#करो_ना,
#यातील_काही_आपण_विसरलोय_का?
#यातील_काही_आपण_विसरलोय_का?
हा लेख प्रकाशित होईल तेव्हा हे आर्थिक वर्ष (Financial Year) संपायला ४/६ दिवस उरले असतील. आर्थिक वर्षाची मुदत वाढवली नसून रिजर्व बँकेने आपले आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असे केल्याने त्यांचे सन २००१९- २०२० हे वर्ष जून २०२० ला संपून पुढील वर्ष हे ९ महिन्यांचे असून ते ३१ मार्च २०२१ रोजी संपेल, त्यापुढील आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असेल. हे लक्षात ठेऊन काही गोष्टी सर्वांनी अग्रक्रमाने करणे आवश्यक आहे याला मी 'करो ना' म्हणतोय, नाहीतर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे, त्या कोणत्या ते पाहुयात.
★मागील आर्थिक वर्षाचे विवरणपत्र (Income Tax Return) : सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात सर्वसाधारण व्यक्ती, ज्यांचे करपात्र उत्पन्न २लाख ५० हजार, जेष्ठ नागरिक ज्यांचे करपात्र उत्पन्न ३ लाख आहे तर अतिजेष्ठ नागरिक ज्यांचे करपात्र उत्पन्न ५ लाख आहे त्यांनी त्यांचे उत्पन्न करपात्र असो अथवा नसो, मुळातून करकपात झालेली असो अथवा नसो आपले आयकर विवरणपत्र भरणे आवश्यक आहे. योग्य त्या दंडासह असे विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत ३१मार्च २०२० असून अजूनही ज्यांनी विवरणपत्र भरले नाही त्यांनी ताबडतोब भरावे अन्यथा १ एप्रिल २०२० नंतर या विषयी आयकर खात्याकडून नोटीस येऊ शकते, दंड होऊ शकतो.
★चालू आर्थिक वर्षाच्या (सन २०१९-२०२०) अंदाजित उत्पन्नाची मोजणी: आपले सर्व मार्गाने मिळणारे अंदाजित उत्पन्न मोजून त्यावरील सवलतींचा आढावा घ्यावा. जर काही रक्कम गुंतवून करसवलत वाढत असेल तर ३१ मार्चपूर्वी गुंतवणूक करून त्याचा लाभ घेता येईल. तेव्हा शक्य असेल तर यास प्राधान्य देऊन लगेच गुंतवणूक करावी. राष्ट्रीय निवृत्ती योजनेत (National Pension Scheme) ५० हजार रुपये भरल्याने आयकरात ८०/क मध्ये असलेल्या १ लाख ५० हजार व्यतिरिक्त अधिकची सवलत मिळते हे खाते ऑनलाईन उघडता येते.
★आपले करदायित्व मोजा: पूर्ण वर्षभरात आपल्याला १० हजाराहून अधिक कर बसत असेल तर नियमांनुसार वेळोवेळी अग्रीम कर (Advance Tax) भरणे आवश्यक आहे. जर अग्रीम कर भरणे बाकी असेल तर ३१ मार्चपूर्वी दंडासह पूर्ण रकमेचा भरणा बँकेमार्फत आयकर खात्याकडे करावा.
★स्मार्ट गुंतवणूक: करसवलत सोडूनही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provided Fund 2019), सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samrudhi 2019) या मध्ये जास्तीचे पैसे भरून नियमित दरापेक्षा अधिक दराने करमुक्त (Tax-free) व्याज मिळवता येणे शक्य आहे तेव्हा शक्य असल्यास या योजनांमध्ये अधिक गुंतवणूक करावी. यामुळे भविष्यात भांडवलाची निर्मिती होईल. अल्पबचत योजनांवर (Small Savings Schemes) व्याजदर जास्त असून यात जमा रक्कम सरकारकडे असल्याने या योजना कोणत्याही बँकेहून अधिक सुरक्षित आहेत. तेव्हा शक्य असेल तर यातील गुंतवणूक वाढवता येईल. यावरील व्याजदर दर तीन महिन्याने बदलतात व ते भविष्यात कमी होण्याची शक्यता असल्याने या वाढीव व्याजाचा फायदा ३१ मार्च २०२० पूर्वी गुंतवणूक करून घ्यावा.
★कायम नोंदणी क्रमांक Permanent Account Number) आधारशी (Aadhar) जोडणे : आपण करदाते असोत अथवा नसोत आपला कायम नोंदणीक्रमांक ३१ मार्च २०२० पूर्वी आधारशी जोडणे गरजेचे आहे हे करण्यासाठीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२० असून आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे कायम नोंदणी क्रमांक आधारशी जोडले गेले असल्याची खात्री करून घ्यावी व नसलेले क्रमांक जोडून घ्यावे अन्यथा हे कायम नोंदणीक्रमांक स्थगित (Freeze) केले जाण्याची शक्यता आहे.यापूर्वी अनेकदा ही मुदत वाढवण्यात आली आहे. तेव्हा याही वेळी मुदत वाढेल असे गृहीत धरू नका.
★अल्प व दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभाचे करव्यवस्थापन (Short Turn Capital Gain and Long Turm Capital Gain Tax Management) : नोंदणीकृत समभागांवरील अल्प मुदतीच्या भांडवली निव्वळ नफ्यावर १५% या विशेष दराने (Special Rate) कर द्यावा लागतो तर १ लाखाहून अधिक दीर्घकालीन भांडवली नफ्यावर १० टक्के विशेष दराने कर द्यावा लागतो. तर स्थावर मालमत्तेवर दोन वर्षाने तर समभाग सोडून अन्य मालमत्तेवर तीन वर्षाने फायद्याचा १०% किंवा मूल्यांकनाचा लाभ घेऊन २०% दिर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर द्यावा लागेल. तर यातून मिळालेल्या अल्प मुदतीच्या भांडवली नफ्याची मोजणी आपल्या उत्पन्नात केली जाऊन त्यावर प्रचलित दराने कर द्यावा लागेल. वैध मार्गाने कर अजून कमी करता येईल. सध्या अनेक शेअर्स गटांगळ्या घेत असल्याने तोट्यात असलेल्या शेअर्सची विक्री एका बाजारात करून खरेदी दुसऱ्या बाजारात किंवा दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच बाजारात त्याच किंवा त्याच्या खालील भावाने खरेदी करता आली तर आपल्याकडील शेअर्सची संख्या तीच राहून कागदोपत्री तांत्रिकदृष्ट्या मोठा तोटा होईल, हा तोटा या वर्षीच्या किंवा यापुढील काही वर्षात होणाऱ्या भांडवली नफ्यात समायोजित करून मोठ्या प्रमाणात करबचत होऊ शकते.
★योग्य रकमेचे संरक्षण: पगारात होणारी वाढ लक्षात घेवून निव्वळ वार्षिक उत्पन्नच्या २० पट मुदतीचा विमा (Turm Insurance), २/३ पट आरोग्यविमा (Medical Insurance), १० पट अपघात विमा (Accident Insurance) असावा हे लक्षात ठेवून त्यात आवश्यक ती वाढ करावी. जरूरीप्रमाणे इतर विमाप्रकार घेण्याचा विचार करावा. लाभराहित ( Without Profit) योजना खूप स्वस्त पडतात यात भरलेले पैसे फुकट जाणे म्हणजे आपण व्यवस्थित असणे असे असल्याने हे पैसे आपणास मिळालेच नाहीत असे समजून निश्चित्त राहावे.
★विवाद से विश्वास : आपले करविषयक प्रलंबित दावे, कोणतीही दंड आकारणी न करता सोडवण्याची मुदत ३१ मार्च २०२० आहे यानंतर ३० जून २०२० पर्यंत किरकोळ दंड भरून यातून मुक्ती मिळवता येईल.
★नव्या वर्षाची योजना बनवा : पुढील वर्षांतील उत्पन्नाचा अंदाज घेऊन नियोजनाचा आराखडा बनवा आणि त्याचे काटेकोरपणे पालन करा म्हणजे शेवटच्या क्षणी धावपळ टळेल. गुंतवणूक कागदपत्रे त्यावरील वारसांची नोंद बरोबर आहे का पहा ती सहज मिळतील अशा प्रकारे एकत्रित ठेवा. पुढील वर्षात ज्या योजनांची मुदत संपते त्याचे आसपास आपल्याला आठवण करून देणारे रिमाईंडर, त्याचप्रमाणे विविध हप्ते भरण्याची आठवण करून देणारे रिमाईंडर ३१ मार्च २०२० पूर्वी आपल्या मोबाईल मध्ये सेट करा.
यातील - आयकर विवरणपत्र भरणे, कायम नोंदणी क्रमांक आधारशी जोडणे आणि विवाद से विश्वास यांना सरकारने लॉकडाऊनमुळे ३० जून २०२० पर्यंत मुदतवाढ अलीकडेच दिली आहे. सध्या सगळीकडे 'करोना' चा इफेक्ट असल्याने, तसेच यातील बहुतेक गोष्टी सर्व गोष्टी बाहेर न जाता करता येत असल्याने आणि पुरेसा वेळही असल्याने आता ताबडतोब हे सर्व 'करो ना' !
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर येथे २७ मार्च २०२० रोजी पूर्वप्रकाशीत.
No comments:
Post a Comment