Friday, 3 December 2021
सेबीचे (कदाचित) घुमजाव
#सेबीचे_कदाचित_घुमजाव?
तज्ञांचा सल्ला घेऊन विचार करून घेतलेले महत्त्वाचे निर्णय तितक्याच तातडीने मागे घेण्यात सेबीची ख्याती आहे. यामुळे नियामक म्हणून निर्णय घेण्यात आपण कमकुवत पडत असल्याचा संदेश जातो याचे भान त्यांना नसावे. अनेक महत्त्वाचे निर्णय लगेच मागे घेतल्याने आपलीच प्रतिमा आपण मलिन करीत आहोत. 1 जानेवारीपासून T+2 वरून T+1 पद्धतीने सौदापूर्ती ऐच्छिकरित्या करण्यास परवानगी देणारा आपला निर्णय मागे घेतला जाण्याची शक्यता आता आहे. सेटलमेंट कालावधीत येऊ घातलेल्या बदलाबाबत सविस्तर माहिती आपण यापूर्वीच्या 'सुधारणांचे अर्धे पाऊल' या माझ्या लेखातून घेतली होती. यात अशी अर्धवट सुधारणा करण्यापेक्षा सरसकट सर्व सेगमेंटमध्ये T+1 आता सुरू करावेत असे म्हटले होते. त्यानुसार येत्या 1 जानेवारी नाही, परंतू 25 फेब्रुवारी 2022 पासून टप्याटप्याने T+1 पद्धती लागू होईल आणि कोणताही अडथळा न आल्यास सर्वच शेअर्सच्या बाबतीत 27 जानेवारी 2023 पासून लागू होईल. खरंतर हा निर्णय यापूर्वीच घेऊन आपण खूप वर्षांपूर्वी ठरवलेले स्पॉट सेटलमेंटचे उद्दिष्ट पूर्ण करायला हवे होते. आता T+1 वर टप्याटप्याने येताना सक्तीने बदलास सामोरे जायचे ठरवलं असल्याने एकाच शेअरच्या बाबतीत T+2 आणि T+1 सौदापूर्तीमुळे होऊ शकणारा गोंधळ टळेल ही यातील जमेची बाजू.
अशा प्रकारे सौदापूर्ती झाल्यास जरी एखादा व्यवहार बाजार बंद होण्याच्या काही सेकंद आधी झाला असेल तरी खरेदी केली असेल पैसे आणि विक्री केली असेल तर शेअर्स त्याच दिवशी आपल्या ब्रोकर्सकडे द्यावे लागतील. ट्रेडिंग आणि डिरिवेटिव व्यवहार करणाऱ्या लोकांना यात पडणाऱ्या फरकाची पूर्तता त्याच दिवशी करावी लागत असल्याने या बदलामुळे खूप मोठा फरक पडेल असे वाटत नाही. यामुळे बाजार उलाढालीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या चीनमध्ये या पद्धतीने व्यवहार होत असून जर आपल्याकडे ही पद्धत चालू झाली तर अशी पद्धत आणणारा दुसरा देश ठरू. सध्या अमेरिकेसारख्या प्रगत देशातही सौदापूर्ती T+3 पद्धतीने होत असून आपल्याकडून स्फूर्ती घेऊन टप्याटप्याने T+1 पद्धत आणण्याची त्यांची योजना आहे. सेबीने ऐच्छिकरित्या T+1ला दिलेल्या परवानगीमुळे अपेक्षित सुधारणा अर्धवटच होऊ शकली असती. यामुळे विदेशी गुंतवणूकदारांना, ते जगभरातील बाजारात व्यवहार करीत असल्याने बदलणारी व्यवहार वेळ यामुळे काही तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता होती. तेव्हा स्टॉक एक्सचेंजने पूर्ण बदल होण्यास थोडा अवधी मिळावा या हेतूने काही बदल सुचवून T+1पद्धतीने व्यवहार टप्याटप्याने करण्याची मागणी केली असून आजवरील अनुभव पाहता ती मान्य होण्याची शक्यता आहे.
या योजनेची वैशिष्ट्ये-
*बाजारमूल्य सर्वात कमी असलेल्या 100 कंपन्यांची सौदापूर्ती शुक्रवारी 25 फेब्रुवारी 2022 पासून T+1 या पद्धतीने होईल.
*याबरोबरच एक्सचेंज ट्रेडेड फंड, म्युच्युअल फंड युनिट, इंव्हीट, रिटस यांच्या खरेदी विक्री हे व्यवहारही या वेळापत्रकातील शेवटच्या टप्यापासून T+1 पद्धतीने केले जातील.
*यानंतर पुढील महिन्याच्या म्हणजे मार्च 2022 च्या शेवटच्या शुक्रवारी याच निकषानुसार बाजारमूल्य सर्वात कमी असलेल्या 500 कंपन्यांचे व्यवहार T+1 पद्धतीने होतील.
*राष्ट्रीय शेअरबाजारात नोंदणी असलेल्या आणि यातील बाजार मूल्यांकनानुसार अधिक भाव असलेल्या 500 कंपन्यांमधील व्यवहार 25 नोव्हेंबर 2022 पासून T+1 पद्धतीने होतील.
*याप्पुढील टप्यावर म्हणजे सर्वाधिक उलाढाल व बाजारमूल्य असलेल्या निफ्टी 50 मधील 50 कंपन्यांमधील व्यवहार या पद्धतीने सुरू होण्यास सर्वात शेवटी म्हणजे 27 जानेवारी 2023 उजाडेल असे या नवीन कार्यक्रमात गृहीत धरले आहे.
*ज्या कंपन्यांचे व्यवहार T+1मध्ये येतील त्याच दिवसापासून त्यांचे कार्पोरेट बॉण्ड, पार्टली पेडअप शेअर्स, हक्कभाग अधिकारांची खरेदीविक्रीही आपोआपच याच पद्धतीने चालू होईल.
अशाप्रकारे बदलणाऱ्या सौदापूर्तीचे उद्दिष्ट कमी बाजारमूल्य असलेल्या कंपन्यांपासून अधिक बाजारमूल्य असलेल्या कंपन्यांकडे चढत्या वर्गाने ठेवल्यामुळे अतिशय सहजरित्या हा महत्वपूर्ण बदल घडू शकेल. तंत्रज्ञानात बदल करण्यास सर्वानाच पुरेसा वेळ मिळेल. व्यवहार करण्याच्या पद्धतीत थोडा बदल होईल रोकड सुलभतेत सुधारणा कारावी लागेल. तर काही तज्ञांच्या मते सौदापुर्ती तत्परतेने करण्यासाठी अधिक मनुष्यबळ लागणार असल्याने ब्रोकर्स लोकांच्या बॅक ऑफिस खर्चात वाढ होईल त्यामुळे हे लोक सध्या फारशी हालचाल करणार नाहीत आणि नोव्हेंबर 2022 ला जेव्हा निफ्टी 500 चे व्यवहार चालू होतील त्यापूर्वी अजून पुरेशी तयारी नसल्याचे रडगाणे गाऊन यासंबंधी असलेली अंतिम तारीख वाढवून मागण्याची शक्यता आहे.
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर.कॉम येथे 3 डिसेंबर 2021 रोजी पूर्वप्रकाशीत.
हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी-
माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक,
https://udaypingales.blogspot.com/?m=1
'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक,
https://www.facebook.com/pingaleuday/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment