Friday, 31 October 2025

समजून घेऊया भांडवल बाजारातील गुंतवणूक भाग 7

#समजून_घेऊया_भांडवल_बाजारातील_गुंतवणूक_भाग 7 22. बॅलन्स फंड म्हणजे काय? बॅलन्स फंडांची गुंतवणूक शेअर्स आणि बॉण्ड या दोन्ही प्रकारात असते. शेअर्समधील वृद्धी आणि बॉण्ड मधील स्थिरता यांचा समतोल त्यात साधला गेल्याने असे फंड गुंतवणूकदारांना किमान जोखीम घेऊन चांगला परतावा देत असल्याने अधिक लोकप्रिय आहेत. यांना हायब्रीड फंड असेही म्हटले जाते. हे फंड बाजारात येताना त्यांची गुंतवणूक शेअर्स आणि बॉण्डमध्ये कमाल किमान किती टक्के असणार ते जाहीर करतात आणि त्या टक्केवारीच्या जवळपास गुंतवणूक कशी राहील याची काळजी घेतात. या फंडाचे व्यवस्थापक बाजाराचा कल ओळखून कुठे किती गुंतवणूक ते निश्चित करतात. जर शेअरबाजार तेजीत असेल तर फंड व्यवस्थापक त्यांच्या मर्यादेतील अधिकाधिक गुंतवणूक शेअर्समध्ये करतात याउलट बाजारात मंदी असल्यास अधिकाधिक गुंतवणूक बॉण्डमध्ये करतात. या योजना गुंतवणूकदारांना भावण्याची कारणे- ●गुंतवणूक विविधता- गुंतवणूक शेअर्स आणि बॉण्ड या दोन्ही मालमत्ता प्रकारात केली गेल्याने गुंतवणुकीचे विविधिकरण होते. ●गुंतवणूक स्नेही: गुंतवणूकदारांना शेअर्स बॉण्ड अशा वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करण्याऐवजी एकत्रितपणे गुंतवणूक संधी उपलब्ध होते. ●वृद्धी सातत्य: यातील गुंतवणूकीस शेअर्सचा भांडवली लाभ आणि बॉण्डची सुरक्षितता या दोन्हींचा फायदा होत असल्याने त्यात सातत्याने वृद्धी होत राहण्याची शक्यता असते. ●जोखीम विभागणी: शेअर्स आणि बॉण्ड या दोन्ही प्रकारात गुंतवणूक होत असल्याने भांडवल बाजारातील भावाची अशाश्वतता आणि बॉण्डमधील स्थैर्य याची जोड मिळाल्याने जोखीम कमी होते. 23. एक्झिट लोड: म्युच्युअल फंड योजनांतील गुंतवणूक काढून घेताना एक्झिट लोडच वापर होतो. म्युच्युअल फंड योजना त्यातील जोखीम आणि परतावा याचा विचार करता उत्तम गुंतवणूक संधी देत असल्याने गुंतवणूकदारांत लोकप्रिय आहेत. त्यांचे स्वतःचे काही नियम आहेत त्यानुसार गुंतवणूकदारांनी किमान काही काळ रक्कम त्याच्याकडे ठेवावी अशी त्यांची अपेक्षा असते त्यापूर्वी गुंतवणूक काढून घेतली असता काही दंड आकारला जातो त्यास एक्झिट लोड असे म्हणतात. गुंतवणूक करण्यापूर्वी ते किती असेल याची माहिती घ्यावी. ●जेव्हा गुंतवणूकदार म्युच्युअल फंड योजनेतील गुंतवणूक लवकर काढून घेण्याचा विचार करतो तेव्हा त्याला देय असलेल्या रकमेवर फंडाच्या नियमानुसार एक्झिट लोड आकारून उरलेली रक्कम दिली जाते. ●वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या दराने त्याची आकारणी करतात. शेअर्स आधारीत योजनावरील एक वर्षाच्या आतील कालावधीसाठी सर्वसाधारणपणे विक्री किमतीच्या 1% एक्झिट लोड आकारले जाते तर रोखे आधारीत योजनांवर ते अगदी मामुली किंवा शून्य असते. ●एक्झिट लोडमुळे गुंतवणूक दार सातत्याने योजनांची खरेदी विक्री करत नाहीत. त्यामुळे निधी व्यवस्थापित करणे सोपे जाते. ● यामुळे दीर्घकाळ गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळते. 24. समभाग संलग्न गुंतवणूक योजना (इएलएसएस) समभाग गुंतवणूकीस प्रोत्साहन देण्यासाठी या योजना चालू करण्यात आल्या. जे लोक अशा योजनेत गुंतवणूक करतात त्यांना जुन्या करप्रणाली प्रमाणे गुंतवणूक केल्यास 80 सी ची सवलत मिळते. या योजनेत केलेली गुंतवणूक किमान तीन वर्षे पूर्ण झाल्याशिवाय काढून घेता येत नाही. या योजनेतून करबचत आणि दिर्घकाळात संपत्ती निर्माण होत असल्याने लोकप्रिय आहेत. जे लोक अप्रत्यक्षपणे दीर्घकाळ भांडवल बाजारात गुंतवणूक करणे पसंत करतात त्यांना संपत्ती निर्मिती आणि करबचत करून देतात. या योजनेत गुंतवणूक केलेल्या रकमेपैकी 80% रक्कम ही शेअर्स मध्ये गुंतवली जाते. योजना कोणत्याही परताव्याची हमी देत नाही. ●ही गुंतवणूक एकरकमी अथवा एसआयपीच्या माध्यमातून करता येते. किमान ₹ 500/- ची एसआयपी करता येते. ●गुंतवणूकदारांना संचयित गुंतवणूक करता येईल अथवा डिव्हिडंड मिळवता येईल. ●प्रत्येक गुंतवणूक किमान तीन वर्षे काढून घेता येणार नाही गुंतवणूकदारांची इच्छा असल्यास तो कितीही काळ गुंतवणूक तशीच ठेऊ शकतो. ●ती भांडवल बाजाराशी संबंधित असल्याने त्यातून मिळू शकणाऱ्या परताव्याची कोणतीही हमी नाही. ●आयकर कायद्याच्या 80 सी नुसार जास्तीतजास्त दीड लाख गुंतवणुकीवर जुन्या करप्रणालीनुसार आयकारात सूट मिळेल. ●या गुंतवणूकीवर दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर सव्वा लाखाहून अधिक रकमेवर 12.5% या विशेष दारांने कर आकाराला जातो. 25.आरबीट्राज फंड: हे विशेष प्रकारचे इक्विटी फंड असून त्यांची गुंतवणूक शेअर्समध्ये असली तरी कमी जोखमीचे आहेत. यांची गुंतवणूक रचना दोन प्रकारच्या किंवा दोन बाजारातील समभागाच्या बाजारभावात असलेल्या फरकाचा लाभ घेणे हा आहे. रोख बाजार आणि वायदेबाजार यांच्यातील बाजार भावात असलेल्या फरकाचा फायदा घेण्यासाठी यातील व्यवहार एकाच वेळी केले जातात. यामुळे फंड योजनेस कोणतीही जोखीम न घेता फायदाच होतो. ●हे फंड दोन बाजार किंवा बाजार प्रकार यातील भावांमध्ये पडणाऱ्या फरकाचा सतत शोध घेत असतात. समजा एखाद्या शेअर्सचा कॅश मार्केटमध्ये असलेला भाव ₹ 100/- आहे आणि त्याच शेअर्सचा भाव फ्युचर बाजारात ₹ 102/- आहे म्हणजेच भावात ₹2/- चा फरक आहे. ●अशा वेळी फंड कॅश मार्केटमध्ये ₹100/- ने खरेदी करून त्याच वेळी फ्युचरमध्ये ₹102/- ने विक्री करेल. ●फ्युचर सेटलमेंट संपताना दोन्ही भावात फरक नसल्याने फंडास प्रतिशेअर 2/- रुपये फायदा होईल. ●जेव्हा भावात असलेल्या फरकांच्या संधी बाजारात उपलब्ध नसतील तेव्हा मनी मार्केट फंडात पैसे ठेवून फंडास काहींना काही प्राप्ती होत राहील. आरबीट्राज फंडाचे फायदे- ●कमी जोखीम तरीही शेअर्स मधील गुंतवणूकीचा सर्व लाभ या योजनांना मिळतो. ●कर सवलती: हे फंड तात्पुरत्या स्वरूपात मनी मार्केटमध्ये गुंतवणूक करीत असले तरी कायदेशीररित्या ते इक्विटी फंड समजले जात असल्याने त्यांना त्या अनुषंगाने करात सवलती मिळतात. ●रोकड सुलभ: यातील पैसे कधीही सहज काढून घेता येत असल्याने ते रोकड सुलभ आहेत. ●गुंतवणूक विविधता: हे फंड विविध क्षेत्रात गुंतवणूकीत विविधता येते. आरबीट्राज फंडाच्या मर्यादा- ●बाजार निगडित परतावा- हे फंड बाजारभावातील फरकाचा फायदा घेत असल्याने जर बाजारात फारशी हालचाल नसेल तर आकर्षक परतावा मिळवू शकत नाहीत. ●अल्प कालीन गुंतवणूकीसाठी योग्य: हे फंड दिर्घकाळ गुंतवणूक करण्यासाठी नाहीत. 26.म्युच्युअल फंड योजनांचा धोकामापक (रिस्कोमिटर): कोणतीही गुंतवणूक म्हटली की जोखीम आलीच. ही जोखीम गुंतवणूकदारांना सहज समजावी त्यातून त्यांनी जाणीवपूर्वक गुंतवणूक निर्णय या हेतूने सेबीने या धोका मापकाची निर्मिती केली आहे त्यातून योजनेतील धोका स्पष्ट समजून येईल अशी त्याची पारदर्शक रचना आहे. त्यावरून गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणूकीबाबत योग्य तो निर्णय घेऊ शकतात. सर्व मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना त्यांच्या नव्या योजनेतील जोखीम गुंतवणूक दारांना समजावी म्हणून योजनेच्या माहिती पत्रकात जाहिरातीत धोकामापक दर्शविणे सक्तीचे केले आहे. हा रिस्कोमिटर योजनेतील जोखीम सहा वेगवेगळ्या वर्गात दाखवतो. ●कमी धोकादायक: या योजना जवळपास जोखीम मुक्त असतात. रिस्कोमिटरवर या योजनांचा रंग हिरवा (Irish Greeen) असतो. ●कमी ते मध्यम जोखीम: या योजना कमी किंवा त्याहून किंचित धोकादायक योजनांहुन अधिक पण मध्यम धोकादायक योजनाहून कमी धोकादायक असतात. रिस्कोमिटरवर या योजना पोपटी रंगात दाखवल्या जातात. ●मध्यम धोकादायक: या योजनेतील जोखीम मर्यादित असते जे जाणीवपूर्वक जोखीम स्वीकारतात अशा गुंतवणूकदारांना या योजना उपयुक्त ठरतात. त्या पिवळ्या (Neon yellow) रंगात दर्शवितात ●मध्यम ते अधिक धोकादायक: बाजारातील चढ उतार लक्षात घेऊन अधिक जोखीम घेऊन अधिक उतारा मिळवण्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांना उपयुक्त अशा या योजना आहेत. त्या नारंगी (caramel) रंगात दर्शवितात. ●धोकादायक: या योजना मध्यम आणि अधिक धोकादायक यापेक्षा जास्त धोकादायक असतात. या गडध नारंगी (Dark Orange) ●तीव्र धोकादायक: या योजना साहसी गुंतवणूकदारांसाठी उपयोगी असतात. त्या लाल (Red) रंगात दर्शवितात. हे वर्गीकरण मालमत्ता प्रकार, बाजारातील चढ उतार, जोखीम व्याजदर यावरून केले आहेत. रिस्कोमिटरमुळे, ●योजनेतील जोखीम समजते. ●योग्य फंडाची निवड करता येते. ●पारदर्शकपणे जोखीम स्तर समजतो. ●गुंतवणूक निर्णय सहज घेता येतात. ●जोखीम परतावा यातील संबंध समजतो. ●आपल्या उद्दीष्ट आणि जोखीम क्षमताची जाणीव होते. ●सर्वच योजना वेगवेगळ्या स्तरात विभागता येतात. ●अयोग्य योजना टाळता येतात. ●कमी जोखिम घेणारे अधिक जोखमीच्या योजना टाळू शकतात.(अपूर्ण) सेबीच्या सारथी या अँपवर उपलब्ध माहितीचा भावानुवाद. उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही याची नोंद घ्यावी)

Friday, 24 October 2025

समजून घेऊया भांडवल बाजारातील गुंतवणूक भाग 6

#समजून_घेऊया_भांडवल_बाजारातील_गुंतवणूक_भाग_6 18 ब. भांडवल वाजारतील तक्रारींचे निवारण: सेबीने उपलब्ध करून दिलेल्या स्कोर या तक्रार निवारण मंचावर गुंतवणूकदार तक्रार करू शकतात. ती दाखल करण्याचे टप्पे असे- ●तक्रारदाराची नोंदणी: स्कॉरच्या पोर्टलवर जाऊन जर नवीन तक्रारदार असाल तर नोंदणी करावी लागते. तेव्हा नाव, पत्ता, इमेल, फोन, पॅन यासारखी वैयक्तिक माहिती द्यावी लागते. ●तक्रार दाखल करणे: यापुढील पायरी म्हणजे आपली तक्रार नेमक्या शब्दात दाखल करून त्यासंबंधीचे पुरावे 2 एमबीच्या पीडीएफ फाईलद्वारे त्या सोबत जोडावे. ●तक्रार क्रमांक मिळवणे: तक्रार दाखल झाल्यावर तिचा नोंदणी क्रमांक मिळेल त्याचा वापर करून तक्रारीचा मागोवा घेता येतो. ●अवलोकन करणे: यानंतर गुंतवणूकदार सदर तक्रारीची स्थिती जाणून अवलोकन करू शकतो. तक्रार दाखल करताना तक्राररदाराने स्वतःची ओळख पटवून देणे गरजेचे आहे. स्कोरवर खालील तक्रारींची दखल घेतली जात नाही. ●भांडवल बाजारातील गुंतवणूक संबंधात नसलेल्या तक्रारी. ●तपशील नसलेल्या तक्रारी. ●अपूर्ण अथवा अवास्तव तक्रारी. ●अपुऱ्या पुराव्याशिवाय केलेले आरोप. ●सुचना अथवा मार्गदर्शनपर विनंत्या. ●शेअरच्या बाजारभाव संबंधित तक्रारी. ●बाजारात नोंदणी न केलेल्या कंपनीच्या संदर्भातील तक्रारी. या संबंधातील तक्रारी एमआय पोर्टलवर देता येतात. ●दिवाळखोरी अथवा नादारी कारवाई चालू असल्यास अशा कंपनी विषयीच्या तक्रारी. ●कंपनी राजीस्स्टारार किंवा कॉर्पोरेट अफेअर्स यांच्या यादीत नसलेल्या कंपन्या. ●विविध न्यायालयात चालू असलेल्या तक्रारी. ●सेबीच्या ऑनलाइन विवाद निवारण यंत्रणेपुढे चालू असलेल्या तक्रारी. तक्रार दाखल करण्याचा कालावधी: तक्रार उद्भवल्यापासून 1 वर्षाच्या आत तक्रार दाखल करायला हवी. याहून अधिक कालावधीने दाखल केलेली आलेल्या तक्रारी मागून लक्षात आल्यास पोर्टलवरून परस्पर रद्द केल्या जाऊ शकतात. मोबाईल वापरून तक्रार दाखल करणे सोपे व्हावे म्हणून स्कोरचे अँप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. असा मंच निर्माण करून सेबीने तक्रार निवारणाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे शिवाय भांडवल बाजारातील कंपन्या मध्यस्थ याच्यापुढे आदर्श निर्माण केला आहे. 19. ओडीआर म्हणजे काय? सोप्या आणि पारदर्शक पद्धतीने भांडवल बाजाराशी संबंधित गुंतवणूकदारांच्या तक्रारी सोडवण्यासाठी सेबीने ओडीआर यंत्रणेची निर्मिती केली आहे. ओडीआर हा न्यायालयाबाहेर विवाद निवारण करण्याच्या पारंपरिक पर्यायाचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वाद मिटवण्याचा आधुनिक उपाय आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने कंपन्या मध्यस्थ आणि बाजार पायाभूत सुविधा याच्याविषयीच्या तक्रारी पारदर्शक पद्धतीने आणि जलद गतीने सोडवू शकता. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ओडीआर यंत्रणेचे महत्व: ●सोय: या यंत्रणेची मदत घेऊन कुठेही न जाता घरी बसून तक्रारी सोडवता येतात. ●कमी खर्च: या यंत्रणेची मदत घेऊन तक्रारी सोडवण्यासाठी येणारा खर्चही कमी असतो. ●कमी वेळ: तक्रार सुटण्याचा कालावधी पारंपरिक पद्धतीपेक्षा खूप कमी असतो. ●पारदर्शकता: या पूर्ण प्रक्रियेची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंद ठेवली जात असल्याने ती पूर्णपणे पारदर्शक आहे. गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी सेबीने पुढाकार घेऊन ऑनलाइन तक्रारी सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध करून दिली असून गुंतवणूकदार खाली दिलेल्या गोष्टींसंबंधित तक्रारी ओडीआरद्वारे सोडवू शकतात. *दलाल *डिपॉजीटरी पार्टीसिपंट *बँकर्स *गुंतवणूक व्यवस्थापन कंपनी *कमोडिटी क्लिअरिंग कॉर्पोरेशन *गुंतवणूक सल्लागार *इनव्हीट गुंतवणूक व्यवस्थापक *मर्चंट बँकर *म्युच्युअल फंड - मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या. *गुंतवणूक संच व्यवस्थापक *रजिस्टार अँड ट्रान्सफर एजंट *रिटस व्यवस्थापक *रिसर्च एनलिस्ट याशिवाय *कस्टोडीयन, रेटिंग एजन्सीज, क्लिअरिंग कॉर्पोरेशन यांच्याशी संबंधित तक्रारी या यंत्रणेद्वारे सोडवू शकतो विविध भाषिक माध्यमातून सुविधा देणारे महत्वाचे ओडीआर मंच असे, क्रेड, जस्टीस्ट, समा, कॉर्ड इ. यातील कोणत्याही ओडीआर यंत्रणेची मदत घेऊन तक्रार निवारणाची सर्वसाधारण पद्धत अशी- ●तक्रारीची नोंदणी करणे: या मंचावर तक्रार नोंदणी केली जाते. आवश्यक पुरावे सादर केले जातात. अशी तक्रार दाखल करण्यापूर्वी तक्रारदार त्याचा प्रतिपक्ष सामंजस्याने तक्रार सुटू शकते याची चाचपणी करतात. ●सलोखा पूर्व स्थिती: येथे दोन्ही पक्षकार तक्रार समजून घेऊन ती सलोख्याच्या माध्यमातून सुटू शकते का याचा अभ्यास करतात. ●मध्यस्थी: दोन्ही बाजूंचा विचार करून तक्रार कशी सोडवता येईल यासाठी मध्यस्थ/ सलोखाकार तक्रार सोडवण्यासाठी मार्गदर्शन करतात. ●लवाद: तरीही तक्रार न सुटल्यास लवाद नेमला जातो तो कायदेशीर बाजूचा विचार करून निर्णय देतो, जो दोन्ही पक्षकारांवर बंधनकारक असतो. सलोखा आणि लवाद या पद्धतीने तक्रार सोडवण्यास येणाऱ्या खर्चाची माहिती सेबीच्या पोर्टलवर आहे. अशा पद्धतीने भांडवल बाजारातील तक्रारी कमी खर्चात आणि जलद गतीने सहज सोडवता येऊ शकतात. हा गुंतवणूकदारांच्या तक्रारी सोडवण्यातील मैलाचा दगड म्हणता येईल. तेव्हा गुंतवणूकदारांचे हित जपण्याचा उपलब्ध असलेल्या मंचाचा वापर आपल्या गरजेनुसार करता येईल. 20. जाणून घेऊया म्युच्युअल फंडातील थेट गुंतवणूक म्हणजे काय आणि मध्यस्थामार्फत केलेली नियमित गुंतवणूक म्हणजे काय? म्युच्युअल फंड योजना या त्यातील फायदे म्हणजे गुंतवणूक वैविध्य, व्यावसायिक व्यवस्थापन आणि सहजता यामुळे गुंतवणूकदारांत लोकप्रिय आहेत. त्यामध्ये मध्यस्थामार्फत अथवा थेट गुंतवणूक करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. या दोन्ही पद्धतीत फरक असून त्यांचे कमी अधिक फायदे तोटे आहेत. या दोन्ही पद्धतीत व्यावसायिक व्यवस्थापनाद्वारे गुंतवणूक संच तयार केला जात असला थेट गुंतवणूक ही मध्यस्थाला वगळून केली जात असल्याने त्यावरील खर्च कमी होतो. दिर्घकाळात यामुळे खूप फरक पडतो. मध्यस्थामार्फत सुचवल्या जाणाऱ्या योजना, ●ह्या दलाल, एजंट अथवा वितरकांकडून सुचवल्या जातात. ●मध्यस्थाकडून सल्ला मिळतो त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्रे भरून घेतली जातात. ●यावर केला जाणारा खर्च गुंतवणूकदारांकडून वसूल केला जात असल्याने योजनेवर होणाऱ्या खर्चात वाढ होते. ●नव्याने भांडवल बाजारात म्युच्युअल फंड योजनांच्यामार्फत प्रवेश करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी या पद्धतीने गुंतवणूक करणे योग्य ठरेल. थेट गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी, ●योजना थेट गुंतवणूक व्यवस्थापन कंपनीकडून घ्यावी लागते. ●कोणती योजना लाभदायक ठरेल याचा गुंतवणूकदारास अभ्यास करावा लागतो. ●मध्यस्थाना फी द्यावी लागत नसल्याने व्यवस्थापन खर्च कमी. दोन्ही प्रकारातील महत्त्वाचे फरक ●व्यवस्थापन खर्च: नियमित मध्यस्थामार्फत केलेल्या गुंतवणूकीस अधिक तर थेट योजनेस कमी. ●परतावा: नियमित योजनेतील परतावा किंचित कमी असून थेट योजनेत तो थोडा अधिक असतो. ●गुंतवणूक सुलभता: नियमित योजनांत गुंतवणूक करण्यासाठी मध्यस्थाची मदत होते थेट योजनेत ती गुंतवणूकदारास स्वतः करावी लागते. ●कुणासाठी योग्य? नियमित योजना नव्याने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी योग्य असून थेट योजना जाणकार गुंतवणूक दारांसाठी योग्य आहेत. 21.मुदतबंद योजना, महत्व, वैशिष्ट्ये: मुदतबंद योजना हा म्युच्युअल फंड योजनांचा वेगळा प्रकार असून त्या नावाप्रमाणेच विशिष्ट कालावधीसाठी गुंतवणूक करण्यात येते. योजनेची प्रारंभिक युनिट विक्री केली जाते. हे युनिट केव्हाही खरेदी किंवा विक्री करता येत नाहीत. योजनेच्या युनिटची खरेदी भांडवल बाजारात करता येत असली तरलतेच्या अभावी सौदे पूर्ण होऊ शकतील याची खात्री देता येत नाही. मुदतबंद योजनांचे महत्व: ●निश्चित योजना आकार: या योजनेची एकूण गुंतवणूक रक्कम किती असेल ते आधीच निश्चित केले जाते. ●शेअरबाजारात व्यवहार शक्य: या योजना बाजरात सुचिबद्ध असल्याने त्यांची खरेदीविक्री बाजारभावाने करता येते. ●मुदतपूर्ती: योजनेची मुदतपूर्ती कधी होणार हे आधीच ठरलेले असते. ●व्यावसायिक व्यवस्थापन: म्युच्युअल फंडांच्या अन्य योजनांप्रमाणेच या योजनांचे व्यवस्थापन व्यावसायिक व्यवस्थापनाकडून केले जात असल्याने त्यांच्या ज्ञानाचा गुंतवणूकदारांना लाभ मिळतो. मुदतबंद योजनांचे फायदे: ●विशिष्ट उद्देशाने त्यांची निर्मिती केलेली असल्याने गुंतवणूकदार त्यास सहमत असल्यास त्यांना अशा योजनांचा लाभ घेता येतो. ●योजना कालावधी: या योजना सहसा दीर्घ मुदतीच्या (3 ते 7 वर्ष) कालावधीच्या असल्याने दीर्घकाळ गुंतवणूकीस प्रोत्साहन देणाऱ्या असतात. ●गुंतवणूक विविधता: जोखीम विभागणी व्हावी म्हणून योजनेची गुंतवणूक विविध मालमत्ता प्रकारात विभागून केली जाते. ●नोंदणी: योजनेची नोंदणी शेअरबाजारात झालेली असल्याने तेथील भावानुसार गुंतवणूक जरुरीप्रमाणे काढून घेता येते. (अपूर्ण) सेबीच्या सारथी या अँपवर उपलब्ध असलेल्या माहितीचा भावानुवाद. ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही याची नोंद घ्यावी)

Friday, 17 October 2025

समजून घेऊया - भांडवल बाजारातील गुंतवणूक भाग 5

#समजून_घेऊया_भांडवल_बाजारातील_गुंतवणूक_भाग_5 15. पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP): म्युच्युअल फंड योजनांत टप्याटप्याने गुंतवणूक करण्यासाठी पद्धतशीर गुंतवणूक योजना हा सुयोग्य पर्याय आहे. एकदाच मोठी रक्कम एकरकमी गुंतवण्याऐवजी ती नियमित अंतराने सर्वसाधारणपणे दरमहा गुंतवली जाते. हे म्हणजे रोवलेल्या बिजाची सातत्याने निगराणी करण्यासारखे आहे त्यामुळे त्याचे डेरेदार वृक्षात रूपांतर होईल. पद्धतशीर गुंतवणूकीचे महत्व: ●सातत्यता: आपल्या ऐपतीप्रमाणे दरमहा गुंतवणूक करायची असल्याने त्याचा भार न होता सातत्य राहते. ●चक्रवाढ लाभ: दिर्घकाळात ही गुंतवणूक वाढत राहिल्याने त्यातील परताव्यात चक्रवाढ व्याजाने वाढ होते. ●सरासरीचा लाभ: गुंतवणूक नियमीतपणे होत असल्याने बाजार खाली असताना जास्त युनिट मिळतात तर वर असताना तुलनेत कमी युनिट एकूण युनिट सरासरी किमतीत मिळतात. ●आर्थिक शिस्त: नियमितपणे गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारास आर्थिक शिस्त लागते. पद्धतशीर गुंतवणुकीची उपयुक्तता: ●परवडणारी गुंतवणूक: अत्यल्प गुंतवणूक करावी लागत असल्याने ती सर्वाना परवडू शकते. किमान ₹500/-ची गुंतवणूक करण्याची सोय सर्व फंडांनी उपलब्ध करून दिली आहे. काही फंड याहून कमी रकमेची किमान गुंतवणूक घेतात. ●विशिष्ट उद्देशाने केलेली गुंतवणूक: यातील गुंतवणूक विशिष्ट उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वापरली जाते. ●लवचिकता: याची सुरुवात कधीही करता येते तसेच थांबवताही येते. काही काळासाठीही थांबवता येते किंवा वाढवता अथवा कमी करता येते. ●दीर्घकालीन गुंतवणूक:अशी गुंतवणूक वाढून दिर्घकाळात संपत्ती निर्माण होत असल्याने आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत होते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे पद्धतशीर गुंतवणूक म्हणजे रोपाची नियमित निगराणी करणे ज्यामुळे त्याचे भरदार वृक्षात रूपांतर होऊन त्याची फळे आपल्यास चाखता येतात. 16. निव्वळ संपत्ती (Net worth) : निव्वळ संपत्ती म्हणजे आपल्याकडे असलेल्या सर्व मालमत्तांच्या बाजारमूल्यातून देणी वजा केली असता शिल्लख राहणारी रक्कम. याचा उपयोग आपला आर्थिक स्तर समजून घेण्यासाठी होतो. निव्वळ संपत्तीचे महत्व: निव्वळ संपत्ती किती आहे त्यावरून गुंतवणूकदारास त्याचा आर्थिक स्तर समजतो. त्यावरून त्याला किती खर्च करावा, बचत करावी किंवा गुंतवणूक करावी याचा अंदाज बांधता येतो. आपण आर्थिक दृष्ट्या कुठे आहोत आणि कुठे जायला हवे यासंबंधीचा निर्णय घेण्यास त्याचा उपयोग होतो. गुंतवणूकदार त्याच्या मालमत्तेतून देयता वजा करून निव्वळ संपत्तीचा शोध घेऊ शकतो. असा शोध घेतल्याने, ●गुंतवणूकदारास त्याची आर्थिक प्रगती समजते. ●वाजवी आर्थिक धेय्ये ठरवता येतात. ●भविष्यातील योजनांची आखणी करता येते जसे- घर बांधणे, उच्च शिक्षण घेणे, निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करणे. असा शोध घेणे, हे आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने उचललेले पाहिले पाऊल आहे, जे आपल्याला सक्षम बनवेल. ही अतिशय सहज करता येण्यासारखी, उपयुक्त सवय असून त्यामुळे गुंतवणूकदाराची आर्थिक सजगता वाढते. 17. मालमत्तेचे निव्वळ मूल्य (NAV): म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करताना मालमत्तेचे निव्वळ मूल्य म्हणजे काय? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कल्पना करा तुम्ही मित्रांबरोबर एकत्र पिझ्झा खायचा प्लॅन करत आहात, तुम्ही तो समान तुकडे करून वाटून खाता त्याचे पैसे सारखी विभागणी करून भरता. प्रत्येकाने मोजलेली पिझ्याची किंमत ही त्यांनी खाल्लेल्या भागाची किंमत असते. आता या पिझ्याच्या जागी म्युच्युअल फंड योजना असल्याची कल्पना करूया म्हणजे निव्वळ मालमत्ता मूल्य म्हणजे काय त्याचा प्राथमिक अंदाज येईल. एखाद्या योजनेच्या युनिटचे निव्वळ मालमत्ता मूल्य हे त्यातील मालमत्तेच्या मूल्याचे प्रतिबिंब असते. सोप्या भाषेत युनिटचे मालमत्ता मूल्य ही त्यातील मालमत्तेची तेव्हाचे निव्वळ मूल्य असते. निव्वळ मालमत्ता मूल्य = योजनेतील मालमत्तेचा बाजारभाव - योजनेचे खर्च यास एकंदर युनिटच्या संख्येने भागले असता येणारी संख्या. बाजारभावातील मालमत्तेच्या किमतीत होणाऱ्या फरकामुळे हे मूल्य सतत बदलत असते. निव्वळ मालमत्ता मूल्याचे महत्व: निव्वळ मालमत्ता मूल्यामुळे योजनेची कामगिरी समजत असल्याने गुंतवणूकदार त्या योजनेची कामगिरीचा अंदाज बांधत असल्याने योजनेचे निव्वळ मालमत्ता मूल्य माहिती असणे गरजेचे आहे. ●योजनेतील युनिटच्या खरेदी विक्री संबंधित निर्णय घेण्यासाठी: गुंतवणूकदार युनिट खरेदी अथवा विक्री करण्यापूर्वी त्याचे निव्वळ मूल्य पाहतात. त्यानुसारच खरेदी विक्री केली जाते. ●योजनेची कामगिरी तपासण्यासाठी: निव्वळ मालमत्ता मूल्यात विशिष्ट काळात झालेली वाढ यावरून योजनेच्या कामगिरीची पडताळणी करता येते. ●फंडांच्या कामगिरीची तुलना करण्यासाठी: वेगवेगळ्या म्युच्युअल फंड हाऊसच्या एकाच प्रकारच्या योजनेच्या कामगिरीची तुलना निव्वळ मालमत्ता मूल्याच्या वाढीवरून करता येऊन कोणत्या फडांची कामगिरी उजवी आहे त्याची तपासणी करता येते. याचा अर्थ असा नाही की एखाद्या फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य अधिक आहे याचा अर्थ असा नाही की तो चांगला फंड आहे तर त्यातील टक्केवारीतील वाढ किती आहे हे महत्त्वाचं आहे. ●लाभांश वितरण: म्युच्युअल फंडाच्या योजना त्यांच्या युनिट धारकांना लाभांश स्वीकार करण्याचा पर्याय देतात. यामध्ये निव्वळ मालमत्ता मूल्य किती आहे ते महत्वाचे आहे. युनिटवर मिळणारा परतावा यावरूनही गुंतवणुकीचे मूल्यांकन करता येते. ●फी आणि योजनेचा खर्च: निव्वळ मालमत्ता मूल्य काढताना फी आणि योजनेचा खर्च त्यातून वजा करून काढली जाते. हा खर्च जितका कमीतकमी तेवढी ती योजना चांगली असे अनुमान काढता येते. 18 अ. भांडवल बाजाराशी संबंधित तक्रारींचे निवारण: भांडवल बाजार नियंत्रक सेबीने गुंतवणूकदारांच्या भांडवल बाजाराशी संबंधित तक्रारींचे झटपट निवारण करण्यासाठी स्कोर (SCORES) या नावाचा एक मंच तयार केला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणूक विषयक तक्रारी त्यावरून सहज सोडवता येतील. हा ऑनलाइन तक्रार निवारण मंच असून त्याद्वारे नोंदणीकृत कंपन्या, गुंतवणूक मध्यस्थ याच्यांविषयी तक्रार दाखल करणे आणि त्यांचा पाठपुरावा करणे सोयीचे आहे. गुंतवणूक ग्राहकांच्या तक्रारी पारदर्शक पद्धतीने, जलद आणि समाधानकारक पद्धतीने सोडवण्यास मदत करणे हे या मंचाचे उद्दिष्ट आहे. स्कोर या मंचाची ठळक वैशिष्ठ्ये: ●वापरकर्ता स्नेही रचना: या मंचाची रचना ही सोपी असून त्याचा वापर कम्प्युटर आणि मोबाइलवरून सहज करता येतो. कोणत्याही तांत्रिक कौशल्य नसलेल्या व्यक्तीस त्याचा वापर करता येईल. ●वेळोवेळी मागोवा घेणे शक्य: येथे तक्रार दाखल केल्यानंतर एक तक्रार क्रमांक तयार होतो तो तक्रारदारास पाठवला जातो त्याचा उपयोग करून तक्रारीची स्थिती जाणून घेता येते. ●अभिप्रायावर आधारित सुधारणा : सोडवलेल्या तक्रारी, तक्रारदाराचे अनुभव आणि सूचना यांचा विचार करून ह्या मंचावर गुंतवणूकदारांना उपयुक्त होतील अशा सुधारणा केल्या जातात. स्कोरची सुधारित आवृत्ती: एप्रिल 2024 मध्ये सुधारित स्वरूपात हा मंच कार्यान्वित झाला असून तो भांडवल बाजाराशी संबंधित तक्रारी सोप्या पद्धतीने नोंदवून जलद गतीने सोडावीत आहे. त्यातील महत्वाच्या बाबी अश्या. ●जलद तक्रार निवारण: पूर्वी एका तक्रारीची सोडवणूक सरासरी 30 दिवसात होत असे तो कालावधी 21 दिवसांवर आला आहे. ●योग्य व्यक्तींकडे तक्रारींची पाठवणी: तक्रार दाखल झाल्यावर लगेचच स्वयंचलित पद्धतीने योग्य विभागातील योग्य व्यक्तीकडे जाते. ●योग्य कालावधीत सोडवणूक न झालेल्या तक्रारी वरिष्ठांकडे रवाना: विहित कालावधीत न सुटलेल्या तक्रारी संबंधित वरिष्ठांकडे जात असल्याने जबाबदारी निश्चित होऊन त्वरित हालचाल केली जाते. ●दोन टप्यातील आढावा: तक्रारीवर 15 दिवसात कोणती कारवाई केली गेली याचा आढावा घेऊन ती न सुटल्यास त्यावरील वरिष्ठ पातळीवर पाठवून त्याचा आढावा गुंतवणूकदारास पाठवला जातो. त्यावरही तक्रारदार समाधानी नसल्यास दुसऱ्या टप्यात उच्चपदास्थाकडून त्याचा पुनर्विचार केला जातो. ●तक्रारदाराची ओळख: स्वयंचलित यंत्रणेद्वारे तक्रारदाराचा पॅन आणि मोबाईल वरील ओटीपी याद्वारे ओळख पाठवली जात असल्याने तक्रार दाखल करणे त्याचा मागोवा घेणे आता अधिक सुलभ झाले आहे. (अपूर्ण) सेबीच्या सारथी या अँपवर उपलब्ध असलेल्या माहितीचा भावानुवाद. उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही याची नोंद घ्यावी)

Friday, 10 October 2025

समजून घेऊया भांडवल बाजारारील गुंतवणूक भाग 4

#समजून_घेऊया_भांडवल_बाजारातील_गुंतवणूक_भाग_4 12. गुंतवणूक संच व्यवस्थापन सुविधा (PMS): मुदत ठेवी, सोने, म्युच्युअल फंड या गुंतवणूक पारंपरिक गुंतवणूक साधनांशिवाय गुंतवणूकदार अन्य मार्गांचा सातत्याने अन्य पर्यायांचा सतत शोध घेत असतात. गुंतवणूक संच व्यवस्थापन हा काहींसाठी उपयुक्त गुंतवणूक पर्याय होऊ शकतो. उच्च मालमत्ता असलेल्या लोकांसाठी हा एक नव्याने उदयास आलेला प्रकार आहे. गुंतवणूकदाराची खास गरज लक्षात घेऊन त्यांना हा पर्याय उपलब्ध करून दिला जातो. ही सेवा नेमकी काय आहे तिचे वैशिष्ट्य, प्रकार, उपयुक्तता, फायदे आणि त्यामागील नियामक चौकट समजून घेऊया. गुंतवणूक संच व्यवस्थापन सेवा म्हणजे काय? ही एक अशी सेवा गुंतवणूक आहे ज्यामध्ये गुंतवणूक व्यवस्थापक गुंतवणूकदारास त्याच्या वैयक्तिक धेय्य आणि गरजेनुसार गुंतवणूक व्यवस्थापित करून देतो. म्युच्युअल फंड योजनेनुसार सर्व गुंतवणूकदारांची गुंतवणूक रक्कम एकत्रित न करता ती स्वतंत्र ठेवली जाते. केलेली गुंतवणूक गुंतवणूकदाराच्या नावावरच असते फक्त त्यांनी अधिकार दिलेल्या व्यवसथापककडून तिचे व्यवस्थापन केले जाते. ते करताना गुंतवणूकदाराच्या गरज, कालावधी उद्दिष्टे, जोखीमक्षमता लक्षात घेतली जाते. गुंतवणूक संच व्यवस्थापन प्रकार: ही सेवा वेगवेगळ्या पद्धतीने दिली जाते. ●विवेकी गुंतवणूक (Discretionary): यामध्ये फंड मॅनेजर गुंतवणूकदाराच्यावतीने त्याला वाटेल त्या पद्धतीने गुंतवणूक करू किंवा बदलू शकतो. त्याला गुंतवणूक कशी, कुठे, किती आणि कधी करावी पूर्ण स्वातंत्र्य असते. या पद्धतीत कोणतेही लागेबांधे नसलेल्या व्यावसायिक व्यवस्थापकाची गरज असते. ●विवेकाधिन गुंतवणूक (Non discretionry): या पद्धतीत फंड मॅनेजर त्याचा सल्ला देतो. त्यावर गुंतवणूकदाराच्या संमतीने गुंतवणूक केली जाते. खरेदी अथवा विक्री या संबंधीचे निर्णय गुंतवणूकदाराच्या परवानगीने घेतले परंतु ते व्यवस्थापकाकडून घेतले जातात. ज्या लोकांना निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीच्या मदतीची गरज असते त्याच्यासाठी ही पद्धत योग्य आहे. ●गुंतवणूक सल्ला (Advisory): या पद्धतीत फंड मॅनेजर गुंतवणूक सल्ला देतो. गुंतवणूकदार त्याच्या मतानुसार त्यावर निर्णय घेऊन स्वतः गुंतवणूक करतो. ही पद्धत जाणकार गुंतवणूकदारांना उपयुक्त वाटते. या मध्ये गुंतवणूकदाराचे गुंतवणूकीवर पूर्ण नियंत्रण असते. गुंतवणूक संच व्यवस्थापनाची वैशिष्ठ्ये: ●वैयक्तिक सेवा: गुंतवणूकदारास त्याची गरज, उद्दिष्टे आणि जोखीम क्षमतेस अनुसरून सल्ला मिळतो. ●पारदर्शकता: दिलेला सल्ला त्याचे परिणाम याचे नियमित अहवाल दिले जात असल्याने या सेवेत पारदर्शकता आहे. ●मोठ्या किमान गुंतवणूकीची आवश्यकता: सेबीच्या नियमानुसार या सेवेचा लाभ घेण्यासाठी किमान 50 लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. ●सक्रिय गुंतवणूक: फंड व्यवस्थापक उपलब्ध निधी, बाजारच्या दिशा, उपलब्ध मालमत्ता, उद्दिष्ट, जोखीम याचा विचार करून तत्परतेने गुंतवणूक निर्णय घेत असल्याने ही गुंतवणूक कायम सक्रिय असते. गुंतवणूक संच व्यवस्थापनाचे फायदे: ●तज्ज्ञांचा सल्ला: या योजनेचे व्यवस्थापन जाणकार व्यक्तींच्या मार्गदर्शनाने होत असल्याने त्यातून अधिक परतावा मिळण्याची जास्त शक्यता असते. ●वैयक्तिक सल्ला: व्यवस्थापकास तुमच्या विषयी सर्व माहिती असल्याने त्यास अनुरूप निर्णय तो घेत असतो. ●विविधिकरण: गुंतवणूक विविध मालमत्ता प्रकारात विभागली गेल्याने त्यातील जोखीम कमी होते आणि परतावा अधिक मिळण्याची शक्यता वाढते. ●करप्रभाव: गुंतवणूक करताना आणि काढून घेताना त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा विचार व्यवस्थापकाकडून केला जातो. गुंतवणूक संच व्यवस्थापन सेवेचा लाभ घेण्यापूर्वी लक्षात घ्यायच्या गोष्टी: ●व्यवस्थापन फी: म्युच्युअल फंड योजनेच्या तुलनेत अशा योजनांची व्यवस्थापन फी अधिक असते. ●बाजार जोखीम: यातील बहुतेक गुंतवणूक भांडवल बाजाराशी संबंधित असल्याने आणि अनिश्चितता हा बाजाराचा स्थायीभाव असल्याने त्याचा गुंतवणूकीवर प्रभाव पडू शकतो. ●मूल्यमापन: अशी सेवा स्वीकारताना फंड मॅनेजर इतिहास, त्याची गुंतवणूक पद्धती आणि फंड हाऊसचा नावलौकिक या सर्व गोष्टी विचारात घ्याव्या. गुंतवणूक संच व्यवस्थापनाची नियामक चौकट: या योजना सेबीच्या नियमनानुसार असल्याने त्या पारदर्शक असाव्यात आणि त्यांचे उत्तरदायित्व कुणाकडे असावे यासंबंधात काही नियम केलेले असून त्याचे पालन करावे लागते. त्यातील महत्त्वाचे नियम असे- ●नोंदणी: ही सेवा देऊ शकणाऱ्या सर्वाना सेबीकडे नोंदणी करणे आणि त्यांच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ●किमान गुंतवणूक: योजनेत भाग घेण्यासाठी गुंतवणूकदाराकडे 50 लाख रुपये अथवा मालमत्ता असणे आवश्यक असते त्यामुळे उच्च मालमत्ता धारण करणारेच त्यात भाग घेऊन त्यासंदर्भात असलेली जोखीम पेलू शकतात. ●जबाबदारी: गुंतवणूकदार आणि नियमकाना वेळोवेळी गुंतवणूक अहवाल देणे, गुंतवणूक दाराला फी ची माहिती आणि जोखीम याची जाणीव करून देणे ही व्यवस्थापकाची जबाबदारी आहे. ●रक्षकाची नियुक्ती( Custodian): केलेली गुंतवणूक संरक्षित राहावी तिचा अन्यत्र वापर केला जाऊ नये यासाठी मालमत्ता रक्षकाची नेमणूक सेवा पुरावठाधारकास करावी लागते. ●नियामक पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती: नियामक नियमांचे पालन आणि देखरेख करण्यासाठी अधिकारी नेमणे बंधनकारक आहे. गुंतवणूक संच व्यवस्थापन सेवेतील जोखीम: ही सेवा घेण्यापूर्वी त्यासंबंधातील जोखीम धोके गुंतवणूकदारांनी समजून घेणे आवश्यक आहे. ●बाजार जोखीम- बाजार वरखाली होत असल्याने मालमत्ता मूल्य सतत बदलत राहते. ●लक्षवेधी गुंतवणूक- एकाच व्यवसाय प्रकारात अधिक गुंतवणूक असेल आहे आणि तो व्यवसाय प्रकार न चालल्यास तुमचे गुंतवणूक मूल्य कमी होऊ शकते. ●तरलता: बाजारात तरलतेचा अभाव असल्यास गुंतवणूकीतून पुरेसा परतावा न मिळण्याचा धोका वाढतो. ●व्यवस्थापकीय कौशल्य: मालमत्तेतुन मिळणारा परतावा हा फंड व्यवस्थापकाच्या कौशल्यावर आधारित असल्याने जर फंड मॅनेजर कमी पडल्यास फंड उत्तम कामगिरी करू शकत नाही. 13. पद्धतशीर गुंतवणूक काढून घेण्याची योजना (SWP): ठराविक अंतराने मालमत्ता विकून गुंतवणूक काढून घेण्याची पद्धत हा एक गुंतवणूक नियोजनाचा लोकप्रिय प्रकार आहे. त्यामुळे गुंतवणूक योग्य रीतीने व्यवस्थापित होऊन नियमित उत्पन्न मिळत राहते. गुंतवणूकदारास आपल्याला जणूकाही पगार मिळत असल्याचा भास होतो. ही रक्कम किती आणि कधी मिळत राहावी यावर त्याचे पूर्ण नियंत्रण असते. योजनेचे महत्व: ●उत्पन्नात सातत्यता: सतत काहीतरी उत्पन्न मिळत राहणं ही काही गुंतवणूकदारांची गरज असते. विशेषतः निवृत्त लोक त्याची रोकड सुलभता ठीक राहावी म्हणून अशा योजनांची निवड करतात. ●आर्थिक नियोजन: आर्थिक नियोजन करण्याच्या हेतूनेही अनेक गुंतवणूकदार अशा योजना घेतात ज्या योगे त्यांचे पैशांवर नियंत्रण राहते. ●कर नियोजन: भांडवल बाजारातील गुंतवणूकीवर विशेष एकसमान दराने कर आकारणी होत असल्याने कर नियोजनाच्या दृष्टीने या योजना गुंतवणूकदारांना उपयुक्त आहेत. या योजनेची निवड का करावी? ●नियमित उत्पन्नासाठी, रोखता प्रवाह राखला जातो. ●यातून मिळणारा परतावा दिर्घकाळात महागाईवर मात करीत असल्याने एकंदरीत परताव्यात वाढ होते. ●आर्थिक शिस्त लागण्यासाठी या योजनेचा उपयोग होतो. अशा गुंतवणूकीमुळे आर्थिक स्वातंत्र्य मिळते, सुरक्षितता लाभते. नियमित उत्पन्न मिळत असल्याने मनशांती लाभत असल्याने त्या लोकप्रिय आहेत. 14. मूलभूत सेवा डी मॅट खाते: भांडवल बाजारात सर्व व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होत असल्याने त्यांची गुंतवणूक केलेली मालमत्ता साठवण्यासाठी डी मॅट खात्याची आवश्यकता असते. हा एक डिजिटल लॉकर असून त्यात तुम्ही आपली भांडवल बाजार संबंधित मालमत्ता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने साठवून सुरक्षितपणे ठेऊ शकता. त्यांची खरेदीविक्री करू शकता. मूलभूत सेवा डी मॅट खाते हे किमान खर्चात गुंतवणूकदारांना भांडवल बाजारासंबंधीत सुविधा कमीतकमी खर्चात उपलब्ध करून देते. नवीन गुंतवणूकदारांकडे भांडवल कमी असल्याने मोठ्या संख्येने ते व्यवहार करू शकत नाही. मूलभूत सेवा डी मॅट खात्याची वैशिष्ठ्ये: ●कमी व्यवस्थापन शुल्क: या खात्याचे व्यवस्थापन शुल्क अगदी कमी किंवा शून्य असते. ●मालमत्तेच्या बाजारमूल्याची मर्यादा: या खात्यात धारण केलेल्या मालमत्तेचे बाजारमूल्य ₹ 4 लाखाच्या आत असेल तर मालमत्ता व्यवस्थापन कंपनीस कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही त्याहून अधिक पण ₹10 लाखापर्यंत असल्यास ₹100/- शुल्क द्यावे लागेल. हे मूल्य ₹10 लाखावर गेल्यास नियमित खात्याप्रमाणे शुल्क द्यावे लागते. ●प्राथमिक सेवा उपलब्धता: या खात्यात भांडवली मालमत्ता जमा करणे आणि त्यातून त्यांची विक्री करणे एवढेच व्यवहार होतात. त्याहून अधिक विशेष प्रकारचे व्यवहार करता येत नाहीत. ●परिवर्तनीयता: हे खाते नियमित डी मॅट खात्यामध्ये कधीही बदलता येते. या खात्याचा हेतू सामान्य गुंतवणूकदाराने भांडवल बाजारात गुंतवणूक करावी हा असल्याने ते किमान खर्चात उपलब्ध झाल्याने सर्वाना परवडेल आणि त्यांची सोय होईल. मूलभूत सेवा डी मॅट खात्यापासून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना होणारे फायदे: ●किमान खर्च ●सुलभता ●गुंतवणूक कीस प्रोत्साहन ●सुरक्षितता हे खाते नव्याने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना वरदान आहे.(अपूर्ण) सेबीच्या सारथी या अँपवर उपलब्ध असलेल्या माहितीचा भावानुवाद. ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही याची नोंद घ्यावी) 10 ऑक्टोबर 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.

समजूत घेऊया भांडवल बाजारातील गुंतवणूक भाग 3

#समजून_घेऊया_भांडवल_बाजारातील_गुंतवणूक_भाग_3 9. मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (एएमसी): मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ही एक आर्थिक संस्था असून त्या त्यांच्या ग्राहकांच्या रकमेची गुंतवणूक आणि व्यवस्थापन करतात. सर्वसाधारण गुंतवणूकदार, निवृत्ती नियोजन फंड, बँका, विमा कंपन्या, विविध कंपन्या आणि सरकारही, या सर्वांचा त्यांच्या ग्राहकांत समावेश होतो. किमान जोखीम घेऊन आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त परतावा मिळवून देणे हे मालमत्ता व्यवस्था कंपन्यांचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यांचे कार्य एकाद्या न्यासासारखे असते. म्युच्युअल फंडांचे कार्य ट्रस्टप्रमाणे चालते आणि मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या त्यांच्या गुंतवणूक व्यवस्थापक कंपन्याना म्युच्युअल फंड योजना पुरस्कृत करतात त्यांना नियमानुसार आपली आर्थिक सक्षमता सिद्द ठेवावी लागते. या कंपन्या खाजगी अथवा सार्वजनिक मर्यादित असल्या तरी त्यांना नियामक बंधने पाळावी लागतात. त्याचप्रमाणे कंपनी नियमाप्रमाणे नियम, प्रक्रिया, नियंत्रण, व्यवस्थापन, जबाबदारी, पारदर्शकता, हितसंबंधांचा समतोल, नैतिक आणि कायदेशीर गोष्टीचे पालन करावे लागते. गुंतवणूकदारांचे रक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन करावी लागते. कंपनीच्या संचालक मंडळात एक स्वतंत्र संचालक नेमावा लागतो. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांचा मुख्य उद्देश किमान जोखीम पत्करून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देणे आणि म्युच्युअल फंडांसाठी आवश्यक सुविधा उभ्या करणं हा असतो. या कंपन्या गुंतवणूकदारांची आर्थिक उद्दिष्ट, जोखीम क्षमता, गुंतवणूक कालावधी समजून घेतात. त्याच्या आधारे विविध मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करतात. त्याच्याकडे तज्ज्ञ व्यवस्थापक, तांत्रिक विश्लेषक असतात. आर्थिक संकेतक, कंपनी कामगिरी विचारात घेऊन ते त्यातील जोखिम समजून घेऊन गुंतवणूक संच कसा बनवायचा यासंबंधी निर्णय घेतात. मालमत्ता व्यवस्थापन कंपनीपासून मिळणारे फायदे: ●व्यावसायिक व्यवस्थापकांच्या अनुभवाचा लाभ- वेगवेगळ्या गुंतवणूक संकल्पना पुढे येत असल्याने त्या समजून घेऊन गुंतवणूक करणे दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांकडे तज्ज्ञ सल्लागारांचा ताफा उपलब्ध असल्याने त्यांचा उपयोग होऊन नवीन गुंतवणूकीत होणाऱ्या सर्वसामान्य चुका टाळता येतात. ●गुंतवणुकीचे विविधिकरण: मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांकडे मोठा गुंतवणूक निधी जमा होत असल्याने त्याची विभागणी वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारात करता येत असल्याने एकाच प्रकारच्या गुंतवणुकीतील धोका टाळता येतो. त्यामुळे एकाद्या गुंतवणूकीतून पुरेसा परतावा मिळाला नाही तरी त्याचा योजनेच्या एकूण परताव्यावर फारसा परिणाम होत नाही. ●वेळेची बचत: सध्याच्या वेगवान जगात आपली नोकरी अथवा व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या, महत्वाकांक्षा, छंद यांचा समतोल साधताना गुंतवणूकीकडे सातत्याने लक्ष देणे अनेकदा जमत नाही. मालमत्ता कंपन्या ही जबाबदारी उचलत असल्याने गुंतवणूकदारांच्या वेळेची बचत होते. ●विविध गुंतवणूक प्रकारांची उपलब्धता: जागतिक बाजार, पर्यायी गुंतवणूक आणि पारंपरिक गुंतवणूक असे विविध पर्याय मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या गुंतवणूकदारांना देत असल्याने गुंतवणूकदाराना अनेक पर्याय उपलब्ध होतात. ●जोखीम विभागणी: सर्वसाधारण बाजार कल खाली असताना मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या अशी गुंतवणूक तंत्रे वापरतात ज्यामुळे गुंतवणूकदारांचे कमीतकमी नुकसान होईल. त्यामुळे आर्थिक मंदीतही गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक सुरक्षित असल्याचे समाधान मिळते. 10. व्यवस्थापित मालमत्ता मूल्य (assets under management): AUM हा शब्दप्रयोग अनेकदा आपण ऐकला असेल. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्यावतीने वित्तसंस्था अथवा वित्तीय व्यवस्थापक यांच्याकडून व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या सर्व मालमत्तेचे बाजारमूल्य. ही गुंतवणूक शेअर्स, कर्जरोखे, स्थावर मालमत्ता किंवा अन्य कोणत्याही आर्थिक साधनांत असू शकते. त्यांच्या बाजारमूल्यामुळे या संस्थेकडे किती मोठी जबाबदारी आहे याचा अंदाज गुंतवणूकदार बांधू शकतात. व्यवस्थापित मालमत्तेची मोजणी कशी करायची? व्यवस्थापित मालमत्तेची मोजणी करणं अतिशय सोपं आहे. गुंतवणूक संचातील सर्व मालमत्ता प्रकारांचे बाजारमूल्य काढणे. बाजारमूल्य म्हणजे चालू परिस्थितीत या मालमत्तेची विक्री केली असता मिळू शकणारी किंमत. समजा एखाद्या गुंतवणूक व्यवस्थापकाकडे 100 गुंतवणूकदार आहेत प्रत्येक गुंतवणूकदाराकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स, कर्जरोखे याशिवाय अन्य गुंतवणूक आहे. त्या सर्वांचे बाजारमूल्य म्हणजे व्यवस्थापित मालमत्ता. गुंतवणूक केलेल्या मालमत्तेचे मूल्य बदलत असल्याने व्यवस्थापित मालमत्ता मूल्य सातत्याने वरखाली होत असते. त्यामुळेच ही गुंतवणूक म्युच्युअल फंड योजनेची असेल तर तिचे निव्वळ मालमत्ता मूल्य दररोज दिवसाच्या शेवटी असलेल्या बंद भावांवरून काढले जाते. व्यवस्थापित मालमत्ता मूल्याचे महत्व: मालमत्ता व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीच्या दृष्टीने त्याच्याकडून किती मालमत्ता व्यवस्थापित केली जाते त्याचे मूल्य कळणे महत्वाचे आहे. त्यावरून ती कंपनी किती मोठी आहे याचा अंदाज बांधता येतो. जर ती कंपनी म्युच्युअल फंड योजना व्यवस्थापित करीत असेल, गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळत असेल आणि त्यांचा व्यवस्थापन खर्च कमी असेल तर त्या योजना गुंतवणूकदारांना आकर्षित करतात. अनेक गुंतवणूकदारही त्सदर योजनेत आपली गुंतवणूक वाढवू शकतात अथवा नव्याने गुंतवणूक करू शकतात. योजनेचा भूतकाळ चांगला असेल तर त्यांतील गुंतवणूक वाढू शकते याचा अर्थ एखाद्या योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली असेल तर त्या योजनेचा भूतकाळ चांगला असेलच असे नाही. 11. म्युच्युअल फंड योजना बदली म्हणजे काय? समजा तुमची एक वेगवेगळ्या फुलझाडांची बाग आहे. काही झाडे पूर्णपणे डवरली आहेत तर काही तितकीशी वाढ दाखवत नाहीत त्यामुळे तुम्ही ती उपटून जिथे ती बहरतील अशा दुसऱ्या जागी लावता. गुंतवणूकीच्या जगात असं करणं म्हणजे योजना बदली होय. म्युच्युअल फंडाच्या बाबतीत एका योजनेतील पैसे काढून घेऊन त्याच फंड हाऊसच्या दुसऱ्या योजनेत ते पैसे गुंतवणे. हे अगदी वर उल्लेख केलेल्या झाडाप्रमाणे आहे. योजना बदलीचे महत्व: ●परताव्यातील वाढ: अश्या प्रकारे योजनेतील बदलामुळे एकंदरीत परतावा वाढण्याची शक्यता असते. ●जोखीम व्यवस्थापन: यामुळे असलेला धोका कमी झाल्याने उत्तम जोखीम व्यवस्थापन होण्याची शक्यता असते. ●गरजेनुसार केलेले बदल: आपल्या गरजामध्ये बदल होत असतात त्यानुसार योजनेत बदल केल्याने ते तुमच्या इच्छा आकांक्षाशी अनुरूप असतात आणि जोखीम कमी करतात. योजना बदल कसा केला जातो? ●कोणत्या योजनेत बदल करायचा आहे ती योजना प्रथम शोधली जाते. ●तुमच्या गरजांच्या अनुरूप त्याच मालमत्ता कंपनीच्या अन्य योजनेची निवड केली जाते. ●एक विनंती अर्ज भरून दिला गेला की आधीच्या योजनेतील पैसे काढून घेऊन आलेल्या पैशातून निवडलेल्या नव्या योजनेचे युनिट बाजारभावाने घेतले जातात. असे अर्ज आता ऑनलाइन भरून देण्याची सोय आहे. योजनेतील बदलांमुळे, ●जोखीम कमी होण्याची शक्यता असते. ●पैसे काढून घेऊन पूर्णपणे गुंतवणूक केली गेल्याने त्यातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. ●यामुळे गुंतवणूकदारांची उद्दिष्टे लवकर पूर्ण होऊन लवकर आर्थिक स्थिरता मिळण्याची शक्यता वाढते. सेबीच्या सारथी या अँपवर असलेल्या माहितीचा भावानुवाद (अपूर्ण) ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही याची नोंद घ्यावी) 3 ऑक्टोबर 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम येथे पूर्वप्रकाशीत.

Friday, 3 October 2025

समजून घेऊया, भांडवल बाजारातील गुंतवणूक

#समजून_घेऊया_भांडवल_बाजारातील_गुंतवणूक_भाग_3 9. मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (एएमसी): मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ही एक आर्थिक संस्था असून त्या त्यांच्या ग्राहकांच्या रकमेची गुंतवणूक आणि व्यवस्थापन करतात. सर्वसाधारण गुंतवणूकदार, निवृत्ती नियोजन फंड, बँका, विमा कंपन्या, विविध कंपन्या आणि सरकारही, या सर्वांचा त्यांच्या ग्राहकांत समावेश होतो. किमान जोखीम घेऊन आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त परतावा मिळवून देणे हे मालमत्ता व्यवस्था कंपन्यांचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यांचे कार्य एकाद्या न्यासासारखे असते. म्युच्युअल फंडांचे कार्य ट्रस्टप्रमाणे चालते आणि मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या त्यांच्या गुंतवणूक व्यवस्थापक कंपन्याना म्युच्युअल फंड योजना पुरस्कृत करतात त्यांना नियमानुसार आपली आर्थिक सक्षमता सिद्द ठेवावी लागते. या कंपन्या खाजगी अथवा सार्वजनिक मर्यादित असल्या तरी त्यांना नियामक बंधने पाळावी लागतात. त्याचप्रमाणे कंपनी नियमाप्रमाणे नियम, प्रक्रिया, नियंत्रण, व्यवस्थापन, जबाबदारी, पारदर्शकता, हितसंबंधांचा समतोल, नैतिक आणि कायदेशीर गोष्टीचे पालन करावे लागते. गुंतवणूकदारांचे रक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन करावी लागते. कंपनीच्या संचालक मंडळात एक स्वतंत्र संचालक नेमावा लागतो. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांचा मुख्य उद्देश किमान जोखीम पत्करून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देणे आणि म्युच्युअल फंडांसाठी आवश्यक सुविधा उभ्या करणं हा असतो. या कंपन्या गुंतवणूकदारांची आर्थिक उद्दिष्ट, जोखीम क्षमता, गुंतवणूक कालावधी समजून घेतात. त्याच्या आधारे विविध मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करतात. त्याच्याकडे तज्ज्ञ व्यवस्थापक, तांत्रिक विश्लेषक असतात. आर्थिक संकेतक, कंपनी कामगिरी विचारात घेऊन ते त्यातील जोखिम समजून घेऊन गुंतवणूक संच कसा बनवायचा यासंबंधी निर्णय घेतात. मालमत्ता व्यवस्थापन कंपनीपासून मिळणारे फायदे: ●व्यावसायिक व्यवस्थापकांच्या अनुभवाचा लाभ- वेगवेगळ्या गुंतवणूक संकल्पना पुढे येत असल्याने त्या समजून घेऊन गुंतवणूक करणे दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांकडे तज्ज्ञ सल्लागारांचा ताफा उपलब्ध असल्याने त्यांचा उपयोग होऊन नवीन गुंतवणूकीत होणाऱ्या सर्वसामान्य चुका टाळता येतात. ●गुंतवणुकीचे विविधिकरण: मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांकडे मोठा गुंतवणूक निधी जमा होत असल्याने त्याची विभागणी वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारात करता येत असल्याने एकाच प्रकारच्या गुंतवणुकीतील धोका टाळता येतो. त्यामुळे एकाद्या गुंतवणूकीतून पुरेसा परतावा मिळाला नाही तरी त्याचा योजनेच्या एकूण परताव्यावर फारसा परिणाम होत नाही. ●वेळेची बचत: सध्याच्या वेगवान जगात आपली नोकरी अथवा व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या, महत्वाकांक्षा, छंद यांचा समतोल साधताना गुंतवणूकीकडे सातत्याने लक्ष देणे अनेकदा जमत नाही. मालमत्ता कंपन्या ही जबाबदारी उचलत असल्याने गुंतवणूकदारांच्या वेळेची बचत होते. ●विविध गुंतवणूक प्रकारांची उपलब्धता: जागतिक बाजार, पर्यायी गुंतवणूक आणि पारंपरिक गुंतवणूक असे विविध पर्याय मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या गुंतवणूकदारांना देत असल्याने गुंतवणूकदाराना अनेक पर्याय उपलब्ध होतात. ●जोखीम विभागणी: सर्वसाधारण बाजार कल खाली असताना मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या अशी गुंतवणूक तंत्रे वापरतात ज्यामुळे गुंतवणूकदारांचे कमीतकमी नुकसान होईल. त्यामुळे आर्थिक मंदीतही गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक सुरक्षित असल्याचे समाधान मिळते. 10. व्यवस्थापित मालमत्ता मूल्य (assets under management): AUM हा शब्दप्रयोग अनेकदा आपण ऐकला असेल. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्यावतीने वित्तसंस्था अथवा वित्तीय व्यवस्थापक यांच्याकडून व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या सर्व मालमत्तेचे बाजारमूल्य. ही गुंतवणूक शेअर्स, कर्जरोखे, स्थावर मालमत्ता किंवा अन्य कोणत्याही आर्थिक साधनांत असू शकते. त्यांच्या बाजारमूल्यामुळे या संस्थेकडे किती मोठी जबाबदारी आहे याचा अंदाज गुंतवणूकदार बांधू शकतात. व्यवस्थापित मालमत्तेची मोजणी कशी करायची? व्यवस्थापित मालमत्तेची मोजणी करणं अतिशय सोपं आहे. गुंतवणूक संचातील सर्व मालमत्ता प्रकारांचे बाजारमूल्य काढणे. बाजारमूल्य म्हणजे चालू परिस्थितीत या मालमत्तेची विक्री केली असता मिळू शकणारी किंमत. समजा एखाद्या गुंतवणूक व्यवस्थापकाकडे 100 गुंतवणूकदार आहेत प्रत्येक गुंतवणूकदाराकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स, कर्जरोखे याशिवाय अन्य गुंतवणूक आहे. त्या सर्वांचे बाजारमूल्य म्हणजे व्यवस्थापित मालमत्ता. गुंतवणूक केलेल्या मालमत्तेचे मूल्य बदलत असल्याने व्यवस्थापित मालमत्ता मूल्य सातत्याने वरखाली होत असते. त्यामुळेच ही गुंतवणूक म्युच्युअल फंड योजनेची असेल तर तिचे निव्वळ मालमत्ता मूल्य दररोज दिवसाच्या शेवटी असलेल्या बंद भावांवरून काढले जाते. व्यवस्थापित मालमत्ता मूल्याचे महत्व: मालमत्ता व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीच्या दृष्टीने त्याच्याकडून किती मालमत्ता व्यवस्थापित केली जाते त्याचे मूल्य कळणे महत्वाचे आहे. त्यावरून ती कंपनी किती मोठी आहे याचा अंदाज बांधता येतो. जर ती कंपनी म्युच्युअल फंड योजना व्यवस्थापित करीत असेल, गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळत असेल आणि त्यांचा व्यवस्थापन खर्च कमी असेल तर त्या योजना गुंतवणूकदारांना आकर्षित करतात. अनेक गुंतवणूकदारही त्सदर योजनेत आपली गुंतवणूक वाढवू शकतात अथवा नव्याने गुंतवणूक करू शकतात. योजनेचा भूतकाळ चांगला असेल तर त्यांतील गुंतवणूक वाढू शकते याचा अर्थ एखाद्या योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली असेल तर त्या योजनेचा भूतकाळ चांगला असेलच असे नाही. 11. म्युच्युअल फंड योजना बदली म्हणजे काय? समजा तुमची एक वेगवेगळ्या फुलझाडांची बाग आहे. काही झाडे पूर्णपणे डवरली आहेत तर काही तितकीशी वाढ दाखवत नाहीत त्यामुळे तुम्ही ती उपटून जिथे ती बहरतील अशा दुसऱ्या जागी लावता. गुंतवणूकीच्या जगात असं करणं म्हणजे योजना बदली होय. म्युच्युअल फंडाच्या बाबतीत एका योजनेतील पैसे काढून घेऊन त्याच फंड हाऊसच्या दुसऱ्या योजनेत ते पैसे गुंतवणे. हे अगदी वर उल्लेख केलेल्या झाडाप्रमाणे आहे. योजना बदलीचे महत्व: ●परताव्यातील वाढ: अश्या प्रकारे योजनेतील बदलामुळे एकंदरीत परतावा वाढण्याची शक्यता असते. ●जोखीम व्यवस्थापन: यामुळे असलेला धोका कमी झाल्याने उत्तम जोखीम व्यवस्थापन होण्याची शक्यता असते. ●गरजेनुसार केलेले बदल: आपल्या गरजामध्ये बदल होत असतात त्यानुसार योजनेत बदल केल्याने ते तुमच्या इच्छा आकांक्षाशी अनुरूप असतात आणि जोखीम कमी करतात. योजना बदल कसा केला जातो? ●कोणत्या योजनेत बदल करायचा आहे ती योजना प्रथम शोधली जाते. ●तुमच्या गरजांच्या अनुरूप त्याच मालमत्ता कंपनीच्या अन्य योजनेची निवड केली जाते. ●एक विनंती अर्ज भरून दिला गेला की आधीच्या योजनेतील पैसे काढून घेऊन आलेल्या पैशातून निवडलेल्या नव्या योजनेचे युनिट बाजारभावाने घेतले जातात. असे अर्ज आता ऑनलाइन भरून देण्याची सोय आहे. योजनेतील बदलांमुळे, ●जोखीम कमी होण्याची शक्यता असते. ●पैसे काढून घेऊन पूर्णपणे गुंतवणूक केली गेल्याने त्यातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. ●यामुळे गुंतवणूकदारांची उद्दिष्टे लवकर पूर्ण होऊन लवकर आर्थिक स्थिरता मिळण्याची शक्यता वाढते. सेबीच्या सारथी या अँपवर असलेल्या माहितीचा भावानुवाद (अपूर्ण) ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही याची नोंद घ्यावी) 3 ऑक्टोबर 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम येथे पूर्वप्रकाशीत.