Friday, 30 June 2017

गुंतवणूकदारांचा मितवा .....😀

      गुंतवणूकदारांचा मितवा ...☺


     एक जागरूक आणि सजग गुंतवणूकदार म्हणून आपण विविध गुंतवणूक प्रकारात आपली बचत आणि गुंतवणुक विभागून ठेवायला हवी .तसेच वेळोवेळी त्याचा आढावा घेवून त्यात योग्य ते बदल करायला हवेत हे आपल्याला माहीत आहेच .प्रत्यक्षात असा मागोवा मोजकेच लोक घेत असतात .अश्या प्रकारे आपल्या गुंतवणूकीचे योग्य मूल्यांकन आणि मुल्यमापन moneycontrol या संकेतस्थळाला भेट देवून अथवा आपल्या मोबाईलवर या अॅपमुळे क्षणात करता येणे शक्य आहे . अनेक जणांनी हे App आपल्या मोबाइलवर घेतले आहे तर काहीजणांच्या मोबाईलमधे ते मुळातच आहे अनेकांनी ते आपल्या पी सी  ,लॅपटॉप मधेही ते घेतले आहे. परंतू बरेचसे लोक शेअरचे भाव आणि म्यूचुअल फंड योजनांचे निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV)एवढे पाहण्यापुरताच  याचा वापर करतात ,थोडीशी मेहनत घेवून जर आपल्या बचत आणि गुंतवणुकीच्या योजना यांची नोंद केली आणि त्यात बदलानुसार दुरुस्त्या केल्या तर याहून अधिक चांगल्या प्रकारे याचा वापर करता येणे शक्य आहे.अनेकांना यामधे काय काय आहे हेच मूळात माहीत नाही .त्या सर्व गोष्टींची आपण माहिती करून घेवूया .जांच्याकडे हे App नाही त्यानी Play Store वर जावून मोबाईलवर मोफत डाउनलोड करून घ्यावे .पी सी आणि लॅपटॉपसाठी moneycontrol.com या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि शॉर्टकट तयार करून तो डेस्कटॉप वर घ्यावा यानंतर आपली वैयक्तीक माहिती भरून लॉग इन आय डी आणि पासवर्ड तयार करून घ्यावा आणि लक्षात ठेवावा .हे करणे अतिशय सोपे असून जर जमले नाही तर कोणाची तरी मदत घ्यावी. आता आपल्याकडे हे App आहे आणि आपण त्याचे वापरकर्ते झालो आहाेत आणि त्याचा पूर्ण क्षमतेने वापर करणार आहोत .
   मोबाईलवर हे App उघडल्यावर  डाव्या बाजूस तीन आडव्या रेषा दिसतील या App ची ही    गुरुकिल्ली Enter असून त्यावर क्लिक केले असता एखादा खजिना मिळावा त्याप्रमाणे विविध शीर्षक असलेले अनेक आयकॉन दिसतील .
   १.Language हा डाव्या बाजूस सर्वात वर आयकॉन असून याची भाषा English दिसेल ,शेजारील Pencil ला क्लिक केले कि त्यात बदल होवून  इंग्रजी ,हिंदी , गुजराथी असे पर्याय दिसतील यातील आपणास हवा असलेला पर्याय घेऊन भाषा बदल करू  शकतो .आपण जोपर्यंत भाषेत बदल करीत नाही तोपर्यंत यात काही  बदल होणार नाही .
   २. याखाली Home असून त्यावर क्लिक केले तर आपण मागे म्हणजे जेथून सुरुवात केली तेथे Homepage वर जातो.येथे या appचा सारांश आहे या मधे उजव्या बाजूस एंटर ची खूण moneycontol चे बोधचिन्ह असून शेजारी काही Aapची जाहिरात लिंक आहे उजव्या बाजूस माणसाचे चिन्ह असून तेथे My portfolio ,My Watchlist ,My Forum ,Setting यांवर जाण्याचा जवळचा मार्ग (Short Cut) असून येथून बाहेर पडण्यासाठी Log out आहे .शेजारीच असलेल्या दुर्बिणीतून समभाग ,म्यूचुअल फंड ,कमोडीटी यांचे भाव पहाता येतात .याखाली एक धावती पट्टी असून या पट्टिवर Nifty ,Sensex किंवा आपल्या मर्जिनुसार ठेवलेल्या समभागांचे भाव पहाता येतात .या धावपट्टिखाली तीन महत्वाच्या बातम्याचे शीर्षक असून त्यावर क्लिक केले तर सविस्तर बातमी आपल्याला वाचता येते.त्याचेखाली सहा महत्वाचे निर्देशांक ,आपल्या गुंतवणूकीचे निव्वळ मूल्य ,अलिकडे पाहिलेल्या चार कंपन्याचे भाव ,बाजारावर परिणाम करणाऱ्या चार कंपन्यांचे भाव ,सोने ,खनिज तेल ,डॉलर आणि पौंड यांचे सध्याचे बाजारभाव दिसतात .
   ३.याखाली Market हा आयकॉन असून यावर क्लिक केले असता Indian Indices , Global Indices ,या शीर्षकांखाली विविध प्रकारचे , विविध शेअर बाजारांचे निर्देशांक पहावयास मिळतात . याचा मागील आणि चालू बंद भाव ,बाजार चालू असताना पडत असलेला फरक , त्या दिवसाचा आलेख , दिवसभरातील सर्वात कमी जास्त भावपातळी ,मागील ५२ आठवड्यांची भावपातळी ,१दिवस ते ३वर्ष या कालावधीतील उतारा , मागील ३० दिवस ते २०० दिवस दिवसांचा सरासरी भाव यातील एखादा  निर्देशांक क्लिक केला तर त्यात सामाविष्ट शेअर वरील सर्व माहीतीसह स्वतंत्रपणे पाहता येतो ही कंपनी कोणत्या प्रकारात येते तसेच या निर्देशांकात समाविष्ट विविध प्रकारच्या उद्योगांचा आलेख पहाता येतो.याशिवाय निर्देशांकातील कोणत्याही कंपनीवर क्लिक केले तर त्या कंपनीची सर्व माहिती निर्देशांकाच्या माहितीप्रमाणे मिळते याशिवाय जर ती कंपनी F&O मधे असेल त्याविषयी माहिती , त्याचप्रमाणे कंपनीच्या संदर्भातील बातम्या , गुंतवणूकदारानी व्यक्त केलेली मते , कंपनी विषयीचे अंदाज ,पाच सर्वोच्च खरेदीदार आणि विक्रेते यांनी नोदवलेले भाव व शेअरची संख्या ,बोर्ड मीटिंग , डीवीडेंड , बोनस ,समभाग विभागणी , राइट्स ,वार्षिक सर्वसाधारण सभा विशेष सभा ,तिमाही अहवाल , वार्षिक अहवाल ,जमाखर्च ,विविध प्रकारची आर्थिक गुणोत्तरे (Retios),स्पर्धक कंपन्या , समभाग धारकांचे वर्गिकरण , कंपनीचा पत्ता फोन इ मेल संकेतस्थळ संचालक यांच्या विषयी माहिती मिळते यातील Market Moovers मधे Sensex आणि Nifty यातील सर्वाधिक वाढ /घट दाखवणारे शेअर ,किंमत /उलाढाल यानुसार वर्गवारी केलेले शेअर ,52 आठवड्याचा भावाचा उच्चांक आणि निचांक दर्शवणारे शेअर आणि ज्या शेअर्सना फक्त खरेदीदार किंवा फक्त विक्रेते आहेत यांची यादी पहायला मिळते .याच भागात Currency Exchange  Rate , F&O Action ,IPO ,FII ,DII ,Mutual Fund यांनी केलेली खरेदी विक्री याविषयी सखोल माहिती मिळते आणि Broker Research मध्ये वेगवेगळे ब्रोकर आणि फंड हाउस यांनी सूचवलेले शेअर याविषयी माहिती मिळते .
   ४.याखाली News हा आयकॉन असून यामधे Top News , Market ,Stock ,Business , Managment Talk ,Mutual Fund ,Commodities , Economy ,Politics , lnternational ,SME , Technology ,Auto & lifestyle या शिर्षकाखाली विविध बातम्या वाचावयास मिळतात .
  ५.यानंतर Live TV हा आयकॉन असून यामधे CNBC चे  TV 18, Awaaz ,Bazaar ,Prime HD हे चॅनल पाहण्याची सोय असून Vidios on Demand मधे विविध विषयांचे विडिओ पहाण्याची सोय आहे .
   ६.याखाली My Stock हा महत्वाचा आयकॉन असून यामध्ये My Portfolio ,My Watchlist, Stock Last Visited हे उपप्रकार असून My Portfolio मधे आपली एकूण मालमत्ता , यामधे कालच्या तुलनेत झालेली वट घट यांची माहिती मिळते आपण शेअर ,म्यूचुअल फंड त्यांचे एस आई पी ,सोने चांदी ,फिक्स डिपोजिट ,एन एस सी ,पी पी एफ ,मालमत्ता या सारख्या गुंतवणूक व बचत यांच्या नोंदी ठेवण्याची सोय असून वेळोवेळी त्या अद्ययावत करण्याचा पर्याय आहे . त्याचप्रमाणे विविध   उधाऱ्या आणि कर्ज यांचीही नोंद ठेवता येते  तर My Watchlist मधे आपण लक्ष ठेवून असलेल्या शेअरचे भाव आणि त्या कंपनी विषयी सर्व माहिती पाहण्याची सोय असून Stock Last Visited मधे अलीकडे पाहिलेल्या कंपन्यांची माहिती आहे .
   ७.Forum यामधे आपण लक्ष ठेवून असलेल्या किंवा आपली गुंतवणूक असलेले शेअर ,फंड , कमोडिटी यावरील विविध लोकांच्या चर्चा ,मते ,सूचना असतात आपण यात सहभागी होऊ शकतो ,मत मांडू शकतो .
   ८.याखाली Commodity , Currency ,Mutual Fund यांचे आयकॉन असून यामधील चढ उतार ,चलनाचा विनिमय दर , म्यूचुअल फंडाची कामगिरी श्रेणी यांची वर्गवारी दिली आहे यातील प्रत्येक ठिकाणी क्लिक केले असता मागील पाच वर्षाची कामगिरी ,किमान गुंतवणूक , लाभांश ,प्रमुख समभागातिल गुंतवणूक यांची अधिक सखोल माहिती मिळते .
   ९.याखालीच Personal Finance हा आयकॉन असून यामधे Plan & Invest , Insurance ,Tax ,Loans , Property ,Retirement ,Fixed Income ,Credit Cards यासंबंधीची माहिती असून Tools मधे Magic of      Compounding ,How to Become Carorpati ,EMI , Calculater आणि Gratuity Calculater यांच्या तयार सारण्या (tables) असून यात काही माहिती भरल्यास  त्याची उत्तरे मिळू शकतात .
   १०.याखाली Subscription हा आयकॉन असून येथे ब्रोकर आणि फंड हाउस यांच्याकडील पैसे आकारुन गुंतवणूकीचे संदर्भातील मार्गदर्शन उपलब्ध आहे .
   ११.यानंतर Specials मध्ये उपयुक्त विषय दिले असून तेथून यावरील लिंकवर जाता येते.
   १२.याखाली Saved Articles हा आयकॉन असून येथे आपण ऑनलाइन असताना साठवून ठेवलेले लेख ऑफलाइन वाचू शकतो.
   १३.यानंतर Setting हा आयकॉन असून यामधे आपणास Ticker चे सेटिंग Sensex , Nifty , Portfolio आणि Watchlist प्रमाणे करून ठेवता येते .
   या खाली अन्य चार आयकॉन असून त्याद्वारे याApp ची माहिती इतरांना देता येते .आपणास हे App कसे वाटते याविषयी मत नोंदवता येते .यासारख्या दुसऱ्या App ची माहिती मिळवता येते .तसेच या App संबंधी काही सूचना/तक्रारी असतील तर Feedback द्वारे कळवण्याची सोय आहे .
  कोण होईल मराठी करोडपती यातील मितवा हे आधारकार्ड आठवतंय का ? गुंतवणूकदारांच्या दृष्टीने हेApp म्हणजे मित्र , तत्वज्ञ ,वाटाड्याच ! 'अनंतहस्ते कमलावराने ,देता घेशील दो कराने' अतिशय थोडक्यात परंतू या App ची परिपूर्ण ओळख करून देण्याचा हा प्रयत्न असून जिज्ञासुनी या आधारे अधिक माहिती मिळवून स्वयंपूर्ण व्हावे .

©उदय पिंगळे

(यात उल्लेख केलेले  App गुंतवणुकदाराना मार्गदर्शक ठरेल असे वाटते म्हणून त्याची सविस्तर माहिती दिली असून याच्याशी लेखकाचा कोणताही व्यावसायीक संबध नाही)

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

   ही माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांनी वाचण्यासाठी  त्यांना शेअर करा म्हणजे अनेकांपर्यत ती एकाच वेळी पोहोचेल.

Friday, 23 June 2017

रिझर्व बँकेचे द्वैमासिक पतधोरण ......

      ..रिझर्व बँकेचे द्वैमासिक पतधोरण..

       महागाई एका मर्यादेत ठेवण्यासाठी अनेक उपाय सरकार करते .महागाई नियंत्रण करणे हे रिझर्व बँकेच्या  अनेक कामांपैकी एक महत्वाचे काम आहे .बाजारात रकमेची तरलता कायम ठेवून महागाईवर नियंत्रण करता येऊ शकते  यासाठी दर दोन महिन्यांनी रिझर्व बँक आपल्या पतविषयक , धोरणाचा आढावा घेऊन त्यात जरूर असल्यास बदल करते . यात सी आर आर ,एस एल आर , रेपो , रिव्हर्स रेपो ,कॉल रेट ,बँक रेट आणि प्राइम लेंडीग रेट यांचा सामावेश होतो . याचा संबध ठेवी आणि कर्ज यांच्या व्याजदरावर पडत असतो .हे सर्व नक्की काय आहे हे थोडक्यात समजून घेवूया .
    बँकिंग व्यवसायात लोकांच्या ठेवी ,बँकानी विविध मार्गाने जमा केलेले भांडवल , घेतलेली कर्जे ही खर्चाची बाजू तर दिलेली कर्जे, विविध गुंतवणूकीतून  मिळालेला फायदा ,विवीध सेवा पूरवल्याचा आकार ही उत्पन्नाची बाजू असते . यातील 85% रक्कम ही दिलेल्या कर्जावरील व्याज या स्वरूपात असते थोडक्यात भांडवल म्हणून घेतलेल्या पैशावरील दिलेले व्याज आणि दिलेल्या कर्जावर मिळवलेले व्याज यांतील फरक यातून         व्यवस्थापकीय  खर्च वगळून राहिलेली रक्कम ही त्या बँकेचा नफा /तोटा असतो .बँकेकडे जमा झालेले सर्व पैसे बँकेस कर्ज देण्याकरिता वापरता येत नाही .बँकेमधील बचत / चालू खात्यातिल रक्कम ही मागणीदेय स्वरूपातील जमा म्हणजे ग्राहकाने  मागणी केल्यास ताबडतोब देणे बंधनकारक असते यासाठी जमा रकमेचा  काही भाग बँका आपल्याकडे रोख स्वरूपात अथवा रिझर्व बँकेच्या नोटा वितरण विभागात (currency chests ) ठेवतात एकूण जमा रकमेच्या प्रमाणात ही रक्कम ठेवावी लागते यास सी आर आर (cash reserve retio)असे म्हणतात . यावर व्याज मिळत नाही .सध्या हा दर 4% आहे .सी आर  आर कमी झाल्यास कर्ज आणि गुंतवणूक यासाठी अधिक रक्कम उपलब्ध होते .बँकाना जमा रकमेचा काही भाग भविष्यातील संभाव्य देणी (मुदत ठेवींची पूर्तता) देण्यासाठी रोख रक्कम ,सोने , सरकारी कर्जरोख्यात गुतवावा लागतो त्यास एस एल आर (statutary liquidity ratio) असे म्हणतात यावर निश्चित असे उत्पन्न मिळते तसेच आकस्मिक प्रसंगी पैशाची उपलब्धता करण्यास तारण म्हणून याचा वापर करता येतो सध्या हे प्रमाण 20.5%आहे . हे प्रमाण वाढल्यास कर्ज देण्यासाठी कमी रक्कम तर कमी झाल्यास कर्ज वितरणासाठी अधिक रक्कम बँकाना उपलब्ध होते .
   याहून अधिक रकमेची गरज लागल्यास रिजर्व बँकेकडून अल्प मुदतीचे कर्ज घ्यावे लागते यावर व्याज द्यावे लागते यास रेपो रेट असे म्हणतात, सध्या रेपोरेट 6.25%आहे .हा दर कमी झाल्यास कर्जावरील आणि ठेवींवरील व्याजदर कमी होतो त्यामुळे कर्जाची मागणी वाढते तर रेपो रेट वाढल्यास कर्ज महाग झाल्याने मागणी कमी होते .याउलट काही वेळा रिझर्व बँकेस इतर बँकाकडून अल्प मुदतीचे कर्ज घ्यावे लागते आणि त्यावर व्याजही द्यावे लागते या व्याजदरास रिवर्स रेपो असे म्हणतात सध्या हा दर 6% आहे हा दर वाढल्यास बाजारातील कर्जाची उपलब्धता कमी होते कारण बँकाना व्यक्ति आणि उद्योग यांना कर्ज पुरवठा करण्यापेक्षा अतिरिक्त रक्कम रिझर्व बँकेस कर्जाऊ देणे अत्यल्प जोखमीचे आणि अधिक सोयीचे वाटते तर हा दर कमी झाल्यास बँका इतर पर्यायांची चाचपणी करण्याची शक्यता असते .
   बँकांमध्ये आपापसात जी अल्प मुदतीच्या कर्जाची देवाण घेवाण होते यावरील व्याजदरास कॉल रेट म्हणतात .हे दर मागणी आणि पुरवठा यानुसार सतत बदलत असतात .आणीबाणीचे प्रसंगी ग्राहकांचा विश्वास जागवण्याकरीता बँकाना आपली गुंतवणूक तात्पुरती तारण ठेवून रिझर्व बँकेकडून कर्ज घ्यावे लागते यावरील व्याजदर रेपो रेट पेक्षा अधिक असतो सध्या हा दर 6.5%आहे या सोइला मार्जीनल स्टेंडिंग फॅसीलीटी असे म्हणतात . जर असे कर्ज दीर्घ मुदतीसाठी घेतले गेले तर यावरील व्याजदरास बँक रेट असे म्हणतात हा रेट वाढवून अथवा कमी करून चलन नियंत्रण करणे रिझर्व बँकेने बंद केले आहे .प्रत्येक बँकेने गृहकर्ज आणि वाहनकर्ज सोडून आपल्या ग्राहकांना कर्ज देण्यासाठी किमान व्याजदर निश्चित केला असून यापेक्षा कमी दराने बँका कोणालाही कर्ज देत नाहीत हा दर प्रत्येक बँकेने स्वतंत्रपणे ठरवला असून सध्या तो 9.1ते 9.6%या दरम्यान आहे काही कर्जावरील व्याजदर हा यापेक्षाही अधिक आहे .या सर्वावर रिजर्व बँकेचे बारकाईने लक्ष असून जरूर पडल्यास यामधे हस्तक्षेप केला जातो .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

आपल्या मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी आपण त्या॑ना tag करा म्हणजे अनेकांपर्यत ही माहिती एकाच वेळी पोहोचेल.

Friday, 16 June 2017

पेमेंट बँक (Payment Banks)


     पेमेंट बँक (Payment Banks )

  पेमेंट बँक या मर्यादित बँकिंग व्यवहार करणाऱ्या छोट्या बँका असून त्या कोणतीही जोखिम स्वीकारत नाहीत .या बँका बहुतेक सर्व प्रकारचे बँकिंग व्यवहार करतात त्यांच्याकडे बचत /चालू खाते काढता येते .परंतू या बँका कर्ज देत नाहीत ,मुदत ठेवी स्वीकारत नाहीत .ग्राहकांना क्रेडिट कार्ड देऊ शकत नाहीत .1लाख रुपयांहून अधिक रकमेच्या मागणी ठेवी (Demand Diposite) स्वीकारू शकत नाहीत .बिलांची वसूली , देण्यांची पूर्तता , मोबाईलवरुन पैशाचे  व्यवहार , खरेदी विक्री , विविध सरकारी योजनांची प्रोत्साहन राशी ,आरोग्य शिक्षण गँस यावरील सरकारी सबसीडी थेट जमा करणे ,ए टी एम चे व्यवहार ,नेटबँकिंग ,थर्ड पार्टी फंड ट्रान्स्फर परकीय चलन व्यवहार या सारख्या सुविधा देतात .
   सप्टेंबर 2013 मधे डॉ नचीकेत मोर यांच्या अध्यक्षते खालील कमिटीने छोटे उद्योग आणि अल्प उत्पन्नधारक व्यक्तींच्या आर्थिक गरजा आणि अपेक्षा आढावा घेतला होतो .बँकिंग व्यवस्थेपासून देशातील 25 कोटी लोक वंचित असून ते आपले सर्व व्यवहार रोखीने करतात या लोकांना बँकिंग व्यवस्थेत आणणे आणि त्यांचाकडून तंत्रज्ञानाचे मदतीने रोख रक्कम न वापरता व्यवहार करण्यास प्रोत्साहित करणे हे मोठे आव्हान आहे .या कमिटीने आपला अहवाल रिझर्व बँकेस जानेवरी 2014 मधे सादर केला .यामधे अल्प उत्पन्न धारक आणि छोटे व्यवसायिक यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष बँका स्थापन करण्याची शिफारस केली होती .यास पेमेंट बँक असे म्हणावे असे सूचवले होते .
    या बँका कश्या असाव्यात यासंबंधीचा कच्चा मसुदा जुलै 2014 रोजी प्रसारीत करण्यात येवून नोव्हेंबर 2014 रोजी त्यास अंतिम रूप देण्यात आले .सर्वाना किमान बँकिंग सेवा देणे हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट असून त्यांचे प्रमुख ग्राहक स्थलांतरीत मजूर ,अल्प उत्पन्नधारक ,छोटे व्यापारी आणि असंघटित उद्योगात काम   करणाऱ्या  व्यक्ति असतील .या बँका इतर व्यापारी बँकेच्या प्रतिनिधी म्हणून काम करू शकतील .किमान भाग भांडवल 100 कोटी असेल यात पुरस्कर्त्याचा सहभाग 40%असेल आणि किमान एवढा भांडवली सहभाग पुढील पाच वर्ष असेल सध्या बँकिंग क्षेत्रास लागू असलेले परकीय भांडवलाची असलेली 76% मर्यादा या बँकांना पाळावी लागेल .यांचे पुरस्कर्ते व्यक्ति ,व्यवसायिक , एन बी एफ सी ,पी पी आई ,मोबाइल टेलिफोन कंपन्या ,सुपर मार्केट चेन ,कंपन्या असू शकतील किमान 5वर्ष व्यवसाय करण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे .बँका आपले सर्व बँकिंग व्यवहार तंत्रज्ञानाचे सहाय्याने ,कागदविरहित पद्धतीने संगणक किंवा मोबाईलवर करतील .यांच्यामार्फत व्यवहार करण्यासाठी ए टी एम ,अभिकर्ते , छोटे व्यापारी यासारख्या विविध मध्यस्तांची मदत घेता येईल .जमा रक्कमेच्या 75%रक्कम एक वर्षाच्या सरकारी रोख्यामध्ये तर 25%रक्कम व्यापारी बँकेत ठेवावी लागेल ठेवावी लागेल त्यावर मिळणारे व्याज आणि विविध सेवा मार्गाने मिळणारे कमीशन , म्यूचुअल फंड योजनांची विक्री , विमा योजनांची विक्री इ . मार्गाने मिळालेले उत्पन्न हे या बँकेच्या   उत्पन्नाचे साधन असेल . रोखीचे व्यवहार सोडून देवून सर्वाना ई कॉमर्सकडे या बँका घेवून जात आहेत .प्रायोगिक तत्वावर रिझर्व बँकेने बँकिंग नियम 1949 अनुसरून 11 पेमेंट बँकना 19 ऑगस्ट 2015 रोजी परवानगी दिली असून त्यानी 18 महिन्यात कंपनी ऍक्ट 2013 नुसार बँक सुरू करावी असे सूचवले होते .यातील 3 बँक चालू झाल्या आहेत लवकरच इतर बँक चालू होऊन मोठे आर्थिक परिवर्तन अपेक्षित आहे .पेमेंट बँक परवानगी खालील बँकाना मिळाली आहे :
1)Aditya Birla Nuvo
2)Airtel M Commerce Services
3)Cholamandalam Distribution services
4)Department of Posts
5)FINO PayTech
6)National Securities Depository
7)Reliance Industries
8)Sun Pharmaceutical
9)Paytm
10)Tech Mahindra
11)Vodafone M-Pesa
यातील 3,8,10 यानी परवाना परत केला असून बँक स्थापन करण्याचा विचार सोडून दिला आहे .तर 2,9,4 यांनी बँक व्यवसायास सुरुवात केली आहे .

©उदय पिंगळे


ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

आपल्या मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी आपण त्या॑ना tag करा म्हणजे अनेकांपर्यत ही माहिती एकाच वेळी पोहोचेल.


Friday, 9 June 2017

मसाला बॉन्ड

         मसाला बॉन्ड

    मसाला बॉन्ड हे परदेशात विक्री केलेले भारतीय रुपयातील कर्जरोखे आहेत .याचा मसाल्यांशी नावाशिवाय काहीही  संबध नाही .यामुळे कमी व्याजदरात भांडवल उभारणीसाठी भारतीय कंपन्यांना एक पर्याय उपलब्ध झाला असून यापूर्वी भारतातील पायाभूत  सुविधांच्या योजना मार्गी लावण्यासाठी 1000 कोटी रुपये एकूण दर्शनी मूल्य असलेल्या भारतीय रुपयातील कर्जरोख्यांची विक्री नोव्हेंबर 2014मध्ये आई एफ सी या जागतिक बँकेच्या गुंतवणूक विभागाकडून करण्यात आली . त्यांची नोंदणी लंडन शेअर बाजारात करण्यात आली .या रोख्यांची विक्री करतांना आई एफ सी ने त्यांना मसाला बॉन्ड असे नाव दिले ज्यातून  भारतीय संस्कृती किंवा भारतीय खाद्यपदार्थाचे वैशिठ्य प्रतिबिंबित होते .अशा प्रकारच्या बॉन्डची रचना कशी असावी ,ते कुणी वितरित करावेत त्याची कुठे आणि कशी नोंदणी व्हावी यावर बराच अभ्यास होऊन त्याची अंतिम नियमावली भारतीय रिजर्व बँकेने बनवली त्यानंतर अशाप्रकारच्या बॉन्डची विक्री परदेशात करण्याची परवानगी व्यापारी बँका आणि भारतीय कंपन्याना दिली .याप्रमाणे बँका आणि पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी असे कर्जरोखे विकून निधी उभारला आणि गरजेप्रमाणे वेळोवेळी निधी जमा करीत आहेत .आधीच्या नावाला भरपूर प्रसिद्धी मिळाल्याने  आता अशा पद्धतीच्या कर्जरोख्याना आता मसाला बॉन्ड हेच नाव कायम झाले आहे .
   रुपया हा इतर देशांच्या चलनात पूर्णत: परावर्तित झालेला नसल्याने जर एखाद्या कंपनीने परकीय चलनातील कर्जरोखे काढले तर भविष्यात त्यावरील व्याज आणि मूद्दल त्याच चलनात द्यावे लागत असल्याने या चलनाचे रुपयाच्या तुलनेतील मूल्य वाढले तर कर्ज घेणाऱ्या कंपनीवर वाढीव बोजा पडतो .जर भारतीय चलनातील कर्जरोखे काढले तर जरी त्या चलनाचे विनिमय मूल्य वाढले तर कबूल केलेल्या रुपयांएवढेच परकीय चलन द्यावे लागत असल्याने गुंतवणूक करणाऱ्याला कमी उतारा मिळतो. मसाला बॉन्ड मुळे भारतीय कंपन्यांना कमी खर्चात परकीय चलन मिळवण्याचा आणखी एक अधिकचा पर्याय उपलब्ध झाला आहे .ही गुंतवणूक अधिक आकर्षक व्हावी म्हणून अर्थमंत्रालयाने यावरील भांडवली कर रद्द केला असून व्याजावरिल कर 20%वरुन 5%पर्यत खाली आणला आहे .
   या बॉन्ड मुळे परदेशी गुंतवणुक भारतात आली असून या गुंतवणुकदारांचा भारतीय अर्थव्यवस्था चलनावरील विश्वास वाढला आहे .अलीकडे 11मे 2017रोजी  NHAl ने प्रथमच मसाला बॉन्ड विकून 3000 कोटी रुपये जमवले आहेत .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

आपल्या मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी आपण त्या॑ना tag करा म्हणजे अनेकांपर्यत ही माहिती एकाच वेळी पोहोचेल.

Friday, 2 June 2017

भारतीय रिजर्व बँक

   भारतीय रिझर्व बँक (Reserve bank of india )

  भारतीय रिजर्व बँक ही भारतातील सर्व बँकांची शिखर बँक असून तिची स्थापना हिल्टन अँड यंग कमिशनच्या शिफारशीनुसार आर बी आई ऍक्ट 1934नुसार झाली हा कायदा बनवताना डॉ आंबेडकर यांच्या The problem of indian rupee-its origin and its solution या पुस्तकाचा आधार धेण्यात आला . तीचे मुख्यालय 1937 मध्ये कोलकत्याहून मुंबई कायमचे स्थानांतरित करण्यात येऊन बँकेचे गवर्नर त्यांचे संचालक मंडळाचे मदतीने धोरणात्मक निर्णय येथून घेतात .जरी याच्या नावात बँक हा शब्द असला तरी आपण ज्याला बँक म्हणतो त्यापलिकडे जावून ही बँक कार्य करते .जवळपास सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या राजधानीमधे बँकेची विभागीय कार्यालये आहेत .स्वातंत्र मिळण्यापूर्वी ही एक खाजगी संस्था म्हणून काम करीत होती आणि सरकारकडे तिचे अत्यल्प भांडवल होते खाजगी धारकाना योग्य मोबदला देवून 1949 साली तिचे राष्ट्रीयकरण करण्यात आले .यानंतर जरी भारत सरकारकडे तिची मालकी आली असली तरी बँकेस तिच्या उदिष्टपूर्तीसाठी निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र आहे .
  देशाचा आर्थिक विकास होण्यासाठी लोकांचा रुपया या आपल्या देशाच्या चलनावरील विश्वास वाढावा ,आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या चलनाचे विनिमय मूल्य स्थिर रहावे ,महागाई नियंत्रणात रहावी यासाठी चलनाचा व्यवस्थित पुरवठा करणे म्हणजेच आपल्या अर्थव्यवस्थेस उपयोगी पडेल अशा तऱ्हेने बाजारात चलन उपलब्ध होईल याची व्यवस्था करणे . गरजेप्रमाणे नोटा छापणे आणि खराब  नोटा चलनातून बाद करणे. बँक आणि बँकेतर वित्तसंस्था यांची नोंदणी आणि कामगिरीवर नियंत्रण ठेवणे .पुरेसा कर्ज पुरवठा होईल यासाठी योग्य ते नियमन करणे विशेष वित्तसंस्थाची निर्मिती करणे ,तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करणे , नविन गुंतवणूक साधने सुचवणे ,नविन बँकाना परवाने देणे ,लोकांना अर्थसाक्षर करणे आणि देशाचा संतुलित आर्थिक विकास होण्यासाठी प्रयत्न करणे ही या बँकेची महत्वाची कामे आहेत .बँक Alliance for financial inclusion या गेट दांपत्यानी विकसित देशातील गरीब लोकांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेची प्रमुख सल्लागार आहे .
   बँकेचे संचालक मंडळात जास्तीत 21संचालक असून  1 गवर्नर जास्तीत जास्त 4 उपगवर्नर आणि मुंबई दिल्ली कोलकता चेन्नई याप्रत्येक विभागातून प्रत्येकी किमान 1 संचालक आणि इतर स्वतंत्र संचालक असतात . यांची नेमणूक जरी सरकार करीत असेल तरी त्यांची पात्रता आर बी आई अॅक्ट 1934 प्रमाणे असावी लागते हे सर्व लोक आर्थिक विषयातील तज्ञ असतात .त्यांना मदत करण्यासाठी प्रत्येक विभागात एक विभागीय मंडळ असून त्यात प्रत्येकी 5 सदस्य असतात .याद्वारे प्रादेशिक हित जपले जाते . संचालक आणि सदस्य यांची मुदत 4वर्षे असते .बँकेचे बोर्ड ऑफ़ फाइनान्शियल सूपरविजन नावाचे ते एक नियामक मंडळ असून ते सर्व बँका ,वित्तसंस्था ,बिगर बँकिंग वित्त संस्था यांचे नियमन व नियंत्रण करते .वेगवेगळ्या उपसमित्या त्यांना मदत करतात .यांच्या नियमित बैठका होऊन यामध्ये अर्थव्यवस्था सुधृढ होण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे यावर विचार केला जावून त्याची अमलबजावणी आणि पाठपुरावा केला जातो .
    बँक सध्या वित्तसंस्थावर देखरेख ,त्यांच्या आर्थिक स्थितिची पडताळणी ,नोंदणी ,बँकेतिल गैरव्यवहारासंबंधी कायदेशीर बाबी ,अनुत्पादक कर्जाचा प्रश्न ,बँका ,वित्तसंस्था ,बँकेतर वित्त कंपन्या यांचे स्वतंत्र मूल्यांकन या विषयांवर लक्ष केंद्रित केले असून त्याद्वारे सामाजिक हीत जपले जात आहे .

@उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

आपल्या मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी आपण त्या॑ना tag करा म्हणजे अनेकांपर्यत ही माहिती एकाच वेळी पोहोचेल.