Friday, 3 February 2023
स्विंग ट्रेडिंग
#स्विंग_ट्रेडिंग
शेअरबाजारात व्यवहार करण्याच्या विविध पद्धती आहे. यातील डे ट्रेंनिग म्हणजे व्यवहार केल्यापासून दिवसभरात पूर्ण व्यवहार करणे म्हणजेच शेअर खरेदी केले असल्यास विकणे किंवा विकले असतील (शॉर्ट सेल) तर खरेदी करून दिले हा कालावधी सेकंदाच्या काही भागापासून त्या पूर्ण दिवसाच्या कालावधी एवढा असू शकतो याशिवाय अल्प, मध्यम दीर्घ मुदतीचे व्यवहार होऊ शकतात. यामध्ये जितका कालावधी अधिक असेल आणि जेवढ्या विविध क्षेत्रात गुंतवणूक विभागली जाईल तेवढी त्यातील जोखीम कमी होते.
स्विंग ट्रेडिंग हा अल्प किंवा मध्यम गुंतवणुकीचा प्रकार असून यात कमी जोखीम स्वीकारून कमीतकमी कालावधीमध्ये अधिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. स्विंग म्हणजे अल्प कालावधीत शेअरच्या किंमतीत फरक पडण्याची दिशा, याचा अंदाज घेऊन आपण थोडे थांबून अपेक्षित भाव आल्यावर ते शेअर विकून टाकणे. ज्याला तांत्रिक भाषेत पॉझिशनल ट्रेड यात दीर्घकालीन गुंतवणूक हा विचार नसून भाव आपल्या टप्यात आल्यावर विकून बाहेर पडणे असाच काहीसा हा प्रकार आहे. यातील गुंतवणूक कालावधी एक दिवस, काही दिवस/ आठवडे असू शकतो.
स्विंग ट्रेडींगसाठी कंपनी निवडताना मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषणाची (Fundamental and technical anyelesis) मदत घेतली जाते. मूलभूत विश्लेषण चांगली कंपनी निवडण्यास तर तांत्रिक विश्लेषण विशिष्ट कालावधीत अपेक्षित भाव मिळण्यासाठी.
अनेक प्रसिद्ध स्विंग ट्रेडर्सनी अल्प कालावधीत भरपूर कमाई केली आहे शेअरचे भाव वाढायला सुरुवात होतेय तोच नेमकी खरेदी आणि आता खाली येणार त्यापूर्वी नेमकीच विक्री हे तंत्र त्यांना अवगत झाल्याने कमी कालावधीत सर्वाधिक नफा ते कमवू शकले.
स्विंग ट्रेडिंगसाठी कंपनी योग्य निवडायला हवीच याशिवाय त्यास दोन पद्धतींची जोड देता येईल
1तांत्रिक विश्लेषण आणि 2 बाजाराचा कल
तांत्रिक विश्लेषणाची जोड देताना अल्पकाळात भावात पडणारा फरक, त्यातील सातत्य, किती ट्रेड किती कालावधीत घेणार की सर्वाधिक फायदा होईल ते ठरवावे लागेल.
बाजाराचा कल पाहून ट्रेड घेताना सध्याची बाजार परिस्थिती बाजारातून कंपनी विषयी मिळणाऱ्या अनुकूल बातम्या याचा वापर कमी वेळेत अधिक फायदा मिळवण्यासाठी कसा करता येईल ते ठरवावे लागेल
यातील कोणत्याही पद्धतीने स्विंग ट्रेडिंग करायचे असल्यास काही गोष्टी आधीच ठरवाव्या लागतील.
खरेदी पातळी- कोणत्या बाजारभावाने किती शेअर्स खरेदी करायचे?
विक्री किंमत- कोणत्या बाजारभावाने यातून बाहेर पडायचे म्हणजेच विक्री करायची?
स्टॉप लॉस: आपण अपेक्षित कालावधीत स्टॉकने भाववाढ न दाखवता घट झाली तर कोणत्या भावाने सर्व शेअर्स विकायचे ज्यामुळे किमान तोटा होऊन पैसे अधिक कालावधीसाठी दीर्घकाळ अडकून राहणार नाहीत.
स्विंग ट्रेडिंगचे लोकप्रिय प्रकार
1किंमत भाववाढ समजून घेऊन: यात ट्रेडर अशी संधी शोधतो ज्यामध्ये एका विशिष्ठ भावपासून कमी कालावधीत सर्वाधिक भाव वाढत यासाठी वेगवेगळे किंमत आधार आणि अवरोध (support and resistance) निश्चित करावे लागतात. किंमत आधार आणि अवरोध शोधण्यास तांत्रिक विश्लेषणातील विविध आलेख रचनांचा आधार घेतला जातो.
2.किंमत सरासरीचा आणि कल याचा आधार घेऊन: यात खरेदी पातळी विक्री किंमत ठरवण्यासाठी मागील काही दिवसाच्या सरासरी किमतीचा आधार घेतला जातो. यासरासरी किमत रेषेवरून पुढील भावाचा अंदाज बांधला तो खाली जाईल की वर येईल ते ठरवण्यात येते. या तून निघणाऱ्या दोन्ही रेषा एकमेकांना छेदून कोणता कल दाखवतील तो वाढ दर्शवेल तर खरेदी आणि घट दर्शवेल त्या किमतीस विक्री केली जाते.
3 साधी सरासरी किंमत पाहून : यात नावाप्रमाणेच सरासरी भाव पाहिला जाऊन मागील 10 दिवसांची आणि 20 दिवसांची सरासरी एकमेकांना जेथे छेदते त्यानंतर येणारी किंमत यांचा विचार करून अंदाज बांधला जातो.
याशिवाय तांत्रिक विश्लेषणाशी संबंधी असलेल्या फिबोनासी रिटेचमेन्ट सस्ट्रॅटेजी, बॉलिंगर बँडस इंडिकेटर स्ट्रॅटेजी, गोल्डन गेट स्ट्रॅटेजी यासारख्या तांत्रिक विश्लेषण पद्धतींचा वापर करून स्विंग ट्रेडर्स कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी ते काय भावाने खरेदी करावेत आणि किती कालावधीत काय भाव गेला तर किंवा नाही गेला तरी विकावेत याचा निर्णय घेतात. यासाठी तांत्रिक गोष्टींचे ज्ञान, शिस्त, चिकाटी आणि अनुभव आवश्यक आहे. ज्यातील एक अथवा अनेक पद्धती किंवा त्यांचे एकत्रिकरण करून एक वेगळीच काळाच्या कसोटीवर उतरणारी स्वतःला उपयोगी पडेल अशी पद्धत गुंतवणूकदार ठरवू शकेल.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे पदाधिकारी असून लेखात व्यक्त मते वैयक्तीक असल्याची नोंद घ्यावी)
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 3 फेब्रुवारी 2023 रोजी पूर्वप्रकाशीत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment