Thursday, 27 April 2017

.....इनव्हीट ट्रस्टचे भांडवल बाजारात आगमन...

         इनव्हिट ट्रस्टचे भांडवल बाजारात  आगमन.....


   पायाभूत सुविधांच्या विकास जलद गतीने व्हावा आणि त्यासाठी लागणारे मोठ्या प्रमाणातील भांडवल अल्प खर्चात आणि कमी वेळात उपलब्ध व्हावे.यासाठी 'इनव्हिट 'या माध्यमातून भांडवल गोळा करावे आणि ते समभाग म्हणून धरले जावेत.असे रिझर्व बँकेने सूचवले होते या प्रकारची व्यवस्था ऑस्ट्रेलिया आणि थायलंड मध्ये उत्तम प्रकारे राबवली जाते.यास अनुसरून भारतात यासाठी कोणती नियमावली असावी यावर बरेच विचार मंथन झाले.हे एक समभाग आणि कर्जरोखे यांचे मिश्रण आहे. यामध्ये जरी ते भाग बाजारात सूचीबद्ध झाले तरी समभागाप्रमाने मोठ्या प्रमाणात भांडवलवृद्धी होणार नाही.जरी ते कर्जरोख्यासारखे असले तरी त्यावर ठराविक व्याज आणि मूद्दल रकमेची हमी नाही.आयकर नियमाप्रमाणे यावर मिळणारा लाभांश करमुक्त असेल परंतु विक्री करून नफा झाल्यास तीन वर्षांच्या आतील नफा अल्प मुदतीचा असेल व तीन वर्षे पूर्ण झाल्यावर दीर्घ कालीन भांडवली नफा समजण्यात येईल.समभागाप्रमाणे तो करमुक्त असणार नाही. पुरस्कृत करणाऱ्या कंपनीचा यात 25% सहभाग भांडवली सहभाग असेल.या ट्रस्ट ची किमान मालमत्ता 500 कोटी असेल आणि एका वेळी बाजारामधून किमान 2500 कोटी रुपये जमा केले जातील.आशा विविध अटी लावून सेबीने त्यास परवानगी दिली आहे.या विषयाचा2013 पासून सखोल अभ्यास करून अशा ट्रस्ट ची कार्यपद्धती कशी असावी याची नियमावली बनवली असून यामधे बँका ,म्यूचुअल फंड (मालमत्तेच्या 5%पर्यत ),कंपन्या आणि मोठे गुंतवणूदार याना त्यात गुंतवणूक करू देण्याची परवानगी  दिली आहे. मोठ्या वैयक्तिक गुंतवणूकदारास किमान 10 लाख व इतर संस्थात्मक गुंतवणूक दारांना 1 कोटी गुंतवणूक करावी लागेल.पारंभिक विक्री करताना 20 वैयक्तिक मोठे गुंतवणूकदार आणि 5 संस्थात्मक गुंतवणूकदार यात सहभागी असावेत अशी अट टाकण्यात आहे.सध्या छोट्या गुंतवणूकदाराना यामधून वगळण्यात आले आहे.कंपनीकडे जमा उत्पन्नातील 90%उत्पन्न 3 महिन्यातून एकदा भागधारकाना वाटणे बंधनकारक आहे. गुंतवणुकदाराना करमुक्त लाभांश मिळेल.या ट्रस्टना डीवीडेंड वरील करातून वगळण्यात आले आहे.या सर्व प्रक्रियेवर सेबीचे नियंत्रण असून हे व्यवहार पूर्णपणे पारदर्शक असतील. गुंतवणूकदाराना हे भाग दुय्यम बाजारात नोंदणी झाल्यावर विकता येतील परंतु त्याचा विक्रीयोग्य खरेदी विक्री संच  5 लाख रुपयांच्या पटीत असेल.साहजिकच असा एक लॉट घेणे हे सामान्य गुंतवणूकदाराच्या आवाक्याबाहेरचे असेल.उच्च उत्पन्नधारकाना दीर्घ काळ सातत्याने चांगला उतारा मिळण्याची शक्यता असल्याने त्यांच्या दृष्टीने ही एक नवी संधी उपलब्ध झाली आहे.
  आशा प्रकारच्या पहिल्या इनव्हीट  ट्रस्टचे ,आई आर बी इनव्हिट ट्रस्ट आगमन बाजारात झाले असून त्याची प्रारंभिक भाग विक्री 3मे ते 5मे 2017 या कालावधीत होईल.आई आर बी इनफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट ली हे त्याचे पुरस्कर्ते आहेत.त्यांनी आपल्या 20 विविध चालू योजनांपैकी 6रस्ता वहातूक योजना ट्रस्ट कडे हस्तांतरित केल्या आहेत.त्याचे मूल्यमापन करून  या ट्रस्टचे 10 रूपये दर्शनी मूल्याचे समभाग 100 ते 102 या पट्यात विक्रीसाठी उपलब्ध आहेत किमान 10 हजार (बाजारमूल्य 10लाख 20हजार)व नंतर 5 हजार समभागाचे चे पटीत शेअरसाठी मागणी करावी लागेल.  4300 कोटी पेक्षा जास्त रुपये या प्रारंभीक विक्रीतून जमा होतील असा अंदाज आहे. नेहमीच्या समभाग विक्रीच्या बुक बिल्डिंग पध्दतीने ही सर्व प्रक्रिया पार पडेल.त्यामुळे कंपनीचे सध्या चालू असलेले मंजूरी मिळालेले सहा रस्त्यांच्या बांधणी प्रकल्पातील कर्जवरील व्याजाचा खर्च 2%कमी होईल तर टोलचे माध्यमातून जमा झालेली रक्कम वाटली गेल्याने  गुंतवणूकीवर 12%नफा आणि 20%फायदा होऊ शकेल असा प्राथमिक अंदाज आहे.अजून काही योजना ट्रस्टकडे हस्तांतरित होण्याची शक्यता आहे.या समभाग विक्रीस नामवंत मूल्यांकन कंपनीनी (credit reatings agency) AAA  हे उच्च मानांकन दिले आहे.बी एस सी आणि एन एस सी यानी हे समभाग खरेदी विक्रीसाठी तत्वता मान्यता दिली असून बी एस सी थेट अ गटातील शेअर मध्ये त्याचा सामावेश करणार आहे.अजून दोन ट्रस्टचे भांडवलविक्रीचे प्रस्ताव सेबीचे विचाराधीन आहेत.या माध्यमातून कोणाचा कसा आणि किती फायदा होईल ते येणारा काळ ठरवेल. त्यावरून भविष्यात किरकोळ गुंतवणूकदाराना यात भाग घेण्याची संधी कदाचीत प्राप्त होऊ शकेल.

उदय पिंगळे

('इनव्हिट'या नव्याने येऊ घातलेल्या गुंतवणूक साधनाची ओळख व्हावी म्हणून हा लेख लिहिला असून यामध्ये खूप मोठी रक्कम गुंतवावी लागेल. जोखीमही भरपूर  असल्याने यासंबंधीचा निर्णय आपल्या सल्लागाराशी चर्चा करून घ्यावा.)

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/

Monday, 24 April 2017

विदेशी चलनबाजार (Foreign Currency Market)

     .....विदेशी चलनबाजार..... (Foreign Currency Market)


     विदेशी चलनबाजार (Foreign Currency Market)हा वित्तीय बाजाराचा महत्वाचा घटक आहे.खाजगीकरण ,उदारीकरण ,जागतिकीकरण यामुळे दळण वळण आणि संपर्क क्षेत्रातील मोठी क्रांती झालीआहे. त्यामुळे दोन देशातील वस्तू आणि सेवा यांच्या व्यापारात वाढ झाली आहे.प्रत्येक देशाचे स्वतः चे असे चलन वेगळे वेगळे असते  आणि त्याच्या अंगभूत क्रयशक्तिमुळे तेथील वस्तु आणि सेवांची खरेदी विक्री होत असल्याने, त्या देशाचे चलन असण्याची आवश्यकता निर्माण झाली. हे चलन घेण्यासाठी आपल्याकडील चलन द्यावे लागते तर वस्तूंची विक्री करून आलेल्या दुसऱ्या देशातील चलनाचे रुपांतर आपल्या देशातील चलनात बदलून घ्यावे लागते असे व्यवहार जेथे होतात त्यास विदेशी चलन बाजार असे म्हणतात.येथे दोन चलनांची आदलाबदल होते.असा विनिमय ज्या ठिकाणी होतो तेथे खरेदी आणि विक्री याचे दर वेगवेगळे दाखवले जातात.हे दर अनेक कारणाने सातत्याने बदलत असतात.या दरास विनिमय दर असे म्हणतात. ही एका चलनाची दुसऱ्या चलनात व्यक्त केलेली किंमत असून यामधील फरक हा चलन व्यवहार करणाऱ्याचा नफा असतो.जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी असे व्यवहार चालू असल्याने हा बाजार 24 तास चालू असतो.
   आयातदार ,परदेशी जाऊ इच्छीणारे पर्यटक त्याचप्रमाणे निर्यातक विदेशी पर्यटक या सर्वाना अशा चलन बाजाराची जरूरी असते यामुळे व्यापारवृद्धी , अौद्याेगीक विकास ,आर्थिक विकास ,भांडवलवाढ ,सांस्कृतीक देवाणघेवाण यात वाढ होते. या बाजारात एकाचवेळी चलनाची मागणी आणि पुरवठा चालू असतो आणि चलनांची अदलाबदल होत असल्याने प्रत्यक्षांत क्रयशक्तिंचे हस्तांतरण होत असते.विदेशी चलन बाजारात अशा चलनांची आवश्यकता असणारे ग्राहक , व्यापारी बँका ,रिझर्व बँक , मान्यताप्राप्त विक्रेते आणि सट्टेबाज कार्यरत आहेत.या मध्ये चलनाचे हजर व्यवहार (spot) आणि वायदे व्यवहार (futures) होतात.हे व्यवहार व्यापारी व्यवहार ,आंतर बँक व्यवहार , विदेशी व्यवहार ,रिझर्व बँकेने इतर बँकाशी केलेले व्यवहार व चलन स्थिर ठेवण्यासाठी केलेला हस्तक्षेप यांसारख्या स्वरूपात असतात. यापूर्वी असे व्यवहार फक्त मोठ्या शहरांत होत असत.दळण वळणातील प्रगती , विदेशी व्यापारात वाढ ,सहयोगी सदस्यामधील वाढ ,झटपट आणि पारदर्शी व्यवहारामुळे विदेशी बाजारातील व्यवहार वाढले आहेत.

©उदय पिंगळे

ही माहिती सर्वाना समजण्यासाठी श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/



भांडवल बाजार विषयक सात मूलभूत संज्ञा

     भांडवल बाजार विषयक सात मूलभूत प्राथमिक संज्ञा....

   आर्थिक विषयांशी, प्रामुख्याने भांडवल बाजाराशी संबंधित विक्रेते (agents ), दलाल (brokers), गुंतवणुक विश्लेषक (investment anyalists),वित्त व्यवस्थापक (welth managers),गुंतवणुक तज्ञ (investment experts) याच्या बोलण्यातून धोका (risk), तेजी (bull),मंदी (bear)उतारा (return), त्यांचा एकमेकांशी असलेला संबध (risk return retio), गुंतवणुक विविधता (diversification),गुंतवणूक संच (portfolio):असे शब्द सातत्याने वापरले जातात.आपण या संज्ञांचे नेमके अर्थ समजून धेवूया.
    १)धोका (risk): ही एक नकारात्मक बाजू आहे. गुंतवणूक ही दीर्घ कालीन प्रक्रिया असल्याने यातून  त्यामध्ये असलेल्या जोखमीमुळे आपण आपले जास्तीत जास्त किती संभाव्य नुकसान होवू शकेल यांसंबंधीचा विचार यात करतो. त्यानंतरच यासंबंधीचा निर्णय घेतो. कुठेही पैसे गुंतवले तरी त्यात काहीतरी धोका असतोच.आपण बँकेत पैसे ठेवले आहेत त्या बँकेचे दिवाळे वाजू शकते. स्थावर मालमत्तेची किंमत घटू शकते.सुरू केलेल्या उद्योगासाठी वापरलेले भांडवल कमी होवू शकते. सर्वसाधारण पणे सरकारी पाठबळ असलेल्या योजना किंवा मोठ्या उद्योगसमूहात गुंतवणुक करण्यात धोका कमी असतो.आपण केलेल्या गुंतवणूकीवर पैशाच्या रूपात किती नफा अगर नुकसान झाले यावरून धोका किंवा फायद्याची मोजणी करता येते.
   २)तेजी (bull market):हा एक असा कालखंड आहे की या काळात समभागांच्या किमती सातत्याने वर जात असतात थोड्याफार विरोधी कारणांनी बाजारावर खास परिणाम होत नाही.मालाला उठाव असतो ,बेकारीचे प्रमाण कमी असते.अर्थव्यवस्था सुधृढ असल्याचे हे लक्षण आहे. या काळात सातत्याने फायदा होत असल्याने कोठेही गुंतवणूक केली असताना फायदाच होण्याची शक्यता जास्त असते.
   ३)मंदी (bear market): या काळात बरोबर उलट स्थिती असते समभागांच्या किंमती सातत्याने कमी कमी होत असतात.काही गुंतवणूकदार समभागांची प्रथम विक्री (short selling)करून नंतर खरेदी करून देऊन नफा मिळवतात.कंपनीच्या आकर्षित कामगिरीमुळे भावामद्धे खास वाढ होत नाही.असे असले तरी प्रत्येक मंदी ही येणाऱ्या तेजीची सुरुवात असते आणि काळाचे भान असणाऱ्या गुंतवणुकदारांच्या दृष्टीने ही एक संधी असते.
  ४)उतारा (return):ही एक नफा /नुकसान यासंबंधीची सकारात्मक/नकारात्मक बाब असून यामध्ये आपण कलेल्या गुंतवणुकीवर मिळालेले व्याज ,लाभांश , भांडवली नफा/तोटा  यांचा समावेश होतो.त्याची मोजणी ही गूंतवलेल्या रकमेच्या तुलनेत केली जाते.
   ५)धोका आणि उतारा संबध (risk reward ratio) :यांचा एकमेकांशी सरळसरळ संबध असून जेवढा धोका जास्त स्वीकारला जाईल त्या प्रमाणात नफा किंवा नुकसान जास्त होण्याची शक्यता असते.जेव्हा जेव्हा कमी धोका आणि जास्त उतारा मिळण्याची शक्यता असते तेव्हा प्रत्येक वेळी गुंतवणूकीची संधी निर्माण होते. अशा प्रत्येक वेळी मागणीत वाढ होते ,तुलनेने पुरवठा कमी होतो साहजिकच भावात वाढ होते आणि उतारा कमी होण्याची शक्यता वाढते. तेव्हा कष्टाशिवाय फायदा नाही हे तत्व विसरू नये.त्यामुळे सर्व बाजूंचा अभ्यास करूनच गुंतवणुकीचे निर्णय घ्यायला हवेत.
   ६)गुंतवणूक विविधता (diversification) : आपली गुंतवणुक एकाच प्रकारात न करता त्यात  विविधता हवी. विविध क्षेत्रांतील उद्योगांचे समभाग , रोखे अल्प व दीर्घ मुदतीची सरकारी कर्जे ,म्यूचुअल फंडांचे यूनिट , एक्सचेंज ट्रेडेड फंड ,विविध वस्तु बाजार , वायदे, ऑप्शन ,फ्यूचर यांमध्ये कमीजास्त प्रमाणात करून गुंतवणूकीचा समतोल साधता आल्यास यांतील धोक्याचे प्रमाण खूप कमी करता येऊ शकते.
   ७)गुंतवणूक संच (portfolio): वर उल्लेख केलेले भांडवल बाजाराशी संबधित विविध प्रकारांचा एकत्रित संच म्हणजेच आपला स्वतःचा गुंतवणूक संच होय.

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/

भांडवल बाजार (capital market)

    भांडवल बाजार (Capital Market)

   भांडवल बाजार (Capital market) हा वित्तीय बाजारातील एक महत्वाचा घटक आहे. एखादया देशाची आर्थिक सुधृढता ही त्या देशाच्या भांडवल बाजाराच्या प्रगतीवरून मोजली जाते.मागील लेखांकात आपण नाणेबाजारात अल्पमुदतीच्या कर्जाची देवाण घेवाण होते हे पहिले.ज्याप्रमाणे शेती ,उद्योग आणि सेवा क्षेत्रास दैनंदिन व्यवहारांसाठी पैशांची गरज असते त्याचप्रमाणे अवजारे , ईमारत , यंत्रसमुग्री,तंत्रज्ञान या गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणात पैशाची  गरज असते. यामधून दीर्घ काळात उत्पन्न निर्माण होत असल्याने त्या॑ना भांडवली वस्तु असे म्हणतात. भांडवलबाजारात अशा वस्तुंऎवजी त्या घेण्यासाठी लागणाऱ्या पैशांची म्हणजेच चलनी भांडवलाची उलाढाल होत  असते. मध्यम आणि दीर्घ स्वरूपाच्या कर्जाच्या माध्यमातून ही देवाण घेवाण ज्या यंत्रणेच्या मार्फत होते त्यास भांडवलबाजार असे म्हणतात.
   देशाच्या विकासात भांडवलबाजाराचा मोठा वाटा आहे.येथून सरकारला मोठ्या प्रमाणात कर आणि कर्ज मिळते. भांडवलबाजारात कार्यरत असणारे विविध घटक हे मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची बचत व गुंतवणुक गोळा करतात.धाडसी गुंतवणूकदाराना गुंतवणूकीच्या विविध संधी उपलब्ध करून देतात तर खाजगी ,सहकारी आणि  सरकारी उद्योगाना उभारणी , विस्तार आणि आधुनिकीकरण यासाठी अल्पखर्चात निधी गोळा करण्याची संधी देतात.अतिरिक्त निधी असलेल्या काहींना गुंतवणूकीत सुरक्षीतता हवी असते तर काहींना अधिक उत्पन्न हवे असते त्यासाठी धोका पत्करण्यास ते तयार असतात तर काहीजणांना यांतील मध्यम मार्ग आवडतो. यातील प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या विविध योजना भांडवलबाजारात उपलब्ध आहेत.उद्योगधंद्याप्रमाणे सरकारला प्रशासकीय खर्च , युध्द , नैसर्गिक आपत्ती ,पायाभूत सुविधांची निर्मीती यासाठी वेळोवेळी पैशाची मोठ्या प्रमाणात गरज पडते ,तर व्यक्ति ,बँका ,विमा कंपन्या , विकास बँका,खासगी संस्था यांच्याकडे असलेला अतिरिक्त पैसा किफायतशिररित्या गुंतवण्याची संधी  भांडवलबाजारातून प्राप्त होते.मोठ्या प्रमाणात भांडवल निर्मीती झाल्याने विकासदर वाढतो ,उत्पादकता वाढते त्यामुळे आैद्योगीक विकास होऊन देशाची प्रगती होते.
  देश स्वतंत्र झाला त्यावेळी मोठ्या प्रमाणात भांडवलबाजाराचा विकास झाला नव्हता परंतु आर्थिक  विकासातील भांडवलबाजाराचे स्थान लक्षात घेऊन या बाजाराचा विकास करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेल्याने भागबाजार ,बँका ,विमा कंपन्या ,खाजगी संस्था ,विश्वस्त संस्था ,म्यूचुअल फंड ,पोस्ट ऑफीस ,विनिमय बँका ,बँकेतर वित्तीय संस्था ,परकीय वित्तसंस्था , विशेष वित्त संस्था ,भूविकास बँका ,वस्तुबाजार ,वायदेबाजार ,  भविष्यनिर्वाह निधी ,निवृतनिर्वाह निधी ,रोखेबाजार ,सरकारी रोखे बाजार या भांडवलबाजारातील घटकांना त्यांचा विस्तार करून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करणे विविध योजनांच्या माध्यमातून शक्य झाले.त्यामुळेच  मध्यम आणि दीर्घकालीन कर्जाच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आज आपल्याला दिसून येत आहे.
   असंघटित क्षेत्राचे अस्तित्व आणि त्यांच्याकडून अनूत्पादक कार्याला पुरवला जाणारा निधी ,मोठ्या प्रमाणातील गरीबी त्यामुळे त्यांच्याकडून कडून येणाऱ्या भांडवलाचा अभाव ,शेती क्षेत्राचा अल्प सहभाग,यापूर्वी झालेले विविध आर्थिक घोटाळे हे भारतीय भांडवलबाजारातील दोष म्हणता येतील मांत्र व्याजदर निर्बंध शिथिलता ,विविध मध्यस्थांची नोंदणी , sebi /irda /parda सारख्या स्वतंत्र नियामकांची स्थापना , प्रकल्पसेवी बँकांची स्थापना (Merchant Bankers),परकीय गुंतवणुकीला परवानगी , रोखेबाजारातील सुधारणा ,राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना ,वस्तू बाजार ,वायदे व्यवहार ,विविध पतमापन संस्थांचे अस्तित्व , संगणकामार्फत कागद विरहित आणि पारदर्शी व्यवहार , जलद हस्तांतरण  या आणि अशा सुधारणा गेल्या 30 वर्षात केल्या गेल्याने हे क्षेत्र आता मोठ्या प्रमाणात संघटित व अधिक पारदर्शक झाले आहे. यात काही उणिवा आहेत त्या दूर करण्याचे प्रयत्न विविध पातळीवर सुरू आहेत.


©उदय पिंगळे


ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1
 https://www.facebook.com/pingaleuday/

Friday, 21 April 2017

नाणेबाजार (Money Market).......

नाणेबाजार (money market )

   
    वित्तीय बाजाराचे नाणेबाजार , भांडवल बाजार  आणि विदेशी चलन बाजार हे महत्वाचे घटक आहेत.यांपैकी नाणेबाजार या घटकाची माहिती करून घेवूयात.
सामन्यतः बाजार म्हटले की वस्तुची देवाण घेवाण होत असणारे मंडई सारखे ठिकाण डोळ्यासमोर येते. अर्थशास्त्राच्या दृष्टीने बाजार म्हणजे वस्तु आणि सेवा यांची देवाणघेवाण, यासाठी विशिष्ठ ठिकाण हवेच असे नाही. नाणेबाजार (money market) या शब्दावरून नाणे किंवा चलन यांची देवाण घेवाण होत असेल असे वाटणे साहजिकच आहे परंतु नाणेबाजारात प्रत्यक्ष चलनांची देवाण घेवाण होत नाही तर भांडवलाची देवाण घेवाण अल्प मुदतीच्या कर्जाच्या रूपात होते.अशा प्रकारच्या कर्जाची मुदत एक दिवस ते बारा महीने या कालावधीची असू शकते. ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे ते आपल्याकडील पैसा ज्यांना पैशांची गरज आहे त्या॑ना अल्प मुदतीसाठी कर्ज म्हणून देवू करतात या बदल्यात कर्जदार व्याज देतात.यामुळे पैसे असणाऱ्याना व्याज मिळते तर कर्जदाराची गरज भागते.शेतकरी , छोटे व्यापारी ,लघुउद्योजक यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी पैशांची गरज लागते ही गरज नाणेबाजारातून भागवली जाते.
   शेती ,उद्योग व सेवाक्षेत्र यामधे मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे त्यांची अल्पकालीन कर्जाची गरज सतत वाढतच आहे. आपल्या प्रमाणे सरकारला अल्पकालीन खर्च भागवण्यासाठी कर्जाची आवश्यकता पडते.हा खर्च भागवण्यासाठी सरकार रिझर्व बँकेला पैसे छापण्यास सांगू शकते परंतु त्यामुळे चलनवाढ होऊ शकते.त्यामुळे सरकार नाणे बाजारातून तात्पुरते कर्ज उचलते.व्यापारी /सहकारी बँका लोकांकडून ठेवी स्वीकारतात. बचत खात्यात पैसे ठेवून घेतात.यावर व्याज द्यावे लागते.त्याचप्रमाणे हे पैसे ठेवीदराना त्यांच्या मागणीनुसार द्यावे लागतात त्यामुळे बँका अशी रक्कम जास्त कालावधीसाठी वापरू शकत नाहीत हे पैसे गुंतवण्याची गरज नाणे बाजारातून भागवली जाते.तसेच ठेवीदाराना पैसे परत करण्यास बँकेकडे नसतील तर त्यासाठी तात्पुरती सोय म्हणून नाणेबाजारातून कर्जे घेता येऊ शकतात.अशा प्रकारे गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या व्यक्ति आणि संस्था यांना हमखास सुरक्षित फायदा मिळवून देण्याची संधी यामधून उपलब्ध होते. पतनियंत्रक करणे म्हणजेच गरजेपेक्षा जास्त अथवा कमी पैशाची उपलब्धता न पडू देणे हे मध्यवर्ती बँकेचे महत्वाचे कार्य असून त्याकरिता वेगवेगळ्या पतपत्रांची निर्मिती तिच्याकडून केली जाते.वेगवेगळ्या पतपत्रांच्या निर्मीतीमुळे त्यांचे व्यवहार करणारे वेगवेगळे उपबाजार उदाहरणार्थ मागणी देय बाजार (call money market ),बील /हूंडी बाजार (bill market),सरकारी अल्पमुदत कर्जरोखे (tressary bills ),तारण बाजार (collataral market)निर्माण झाले असून  यांचे व्यवहार करण्यासाठी विविध स्वीकृतगृहे आणि वटवणूकगृहे यासारखी विशेष केंद्रे निर्माण झाली आहेत.
   विकसित देशांपेक्षा इथला नाणेबाजार हा संघटित व असंघटित क्षेत्रात विभागला गेला आहे. संघटित क्षेत्रात रिझर्व बँक ,व्यापारी बँका ,खासगी बँका ,सहकारी बँका ,विनिमय बँका यांचा समावेश होतो यावर रिझर्व बँकेचे नियंत्रण असून तिच्याकडे चलन निर्मीतीची मक्तेदारी आहे.नाणेबाजारास प्रोत्साहन देण्याचे काम रिझर्व बँकेचेकडून केले जाते.सराफी पेढ्या आणि बँकेतर मध्यस्थ निधी ,चिटफंड हे असंघटित क्षेत्रांत कार्यरत आहेत.
  भारतीय नाणेबाजारात असंघटित क्षेत्रांचे अस्तित्व ,एकसूत्रतेचा अभाव ,व्याजदरांमधील विविधता ,यासारख्या उणिवा आहेत.त्या दूर करण्यासाठी रिजर्व बँकेने व्याजदर निर्बंध शिथिल करणे ,विविध कोशागार पत्रांची निर्मीती ,नवीन पतसाधने आणि नवीन संस्थांचा सहभाग , नाणेबाजार परस्पर निधीची स्थापना (money market mutual fund ),कर्ज पुर्नखरेदी (repo),यासारख्या अनेक सुधारणा केल्या आहेत.

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://www.facebook.com/pingaleuday/

https://udaypingales.blogspot.in/?m1

Thursday, 6 April 2017

वित्त कायदा 2017 महत्वपूर्ण तरतुदी........

    वित्त कायदा 2017 महत्वपूर्ण तरतुदी....

  वित्त विधेयक 2017 यावर 31/03/2017 रोजी राष्ट्रपतीनी सही केल्याने तेव्हा पासून ते लागू झाले आहे.अतिशय कमी वेळात आणि नवीन आर्थिक वर्षांच्या सुरूवतीला ते लागू झाले. हे विधेयक मंजूर होण्यासाठी कमीत कमी कालावधी लागला हा ही एक विक्रम आहे. हे विधेयक आता कायद्यात रूपांतरित झाल्याने या कायद्यातील महत्वपूर्ण तरतुदींमुळे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या यातील बदलांचा परिणाम समाजाच्या प्रत्येक घटकांवर होणार आहे तेव्हा त्यातील महत्वपूर्ण तरतुदींचा आपण विचार करुया.
  1)करदरातील रचनेतील बदल:
  अ) याकायद्यामुळे याआधी 5  लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्याना  10%ऐवजी 5% कर द्यावा लागेल.
   ब)ज्यांचे उत्पन्न 50 लाख ते 1 कोटी असेल त्याना देय करावर 10% आणि 1 कोटीहून अधिक उत्पन्न असलेल्या करदात्यास 15% सरचार्ज द्यावा लागेल.
  क)5लाख रुपयापेक्षा कमी करपात्र उत्पन्न असलेल्या करदात्याना या कलमाखाली मिळणारी 5हजार रुपयांची करसवलत रद्द केली असून या वर्षी अशी करसवलत 3.5लाख रूपये करपात्र उत्पन्न असलेल्याना 2.5 हजार रूपये एवढीच मिळेल.
 ड)आर्थिक वर्षे 2015/16 मध्ये ज्या कंपन्यांची उलाढाल/प्राप्ती 50 कोटीहून कमी होती आशा कंपन्याना यावर्षीपासून  30ऐवजी 25%दराने कर द्यावा लागेल.
  2)उगमातून कर कपातीतील महत्वपूर्ण बदल :यापूर्वी वैयक्तिक करदाते हिंदू अविभाज्य कुटुंब ज्यांना आपल्या उत्पन्नाचे लेखापरीक्षण  करून घ्यावे लागत असेल आणि त्यांना 1.8 लाख रुपये प्रतिवर्ष भाडेउत्पन्न मिळत असेल तर 10% दराने उगमातून कर कपात करावी लागत असे. आता लेखापरीक्षण करून न घ्याव्या लागणाऱ्या सर्व करदात्याना मासिक भाडेउत्पन्न 50 हजार किंवा अधिक असल्यास 5%दराने मुळातून करकपात करावी लागेल.
   3)भांडवली नफ्याच्या मोजणी आणि आकारणीतील बदल :      
 अ )दीर्घकालीन भांडवली नफ्याच्या मोजणीतील बदल : यापूर्वी जमीन ,घर या सारख्या स्थावर मालमत्ता विक्रीतून तीन वर्षानंतर मिळणारा नफा दीर्घकालीन धरला जाऊन त्यास चलनवाढ निर्देशांकाचा फायदा मिळून कमी दराने करआकारणी होत असे.हा कालावधी तीन वरून दोन वर्षावर आणला आहे. यामुळे समभाग आणि समभाग संलग्न यूनिट यावरील दीर्घकालिन नफा एक वर्षानी आणि पूर्णपणे करमुक्त तर जमीन,घर यासारख्या स्थावर मालमत्तेवरील दीर्घकालीन नफा दोन वर्षानी आणि बॉन्ड ,रोखे यावरील दीर्घकालीन नफा तीन वर्षानी मोजला जाऊन प्रचलित तरतुदीप्रमाणे करआकारणी होईल.
   ब)समभागावरील दीर्घ मुदतीचे भांडवली नफ्यावर विक्री करताना एस टी टी मुळातून कापला असेल तर कलम 10(38)नुसार पूर्णपणे करमाफी आहे. या तरतुदीत किंचित बदल केला आहे आता ही सवलत मिळवण्यासाठी सदर समभाग हे 01/10/2004 नंतर एस टी टी भरून घेतलेले असावेत अशी अट टाकण्यात आली आहे.यामधून आई पी ओ ,फॉलो ऑन ऑफर ,बोनस ,राईट इश्यू यातून मिळालेले समभाग स्वतंत्रपणे खुलासा करून वगळण्यात आले आहेत.
   क)जमीन ,रहाते घर किंवा स्थावर मालमत्तेचा काही भाग विकासकाकडे दिला असता भांडवली नफ्याची मोजणी केली जाते , प्रत्यक्षात विकसित  मालमत्ता पुन्हा ताब्यात येण्यासाठी बराच कालावधी जात असल्याने आता भांडवली नफ्याची मोजणी ही प्रत्यक्ष ताबा मिळताना केली जाईल.यासाठी 45(5ए )या नवीन कलमाचा समावेश करण्यात आला असून आता मालक आणि विकासक यांच्यामधे करारनामा झाल्यावर भांडवली नफ्याची देयता मालकास लागू होईल परंतु तिची मोजणी आणि आकारणी सक्षम अधिकाराऱ्याने दिलेल्या पूर्तता प्रमाणपत्रानंतर केली जाईल. यासाठी लागणारे मुद्रांक हे प्रचलित दराने भरावे लागेल.
  ड)मालमत्तेची सुयोग्य किंमत ठरवण्याच्या वर्षात बदल : भांडवली नफ्याची मोजणी करताना करदात्यास मालमत्तेचे 01/04/1981रोजीचे बाजारमूल्य विचारत घेण्याचा पर्याय होता यामध्ये बदल करण्यात आला असून आता करदात्यास मालमत्तेची किंमत ठरवण्यासाठी 01/04/2001 ची किंमत ही आधारभूत किंमत म्हणून धरता येईल.
   ई)बाजारात व्यवहार न होणाऱ्या समभागांची योग्य किंमत ठरवणे :01/04/2017 पासून कलम 50 सी ए नुसार ज्या समभागाचे खरेदी विक्री व्यवहार होत नाहीत त्याची सुयोग्य किंमत धरण्यासाठी दर्शनी मूल्याचा वापर केला जाईल आणि यापेक्षा कमी किंमतीला होणाऱ्या व्यवहारासाठी दर्शनी मूल्य व जास्त किंमतींच्या व्यवहारासाठी जास्तीचे मूल्य ही सुयोग्य किंमत मानली जाऊन त्याप्रमाणे मुद्रांक शुल्क आकारणी केली जाईल.
   4)यापूर्वी मोफत अथवा कमी मूल्याने चल अथवा अचल मालमत्तेचा व्यवहार फर्म /ए ओ पी /किंवा क्लॉजली हेल्ड कंपनी  यानी केला तर त्यावर कर द्यावा लागत नसे यापुढे त्यावर बाजारमूल्याप्रमाणे कलम 56(2)नुसार कर द्यावा लागेल यामधून न्यास (trust) , दोन नातेवाईकांमधील व्यवहार  किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाची विभागणी होऊन व्यवहार झाला असेल तर त्यास वगळण्यात आले आहे.
   5)भाड्याने दिलेल्या घरापासून होणाऱ्या तोट्याची मोजणी आणि आकारणी : भाड्याने दिलेल्या घरापासून मिळणारे उत्पन्न व्याजापासून होणारा तोटा कोणत्याही मर्यादेशिवाय इतर उत्पन्नात मिळवला जात असे आता असा तोटा इतर उत्पन्नात दोन लाखांपर्यंतच्या मर्यादेत मिळवता येईल आणि अधिकचा तोटा पुढील आठ वर्षे ओढून दोन लाखाच्या मर्यादेत पुढे ओढता येईल. यापेक्षा जास्तीचा तोटा हा फक्त घरापासून मिळालेल्या उत्पन्नातूनच कोणत्याही मर्यादेशिवाय वजा करता येईल.
   6)न्यासांचे करआकारणी संबधित बदल :
   अ)ज्या धर्माथ न्यासाची नोंदणी कलम 10 किंवा 12ए ए खाली झाली आहे त्यांना दुसऱ्या अशाच नोंदणीकृत न्यासास देणगी देता येणार नाही.
   ब)जर 12ए ए खाली स्थापन झालेल्या न्यासास आपली उदिष्ठे बदलायची असतील तर तीस दिवसात नव्याने नोंदणी करावी लागेल
   क )ज्या न्यासांकडे 2.5लाखाचे मर्यादेपेक्षा जास्त जमा असेल त्याना आयकर पत्रक विहित मर्यादेत भरणे अनिवार्य असून या प्रमाणे आयकर पत्रक भरणाऱ्या न्यासानाच कलम 11 आणि 12 नुसार आयकरात सूट मिळेल.
   7)बांधकाम व्यवसायिक /मालक यांच्या मालमत्तेचे मूल्यांकन : यांच्याकडे न विकलेली मालमत्ता असेल तर ती पूर्ण झाल्यापासून एक वर्ष तशीच पडून असल्यास कर आकारणीसाठी तीचे आभासी मूल्य शून्य धरण्यात येईल.
  8)रोख रकमेच्या व्यवहारातील बदल :
   अ )सध्या इतर व्यवसायिकाना कलम 40ए3 नुसार रोज महसुली खर्च ₹20000/- च्या मर्यादेत करता येतो तर वाहतूक व्यवसायीकाना ₹35000/-पर्यत करता येतो.वाहतूक व्यवसायिक सोडून इतर व्यवसायिकांची रोखीची मर्यादा ₹10000/-करण्यात आली आहे.
   ब) कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यासाठी रोखीची मर्यादा नव्हती.ती दहा हजार करण्यात आली असून यापेक्षा जास्त रक्कम देऊन केलेले व्यवहार मान्य होणार नाहीत.
   क)एका दिवशी रोखीने केलेले 2 लाख पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार नवीन कलम 269एस टी नुसार दंडास पात्र ठरतील.यामुळे दोन लाख वरील रकमेच्या सोन्याच्या व्यवहारावरील मुळातील कर कपात रद्द झाली आहे.बँक आणि पोस्ट यामध्ये एका दिवशी केलेले 2 लाख रुपयांचे व्यवहार यातून वगळण्यात आले आहेत.
  ड) ज्या व्यक्तींनी गेल्या वर्षी वस्तु आणि सेवांसाठी दोन लाख रु रोख खर्च केले आहेत त्याना त्याचा तपशीलवार विवरण द्यावे लागेल तर ज्यांना कलम 44ए ए नुसार लेखापरीक्षण करावे लागते त्याना
फॉर्म 61ए 31 मे 2017 पर्यत भरून द्यावा लागेल. असा तपशील न देणाऱ्या व्यक्तींना ₹100/- दंड प्रत्येक दिवसासाठी द्यावा लागेल.
   ई)नोटाबंदीचे काळात 2 लाखाहून अधिक रकमेचा भरणा करणाऱ्या व्यक्तींना विहित नमुन्यात तपशील द्यावा लागेल.
  फ)रोखीने दिलेली दोन हजार रुपयापेक्षा जास्त रकमेची देणगी अमान्य होईल.
   9)जर करदात्याने 20 कोटीहून अधिक रकमेचा व्यवहार केला असेल तर त्याचा तपशील 3 सी ई या नमुन्यात द्यावा लागेल.
   10)जे छोटे व्यवसायिक व्यापारी नोंदी न ठेवता अंदजित उत्पन्नावर 6 ते 8% नफा दाखवतात त्यांचा अंदाजीत नफा एक लाख वीस हजार अथवा उलाढाल दहा लाखाचे वर असेल तर त्याना आयकर अधिनियमानुसार नोंदी ठेवाव्या लागतील.अशाच प्रकारच्या नोंदी 15 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या वैयक्तिक करदात्याना आणि 25 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या हिंदू अवीभक्त कुटुंबास ठेवाव्या लागतील.जे व्यवसायिक लेखापरीक्षण न करता त्यांची उलाढाल दोन कोटी किंवा जमा पन्नास लाखाहून अधिक असेल त्याचप्रमाणे कंपनी अथवा मर्यादित दायित्व असलेल्या एक कोटीचेवर उलाढाल असलेल्या सर्वाना कलम 44 नुसार नोंदी ठेवून लेखापरीक्षण करून घ्यावे लागेल.जे लोक व्यवसायाची देवाण घेवाण रोख रकमेशिवाय  करतात परंतु व्यवसायिक नोंदी ठेवित नाहीत त्याना त्यांचे उलाढालीवर 6% नफा अंदाजित करून कर भरता येईल.मांत्र त्याना रोख रकमेच्या व इतर माध्यमांतील व्यवहारांची वेगवेगळी नोंद ठेवावी लागेल.
   11)सध्या 10 लाख रुपयापेक्षा जास्त लाभांश मिळत असेल तर व्यक्ति ,न्यास ,हिंदू अवीभक्त कुटुंब आणि फर्म 10% दराने कर द्यावा लागतो आता नोंदणीकृत कंपन्या ,न्यास आणि वित्तीय संस्था सोडून इतर सर्वाना हा कर द्यावा लागेल.
   12)किमान कर 10 वर्षापर्यत पुढे ओढून समायोजीत करता येत होता तो 15 वर्षपर्यंत पुढे ओढता येईल.
   13)यापूर्वी संशयितांवर छापा मारण्यापूर्वी आयकर विभागास त्यामागील कारण सांगणे जरुरीचे होते आता यामागील कारण सांगणे जरुरीचे नाही.
    14)आयकर पत्रक भरण्याची मर्यादा दोन वरून एक वर्ष करण्यात आली आहे त्यामुळे आर्थिक वर्ष 2016/17 चे विवरण पत्र 31 मार्च 2019 पर्यत भरता येईल तर 2017/18 चे विवरण पुढील एक वर्षात म्हणजेच 31 मार्च 2019 पर्यत भरता येईल.
   15)01/07/2017पासून आयकर विवरणपत्र भरण्यासाठी आधार क्रमांक देणे जरुरीचे आहे.
    16)आयकर विवरणपत्र उशीरा भरणाऱ्या वैयक्तिक करदात्याना 31डिंसेबर पर्यत पत्रक भरल्यास पाच हजार आणि 31मार्च पर्यत भरल्यास दहा हजार रु दंड भरावा लागेल परंतु पाच लाखाचे आत उत्पन्न असलेल्या करदात्याना हा दंड एक हजार रुपये एवढा असेल.सदर दंड विवरणपत्र दाखल करताना भरावा लागेल.
   17)प्रत्येक करदात्यास विवरण पत्राचा तपशील 6 वर्ष जपून ठेवावा लागत असे ही मर्यादा 10 वर्ष करण्यात आली आहे.
   18)सी बी डी टी यांचे परीपत्रकास अनुसरून सर्व करदात्यानी त्यांच्या उत्पन्न व खर्च यांच्या नोंदी आर्थिक वर्ष 2016/17 पासून ठेवणे आवश्यक आहे.

(सदर लेख हा प्रवीण सारस्वत यानी taxguru वर पाठवलेल्या  इंग्रजी मेलवर आधारित आहे)

उदय पिंगळे ,रसायनी
05/04/2017