Saturday, 24 December 2022

करोडपती कसे व्हावे?

#करोडपती_कसे_व्हावे? माझ्या लहानपणी म्हणजे 50 वर्षांपूर्वी दहा हजार ही खूप मोठी रक्कम होती जसजसा काळ गेला आणि महागाई वाढली तसं 10 हजाराची जागा एक लाख रुपयांनी घेतली. मला आठवतंय सन 1992 मध्ये तत्कालीन आयडीबीआयने 25 वर्षांनी एक लाख रुपये मिळू शकतील असे डीप डिस्काउंट बॉण्ड बाजारात आणले होते जे गुंतवणूकदारांना ₹2700/- ला देऊ केले होते. यानंतर सरदार सरोवर नर्मदा निगम, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांनी आणि अनेकांनी 25 ते 35 वर्षे मुदतीचे जास्त व्याजदर असलेले बॉण्ड देऊ करून गुंतवणूकदारांना मोठ्या रकमेचे स्वप्न दाखवले होते. हे सर्वच बाँड त्यात असलेल्या बाहेर पडण्याच्या पर्यायांनुसार कमाल 5 ते 12 वर्षात बंद झाले कारण व्याजदर नंतर कमी कमी होत गेल्याने असे महागडे बॉण्ड चालू ठेवणे शक्य नव्हते. वित्तसंस्थाच्या दृष्टीने हा आतबट्याचा व्यवहार होता ती गोष्ट वेगळी पण अनेकांचे ते स्वप्न होते. आज तीच जागा एक कोटी रुपयांनी घेतली आहे ही रक्कम भविष्यात अपुरी पडू शकेल अनेक तज्ञांचे मत आहे. माझ्या एका स्नेह्यांच्या मते ही महागाई नव्हेच तर चलनाचे अवमूल्यन झाले आहे. प्रत्यक्षात जीवनावश्यक वस्तूचे भाव फारसे वाढले नाहीत तर तुलनेने कमी झाले आहेत परंतू आपल्या अन्य गरजा वाढल्या असल्याने खर्च वाढत असून आपले राहणीमान पूर्णपणे बदलले आहे. आपण त्याला ते उंचावले आहे असे समजतो आणि अनावश्यक खर्च वाढवत आहोत. आज अनेक व्यक्ती आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कदाचित काही रक्कम वाचवू शकतील ते जितकी जास्त रक्कम कमी वयात वाचवू शकतील त्यांचे हे स्वप्न बचतीने पुरं झालं तरी वर म्हटल्याप्रमाणे स्वप्न पाहिलेल्या एक कोटींची जागा 10 कोटींनी घेतली असेल. तेव्हा भविष्यात काय वाढलंय हे जाणून मोठं स्वप्न पाहायला हवं. बचत आणि गुंतवणूक करून काही शिस्त पाळली तर हे स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकतं. ₹ दहा हजार काही वर्षात जर एक कोटींमध्ये परावर्तित झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. यासाठी लवकरात लवकर सुरुवात करणे जेवढे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे या गुंतवणुकोचा कालावधी आणि सातत्याने उच्च परतावा मिळवून देऊ शकणारे साधन महत्वाचे आहे. नेहमी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून, तरुणांना लवकरात लवकर आपल्या उत्पन्नातील काही भाग हा बचतीकडे वळवण्याचा सल्ला दिला जातो. बहुदा अनेकजण जणू ते बहिरेच आहेत असं समजून ऐकलं न ऐकल्यासारखं करून त्याकडे दुर्लक्ष करतात. 30/ 35 वर्षानंतर येऊ शकणारा काळ कसा असेल आपलं जीवन कस असू शकेल याचा विचार करण्याएवढी प्रगल्भता त्याच्याकडे नसते. त्यामुळे आयफोन घेणे, महागडी कार घेणे अशा प्रकारची स्वप्ने पाहताना काहीच नाही तर गुंतवणूक म्हणून म्युच्युअल फंड योजनेची एसआयपी करायची तर इएमआयच्या चक्रात ते सापडतात. आपल्या करियरच्या सुरुवातीस थोडी बचत त्यातून काही गुंतवणूक अशी शिस्त लावूनच करायला हवी. 30 वय असलेल्या व्यक्तीचा किमान मासिक आवश्यकतावरील खर्च जर दरमहा ₹तीस हजार असेल तर 6% चलनवाढ धरून होणारा मूल्यऱ्हास विचारात घेता हाच मासिक खर्च त्याच्या 60 व्या वर्षी दरमहा 1 लाख 72 हजार असेल. तुम्ही नियोजनशून्य असाल तर खर्चात होणारी ही छुपी वाढ एकदम न होता हळू हळू होत असते हे लक्षातही येणार नाही. दरवर्षी मिळणारी पगारवाढ यामुळे मूल्यवाढीची फारशी झळ पोहोचत नाही फरक पडतो तो मिळणारे उत्पन्न अचानक बंद होते तेव्हा. याचा सर्वाधिक फटका बसतो तो तुम्ही आजारी पडल्यावर, तरुण असताना तसेच नोकरीत असतांना याचा फारसा फटका बसत नाही परंतु वयोमानानुसार आणि असाध्य रोग होण्याची शक्यता ही साठ वर्षांनंतर असल्याने यावर उपचार आणि नियंत्रण ठेवण्यासाठी तुमच्या मासिक खर्चाच्या 20% रक्कम खर्च होऊ शकते आणि मोठे आजारपण आले तर आप्तेष्टांकडे हात पसरण्याची वेळ येते. आताचा असणारा मासिक खर्च हा आपली सध्याची खर्चपद्धती कायम 30 वर्धात 30 हजारहून 1 लाख 72 हजार होईल हे आपण पाहिलं यात महागाई वाढ 6 % गृहीत धरली आहे. तेव्हा उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता नसल्यास तेव्हा उपलब्ध असणारी रक्कम कमीकमी होत जाऊन संपेल यासाठी आपल्याला उपलब्ध रक्कम ही 1 कोटी असून पुरणार नाही. ती अधिक लागेल कारण आपल्या निवृत्तीनंतर महागाई वाढतच राहणार याला फक्त जुन्या पद्धतीने पेन्शन मिळणारे लोक हेच अपवाद राहतील. नवीन पेन्शन धारकांना वाढीव पेन्शन देण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असले तरी याबाबत अजून सरकारी धोरण काय असेल यासंबंधी पुरेशी स्पष्टता नाही. त्यांना आता मिळत असलेल्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये भरीव वाढ झाली तरी ती तिथेच स्थगित होत असल्याने तेही काही वर्षांनी उत्पन्न कमी आणि खर्च अधिक असे झाल्याने अपुरेच पडणार. निवृत्तीनंतर उपलब्ध फंड 1 कोटी असून त्यावर वार्षिक 8% दराने परतावा मिळाल्यास आणि खर्च 1 लाख 72 हजार असेल उपलब्ध रक्कम 5 वर्षात संपेल, 3 कोटीरुपयात 16 वर्ष तर 5 कोटी रुपयात 32 वर्षे काढता येतील. तेव्हा वाढलेली आयुर्मर्यादा विचारात घेऊन आपल्याला उपयोगी निवृत्ती योजना बनवायची असेल तर एक कोटी ऐवजी तुम्हाला 5 कोटींचे उद्दिष्ट ठेवावे लागेल दीर्घकाळ तुमची गरज भागवू शकेल असा परतावा आपल्याला भांडवल बाजारातील गुंतवणुकीतून मिळू शकतो आपले आर्थिक उद्दिष्ट ठरले की आपली योजना तुम्ही बनवू शकता. अल्पकाळात यातील गुंतवणूक बरीच धोकादायक वाटत असेल तरी 10, 20, 30 वर्षांनी त्याची तीव्रता कमी कमी होत जाते. अनेकजण भविष्यकालीन गुंतवणूक म्हणून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) हा पर्याय निवडतात यावर मिळणारा परतावा हा महागाईवर जेमतेम मात करतो. गेल्या 20 वर्षात पीपीएफ मधील गुंतवणुकीची तुलना सेन्सेक्स या निर्देशांकाशी केली असता 1 लाख रुपयांची गुंतवणूक पीपीएफमध्ये 30 वर्षांनी 5 लाख झाली तर सेन्सेक्समधील गुंतवणूक याच कालावधीत 24 लाख 21 हजार झाली तेव्हा केवळ सुरक्षितता यावर कितपत समाधान मानायचे याचाही विचार करायला हवा. पीपीएफ मधील सुरक्षितता आणि थेट भांडवल बाजारातील गुंतवणुकीस उपलब्ध असलेला इक्विटी म्युच्युअल फंडाच्या योजना हा मध्यममार्ग होऊ शकतो यातील गुंतवणूक ही स्वतः संशोधन करून गुंतवणूक करण्यापेक्षा तुलनेने सोपी आहे. *यात सहज योजना बदल करता येतो. *निवडीस अनेक पर्याय उपलब्ध असतात. *गुंतवणूक कमी अधिक करण्याची सुविधा. किमान गुंतवणूक अत्यंत कमी. *पारदर्शक आणि नियंत्रित त्यामुळे जोखीम कमी. *योजनेतील सहभाग कधीही काढून घेता येतो. याउलट थेट गुंतवणुकीच्या असणाऱ्या समभाग गुंतवणूक व्यवस्थापन योजनांत (पीएमएस) सध्याच्या नियमानुसार किमान ₹ 50 लाख गुंतवणूक करावी लागते. ती किमान निर्धारित काळ ठेवावी लागते. म्युच्युअल फंड योजनेतून काही वर्षानंतर लागणारी कोटींमधील रक्कम जमा करताना- *अपेक्षित परतावा निश्चित करा इंडेक्स फंडातून 14% परतावा मिळाला आहे. *आपल्याला किती रक्कम लागेल ते ध्येय निश्चित करा. *यासाठी लागणारा कालावधी ठरावा. *1 कोटी रक्कम 10 वर्षात जमा करायची असल्यास ₹30600/- दरमहा गुंतवावे लागतील पण हीच रक्कम 30 वर्षात जमा करायची असेल तर ₹1300/- दरमहा गुंतवावे लागतील. यात मिळणारा परतावा 10% दराने असल्याचे गृहीत धरले आहे. यातील कोणतीही गोष्ट बदलली तर उत्तर बदलेल. *तीन इक्विटी आधारित योजना निवडा. *आवश्यक रकमेचे एसआयपी करा. *त्यावर अधूनमधून लक्ष ठेवा. *यात बदल करणे आवश्यक असेल तर त्याचे कर या दृष्टीने होणारे परिणाम तपासून पहा. *श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र लक्षात ठेवा. *आवश्यक असेल तर फी आकारून सल्ला देणाऱ्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या लक्षात ठेवा इथे किंवा कुठेच काही फुकट मिळत नाही. अनेक गुंतवणूकदार बाजारात पडणाऱ्या फरकाने घाबरून जाउन चुकीच्या वेळी खरेदीविक्री करतात. आपल्या अनावश्यक गरजांसाठी गुंतवणूक काढून घेतात. सध्याचा गुंतवणूकदारांचा गुंतवणूक कालावधी सरासरी दोन वर्ष आहे त्यामुळे अनेकदा यातील फायदा अनुभवता येत नाही. केवळ हे टाळून थोडी डोळस गुंतवणूक केलीत तर नक्कीच करोडपती व्हाल. ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (आकडेवारी संदर्भ व्हॅल्यूरिसर्च ऑनलाइन या संकेतस्थळावरून मिळवला आहे. लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेच्या कार्यकारणीचे सदस्य असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तीक आहेत) अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 23 डिसेंबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.

No comments:

Post a Comment