Monday, 24 April 2017

विदेशी चलनबाजार (Foreign Currency Market)

     .....विदेशी चलनबाजार..... (Foreign Currency Market)


     विदेशी चलनबाजार (Foreign Currency Market)हा वित्तीय बाजाराचा महत्वाचा घटक आहे.खाजगीकरण ,उदारीकरण ,जागतिकीकरण यामुळे दळण वळण आणि संपर्क क्षेत्रातील मोठी क्रांती झालीआहे. त्यामुळे दोन देशातील वस्तू आणि सेवा यांच्या व्यापारात वाढ झाली आहे.प्रत्येक देशाचे स्वतः चे असे चलन वेगळे वेगळे असते  आणि त्याच्या अंगभूत क्रयशक्तिमुळे तेथील वस्तु आणि सेवांची खरेदी विक्री होत असल्याने, त्या देशाचे चलन असण्याची आवश्यकता निर्माण झाली. हे चलन घेण्यासाठी आपल्याकडील चलन द्यावे लागते तर वस्तूंची विक्री करून आलेल्या दुसऱ्या देशातील चलनाचे रुपांतर आपल्या देशातील चलनात बदलून घ्यावे लागते असे व्यवहार जेथे होतात त्यास विदेशी चलन बाजार असे म्हणतात.येथे दोन चलनांची आदलाबदल होते.असा विनिमय ज्या ठिकाणी होतो तेथे खरेदी आणि विक्री याचे दर वेगवेगळे दाखवले जातात.हे दर अनेक कारणाने सातत्याने बदलत असतात.या दरास विनिमय दर असे म्हणतात. ही एका चलनाची दुसऱ्या चलनात व्यक्त केलेली किंमत असून यामधील फरक हा चलन व्यवहार करणाऱ्याचा नफा असतो.जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी असे व्यवहार चालू असल्याने हा बाजार 24 तास चालू असतो.
   आयातदार ,परदेशी जाऊ इच्छीणारे पर्यटक त्याचप्रमाणे निर्यातक विदेशी पर्यटक या सर्वाना अशा चलन बाजाराची जरूरी असते यामुळे व्यापारवृद्धी , अौद्याेगीक विकास ,आर्थिक विकास ,भांडवलवाढ ,सांस्कृतीक देवाणघेवाण यात वाढ होते. या बाजारात एकाचवेळी चलनाची मागणी आणि पुरवठा चालू असतो आणि चलनांची अदलाबदल होत असल्याने प्रत्यक्षांत क्रयशक्तिंचे हस्तांतरण होत असते.विदेशी चलन बाजारात अशा चलनांची आवश्यकता असणारे ग्राहक , व्यापारी बँका ,रिझर्व बँक , मान्यताप्राप्त विक्रेते आणि सट्टेबाज कार्यरत आहेत.या मध्ये चलनाचे हजर व्यवहार (spot) आणि वायदे व्यवहार (futures) होतात.हे व्यवहार व्यापारी व्यवहार ,आंतर बँक व्यवहार , विदेशी व्यवहार ,रिझर्व बँकेने इतर बँकाशी केलेले व्यवहार व चलन स्थिर ठेवण्यासाठी केलेला हस्तक्षेप यांसारख्या स्वरूपात असतात. यापूर्वी असे व्यवहार फक्त मोठ्या शहरांत होत असत.दळण वळणातील प्रगती , विदेशी व्यापारात वाढ ,सहयोगी सदस्यामधील वाढ ,झटपट आणि पारदर्शी व्यवहारामुळे विदेशी बाजारातील व्यवहार वाढले आहेत.

©उदय पिंगळे

ही माहिती सर्वाना समजण्यासाठी श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/



No comments:

Post a Comment