Sunday, 14 May 2017

पी पी एफ (सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी) बचतीचा महामेरू

   पी पी एफ (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी)बचतीचा मेरुमणी


  सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही एक दीर्घ मुदतीची बचत योजना आहे.ज्या लोकांना व्यवसायिकांना भविष्य निर्वाह नीधीची सोय नाही त्यांनी बचत करून स्वतःचा निधी उभरावा याशिवाय इतरांनीही अधिकचा निधी या योजनेत भाग घेऊन जमा करावा आणि दीर्घ मुदतीसाठी सरकारला पैसा वापरण्यास द्यावा हा या योजनेमागील हेतू आहे.या योजनेचे खाते पोस्ट ,सरकारी बँक ,खाजगी बँक किंवा मान्यताप्राप्त सहकारी बँकेत कोणाही भारतीयास काढता येते.अज्ञानाचेवतीने त्याच्या पालकास किंवा कायदेशीर पालकांनाही खाते उघडता येते.एका व्यक्तीचे एकच खाते असू शकते व्यक्तिला त्याच्या जोडीदार व मुलांच्या खात्यात रक्कम भरता येते.हे खाते 16 आर्थिक वर्षांचे असून खाते चालू ठेवण्यासाठी दरवर्षी किमान पाचशे रूपये भरावे लागतात.व्यक्तिस तो आणि त्याचा जोडीदार व मुले यांचे नावावर एका आर्थिक वर्षात एक लाख पन्नास हजार रुपये यापेक्षा जास्त रक्कम भरता येत नाही.जमा रकमेवर 80/सी ची सवलत मिळते.दर महिन्याच्या पाच तारखेला खात्यात शिल्लक असलेल्या रकमेवर दरवर्षी व्याज दिले जाते.व्याजदर दर तीन महिन्यांनी सरकार कडून निश्चित केले जातात.सध्या (01/07/2017 पासून )  हा व्याजदर दर साल 7.8%आहे. या योजनेवर मिळणारे व्याज पूर्णपणे करमुक्त आहे.जरी ही योजना दीर्घकालीन असली तरी योजनेच्या चवथ्या वर्षापासून सहाव्या वर्षापर्यंत आवश्यकता असल्यास काही रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते.सातव्या वर्षी त्यामागील चार वर्षे म्हणजे तिसऱ्या वर्षीची शिल्लक अथवा आधीच्या वर्षांच्या शिल्लक रकमेच्या 50%यांतील कमी असलेली रक्कम दरवर्षी एकदा काढता येते.ही रक्कम परत करण्याची गरज नसते.खाते पूर्ण झाल्यावर पाहिजे असल्यास सर्व रक्कम काढता येते अथवा 60%रक्कम काढून घेवून पाच वर्षानी खात्याची मुदत आणखी पाच वर्षे अशी कितीही वेळा वाढवता येते खात्याची मुदत वाढवली की दरवर्षी यात रक्कम भरायची किंवा नाही असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
   जरी हे खाते पोस्ट अथवा बँकेत काढता येत असले तरी ते बँकेत उघडणे ग्राहकांच्या दृष्टीने अधिक सोईस्कर आहे.तेथे हे खाते आपल्या बचत खात्याशी जोडता येते.दरमहा बचत खात्यातून पैसे परस्पर या खात्यात जमा करण्याची सूचना देण्यात येते.80/सी ची सवलत असणाऱ्या या योजनेच्या 16 वर्षे तुलनेत ही सवलत उपलब्ध असणारी5 वर्षे मुदतीची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे किंवा 5 वर्षे मुदतीच्या करबचत जमा योजना यावर एवढेच व्याज मिळाले तरी ते करपात्र असल्याने त्याचा खरखूरा उतारा कमी होतो.
म्युचुअल फंडाची ई एल एस एस योजनेचा कालावधी 3वर्षे आहे.चांगल्या योजनेत 10ते 20% उतारा मिळत आहे परंतू त्यात गुतवलेल्या रकमेत  किती वाढ होईल व किती उतारा त्यावर हमखास मिळेल याची कोणतीही हमी नाही.या तुलनेत दीर्घ काळात आपल्यासाठी भांडवल उभारणी करणारी करमुक्त परतावा देणारी आणि जोखिम नसणारी ही योजना बचतीचा महामेरूच म्हणता येईल.

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

No comments:

Post a Comment