Sunday, 27 August 2017

     एन आई एस एम (National lnstitute of Security Management
              उत्तरार्ध
NISM Certification Exams. चे काम दोन स्तरांवर चालते .एक म्हणजे नियमीत परीक्षा घेणे आणि दर तीन वर्षानी पुन्हा परीक्षा घेवून त्यात पास झालेल्या व्यक्तींची प्रमाणपत्र वैधता अजून तीन वर्षे वाढवणे किंवा जर त्या व्यक्ति भांडवल बाजारात कार्यरत असतील तर किमान सहा तास मुदतीची एक दिवसाची कार्यशाळा CPE (Continuing Professional Education) पूर्ण करून त्या कार्यशाळेअखेर घेतली जाणारी परीक्षा उत्तीर्ण होवूनही त्यांच्याकडील प्रमाणपत्राची वैधता आणखी तीन वर्ष वाढवता येवू शकते .हे दोन्ही मार्ग एकसमान आहेत .
    e-CPE म्यूचुअल फंड सल्लागार , वितरक यांच्या साठी सध्याच्या प्रमाणपत्राची मुदत वाढवण्यासाठी कार्यशाळा घेवुन निवडक ठिकाणी परीक्षा देवून प्रमाणपत्र मुदत तीन वर्षे वाढवता येवू शकते .
    NISM चा हा प्रमाणपत्र देणारा विभाग आणि इतर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने परीक्षा घेवून काही प्रमाणपत्र वितरित करण्यात येतात ती खालील प्रमाणे -
 1)NISM Moody's Certificate in Derivatives Strategies (Moody's ही आंतरराष्ट्रीय संस्था)
 2)Equity Trading &Investment (ICFL ही ICICI Direct ने स्थापन केलेली संस्था)
 3)Credit Rating & Research Analyst Certification
 4)Certified Alternative Investment Manager Certification
(यापैकी 3 आणि 4 हे अभ्यासक्रम Association of International Wealth Management of India ही आंतराष्ट्रीय प्रमाणपत्र वितरित करणारी संस्थेचे संयुक्त विद्यमाने)
D)School of Corporate Governance : भांडवलबाजारात कार्यरत कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढावा आणि अधिकाधिक गुंतवणूकदार भांडवल बाजारात येवून विकासाला चालना मिळावी यासाठी या विभागाकडून कंपन्यातील वरीष्ठ अधिकारी व संचालकमंडळातील सदस्यासाठी
विविध कार्यक्रम कार्यशाळा आयोजित केले जाते .
E)School for Regulatory studies & Supervision : बँकावर भारतीय रिझर्व बँकेचे आणि भांडवलबाजारावर सेबीचे नियंत्रण आहे या नियमकाना आपल्या ध्येय्यधोरणांची अमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची जरूरी लागते ही गरज पूर्ण करण्याचे काम या विभागाकडून केले जाते .रिझर्व बँक, सेबी , गुप्तवार्ता  , अर्थमंत्रालय ,अमलबजावणी विभाग ,प्रशासकीय सेवा ,महसूल विभाग यांच्या उच्चाधिकाऱ्यांसाठी ध्येय्य आणि धोरणे यांच्याशी सुसंगत असे प्रशिक्षणवर्ग आणि  कार्यशाळा आयोजित केले जातात .या वर्गात भांडवल बाजाराचे नियमन ,अवैध मार्गाने भांडवल बाजारात येणाऱ्या पैशाची समस्या ,आर्थिक धोरणांचे नियमन ,बाजारातील गैरव्यवहारांचा शोध ,भांडवल बाजारातील अकस्मात होणारी पडझड किंवा वाढ आणि त्यावरील उपाययोजना ,आर्थिक गुन्हेगारीची दखल तपास शोध कसा घ्यायचा यासंबंधीच्या प्रशिक्षणाचा सामावेश होतो .
F) School of Securities Information & Research : कोणत्याही क्षेत्रातील विकास हा त्यांतील मूलभूत संशोधनामुळे होतो .nism  चा हा विभाग या क्षेत्रातील जाणकारांना भांडवल बाजाराविषयी  संशोधन करण्याची संधी उपलब्ध करून देतो .त्यांचे शोधनिबंध प्रकाशित करतो . विविध विषयावर संशोधन करून या विभागाने त्यासंबधीचे अहवाल अर्थमंत्रालय ,सेबी ,रिझर्व बँक यांना दिले आहेत .याशिवाय काही शोधनिबंध आंतरराष्ट्रीय मासिकात प्रसिद्ध झाले आहेत . येथे संशोधन करू ईच्छिणाऱ्या सर्वाना बाजाराशी संबंधीत हवी असलेली सर्व माहिती येथे उपलब्ध करून दिली जाते .
   NISM च्या 22 सर्टिफिकेशन कोर्सची सर्व माहिती यापुर्वीच्या भागात दिली आहे .भांडवल बाजारातील कार्यरत घटकांना सेबीचे नियमानुसार लागणारी ही  किमान पात्रता असली तरी एक जागृत गुंतवणूकदार म्हणून आपली गुंतवणूक ज्या विभागात असेल त्याची किमान माहिती आपल्याला असायलाच हवी . याशिवाय ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण वेळ उपलब्ध असलेले पी जी  कोर्स करायला हरकत नाही .या अभ्यासक्रमाना AICTE यांची मान्यता असून या विषयात करीयर करण्याची संधी आहे .शिक्षण आणि त्यावर होणारा खर्च यासाठी मराठी माणसांनी मागचा पुढचा विचार आजपर्यंत केला नाही सध्या दोन वर्षाच्या पूर्ण वेळ अभ्यासक्रमाचा खर्च साडेदहा लाख आहे .जो काहींना खूप जास्त वाटू शकतो . त्यांना शैक्षणिक कर्ज घेणे हा पर्याय होवू शकतो .अल्प मुदतीचे आणि सुटीतील अभ्यासक्रम हा ही पात्रता उंचावण्याचा पर्याय होवू शकतो .जे  चार हजार रुपयांपासून सुरू होतात .जर असे कोणी लोक आपल्या परीचयात असतील तर त्यांना यासंदर्भातील माहिती द्यावी . यातील सर्व माहिती NISM च्या अधिकृत www.nism.ac.in या संकेतस्थळावरून घेतली असून अधिक माहिती हवी असल्यास तेथे मिळेल .काही खाजगी व्यावसायिक शिक्षणसंस्था nism परीक्षांची तयारी करून घेतात परंतू त्यांची फी जास्त असते आणि त्याच्याबद्द्ल काही निश्चित अशी अधिक माहिती सांगणे योग्य ठरणार नाही .(समाप्त)

©उदय पिंगळे

 ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 25 August 2017

एन आई एस एम (NISM) पूर्वार्ध

     एन आई एस एम (National lnstitute of Securities Management)
                   पूर्वार्ध
    NISM ही सेबीने (Securities &Exchange Board of India)
2006 साली स्थापना केलेली शैक्षणिक संस्था असून ती भारतीय सार्वजनीक विश्वस्त संस्था म्हणून नोंदली आहे .या संस्थेकडून भांडवलबाजारास आवश्यक शैक्षणिक अभ्यासक्रम , कार्यशाळा,कौशल्ये विकसित होण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात .सर्वसाधारण अर्थसाक्षरता वाढावी यासाठी अनेक शैक्षणिक सुविधा संस्थेकडे आहेत .संस्थेचे मुख्य कार्यालय वाशी नवी मुंबई येथे असून 72 एकर जागेवर पाताळगंगा (मुंबई पासून 65कि मी  अंतरावर नविन दृतगती मार्गानजीक) येथे सुसज्ज शैक्षणिक संकुल असून अलीकडेच ते सुरू झाले .ही संस्था पूर्णपणे स्वायत्त असून संस्थेच्या संचालक मंडळाचे मार्गदर्शनाने तीचे कामकाज चालते .संस्थेचे सहा शैक्षणिक विभाग खालीलप्रमाणे :
A)School for Securities Education : या विभागामार्फत पूर्ण वेळेचे भांडवल बाजाराशी संबधित खालील अभ्यासक्रम आहेत .
1)Post Graduate Diploma in Management (Securities Markets)
2)Post Graduate Program in Securities Markets
3)Post Graduation Diploma in Quntitative Finance
खालील अभ्यासक्रम अर्धवेळ आहेत
1)Post Graduate Diploma in Data Science
2)Certificate in Securities Law
3)Certificate in Treasury Management
4)Post Graduation Diploma in Financial Engineering & Risk  Management
अल्प मुदतीचे अभ्यासक्रम
1)Summer School 2017
2)Post Graduate Certificate in Securities Market
3)Post Graduate Certificate in Capital Market
4)NISM Certified Course in Securities Market
5)NISM- VES lnvestment Adviser Program
6)NISM IMART Certificate Course in Securities Market
B)School for Investor Education & Financial Literary :या विभागामार्फत अर्थसाक्षरता वाढीस लागावी यासाठी
1)शाळांमधे आर्थिक विषयाचे शैक्षणिक उपक्रम
2)अर्थसाक्षरतेचे विषयी ncfeindia.org ह्या स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती ,वेळोवेळी त्याचे नूतनीकरण .
3)विविध शहरे ,गावे यामधुन अर्थ साक्षरता विषयक कार्यशाळा
C)School of Certification of Intermediate :भांडवल बाजाराशी संबधित सर्व घटकांना आपल्या कामासंबंधी प्राथमिक गोष्टींची किमान माहिती होण्यासाठी सेबीच्या नियमानुसार आवश्यक अशी पात्रता पूर्ण करण्यासाठी या परीक्षा देणे जरुरीचे आहे .या परीक्षा देण्यासाठी वय आणि शिक्षण याबाबत कोणतीही अट नसून पर्यायी स्वरूपात उत्तरे देणे अपेक्षित असते .प्रश्न आणि पर्याय
समजेल एवढे ज्ञान आणि उत्तर निवडता करता येईल इतके संगणकज्ञान असणे जरुरीचे आहे .या परीक्षा ऑनलाइन होतात आणि ताबडतोब निकाल मिळतो .प्रथम नोंदणी करून अभ्यासक्रम निवडावा लागतो . नोंदणीसाठी आधार क्रमांकाची गरज असते . अभ्यासक्रम नोंदवल्यावर स्वयं अध्ययनासाठी लागणारे साहित्य ऑनलाइन मिळते परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 50/60%  गुण मिळवणे जरुरीचे असून त्याची वैधता 3 वर्ष असते परीक्षांचे माध्यम इंग्रजी असून काही परीक्षा हिंदी / गुजराथी माध्यमातुनही देता येतात .पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण  न  झाल्यास परीक्षा फी  भरून अजून दोनदा परीक्षा  देता  येते . भांडवलबाजाराचे संबधित कोणतीही नोकरी अथवा व्यवसाय करण्यासाठी किमान एवढी पात्रता परिपूर्ण करावीच लागते .भरलेल्या  फीमध्ये एक सराव परीक्षाही  देता  येते .नोंदणी केल्यापासून 180 दिवसाचे आत देशभरातील 150 हून अधिक ठिकाणी असणाऱ्या कोणत्याही केंद्राची निवड करून परीक्षा देता येते . दोन तास (Common Derivatives Certification   तीन तास 150प्रश्न 150 गुण ) चालणारी ही परीक्षा 50/100 बहुपर्यायी प्रश्न स्वरूपात असून योग्य उत्तर निवडायचे असते . काही परीक्षामधे चुकीच्या उत्तराकरीता 25% गुणकपात होते .या अभ्यासक्रमाची फी ₹ 1000 ते 3000 या दरम्यान आहे .माफक फी मुळे कोणीही गुंतवणूकदार या परीक्षा देवून व्यवसाय आणि नोकरीच्या किमान पात्रता धारण करू शकतो . तर सध्या भांडवल बाजारात कार्यरत व्यक्ति त्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाने अधिक उच्च दर्जाची सेवा देवू शकते .या शिवाय एक सुजाण गुंतवणूकदार बनून या  ज्ञानाचा स्वतःच्या गुंतवणूकीचे निर्णय घेण्यास उपयोग होतो यामुळे शक्य असेल त्या सर्वानीच ते गुंतवणुक करीत असलेल्या गोष्टीशी संबधित  परीक्षा देणे म्हणजे ज्ञानात केलेली गुंतवणुक आहे असे म्हणता येईल .सध्या उपलब्ध असलेले बावीस प्रमाणपत्र अभ्यासक्रम खालील प्रमाणे :---
 1)NISM Series 1:Currency Derivatives Certification Exams
 2)NISM Series 2A: Registrar & Transfer Agent (Corporate) Certification Exams
 3)NISM Series 2B: Registrar &Transfer Agent (Mutual Fund) Certification Exams
 4)NISM Series 3A: Securities lntermediaries Compliance (Non Fund) Certification Exams
 5)NISM Series 3B: lssuers Compliance Certification Exams *
 6)NISM Series 4: Interest Rates Derivatives Certification Exams
 7)NISM Series 5A: Mutual Fund Distributors Certification Exams
 8)NISM Series 5B: Mutual  Fund Foundation Exams.
 9)NISM Series 5C: Mutual Fund Distributors (Leval-2) Certification Exams.*
10)NISM Series 6: Depositary Operatons Certification Exams.
11)NISM Series 7: Securities Operations & Risk Management Certification Exams.
12)NISM Series 8: Equity Derivatives Certification Exams.
13) NISM Series 9: Merchant Banking Certification Exams.
14)NISM Series 10A: Investment Adviser (Leval -1) Certification Exams.
15)NISM Series 10B: Investment Adviser (Level -2) Certifiation Exams.
16)NISM Series 11: Equity Sells Certification Exams.*
17)NISM Series 12: Securities Market Foundation Exams.*
18)NISM Series 13: Common Derivatives Certification Exams.
19)NISM Series 14:    Internal Auditors for Stock Brokers Certification Exams.*
20)NISM Series 15: Reserch Analist Certification Exams.
21)NISM Series 17:
Retirement Advicers Certification Exams.
22)IBBI Limited Insolvency Certification Exams.
*अशी खूण असलेले अभ्यासक्रम पूर्ण केले पाहिजेत अशी सेबीची सक्ती नाही .हे अभ्यासक्रम सामान्य ज्ञान वाढावे यासाठी सर्वांसाठी असून ते प्रामुख्याने विद्यार्थी ,शिक्षक ,गृहिणी यांना उपयुक्त आहेत .(उत्तरार्ध उद्या प्रसारित केला जाईल. अधिक माहितीसाठी : www.nism.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी)

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .


   

Friday, 18 August 2017

भांडवलबाजार शिक्षण आणि व्यवसायसंधी ....भाग ३

      भांडवलबाजार शिक्षण आणि व्यवसायसंधी ..........(भाग -३)

(मागील लेखावरून पुढे )
11)संशोधन संस्था (Research Company): या कंपन्या डेटा बँकेने जमवलेली माहिती तयार केलेले अहवाल यावरून जोखिम(Risk) व परतावा (Return)याचा अंदाज बांधून आपला अहवाल देतो .पूर्वीचे जे अंदाज चुकीचे ठरले त्याचा चिकित्सक विचार करतो .हे काम अत्यंत बुद्धिमत्तेचे असून असे कार्य करणाऱ्या संशोधकास सुसज्ज कार्यालय असून अनेक आधुनिक सोईसुविधा उपलब्ध असतात . आर्थिक ,मूलभूत व तांत्रिक अशा सर्व प्रकारचा अभ्यास करून देशातील स्थिति आणि जागतिक परिस्थिती यांचा विचार करून या तिन्ही प्रकारचे अहवाल संशोधकांकडून प्रकाशित केले जातात .जगभरात सर्वत्र त्याची दखल घेतली जाते .आर्थिक विषयाची पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट आणि 10 वर्षाचा अनुभव संशोधकास आवश्यक आहे .
12)मध्यस्थ (Arbitrager): शेअर बाजारांच्या संदर्भात मध्यस्थ हा एकमेव व्यवसाय आहे ज्यासाठी केवळ ज्ञान हेच भांडवल लागते आणि या व्यवसायात तोटा होत नाही .विशिष्ट कंपनीच्या दोन बाजारातील बाजारभावातील तफावत दूर करण्याचे काम हा मध्यस्थ करीत असतो समभाग व डेरीव्हेटिव्हमधील आर्बिट्राजर हा असा व्यवसाय आहे येथे कायम नफाच आहे जोखिम न स्वीकारता केला जाणारा असा हा अपवादात्मक व्यवसाय असून येथे कौशल्याप्रमाणे अधिकाधिक नफा कमवण्याची हमी आहे . बाजारातील तेजी अथवा मंदीकडे ध्यान न देता आर्बिट्राजरला फक्त तफावत शोधून आपल्याकडे घ्यायची असते .बाजारातील व्यवहारांचे पूर्ण ज्ञान ,संगणकावर जलदगतीने मागणी टाकण्याचे आणि असलेल्या संधीचा फायदा करून घेण्याचे तंत्र जमणे आवश्यक आहे .अनेक दलाल , मोठे गुंतवणूकदार आणि संस्था यांनी आपले आर्बिट्राजर नेमले असून त्यांचे भांडवल आणि आर्बिट्राजरचे कौशल्य असे असल्यास नफ्यातील काही टक्के हिस्सा आर्बिट्राजरला मिळतो . NISM कडील डेरिव्हेटीव्हजचे किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणे जरूरी आहे .
13)डेरिव्हेटिव्हज (Derivetives): मुंबई शेअर बाजारात यापूर्वी असलेल्या वायदा कराराची 'बदला'(हे या व्यवहाराचे नाव आहे.त्याचा हिंदी चित्रपटातील बदल्याशी काही संबध नाही) ही पद्धती ती बदलून नवीन फ्युचर आणि ऑप्शन या माध्यमातून भविष्यकालीन सौदे सुरू झाले .हे सौदे मूळ किंमतीला आधारभूत धरून केले जातात यामुळे काही अंशी बाजारातील चढ उतारावर ताबा रहातो .हे व्यवहार समभाग ,वस्तू ,चलन आणि अन्य मालमत्तेत केले जावू शकतात . ज्यावेळी मोठ्या वित्तीय संस्था व सहभागिदार मोठ्या प्रमाणात याद्वारे व्यवहार करू लागले तेव्हा जोखिम व्यवस्थापन नीट व्हावे म्हणून हेजिंग करण्यासाठी याचा वापर होऊ लागला .फ्यूचरमधे भविष्यकाळातील जोखिम स्वीकारलेली असते ऑप्शनमधे अधिमुल्य (Premium)देवून ती मर्यादीत केली जाते .म्यूचुअल फंड ,विदेशी वित्तसंस्था ,देशी वित्तसंस्था,मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार आणि काही धाडसी लोक मोठया प्रमाणात हे व्यवहार करत असतात. यापैकी म्यूचुअल व विदेशी वित्तसंस्था यांना फक्त हेजिंगसाठी असे  व्यवहार करण्यास परवानगी आहे. बाजारातील एकूण व्यवहारांच्या 80% हून अधिक व्यवहार डेरिव्हेटीव्हज मधे होत असल्याने यामधील तज्ञ व्यक्तिंना संधी आहे NISM कडून समभाग (Equity) वस्तू (Commodity) परकीय चलन (Forex) यातील वेगवेगळे तसेच सर्वांचे संयुक्त प्रमाणपत्र असलेले त्याचप्रमाणे  BSE /NSE यांचे डेरिव्हेटीव्हजवरील प्रमाणपत्र मिळवणे आणि अनुभव घेवून यामधे प्राविण्य मिळवणे जरूरी आहे.यातील एक व्यवहार हा किमान पाच लाखहून रुपयांहून अधिक मूल्यांचा असल्याने, यामधे नफा अधिक असला तरी भांडवल पूर्णपणे गमावून स्वतः कडील काही पैसे भरावे लागण्याचा मोठा धोकाही आहे .या करारामधे अनेक गुंतागुंतीच्या मुद्यांवर एकत्रित विचार केला जात असतो ,तेव्हा हे व्यवहार कसे होतात ते माहिती करून घेणे आणि प्राविण्य मिळवण्यासाठी जाणकारांकडे उमेदवारी करणे हे मार्ग आहेत .या व्यवहारांना एक्चेंजची हमी असल्याने व्यक्तिव्यक्तिंमध्दे होणाऱ्या भविष्यकालीन सौद्यांपेक्षा हे करार वेगळे आहेत .
14)आर्थिक गुन्हे (Crimes ) अन्वेषक : आर्थिक क्षेत्रात सुरळीत व्यवहार होण्यास नियम आहेत . अनेक लोकांनी सखोल विचार करून ते बनवले आहेत .परंतु गुन्हेगार यांपेक्षा हुशार असून त्यांना शोधून काढून शिक्षा देण्यास मदत करणे हे त्याहून बुद्धिमत्तेचे काम आहे .या क्षेत्रातील व्यवहार तज्ञ ,कायदेशीर ज्ञान असलेले आणि गुन्हेगारांच्या मानसिकतेचा विचार करू शकणारे या सर्वाना येथे संधी असून अशा व्यक्तिंची संस्था ,सरकारी यंत्रणा , सेबी यांना अशा लोकांची नियमीत मदत होवू शकते .हे काम कंत्राटी पद्धतीने चालत असून त्याचे स्वरुप व व्यापकतेप्रमाणे उच्च मोबदला मिळू शकतो .
15)आर्थिक नियोजक (Financial Planners): नियोजनास पर्याय नाही .आर्थिक नियोजक हा फी आकारुन उपलब्ध निधीचा उद्दिष्टानुसार कसा वापरता येईल ,त्याचे अंदाज पत्रक कसे असावे ,जोखिम व्यवस्थापन ,कर मार्गदर्शन , मालमत्तेचे नियोजन ,निवृत्तीनंतरचे नियोजन याविषयीच्या व्यक्तीगत गरजा लक्षात घेवून मार्गदर्शन करतो हा व्यवसाय वेतनासह /शिवाय अथवा कमीशन घेवून करता येवू शकतो .
समारोप : ही यादी परिपूर्ण नाही याशिवाय भागबाजारशी संबंधी अनेक व्यवसाय आहेत . उदा . प्राथमिक बाजार ,दुय्यम बाजारासंबधी कामे ,बाजार सुरू व बाजार बंद झाल्यावर करायची कामे ,अकाउंटीग ,तपासणी , विविध प्रसारमाध्यमे ,पत्रकारिता विविध कार्यक्रमाचे आयोजन , मुलाखती , स्थानिक व जागतीक बाजारातून निधी गोळा करणे , कार्यालयीन प्रशासन यासंबंधी अनेक व्यवसाय संधी आहेत .या संधींचे सोने करण्यासाठी नोंदणी आणि किमान पात्रता प्रमाणपत्र आवश्यक आहे . यातील कोणतेही काम दुय्यम नाही ,यांच्यातील सुसंवादाने बाजार सुरळीत चालतो .यातील अनुभव घेवून महत्वाकांक्षी लोकांना यासंबंधीच्या व्यवसायसंधी जगभर उपलब्ध आहेत कारण थोड्याफार फरकाने जगभरात याच पद्धतीने सर्व व्यवहार चालतात .  तेथे कंपनीचे नाव आणि चलन वेगळे असते एवढाच काय तो फरक . मागील तीन लेखातून काही व्यवसायांची ओझराती ओळख करून घेत असताना लेखन खूप लांबत चालले आहे . तरीही थोडक्यात जास्तीत जास्त परिपूर्ण माहिती आपल्याकडे पोहोचवण्याचा हा प्रयत्न .यातून कुणाला प्रेरणा मिळू शकली तर अधिक आनंद होईल . तेव्हा इथेच क्षणभर थांबूया .(समाप्त)

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे ,त्यास जरूर प्रतिसाद द्या .


Sunday, 13 August 2017

वस्तूबाजारातून हीरा खरेदी .....😀



 ...वस्तूबाजारातून हीरा खरेदी ...

   हीरा हा एक मौल्यवान आणि सामन्यांच्या आवाक्यात न येणारा धातु /रत्न आहे असे अनेकांना वाटते . त्यांच्या संकल्पना बदलून टाकणाऱ्या काही कल्पक योजना घेवून येण्यास ,इंडियन कमोडिटी एक्चेंज (ICEX) तयार आहे . सेबी या भांडवलबाजार नियामकाकडून (Securities &Exchange Board of India ) नुकतीच त्यांच्या हीरा खरेदी एस ई पी  ला मंजूरी मिळाली आहे .त्यामुळे आता हीरा खरेदी /विक्री करणे सोपे झाले आहे. किमान 1 सेंट हीऱ्याच्या किंमती एवढी रक्कम (अंदाजे ₹900/-)आपण दरमहा गुंतवून (एस आई पी)30 सेंट 50सेंट आणि 100 सेंट या तीन प्रकारात आपण हीरा खरेदी करू शकणार आहोत . lCEX चा सदस्य असलेल्या दलालाकडे आपल्या ग्राहक ओळखी KYC ची पूर्तता करून एक खाते काढावे लागेल .जर आपल्या दलालांनी ही सेवा आपणास देवू केली असेल तर त्याच्यामार्फत हे व्यवहार आपण करू शकतो .काही तांत्रिक कारणाने आपले समभाग , रोखे , यूनिट असलेले निक्षेपीकेकडील सध्याचे खाते ( D -mat account) आपणास या व्यवहारात वापरता येत नसल्याने जास्तीचे एक डी मॅट खाते काढावे लागेल .हे व्यवहार पुढील महिन्यात नियमित सुरू होतील ,यासंबंधी प्रयोग तत्वावर काही चाचणी व्यवहार (MockTrading) ICEX वर होत आहेत .या बाजारात घेतलेला हीरा हा अमूर्त (Electronic) पद्धतीने खरेदी करता येत असल्याने 1 सेंटहून कमी /अधिक खरेदी करता येवू शकेल .मांत्र जर तो वस्तूरूपात (Physical Form) हवा असेल तर किमान 30 सेंट आपण खरेदी केलेले असले पाहिजेत . दरमहा एक सेंटचे पटीत SIP करून नंतर मूर्त स्वरूपात हीऱ्याचा ताबा घेता येईल .अशा प्रकारची हीरा खरेदीची जगातील ही पहिलीच व एकमेव योजना आहे .येथे फक्त नैसर्गिकरीत्या उपलब्ध झालेल्या हीऱ्यांची खरेदी विक्री होईल त्यास जगप्रसिद्ध हीरा उत्पादक व विक्रेते De Beers ने 4C (Cut -पैलू ,Carat - वजन , Colour - रंग ,Clarity - पारदर्शी) ने प्रमाणित केलेले असेल  MALCA याजगप्रसिद्ध हीरे कुरियर सेवेने त्याची पोच खरेदीदारास केली जाईल . बाजारात लोकांच्या मागणीनुसार भाव बदलत रहातील आणि आंतरराष्ट्रीय भावाचे आसपास कालांतराने स्थिरावतील  ,पुरेशी पारदर्शकता या व्यवहाराना मिळेल . यामुळे दर्जेदार ,प्रमाणित हीरा खरेदी करणे सर्वसामान्यांना शक्य होणार आहे .भावात पडणाऱ्या फरकाचा लाभही  (Trading)करून घेता येणेही शक्य आहे. सोने , चांदी , हीरे यातून मागील काही वर्षात मिळालेला उतारा हा अपवादात्मक परिस्थिती वगळता आकर्षक नाही. तरीही मोठ्या प्रमाणात हौशी आणि गुंतवणूकदार जगभर यात व्यवहार करीत असतात त्यामुळेच  यातील भावनात्मक मुल्याची तुलना करता येणे अशक्य आहे .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .


Friday, 11 August 2017

भांडवलबाजार शिक्षण आणि व्यवसायसंधी ....(भाग -२)

      भांडवलबाजार शिक्षण आणि
व्यवसायसंधी ......(भाग --२)

(मागील लेखावरून पुढे)
5)निक्षेपक /निक्षेपिका (Depositary &Depositary Participant ):ही सुविधा म्हणजे 21 व्या शतकातील गुंतवणूकदारांना मिळालेले वरदान आहे .यामूळे तांत्रिकदृष्ट्या कोणतीही गुंतवणूक कागद विरहित करणे शक्य झाले आहे . समभाग बाजारात याची टप्प्याटप्प्यांत आणि सक्तीने अमंलबजावणी झाल्याने व्यवहार सहज, सुलभ , सोपे,जलद आणि पारदर्शक झाले आहेत . गुंतवणूकदारास अत्यंल्प गुंतवणूक करणे यामुळे शक्य झाले असून ह्या अतिशय सोप्या वाटणाऱ्या पद्धतीत प्रवेश ,नोंदी , हिशोब , ऑडीट ,करविषयक माहिती , नेटवर्क , डी पी नेटवर्क , डी पी नूतनीकरण , आर्बिटरेशन , बॅकप ,पर्याय यंत्रणा अशा अनेक विभागांचा सामावेश होतो .यामधे सी ए , अकौंटंट , वकील, इंजीनियर ,संगणक तज्ञ नेटवर्कतज्ञ ,पत्रकार याशिवाय संगणकाची अगदी जुजबी ओळख असलेल्या सर्वाना संधी आहे या पद्धतीचे महत्व सर्वाना पटल्याने समभागाशिवाय रोखे ,यूनिट ,ई टी एफ ,बचत योजना पत्रे ,विमा प्रमाणपत्रे कमर्शियल पेपर , सर्टिफिकेट ऑफ डेपॉजिट आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिली घेतली जात आहेत .येथे काम पडणाऱ्या
प्रत्येकास डेपोसिटरी ऑपरेशन , रिस्क मॅनेजमेंट सर्टिफिकेशन पूर्ण करणे या किमान पात्रता आहेत , व्यक्तीगतरित्या डिपोसिटरी पार्टिसिपंट म्हणून काम करणे हा व्यवसाय होवू शकतो तर त्यांच्याकडे आपल्या क्षमतेनुसार नोकरी करणे हा एक पर्याय होवू शकतो .
 6)मूलभूत विश्लेषक (Fundmental Anyalist): बाजारात मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याने स्पर्धात्मक युगात आधिकाधीक गुंतवणुकदार आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी विशिष्ट रितीने अभ्यास करून त्यातून काढलेले निष्कर्श जर बरोबर आले तर मोठ्या प्रमाणात व्यवसायसंधी वाढतात हे येथील दलाल ,बँका , अर्थसंस्था ,बँकेतर वित्तीय संस्था , एसेट मॅनेजमेंट संस्था या भागबाजारांच्या घटकांना माहीत झाले आहे .सी ए ,सी एस , एम बी ए (फायनान्स/अकौंटसी) असे शिक्षण घेतलेले असलेल्या व बाजारात करीयर करू इच्छिणाऱ्या सर्वाना मूलभूत विश्लेषक होण्याची संधी आहे मुंबई शेअर बाजाराने या संबंधिचा एक अभ्यासक्रम विकसित केला आहे .उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करून कोणत्याही कंपनीचे आंतरिक मूल्य शोधून काढणे ही एक कला आहे यानाच रिसर्च /सिक्युरिटी फायनांस एनालिस्ट असेही म्हणतात .यांचे काम शास्त्रावर आधारित आहे जोखिम /परतावा यांची चक्रवाढ पद्धतीने पृथकरण करून पैशाचे वर्तमान काळातील मूल्य व भविष्य मूल्य याचा विचार केलेला असतो यामूळे गुंतवणूकदाराची जोखिम कमी होते .Du pont या कंपनीने विकसित केलेल्या SWOT पद्धतींनी कंपनीचे बलस्थान , त्रुटी ,उपलब्ध संधी,संभावित धोके (Strength,Weekness ,Opportunity ,Threat) यामूळे गुंतवणूकीवरील परतावा (ROE : Return on Equity) काढणे सोपे झाले आहे . यामूळे अपेक्षित जोखिम व परतावा याबाबत अचूक अंदाज बांधणे सोपे होते .नेमके काय आणि कसे करायचे ,उपलब्ध आकडेवारी काय सूचवते यावरून अर्थबोधन करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे .अनेक कंपन्या , बँका ,वित्तसंस्था ,एसेट मॅनेजमेंट कंपन्या ,दलाल यांच्याकडे उच्च वेतनमानाने सुरू होणाऱ्या नोकऱ्याची संधी आहे .याशिवाय फी आकारुन अशा प्रकारे स्वतंत्र व्यवसाय करता येणॆ शक्य आहे . nism कडून किंवा समकक्ष प्रमाणपत्र व सेबीकडे नोंदणी आवश्यक .
7) तांत्रिक विश्लेषक :(Technical Annyaalist) तांत्रिक बिश्लेषण  हे मूलभूत विश्लेषणापेक्षा वेगळे असून मूलभूत विश्लेषक असा विचार करतात की बाजार हा जास्तीत जास्त तर्कावर तर काही प्रमाणात मानसिकतेवर आधारित आहे तर तांत्रिक विश्लेषकांच्या मते तो जास्तीत जास्त मानसिकतेवर आणि काही प्रमाणात तर्कावर आधारित आहे .त्यामुळे तांत्रिक विश्लेषकांचा भर हा शेअरबाजारातील स्थित्यंतरावर असतो यासाठी रेखाचित्रे आलेख यांचा अभ्यास केला जात असल्याने चार्टिस्ट असेही म्हणतात. पूर्वीचे वर्तन पायाभूत समजून भविष्यातील वर्तनाचा त्यांच्याकडून वेध घेतला जातो मोठ्या प्रमाणात खरेदीविक्री करणाऱ्या संस्था काही समभाग दीर्घ मुदतीसाठी तर काही अल्प मुदतीसाठी घेतात यातील अल्प मुदत आणि डे ट्रेडिंगसाठी तांत्रिक विश्लेषकाना उच्च वेतनाच्या नोकरीची संधी आहेत .तांत्रिक विश्लेषण आपण टाळू शकत नाही कारण भावात होणारी वट घट ही त्यामागील समूहांच्या एकत्रित मानसिकतेमुळे होते हे सर्वमान्य आहे .जे लोक नफा आणि नुकसान लीलया पचवू शकतात त्यांचे हे आधारस्तंभ आहेत .फी आकारणी करून हा स्वतंत्र व्यवसायही होवू शकतो .nism कडून याचा प्राथमिक आणि प्रगत असा अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि सेबीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे .
8)फंड व्यवस्थापक ( fund manager)शेअर बाजारात भारतीय आणि विदेशी वित्तसंस्था मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत असतात ही गुंतवणुक ज्या ऊद्धेशाने केली जाते .त्या प्रमाणे करणे करून देणे ,वेळोवेळी त्याचा आढावा घेणे ,कालानुरुप यात बदल करणे हे फंड व्यवस्थापकाचे  काम आहे .तज्ञांच्या मोठ्या गटाचे तो नेतृत्व तो करीत असतो आणि अंतिम निर्णय घेवून एक पायंडा (Benchmark)पाडत असतो या कामाची व्याप्ती पोर्टफोलिओ मेनेजरहून जास्त असून फायनान्समध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना नामवंत फंड मेनेजरचे सहायक म्हणून सुरुवात करून साधारण तीन वर्षाच्या अनुभवाने स्वतंत्र व्यवसाय अथवा नोकरीच्या संधी आहेत .
9)संपत्ती व्यवस्थापक (Assets Manager): म्यूचुअल फंड ,समभाग संलग्न विमा योजना ,पेन्शन फंड हे गुंतवणूकदाराचे वतीने बाजारात गुंतवणूक करीत असतात ही गुंतवणूक करण्यासाठी विश्वस्त संस्था स्थापन करावी लागते ते विविध योजना बाजारात आणतात .अशा योजना आखणे , सेबीची परवानगी घेणे ,प्रारंभिक विक्री करून जमा रकमेची योजना उद्देशानुसार कार्यान्वित करणे , कायदेशीर तरतुदीप्रमाणे nav जाहीर करणे विविध अहवाल तयार करणे ,तक्रार निवारण यंत्रणा उभी करणे ,खर्च कमीशन यांची माहिती देणे या सारखी कामे वेळेत आणि तत्परतेने करणे जरुरीचे असते अतिशय जोखमीचे काम असल्याने उच्च शैक्षणिक पात्रता आणि काही वर्षाचा सहाय्यक व्यवस्थापकाचा अनुभव असणे गरजेचे आहे .हे फार जबाबदारीचे काम असल्याने त्याचे वेतनमान साजेसे आणि उच्च असते .
10)माहिती संकलन (Deta Bank) : शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या सर्वांची मार्गदर्शनाची गरज डेटा बँक आणि रिसर्च कंपनीद्वारे पूर्ण होऊ शकते . उपलब्ध आकडेवारीच्या सहायाने संशोधनात्मक अहवाल तयार करणे हे जिकिरीचे काम आहे . कोणताही निर्णय घेण्यापुर्वी त्याचा इतिहास पहाणे गरजेचे असते . शेअर बाजार सतत भविष्याचा वेध घेत असेल तर या क्षेत्राची भूतकाळातील कामगिरी ही पथदर्शक ठरते उदाहरणार्थ अन्य कोणत्याही गुंतवणूक प्रकारपेक्षा समभाग गुंतवणूक ही जास्त फायदेशीर आहे हे सांगणे संकलित केलेली माहिती आणि त्याद्वारे काढलेला निष्कर्ष यामूळे सहज समजू शकते .ही सर्व माहिती गोळा करणे त्याची नोंद ठेवणे आणि त्यातून अनुमान काढणे यासाठी अचुकतेने काम करणाऱ्या व्यक्तीची गरज लागते .ही आकडेवारी अहवाल मोबदला घेवुन व्यक्ति आणि संस्था यांना पुरवले जातात एका अर्थी गुंतवणूकीचा डेटा बँक हा कच्चा माल आहे .हे काम पूर्णवेळ किंवा अर्धवेळ करता येवू शकते कामाचे निश्चित स्वरूप आणि आवाका यावर डेटा कंपनीचा मोबदला अवलंबून असतो .ठोक स्वरूपात हे काम स्विकारले तर घरी बसूनही करता येवू शकते .यासाठी संगणकावर वेगाने व अचुकतेने काम करण्याचा सराव असणे जरुरीचे आहे .(अपूर्ण)

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख आणि यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर आहे .
 

Friday, 4 August 2017

भांडवलबाजार शिक्षण आणि व्यवसायसंधी .......(भाग --१)

    भांडवलबाजार शिक्षण आणि व्यवसायसंधी ......(भाग --१)

   भांडवलबाजारात अनेक घटक कार्यरत आहेत .तेथे मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाची देवाण घेवाण होते .त्यामुळे शेती ,उद्योग ,सेवा क्षेत्राचा विस्तार व आधुनिकीकरण शक्य होते तर व्यक्ति ,बँका ,वित्तीय संस्था ,गुंतवणूक संस्था ,विमा कंपन्या ,विकास बँका यांचेमार्फत बचत आणि गुंतवणूकीचे विविध मार्गातून एकत्रिकरण होवून त्याना सुयोग्य परतावा तर खाजगी उद्योजक , शासन आणि सार्वजनिक उपक्रम यांची कर्ज मागणी पूर्ण केली जाते . भागबाजार (Stock Exchange ),वस्तु बाजार (Commodity Market ) गुंतवणूक विश्वस्त संस्था (Investment Trust),परस्पर निधी Mutual Funds ), निक्षेपसंस्था (Depositary), निक्षेपक (Depositary Participant ) विशेष वित्त संस्था (Specialized Financial Institutes),विनिमय संस्था (Exchanges),बँकेतर वित्तीय संस्था (Non Banking Financial Companies ), पतमापन संस्था (Credit Ratings Agencies ), प्रकल्पसेवी बँका (Merchant Banks ),आंतरराष्टीय वित्तीय संस्था(International Financial Institutes)या घटकांच्या माध्यमातून येथे व्यवहार केले जातात .हे व्यवहार पूर्णपणे पारदर्शक आणि संगणकामार्फत होत असतात , तसेच त्यावर भारतीय रिझर्व बँक (RBI), AMFI ,IRDA ,PRADA नियंत्रण आहे आणि त्यानी केलेल्या समभाग ,रोखे आणि वस्तु व्यवहारावर अंतिम नियामक म्हणून भांडवल बाजार नियंत्रकांचे (SEBI) यांचे नियंत्रण  आहे . विविध व्यक्ती ,संस्था ,परकीय गुंतवणुकदार यांच्यातील व्यवहारांचे प्रमाण प्रचंड असून तंत्रज्ञान वेगवान झाल्याने अनेक तज्ञ व्यक्तींची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे अनेकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत .हे  एकाअर्थी सेवा पुरवणारे उद्योगक्षेत्र बनले असून सेबीच्या नविन कायदेशीर बंधनाप्रमाणे यातील बहुतेक सर्व  घटकांना नोंदणी आणि किमान शैक्षणिक पात्रता अनिवार्य असल्याने संबधीत विषयातील ज्ञान /प्रशिक्षण घेणे जरुरीचे आहे त्याचप्रमाणे ठराविक मुदतीने पुन्हा परीक्षा देवून नविन बदलांचे ज्ञान आपल्याला आहे हे सिद्ध करावे लागत असल्याने काळानुसार होणारे बदल माहीत करून घ्यावे लागत आहेत .तसे पाहिले एकूण लोकसंख्येच्या 4% हून कमी लोक प्रत्यक्षपणे तर इतर बहुसंख्य लोक इतर बचत आणि गुंतवणूकीच्या  माध्यमातून अप्रत्यक्षपणे ,तसेच देशी आणि विदेशी संस्थापक गुंतवणुकदार कोट्यावधी रुपयांचे व्यवहार रोज करत असून सरकारलाही मोठ्या प्रमाणात करप्राप्ती  आणि भांडवल निर्मिती करण्यासाठी या बाजाराचा उपयोग होत आहे . येथील बहुतेक व्यवहार हे मुंबई शेअरबाजार (BSE) , राष्ट्रीय शेअरबाजार (NSE) ,वस्तू व्यवहार प्रामुख्याने MCX यामधे होत असतात आणि जगाच्या पाठीवरून कुठूनही करता येतात .बाजारातील प्रशिक्षित लोकांची गरज पूर्ण करण्यासाठी BSE आणि NSE कडून विविध परीक्षा व पूरक अभ्यासवर्ग ,अर्ध वेळ /पूर्णवेळ अभ्यासक्रम घेतले जातात .NISM या सेबीने स्थापना केलेल्या न्यासाकडून ,तसेच अन्य विद्यापीठे शैक्षणिक संस्था खाजगी संस्था यांच्यातर्फे स्वतंत्रपणे अथवा सहकार्याने असे अभ्यासक्रम घेतले जात आहेत यातील बरेचसे अभ्यासक्रम स्वयंअध्ययनाने व माफक फी देवून करता येत असून त्यासाठी प्रश्न समजणे आणि परीक्षा ऑनलाईन असल्याने संगणकाचे जुजबी ज्ञान आवश्यक आहे .सर्व अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमात असून काही अभ्यासक्रम हिंदी आणि गुजराथी माध्यमात उपलब्ध आहेत . भांडवलबाजारातील काही व्यवसाय ,कामाचे स्वरूप आणि त्यासाठी आवश्यक पात्रता यांना स्पर्श करण्याचा हा अल्पप्रयत्न असून अभ्यासक्रमाचे नाव , नोंदणी , शैक्षणिक पात्रता ,यात येणारे विषय ,फी ,शैक्षणिक साहित्य , सराव परीक्षा ,अंतिम परीक्षा ,व्यवसाय संधी आणि अभ्यासक्रमाची  वैधता यासंबंधीची सविस्तर माहिती त्या त्या संस्थेच्या संकेतस्थळावर असून आवड आणि इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने आपले ज्ञान वाढवण्यासाठी याचा उपयोग करून घेतला पाहिजे .
   कोणी काही म्हणो ,पैशाच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे आणि जीवनातल्या महत्वपूर्ण स्थानामुळे पैशाचा ओघ स्वतःकडे आणणे हे आपले प्राथमिक उद्दिष्ट सर्वच गुंतवणूकदाराना ठेवावे लागते आणि यासाठी कोणी आपले बोट धरून नेईल याची वाट न पहाता वेळ न दवडता गीतेतील संदेशाप्रमाणे स्वताचा उद्धार स्वतः करावा नाशास कारणीभूत होवू नये कारण आपणच आपले मित्र आणि आपणच आपले शत्रू असतो . तेव्हा आळस झटकून सर्वप्रथम काही महत्वाचे व्यवसाय ,त्याचे कामाचे स्वरूप, शैक्षणिक पात्रता यांचा विचार करून यातील शिक्षण आणि व्यवसाय संधी यांचा धावता आढावा घेवूयात  :
  1)दलाल (Brokar): हा एक स्वतंत्र व्यवसाय असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते मुंबई शेअर बाजाराचे सभासदत्व मिळवण्यासाठी 12 वी उत्तीर्ण असणे तर राष्ट्रीय शेअरबाजारासाठी पदवीधर असणे   ही किमान शैक्षणिक पात्रता आहे .असे असले तरी यापेक्षा उच्च शिक्षण जसे सी ए ,सी एस ,एम बी ए यांना प्राधान्य मिळते .nism कडील mandatory certification examination for associated person in the securities markets या किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते .याशिवाय  सेबिकडे नोंदणी फी भरून परवानगी घ्यावी लागते .ज्या बाजाराचे सदस्यत्व हवे  बाजारकडे प्रवेश फी ,नोंदणी फी (cash आणि derivetives  साठी वेगवेगळी ) वार्षिक फी ,ट्रेडिंग फी ,अनामत ,को लेटरल सेक्यूरिटी ,ट्रेड ग्यारंटी फंड ,आपतकाली निधी,याशिवाय  दोन विद्यमान सदस्यांची शिफारसपत्रे याशिवाय  मोठ्या प्रमाणात वैयक्तीक मालमत्ता (networth ) असावी लागते .या व्यवसायास मोठ्या प्रमाणात खेळत्या भांडवलाची गरज लागते .त्यामुळे स्वतः कडे किमान 10 कोटी रुपये असल्याशिवाय हा व्यवसाय करता येणे अशक्य आहे यातून मिळणारे उत्पन्न हे दलाली असल्याने स्पर्धात्मक दलालीत जास्तीत जास्त ट्रेडर मोठे ग्राहक एच एन आई ,एन आर आई आणि देशी विदेशी संस्थात्मक गुंतवणूक दार मिळवणे आणि त्यांना आपल्याकडे टिकवून ठेवणे  जरुरीचे आहे . रीतसर करार करून त्याची पूर्तता करावी लागते .पूर्णपणे बुद्धिजीवी असा हा व्यवसाय असून खरेदीदार आणि विक्रेते यातील महत्वाचा दुवा आहे .काही मोजके व्यवहार सोडले तर दलालाशिवाय व्यवहार करणे बेकायदेशीर आहे .
2) उपदलाल (sub broker): दलाल आणि गुंतवणूकदार यामधील उपदलालाचे स्थान महत्वाचे आहे .दलालांच्या मर्यादित संख्येमुळे सर्वच गुंतवणूकदार दलालाशी थेट संपर्क प्रस्थापित करू शकत नाहीत .सेबी आणि एक्सचेंजकडे नोंदणी आवश्यक , किमान शैक्षणिक पात्रता 12 वी याशिवाय nism ची परीक्षा किंवा समकक्ष  परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असून नोंदणी फी , परवाना शुल्क आणि मुख्य दलालाकडे उभयपक्षी मान्य अनामत रक्कम ठेवून हा व्यवसाय करता येतो आणि तो पूर्णवेळ अथवा अर्धवेळ करता येणे शक्य आहे .विद्यार्थी ,गृहिणी स्वेच्छा /सेवा निवृत्त लोक हे काम करू शकतात .जे लोक उप दलालाचे माध्यमातून गुंतवणुक करतात त्यांना दलाल ,उपदलाल आणि गुंतवणूकदार या तिघांचा एकत्रित करारनामा करावा लागतो याशिवाय असा व्यवसाय करणे    बेकायदेशीर आहे .साधारणपणे 10 लाख रुपये गुंतवून हा व्यवसाय करता येणे शक्य आहे .उत्कृष्ट सेवा आणि मोठा जनसंपर्क याद्वारे यात प्रगती करता येणे शक्य असून बाजार हा भविष्यवेधी असल्याने ज्ञान आणि अनुभव याद्वारे आपली प्रगती करता येणे शक्य आहे .
3)गुंतवणूक संच व्यवस्थापक ( portfolio manager) : हा गुंतवणूकदाराच्या गरजेप्रमाणे विविध ठिकाणी गुंतवणूक करून देतो त्यातील जोखिम व त्यावरील उपाययोजना अमलात आणतो . त्याच्या सर्व शंकांची उत्तरे देतो  . गुंतवणूकदारास गुंतवणूकीचे सखोल ज्ञान असतेच असे नाही अशावेळी त्याला तज्ञ व्यक्तीची गरज लागते .गुंतवणूकीच्या विविध प्रकारांचे ,कायद्याचे ज्ञान आवश्यक असून मोठया कंपन्या ,म्यूचुअल फंड ,वित्त संस्था येथे स्वतंत्र पोर्ट फोलिओ मॅनेजर नेमलेले आहेत  त्यांचे वेतनमान उच्च असते काही ब्रोकिंग फर्म ,मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकणाऱ्या ग्राहकांना फी आकारुन ही सुविधा उपलब्ध करून देतात . यासाठी करार करून आपल्या वतीने सर्वाधिकार पोर्ट फोलिओ      मॅनेजरला दिलेले असतात .अजून वैयक्तिक गुंतवणूकदारापैकी अशा व्यक्तीची नेमणूक करणारे फार थोडे लोक आहेत .सेबीकडे नोंदणी करून गुंतवणूक व्यवस्थापकाचे पात्रता निकष पूर्ण करावे लागतात .nism कडून प्राथमिक basic आणि प्रगत advance portfolio manager चे सर्टिफिकेशन मिळवावे लागते .ही परीक्षा ऑनलाईन असते. विशिष्ट व्यवसायिक शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या काहींना यातून सूट देण्यात आली आहे .या व्यक्ति निर्धारित नियमांचे पालन करून नोकरी अथवा स्वतंत्र व्यवसाय करू शकतात .गुंतवणूकदाराचा Doctor असेही याला म्हणायला हरकत नाही .
4)गुंतवणूक सल्लागार :( investment adviser ) किमान शैक्षणिक पात्रता पदवी ,विशिष्ट व्यावसायिक शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या व्यक्ति सोडून nism ची प्राथमिक आणि प्रगत परीक्षा देणे अनिवार्य आहे .सर्वाना सेबीकडे नोंदणी करने आवश्यक असून दिलेल्या सल्ल्याच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे .गुंतवणूक व्यवस्थापक गुंतवणूकदाराच्यावतीने प्रत्यक्ष व्यवहार करतो तर गुंतवणूक सल्लागार फक्त सल्ला देतो , दोघांनाही गुंतवणूक विषयक सखोल ज्ञान हवे ,बाजारातील बदल टिपून घेता आले पाहिजेत . आपल्या ग्राहकास आपला निर्णय पटवून देता आला पाहिजे , कायद्यातील बदल ,कर प्रणाली याची माहिती हवी तसेच ग्राहकास त्याच्या अपेक्षेप्रमाणे वारसा नोंद करण्याचा आग्रह त्याने धरायला हवा .सखोल माहिती ,कामाची आवड ,अनुभव या बळावर हा व्यवसाय करणे शक्य आहे .अनेक ठिकाणी पूर्णवेळ नोकऱ्या उपलब्ध आहेत (अपूर्ण).....😣

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

आपल्या मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी शेअर करा म्हणजे अनेकांपर्यत ती माहिती एकाच वेळी पोहोचेल.