Friday, 29 November 2024
तांत्रिक विश्लेषण
#तांत्रिक_विश्लेषण
बाजारात दिसतो तो मालमत्ता प्रकारांचा बाजारभाव. एक गुंतवणूकदार म्हणून आपल्या गुंतवणुकीचे योग्य मूल्य शोधून कमी किमतीत अथवा रास्त किमतीत (स्वस्त नव्हे) गुंतवणूक संधी शोधणे हे कौशल्याचे काम आहे. यासाठी मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण यांचा आधार घेतला जातो. मूलभूत विश्लेषणात उत्पादक, उत्पादन, विक्री, कमाई यासारख्या व्यवसायाच्या कामगिरीवर आधारित संदर्भांचा विचार केला जातो. यासाठी वार्षिक अहवालाचा उपयोग होतो. मध्यम आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीसाठी या पद्धतीचा वापर करतात. तांत्रिक विश्लेषण भूतकाळातील किंमत, हालचाल, बाजार उलाढाल, त्यांची पद्धती, रचना याच्या उपलब्ध माहितीवरून भविष्यातील कामगिरीचा अंदाज बांधून कोणत्या भावाने खरेदी करायची, काय भाव आल्यावर विक्री करायची याचा अंदाज बांधला जातो. हे करत असताना “भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची सातत्याने पुनरावृत्ती होत असते” हे गृहीत धरले आहे. अल्पकालीन गुंतवणूकदारांना किमान भांडवलात आणि कमी कालावधीत अधिकाधिक नफा मिळवायचा असल्याने ते प्रामुख्याने तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतात.
◆अल्पकालीन गुंतवणूकदार डे ट्रेडर्स, स्विंग ट्रेडर्स, पोझिशनल ट्रेडर्स तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून -
●आपण नेमकी खरेदी अथवा विक्री करून कुठे उलट ट्रेंड घ्यायचा ते ठरवतात.
●समर्थन आणि प्रतिकार पातळी ओळखून आपले नुकसान होऊ नये याची काळजी घेतात.
●बाजार भावना म्हणजे बाजारात तेजी आहे अथवा मंदी आहे किंवा एका विशिष्ट भावातच तो स्थिर झाला आहे ते जाणून त्यात होणारे बदल लक्षात घेतात.
◆हे विश्लेषण जाणून घेताना विविध तक्ते आलेख यांचा वापर केला जातो ते किंमत आणि उलाढाल याचा आधार घेऊन बनवले जातात ते असे-
●रेखा तक्ते - हे बाजाराचा कल एका रेषेत दृश्य स्वरूपात दाखवतात यासाठी विशिष्ठ कालावधीतील छोटे भाग घटना यांचा संदर्भ घेतला जातो.
●बार चार्ट - हे विशिष्ट कालावधीतील खुला बंद भाव सर्वात कमी आणि सर्वाधिक भाव याचा विचार करून बनवलेले असतात त्यामुळे ते रेखा तक्त्याहून अधिक तपशील पुरवतात.
●कॅडल स्टिक चार्ट - हे बार चार्टशी मिळतेजुळते असून त्यामुळे किंमत हालचाल आणि कलबदल ओळखण्यास मदत करतात.
◆तांत्रिक विश्लेषणाचे विविध संकेतक - भविष्यातील किमतीचा अंदाज बांधण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. भारतीय बाजारात वापरले जाणारे सर्वसामान्य संकेतक असे आहेत.
●अद्ययावत सरासरी किंमत (Moving Average) ही विशिष्ट कालावधीतील भूतकाळातील दिलेल्या किंमतीचा विचार करून अंकगणितीय सरासरी घेते तर (Exponential MA)मध्ये अलीकडच्या किमतीचा विचार करून सरासरी काढली जाते. यामुळे अल्प आणि मध्यम काळातील किंमतीचा कल समजून घेऊन अंदाज बांधता येतो.
●सापेक्ष शक्ती निर्देशांक (Relative Strenth Index) अलीकडील ट्रेडिंग कालावधीच्या बंद होणाऱ्या किमतीवरून शेअर किंवा बाजाराच्या शक्तीची म्हणजे अधिक खरेदी होत असल्यास भाव वर जाण्याची शक्यता अथवा अधिक विक्री होत असल्यास किंमती खाली येतील याच्या शक्यता सूचित करतो.
●बदलते सरासरी अभिसरण / विचलन (MA covergences divergence) - यातून दोन इएमए मधील संबध दाखविला जातो. अभिसरणात दोन्ही इएमए एकमेकांच्या दिशेने जातात तर विचालनात एकमेकांपासून दूर जातात अल्प मुदतीत किंमत हालचाल ओळखून त्याचे मूल्यांकन यामुळे करता येते.
●हालचाल रेषा (Trendline) - ही एक रेषा असून तिच्या साहाय्याने बाजार हालचाल म्हणजेच समर्थन आणि प्रतिकार कुठे असतील ते समजू शकते, त्यानुसार व्यवहार करता येतात. या रेषा क्रम संलग्न करून निष्कर्ष काढण्यासाठी वापरल्या जातात. बाजार दिशा आणि सामर्थ्य दाखवतात.
●समर्थन आणि प्रतिकार - भाव पातळी एकच एक दिशा दाखवीत नाही जर भाव वरवर जात असेल तर एका मर्यादेनंतर तो खाली येतो किंवा खाली खाली जाणारा भाव एका मर्यादेवर स्थिर होऊन वाढतो नंतर एका पातळीवर स्थिरावतो. या स्थिरावलेल्या पातळीत भाव वर खाली होत असल्याने कोणत्याही परिस्थितीत गुंतवणूक संधी असतात.
●करारांची संख्या - एकूण खरेदी विक्री करार किती झाले त्याच्या संख्येवरून त्याचप्रमाणे करार करण्यास स्वारस्य असलेल्या गुंतवणूकदारांची संख्या आणि त्यात होणारी उलाढाल अचानक होणारी वाढ यावरून अनेकजण अंदाज बांधत असतात.
या सर्व संकेतकांच्या आधारे मोठ्या प्रमाणात तांत्रिक विश्लेषण केले जाते. बाजारात सर्वाधिक व्यवहार हे झटपट फायदा मिळवणे या प्रकारातले तर त्याखालोखाल मध्यम कालावधीतील गुंतवणूकीत होत असल्याने बाजारफलक सतत हलता राहतो. यासाठी आधार म्हणून काही पद्धती वापरल्या जातात.
●कल ओळख (Trend anyalis) - यामध्ये किंमती वाढत राहतील अजून वाढतील, कमी येतील अथवा आणखी खाली जातील की एका मर्यादित पातळीत राहतील या गोष्टी पाहिल्या जातात.
●समर्थन आणि प्रतिकार (Support and Resistance) - जेथे शेअर्स अथवा बाजाराची घसरण थांबेल तो समर्थन बिंदू आणि जेथे वाढ थांबण्याची शक्यता तो प्रतिकार बिंदू शोधून खरेदी विक्री कोणत्या भावाने केली जावी ते ठरवले जाते.
●बॉलिंगर बँड - यातून सरासरी किंमत पट्याच्या आधारे बाजारातील तरलता आणि त्यातील बदल याविषयी माहिती मिळते.
●फिबोनाची रिटरॅटमेन्ट - हे एक गुणोत्तर आहे ज्यात किंमत खाली किंवा वर जाईल याच्या शक्यता सांगितल्या जातात.
●कॅडलस्टिक - ही एक जपानी पद्धत असून यामध्ये भावातील फरक आकृतिबंधाच्या साहाय्याने पाहण्याचा प्रयत्न करून त्याचा अर्थ लावण्यात येतो. उदा दोजी, हॅमर त्यांना निश्चित असे अर्थ आहेत.
●उलाढाल - विशिष्ट कालावधीतील बाजारातील व्यवहार त्यामध्ये झालेले बदल यावरून अंदाज बांधले जातात.
●विविध आलेख- भावातील बदल आलेखाद्वारे दाखवून त्यातून भविष्यातील किमतीचा अंदाज बांधण्यात येतो. त्यांना हेड अँड शोल्डर, डबल टॉप/ बॉटम, फ्लॅग यासारखी नावे दिली आहेत. अशा अलेखांचे अर्थ ही आहेत.
●पॅरा बोलीक एसएआर- याद्वारे असा बिंदू निश्चित होतो जेथून स्टॉक अथवा बाजार त्याच्या विरुद्ध दिशेत जाईल.
एक वा अनेक पद्धतीने केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या मर्यादा आहेत यातील कोणतीही पद्धत यशाची हमी देत नाही. तांत्रिक विश्लेषक त्यांचा वापर करून आपले व्यापार घोरण ठरवतात. असे करणे आणि त्यावर त्वरित निर्णय घेऊन तो अमलात आणणे हे अतिशय कौशल्याचे काम आहे. अनेकजण सर्वत्र उपलब्ध असलेल्या सारख्या माहितीस स्वतःचे ज्ञान आणि अनुभव यांची जोड देऊन निर्णय घेत असल्याने त्यांचे निष्कर्ष वेगवेगळे असू शकतात. जास्तीत जास्त एकसमान निर्णय असतील त्या दिशेवर बाजार कल झुकतो. तो ओळखण्यात अधिकाधिक अचूकता आली तरच गुंतवणूक यशस्वी होऊ शकते.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)
Friday, 22 November 2024
तुझं माझं आपलं
#तुझं+माझं=आपलं
आजकाल पतिपत्नी दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करीत असतात. “व्यक्ती तितक्या प्रकृती” या न्यायाने त्यांची पैसे खर्च करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. एकाची वृत्ती ही दुसऱ्यास त्याचा कंजूसपणा अथवा उधळपट्टी वाटू शकते. आर्थिक उद्दिष्टही वेगवेगळी असू शकतात उदा. कर्ज घ्यावे की न घ्यावे, घेतल्यास लवकरात लवकर फेडावे की आरामात फेडावे, पैशांचे व्यवहार कुणाशी कोणत्या मर्यादेत करावे, गुंतवणूक कोणत्या मालमत्ता प्रकारात करावी इ. याबाबत मतभेद असू शकतात. त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परस्परातील नातेसंबंधावर प्रभाव पडतो. ज्यांचे एक दुसऱ्याशी पूर्णपणे समर्पण आहे असे मोजकेच अपवाद सोडले तर अनेकांच्या दृष्टीने हा अतिशय नाजूक विषय आहे. एकमेकांना समजून घेऊन कोणतेही पूर्वग्रह न ठेवता संवाद साधल्यास, काही बाबतीत तडजोड केल्यास संसार सुखाचा होतो.
■आर्थिक वादात सन्माननीय मार्ग काढण्याचे उपाय-
●संवाद साधावा -
हा कोणताही वाद मिटवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. आर्थिक विषयातील मतभेद कोणत्याही पूर्वग्रहविरहित चर्चेतून नक्कीच सुटू शकतात. दोन व्यक्तींची जडणघडण वेगळी असल्याने त्यांची आर्थिक मूल्ये, ध्येय, निष्ठा वेगवेगळ्या असणे साहजिकच आहे त्यातून कोणताही एकतर्फी निष्कर्ष काढू नये. मुद्दाम ठरवून निवांतवेळी यावर चर्चा करावी ती करत असताना वैयक्तिक टीकाटिपणी करू नये.
●एकमेकांची पैशांबद्धलची मानसिकता समजून घ्यावी -
प्रत्येकाची पैशांविषयीची मानसिकता ही जडणघडण, अनुभव आणि व्यक्तिमत्त्व यावर अवलंबून असते. काही व्यक्ती या काटकसर करणाऱ्या असतात तर काहीजण सढळ हस्ते खर्च करणाऱ्या असतात. एकमेकांनी ती जाणून घेतल्यास त्यातून त्यातून मध्यममार्ग काढता येतो. एकमेकांनी त्यांच्या कुटुंबीयांनी गुंतवणूक कशी केली. त्यांना कोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर त्यांनी काय उपाययोजना केली, हे जाणून घेतल्यास मध्यममार्ग कोणता त्याचा शोध घेता येईल.
●सर्वसाधारण सहमत असलेल्या आर्थिक धेय्यांना प्राधान्य द्यावे -
सामायिक किंवा त्याच्या जवळपास जाणारी काही उद्दिष्टे असू शकतात उदा घर घेणे, जग पहाणे, कर्जफेड करणे ती वेगळी करून त्यांना प्राधान्य दिल्यास अनेक छोटेमोठे वाद निर्माणच होणार नाहीत. भविष्यकालीन तरतुदींच्या दृष्टीने आकस्मिक अडचणींवर मात करण्यासाठी कुटुंबाचा राखीव फंड असावा तसेच सेवानिवृत्ती नंतरच्या खर्चाची तोंडमिळवणी करण्याएवढा निधी असावा, यावर निश्चित एकमत होऊ शकते. त्यादृष्टीने मिळून प्रयत्न करावेत, नियमित खर्चावरून एकमेकांना टोचून बोलू नये.
●अंदाजपत्रक तयार करावे -
अनेकदा खर्च करताना आपली समजूत अशी असते की आपण योग्य तोच खर्च करतो. आपले काही खर्च असे असतात की जे आपण टाळू शकतच नाही तर काही खर्च पुढेमागे करता येणे शक्य असते एकमेकांनी सहमत नसलेल्या खर्चावर चर्चा करून आपल्या अपेक्षा सांगितल्या तर खर्च, बचत आणि गुंतवणूक यावर निश्चित निर्णय घेता येतील. यासाठी अंदाजपत्रक बनवणे उपयुक्त ठरते त्यात काही बाबतीत थोडेफार स्वातंत्र्य घेता येईल ज्यायोगे दोघांनाही काही खर्च स्वतःच्या मर्जीनुसार करता येईल. आपली मिळकत, खर्च आणि उद्दिष्टे यांचा समन्वय साधणारी मोबाईल अँप्स उपलब्ध आहेत त्यांची मदत घेता येईल. आपल्या अंदाजपत्रकानुसार काही मर्यादेत एकमेकांना मोकळेपणाने खर्च करता आल्यास दोघांनाही आनंद मिळेल.
●आर्थिक जबाबदाऱ्यांची वाटणी करावी -
आर्थिक जबाबदाऱ्यांची वाटणी करणे म्हणजे त्या अर्ध्याअर्ध्या उचलणे असे अपेक्षित नसून आपली बलस्थाने ओळखून त्यांची विभागणी करणे उदा एक व्यक्ती मासिक खर्च सांभाळेल तर दुसरा केवळ दीर्घकालीन गुंतवणुकीवर आपले लक्ष केंद्रित करेल. असे करत असताना कोणालाही दुय्यम न समजता अधूनमधून त्याचे मूल्यांकन करावे प्रत्येकजण आपापली भूमिका सांभाळेल आणि सुरळीतपणे पार पाडेल.
●तडजोड करावी लवचिकता बाळगावी -
दोन व्यक्तींचे आर्थिक प्राधान्यक्रम सारखेच असतील तर ठीक पण नसतील तर त्यावर वाद घालण्यात काही अर्थ नाही. चर्चा करून तडजोड करणं उत्तम. तेवढी लवचिकता असेल तरच मध्यममार्ग निघेल “मी म्हणतो तेच बरोबर” अशी एकतर्फी भूमिका नसावी.
●मोठे आर्थिक निर्णय परस्पर घेऊ नयेत -
काही निर्णय चुकल्यास त्याचे दीर्घकालीन परिणाम कुटुंबावर होत असतात. विशेषतः जवळच्या व्यक्तीस पैसे उधार देणे, जामीन राहणे, मोठी खरेदी इ. हे सर्व आवश्यक असले तरी त्याचे दूरगामी परिणाम होत असतात. या मुद्द्यांवर सर्वसाधारण एकमत नसेल तर त्यातून मोठे वाद निर्माण होऊ शकतात त्यासाठीच्या निश्चित मर्यादा ठरवाव्यात आणि सहमतीने निर्णय घ्यावेत.
●कर्जाबाबत पारदर्शकता असावी -
अनेकदा वेगवेगळ्या कारणाने कर्ज घ्यावे लागते. त्यांची अत्यंत आवश्यक आणि अनावश्यक अशी विभागणी करता येईल. यातील कोणतेही कर्ज जोडीदारास पूर्वकल्पना न देता परस्पर घेऊ नये. यातून काही अडचणी निर्माण झाल्यास अहंकार दुखावला जातो. आपल्या नातेसंबंधात यामुळे वादळ उद्भवण्याची शक्यता असते.
●व्यावसायिक सल्लागाराची मदत घ्यावी -
मोठे मतभेद असलेले आर्थिक निर्णय एकमेकांवर लादणे चुकीचे आहे यासाठी व्यावसायिक आर्थिक सल्लागाराची किंवा विश्वासार्ह जाणकाराची मदत घेता येईल. तो निःपक्षपातीपणे आपले मत सांगेल ते दोघांनीही मोकळेपणाने मान्य करावे.
●समजून घ्यावे आणि संयम पाळावा -
आर्थिक विवाद निवळायला प्रामाणिक प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी वेळ लागतो यासाठी कोणतीही जादूची कांडी उपलब्ध नाही. त्यासाठी समजून घेणे आणि संयमाची अत्यंत गरज असते. “माझंच खरं” करण्यापेक्षा आपलेपणाने प्रत्येक गोष्टीकडे पाहिल्यास आपोआपच सुसंवाद होत राहील. प्रत्येक समस्येची छोट्या भागात विभागणी करावी, छोटी छोटी उद्दिष्टे साध्य होण्याच्या टप्यावर आनंद साजरा करावा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. थोडी असहमती असली तरी कुठेही तोल ढळू देऊ नये.
केवळ आर्थिक बाबीसाठी नव्हे तर जीवनातील सर्वच वादग्रस्त समस्यांसाठी या गोष्टींचा थोड्याफार फरकाने उपयोग होईल, आणि “तुझं”, “माझं” करताकरता ते “आपलंच” होऊन जाईल. संसाराकडे पाठ फिरवणाऱ्या रामदास स्वामींनी त्याच्या मनाच्या श्लोकांतून संसार सुखाचा होण्यासाठी उत्तम मार्ग दाखवला आहे, ते म्हणतात-
तुटे वाद संवाद त्याते म्हणावे
विवेके अहंभाव याते जिणावे।
अहंतागुणे वाद नाना विकारी
तुटे वाद संवाद तो हितकारी।।
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायती या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तीक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 22 नोव्हेंबर 2024 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 15 November 2024
दीर्घकालीन गुंतवणूक काही मंत्रतंत्र
#दीर्घकालीन_गुंतवणूक_काही_मंत्रतंत्र
“मंत्रतंत्र’ म्हटल्यावर अध्यात्मिक, आदीभौतिक संबंधित काहीतरी असावे असे वाटत असेल तर आपली निराशा होणार आहे. मागील लेखात आपण दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे काय? त्याची वैशिष्ट्ये, फायदे/ तोटे समजून घेतले. अशी गुंतवणूक वाटते तितकी सोपी नसली तरी अशक्य नाही. सर्वच दीर्घकालीन गुंतवणूक दीर्घकाळात फायदेशीर ठरेल असे नसल्याने काही सिद्द तंत्रांची माहिती असणे आवश्यक आहे, त्यांला अनुभवाची जोड देऊन आपल्या वृत्तीनुरूप त्यात कल्पक बदलही करावा लागतो. गुंतवणूक अनेक मालमत्ता प्रकारात करता येत असली तरी तुलनात्मक दृष्टीने भांडवल बाजारात गुंतवणूक करणे अधिक लाभदायक आणि सुलभ होऊ शकते, ते कसे हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
गुंतवणूक करताना पाळायचे काही मंत्र -
●सुरुवात लवकरात लवकर करावी.
●संयम पाळावा.
●सखोल अभ्यास करावा.
●विविध मालमत्ता प्रकारात विभाजन करावे.
●भावनेच्या भरात निर्णय घेण्याचे टाळावे.
●आढावा घेऊन अत्यावश्यक तेथे बदल करावे.
●द्यावे लागणारे कर लक्षात घ्यावे.
●निश्चित ध्येय ठरवावे.
हे मंत्र लक्षात ठेवून शिस्तीत आणि संयमाने गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात किफायतशीर ठरते. अनेक गुंतवणूकदार त्विविध पद्धतीने त्यांची गुंतवणूक करीत असतात. त्यातील काही पद्धती अशा
●केवळ खरेदी करीत राहणे आणि सांभाळणे: यापद्धतीत योग्य स्टॉक निवडून तो वाजवी किमतीत (स्वस्त नव्हे) मिळत असल्यास फक्त घेतला जातो आणि दीर्घकाळ सांभाळला जातो. या काळात भावात पडणाऱ्या फरकाचा कोणताही परिणाम होत नाही.
●रुपयांच्या सरासरी किमतीचा लाभ घेणे : आधी ठरवलेली रक्कम ठराविक दिवशी निश्चित केलेल्या मालमत्तेत गुंतवणे. यामुळे दीर्घकाळात सरासरीचा लाभ होतो म्हणजे किंमत कमी असल्यास अधिक मालमत्ता आणि जास्त असल्यास कमी मालमत्ता मिळत असल्याने एकूण मालमत्तेची सरासरी किंमत कमी होते. अशा पद्धतीने नियमित रक्कम बाजूला केल्यास त्यास गुंतवणूक म्हणावे का?
कारण अशा पद्धतीने बचत करता येईल आणि भांडवल निर्माण करण्यासाठी ते योग्यही असेल पण गुंतवणूक ही आपल्या टप्यात आल्यावरच करायची असते. परंतु या पद्धतीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरत असल्याचा अनुभव आहे आणि म्युच्युअल फंड योजनांचा इतिहास तपासता ते सिद्ध झाले आहे. त्यामुळे अनेकजण भांडवल बाजारात या पद्धतीने थेट गुंतवणूक करून प्रत्यक्ष तर म्युच्युअल फंड युनिट खरेदी करून अप्रत्यक्ष पद्धतीने गुंतवणूक करीत असतात.
●डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यातील गुंतवणूक: दीर्घ मुदतीत लाभ होत असला तरी केलेल्या गुंतवणुकीतून नियमित काहीतरी मिळत राहावे अशी काही लोकांची विशेषतः पेन्शन मिळत नसलेल्या सेवानिवृत्त लोकांची गरज असते. मध्यम उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तीला काही अकस्मात खर्च पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी काही रकमेची गरज असते. त्यामुळेच ज्यांचा डिव्हिडंड हा फिक्स डिपॉझिट व्याजाशी मिळताजुळता आहे अशा ठिकाणी गुंतवणूक करून डिव्हिडंड आणि भांडवलवृद्धी या दुहेरी हेतूने अशी गुंतवणूक केली जाते. रिटस आणि इनव्हीट निमिर्तीमागे हाच हेतू आहे. याशिवाय विविध कंपन्या वर्षभर वेगवेगळ्या वेळी आपल्या धारकांना डिव्हिडंड देण्याचे जाहीर करीत असतात. त्यांनी तसे जाहीर केल्याने बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होऊन त्याचा बाजारभाव वाढतो. ही वाढ जाहीर केलेल्या डिव्हिडंडपेक्षा जास्त असते याचा फायदा अनेकजण धुर्तपणे करून घेत असतात. अशीच वाढ कंपनीने बोनस शेअर्स देण्याचे, शेअर्सचे विभाजन करण्याचे अथवा प्राधान्य भाग देण्याचे ठरवल्यावर दिसून येते. ते जाहीर होण्यापासून प्रत्यक्षात मिळेपर्यंतच्या कालावधीत भावात पडणाऱ्या फरकाचा लाभ घेऊन आपले होल्डिंग तसेच ठेवून सरासरी किंमत कमी करता येते.
●इंडेक्स फंड अथवा इटीएफमधील गुंतवणूक: काही गुंतवणूकदार हे इंडेक्स फंड अथवा इटीएफ मध्ये सातत्याने गुंतवणूक करीत असतात यात दिर्घकाळात चांगला परतावा मिळत असल्याने जोखीम कमी आहे. या दोन्हींचे उद्दिष्ट सारखेच असले तरी त्यात थोडा फरक आहे. गुंतवणूकदारास म्युच्युअल फंडाचे युनिट हे त्याच्या मालमत्ता मूल्याने (एनएव्ही) फंडहाऊसकडून इटीएफ हे बाजारमूल्याने (मार्केट प्राईज) भांडवल बाजारातून घ्यावे लागतात.
●मूल्य ओळखून केलेली गुंतवणूक : भांडवल बाजार हा काही काळ एक तर वाढत किंवा कमी होत असतो अथवा अनेकदा एकाच पातळीवर स्थिरावलेला असतो. गुंतवणूकदारास शेअरचा बाजारभाव दिसत असतो परंतु वेगवेगळ्या मूलभूत आणि तांत्रिक गोष्टींची मदत त्याचे वास्तविक मूल्य काढता आले आणि त्यात आधी गुंतवणूक करता येते. ही गुंतवणूक जेवढी लवकर होईल तेवढी अधिक लाभदायक ठरू शकते.
●वाढणाऱ्या शेअर्समधील गुंतवणूक : ज्यांचे भाव सातत्याने वाढत आहेत असे चांगल्या कंपन्यांचे शेअर्स निवडून त्यामधील गुंतवणूक अनेकजण सातत्याने थोडी थोडी वाढवत असतात. त्यांना ट्रेंड फॉलोअर्स असे म्हणतात हा ही दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा मार्ग होऊ शकतो. भाव खाली आल्यावर अनेकजण सरासरी करण्यासाठी गुंतवणूक करीत असतात त्यांच्या एका विशिष्ट मर्यादेनंतरही भाव खाली आल्यास वैफल्य येऊ शकते त्यामुळे मोठ्या प्रमाणात भांडवल अडकून राहते. त्यापेक्षा ही पद्धत अधिक उजवी आहे.
●भावपातळी समजून केलेली गुंतवणूक - एका विशिष्ट किमतीस अर्धी गुंतवणूक करून त्याच्या अथवा बाजाराच्या भावपातळीखाली भाव गेल्यास अल्प खरेदी आणि वर गेल्यास किंचित विक्री असे करून उरलेल्या रक्कमेची गुंतवणूक करीत गेल्यास भावात पडणाऱ्या मोठ्या फरकाचा गुंतवणूकदारावर ताण पडत नाही.
●विशिष्ट प्रकारातील गुंतवणूक : यापद्धतीने गुंतवणूक करणारे केवळ विशिष्ट सेक्टर, बाजार सायकल, इंडेक्समधील स्टॉक, मार्केट लिडर्स यात आपली गुंतवणूक करतात. हे स्टॉक नेहमी महागच असतात अंदाज चुकल्यास बराच काळ त्यात पैसे अडकून राहू शकतात अथवा नुकसान स्वीकारावे लागते.
●विशिष्ट हेतू मनात ठेवून केलेली गुंतवणूक : काही विशिष्ट हेतू निश्चित करून ही गुंतवणूक केली जाते. जसे सनराईज सेक्टर, इएसजी क्षेत्रात केलेली गुंतवणूक. यातील मुख्य हेतू हा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे आपले सामाजिक भान जपावे एवढाच मर्यादित असतो.
●विभागून केलेली गुंतवणूक- अशी गुंतवणूक भांडवल बाजारातील विविध क्षेत्रात विभागून करण्यात येते दरवेळी काही क्षेत्रे उत्कृष्ट कामगिरी करीत असल्याने त्यातील जोखीमही विभागली जाते.
●समतोल साधत केलेली गुंतवणूक -आपल्या गुंतवणूकीचे मूल्यमापन करून आवश्यक असल्यास त्यात बदल केला जातो. यात वारंवार बदल करणे अपेक्षित नसून केवळ अत्यावश्यक बदलच अपेक्षित असतात.
●कर वाचवण्यासाठी केलेली गुंतवणूक- ही एक गुंतवणूक पद्धत आहे. भांडवल बाजारातील गुंतवणुकीस काही कर सवलती असून केवळ कर वाचववा एवढाच त्याचा मुख्य हेतू असतो.
याशिवाय गुंतवणूक तज्ञ अनेक पद्धती सुचवत असतात स्वतः टिप्स देत असतात केवळ त्यावर विश्वास ठेवूनही अनेकजण गुंतवणूक करतात. या पद्धती म्हणजे आपली अंतिम गुंतवणूक पद्धत नसून आपल्याला योग्य वाटणारी गुंतवणूक पद्धत शोधून बँक टेस्टिंगद्वारे तिची व्यवहार्यता तपासून वेळोवेळी त्याचा आढावा घेऊन आवश्यक तेथे बदल केल्यास आपण यशस्वी गुंतवणूकदार होण्याच्या शक्यता वाढतात. गुंतवणूक करताना काही ठिकाणी तोटा होणे स्वाभाविक असले तरी आपले भांडवल सुरक्षित राहून आपल्याला सातत्याने महागाईवर मात करणारा परतावाही मिळायला हवा. तंत्र कोणतेही असो. आपल्याकडील गुंतवणूकयोग्य निधी, आर्थिक उद्दिष्ट, जोखीम क्षमता, कामगिरी आणि गुंतवणूक कालावधी यासर्वाचे सदैव भान असावे.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 15 नोव्हेंबर 2024 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 8 November 2024
दीर्घकालीन गुंतवणूक
#दीर्घकालीन_गुंतवणूक
मागील काही भागात आपण अल्प मध्यम आणि दीर्घ कालावधीवर आधारित विविध गुंतवणूक पद्धतीची ओळख करून घेत आहोत. यातील कालमर्यादा ही व्यक्तीसापेक्ष असली तरी ती शेअर्स, विविध म्युच्युअल फंड योजनांचे युनिट, इटीएफ,बॉण्ड, सरकारी रोखे, रिटस, इनव्हीट, सोने चांदी यासारखे मौल्यवान घातू, स्थावर मालमत्ता, दुर्मिळ वस्तू, चित्र अशा कोणत्याही मालमत्ता प्रकारात करता येते. आयकर कायद्यानुसार त्याचा प्रकार आणि मालमत्ता बाजारातील नोंदणी यानुसार त्यातील एक ते दोन वर्षावरील गुंतवणूक म्हणजे दीर्घकाळ असतो. केवळ गुंतवणुकीतून बेंजामिन ग्रॅहम, वॉरेन बफे, चार्ल्स मंगुर, पीटर लीच यांनी गुंतवणूकदारांत जागृती करून प्रचंड बाजारमूल्य निर्माण करून आदर्श ठेवला आहे.
“सब्र का फल मिठा होता है!” याच अर्थाने त्यामुळेच जगभरातील गुंतवणूक तज्ञांच्या मते अश्या पद्धतीने गुंतवणूक करणे सर्वश्रेष्ठ मानले जात असावे.
■वैशिष्ट्ये-
●मोठा गुंतवणूक कालावधी - गुंतवणूक तज्ञांच्या मते साधारणतः 5 वर्षाहून अधिक, शेअर्स म्युच्युअल फंड युनिट याबाबत हा कालावधी 7 वर्ष असून या प्रकारात गुंतवणूक विभागून ठेवली असल्यास या कालावधीत आकर्षक परतावा मिळण्याची अधिक शक्यता असते.
●दलाली आणि अन्य खर्च कमी - अशी गुंतवणूक वारंवार केली जात नसल्याने त्यासाठी द्यावी लागणारी दलाली व अन्य शासकीय कर हे तुलनेने कमी असतात.
●जोखीम - आशा प्रकारच्या गुंतवणुकीत गुंतवणूकदाराने घेतलेली जोखीम ही मध्यम ते तीव्र या स्वरूपाची असते.
●गुंतवणूक विविध मालमत्ता प्रकारात - जाणीवपूर्वक जोखीम स्वीकारून यातून अधिक लाभाची अपेक्षा असल्याने अशी गुंतवणूक विविध मालमत्ता प्रकारात कमी अधिक प्रमाणात विभागली जाते.
●चक्रवाढवाढीचा लाभ- गुंतवणूक कालावधी दीर्घ असल्याने त्यातील चक्रवाढवाढीचा लाभ मिळण्याची शक्यता असते जितका अधिक कालावधी तेवढा लाभ अधिकाधिक वाढत जातो.
●संशोधन आणि संयम - ही गुंतवणूक करताना मालमत्ता प्रकारचे मूलभूत आणि तांत्रिक असे संशोधन करून त्यावरील दीर्घकालीन धोरण ठरवण्यात येते.
■फायदे-
●प्रचंड परतावा - चक्रवाढ वेगाने मिळणारा परतावा दीर्घकाळात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रकमेत प्रचंड वाढ होते.
●जोखीम कमी -गुंतवणूक कालावधी मोठा असल्याने कोणत्याही मालमत्ता प्रकारातील जोखीम ही कमी कमी होत जाते. अधिक जोखीम घेतल्यास अल्पकाळात लाभ अथवा तोटा अधिक होण्याची शक्यता दीर्घकाळात कमी होते.
●शिस्त - बचत नियमितपणे तर कोणतीही गुंतवणूक ही योग्य संधी साधून करायची असते याची आपोआपच सवय लागते. त्यादृष्टीने मनाची तयारी होते.
●करलाभ- दीर्घकालीन गुंतवणुकीतून मिळणारा लाभ हा भांडवली नफा समजण्यात येऊन तुमचे उत्पन्न कितीही असेल तरी त्यावर सवलतीच्या एकसमान दराने कर आकाराला जातो. शेअरबाजार संबंधित अशा दीर्घकालीन भांडवली लाभावरील कर आकारणी काही मर्यादेत करमुक्त तर त्यावरील अधिक लाभावर कमी दराने कर आकारणी होत असल्याने आपोआपच एकूणच करदेयता कमी होते.
●संपत्ती निर्मिती - दीर्घकाळ गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण होते. त्यामुळे गुंतवणूकदार केवळ श्रीमंत न होता धनवान होतो. (रिच आणि वेल्थ यातील फरक समजून घ्या)
●निवृत्ती नियोजन - ज्यांना आपल्या भविष्यातील निवृत्तीकाळाचे आर्थिक नियोजन करायचे आहे. त्याच्यासाठी लवकरात लवकर सुरुवात करण्याची ही आदर्श पद्धती आहे.
तोटे-
●कमी रोकडक्षमता - काही मालमत्ता प्रकारात मोठ्या प्रमाणावर लाभ दिसत असला तरी तो प्रत्यक्षात मिळवण्यात अडचणी असल्याने त्यातून अपेक्षित रक्कम योग्य वेळी मिळेल याची शक्यता कमी असते.
●बाजार हालचाल - मालमत्ता बाजार सातत्याने हलता असतो त्यामध्ये वर्षभरात पडणारा फरक हा खूप मोठा असतो या संधीचा फायदा घेता येत नाही.
●महागाईमुळे होणारा तोटा - काही मालमत्ता प्रकारात केलेली गुंतवणूक महागाई दरावर मात करणारी नसल्यास त्यामुळे त्यातील गुंतवणुकीचे मूल्य कमी होते.
●बाजार संधी- गुंतवणूक धोरण आधीच ठरवलेले असल्याने अन्य उपलब्ध संधीचा लाभ घेता येत नाही.
●गुंतवणूक प्रकारात सहज बदल अशक्य - विविध मालमत्तेतील गुंतवणूक प्रमाण बदलायचे असल्यास त्यातील बदल सहज करता येत नाहीत.
●भुराजकीय हालचाली- देशातील आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील ताण तणावाचा प्रभाव मालमत्तांच्या किंमतीवर पडण्याचा संभव यात अधिक आहे.
●मानसिक ताण - यात होणारे बदल हे अनेकांच्या अपेक्षेनुसार नसल्यास त्या सर्वांचा गुंतवणूकदारांच्या मनावर ताण येऊ शकतो.
■दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठीच्या विशेष सूचना
●आपले निश्चित गुंतवणूक ध्येय ठरवावे
●जोखीम क्षमतेनुसार विविध मालमत्ता प्रकारात गुंतवणूक विभागणी करावी.
●संधी साधून योग्य वेळीच गुंतवणूक करावी.
●नियमीत कालावधीनंतर (सर्वसाधारणपणे वर्षातून किमान एकदातरी) गुंतवणुकीचा आढावा घेऊन आवश्यक असल्यास बदल करावेत. वारंवार बदल करू नयेत त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.
●यासंबंधात माहिती मिळवून स्वतःला अद्यावत ठेवणे उत्तम. शिक्षणात केलेली गुंतवणूक कधीही फुकट जात नाही. आज अनेक मंच या संबंधातील उत्तम शिक्षण अल्प खर्चात उपलब्ध करून देत आहेत.
●आधी सांगितल्याप्रमाणे श्रध्दा आणि सबुरी ठेवणं अत्यावश्यक.
दीर्घकालीन गुंतवणूक वाटते तेवढी सहज सोपी नाही त्यासाठी निश्चित मनोभूमिका असणे आणि त्याचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असते. त्याची काही सिद्ध झालेली अनेक गुंतवणूक धोरणे किंवा पद्धती आहेत त्यातील कोणती धोरणे गुंतवणूकदार म्हणून आपल्याला पूरक होऊ शकतात ते ठरवण्यासाठी व्यावसायिक गुंतवणूक सल्लागाराची मदत होऊ शकते. अनेकांना गुंतवणूक करताना मध्यस्थाकडून आपल्याला काहीतरी कमिशन मिळावे अशी अपेक्षा असते ते अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे मध्यस्थही त्याला अधिक कमिशन किंवा अन्य लाभ देणाऱ्या योजना गुंतवणूकदारांच्या गळ्यात मारण्याची शक्यता असते म्हणूनच मध्यस्थ निवडण्यास अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घेण्यास कोणताही संकोच बाळगू नये. केशवसुतांनी त्यांच्या सतारीचे बोल या त्यांच्या दीर्घ कवितेत
धीर धरी रे धीरा पोटी
असती मोठी फळे गोमटी
ऐक मनीच्या हरितील गदा
ध्वनि हे ....
दिड दा, दिड दा, दिड दा …
असे आपल्याला सुचवले आहेच.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखातील मते वैयक्तिक आहेत)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 8 नोव्हेंबर 3024 रोजी पूर्वप्रकाशीत.
Subscribe to:
Posts (Atom)