आवश्यक असून मोठया कंपन्या ,म्यूचुअल फंड ,वित्त संस्था येथे स्वतंत्र पोर्ट फोलिओ मॅनेजर नेमलेले आहेत  त्यांचे वेतनमान उच्च असते काही ब्रोकिंग फर्म ,मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकणाऱ्या ग्राहकांना फी आकारुन ही सुविधा उपलब्ध करून देतात . यासाठी करार करून आपल्या वतीने सर्वाधिकार पोर्ट फोलिओ      मॅनेजरला दिलेले असतात .अजून वैयक्तिक गुंतवणूकदारापैकी अशा व्यक्तीची नेमणूक करणारे फार थोडे लोक आहेत .सेबीकडे नोंदणी करून गुंतवणूक व्यवस्थापकाचे पात्रता निकष पूर्ण करावे लागतात .nism कडून प्राथमिक basic आणि प्रगत advance portfolio manager चे सर्टिफिकेशन मिळवावे लागते .ही परीक्षा ऑनलाईन असते. विशिष्ट व्यवसायिक शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या काहींना यातून सूट देण्यात आली आहे .या व्यक्ति निर्धारित नियमांचे पालन करून नोकरी अथवा स्वतंत्र व्यवसाय करू शकतात .गुंतवणूकदाराचा Doctor असेही याला म्हणायला हरकत नाही .
4)गुंतवणूक सल्लागार :( investment adviser ) किमान शैक्षणिक पात्रता पदवी ,विशिष्ट व्यावसायिक शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या व्यक्ति सोडून nism ची प्राथमिक आणि प्रगत परीक्षा देणे अनिवार्य आहे .सर्वाना सेबीकडे नोंदणी करने आवश्यक असून दिलेल्या सल्ल्याच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे .गुंतवणूक व्यवस्थापक गुंतवणूकदाराच्यावतीने प्रत्यक्ष व्यवहार करतो तर गुंतवणूक सल्लागार फक्त सल्ला देतो , दोघांनाही गुंतवणूक विषयक सखोल ज्ञान हवे ,बाजारातील बदल टिपून घेता आले पाहिजेत . आपल्या ग्राहकास आपला निर्णय पटवून देता आला पाहिजे , कायद्यातील बदल ,कर प्रणाली याची माहिती हवी तसेच ग्राहकास त्याच्या अपेक्षेप्रमाणे वारसा नोंद करण्याचा आग्रह त्याने धरायला हवा .सखोल माहिती ,कामाची आवड ,अनुभव या बळावर हा व्यवसाय करणे शक्य आहे .अनेक ठिकाणी पूर्णवेळ नोकऱ्या उपलब्ध आहेत (अपूर्ण).....😣

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

आपल्या मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी शेअर करा म्हणजे अनेकांपर्यत ती माहिती एकाच वेळी पोहोचेल.

No comments:

Post a Comment