Saturday, 9 May 2026

वाढत्या वैद्यकीय खर्चास पूरक एनपीएस स्वास्थ्य योजना

#वाढत्या_वैद्यकीय_खर्चास_पूरक_एनपीएस_स्वास्थ्य_पेन्शन_योजना गेले काही वर्षे शिक्षण आणि वैद्यकीय खर्चात प्रचंड वाढ होत आहे. सर्वसाधारण महागाई 6 ते 7% दराने वाढत असल्यास या दोन क्षेत्रांतील महागाई 12 ते 14% म्हणजे दुप्पट वेगाने वाढत आहे. कुटुंबातील कोणत्याही सदस्यास काही गंभीर आजार झाल्यास त्यांची आर्थिक घडी विस्कटून जाते. कित्येक वर्षात जमा केलेली गुंतवणूक कमी कालावधीत नाहीशी होऊ शकते प्रसंगी कर्जबाजारी होण्यासारखी स्थिती निर्माण होऊ शकते. यावर प्रत्येकाचा स्वतंत्र वैद्यकीय विमा असावा. तो घेणे शक्य नसल्यास कुटुंबाचा सामायिक आरोग्यविमा असावा. यासाठी भरावी लागणारी वर्गणी तपासून किमान ₹5 ते 10 लाख विमा एका कुटुंबासाठी असणे जरुरीचे आहे. परवडत असल्यास त्याहून अधिक रक्कम टॉप अपही करता येते. ज्यांना त्याच्या मालकाकडून असा विमा मिळतो त्यांच्याकडेही स्वतःचा किमान रकमेचा आरोग्यविमा असावा, कारण नोकरी बदलल्यास आधीच्या मालकाकडून मिळणारी सुविधा रद्द होते. त्याचप्रमाणे नोकरी बदलण्याच्या मधल्या कालावधीत काही अडचण उद्भवली तरी कोणतीही सुविधा उपलब्ध नसते त्यावेळी या पॉलिसीचा उपयोग होतो. ज्यांना आयुष्यभर अशा सुविधा मिळतात असे मोजकेच भाग्यवान सोडले तर वैद्यकीय विमा ही प्रत्येकाची जरूरी आहे. खरंतर उपयोग, लाभ हे शब्द अशा योजनांना वापरू नयेत. याचे फायदे पैशात मोजणे म्हणजे आपले किंवा कुटुंबाचे स्वास्थ्य ठीक नसणं. तेव्हा हा जोखीम व्यवस्थापनाचा भाग मानावा. यासाठी भरलेली वर्गणीतून कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता ती फुकट जावी अशी प्रार्थना करावी. सर्वसाधारणपणे आरोग्यविषयक तक्रारी या चाळिशीनंतर येण्यास सुरुवात होते आणि उतारवयात त्यात वाढ होते त्यामुळे अशा पॉलिसीची वर्गणी ही सदस्याच्या वयानुसार कमी अधिक असते. जर कुटुंबातील सर्वांसाठी ही योजना घेतली असेल तर त्याची वर्गणी ठरवताना सर्वाधिक वयाच्चा सदस्य आणि एकूण सदस्य यावरून त्याची गणना केली जाते. या संबंधात माझा अनुभव सांगतो. मी एका सरकारी उपक्रमात कामाला होतो. मला आणि माझ्या कुटुंबाला यात मी, माझी पत्नी, दोन मुले (त्यांचे वय 25 वर्ष होईपर्यंत किंवा त्यांना नोकरी लागेपर्यंत) आणि आईवडील या सर्वांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मला एका ठराविक दराने मिळत असल्याने त्याचा फारसा बोजा माझ्यावर पडत नव्हता. मध्यंतरीच्या काळात कंपनीची स्थिती नाजूक झाल्याने, मासिक पगार होणे कठीण झाल्याने ही सवलत स्थगित करण्यात आली. याच कालावधीत माझ्या पत्नीला विविध काळाने वारंवार हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्याने माझी सर्व गुंतवणूक संपून गेली. या अनुभवातून शहाणे होऊन मी 15 वर्षांपूर्वी पाच लाख रुपयांचा आरोग्यविमा 4 जणांसाठी घेतला. यानंतर मुले मोठी झाल्याने तो आम्हा उभयतांसाठी मर्यादित राहिला नंतर तो मी दहा लाख रुपयांपर्यंत वाढवला. या कालावधीत आरोग्यविम्याच्या प्रीमियममध्ये झालेली वाढ चक्रातून टाकणारी आहे. पाहिले तीन वर्षे तो ₹7200/- नंतर 2 वर्ष ₹11700/- मग 2 वर्ष ₹19500/- नंतर तीन वर्षे ₹29000 नंतर तीन वर्षे 51000 नंतर 1 वर्ष 65000/- आता कंपनी बदलल्याने तो 1 वर्ष 54000/- आहे. विद्यमान धारकांना पॉलिसी पोर्ट करण्याचा पर्याय आहे. तुम्ही उपचार कुठे करून घेता यावरही हॉस्पिटलचे दर अवलंबून असून मेडीक्लेम असेल तर अनावश्यक तपासण्या करण्यात येतात आणि दरही अधिक लावले जातात यावर काहीतरी मर्यादा असायला हवी. सरकारी दवाखान्यातील गैरसोयी पाहून बहुतेक रुग्ण खाजगी उपचार पसंत करतात आणि कधीतरी या चक्रात अडकतात. त्यामुळेच मेडिक्लेम ऐवजी आपल्याकडे एखादा केवळ याच कारणासाठी वापरता येईल असा फंड असावा असा विचार माझ्या मनात घोळत होता. त्यादृष्टीने मी पावले उचलली आहेत. अलीकडेच एनपीएस स्वास्थ्य नावाची योजना बाजारात आली असून 40 हून अधिक वय असलेले विद्यमान एनपीएस खातेधारक त्याच्या जमा फंडातील 30% रक्कम तिथे वळवू शकतात. जानेवारी 2026 रोजी प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही योजना एक ऐच्छिक, वैद्यकीय उपचार केंद्रित योजना असून ती सदस्यांना त्यांच्या सेवानिवृत्ती साठी केलेल्या बचतीतील काही भाग आरोग्यसेवेवर (आयपीडी आणि ओपीडी) खर्च करण्याची परवानगी देते. ●विद्यमान एनपीएस सदस्यासाठी उपलब्ध. ●वैद्यकीय सेवा घेण्यासाठी कितीही वेळा अंशतः पैसे काढता येतात. ●खात्यात किमान ₹50000/- जमा झाल्यावरच 25% च्या मर्यादेत पैसे काढता येतात. ●जर रुग्णालयातील खर्च एकूण स्वास्थ्य निधीच्या 70% असेल तर आणि गंभीर आजारांसाठी संपूर्ण पैसे काढून घेता येतात. ●काढून घेतलेली रक्कम परस्पर हॉस्पिटलकडे पाठवली जाते. ●यामुळे सदस्यांना सेवानिवृत्ती निधीमध्ये व्यत्यय न आणता आरोग्य विषयक गरजांसाठी स्वतंत्र खाते तयार करता येते. थोडक्यात, एनपीएसमध्ये अलीकडे जे बदल झाले आहेत त्याचाच हा भाग असून गुंतवणूकदारांना एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. यासाठी ●एनपीएस खाते असणे आवश्यक आहे त्यातील टियर वन खाते सक्तीचे असून टियर टू ऐच्छिक आहे त्याचप्रमाणे एनपीएस स्वास्थ्य ऐच्छिक आहे. ●फक्त एनपीएस स्वास्थ्य खाते काढता येणार नाही. ●18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीस हे खाते काढता येते. उशिरात उशिरा 80 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी आणि 85 व्या वर्षापर्यंत चालवता येते. ●यातील टियर वन हे पेन्शन खाते आहे. टियर टू हे बचत खाते आहे. आता उपलब्ध एनपीएस स्वास्थ्य हे आरोग्यविषयक गरजांसाठी पूरक खाते आहे. ●यातील एक वा अनेक खाती चालू ठेवण्यासाठी किमान एक ते दोन हजार दरवर्षी भरावे लागतात. यास कोणतीही कमाल मर्यादा नाही. ●टियर वन मधील पैसे विशेष कारणासाठी संपूर्ण कालावधीत पाच वर्षाच्या अंतराने चार वेळा काढता येतात. टियर टू मधील पैसे कोणत्याही कारणासाठी जरुरीप्रमाणे काढता येतात, स्वास्थ्य खात्यातील पैसे नियमानुसार वैद्यकीय कारणासाठी काढता येतात. ●या सर्व योजनांचा व्यवस्थापक, विविध मालमत्ता गुंतवणूक टक्केवारी गुंतवणूकदार ठरवू शकतो. त्यात बदल करू शकतो. यात 100% समभाग गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहे. ●सर्व खात्याच्या व्यवस्थापन खर्च अत्यंत कमी आहे. ●खाते साठ वर्षांनंतर कधीही बंद करता येते. ●खाते बंद करताना सरकारी कर्मचारी त्यातून 60% करमुक्त रक्कम, अन्य लोक 80% रक्कम काढून घेऊ शकतात. ●प्रकारानुसार 20 ते 40% रक्कम इन्शुरन्स कंपन्यांच्या निवृत्ती वेतन देणाऱ्या योजनेत गुंतवावे लागतात. ●एकूण जमा रक्कम आठ लाख असेल तर कोणतीही निवृत्ती वेतन योजना न घेता यातून बाहेर पडता येते. ●यातील टियर टू खाते अतिशय उपयुक्त आहे जे ओपन एन्डेड म्युचुअल फंड योजनेसारखे काम करते. ●40 वर्षाहून जास्त वय असलेले खातेदार जमा रकमेतील 30% रक्कम एनपीएस स्वास्थ्यमध्ये वर्ग करू शकतात. ●ज्यांनी काही कारणाने आपले खाते बंद केले असेल त्यांनी सदर खात्याची वाढलेली उपयुक्तता पाहून नव्याने खाते काढण्यास हरकत नाही. याठिकाणी त्यांना पूर्वीचे खाते पुनरुज्जीवित करता येणार नाही. नव्याने प्राण नंबर (कायम पेन्शन खाते नोंदणी क्रमांक) घ्यावा लागेल. ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)

No comments:

Post a Comment