Monday, 24 April 2017

भांडवल बाजार (capital market)

    भांडवल बाजार (Capital Market)

   भांडवल बाजार (Capital market) हा वित्तीय बाजारातील एक महत्वाचा घटक आहे. एखादया देशाची आर्थिक सुधृढता ही त्या देशाच्या भांडवल बाजाराच्या प्रगतीवरून मोजली जाते.मागील लेखांकात आपण नाणेबाजारात अल्पमुदतीच्या कर्जाची देवाण घेवाण होते हे पहिले.ज्याप्रमाणे शेती ,उद्योग आणि सेवा क्षेत्रास दैनंदिन व्यवहारांसाठी पैशांची गरज असते त्याचप्रमाणे अवजारे , ईमारत , यंत्रसमुग्री,तंत्रज्ञान या गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणात पैशाची  गरज असते. यामधून दीर्घ काळात उत्पन्न निर्माण होत असल्याने त्या॑ना भांडवली वस्तु असे म्हणतात. भांडवलबाजारात अशा वस्तुंऎवजी त्या घेण्यासाठी लागणाऱ्या पैशांची म्हणजेच चलनी भांडवलाची उलाढाल होत  असते. मध्यम आणि दीर्घ स्वरूपाच्या कर्जाच्या माध्यमातून ही देवाण घेवाण ज्या यंत्रणेच्या मार्फत होते त्यास भांडवलबाजार असे म्हणतात.
   देशाच्या विकासात भांडवलबाजाराचा मोठा वाटा आहे.येथून सरकारला मोठ्या प्रमाणात कर आणि कर्ज मिळते. भांडवलबाजारात कार्यरत असणारे विविध घटक हे मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची बचत व गुंतवणुक गोळा करतात.धाडसी गुंतवणूकदाराना गुंतवणूकीच्या विविध संधी उपलब्ध करून देतात तर खाजगी ,सहकारी आणि  सरकारी उद्योगाना उभारणी , विस्तार आणि आधुनिकीकरण यासाठी अल्पखर्चात निधी गोळा करण्याची संधी देतात.अतिरिक्त निधी असलेल्या काहींना गुंतवणूकीत सुरक्षीतता हवी असते तर काहींना अधिक उत्पन्न हवे असते त्यासाठी धोका पत्करण्यास ते तयार असतात तर काहीजणांना यांतील मध्यम मार्ग आवडतो. यातील प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या विविध योजना भांडवलबाजारात उपलब्ध आहेत.उद्योगधंद्याप्रमाणे सरकारला प्रशासकीय खर्च , युध्द , नैसर्गिक आपत्ती ,पायाभूत सुविधांची निर्मीती यासाठी वेळोवेळी पैशाची मोठ्या प्रमाणात गरज पडते ,तर व्यक्ति ,बँका ,विमा कंपन्या , विकास बँका,खासगी संस्था यांच्याकडे असलेला अतिरिक्त पैसा किफायतशिररित्या गुंतवण्याची संधी  भांडवलबाजारातून प्राप्त होते.मोठ्या प्रमाणात भांडवल निर्मीती झाल्याने विकासदर वाढतो ,उत्पादकता वाढते त्यामुळे आैद्योगीक विकास होऊन देशाची प्रगती होते.
  देश स्वतंत्र झाला त्यावेळी मोठ्या प्रमाणात भांडवलबाजाराचा विकास झाला नव्हता परंतु आर्थिक  विकासातील भांडवलबाजाराचे स्थान लक्षात घेऊन या बाजाराचा विकास करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेल्याने भागबाजार ,बँका ,विमा कंपन्या ,खाजगी संस्था ,विश्वस्त संस्था ,म्यूचुअल फंड ,पोस्ट ऑफीस ,विनिमय बँका ,बँकेतर वित्तीय संस्था ,परकीय वित्तसंस्था , विशेष वित्त संस्था ,भूविकास बँका ,वस्तुबाजार ,वायदेबाजार ,  भविष्यनिर्वाह निधी ,निवृतनिर्वाह निधी ,रोखेबाजार ,सरकारी रोखे बाजार या भांडवलबाजारातील घटकांना त्यांचा विस्तार करून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करणे विविध योजनांच्या माध्यमातून शक्य झाले.त्यामुळेच  मध्यम आणि दीर्घकालीन कर्जाच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आज आपल्याला दिसून येत आहे.
   असंघटित क्षेत्राचे अस्तित्व आणि त्यांच्याकडून अनूत्पादक कार्याला पुरवला जाणारा निधी ,मोठ्या प्रमाणातील गरीबी त्यामुळे त्यांच्याकडून कडून येणाऱ्या भांडवलाचा अभाव ,शेती क्षेत्राचा अल्प सहभाग,यापूर्वी झालेले विविध आर्थिक घोटाळे हे भारतीय भांडवलबाजारातील दोष म्हणता येतील मांत्र व्याजदर निर्बंध शिथिलता ,विविध मध्यस्थांची नोंदणी , sebi /irda /parda सारख्या स्वतंत्र नियामकांची स्थापना , प्रकल्पसेवी बँकांची स्थापना (Merchant Bankers),परकीय गुंतवणुकीला परवानगी , रोखेबाजारातील सुधारणा ,राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना ,वस्तू बाजार ,वायदे व्यवहार ,विविध पतमापन संस्थांचे अस्तित्व , संगणकामार्फत कागद विरहित आणि पारदर्शी व्यवहार , जलद हस्तांतरण  या आणि अशा सुधारणा गेल्या 30 वर्षात केल्या गेल्याने हे क्षेत्र आता मोठ्या प्रमाणात संघटित व अधिक पारदर्शक झाले आहे. यात काही उणिवा आहेत त्या दूर करण्याचे प्रयत्न विविध पातळीवर सुरू आहेत.


©उदय पिंगळे


ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1
 https://www.facebook.com/pingaleuday/

No comments:

Post a Comment