Friday, 28 January 2022
सा₹थी
#सा₹थी
सन 1988 रोजी सेबीची स्थापना होऊन त्यांना 12 एप्रिल 1992 रोजी कायदेशीर अधिकार मिळाले. या घटनेस लवकरच 40 वर्षे पूर्ण होतील. आज अनेक वर्षे उलटल्यावर त्याच्या स्थापनेमागील महत्वाचा उद्देश म्हणजे 'गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण' हे कितपत साध्य झाले हा कायमच वादग्रस्त मुद्दा राहिला आहे. सुरुवातीला ही यंत्रणा चाचपडत होती असे आपण समजू शकतो परंतू अलीकडच्या काळात कार्वी, अनुग्रह, एनएससी को लोकेशन घोटाळा यासंदर्भात आधी संकेत मिळूनही सेबीने डोळेझाक केलली ही प्रकरणे न्यायालयीन कारवाईत आहेत. अनेक ब्रोकर्स नादार होऊनही बाजारातील गुंतवणूकदार रक्षण फंडातून त्यांना नियमानुसार मिळू शकणारे पैसे त्यांना मिळालेले नाहीत. 6 ऑगस्ट 2013 पासून नॅशनल स्पॉट एक्सचेंजवरील व्यवहार बंद होऊनही काही गुंतवणूकदारांना अद्याप त्यांची बरीच रक्कम मिळायची बाकी आहे. गुंतवणूकदार शिक्षण या नावाखाली म्हणजे तारांकित सेमिनार प्रायोजित करणे एवढेच चालू आहे. तक्रार निवारणात आलेली तक्रार संबंधितांना पाठवणे त्याचे पुढे काय झाले याबाबत पुरेसा पाठपुरावा केला जाऊन किती तक्रारींची खरोखर सोडवणूक झाली हा संशोधनाचा विषय आहे.
या सर्व निराशाजनक पार्श्वभूमीवर 19 जानेवारी 2022 रोजी गुंतवणूकदारांना उपयुक्त होईल असे 'सा₹थी' या नावाचे अँड्रॉईड आणि आयओएस या यंत्रणेवर चालणारे दोन्ही प्रकारचे मोबाइल अँप सेबीने सुरू करून खऱ्या अर्थाने सामान्य गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर बनवण्याच्या दृष्टीने एक मोलाचे पाऊल उचलले आहे. प्ले स्टोअर आणि अँप स्टोअरवर याच नावाची अनेक अँप असल्याने केवळ Saa₹thi यातील 'R' च्या जागी रुपयांचा '₹' हा लोगो टाकला आहे. ते अँप सेबीचे आहे ते डाउनलोड करून चालू करावे लागेल. यासाठी नाव, इ मेल, फोन नंबर, पासवर्ड आणि इच्छा असल्यास पॅन टाकून नोंदणी करावी लागेल त्यानंतर एक ओटीपी येईल तो टाकून किंवा आपले फेसबुक, गुगल खात्याचा संदर्भ देऊनही नोंदणी करता येईल आणि लॉग इन प्रक्रिया पूर्ण होईल. हे सर्व न करताही पाहुणे सदस्य म्हणूनही आपण तेथे जाऊ शकता. याप्रमाणे लॉग इन करून अथवा न करता या अँपच्या मुखपृष्ठावर (Home page) जाता येईल. तेथे भांडवलबाजाराची ओळख, शंका आणि तक्रार मागोवा, सेबीची माहिती, गुंतवणुक कशी करू?, सेबीची संसाधने, सेबीशी संपर्क असे सहा प्रमुख विभागांची सहा दारे दिसतील. उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक केले असता आपल्याला भाषा आणि अँप मधून बाहेर पडण्याचा मार्ग असे दोन पर्याय दिसतील. भाषा मध्ये इंग्रजी आणि हिंदी असे दोनच पर्याय आहेत त्याचा वापर करून आपणास भाषा बदलता येईल. याखाली असलेल्या एक्झिटवर क्लिक केले तर अँपमधून बाहेर पडता येईल.
मुखपृष्ठावरील पहिल्या म्हणजेच भांडवलबाजारची माहिती या दरवाजातून प्रवेश केल्यावर सहा उपविभाग येतील यातील सेबी आणि भांडवलबाजार यात सेबीची स्थापना उद्देश याविषयी माहिती आहे. त्याखाली असलेल्या म्युच्युअल फंड आणि इटीएफ यावर गेल्यास त्यांची प्राथमिक माहिती दिली आहे. याखाली असलेल्या उपविभागात रिटस आणि इनव्हीट याची प्राथमिक माहिती दिली आहे. याबाजूला असलेल्या उपविभागात शेअर्सविषयीची प्राथमिक माहिती आहे यात दुय्यम बाजारात व्यवहार करण्यासाठी खाते उघणे या विषयी माहिती आपला ग्राहक ओळखा (KYC), डिपॉजीटरी सेवा याविषयी माहितीच्या लिंक्स आहेत. याखाली असलेल्या उपविभागात कर्जरोख्याविषयी प्राथमिक माहिती आहे. याखाली असलेल्या उपविभागावर गेले असता डेरीवेटीव म्हणजेच व्युत्पन्न करारासंबंधी संबधित प्राथमिक माहिती आहे.
मुखपृष्ठावरील शंका आणि तक्रार मागोवा या दरवाजातून गेलो असता तक्रार निवारण कसे करावे याविषयीच्या माहितीची लिंक असून खाली सेबीची SCORS ही तक्रार निवारण यंत्रणा, काही चौकशी करायची असल्यास माहिती मागवण्याची सोय, सेबीचे गुंतवणूकदारांना उपलब्ध असलेले टोल फ्री संपर्क क्रमांक, शेअरबाजार, बस्तूबाजार, सिडिएसएल, एनएसडीएल याचे तक्रार करायची असल्यास त्यांना थेट मेल करण्याची सोय आहे.
यापुढील विभाग आहे सेबीची माहिती असणारा या दारातून प्रवेश केला असता यात सहा उपविभाग आहेत त्यातील पहिला भाग सेबी कशासाठी? याची माहिती देतो, दुसरा भाग सामान्यतः विचारले जाणाऱ्या प्रश्नाचा असून वेगवेगळ्या 28 मुद्यांशी संबधित प्रश्न आणि त्यांची उत्तरे आहेत. त्यापुढील विभागात सेबीशी संबंधित बाजारातील 7 महत्वाच्या वेगवेगळ्या मध्यस्थाची नावे पत्ते फोन नंबर आहेत. यापुढील उपविभाग सेबीची भांडवल बाजारातील भूमिका, त्यांनी काढलेली विविध परिपत्रके, नोंदणीकृत कंपन्या रजिस्ट्रार या सारख्या 35 प्रकारच्या सहभागी माध्यस्थांची माहिती देणारे आहेत.
यानंतरचा विभाग गुंतवणूक कशी करायची? यावर दरवाजातून गेले असता, अनुक्रमे गुंतवणूक म्हणजे काय? भांडवलबाजारात गुंतवणूक कशी करायची? भांडवलबाजाराच्या अभ्याससंबंधीत शैक्षणिक माहिती असलेल्या पुस्तिका, बचत गुंतवणूक यातील फरक, केवायसी संबधित माहिती, वेगळे व्हीडीओज आणि कार्यशाळा यांची माहिती आहे.
यापुढील विभाग सेबीच्या साधन संपत्तीचा विभाग असून सेबीसंबंधीत ताजी माहिती, प्रश्नमंजुषा आणि निबंध स्पर्धा, सेबीचे संकेतस्थळ, गुंतवणूकदारांची सनद, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सुरू झालेल्या विविध उपक्रमांची माहिती आहे. सेबीच्या मुख्य आणि वेगवेगळ्या स्थानिक कार्यालयांचे पत्ते आणि संपर्क क्रमांक आहेत या ठिकाणी थेट जाण्याचा स्वतंत्र दरवाजा मुख्य पानावरही आहे.
सर्वसामान्य गुंतवणूकदारांना शेअरबाजाराशी संबंधित प्राथमिक संकल्पना, केवायसी प्रोसेस, बाजार व्यवहार परिपूर्ती, चालू घडामोडी, तक्रार निवारण यंत्रणा या सर्वांसाठी उपयुक्त होईल असे हे अँप असून यात अजून काही गोष्टींचा समावेश करून अधिक परिपूर्ण होऊ शकते त्याप्रमाणे त्यात वेळोवेळी बदल केले जाणार असून लवकरच हे प्रादेशिक भाषांत उपलब्ध करून देण्याचा मानस आहे असे म्हणतात. त्याप्रमाणे ते खरोखरच उपलब्ध झाले तर खऱ्या अर्थाने सर्वच गुंतवणूकदारांना त्याचा अधिक चांगला उपयोग होईल. मुंबई शेअरबाजार महाराष्ट्रात असून त्याच्या प्रशिक्षण विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या कार्यशाळा अल्प आणि दीर्घ मुदतीचे प्रमाणपत्र वर्ग, पदवी, पदव्युत्तर, पदविका, प्रगत अभ्यासक्रम किंचित महाग परंतू अत्यंत उपयोगी आहेत. हे प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम केवळ इंग्रजी माध्यमात उपलब्ध आहे. शेअरबाजार चालू होऊन 146 वर्षे उलटल्यावर आणि बाजाराचे प्रशिक्षण केंद्र सुरू होऊन 47 वर्षे होऊन गेल्यावरही किरकोळ पुस्तिका, पत्रके, जाहिराती सोडून आज शेअरबाजारा विषयीचे खात्रीशीर साहित्य आणि अभ्यासक्रम बाजार व्यवस्थापनाकडून मराठीत उपलब्ध नाही आणि येथील राज्यकर्त्यांना ते मराठीत असावेत असे वाटत नाही हे मराठी भाषा आणि महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. सर्व गुंतवणूकदारांना उपयोग होईल असे द्वैभाषिक अँप निर्माण करून विनामूल्य उपलब्ध केल्याबद्दल सेबीचे मनःपूर्वक अभिनंदन!
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर.कॉम येथे 28 जानेवारी 2022रोजी पूर्वप्रकाशीत.
हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी-
माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक,
https://udaypingales.blogspot.com/?m=1
'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक,
https://www.facebook.com/pingaleuday/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment