Friday, 6 November 2026
निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता
#अर्थात
#निवृत्तीनंतरची_आर्थिक_सुरक्षितता
निवृत्तीचे नियोजन करताना पैसा कुठे गुंतवायचा याइतकेच तो कधी, किती आणि कोणत्या गुंतवणुकीतून गरजेसाठी काढून घ्यायचा, हे ठरवणे महत्त्वाचे आहे. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर नियमित पगाराचे उत्पन्न थांबते; परंतु दैनंदिन खर्च थांबत नाहीत. उलट वाढते वय, आरोग्यविषयक गरजा, औषधोपचार, महागाई आणि अनपेक्षित खर्च यांमुळे निवृत्तीनंतर पैशांची गरज अधिक काळजीपूर्वक उपलब्ध पैशांतून भागवावी लागते. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनात केवळ किती मोठा निवृत्ती निधी जमा झाला आहे, यापेक्षा त्या निधीचा वापर किती शिस्तबद्ध पद्धतीने केला जातो, हे अधिक महत्त्वाचे ठरते.
निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनासाठी प्रचलित असलेल्या पद्धतींपैकी एक म्हणजे 'बकेट स्ट्रॅटेजी' (Bucket Strategy). या पद्धतीत निवृत्तीचा एकूण निधी वेगवेगळ्या कालावधीसाठी आणि वेगवेगळ्या जोखीम पातळ्यांनुसार विभागला जातो. मात्र, या पद्धतीत अनेकदा दुर्लक्षित राहणारा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 'रिफिल नियम' (Refill Rule). सुरक्षित बकेटमधील पैसा खर्च होत गेल्यानंतर त्यात पुन्हा पैसा कधी आणि कुठून आणायचा, याचे नियोजन नसेल तर बकेट स्ट्रॅटेजी अपुरी ठरू शकते.
समजा, एखाद्या व्यक्तीकडे निवृत्तीच्या वेळी एक कोटी रुपयांचा निधी आहे. हा संपूर्ण निधी एकाच गुंतवणूक प्रकारात ठेवण्याऐवजी त्याचे तीन भाग केले जातात.
◆लिक्विडिटी बकेट (Liquidity Bucket) : पुढील एक ते तीन वर्षांच्या खर्चासाठी लागणारी रक्कम बचत खाते, मुदत ठेवी, लिक्विड फंड किंवा अल्पकालीन सुरक्षित साधनांमध्ये ठेवली जाते. यामुळे बाजारात घसरण झाली तरी दैनंदिन खर्चासाठी शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंड विकण्याची वेळ येत नाही.
◆सेफ्टी बकेट (Safety Bucket) चार ते सात वर्षांच्या खर्चासाठी लागणारी रक्कम तुलनेने कमी जोखमीच्या साधनांमध्ये गुंतवली जाते. उदाहरणार्थ, योग्य मुदतीच्या मुदत ठेवी, उच्च दर्जाचे डेट फंड किंवा वरिष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न योजना अथवा अन्य निश्चित उत्पन्न देणारी सुरक्षित साधने.
◆ग्रोथ बकेट (Growth Bucket) : सात वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक असलेली रक्कम इक्विटी म्युच्युअल फंड किंवा अन्य योग्य वाढीच्या साधनांमध्ये गुंतवली जाते. दीर्घकालीन महागाईवर मात करून निवृत्ती निधीची क्रयशक्ती टिकवून ठेवणे हा यामागील उद्देश असतो.
या विभागणीचा मुख्य हेतू असा की, जवळच्या काळातील खर्चासाठी लागणारा पैसा बाजारातील अस्थिरतेपासून शक्य तितका सुरक्षित ठेवायचा आणि दीर्घकालीन पैशाला वाढण्याची संधी द्यायची.
बकेट स्ट्रॅटेजीतील उणीव : रिफिल कुठून आणि कधी?
समजा, निवृत्त व्यक्तीचा वार्षिक खर्च सहा लाख रुपये आहे. अशा वेळी पहिल्या बकेटमध्ये तीन वर्षांच्या खर्चाएवढे म्हणजे १८ लाख रुपये ठेवले. दरवर्षी खर्चासाठी या बकेटमधून सहा लाख रुपये काढले जातील. तीन वर्षांनंतर ही बकेट जवळपास रिकामी होईल.
मग पुढे काय?
या प्रश्नाचे उत्तर म्हणजे 'रिफिल नियम'.
सुरक्षित बकेटमधील रक्कम एका ठरावीक मर्यादेपर्यंत कमी झाल्यानंतर ती पुन्हा पूर्वनिर्धारित पातळीवर आणण्यासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या बकेटमधून पैसा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया म्हणजे रिफिल. मात्र, ही प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत मनमानी पद्धतीने न करता आधीच ठरवलेल्या नियमांनुसार करणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ, पहिल्या बकेटमध्ये तीन वर्षांच्या खर्चाएवढी रक्कम ठेवायची आणि ती एका वर्षाच्या खर्चाएवढी उरल्यावर पुन्हा तीन वर्षांच्या खर्चाएवढी करायची, असा नियम ठरवता येईल. त्यासाठी उपलब्ध परिस्थितीनुसार दुसऱ्या बकेटमधील गुंतवणूक वापरता येईल.
बाजारातील तेजी आणि मंदीचा विचार आवश्यक: रिफिल करताना बाजाराची परिस्थिती महत्त्वाची ठरते. समजा, इक्विटी बाजारात चांगली तेजी आली आहे आणि ग्रोथ बकेटमधील गुंतवणुकीचे मूल्य लक्षणीय वाढले आहे. अशा वेळी काही प्रमाणात नफा बुक करून तो सुरक्षित बकेटमध्ये हस्तांतरित करता येतो. यामुळे इक्विटीमधील वाढीचा लाभ प्रत्यक्ष खर्चासाठी उपलब्ध होतो. याउलट, बाजारात मोठी घसरण झाली असेल तर इक्विटी गुंतवणूक तातडीने विकून सुरक्षित बकेट भरणे टाळणे अधिक योग्य ठरू शकते. कारण बाजार घसरलेल्या काळात इक्विटी विकल्यास नुकसान प्रत्यक्षात निश्चित होते. याला गुंतवणुकीच्या भाषेत 'सीक्वेन्स ऑफ रिटर्न्स रिस्क' (Sequence of Returns Risk) असे म्हणतात. निवृत्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात बाजारात मोठी घसरण झाली आणि त्याच वेळी खर्च भागवण्यासाठी इक्विटी गुंतवणूक विकावी लागली, तर निवृत्ती निधीवर दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. बाजार सावरण्यापूर्वीच गुंतवणुकीतील काही हिस्सा विकल्यामुळे भविष्यातील संभाव्य वाढीचाही लाभ कमी होतो म्हणूनच बाजार घसरलेला असताना लिक्विडिटी आणि सेफ्टी बकेटचा उपयोग करणे आणि बाजारात सुधारणा झाल्यावर नियोजित पद्धतीने त्यांचे पुनर्भरण करणे ही शिस्त महत्त्वाची आहे.
रिफिल नियम ठरवताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात?
●रिफिल नियम सर्व निवृत्त व्यक्तींसाठी एकसारखा असू शकत नाही.
●तो व्यक्तीचे वय, वार्षिक खर्च, नियमित उत्पन्न, आरोग्यविषयक गरजा, गुंतवणुकीची जोखीम स्वीकारण्याची क्षमता आणि अपेक्षित आयुर्मान यांवर अवलंबून असतो.
उदाहरणार्थ, पेन्शन किंवा भाड्याच्या स्वरूपात नियमित उत्पन्न मिळत असेल तर सुरक्षित बकेटमध्ये ठेवण्याची आवश्यक रक्कम वेगळी असू शकते. मात्र, नियमित उत्पन्न नसलेल्या व्यक्तीला अधिक मोठा खर्च राखीव ठेवावा लागू शकतो. तसेच महागाईमुळे आजचा सहा लाख रुपयांचा वार्षिक खर्च पाच वर्षांनंतर अधिक होऊ शकतो. त्यामुळे बकेटमधील रक्कम केवळ सुरुवातीच्या खर्चावर आधारित न ठेवता दरवर्षी तिचा आढावा घेणे आवश्यक आहे. आरोग्यविषयक आपत्कालीन खर्चासाठी स्वतंत्र तरतूद ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
एसडब्ल्यूपी आणि बकेट स्ट्रॅटेजी यांचा संबंध-
अनेक निवृत्त गुंतवणूकदार म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (SWP) वापरतात. त्याद्वारे दरमहा ठरावीक रक्कम काढता येते. मात्र, एसडब्ल्यूपी म्हणजे निश्चित परतावा किंवा निश्चित पेन्शन नव्हे. बाजारातील घसरणीच्या काळात नियमित पैसे काढल्यास म्युच्युअल फंडातील युनिट्स अधिक प्रमाणात विकली जाऊ शकतात. त्यामुळे उर्वरित गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. बकेट स्ट्रॅटेजी आणि एसडब्ल्यूपी यांची सांगड घालताना खर्चासाठी लागणारी रक्कम, बाजारातील परिस्थिती आणि रिफिल नियम यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.
निष्कर्ष,
निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन म्हणजे केवळ मोठा निधी जमा करणे किंवा जास्त परतावा मिळवणे नव्हे. त्या निधीतून आयुष्यभर नियमित खर्च भागवता येईल, महागाईचा परिणाम सहन करता येईल आणि बाजारातील अस्थिरतेच्या काळात गुंतवणूक घाईघाईने विकण्याची वेळ येणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करणे हा त्याचा खरा उद्देश आहे.
बकेट स्ट्रॅटेजी आपल्याला पैशांची विभागणी शिकवते, तर रिफिल नियम त्या पैशांचा वापर कसा करायचा याची शिस्त लावतो. त्यामुळे निवृत्ती नियोजन करताना 'माझ्याकडे किती पैसे आहेत?' या प्रश्नाबरोबरच 'माझ्या खर्चासाठीची बकेट संपल्यावर ती पुन्हा कशी भरणार?' हा प्रश्नही विचारला पाहिजे.
अखेरीस, निवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य टिकवण्यासाठी गुंतवणुकीतून मिळणारा परतावा जितका महत्त्वाचा आहे, तितकीच महत्त्वाची आहे योग्य वेळी पैसा काढण्याची आणि पुन्हा गुंतवण्याची शिस्त कारण निवृत्तीनंतर नवीन संपत्ती निर्माण करण्यापेक्षा यापूर्वी निर्माण केलेली संपत्ती दीर्घकाळ टिकवणे हे अधिक मोठे आव्हान असते.
*#उदय_पिंगळे*
*#अर्थ_अभ्यासक*
*(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)*
Subscribe to:
Posts (Atom)