Friday, 17 April 2026

तांबे गुंतवणुकीसाठी दुर्लक्षित धातू

#तांबे_गुंतवणूकीसाठी_दुर्लक्षित_धातू सन 2024 च्या अखेरीस आणि सन 2025 मध्ये सोने आणि चांदी याच्या बाजारभावात प्रचंड वाढ झाली. आतापर्यंतची अभूतपूर्व भाववाढ चांदीत नोंदवली गेली. सोलर, इव्ही यांच्यासाठी लागणाऱ्या या धातूतील तुटवड्याकडे बाजाराने यापूर्वी दुर्लक्ष केल आणि जेव्हा लक्ष गेले, तेव्हा चांदीच्या किमती झपाट्याने वाढल्या होत्या अगदी असंच काहीतरी दुसऱ्या धातूबाबत घडण्याची शक्यता आहे. तो धातू म्हणजे, तांबे. फरक एवढाच आहे की, अजूनही जगभरातील बहुतेक गुंतवणूकदारांचं त्याकडे लक्ष गेलेलं नाही. आपल्याकडे तर यावर चर्चा नाहीच. तांब्याला ‘डॉ. कॉपर’ म्हणतात कारण तो जागतिक अर्थव्यवस्थेची तब्येत सांगतो. तांब्याच्या किमती वाढल्या → उद्योग चालू → अर्थव्यवस्था वाढते, किमती घसरल्या → मागणी कमी → मंदीची चाहूल. हा केवळ सिद्धांत नाही तर इतिहासात वारंवार सिद्ध झालेले वास्तव आहे. तांब्याची खरी ताकद त्याच्या वापरात आहे आणि हा धातू आता मोठ्या प्रमाणात, ●प्रत्येक वायरमध्ये ●प्रत्येक घरगुती उपकरणात ●प्रत्येक सोलर पॅनलमध्ये ●प्रत्येक EV मध्ये ●प्रत्येक डेटा सेंटरमध्ये वापरला जातोय. यातील 70% पेक्षा जास्त तांबे विद्युत क्षेत्रात वापरले जाते आणि महत्त्वाचे म्हणजे याला सध्यातरी पर्याय नाही. सन 2040 पर्यंत तांब्याची मागणी दरवर्षी 2.7% ने वाढेल असा अंदाज आहे पण हा आकडा फसवणारा आहे. कारण प्रत्यक्षात, ●अपारंपरिक उर्जाक्षेत्र ●इलेक्ट्रिक वाहने ●पॉवर ग्रीड ●एआय आणि डेटा सेंटर ●संरक्षण या क्षेत्रांतून एकाच वेळी सातत्याने मागणी येत आहे याशिवाय आता बाजारात मानवाशी साधर्म्य साधणारे यंत्रमानव येऊ घातले असून सन 2040 पर्यत जर एक अब्ज यंत्रमानव निर्माण झाले तर फक्त त्यांनाच 1.6 दशलक्ष तांबे लागू शकते. ते भारतीयांच्या आजच्या एकूण वापरापेक्षा खूप जास्त आहे. यातील मुख्य अडचण अशी, तांब्याची पुरवठा साखळी लांब आणि गुंतागुंतीची आहे खनिज उत्खदन→उष्णता देऊन धातू विलगीकरण → शुद्धीकरण → वापरकर्त्यांना पोहोच पण या प्रत्येक टप्प्यावर समस्या आहेत. 1. खनिज उत्खदन- खाणीतील खनिजाची गुणवत्ता घसरतेय 30 वर्षांपूर्वीपेक्षा दुप्पट खणावे लागते नवीन खाण सुरू करायला लागणारा कालावधी खूप मोठा आहे ~17वर्षे 2. अपुरा पुरवठा- मोठ्या खाणी बंद (पनामा, इंडोनेशिया) त्यामुळे जागतिक पुरवठा कमी झाला ~4% 3. विलगीकरणातील धोके- 40–50% क्षमता एकट्या चीनकडे एकवटली आहे यामुळे निर्माण एकधिकारशाहीने किमती वाढण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. 4.अपुरा पुनर्वापर- पुनर्वापर होत असल्याने मदत होते, पण ती पुरेशी नाही सन 2040 च्या मागणीपैकी फक्त 1/3 भाग म्हणजे भविष्यात वादळी मागणीची शक्यता यामुळे वेगाने वाढणारी मागणी आणि अपुरा पुरवठा या सर्वांचा विचार करता, ●ही एक कमोडिटी सुपर सायकलची सुरुवात वाटते म्हणजे पुढील अनेक वर्षे त्यात सतत किंमतवाढ होत राहण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारानी अधिक सावध राहायला हवे ●सन 2020 पासून तांब्याने ~150% परतावा दिला आहे. ●गेल्या 18 महिन्यांत या धातूच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे कारण, ~अमेरिकेने लावलेला अधिभार ~कृत्रिम बुद्धीमत्ता आणि पायाभूत सुविधा याच्यात होत असलेली वाढ ~सट्टेबाजी यामुळे किमती आधीच वाढल्या आहेत. ●तांबे महाग झाले तर, ~बांधकाम खर्चात वाढ ~वीज आधारित वाहनांच्या किमतीत वाढ ~वीज प्रकल्प आणि वितरण खर्चात वाढ यात तांबे हा धातू स्वतःच महागाई वाढवणारा घटक बनतो काही मोठ्या गुंतवणूक संस्था आणि जागतिक बँकानी सन 2035 पर्यंत $13,500–$15,500 असा किंमत अंदाज दिला आहे त्यांच्यामते इथून पुढे त्यामध्ये होणारी भाववाढ मर्यादित असू शकते पण गुंतवणुकीत एक साधा नियम आहे, जेव्हा सगळे बोलत असतात, तेव्हा उशीर झालेला असतो आणि जेव्हा कोणीच बोलत नाही, तेव्हा संधी असते. आज तांबे याच टप्प्यावर आहे का? बाजाराला त्याची जाणीव होऊ लागली आहे का? गुंतवणूकीच्या संदर्भात, दीर्घकालीन दृष्टिकोनातून तांब्यातील गुंतवणुकीत संधी आहे, सध्याच्या किमतीत खूप आशावाद आधीच दिसतो म्हणून इतरांपेक्षा मागे राहण्याची भीती टाळा. अनुभव असा आहे सर्वोत्तम संधी तेव्हाच येते जेव्हा भीती जास्त असते, उत्साह नसतो आता तांब्यात गुंतवणूक आकर्षक असली तरी प्रश्न एकच आहेच, यात गुंतवणूक कशी करावी? प्रत्यक्ष तांबे खरेदी करणे फारसं व्यवहार्य नाहीये म्हणून अन्य काही पर्याय विचारात घेता येतील. ●खनिज व्यवसायात असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अप्रत्यक्ष गुंतवणूक करणे. ~तांबे उत्खदीत असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे शेअर्स खरेदी करणे हा सर्वात योग्य मार्ग होऊ शकतो. यातील नामवंत जागतिक कंपन्या फ्रीपोर्ट मॅकमोरन(अमेरिका), बीएचपी (ऑस्ट्रेलिया), कोडेल्को(चिली),जिझिंग मायलिंग (चीन) रिओ टिंटो आहेत जर तांब्याच्या किमती वाढल्या की या कंपन्यांचा नफा झपाट्याने वाढेल त्यामुळे त्या शेअर्सची बाजारातील किंमत वाढेल. यामध्ये असलेले धोके म्हणजे राजकीय उलथापालथ, खाण प्रकल्पातील अडथळे,यामुळे खर्चात होणारी वाढ हे आहेत. ●तांबे व्यवसायात असलेल्या भारतीय कंपन्या मधील गुंतवणूक- ~पूर्णपणे तांबे उत्पादन करणाऱ्या भारतीय कंपन्या नसल्याने ज्या तांबे उत्पादित करतात उदा हिंदुस्तान कॉपर, हिंडाल्को, वेदांता या सारख्या कंपन्यांतील गुंतवणूक. मात्र हिंदुस्तान कॉपर ही तांबे उत्पादन करणारी सरकारी कंपनी आहे तर इतर कंपन्या फक्त तांब्यावर अवलंबून नाहीत त्या अल्युमिनियम, झिंक उत्पादित करत असल्याने यामध्ये होणाऱ्या भाववाढीवर मर्यादा येतील याची जाणीव असू द्यावी. ●तांब्यावर आधारित इटीएफ अथवा आंतरराष्ट्रीय फंडांतील गुंतवणूक- ~ भारतात थेट कॉपर इटीएफ उपलब्ध नाहीत, आंतरराष्ट्रीय बाजारात कॉपर मायनिंग इटीएफ, कमोडिटी इटीएफ उपलब्ध असले तरी त्यासाठी आंतरराष्ट्रीय ब्रोकिंग खाते आणि रुपया डॉलरमध्ये बदलून देणारे विशेष खाते असणे जरुरीचे आहे. ●कॉपर फ्युचर्स मधील गुंतवणूक (प्रगत गुंतवणूकदारांसाठी)- ~ एमसीएक्स वर कॉपर फ्युचर्स उपलब्ध आहेत. त्याचे भाव खूपच वरखाली होत असतात त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ते योग्य नाहीत. ●संकल्पनेतील गुंतवणूक करणे- ~तांबे थेट न घेता, त्यावर आधारित संकल्पनेत गुंतवणूक करणे म्हणजे, विजेवर चालणारी वाहने, अपारंपरिक उर्जाक्षेत्र, विद्युत निर्मिती आणि वितरण या क्षेत्रातील कंपन्या अथवा त्यावरील इटीएफमध्ये गुंतवणूक करणे कारण हे सर्व उद्योग तांब्यावर अवलंबून आहेत. निष्कर्ष- ~तांबे हा प्रामुख्याने औद्योगिक धातू आहे ~त्याची तुलना विकासाशी करता येईल, विकास वेग वाढला तर मागणी वाढेल, अर्थव्यवस्थेबरोबर जाण्याची त्याची वृत्ती आहे. अर्थव्यवस्था वाढली तरच त्यातील गुंतवणूक फायद्याची ठरेल ~त्याच्या भावात होणारी हालचाल तीव्र स्वरूपाची आहे. ~ त्यामुळे महागाई वाढते ~ सोने भीतीपोटी, चांदी आशावादाने तर तांब्यातील गुंतवणूक त्यातील वाढीवरील विश्वासाने केली जाते आणि हो गुंतवणूकीवर विश्वास असेल तरच सर्वात जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)

No comments:

Post a Comment