Friday, 3 November 2017

निर्देशांक (Index)

                                                          निर्देशांक (Index)

      आपण एखादी दिशा दाखवण्यासाठी हाताचे जे बोट दाखवतो (चाफेकळी) त्याला इंग्रजीत Index Finger असे म्हणतात .ज्यावरून आपण बाजार कोणत्या दिशेला चालला आहे याचा अंदाज बांधू शकतो त्यांस बाजार निर्देशांक (Index) असे म्हणतात . सध्या Sensex आणि nifty हे शेअर बाजाराशी संबधित निर्देशांक प्रसिद्ध आहेत .
  खर तर कोणत्याही कंपनीच्या शेअरचा भाव हा त्या कंपनीच्या कामगिरीवर असायला हवा परंतू प्रत्यक्षात कंपन्यांच्या बाजारभावात इतर अनेक कारणांनी फरक पडत असतो .सध्या मुंबई शेअरबाजारात नोंदणी केलेल्या कंपन्यांची संख्या 8000 हून अधिक तर राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी कलेल्या शेअरची संख्या 5000 हून जास्त आहे .यांपैकी काही कंपन्याची रोज उलाढाल होतेच असे नाही .काही कंपन्यांचे व्यवहार  कवडीमोल दराने होतात तर काही कंपन्यांचे व्यवहार  त्यांच्या दर्शनी मुल्याच्या अनेक पटीने होतात.  या कंपन्या विविध क्षेत्रांत असून त्यांचे भागभांडवल कमी जास्त आहे .उलाढाल नफा या मधे फरक आहे अशा असमान परिस्थितीत सर्व कंपन्यांची तुलना करून काही ठोस निष्कर्ष काढणे हे अत्यंत अवघड आहे . तेव्हा मुंबई शेअर बाजारातील साधारण महत्वाच्या  सर्व क्षेत्राचा समतोल साधून त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 30 कंपन्यांच्या मिळून सेन्सेक्स (Sensitive Index) तर राष्ट्रीय शेअरबाजारातील विविध बारा क्षेत्रातील 50 कंपन्यांचा मिळून निफ्टी(NSE Fifty) बनला आहे .यात सामावेश असलेल्या सर्व कंपन्यांचे मार्केट कॅपिटल म्हणजेच सर्व शेअरचे प्रचलित बाजारमूल्य काढले जाते .या कंपन्यांचे सर्व शेअर बाजारात खरेदी विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या शेअर्सचे संख्येने फ्री फ्लोट फॅक्टर काढून त्याला मार्केट कॅपिटलला गुणुन  फ्री फ्लॉट मार्केट कॅपिटलायझेशन काढले जाते .अशा प्रकारे निर्देशांकात समाविष्ट सर्व कंपन्यांच्या फ्री फ्लॉट मार्केट कॅपिटलायझेशनची बेरिज केली जाते .
      1एप्रिल 1979 रोजी अशा प्रकारे मुंबई शेअर बाजारातील 30 कंपन्यांच्या फ्री फ्लोट  मार्केट कॅपिटलायझेशनची बेरिज करण्यात येवून 100 हा पायाभूत इंडेक्स धरण्यात येवून त्यानुसार सेन्सेक्सचा इंडेक्स डिवायजर काढला गेला .याने प्रत्येक वेळी फ्री फ्लॉट मार्केट कॅपिटलायझेशनला भागले असता येणारा इंडेक्स म्हणजे त्यावेळचा सेन्सेक्स होय .ही प्रक्रिया दर पंधरा सेकंदाने संगणकामार्फत केली जाते .याच पद्धतीने एन एस सी वरील 50 कंपन्यांचा वापर करून निफ्टी काढला जातो .यासाठी 3 नोव्हेंबर 1995 रोजीची पायाभूत किंमत 1000  पकडण्यात आली आहे .थोडक्यात सेन्सेक्स आणि निफ्टी हे एका विशिष्ट दिवसाच्या तुलनेतील एकत्रित मूल्य आहे .
   जेव्हा एखादा निर्देशांक चढतो/उतरतो  तेव्हा त्यात समाविष्ट सर्वच शेअरचे भाव वाढलेले/पडलेले  नसतात त्याच प्रमाणे ही चढ /उतार सारख्याच प्रमाणात नसते .सर्वसाधारणपणे एका वेळी निर्देशांकात सामावेश असलेल्या सर्व शेअर्सची किंमत एकाच वेळी एका दिशेत जात नसल्याने मोठ्या प्रमाणात समतोल साधला जातो .त्यामूळे निर्देशांकातील चढ उतारामधील  कारणे लक्षात न घेता कोणताही ठोस निष्कर्ष काढणे चुकीचे आहे .शेअर्सचे बाजारमूल्यावरून लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप असे वर्गीकरण करण्यात आले आहे.सध्या 3000 कोटीहून अधिक बाजार मूल्य असलेल्याना लार्ज कॅप , 250 कोटीहून कमी बाजारमूल्य असलेल्या कंपन्या स्मोल कॅप आणि बाकी सर्व कंपन्यांना मिड कॅप असे समाजण्यात येते .लवकरच यात बदल होणे अपेक्षित आहे यांसंबंधीची सूचना लवकरच निघेल . त्यातील प्रातिनिधिक शेअर्सवरून , निवडक शेअरवरून , विशिष्ट व्यवसायाचे उत्पादन आणि सेवा जसे आटो , पॉवर , बँकिंग , मेटल , फार्मा ई. यावरूनही निर्देशांक बनवले गेले असून ते 'शितावरून भाताची परीक्षा ' या न्यायाने गुंतवणूकदाराना  दिशादर्शनाचे काम करीत आहेत . याशिवाय म्यूचुअल फंडाच्या विविध योजनाच्या गुंतवणूकीस प्रमाण म्हणून मार्गदर्शक ठरत आहेत .तसेच विविध प्रकारच्या डेरेव्हेटीवच्या योजनांचा आधार आहेत . अनेक लोक , सरकार , स्वदेशी आणि परदेशी वित्त संस्था निर्देशांकातिल वाढीस चांगल्या अर्थव्यवस्थेचे प्रतिक असे समजतात . मांत्र  लक्षात ठेवायला हवे की असे निर्देशांक हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करत नाहीत .यामुळे कोणत्या प्रकारातील कंपन्या तेजीत /मंदीत आहेत याचा फक्त ढोबळ अंदाजच  बांधता येतो .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

No comments:

Post a Comment