Friday, 22 December 2017

              #कॉफी_कॅन_पोर्टफोलिओ
   भांडवलबाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे त्यांच्या गुंतवणूक करण्याच्या पध्दतीवरून पडणारे पाच प्रमुख प्रकार आपण या पूर्वीच्या पाहिले आहेत . यातील दीर्घ मुदतीने गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार या प्रकाराच्या गुंतवणूकीशी मिळतेजुळते कॉफी कॅन पोर्टफोलिओ हे एक तंत्र आहे .
   1984 साली रॉबर्ट किर्बी  या पोर्टफोलिओ मॅनेजरने  गुंतवणूकीच्या या पध्दतीला हे नाव सूचवले .19 व्या शतकाच्या सुरुवातीला ओल्ड वेस्ट या भागातील लोक आपल्याकडील मौल्यवान गोष्टी जसे पैसे ,  सोन्याचे दागिने या सारख्या गोष्टी कॉफीचे टीन मधे ठेवून गादीत दडवून ठेवत असत .10/15 वर्षांनी अगदीच गरज पडली तरच त्याचा उपयोग करत . रॉबर्ट किर्बी याने याच तंत्राचा वापर करून असे सुचवले की काही चांगले शेअर्स शोधून ,एक डायव्हर्सीफाईड पोर्टफोलिओ तयार करावा . त्यातील भावामधे होणारी चढ उतार याकडे  लक्ष देवू नये .त्याचे पुनर्मुल्यांकन करु नये आणि ते किमान दहा वर्ष तरी विकले नाहीत तर त्यात खूप मोठी मूल्यवृद्धी होवू शकते . अनेक गुंतवणूकदार आपल्या गुंतवणूकीसाठी ही पद्धत सध्या वापरत आहेत .
   या तंत्राने गुंतवणूक करण्याचे प्रमुख फायदे असे -
१. ही एक दीर्घ काळासाठीची गुंतवणूक प्रक्रिया असल्याने एखाद्या तिमाहीत अपेक्षित नसलेली कामगिरी , सरकारी धोरणातील बदल या सर्वांचा गुंतवणूकदारावर परिणाम होत नाही .सी सी पी (coffee can portfolio) तंत्राने गुंतवणूक करणाऱ्यावर अशा अल्पकालीन बदलामुळे बाजारभावातील फरकामुळे आपल्या उद्देशापासून फारकत घेतली जात नाही .
२. या पद्धातीत इंडेक्सच्या परताव्याहून अधिक परतावा मिळण्याची जास्त शक्यता : इंडेक्सने दीर्घकाळात चांगला परतावा दिल्याने त्यामधे अथवा त्याच प्रमाणात शेअरमध्ये  गुंतवणूक करणे हा एक फायदेशिर सौदा ठरू शकतो .परंतू इंडेक्स एक अनेक शेअरचे मिश्रण असून त्यातील सर्वच शेअर एकाच वेळी वाढ दर्शवित नाहीत .त्यामूळे त्यात होणारी वाढ ही त्यातील सर्व शेअरची सरासरी असते . कॉफी कॅन पोर्टफोलिओ मध्ये भविष्यात फक्त वाढच अपेक्षित असलेल्याच शेअरचा सामावेश असलेले शेअर असल्याने यात इंडेक्सहून अधिक परतावा मिळू शकतो .
३.कमीत कमी आस्थापन खर्च : यामधे शेअरची सातत्याने खरेदी / विक्री होत नसल्याने एकंदर उलाढालीचे प्रमाण खूप कमी असते , त्यामुळे यावर होणारा ब्रोकरेज आणि इतर खर्च बऱ्याच प्रमाणात वाचतो .
  या पद्धतीने आपला गुंतवणूक संच (portfolio) बनवणाऱ्या व्यक्ति आणि संस्था शेअरची निवड करताना खालील गोष्टी प्रामुख्याने विचारात घेतात .
१.गुंतवणूकीचे विविध निकष वापरून शोधलेली अशीच कंपनी असेल की जीने कंपनीचे प्रवर्तक आणि भागधारक यांच्या मालमत्तेत गेल्या दहा वर्षात कित्येक पटीने वाढ केली आहे .दरवर्षी उलाढाल किमान 10% वाढली आहे .
२.यात गुंतवलेल्या भागभांडवलावर मागील दहा वर्षी प्रत्येक वर्षी किमान 15 % चक्रवाढव्याजदराने उतारा मिळवला आहे .(Return on capital employed) ज्या कंपन्याचा 5हून अधिक आणि 10 वर्षाचा फायनांशियल डाटा उपलब्ध आहे तो विचारात घेतला जातो .5 किंवा त्यापेक्षा कमी वर्षांची माहिती असलेल्या कंपन्याचा अजिबात विचार केला जात नाही .
   बाजारात आपल्याला शेअरचा भाव (Price ) समजतो पण त्याचे आंतरिक मूल्य (हे शोधून काढायचे असते .वॉरेन बफे यांच्या ' चांगले शेअर घ्यावे आणि विसरुन जावे '  याच साध्या तंत्राची ही सुधारीत आवृत्ती असून अनेक गुंतवणूकदार , गुंतवणूक तज्ञ , ब्रोकर , गुंतवणूक संस्था या पद्धतीचा वापर करीत असून ते त्यांनी शोधलेले शेअर्स जाहीरही करीत आहेत .एक मार्गदर्शक दिशा म्हणून याचा अभ्यास करून आपलाही एक चांगला कॉफी कॅन पोर्टफोलिओ बनवून अधिक लाभ मिळवू शकतो .सी सी पी तंत्राचे प्रमुख निकष पूर्ण करणाऱ्या कंपन्याची नावे खालील चित्रात दिली आहेत ती अभ्यासासाठी असून त्यांची शिफारस केलेली नाही . आपल्या गुंतवणूक  सल्लागाराकडून सल्ला आणि जोखिम समजून घेवून गुंतवणूक निर्णय घ्यावा .अशाच प्रकारचे निकष वापरून चांगली कामगिरी अपेक्षित असलेले शेअर्स , इक्विटी म्यूचुअल फंडाच्या योजना ,इंडेक्स फंड शोधता येवू शकतील .

©उदय पिंगळे



Friday, 8 December 2017

आर्थिकबाबींतील या चूका टाळा ....

                            आर्थिकबाबींतील या चूका टाळा .....
    मी सहावीत असताना हिंदीच्या क्रमीक पुस्तकात     ' शेखचेल्ली ' चा धडा होता .तो झाडाच्या ज्या फांदीवर बसला होता तीच तोडत होता .पैशाचे महत्व आपल्याला माहीत आहेच यावर वेगळे सांगण्याची गरज नाही .तरीही आपण या शेखचेल्लीसारखे वागून आपल्याच विनाशास कारणीभूत ठरत आहोत . आर्थिकबाबिंतील खालील त्रुटी आपण नक्कीच टाळू शकतो .
१ बचत आणि गुंतवणूक :अनेकजण या दोन्हीची गल्लत करून आपण केलेल्या बचतीलाच गुंतवणुक असे समजतात .या दोन्हीही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या असून गुंतवणुकीत जाणीवपूर्वक धोका (Calculated Risk) स्वीकारावा लागतो .याच लेखात दिलेल्या पेज /ब्लॉग  चे लिंकवर जावून मी पोस्ट केलेला ' बचत आणि गुंतवणूक'  यावरील लेख वाचावा .
२ इन्शुरेन्स ही गुंतवणूक नाही :इन्शुरेन्स आणि गुंतवणूक ह्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत .इन्शुरेन्स मधून कठीण प्रसंगी सुरक्षिततेची तरतूद पर्याय म्हणून पैशांच्या स्वरूपात करायची असते तर गुंतवणुकीतून  महागाईवर मात करणारा आकर्षक परतावा मिळवायचा असतो .या दोन्हीही गोष्टी एकदम पूर्ण होवू शकत नाहीत .तेव्हा वेगळे असे सुरक्षा कवच घेवून अन्य गुंतवणूक पर्यायांचा विचार करावा . दोन्हीही गोष्टी एकत्रित असणाऱ्या योजनातून आपली पूर्ण गरज भागू शकत नसल्याने अशा योजना घेवू नयेत .
३ बचत आणि गुंतवणूक करण्यात उशीर करणे : अनेकजण खर्च करायला एका पायावर तयार असतात मांत्र गुंतवणूक करण्यासाठी ते टाळाटाळ करतात .गुंतवणूकीची सुरूवात लवकरात लवकर करणे केव्हाही चांगलेच .त्यामुळे आपली गुंतवणूक चक्राकारगतीने वाढते .गुंतवणूकीचे विविध पर्याय आजमावून घेता येतात .उशीरा सुरूवात केलेली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करायला लागल्याने फारसे पर्याय आजमावता येत नाहीत .
४ कर्ज घेवून चैन करणे : सहज उपलब्ध होणारे व्यक्तिगत कर्ज आणि क्रेडिट कार्ड यांमुळे अनावश्यक गोष्टी या आपल्या गरजा कधी बनतात ते समजत नाही .इतर कोणत्याही मार्गाने उपलब्ध असलेल्या कर्जापेक्षा यावरील व्याजदर सर्वाधिक असतो त्यामुळे आपण कर्जाच्या सापळ्यात कधी अडकतो  ते समजत नाही .
५ कर्ज फेडण्याऐवजी गुंतवणूक करणे : एकाचवेळी कर्ज फेडणे आणि गुंतवणूक करणे ही मोठीच तारेवरची कसरत आहे .आपल्याकडे अतिरिक्त रक्कम आली तर कर्ज फेडणे आणि गुंतवणूक करणे यातील पर्यायांचा बारकाईने विचार करावा लागतो . दीर्घ मुदतीच्या कर्जाची अंशतः परतफेड करणे भवितव्याच्या दृष्टीने अनेकदा खूप फायद्याचे ठरते .
६ महत्वपूर्ण माहितीकडे कानाडोळा करणे : अनेकदा  गुंतवणूक करताना आणि कर्ज घेतांना एक करार केला जातो .यात सर्व अटी आणि जोखिम याची माहिती असते .या अटी काय आहेत आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होवू शकतो याची जाणीव आपल्याला असणे जरूरी आहे .यामुळे स्वतंत्र  निर्णय घेता येणे सोपे जाते .केवळ एजंट सांगतो त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवू नये .
७ गुंतवणूक व कर्ज यांचे कागदपत्र नीट न पहाणे आणि  ठेवणे : आपण केलेली गुंतवणूक आणि  घेतलेली कर्ज या संबंधी सर्व कागदपत्र तपासून घेणे महत्वाचे आहे .आपण मान्य केलेल्या अटीप्रमाणे ते आहे की नाही हे पहावे आणि त्याप्रमाणे नसल्यास लगेच निदर्शनास आणून द्यावे .ही सर्व कागदपत्र व्यवस्थित नोंद करून सुरक्षित ठिकाणी ठेवावेत . गुंतवणूकीवरील वारसनोंदी बरोबर आहेत का हे कटाक्षाने पहावे .
८ अंदाजपत्र बिघडणे : आपल्या कुवतीपेक्षा खर्च जास्त होवू नये याची काळजी घ्यावी . ' अंथरुण पाहून पाय पसरावे ' असे म्हटले जाते अगदी तसेच नाही तरी अंथरुण पुरत नसेल तर ते मोठे कसे करता येईल त्याकडे आपले लक्ष असले पाहिजे .ज्यायोगे आपल्या अल्प आणि दीर्घकालीन गरजांची पूर्तता आपल्या उत्पन्नातून करता येणे गरजेचे आहे .
   या सर्व गोष्टी आपल्याला माहीत नाहीत असे नाही तरीही आपले पाऊल डगमगू शकते म्हणून परत  एकदा ही उजळणी .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 1 December 2017

संभाव्य आर्थिक संकटे

#संभाव्य_आर्थिक_संकटे

   अचानक येतात ती संकटे , त्यांच्याशी सामना करण्यास आपण कमी पडलो तर आपले नुकसान होते .संपूर्ण आर्थिक घडी विस्कळते. काहीजण या साठी सज्ज असतात पण बरेच लोक गाफिल असतात .व्यवसाय अथवा नोकरी करीत असताना टर्म इन्शुरेन्स , आक्सिडेंट इन्शुरेन्स आणि मेडिक्लेम असला पाहिजे या संबंधी बऱ्यापैकी प्रसार आणि प्रचार होत असला तरी यास प्राधान्य देणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे .काही सरकारी आणि खाजगी उपक्रमानी यांसंबंधी विचार करून त्यांच्या कर्मचाऱ्याना काही विशेष सोई उपलब्ध करूनf दिल्या आहेत .काही ठिकाणी या संबंधी सक्ती असून काही ठिकाणी या सोई घेणे न घेणे ऐच्छिक आहे . काही ठिकाणी अशा योजनांचा खर्च व्यवस्थापन करते तर काही ठिकाणी या सेवासाठी पूर्ण अथवा अल्प रक्कम कर्मचाऱ्यास खर्च करावी लागते .
    आपली आर्थिक घडी बिघडवून टाकणारी काही संभाव्य संकटे अशी --
१  नोकरी सुटणे / धंद्यातील नुकसान : सध्या सरकारी नोकऱ्या सोडल्यास शाश्वत अशा कोणत्याच नोकऱ्या नाहीत .काही कारणाने नोकरी सुटल्यास किंवा धंद्यामधे मंदी आल्यास अल्पकाळासाठी येणारे  पैसे बंद होतात .असे असले तरी काही किमान खर्च जसे लाईट बिल , शैक्षणिक खर्च , किराणा माल , कर्जाचे हप्ते यांची व्यवस्था करावी लागते .या संबधित आपल्या किमान गरजा यांचा अंदाज घेवून 3 ते 6 महिन्याच्या खर्चाएवढी रक्कम अतिरिक्त व्याजाचा मोह न बाळगता एफ डी किंवा मनी मार्केट फंडात असायला हवा जेणेकरून अल्पकाळात हे पैसे उपयोगी येतील .हे पैसे फक्त याच कारणासाठी वापरले जातील या साठी कायम वेगळे ठेवावेत .
२  नैसर्गिक आपत्ती /युद्ध , दंगल , जाळपोळ याने होवू शकणारे नुकसान :या मुळे अचानक मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागते .या पासून काही प्रमाणात संरक्षण होण्यासाठी किमान प्रिमियममधे थर्ड पार्टी इन्शुरेन्स उपलब्ध आहे .
३ जोदीदाराचा मृत्यू : जोडीदाराचा त्यातही कमावत्या व्यक्तीचा मृत्यू हा त्या कुटुंबावर मोठा आघात असतो याची भरपाई कितीही पैशानी होवू शकत नाही आणि पैशावाचून प्रत्येक ठिकाणी अडचणी येतात .हे कटू असेल तरी सत्य असल्याने आपली दीर्घकालीन गरज ओळखून उत्पन्नच्या 20 पट रकमेचा टर्म इन्शुरेन्स काढणे आणि तो वेळोवेळी वाढणाऱ्या उत्पन्नाच्या प्रमाणात वाढवणे गरजेचे आहे .
४ आजारपण / गंभीर आजार : घरातील व्यक्तीचे आजारपण किंवा असाध्य आजार याच्या उपचारांसाठी आपली सर्व पूंजी संपू शकते .किमान 5 लाख रु आरोग्यविमा असावा आणि तो वेळोवेळी वाढावावा .असाध्य रोगांच्यासाठी उपलब्ध विशेष पॉलिसी ज्यांना शक्य असेल त्यांनी घ्यावी .
५ शैक्षणिक खर्च :शैक्षणिक खर्चात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे .एकेकाळी ज्या खर्चात उच्चशिक्षण पूर्ण होत होते त्याहून जास्त पैसे मुलांना प्राथमिक शिक्षण घेण्यास लागतात .वाढत्या शैक्षणिक खर्चासाठी लवलरात लवकरात लवलर ईक्विटी म्यूचुअल फंडाच्या योजनेत एस आई पी  चालू करावे .
६ निवृत्तीनंतरची तरतूद : वाढती आयुर्मर्यादा आणि महागाई यासाठी निवृत्तीनंतरची 25 वर्ष विचारात घेवून ईक्विटी म्यूचुअल योजनेत दीर्घकाळाचे एस आई पी  चालू करावे .
७ मित्र / नातेवाईकांना मदत : आपल्या अडीअडचणीस आपल्याला मदत करावी अशी अपेक्षा आपण मित्र व नातेवाईक यांच्याकडून बाळगत असतो तशीच अपेक्षा तेही आपल्याकडून करीत असणारच .आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून आपण कोणाला फारशी मदत करु शकत नाही तसेच काहींना टाळूही शकत नाही .यासाठी वेळीच काहीतरी किमान तरतूद करून ठेवणे गरजेचे आहे .
    ही यादी परिपूर्ण नाही तरीही सहज लक्षात आलेल्या या गोष्टी विचारात ठेवून त्या अनुषंगाने तरतूद करण्याचा प्रयत्न केल्यास अशी संकटे आलीच तर त्याची अंशतः आर्थिक भरपाई होवू शकते आणि आपला अर्थप्रवाह स्थिर राहण्यास मदत होते .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

Friday, 24 November 2017

' भारताच्या आंतरराष्ट्रीय मानांकनात मूडीजकडून वाढ '

' भारताच्या आंतरराष्ट्रीय मानांकनात मुडीजकडून वाढ '
  मूडीज ही आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था (Rating agency)असून 1909 पासून ती विविध देशांना ग्रेड  देते .या ग्रेड Aaa , Aa , A , Baa , Ba , B , Caa , Ca आणि C या नऊ विभाग असून 1,2,3 असे उपविभाग आहेत .ते उतरत्या क्रमाने आहेत .दिलेल्या कर्जाची परतफेड न केल्यास कीती प्रमाणात जोखिम आहे ते या ग्रेड ने दाखवले जाते .Aaa ही सर्वात सुरक्षित ग्रेड असून C ही सर्वात धोकादायक ग्रेड आहे .अशा प्रकारे ग्रेड दिल्यावर बाजारात त्यादेशाची प्रतिमा एक निर्माण होते  .या संस्थेचे संस्थापक जॉन मूडी यांनी मूडी कोर्पोरेशनची  मूडीज इन्वेस्टर्स ही  कंपनी असून ती क्रेडिट रेटिंग आणि आर्थिक बाबतीत संशोधन करते .
   रेटिंग ठरवताना देशावरील कर्ज व ते फेडण्याची क्षमता यांचा विचार केला जातो .याची निश्चित अशी पद्धती नसून ही एजंसी 100 हून अधिक अर्थशास्त्रज्ञ आणि विश्लेषक यांच्याशी विचारविनिमय करून त्या देशाचे रेटिंग ठरवते .या वरून त्या देशातील अर्थव्यवस्था कशी आहे .आखलेली धोरणे परकीय गुंतवणुकदाराना अनुकूल आहेत की नाहीत , आयात निर्यात यांचे प्रमाण , राजकीय स्थिती यांचा अंदाज बांधण्यास मदत होते .अशा प्रकारे मूल्यांकन करणे हा त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे .Dun and bandstreet या कंपनीने moodys चा ताबा 1962 ला मिळवून या कंपनीच्या शेअर्सची  न्यूयार्क शेअर  बाजारात 2000 साली मूडीज कॉरपोरेशन या पूर्विच्याच नावाने सार्वजनिक कंपनी म्हणून भागविक्री केली .2007 साली मूडीज इन्वेस्टर्स सर्विस आणि मूडीज अॅनालेटिकल सर्व्हिस अशा दोन कंपन्यांत व्यवसाय विभागणी झाली .यातील रेटिंग व्यवसाय मूडीज इन्वेस्टर्सकडे आणि इतर व्यवसाय मूडीज अॅनालेटिकल सर्व्हिसेस कडे विभागला गेला . जागतिक बॉन्ड व्यवसाय हा  मूडीज , फिच आणि स्टँडर्ड अँन्ड पुअर  या तीन मोठ्या रेटिंग एजन्सीकडे एकवटला असून त्यांच्या रेटिंगचा परकीय गुंतवणूकदार गुंतवणूक करताना विचार करतात .
   मुडीजने 14 वर्षाचे नंतर भारतीय बॉन्डचे रेटिंग Baa3 होते ते Baa2 वर आणले आहे .याचा अर्थ सुधारणा झाली आहे .या मधून आपली गुंतवणूक कीती सुरक्षित आहे याचा अंदाज बांधता येतो .सर्व प्रकारची सरकारी कर्जे , म्युनसीपल बॉन्ड , कॉरपोरेट बॉन्ड , मनी मार्केट फंड , बँका , नॉन बँकिंग कंपन्या , दीर्घ मुदतीची कर्जे या सर्वांचा विचार केला जातो .या तिन्ही मान्यवर संस्थांची रेटिंग देण्याची पध्दत निरनिराळी आहे .यांपैकी मूडीज आपले शोध निबंध (research reports) , वेळोवेळी एखाद्या देशाविषयी प्रदर्शित केलेले मत , बाजारात नविन कर्ज घेवून येणाऱ्याना मार्गदर्शन अशा विविध मार्गाने गुंतवणूकदाराना मोलाचा सल्ला देत आहे .
   मानांकनात Baa3 वरून Baa2 अशी सुधारणा झाली याचा अर्थ यापूर्वी ज्या आर्थिक सुधारणा आपण अमलात आणल्या त्या योग्य असून त्याचे  सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत .यामधे नोटाबंदी , जी एस टी ची अमलबजावणी ,स्टेट बँक सहयोगी बँकांचे विलिनीकरण , रेरा कायदा , भ्रष्टाचार विरोधी कायदा , यू आई  एन  , यू डी ए वाई पॉवर बॉन्ड या गोष्टीचा विचार केला असावा .जागतिक बँकेने या सुधारणांची प्रसंशा केली आहे आणि व्यवहारास योग्य देशांच्या यादीतील भारताचे स्थान 130 वरून 100 व्या क्रमांकावर आणले आहे . आयात निर्यात यातील फरक (balance of payments) आणि चालू खात्यावरिल तूट (fiscal deficits) या गोष्टी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि जागतिक बँक यांच्या  दृष्टीने चिंतेची बाब राहिली असली तरी ती एका विशिष्ठ मर्यादेत राहील यासाठी सरकारचा प्रयत्न आहे .वित्तीय तूट 3% या मर्यादेत ठेवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे . रेटिंग वरील आक्षेपाबाबत मूडीजने तपशीलवार खुलासा करणारे (FAQ) पत्रक प्रसिद्ध केले असून 2017/18 च्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात 7.5% राहील असा अंदाज व्यक्त केला आहे . यांमुळे परकीय गुंतवणूकदार पेन्शन फंड याची भारतीय बाजारातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता असून भांडवलबाजारावर याचा सकारात्मक परिणाम दिसत असून बाजार रोज नविन  उच्चांक करीत आहे .

©उदय पिंगळे

Friday, 17 November 2017

कंपन्यांचे वर्गिकरण ...

                                         कंपन्यांचे वर्गिकरण

   शेअरबाजारात नोंदवण्यात आलेल्या कंपन्याचे बाजारमूल्य (Market Capital) आणि त्यातील शेअर्सची दैनंदिन उलाढाल (Daily Trading Volume) यावरून सध्या कंपन्यांची विभागणी तीन प्रमुख गटात करण्यात आली आहे .१.मोठ्या कंपन्या (Largecap) २.मध्यम कंपन्या (Midcap)आणि ३.लहान कंपन्या (Small can).स्टॉक एक्सचेंजची गव्हर्नीग कमिटी ठराविक कालावधी नंतर प्रत्येक कंपनीचे सरासरी बाजारमूल्य आणि सरासरी दैनंदिन उलाढाल यांचा विचार करून वरीलपैकी कोणत्या गटात कोणती कंपनी असावी या संबंधात निर्णय घेत असते . अलीकडे या पद्धतीत सेबीने बदल सुचवला असून तो पुढील वर्षात अमलात येईल .त्यानुसार आता बाजारमूल्यानूसार पहिल्या 100 कंपन्या या मोठ्या 101 ते 250 पर्यंत मध्यम आणि बाकी सर्व लहान कंपन्या  समजण्यात येतील .असे करीत असताना कंपन्यांची दैनंदिन उलाढाल विचारात घेतली जाणार नाही .
    मोठ्या कंपन्यामधे केलेली गुंतवणूक तुलनेने सुरक्षित असल्याने सर्व गुंतवणूकदारांची पहिली पसंती त्यांना असते .या कंपन्या सुरक्षित असून यांचे भाव अचानक मोठ्या प्रमाणात वाढत नाही किंवा कमी होत नाहीत . कंपनीची उलाढाल , नफा , डीवीडेंड , बोनस यावरून त्यात फरक पडतो . साधारण 20% वेगाने त्या वाढत असतात अथवा कमीही  होतात .मांत्र मोठ्या प्रमाणात  अशा कंपनीत गुंतवणूक केली म्हणजे 100%  सुरक्षित झाली असे समजू नये  .
    या कंपन्यांच्या तुलनेत मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरचे बाजार भावात लार्ज कॅप कंपन्यांच्या तुलनेत भावातील फरकात कमी अधिक असा  लक्षणीय फरक पडत असल्याने मोठया प्रमाणात अनेक गुंतवणूकदार त्यांच्याकडे आकर्षित होतात .या कंपन्यांचे भाव तेजी असल्यास हळु हळु वाढातात तर मंदी आल्यास झटकन कमी होवू शकतात . त्याचप्रमाणे बिजनेस मॉडेल बदलणे ,व्यवस्थापन मंडळ बदलणे , नादारी ई अनेक कारणांनी त्यात फरक पडून भाव मोठ्या प्रमाणात कमी जास्त होवू शकतात .आज ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या याआधी मिड कॅप /स्मॉल कॅप होत्या .त्यामूळे आपण कोणत्या प्रकारचे  गुंतवणूकदार असून कीती जोखिम स्वीकारू शकतो  त्याचा , आपला बाजारविषयक अंदाज कीती प्रमाणात अचूक घेवू शकतो याचा विचार करून मगच यामधे  गुंतवणूक करावी . सर्व गुंतवणूक एकाच प्रकारच्या कंपन्यांच्यामधे न करता ती विविध ठिकाणी  विभागून करावी .जर आपण जास्त जोखिम घेवु शकत असलो तर मिडकॅप / स्मॉलकॅप कंपन्यांतील गुंतवणुक वाढवावी.बरेच वर्ष पूर्ण बहुमतातील सरकार नसल्याने 2014 मधील सार्वजनिक निवडणुकानंतर स्थिर सरकार आल्याने झालेल्या सकारात्मक भावनेने मिड कॅप /स्मॉल कॅपचे भावात अल्प कालावधीत 2/3 पट वाढ झाली .त्यानी चार महिन्यांचे कालावधीत 100 ते 300% हून अधिक रिटर्न दिला .तेव्हा अशा वेळी आलेल्या संधीचा लाभ करून घेण्याची वेळ साधणे हे ही गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे .
    याशिवाय मुंबई शेअरबाजाराने बाजारमूल्य व दैनंदिन उलाढाल यांचा विचार करून तेथे नोंदवण्यात आलेल्या कंपन्याची 'A ' , ' B ' आणि ' Z ' या तीन गटात विभागणी केली आहे .पहिल्या दोनशे कंपन्या  ' A ' या गटात असून , बाजाराच्या नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्या ' Z ' गटात टाकल्या आहेत . उर्वरित सर्व कंपन्या ' B ' गटात आहेत . गुंतवणूक या दृष्टीने 'Z ' गटातील कंपन्यांचा अजिबात विचार करु नये .
   मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार यांनी ' T ' या नावाचा एक गट बनवला असून यामधील व्यवहार हे डिलिव्हरी घेवूनच करावे लागतात .त्याचे शॉर्ट सेलिंग करता येत नाही .खरेदी केलेले शेअर  आपल्या डी मॅट खात्यात आल्याशिवाय विकता येत नाहीत .' Z '  गटातील कंपन्यांचे व्यवहार सक्तीने ट्रेड टू ट्रेड पद्धतीनेच होतात .याशिवाय BSC , NSC आणि सेबी आपापसात चर्चा करून कोणत्याही कंपनीचा सामावेश या गटात करु शकतात अथवा या गटातून बाहेर आणू शकतात . या गटात असलेली कंपनी मग ती यापूर्वी कोणत्याही गटात असली तरी त्याचे व्यवहार हे ट्रेड टू ट्रेड या पद्धतीनेच करावे लागतात . सामान्य गुंतवणूकदाराच्या सुरक्षिततेसाठी ही योजना करण्यात आली आहे .

©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 10 November 2017

ब्रोकरची निवड करतांना ......

                            ब्रोकरची निवड करतांना .....
  बाजारात समभाग , कर्जरोखे , ई टी एफ , वस्तुबाजारातिल वस्तु यांची सुलभ खरेदी विक्री करण्यासाठी कोणीतरी मध्यस्थाची जरूरी असते .यामुळे व्यवहार  जलद होण्यास मदत होते . या शिवाय या व्यवहारांची हमी बाजार घेत  असल्याने असे व्यवहार सुरळीतपणे पार पडतील याची जाणीव असल्याने खरेदीदार आणि विक्रेते हे दोघेही निश्चिंत रहातात . काही मोजके व्यवहार वगळता बाजारात दलालाशिवाय  असे व्यवहार करणे हे बेकायदेशीर आहे .
  हे सर्व व्यवहार ऑनलाइन होत असल्याने ते पुरेसे पारदर्शक आहेत .सध्या ब्रोकिंग व्यवसायात वैयक्तिक  ब्रोकरशिवाय बँका , नॉन बँकिंग कंपन्या असून त्यांच्यात अधिकाधिक व्यवसाय मिळवण्याची  स्पर्धाआहे .त्यामुळे जास्तीत जास्त ब्रोकरेज 2.5% पर्यत घेण्याची परवानगी असताना सर्वसाधारण ब्रोकरेज 0.25%ते 1% चे आसपास आहे .सध्या ब्रोकरमधे त्यांच्या कार्यपद्धतीवरून मुख्य असे दोन प्रकार आहेत
                  १.फुल सर्विस ब्रोकर
                  २.डिसकाउंट ब्रोकर
१.फुल सर्विस ब्रोकर :अनेक व्यक्ति , बँका , नॉन बँकिंग कंपन्या या ही सेवा पुरवीत असून त्यांचे सब ब्रोकर किंवा फ्रेन्चायसीचे माध्यमातून स्टॉक कमोडिटी करन्सी मधील सेवा पारंपरिक पद्धतीने गुंतवणुकदाराना देत आहेत  .सर्वसाधारणपणे 3 in 1म्हणजे सेव्हींग ,डी मॅट आणि ट्रेडिंग असे एकत्रित खाते यांचेकडे उघडावे लागते .ब्रोकरेज 1%हून कमी असून काही ठिकाणी किमान ब्रोकरेज म्हणून विशिष्ट रक्कम द्यावी लागते .हे दर एकंदर उलाढालिचे प्रमाणात बदलू शकतात .फोन करून ऑर्डर नोदवणे त्यात बदल करणे रद्द करणे शक्य असून या गोष्टी त्यांनी दिलेल्या पासवर्डचा वापर करून गुंतवणुकदारास संगणक अथवा मोबाईलवरून करता येतात .आपल्या होल्डिंगचे काही पट मार्जीन मिळू शकते .पब्लिक इश्यू , राईट , बाय बॅक सुविधा या साठी त्यांची मदत होते .विविध रिसर्च रिपोर्ट त्यांच्याकडून उपलब्ध होतात . काहीजण पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सेवाही देतात .त्याचप्रमाणे काही लोकानी त्यांच्या ग्राहकांसाठी गुंतवणूक मार्गदर्शकाची सोय उपलब्ध करून दिली आहे त्याचबरोबर काही योजनांचे विक्री प्रतिनिधी म्हणूनही ते काम करतात आणि गुंतवणूकदाराना सर्व सेवा एका छताखाली उपलब्ध करून देतात  . जे लोक 100% ऑनलाइन व्यवहार करण्यात अनभिज्ञ आहेत किंवा बाजारात व्यवहार कसे होतात यांची माहीती नाही त्यानी आपले व्यवहार यांच्याकडून करणे योग्य आहे .
२.डिसकाउंट ब्रोकर :गेले 6/7 वर्ष अनेक जण ही सेवा पुरवत असून त्यांच्यामार्फत होणाऱ्या उलाढालित सातत्याने वाढ होत आहे .सध्या राष्ट्रीय शेअर बाजारातील 10% उलाढाल यांच्यामार्फत होत असून तंत्रज्ञानाचा वापर करून जलद गतीने आणि कमीतकमी दलाली (brokarage) घेवून ही सेवा दिली जात आहे .ज्या लोकाना बाजारातील व्यवहारांची माहीती आहे त्यानी कोणावरही अवलंबून न राहता त्यांना स्वतःचे व्यवहार स्वतः करून 80 ते 90% दलालीची रक्कम वाचवता येते .
  फुल सर्व्हिस ब्रोकर आपल्या घराजवळ वैयक्तीक पातळीवर ही सेवा उपलब्ध करून देत आहेत तर  डिसकाउंट ब्रोकर अतिशय अल्प दरात प्रगत तंत्रज्ञानाचे सहायाने अतिशय कमी दरात ह्या सेवा देत आहेत .त्यांचा जास्त भर अधिक उलाढालीवर असून हे लोक विशिष्ठ असे किमान दर न आकारता सेवा देत आहेत .यांची दलाली खूप कमी असून विक्री आणि उलाढाल यावरील खर्च हा पारंपरिक दलालांहून कमी आहे .काही कारणाने फोन करून यांच्यामार्फत व्यवहार करायचे असल्यास त्यासाठी वेगळे  पैसे आकारले जातात .ब्रोकरेज कमी लागत असल्याने डे ट्रेडर आणि डेरिव्हेटिवचे व्यवहार करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात डिसकाउंट ब्रोकरना पसंती आहे .डिसकाउंट ब्रोकर आई पी ओ चे वितरक नसल्याने त्यांच्यामार्फत प्रारंभिक विक्रीचे अर्ज भरता येत नाहीत .गुंतवणूकदाराना ते स्टॉक एक्सचेंजचे वेबसाईटवरून भरावे लागतात .
  या दोन्ही प्रकारातील ब्रोकरची जबाबदारी सारखीच असून डीसकाउंट ब्रोकर कमी ब्रोकरेजवर दर्जेदार  सेवा आपल्या ग्राहकांना देत आहेत .सेबीचे त्यांच्यावर लक्ष असून वेळोवेळी दोन्ही प्रकारच्या ब्रोकरची,  त्यांच्या सेवांची तपासणी करण्यात येवून त्याचे मूल्यांकन केले जाते .दोन्हीही ठिकाणी असलेली गुंतवणूक (पैसे अथवा समभाग)  पूर्णपणे सुरक्षित आहे .
   या दोन्हीही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात फायदे तोटे होत असल्याने अनेक लोक दोन्हीही ठिकाणाहून आपले व्यवहार करीत आहेत .तर ज्यांची उलाढाल जास्त आहे ते आपल्या परंपरागत ब्रोकरकडून दलाली कमी करून घेत आहेत .जे एकदम नवखे आहेत त्यांच्यासाठी फुल सर्विस ब्रोकर योग्य असून त्यांना बाजारातील व्यवहारांचे ज्ञान झाल्यावर डिसकाउंट ब्रोकरकडे जाण्याचा पर्याय योग्य वाटतो .
@उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 3 November 2017

निर्देशांक (Index)

                                                          निर्देशांक (Index)

      आपण एखादी दिशा दाखवण्यासाठी हाताचे जे बोट दाखवतो (चाफेकळी) त्याला इंग्रजीत Index Finger असे म्हणतात .ज्यावरून आपण बाजार कोणत्या दिशेला चालला आहे याचा अंदाज बांधू शकतो त्यांस बाजार निर्देशांक (Index) असे म्हणतात . सध्या Sensex आणि nifty हे शेअर बाजाराशी संबधित निर्देशांक प्रसिद्ध आहेत .
  खर तर कोणत्याही कंपनीच्या शेअरचा भाव हा त्या कंपनीच्या कामगिरीवर असायला हवा परंतू प्रत्यक्षात कंपन्यांच्या बाजारभावात इतर अनेक कारणांनी फरक पडत असतो .सध्या मुंबई शेअरबाजारात नोंदणी केलेल्या कंपन्यांची संख्या 8000 हून अधिक तर राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी कलेल्या शेअरची संख्या 5000 हून जास्त आहे .यांपैकी काही कंपन्याची रोज उलाढाल होतेच असे नाही .काही कंपन्यांचे व्यवहार  कवडीमोल दराने होतात तर काही कंपन्यांचे व्यवहार  त्यांच्या दर्शनी मुल्याच्या अनेक पटीने होतात.  या कंपन्या विविध क्षेत्रांत असून त्यांचे भागभांडवल कमी जास्त आहे .उलाढाल नफा या मधे फरक आहे अशा असमान परिस्थितीत सर्व कंपन्यांची तुलना करून काही ठोस निष्कर्ष काढणे हे अत्यंत अवघड आहे . तेव्हा मुंबई शेअर बाजारातील साधारण महत्वाच्या  सर्व क्षेत्राचा समतोल साधून त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 30 कंपन्यांच्या मिळून सेन्सेक्स (Sensitive Index) तर राष्ट्रीय शेअरबाजारातील विविध बारा क्षेत्रातील 50 कंपन्यांचा मिळून निफ्टी(NSE Fifty) बनला आहे .यात सामावेश असलेल्या सर्व कंपन्यांचे मार्केट कॅपिटल म्हणजेच सर्व शेअरचे प्रचलित बाजारमूल्य काढले जाते .या कंपन्यांचे सर्व शेअर बाजारात खरेदी विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या शेअर्सचे संख्येने फ्री फ्लोट फॅक्टर काढून त्याला मार्केट कॅपिटलला गुणुन  फ्री फ्लॉट मार्केट कॅपिटलायझेशन काढले जाते .अशा प्रकारे निर्देशांकात समाविष्ट सर्व कंपन्यांच्या फ्री फ्लॉट मार्केट कॅपिटलायझेशनची बेरिज केली जाते .
      1एप्रिल 1979 रोजी अशा प्रकारे मुंबई शेअर बाजारातील 30 कंपन्यांच्या फ्री फ्लोट  मार्केट कॅपिटलायझेशनची बेरिज करण्यात येवून 100 हा पायाभूत इंडेक्स धरण्यात येवून त्यानुसार सेन्सेक्सचा इंडेक्स डिवायजर काढला गेला .याने प्रत्येक वेळी फ्री फ्लॉट मार्केट कॅपिटलायझेशनला भागले असता येणारा इंडेक्स म्हणजे त्यावेळचा सेन्सेक्स होय .ही प्रक्रिया दर पंधरा सेकंदाने संगणकामार्फत केली जाते .याच पद्धतीने एन एस सी वरील 50 कंपन्यांचा वापर करून निफ्टी काढला जातो .यासाठी 3 नोव्हेंबर 1995 रोजीची पायाभूत किंमत 1000  पकडण्यात आली आहे .थोडक्यात सेन्सेक्स आणि निफ्टी हे एका विशिष्ट दिवसाच्या तुलनेतील एकत्रित मूल्य आहे .
   जेव्हा एखादा निर्देशांक चढतो/उतरतो  तेव्हा त्यात समाविष्ट सर्वच शेअरचे भाव वाढलेले/पडलेले  नसतात त्याच प्रमाणे ही चढ /उतार सारख्याच प्रमाणात नसते .सर्वसाधारणपणे एका वेळी निर्देशांकात सामावेश असलेल्या सर्व शेअर्सची किंमत एकाच वेळी एका दिशेत जात नसल्याने मोठ्या प्रमाणात समतोल साधला जातो .त्यामूळे निर्देशांकातील चढ उतारामधील  कारणे लक्षात न घेता कोणताही ठोस निष्कर्ष काढणे चुकीचे आहे .शेअर्सचे बाजारमूल्यावरून लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप असे वर्गीकरण करण्यात आले आहे.सध्या 3000 कोटीहून अधिक बाजार मूल्य असलेल्याना लार्ज कॅप , 250 कोटीहून कमी बाजारमूल्य असलेल्या कंपन्या स्मोल कॅप आणि बाकी सर्व कंपन्यांना मिड कॅप असे समाजण्यात येते .लवकरच यात बदल होणे अपेक्षित आहे यांसंबंधीची सूचना लवकरच निघेल . त्यातील प्रातिनिधिक शेअर्सवरून , निवडक शेअरवरून , विशिष्ट व्यवसायाचे उत्पादन आणि सेवा जसे आटो , पॉवर , बँकिंग , मेटल , फार्मा ई. यावरूनही निर्देशांक बनवले गेले असून ते 'शितावरून भाताची परीक्षा ' या न्यायाने गुंतवणूकदाराना  दिशादर्शनाचे काम करीत आहेत . याशिवाय म्यूचुअल फंडाच्या विविध योजनाच्या गुंतवणूकीस प्रमाण म्हणून मार्गदर्शक ठरत आहेत .तसेच विविध प्रकारच्या डेरेव्हेटीवच्या योजनांचा आधार आहेत . अनेक लोक , सरकार , स्वदेशी आणि परदेशी वित्त संस्था निर्देशांकातिल वाढीस चांगल्या अर्थव्यवस्थेचे प्रतिक असे समजतात . मांत्र  लक्षात ठेवायला हवे की असे निर्देशांक हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करत नाहीत .यामुळे कोणत्या प्रकारातील कंपन्या तेजीत /मंदीत आहेत याचा फक्त ढोबळ अंदाजच  बांधता येतो .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .